January 30, 2010

संस्कृतीचा उगम आणि अभिव्यक्ती

[संस्कृती इथे 'culture" या अर्थाने वापरला आहे, "civilization" - नागरता किंवा नागरी समाज - या अर्थाने नाही. या लेखाचे संदर्भ जाती- जमाती किंवा जनजाती - समाज यांचे माझ्या परीने संस्क्रुतींचे केलेले अवलोकन व संशोधन साहित्य हे आहेत.]

जळात सर्व जीव सृष्टीचा जन्म झाला हे सर्वश्रूत आहे. एकपेशीय जीवणूपासून उत्क्रांतीने वनास्पती व प्राणी निर्माण झाले. स्थळ - काळ - हवामान वातावरण यानुसार त्यात विविधता आली. या भौगोलिक काळात नागरतेची पांच हजार वर्षे केवळ कस्पटासमान आहेत.

जळ व जमीन यानी सर्व जीवसृष्टीला जगण्याचे साधन दिले. हे आपण अनुभवतोच.
तसेच त्यानी मानवाला संस्कृती प्रदान केली. (मानवेतर प्राण्यांस संस्कृती असते कि नाही यावर येथे न बोललेले बरे.)
संस्कृतीची प्राथमिक अभिव्यक्ती प्रतीत होते "अन्न, निवारा अन् वस्त्र" या मानवाच्या प्राथमिक गरजातून.
ही अभिव्यक्ती माणसाला निसर्गाकडून मिळालेल्या बुध्दीचातुर्य, शारिरीक कौशल्य व भाषा यानी आकार घेते.

प्रादेशिक विविधतेने मानवी संस्कृतीची अभिव्यक्ती पण वैविध्याने नटली. सुमारे तीस हजार वर्षांपूर्वीच्या मानवनिर्मित वस्तू संशोधकांस गवसल्या. त्यांत प्राचीन गुंफांतील भित्ती-चित्रे तसेच शिल्पे आहेत: (चित्र १: अस्थीवर कोरलेल्या चंद्राच्या कला (काळ - सुमारे ३० हजार वर्षांपूर्वी); चित्र २: वरील चित्राचे आरेखन; चित्र ३: मातृदेवता (काळ - सुमारे ३५ हजार वर्षांपूर्वी); चित्र ४: लज्जा गौरी, आलमपूर, इंडिया).
--------------------------------------------------------
चित्र १: अस्थीवर कोरलेल्या चंद्राच्या कला  


चित्र २: वरील चित्र १ चे आलेखन

चित्र ३: मातृदेवता
(अधिक माहितीसाठी पाहा दुवा )


 चित्र ४; लज्जा गौरी, आलमपूर, इंडिया
(एकेकाळी इंडियात शिवलिंग पूजे प्रमाणे योनी पूजा पण प्रचलीत होती.
पितृ-प्रधान कुटुंब पध्दती प्रसार पावली व ती मागे पडली.  
डॉ. घारे यानी या शिल्पाचे नाव "लज्जा गौरी" असे ठेवले; 
पण मी हिला मातृदेवता असे नाव दिलेय.)
(See : "Painted World of Waralis" by Yashodhara Dalamiya.)     
--------------------------------

अन्न: स्थानीय धान्ये - फळे - भाज्या - (व प्राणी), हवामान, जमीन व पाणी हे साध्य करतात. त्यातून समष्टीच्या सर्वमान्यतेने आचार, परंपरा, संस्कार, शिष्टाचार निर्माण होतात. विविध समाज / गटांमध्ये होणारी देवाण - घेवाण पण यांच्यावर परिणाम करते. उदा. ईडली, डोसा, आंबोळी आता जगभर झाले आहेत. (चित्र: पहाटेची न्याहारी, मही नदीच्या कांठी, गुजरात, काळ: . १९६७-६८)

चित्र ५: भिल्लांची पहाटेची न्याहारी - अर्वाचीन युगात (चैत्री पुनवेला मही नदीच्या काठी भिल्लांचा तीन दिवस मेला भरतो.)


निवारा: याचे एकाच उदाहरण पुरेसे होईल: एस्किमो जमातीने तयार केला "इगलू"!
निवारा - आवास - परिसर ही सर्व संस्कृतीची अभिव्यक्ती होत. गुंफा, चंद्रमौळी, अजिंठा-वेरुळ इ. कोरीव लेणी, ते आजची महानगरे व त्याबरोबर त्यांतले घेट्टो (अमेरिकेत - USA ) व झोपडपट्ट्या (जगातील जवळ जवळ सर्व शहरात) हे सारे निवारेच होय.

पुराशास्त्राच्या संशोधाकाना निवारा किंवा त्याचे अवशेष तेथील लोकांची संस्कृती समजून घ्यायला फारच मदत करतात. हराप्पा मोहें-जो-दारो अनेकदा भूमीत गाडले गेले पण त्यात माणसे नव्हती. (त्यात सांगाडे नव्हते.) ते बचावले. फावल्या वेळात विचार करण्याजोगी गोष्ट आहे.

वस्त्र: असे सांगतात, वस्त्र ही माणसाची दूसरी काया आहे, तर घर ही तिसरी काया आहे.
वेगवेगळ्या मुलुखातील लोक आपापल्या गरजे प्रमाणे त्यांच्या परिसरात तयार केलेली वस्त्रे वापरतात.
उंच पुरे धिप्पाड एस्किमो लोकरीची / चामड्याची वस्त्रे वापरतात. तर सहारातील जमाती केवळ लंगोटीवर राहतात. निसर्गाने त्यांच्या शरीराचे आकार ऊर्जेच्या विनियोगानुसार केले.
इथे, वारली, कातकरी, कोळी, आगरी इ. जमाती कामाधामात लंगोट वापरतात. मुंडासे मात्र हवे असते!

लंगोटीपासून फ्याशन टी-वी वर पहायला मिळणारी "चड्डी" पर्यंत सर्व कपडे, किंवा कपड्यांचा अभाव, संस्कृतींची ओळख देतात नाही क?
१०
ध्रुवीय शीत प्रदेशांपासून विषुववृत्तीय उष्ण कटीबंधापर्यंत वनस्पती व प्राणी यांची विविधता वाढत जाते. ध्रुवीय प्रदेशांत ही फारच कमी असते. तर उष्ण कटीबंधात वनस्पती व प्राणी यांची विविधता वाढत जाते. (यापुढे "होती" असे म्हणावे लागेल. नागरतेच्या विकासाच्या नवनव्या उच्चांकां बरोबर जुन्या मरूभूमींच्या जोडीला आता नव्या मरूभूमी होतील. कोणीतरी म्हटले आहे, "wherever civilization stepped, it left desert behind.")
११ 
भाषा
आमच्या इंडियात फळे, भाज्या, अन्नधान्ये, वनस्पती व प्राणी हे विविध तर आहेत, त्यांच्या जाती पण अनेक आहेत. ज़मीन हवामान पण विविध आहेत. व ती बदलत पण असतात.
याचा परिणाम "अन्न, निवारा, वस्त्र" यावर जसा होतो, तसाच भाषेवर पण होतो.
असे म्हणतात, दर दहा मैलांवर बोली बदलतात. या देशाच्या "सुजलाम सुफलाम सृष्टीने भाषा संपन्न केल्या. या सृष्टीचे मनोहर प्रतिबिंब सामाजिक / धार्मिक परंपरांत, आचार विचारात पडलेले दिसते.
तिने अद्वीतीय "आयुर्वेद" पण संपन्न केला.
१२
एस्किमोंच्या भाषेत बर्फाला (पाण्याचेच एक रूप) अनेक शब्द आहेत. आपल्याकडे पाण्याला अनेक प्रतिशब्द आहेत, तसेच सूर्य, चंद्र, पृथ्वी, डोंगर, नदी... यानापण; किंवा "विष्णूसहस्रनाम" (असं ऐकून माहीत आहे.)
इथे सहा ऋतू आहेत, चीनमध्ये चोवीस आहेत.

आफ्रिकेतील दक्षिण सुदान मध्ये डिंकू जनजाती आहे. असे सांगतात त्यांच्या भाषेत गाईच्या संदर्भात चारशे शब्द आहेत. त्याना इतर वस्तूपेक्षा गाई सर्वात अधिक मूल्यवान वाटतात (संदर्भ: Erica Check, "How Africa came to love cow", News, NATURE, Vol: 444, 21-28 Dec 2006, p. 994-996).
१३
लाख वर्षांपूर्वी मानवाला संस्कृती नव्हती असे कसे म्हणता येईल? संस्कृती काय ग्रीक, रोमन, आर्य, मोगल, इंग्रज... आणि आता औद्योगिक समाजाने जगात आणली? संस्कृती काय नागरी समाजाचा (civilized society) मक्ता आहे? असे म्हणणे जातीवाद, धर्मवाद, वंशवाद, भाषावाद... यांसाराखेच अतिरेकी ठरेल.
१४
आजपावेतो अनेक बलाढ्य समाज / साम्राज्ये आली व नामशेष झाली. पण माणसे टिकून आहेत.
पण सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे हजारो वर्षांपासून आदिवासी जमाती (aborigine communities) टिकून आहेत. याचा अर्थ असा नव्हे की ते आजही प्रागैताहासिक काळात आहेत. नागरी समाजानी वेळोवेळी त्यांच्यावर किती अत्याचार केले असतील?
१५
या सर्वांपेक्षा जर कोणी कहर केला असेल तर तो विलायती वसाहतवादी फिरंग्यानी.
कोलंबसाने ५०० वर्षांपूर्वी अमेरिकेत पाय ठेवला तेव्हा त्याने तेथील आदिवासींचे शिरकाण करायला सुरवात केली. त्यामागून सुरू झाले आफ्रिकेतील निग्रोंच्या माथीं गुलामगिरी मारली.
वास्को डी गामाने मुंबईतील माहिमाच्या किल्ल्यावर चढ़ाई केली. त्यात विजय मिळाल्यानंतर माहिम गावात फिरून रस्त्यावरच्या नि:शस्त्र ग्रामास्थाना कापून काढले. का? तर त्याना भीती दाखवण्यासाठी! त्याच्या आरामाराच्या शिपायानी घारापुरीच्या लेण्यात छानणी ठोकली होती. तेव्हा त्यानी गंमत म्हणून तेथील शिल्पांची नासधूस केली.

त्यांचा वसाहतवाद अजूनही चालूच आहे, पण अप्रत्यक्ष रितीने.

१६
सरता पालव

जगातील उरल्या सुरल्या आदिम जमाती मानवतेचे लेणे आहेत; वैश्विक वारसा आहेत. त्यानी नंतर आलेल्या नागरी समाजाना अनेक सांकृतिक देणग्या दिल्या; अजूनही देत आहेत.
त्याना तथाकथित सुधारणेची / विकासाची गळतीने ठिबकणारी नका देऊ भीक. त्यांच्या मानगुटीवर विकासाचा ब्रह्मराक्षस होऊन बसू नका. त्यांचा निसर्गनिवास हिरावून घेऊ नका. त्यांच्या संस्कृतीचे संरक्षण व संधारण करायचे असेल तर त्यांची "स्वायत्तता" हिरावून न घेता तिचे संरक्षण करा.

या आदिम जमातींच्या चिरयौवनाचे इंगीत, गूढ़ काय आहे ते यांच्या निसर्गनिवासांचे, यांच्या स्वायत्तातेचे साकल्याने संधारण केले नाही तर नाही आम्हास ना पुढच्या पिढ्यांस कधीच समजणार नाही. कोणीही विद्वान ते सांगू शकणार नाही.

ते स्वत:च एक चालते बोलते महाकाव्य आहेत
*   *   *   *   *
टीप १: प्राचीन चित्रे व शिल्पे: दुवा
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape