January 16, 2010

सोन्याच्या शोधात: मुंबईत आपला परिसर

मोक्याच्या जागी सोन्याचे कण असलेली माती जमा करणे 
रस्त्यालगतची माती जमा करताना 

मी नेहमीप्रमाणे अहेतुक फिरायला निघालो होतो. वाटेत समोर दोन बाया दिसतात, एक वयस्क दूसरी तरुण, पहिलीची सून वा मुलगी असेल. दोघींच्या डोक्यावर पत्र्याची घमेली आहेत. त्यात ब्रूस वगैरे साहित्य आहे. बघताच लक्षात आले, या सोन्याच्या शोधात निघाल्या आहेत. म्हटले पाहूया यांची सोन्याची खाण कोठे आहे।हमरस्त्याने जात नाहीत. गल्ली-बोळातून त्या तरातरा चालल्या होत्या. त्याना माहित होते नक्की कोठे जायचे. त्या परिसरात मुख्यत: आता सोन्याचांदीची आधुनिक दुकाने आहेत. पण तेथे त्या जात नाहीत: आता तेथे सोनार (कारागीर) नाहीत, पक्त सोन्याचे व्यापारी आहेत.

मुख्य रस्त्याच्या मागील बाजूस जुनी वस्ती आहे, त्यात काही एक-दोन मजली जुनी घरे. त्यातील काही पाडून उंच नव्या ईमारती बांधल्या आहेत. काही ठिकाणी जुनी घरे पाडून जागा मोकळी केली आहें. त्या दोघी अशाच एका मोकळ्या जागी बैठ्या घराच्या वळचणीस थांबतात

परंपरागत सोनाराचे घर, उद्योग दुकान एकाच वास्तूत असतात: मागील बाजूस वा माडीवर घर आणि पुढील बाजूस दुकान. इथे करागीरांच्या पिढ्या कुटुंबाच्या कलेत लहानपणापासून शिकत पारंगत होतात.

सोने गाळण्याची प्रक्रिया 

सोने गाळण्याची प्रक्रिया 

इंडियन / भारतीय स्त्रियाना प्राचीन काळापासून दागिन्यांची फार हौस. हे चित्रशिल्पात तसेच अनेक परंपरांत पण प्रतीत होते. हर प्रकारचे दागिने, अलंकार - शिंपले, काचमणी, मौलिक दगड/रत्ने, सोने, चांदी, मोती... गाय, बैल, उंट, हत्ती, घोड़े... यानापण लोक सजवतात. घरात वापरावयाच्या वस्तू, कपडेलत्ते, घरे - झोपड़ी ते प्रासाद - मंदिरे... सर्व काही रंग-चित्र-शिल्पाने सजवले जातात.

येथल्या सूर्यप्रकाशात दागदागिने, अलंकार, आभुषणे, नक्षीकाम किती खुलून दिसतात नाही!

आणि असंख्य लोक - कोष्टी, कुंभार, सुतार, चांभार, महार, लोहार... अक्षरशत्रू असले तरी त्यांच्या "छपाई" कामात तरबेज आहेत, आजही!!
त्यांच्या कला विलायती लोकांप्रमाणे "कलेसाठी कला" नसतात, तर "जीवनासाठी कला" असतात: हेच तर भारतीय मानस!!!

त्या मुलीने दगडगोटे बाजूला करून तळहातावर माती घेतली निरखली. तिची खात्री झाली तेव्हा जवळपासची - वळचण, रस्ता येथील - माती त्या दोघीनी घमेल्यांत भरली. काही मिनिटांतच त्या निघून गेल्या. पूर्वी तेथे सोनाराचे घर असणार यात शंकाच नाही. हे त्याना नक्कीच माहीत असणार.

ही कहाणी येथेच थांबत नाही.

मोरारजी देसाई, इंग्रजांच्या पठडीत आय. सी. एस. (नोकरशाहीचे शिक्षण) झालेला, व्याज-गांधीवादी (pseudo-Gandhian), जेव्हा केंद्र सरकारात होता तेव्हा त्याने सोने नियंत्रण कायदा (Gold Control Act) आणला. तो सत्तेवर असताना त्याने अनेक उचापती केल्या: महाराष्ट्रात (पूर्वीचा बॉम्बे प्रोविंस) दारूबंदी, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोध इ.

त्या कायद्याने किती कारागीर बेकार झाले असतील त्याला सुमारच नाही. कायदा करणार्र्या सरकारला त्याची तेव्हा जाणीवही नसेल. मग त्यांचे पुनर्वसन कसचे? या कयाद्यानंतर इंडियात सोन्याचा चोरटा व्यापार सुरू झाला.

आता सोन्या-चांदीचे दागिने करणारे कारखाने झालेत असे ऐकिवात आहे. पूर्वीचे स्वतन्त्र होते ते कारागीर आता नोकर झाले.
आता दागिन्यांचे "डिझाईन" करायला शिकवणारया शिक्षण संस्था सुरू झालेल्या आहेत. मग त्या विद्यार्थ्यांना सोने-चांदी-पितळ-कथील यांच्या वजनांताला फरक समजला नाही तरी चालेल!

मी लहानपणी सोने शोधणारे लोक गावाच्या बाजारपेठेत अनेकदा पाहिले होते. ते पावसाळ्यात येत. रस्त्याच्या बाजूच्या गटारातून माती काढत. पावसाळा असल्यामुळे ती माती घमेल्यात घोळवायला मुबलक पाणी असे. पुढची प्रक्रिया करण्यासाठी त्यांच्यापाशी आसिडाची बाटली पण असे.

आता हे सोने शोधणारे लोक राहतील का?

आधुनिक औद्योगिक समाजात "संगणित्रे"- "मोबाईल फोन" इ. साधने जलद टाकाऊ होतात. त्यातील सोने इ. धातू गाळण्याचे  नवे उद्योग पण सुरू होतील. एव्हाना झाले पण असतील। तेथे याना मजूरीचे काम पण मिळेल. पण अशा विषारी उद्योगात हे निरक्षर लोक कितपत टिकाव धरतील?

जे सरकार वर्षानुवर्षे विस्थापितांचे पुर्वासन करीत नाही, जेथे न्यायालयांत हजारो निवाडे थकबाकी आहेत, तेथे या मजूरांचा काय पाड? इंडियाच्या / भारताच्या शिरगणतीत पण यांचा उल्लेख असेल का शंकाच आहे.

आमच्या भाषेत एक म्हण आहे:
"नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा"
या पांचा उत्तरी ही साठा उत्तरांची "व्यत्यासकथा" (metafiction) पूरी करतो.

-------------
प्रतिमा १: भिल्ल आई व मूल




गुजराथेतील पंचमहाल जिल्ह्यात होळी उत्सवात
बिटिश राजाची चांदीची नाणी मला पहायला मिळाली. भिल्लिणीनी ती आपल्या
दागिन्यात वापरली होती. सातापुड्यातील भिल्लिणी त्यांचे मण्यांचे दागिने स्वत:च
गुंफतात. प्रत्येक दागिना वेगळा, त्याची मांडणी वेगळी व अप्रतिम.


-----

प्रतिमा ४: अठराव्या शतकातील राधेचे चित्र


टपाल विभागाने हे चित्र स्टाम्पसाठी वापरले आहे.

----------

टीप: बडोद्यात मला दोन सोनार बंधू भेटले. सोने नियंत्रण कायद्याने ते बेकार झाले होते. त्यानी बडोदे नगरापालिकेत शिपायाची नोकरी धरली. आणि शिंपिकाम शिकले ; कारागीरच ते. त्यानी घरी पूरक जोडधंदा सुरु केला. (वस्त्र ही मूलभूत गरज नाही क?)

~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

  1. > त्यांच्या कला विलायती लोकांप्रमाणे "कलेसाठी कला" नसतात, तर "जीवनासाठी कला" असतात: हेच तर भारतीय मानस!!!
    >---

    श्री डिसोजा : अशी विलायती लोकांवर टीका करणं हा संस्कृतीचा अभिनिवेश नाही का?

    एक तर 'कलेसाठी कला' यात काही गैर आहे, अशातला भाग नाही. संगीत ही 'कलेसाठी कला' आहे. पण ती जीवन समृद्‌ध करते.

    आणि विलायती संस्कृती सरसकट वाइट अजिबात नाही. तिथेही लोक ३०-४० वर्षांपूर्वी अनेक कला कशा जीवनाभिमुख होत्या, आता आधीसारखं कसं राहीलं नाही, वगैरे म्हणतातच.

    - डी एन

    ReplyDelete
  2. श्री. नानिवडेकर,
    तुमचे विचार मला पटतात.
    < एक तर 'कलेसाठी कला' यात काही गैर आहे, अशातला भाग नाही. संगीत ही 'कलेसाठी कला' आहे. पण ती जीवन समृद्‌ध करते.>

    हे मी अनुभवले आहे.
    हे आपले विधान संगीत जीवनासाठी कला आहे हे सिध्द करते नाही का? जेव्हा "कलेसाठी कला" हा मतानिभिवेश होतो तेव्हा त्यात काय उरते?

    माझे वरील विधान लोककलाना उद्देशून आहे हे मला स्पष्ट करावेसे वाटते. अर्थात उच्चभ्रू लोक लोककलाना गौण समजतात हे अलाहिदा.


    कोणतीही संस्कृती वाईट नाही. पण त्याबरोबरच कोणतीही संस्कृती उच्च किंवा नीच नसते.असे मला वाटते. कारण संस्कृती नेहमीच स्थानिक असते. जागतिक संस्कृती ही कल्पनाच चुकीची आहे. फक्त "बाजार" जागतिक आहे. असे माझे प्रामाणिक मत आहे.

    अर्थात माझी वैयक्तिक मते व्यर्ज समजावी. इथेच नाही तर माझ्या पूर्ण ब्लॉग वरची, ही विनंती.
    तुम्ही म्हणता ती वस्तुस्थिती खरी आहे. उद्या ती बदलेल पण!

    --रेमी

    ReplyDelete
  3. दुरुस्ती: "व्यर्ज" याऐवजी "वर्ज्य" वाचावे.

    ReplyDelete
  4. "डो को मी" काय असते, संगीत की काव्य, हे मला कधीच समजले नाही.

    ReplyDelete