May 26, 2010

घरकामाचा जिव्हाळा

एक घरगुती व्यत्यासकथा 

आमच्या आजीला व आईला त्यांच्या ऐशी वर्षांच्या आयुष्यांत कधी काळी कंटाळा आला असे झाले नसावे. त्यांच्या प्रवृत्तीत कंटाळा ही चीजच नव्हती. कुटुंब, घरकाम, शेतकाम, आणि इतर अनेक कामे वर्षभर चालतः ते सारेच घरकाम.

त्यांच्या बांधिलकीचा आवाका, मोजमाप भल्याभल्या पंडितांना - समाजसेवकांना -  शिक्षणवेत्त्यांना पण नाही. त्या शिक्षित नव्हत्या - आणि अशा कोट्यवधी आया बाया आजही आहेत. तत्त्वज्ञ, धर्मोपदेशक, शासक, प्रशासक हे वारंवार प्रवचने देतात, पण त्यांच्यावर लोकांची जबाबदारी नसते (जोवर कोणी साक्षी - पुरावे - कोर्ट - कचेऱ्या यांच्या कचाट्यात अडकत नाहीत).
  
आतासारखी करमणुकीची साधने त्याना उपलब्ध नव्हती. गावात वीज पण नव्हती. हाती चलन नसायचे. भावना, सुखदुःख, गुणावगुण सर्वाना असतात. मग त्याना हे का व कसे शक्य झाले?

मला वाटते याला कारण त्यांचा घरकामाचा स्वायत्त "जिव्हाळा"! हा जिव्हाळा येतो जबाबदारी घेतल्याने यात शंकाच नाही. बहुसंख्य अनामिक जनतेतील स्त्रीयानी उचलेला जबादरीचा वाटा पुरुष वर्गापेक्षा मोठा असतो. याची कुठेही आकडेवारी नाही. 
   

त्यांचे "घर" केवळ चौदाव्या मजाल्यावर चार / चौदा भिंतींचा गाळा नव्हे. 
त्यांचे घर म्हणजे कुटुंब, पाळलेले पक्षी,  जनावरे, परसातील झाडे झुडुपे वेली, राहते घर आणि त्यांची निगा राखणे; घराचे शेण-सारवण, लाकुडफाटा, सैपाक पाणी, शेतीभाती, शेण- पाचोळा -उकिरडा, आळीची / वाडीची सार्वजनिक सामायिक विहीर, शेजारीपाजारी, नातीगोती... सर्व काही आले. 

त्याना कधीही "आपण मोलकरीण आहो" असा विचार पण शिवला नाही, जसा आजच्या सुशिक्षित आया बायाना वाटते. मग त्याना "कंटाळा" कसा शिवणार?





 जागतिकीकरण, मुक्त व्यापार, शहरीकरण झाल्यावर आज मात्र ते चित्र पार बदलले आहे. शहरांत तर बदलले आहेच, खेडेगावांतपण बदलत आहे.
घरकामाचा जिव्हाळा कुणाही  व्यक्तीला
आजचे शिक्षण - नोकरी - व्यवसाय, आणि स्त्री स्वातंत्र्याची मोहिम देऊ शकतील का? आता शिक्षण पण व्यापार-उद्योगांची बटीक झाली आहे. आणि आजच्या आज्या - आया - सूना - मुलीना कंटाळा घेरून आहे.(बाप्प्या लोकांचे पुरुषप्रधान समाजात काय बोलणार?) 

टिप १: वरील प्रतिमा - माझी आजी जीला सारे गाव "माय" या नावाने हाक मारीत असे. माझ्या हजारो मैलांच्या भटकंतीत ती मला अनेक रुपानी नजरेस पडली, ही सत्यकथा आहे.  
२:  शेण - शेतकाम  यांच्या वरील उल्लेखाच्या संदर्भात अधिक वाचा: "Cow dung, Rice and Amartya Sen (a critique)
 ३: आजीवर कितीही लिहिले तरी थोडेच. आजीच्या निमित्ताने लिहिलेले पुढील दोन इंग्रजी पोस्ट: १ - "We must carry our own burden";  २  - "She Lived Her Living Doctrine" जरुर वाचावे. 
: खालील प्रतिमा - माझी आई जीला सारे गाव "माना" (थोरली बहिण) या नावाने हाक मारीत असे. चित्रात माझ्या घरासमोरील अंगण व परिसर: हे आहे पावसाळ्यातील दृश्य.    

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 15, 2010

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे. 

टळली नव्हती दुपार तरी  

डामरी रस्ते  आपलेसे वाटले ---

रामबोलोच्या नादात. 

काळ्या दुपारी काजवे कवडसे 

हरवणाऱ्या शुध्दीचे  

पराकाष्टा करतात वाट उजवायची.   
  ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 07, 2010

हे रस्ते, हे रस्ते


हे रस्ते, हे रस्ते आदि अंत नसलेले
रस्ता - एक तीर काळाभुरका
छेदित अफाट माळरानाला.
पर्णहीन बाभळीच्या संतप्त छाया -
झळा तप्त बोचरया;
फुटक्या पुलावरचे पुराचे ओघ खेचणारे,
हे रस्ते, हे रस्ते कधी संपणारे.

बोडक्या सुतकी डोंगरांच्या रांगा,
मरूभूमीचे तृषार्त माळ,
त्यातून धड़पडणारे
हे रस्ते, हे रस्ते जन्माचे सांगाती.

सावलीच्या शोधात उनाची साठमारी
रेताडाच्या छताडावर मृगजळाचे स्तन,
प्रभातीच्या प्रतिक्षेत वांझोट्या रात्री,
हे रस्ते, हे रस्ते
उभ्या उभ्या चाखलेल्या रतिक्रीड़ा.

चव्वलाच्या नादात पाणपोया
वाहून गेल्या,
हे रस्ते, हे रस्ते
आयुष्याचे छेद उभे आडवे.

(गुजरात: ११-०९-१९८५)

(या कवितेची प्रतिमा १ जून २००८ रोजी BEEHIVE IN GONDWANA मधुकोष गोंडवनी या माझ्या ब्लॉग वर प्रसिध्द केली होती।)

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 01, 2010

सवाल लाखांचा आहे ना?

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची पहिली सुमारे सतरा-अठरा वर्षे व्यक्तित्वाच्या घडणीच काळ असतो. या काळातील त्याला मिळणारे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखता (orientation) पर्यावरण (नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक राजकीय)" ही त्यास कारणीभूत असतात. पारिस्थिकी (ecology) व उर्जा (energy) ही दोनही पर्यावरणाची अंगे असतात. ही स्थिती त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्याची दिशा पण ठरवतात. यानंतरच्या काळात व्यक्तिमत्व (personality) घडते; जसे नवीन कौशल्य / नैपुण्य (skills) व माहिती (information) जमा करणे. याची दिशा पण हा घडणीचा काळच ठरवतो.

याचे एकच उदाहरण पुरे:
वियेतनाम येथे विसाव्या शतकात बरीच वर्षे युघ्द चालले. या काळात एक पिढी बेचिराख झालेल्या युध्दभूमीवर जन्माला आली, वयात आली व बंदूक हातात घेऊन युघ्दात सामील झाली.

मुंबईत (व इतर शहरात) एक-दोन पिढ्या झोपडपट्टीत व रस्त्याकडेस जन्मास आल्या व वाढलेल्या लेखकाने पाहिल्या. त्या फक्त लोकसंख्येच्या आकडेवारीत जमा झाल्या: एक निशब्द युध्द चालू राहिले, कसलाही आवाज न करता. त्यांची वसती आता मुंबईत साठ टक्के आहे असं म्हणतात. इथे अधून मधून आतंक, अतिरेक, दंगली इत्यादींचे स्फोट होत असतात. अर्थातच यामागे धनवानच असणार! या विस्थापितांची पुढची दिशा कोणती?

सद्या दूरचित्रवाणीवर "Indian Idol" दाखवत आहेत. शहरा-शहरांतून हजारो उमेदवार रांगा-रांगांत आपला नंबर लागेल या आशेने उभे असलेले दिसतात. काही यौवनावस्थेत, काही पोक्त आहेत. .
मुंबईच्या झोपडपट्टीत सुमारे १२ - १५ लाख मुले असतील.

"घडणीच्या काळात" या सर्वांचे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखन पर्यावरण" कोणत्या अवस्थेत झाले असेल?
शासक, प्रशासक, प्रव्यवसायिक किंवा अनु मलिक आणि कंपनीला याचा विचार करायला वेळ कुठे? सवाल लाखांचा आहे ना?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape