February 24, 2009

कोलकत्यात शिशिरांतील एक सकाळ



-----

कोलकात्यात शिशिरांतील एक सकाळ.
चार दिवसांच्या माझ्या मुक्कामात एक दिवस सकाळीच मी फिरावयास निघतो.
हवेंत अजूनहि धुके आहे, आणि सुखद गरवा.

व्हिक्टोरिया मेमोरियल समोरच्या रस्त्यावर नर्तकींच्या समूहाचा रियाझ चाललेला आहे. यावेळी रस्त्यावर रहदारी अशी नाहीच.

त्यावेळी टिपलेली ही दोन छायाचित्रे.
एकात नाच चालू आहे;
दुसरयात शेवटचा टप्पा येतो... फुन्हा नाच...

ते आठवते आणि दोन दृश्यातील मोकळी जागा भरता भरता नर्तकींच्या पावलांबरोबर मी घुमतों... डोक्यात संगीत... जवळ जवळ एका दशकानंतर.

हे दृश्य चित्र-फितीवर कुणी पाहिले तर मनात "ती" प्रतिमा अधिक जाणवली असती का? कदाचित. कदाचित नाही.

चित्रपट पण ती प्रतिमा पूर्ण करू शकत नाही, जर
जागेच्या - स्थळाच्या आत्म्याची आणि
नृत्याच्या आत्म्याची
जाणीव (perception) नसेल तर,
या इथे: "आनंद नगरी" - कोलकता.

कोलाकत्याची एक आख्यायिका आठवते: १९६० च्या दशकात कोलकत्यात वारंवार दंगली होत होत्या.
जर दोन तोल्या रस्त्यावर - सार्वजनिक स्थळी - मारामारी करत असले तर (इंडियात कोणत्याही शहरात कोणत्याही कार्यासाठी रस्ते स्वाभाविक सार्वजनिक स्थल होतात, मग ती पूजा असो की दंगल. ) आणि त्यानी पाहिले कुणी कलावंत संगीताची साधने घेऊन येत आहे, तर ते उत्स्फुर्तपणे मारामारी/ दंगल थांबवतात, त्या कलावंताला वाट करून देतात; तो/ती गेल्यावर पुन्हा मारामारी चालू.

~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 21, 2009

वय वर्षे साठ सत्तर

वय वर्षे साठ सत्तर

वय वर्षे साठ सत्तर
खात आलो रोजची भाकर
कधीच नाही शिवला विचार
या भाकरीच्या दाण्यासाठी
कुणी माणूस माणसी अज्ञातवासात
खापले ऊन हींव पावसात
भाकर ब्रम्हाचे सुकृत
मोजले मोल चव्वलात
आणि अन्न्ब्रम्ह अडकले
संस्कृतीच्या गळफासात.
* * *
(बहुतेक धर्मांचे लोक जेवण्याच्या पूर्वी प्रार्थना करतात. एकदा तर दारूच्या गुत्त्यात मी पाहिले एकाने ग्लास दारुने भरला, मधले बोट ग्लासात बुडवले आणि बाहेर झटकले: झाली एका थेंबाची चित्रावती. या कवितेचे इंग्रजी भाषांतर पहा. )

रेमीजीयस डिसोजा
स्थळ: मुंबई
ता: १-१०-१९९७

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 16, 2009

शरीरधर्म


शरीरधर्म


आधुनिकतेच्या चक्रव्यूहात फसलेल्या आयुष्याच्या मुक्तीला
नाहीत कुठे विद्यापीठे कला शास्त्रे शिकवायला.

त्यासाठी असते गरज शांत विश्रामाची
आणि अनिर्बंध उत्सवाची वारंवार.

या बजबजपुरीच्या साठमारीतून निघायला बाहेर
हवी उसंत जीवाला मोकळ्या निश्वासाची वारंवार;
हवी असते आंघोळ अविरत आतबाहेर
आयुष्याला कामकांडांत फसलेल्या वारंवार;
जशी शरीराला असते टाकायची कात,
वसंताच्या आगमनाला गरज पानझडीची.

हे कधी जाणवले नाही. ऐकले तरी उमजले नाही.
समजेल तेव्हा उशीर तर झाला नसेल फार?

मुंबई
१२-१२-२००५

टीप: शरीर धर्म सांभाळणे हा पण सृष्टीयोगाचाच भाग आहे. आपणच आपल्या शरीरावर किती अत्याचार करीत असतो याला काही सुमार नाही. मग आपण देवाला - दैवाला - सरकारला ... दोष देतो.

* * *
See English translation of the original Marathi poem "Bady-Dharma" published on my other blog.
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 12, 2009

काव्य जगणे...


काव्य जगणे...

काव्य जगणे आणि काव्य लिहिणे यात असते जमीन आणि अस्मान या मधील अंतर. जमिनीवरून, डोंगराच्या माथ्यावरून, अथवा विमानातून पहाताना वाटते दूर क्षितिजापाशी आकाश जमिनीला भेटतेय पण हा केवळ भास - दृष्टीभ्रम - असतो.

म्हणून तर ढगाला जमिनीवर उतरायचे असते; पक्ष्याना झाडावर घरटे बांधायचे असते; गरुडाला पर्वताच्या कड्यावर उतरायचे असते, आणि गांडुळाला चांदण्याशी - चांदण्यांशी हितगूज करायाचे असते.

काव्य जगणे म्हणजे जीवनाच्या काव्याचा आनंद जगणे म्हणजेच सृष्टीयोगाची उपासना - सृष्टी - प्रकृती - निसर्गाशी शरीर, मन आणि आत्म्याने सर्वस्पर्शी जीवन जगणे.

त्यासाठी जीवनाला होणारा क्षणाभराचाही उत्कट स्पर्श आमूलाग्र क्रांती आणावयास पुरेसा होतो. मग रूरू होते मरण आणि जन्माचे निरंतर चक्र - "पुनरपि जननम् पुनरपि मरणम्" - आता इथे.


हे कुणालाही - रंक असो की श्रीमंत, शिक्षित वा अशिशिक्षित - शक्य असते. अन अशा अगणित व्यक्ति या पृथ्वीतलावर नक्कीच आहेत यात शंकाच नाही. नाहीतर मानवजातीचा संपूर्ण संहार कधीच झाला असता.

इथे कोणी नाही स्वामी की सेवक; नाही कोणी पुढारी की अनुयायी; इथे संपतात पुराण अथवा आधुनिक अभिजात समाजांचे यमनियम, मग ते असोत संघटीत धर्मसंस्था की राज्यसंस्था की ज्ञान - विज्ञान - मंत्रज्ञान - यंत्रज्ञान यांचे दलाल; की असोत उच्चतम किताब - पदव्या - हुद्दे ; की असोत पांडित्याचे महामार्ग: सारे, सारेच गौण.

सृष्टीशी जेव्हा जुळते आपली तार तेव्हा आपण काव्य लिहित नसतो तर काव्य आपणास लिहिते. उदा. मी बासरी वाजवत नाही तर मला बासरी वाजवते। मग उरते फक्त एकच एक: या उपेक्षित दलित धरतरीच्या कुशीत काव्य जगायची पायवाट.

* * *

ब्लॉग म्हणजे चाव्ह्वाटा: याच्यावर पाहिलेल्या घट्नांचा काय अर्थ लावायचा याचे स्वातंत्र्य वाचाकाना असते. इथे कुणीही आपल्या प्रतिक्रया, शेरे / ताशेरे, वाद / प्रतिवाद, सूचना /आलोचना यांची नि:संकोच नोंद करावी. तेव्हा या लेखनाला संवादाचे स्वरूप येईल, नाही तर ते केवळ स्वगत रहातील.धन्यवाद.

¬¬¬¬¬
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 06, 2009

एक विमनस्क 'क्ष' मित्र

एक विमनस्क 'क्ष' मित्र

कालची रात्र स्वप्नांची स्वामिनी - दात्री
अंधारा, आजही देशील का
तोच आधार नक्षत्रमालेचा?
बुडत्याला आधार अंधाराचा आकार

रात्री, आजही येशील का माझ्याकडे?
आपण करू समागम
एक दुखद मिलन
तू आणि मी

रात्र कष्टी, मी कष्टी,
आमचा समागम कष्टी
एक कष्टी दुखारी ड़ूब
रात्री तुझ्या अंधारया पोकळीत.

~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape