January 23, 2011

बळीराजा पाताळात एकविसाव्या शतकात

वामन-बळीराजा ही पौराणिक कथा आर्य-अनार्य यांच्या वंशभेदाच्या वैमनस्याचा नमुना! वंश-भेद, जाती-भेद, वर्ण-भेद, वर्ग-भेद, लिंग-भेद यांतील संघर्ष चालूच आहेत. त्यांच्या भरीला आता 'प्रथम जगत इंडिया' - 'तृतिय जगत व चतुर्थ जगत इंडिया' यांतील प्रथम-दुय्यम नागरिकत्वांच्या अलिखित संघर्षातून बळीराजाला अमानुष 'पंचम जगत इंडिया'त ढकलायचे कट आता रस्त्यावर आलेत.

 १.
जातीने सारस्वत, कर्माने नवशूद्र (प्रव्यवसायिक आर्किटेक्ट), पण रेमीचा पिंड आहे शेतकरी, धर्माने बाटगा किरिस्ताव, श्रध्दास्थान : सृष्टी (Mother Nature). तो जन्मला, पोसला, वाढला भातशेतीच्या कुणग्यावर कोंकणात. तो शिकला शाळा - कॉलेजच्या चार भिंतीबाहेरच अधिक : देशाच्या मुक्त शाळेत. त्याचा हा गोषवारा!
२. 
बियाणे पेरले की झाली शेती असं नाही; त्या अगोदर व नंतर अनेक कामे असतात. जमिनीची मशागत, बियाण्याचा साठा व निगा, पाचोळा - शेण इत्यादी सेंद्रीय खते, पाण्याचा योग्य पुरवठा जो मुख्यतः पावसाने होतो तसाच ओढे नदी नाले पण करतात, निंदणी, कापणी, झोडणी, भात - बियाणे - गवत - तांदूळ यांचा वर्षभर टिकेल असा साठा करून ठेवणे, कुरमुरे - पोहे - उकडे तांदुळ इ. प्रक्रिया ... अशी अनेक कामे वर्षभर एका पेरणीपासून पुढच्या पेरणीपर्यंत चालू असतात. हे कमीअधिक फरकाने इतर अन्नधान्ये व शाकभाज्यांच्या शेतीला लागू पडते. एवढेच नव्हे तर "आंबोळी, घावन, सांदण, शेवया, पिठले, उप्पीट..." अशा कैक खाद्य प्रकारांचे शोध किसनाच्या झोपडीत लागले. यांचा इतिहास कोणी लिहिला नाही. आणि यांचे संशोधक कोण हेही कोणाला माहित नाही.   
३ 
यास्तव शेतकरी साकल्याने [holistic] बघतो, विचार करतो. त्याला सरकारी नोकरशहा वा प्रव्यवसायिक वा शास्त्रज्ञ यांच्यासारखे चाकोरीत राहून, चालून, पाहून, विचार करून चालणार नाही; अशाने तो टिकूच [sustain] शकणार नाही.

शेतकरी नेहमीच सर्वांच्या नजरेआड राहिला. सारेच शिष्ट प्रतिष्ठीत उच्चभ्रू बोलतात 'भारत शेतीप्रधान देश आहे'. केवळ वायफळ वल्गना! शेतकरी नेमके काय काम करतो, त्या कामात किती मानव ऊर्जा, प्राणी ऊर्जा, सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, जैव ऊर्जा, आणि जीवज ईंधन (fossil fuel) किंवा खनिज ऊर्जा, किती प्रमाणात वापरली जाते; त्याच्या कामात वर्षभर किती लोकांचा सहभाग असतो; यांची आकडेवारी कोणी कधी काढलेली ऐकिवात नाही. मात्र कारखान्यात तयार होणार्‌या मालाची व श्रमाची किती काटेकोर जंत्री तयार केली जाते बरे! कारण कारखाने - मालक व कामगार - यांच्या संघटना आहेत. कोंकणीत म्हण आहे, "नजरेआड मसाणपाड".

संकरित बिजां नसती नातवंडें 

आमच्या सरकारला गेल्या साठ (+) वर्षांपासून औद्योगिक क्रांती लोकांच्या गळ्यात मारायचा ध्यास लागलेला आहे, जणू काही जादूची छडी हाती लागली होती. त्यातच 'संकरित' बियाण्याची आयात करण्यात आली. 'घी देखी पर बड़गा नही देखा' अशी अवस्था झाली. (यामागचा खरा उद्देश भांडवलदारांचे हितसंबंध हाच असतो हे आतापर्यंत लोकांना समजून आलेले आहे.) 

संकरीत बियाण्याबरोबर रासायनिक खते, ट्रैक्टर, यांत्रिक नांगरणी - पेरणी - कापणी, धरणे-कालवे, धान्याना लागणारे रोग, जंतूनाशके, तृणनाशके, अधिक पाण्याची गरज, इ. आली. आणि कणखर देशी बियाणी नाहीशी झाली. जमिनीचा कस, मगदूर गेला. जमिन आणि जळ, दोनही, विषारी होत गेली.
७  
प्रयोगशाळेत तयार केलेली बियाणी, त्याबरोबर अधिक कसदार रासायनिक खते, आता शेतकर्‌याला बाजारातून विकती घ्यायला लागली. आणि किसानांची स्वायत्तता संपुष्टात आली. ते कर्जबाजारी झाले. शिक्षण व साधने नसल्यामुळे त्याना ही गृहोद्योग वा ग्रामोद्योगाद्वारे तयार करणे शक्यच नव्हते. आतातर जीनीय संकरित - GM - बियाणी आणायला सुरवात झालीय. यातून शेतकरी जगले वाचले तरी येत्या पन्नास ते शंभर वर्षात त्याना पूर्वीची स्वायत्तता पुन्हा प्राप्त होणे अशक्य आहे. काही किसानानी संकरित पिकातून बियाणे घेऊन दुसरे पीक घेण्याचा प्रयत्न केला, ते जेमतेम आले. तिसरे आले नाही. आता जा बाजारी!

सत्तेचे केंद्रीकरण 
८. 
अल्पसंख्य उच्चभ्रू नागरिकांचे 'प्रथम जगत इंडिया' सरकार औद्योगिकरणाच्या नशेने टूण झालेले आहे. कशाला, कोणाला प्राथमिकता द्यायची याचे तारतम्य त्याला राहिलेले नाही. नाहीतरी 'सरकार' शब्दच मुळी नपुंसक. हा राजदुर्विलास नाही तर दुसरे काय? जी संकरीत बीजांची दशा ती आधुनिक सरकारची! याना नाही इतिहास माहित, ना वर्तमानाची ओळख!

'सत्तेचे केंद्रीकरण' सर्वच नागरी समाजांचे (civilized societies) व्यवच्छेदक लक्षण आहे. पूर्वी राजसत्ता धर्मसंस्थेला भागीदार करीत असे, आता ती यंत्रौद्योगांना हाती धरते एवढाच फरक. 'बाजार' (market) हे केवळ त्यांचे साधन - आयुध आहे, सोय नव्हे, सामान्य जनांची तर कदापी नाही. ते झाले 'बाजारा'च्या स्वाधीन अन्‌ बिनचेहर्‌याच्या सत्तेचे गुलाम.
१०
भांडवलदारशाही धार्जिण्या सरकारने अभिनिवेशात येऊन मुक्त बाजार खुला केला. पण दारिद्य्राने पिडलेल्या ९० कोटी ग्रामीण जनतेवर काय परिणाम होईल याचा हिशेब केला नाही. परिणामतः विषमतेची गर्ता वाढत गेलेली आहे. सहा लक्ष खेड्यांचे सर्वेक्षण करायला सरकारकडे यंत्रणा आहे कुठे? नमुना (sample) सर्वेक्षण करून काम भागवतात झाले. ते किती विश्वासार्ह असेल याची शंकाच आहे! गेल्या दशकात किती किसान कुपोषण, कर्ज, रोग, आत्महत्या इ. कारणानी देशभर मृत्युमुखी याचा विश्वाहार्य आकडा कुणीच सांगत नाही - ना सरकार, ना पत्रकार, ना चळवळ्या (activist) व्यक्ती वा संघटणा. (अर्थात सरकार म्हणजे सत्तेवर असलेले व विरोधी पक्ष, प्रशासन, न्यायसंस्था आणि इतर शासकीय संघटना.)
११

Domestication of rice in Asia. Source: Internet
नकाशा : १  

कृषीक्रांती सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी तैग्रीस - युफ्रेटीस या नद्यांच्या परिसरात तसेच चीन व आसामात सुरू झाली व सर्व जगभर पसरली. तेव्हा देश नव्हते. त्यावेळी नगरे व नागरी समाज नव्हते. यास्तव राज्ये - साम्राज्ये नव्हती. ते सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. ही तथाकथित सुसंस्कृत समजल्या गेलेल्या नागरी समाजाची व संस्कृतिची (civilized society and culture) सुरवात. ती मुख्यतः श्रमाची विभागणी व सत्तेचे केंद्रीकरण यांवर आधारलेली होती अन आजही आहे. आज तर तो तीव्रतेने आत्मकेंद्री, सनातनी (orthodox), आतंकवादी / अतिरेकी (terrorist / extremist) व असहिष्णू झालाय एवढाच फरक. समाज जेवढा प्रगत तेवढा अधिक सत्तापिपासू, अधिक धनलोभी. त्यांची दानशूरता केवळ आयकरात माफी / सूट मिळावी, किंवा त्यांना वा त्यांच्या मालाला प्रसिद्धी मिळावी यास्तव असते.

संबंधित लेख :
  1. Farming and the Politics of Education in India: Challenges of 21st Century
  2. Emergence of The Fifth World India (सचित्र)

सरता पालव 
१२. 
अर्वाचीन युगात 'गरज आणि हवस' (needs and wants) याचा याचे साधे आलेख उद्धृत करतो.

World Population and human advances ©Taiganideds, 1978
आलेख :  १ 

World energy consumption. ©Taiganideds, 1978
आलेख : २  

यात ई. स. १००० पासून विसाव्या शतकापर्यंतची जगाची लोकसंख्या व भौतिक प्रगती दाखवलेली आहे.

टीपा :
१.  श्री. अण्णा हजारे, महाराष्ट्र, व राजेंद्र सिंह, राजस्थान हे त्यांच्या पर्यावरण आणि जलसंधारण या कामांसाठी सर्वश्रूत आहेत. इतरही संस्था आणि व्यक्ती आहेत.
२ . श्री. दाभोळकर यांनी द्राक्षाच्या लागवडीत केलेले संशोधन आणि त्याचा लाभ शेकडो शेतकर्‌याना प्रात्यक्षिके करून दिला. विशेषतः लहान जमिनीत अधिक पीक कसे काढावे हे त्यानी शिकवले. त्यानी लिहीलेल्या 'विपुलाच सृष्टी', 'केल्याने होत आहे रे', आणि 'आपल्या हाता जगन्नाथ' या पुस्तकानी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
३. "बळीराजा : व्यापारी शेतीचे मासिक" श्री. प्र. बा. भोसले, पुणे, यांनी  अत्यंत बिकट परिस्थितीत चालवले आणि नावारूपास आणले. अर्थातच त्याचे वर्गणीदार व मुख्य आधारस्तंभ शेतकरीवर्ग आहे.
४. कृषी क्रांती: जंगलांतील वानसे आणि पशु यांना माणसाळवणे व गृहसंवर्धन करणे (domestication). हा सद्ध्या गाजावाजा होत असलेल्या "biotechnology"ची सुरवात आहे. दुधाचे दही करणे हा पण बायोटेक्नोलोजीचाच प्रकार आहे.
५. वरील नकाशा आणि आलेख यांवर रेमीजीयस डिसोजा याचे मालकी हक्क नाहीत. हे फक्त शैक्षणिक उपयोगासाठी आहेत.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 18, 2011

मकरसंक्रांतीच्या सर्वाना शुभेच्छा

'एक तीळ सात जणात वाटून खावा'  
ही म्हण मराठी अस्मितेला सामाजिक बांधिलकीची अनाहूतपणे जाणीव देते. किती हृद्य परंपरा! विषेशतः संक्रमण काळी हे फारच जाणवते.
Winter in Mumbai : मुंबईत शिशिर ऋतू
भौगोलिक काळात पृथ्वीचा आंस बदलला काय अन् ऋतुंचा चमत्कार झाला. जैवविविधतेत फरक झाला. हवामान बदलले. उत्तरायण आले : सूर्य (!) दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे जाऊ / जाताना दिसू लागला.

इंडियात सहा ऋतू आहेत. तर चीनमध्ये २४ ऋतू ओळखले जातात; तेथे दर पंधरवड्याला ऋतू बदलतो: हा संवेदनशील निरिक्षणाचा निष्कर्ष. ध्रुवीय प्रदेशांत सहा महिने दिवस (की संध्या?) - सहा महिने रात्र! सृष्टीचा असा हा सतत चालणारा चलत्‌चित्रपट! नित्य नवा! सृजनशीलांचे - व्यक्ति व समष्टीचे - कधीही न आटणारे हे स्फूर्तीचे संपन्न भांडार (No copyright attached here or price-tag)!

संक्रातिच्या दिवशी वसंत ऋतु नवा उल्हास घेऊन येणार याची आशा पालवते.
असे वसंत आपल्या आयुष्यात पण आले तर किती मजा येईल! पण त्यासाठी मानवाला वानस व्हावे लागेल आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार सोडून. पण ते कसे शक्य आहे?

खरं तर 'प्रथम जगतात' सर्व ब्लॉगवाल्यांचा हा अंतरिक्षाला जोडणारा दिवस खास असायला हवा.
नकळत, या तीळ वाटायच्या देशी परंपरेची आठवण देणारा हा दिवस त्यानी साजरा केला नाही तरी, ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली करून, हे संक्रमणाचा दिवस रोजच साजरा करतात नाही का! आणि इंटरनेटवर इतरही अनेक : Wikipedia, Firefox, Open Office, WikiLeaks इ. त्यातलेच नाहीत का? हे सारेच लोकशाहीचा खडतर मार्ग सुकर करायला हातभार नाही का लावित?
जेवढी भौतिक प्रगति अधिक तेवढी लोकशाहीची वाट ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते अधिक बिकट करणार यात शंकाच नाही.

एका जगात अनेक 'जगते'

'प्रथम जगत इंडिया' शिवाय अर्वाचीन युगात इतर जगते पण आहेत.
'तृतीय जगत इंडिया' कृषिवलांचे, जे तीळ तसेच अन्नधान्यादी लागवड करतात; 'चतुर्थ जगत इंडिया' निसर्गनिवासी आदिवासींचे; आणि 'पंचम जगत इंडिया' विस्थापित, बेघर, बेकार व स्थलांतरण झालेल्यांचे.
'पंचम जगते' सर्व जगभर आहेत. मुंबईत यांची वसती सुमारे ६० ते ७० लाख आहे. यांचीपण शीरगणती आता होणार असे ऐकिवात आहे! 

शेतकरी आयुष्यभर पशू - पक्षी - वानसे यांची आयुष्यभर पालन पोषण जोपासना करतो. शहरी लोकांचे आयुष्य यांत्रिकी झाले तर नवल काय! मग शेतकर्‌याचे काय? त्याचा संपर्क सतत पंचमहाभूतांशी येतो.  
एका बिजातून वाढलेले वानस अगणित फळे / फुले / दाणे देते; केवळ मानवाला नाही तर प्राणी-पक्षी-कीटक या सर्वाना. असा 'सत्संग' ज्याला लाभला तो 'मानव' सहजपणे 'वानस' होऊ असू शकतो, कारण ती शेतकऱ्याचा "स्वधर्म" किंवा "सहज प्रवृत्ती" (vocation) असते. शहरी समाजातील व्यक्तींची "सहज प्रवृत्ती" शहर घडवीत असते. त्यांनी जमिनीपासून निसर्गापासून फारकत किंवा काडीमोड घेतलेला असतो. जमीन व निसर्ग या व्यापारी व दृष्टीसुखाच्या उपभोग्य वस्तू आहेत एवढेच त्यांना माहित असते. (ज्याने त्याने आपापले चित्त तपासून पाहावे.)   

Spring-time in Mumbai : वसंत ऋतू मुंबईत
वानसांप्रमाणे शेतकरी पण दानशूर असतो. गांवढ्यातल्या चंद्रमौळीत आलेल्या पाहुण्याचे स्वागत तो गूळपाणी देऊन होते. अन तो सर्वाना अन्न पुरवतो. बळीराजाची पौराणिक कथा सर्वश्रूत आहे. शेतकर्‌याला यास्तव 'बळीराजा' म्हणतात. शेतकऱ्याला अर्वाचीन युगाच्या एकविसाव्या शतकात 'प्रथम जगत इंडिया'ने येनकेन प्रकारेण या बळीराजाला पुन्हा एकदा पाताळात गाडण्याचा चंग बांधलेला आहे का?  


 विस्थापित मुंबईत २०११ 
हे विस्थापित देशाच्या ग्रामीण विभागातून पोटापाण्याचा उद्योग शोधायला मुंबईत तसेच इतर शहरांत पसरलेले आहेत. या मुंबई नगरीत पांढऱ्या पायाच्या गोऱ्या फिरांग्यांचे मात्र हार्दिक स्वागत होते. पण यांना बेकादेशीर आगंतुक समजतात. यांना गुळपाणी कुठले, पाणी, सर्व जीवसृष्टीची 'प्राथमिक' गरज, पण कुणी देत नाही. यांची अवस्था "आई वाढीना, बाप भिक मागू देईना" अशी झालेली आहे. पण "आई" आहे कुठे? 
टिप: प्रतिमा: रेमीजीयस डिसोजा 
रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 11, 2011

भारताची लोकसंख्या विना सेन्सॉर!

भारताची लोकसंख्या विना सेन्सॉर!

India’s Population Uncensored

येथे लोकसंख्येची वाढ बेसुमार ।
योजिले नियोजनाचे कैक पर्याय ।
नियमनाचे थकले सगळे उपचार ।
कधीकाळी होती मुहूर्ताची आडकाठी । 
आता तर बारा महिने तेरा काळ ।
लग्नांच्या मालिका २४ x ७ दूरचित्रवाणीवर !

रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 05, 2011

सृष्टी महात्म्य

॥सृष्टी महात्म्य॥

किती गुण गाऊ मी सृष्टीचे! तिची लीला अगाध! तिचे गूढ अगाध! तिचे औदार्य अपार! तिचा न्याय निष्ठूर तसाच निस्पृह! अवतार, प्रेषित, संतमहात्मे, राजेरजवाडे, चोरदरवडेखोर, किडेमुंग्या, कीटक, पशूपक्षी, तृणे, झाडेवेली सर्व तिला समान. पर्वतराई, महासागर, महाभूखंड, गृहतारे पण अपवाद नाहीत.

सृष्टीला संतुष्ट करायला पूजापाठ, भजनकीर्तन, जपजाप्य, मुहूर्त-शुभाशुभ वेळ... कशाचीही गरज नाही. फक्त तिच्या नियमाचे पालन करायचे. अति खाल्ल्याने अपचन / अतिसार होणार हे अटळ आहे. गंमत अशी की सृष्टी आपल्या बाहेर तशीच आतही आहे. आणि ती काही वेगळी नाही. तीच मूलद्रव्ये. पण हे कधी आईबाबानी, मास्तरांनी की धर्मोपदेशाकांनी सांगितले नाही. नाही वैज्ञानिकानी सांगितले. ते बिचारे हुकुमाचे ताबेदार! ते नवीन नवीन मशिने, शस्त्रास्त्रें, अण्वास्त्रें, संगणके इत्यादि शोधण्यात गुंतलेले आहेत. अर्वाचीन - आधुनिक युगातले सुधारलेले गुलामच म्हणाना
.
विज्ञानाने आधुनिक युगात केवढी तरी प्रगति केलीय. रोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात. सृष्टीचे एक रहस्य उलगडते. त्याहून अनेक पटीने सृष्टी रहस्यमय होत जाते. त्याहूनही मजेची गोष्ट अशी, माणसाला आपलेच शरिर (आणि मन) तरी पूर्णतः कुठे माहित झालेय?

संशोधनासाठी विज्ञानाने नवीन भाषा व यंत्रादि साधने तयार केली, जी माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत, पूर्वी जशी देवभाषा संस्कृत होती तशी. (जर शूद्रांनी त्या भाषेचा उच्चार केला तर तिला विटाळ होत असे. आजही ते चित्र बदललेले नाही. तर अधिक सोवळे झालेय; त्याला 'Intellectual Property Rights' असे नाव आहे.) आपण वैज्ञानिकांवर भाविकपणे विश्वास ठेवायचा एवढेच आपल्या हाती राहते. वैज्ञानिकाना जर विवेक नसेल तर आपण विषमतेच्या आगीत होरपळायचे -- मग ती आग अण्वास्त्रांची असो, कि आर्थिक-सामाजिक-राजकीय, किवा पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्जेची असो. याचे साधे कारण विज्ञान तसेच ज्ञानाच्या इतर शाखा काळाबरोबर लोकाभिमुख वा सार्वत्रिक झालेल्या नाहीत. अशी विषमता नागरी संस्कृतिंत सत्तेला पूरक व पायाभूत असते. किंबहुना 'सत्तेचे केंद्रीकरण' हे नागरी समाजांचे व्यवच्छेदक लक्षण आहे
3.
अशा सत्तापिपासूंनी या ना त्या कारणांनी पृथ्वीवरच्या सर्व जमिनीचे वाळवंट केले तरी सृष्टीला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. कदाचित सहारा वाळवंटातील पिग्मी आदीवासी जमात सोडून इतर सारे मानवप्राणी नष्ट होतील. कदाचित कल्पित स्वर्गातील काल्पनिक देव हळहळतील. पण सृष्टीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.

सृष्टीचा आद्य नियम - सृष्टी सर्व सजीव योनीँना, अतिसूक्ष्म जीवाणू ते वनस्पती, व मानवासह सर्व प्राणीमात्राला, जगण्याची सुयोग्य साधने, सक्षमता व स्वायत्तता देते. या नियमात कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. ही सक्षमता अथवा कार्यक्षमता अशी: "श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन" होत. ही पंच-कार्यें कोणत्याही व्यक्तिच्या वा संस्थेच्या -- ना राजसंस्था, ना धर्मसंस्था -- अखत्यारात येत नाही. ज्यानी असा हस्तक्षेप इतिहासकाळापासून केला ते सारेच सृष्टीचे व जीवमात्राचे घोर अपराधी आहेत. त्यांचा निवाडा करायला सृष्टी सर्वतोपरी समर्थ आहे. ते सारे काळाच्या प्रवाहात वाहून गेले.
शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास
४.
सृष्टी समजून घ्यायची तर तिच्याशी अंतर्बाह्य नियमित संपर्क ठेवायला हवा. अर्थात हा स्वतःपासून सुरू होतो, तो पण आपल्या शरिर व मन यापासून. आपले सर्व अवयव - नाड्या, हृदय, फुफ्फुसे, यकृत इ. - सहजधर्माने चालतात; ते आमच्या मर्जीने चालत नाहीत. लहान बालकांना याची गरज लागत नाही. कारण तीं निसर्गतः सहजधर्माचे किंवा सृष्टीच्या धर्माचे पालन करतात. मात्र आपण - पालक, कुटुंब व समाज - त्याना गर्भधारणेपासून अनेक निमित्तांनी सहजधर्मापासून जाणता-अजाणता दूर करीत असतो. आमच्या अनेक संतांनी अनेकदा सहजधर्माचा पाठपुरावा केला, पण कधी ध्यानातच आले नाही! मुले स्वाभाविकतः सृष्टीयोगाची साधना करतात.

सृष्टीयोगाच्या साधनेत आपणच आपले गुरू! यात कोणतेही विधी नाहीत. आजच्या शहरी धकाधकीत स्वतःसाठी वेळ काढणे फार कठिण झाले आहे. चित्त विचलित करणारी किंवा आपल्या मोकळ्या वेळेचा कबजा घेणारी आमिषे आकर्षणे अमाप असतात. आपल्या शरिर व मनाचे व्यवहार लक्षपूर्वक निरखणे खरोखरच मनोरंजक असते.फक्त एकवार अनुभवायला हवे.
५ 
सृष्टीने सर्व जीवमात्राला पाच कार्यक्षमता दिलेल्या आहेत: "श्रम, विश्राम, स्वाथ्य, अध्ययन व प्रजनन" (दुवा: Work-Leisure-Health-Learning-Propagation)  ही स्वायत्त कार्ये प्रत्येक योनीच्या संरचनेला अनुरूप आहेत

पण इतिहास काळापासून नागरी समाजांतील राजसत्ता व धर्मसंस्था यांनी चढत्या भाजणीने व्यक्तिच्या व समष्टीच्या जीवनात या कार्यांवर कमी अधिक प्रमाणात कबजा केला. आता तर प्रगति व सुधारणा यांच्या नावाखाली या सर्वच कार्यांवर नव्या सत्ताधिशानी कबजा घेतलेला आहे

या सत्ता आपल्याला सर्कशीतल्या जनावरासारखे वागवतात. आपण मुक्तपणे गाणे नाचणे कधीच विसरलो. आता आपण बॉलीवुडच्या तालावर गातो. मात्र पाच हजार वर्षांच्या सवयीने आपल्याला हेच सत्य आहे असे वाटते. या सत्तेच्या राजकारणातून सुटका करून घ्यायची असेल तर ती व्यक्तिगत, कौटुंबिक व 'जमाती'च्या (community) पातळीवरच होऊ शकते. कोणतीही संस्था वा संघटणा हे करू शकणार नाही .
*  *  * 
उद्धरण :
प्राण्यात 'जाणीव' । चैतन्य असते
वर्तन घडते । त्यातूनही;
तरी जगातील । सर्व व्यवहार
होती नियमानुर । सृष्टीच्याच.
कुणा सृष्टीकर्त्या । ईश्वराची नाही
जरूरीच काही । त्यांच्यासाठी.

(विंदा करंदीकर,  चार्वाकदर्शन, "अष्टदर्शने",   पॉप्युलर प्रकाशन, २००३, पृष्ठ पृ. ७७ )

टीप: प्रतिमा: "शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास" - संदर्भ: इंटर्नेट, हे चित्र रद्दीत मिळाले. याचे मालकी हक्क New Scientist या विज्ञान साप्ताहिकाचे आहेत/असावेत.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape