April 25, 2011

टिपणीचे प्रकार अनेक: मौन आणि इतर

जीवनाच्या दिशा व मार्ग

टिपणीचे प्रकार अनेक: १ मौन, २. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ.

१. मौन, हे श्रेणीने व संख्येने सर्वांत प्रथम क्रमांकाला आहे. पण मौन नेहमीच शहाणपणाचे असते असे नाही. कारणे काहीही असोत, पण त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात नक्कीच! मौनपण बोलके असते, ऐकता आले पाहिजे. उदा. इंडियाच्या सरकारला बहुसंख्य असलेल्या दुय्यम दर्जाच्या नागरिकांचे मौन ऐकू यात नाही. यास्तव सर्वच लहान-मोठ्या राजकीय पक्षांना सत्तेसाठी गटबाजी करायला लागते.

२. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ. कोणतीही घटना आपण पाहतो, ऐकतो, वाचतो किंवा तिची चव घेतो तेव्हा मन निर्विकार, सुन्न असतेच असे नाही. नवरसांपैकी कोणतातरी रस उद्भवत असेल की?

घटना वैयक्तिक किवा सार्वजनिक क्षेत्रात असेल. आजचे जीवन एवढे जटील झालेले आहे की क्षुल्लक वाटणारी घटना दूरगामी परिणाम करू शकते. एक म्हण आहे, 'फुलपाखरू वादळ आणते'.

आज जो लाचखोरी, हेराफेरी, काळाबाजार, दडपशाही, भ्रष्टाचार इ. यांचा अचानक डोंब उसळलेला दिसतो त्याची सुरवात पण अशीच झालेली असेल. एकाद्या मौन प्रतिक्रियेने? किंवा निरुपद्रवी वाटणार्‌या घटनेने? आणि आज त्याचे चटके सर्वानाच लागत आहेत.

टिपणीचे स्वरूप मौन असो की शाब्दिक, ही पण घटना असते अन्‌ काहीतरी सांगून जाते. टिपणीमुळे घटनेच्या विषयाला कधी जोड मिळते, कधी नवी बाजू समोर येते. चूका नजरेस येतात. आणि व्यक्ती समष्टीला जोडल्या जातात.

एकाद्या घटनेचा विषय जर लोकहिताचा असेल तर खर्‌याखुर्‌या लोकशाहीत दखल घेतली जाते.

याचे एक उत्तम उदाहरण: अमेरिकेत एक फोटोग्राफर नियमितपणे तेथील अनेक कारखान्यात काम करणार्‌या बाल मजूरांचे फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करीत असे. त्याचा परिणाम 'बालमजूरी विरोधी कायदा' करण्यात झाला. त्याने काढलेले फोटो पण तत्कालीन समाजावर केलेली निर्भीड टिपणी होती. अशी अनेक उदाहरणे असतील.

घटना: समोर दिसणारी/घडणारी वस्तुस्थिती ही एक घटना, व दुसरी – शब्दचित्र, रेखाचित्र, रंगचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, किंवा चलत्‌चित्र इ. अशा स्वरूपाची – कला या सदरातील असेल.

खरं पाहता ही सर्व चित्रे तत्कालीन समाजावर केलेली टिपणी असते, पण ती निस्पृह असतेच असे नाही. आजची वस्तुस्थिती ही भूतकाळ आणि वर्तमान यांचा संमिश्र परिणाम असतो.
दोनही घटना – वस्तुस्थिती वा चित्रे  –  पाहताना एक लक्षात आले. माझ्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती, पूर्वग्रह, अत्याग्रही मते, संस्कार इ. सर्व मी केवल सत्य समजून माझे निर्णय घेतो. अनाहूतपणे मी एका चाकोरीत चालतोय. त्यापलिकडे असलेली वास्तविकता टाळतो. रोजचा पेपर वाचतानाही असेच! फक्त आवडीचे सदर पहायचे. बाकीचे दरवाजे बंद!

अधिक युक्त उदाहरण म्हणजेः मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! पण आरशात दिसणारा मी उलटा दिसतो, मी मागे सरलो हा पण दूर जातो!
हे निरिक्षण माझे नव्हे, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका बालिकेने Alice in Wonderland या पुस्तकाच्या लेखकाला, लुईस कॅरोल याला हे निरीक्षण सांगितले होते. (त्यावरून त्याला Through the Looking-Glass हे पुस्तक लिहायची स्फूर्ती मिळाली.) लहान मुले कधी चाकोरीत बंदिस्त नसतात, तीं सृष्टीच्या नियमाने चालतात. पण वडिल माणसे, पालक. शाळा, संप्रेषणाची आधुनिक साधने इ. त्यांची सहजता, निरागसता, उत्स्फुर्तता शिक्षणाच्या नावाने हिरावून घेतात.
अखेर मला गुरू भेटला. आनंद कुमारस्वामींनी मला विधायक, सर्जनशील टीका शिकवली. माझ्या मगदुराप्रमाणे मी शिकलो.

आपल्या सात संवेदना व संवेदन-सक्षमता (माझी इंग्रजी लेखमाला) क्रियाशील असतील तर कोणतेही घटीत साकल्याने समजणे शक्य असते.

― रेमीजीयस डिसोजा, मुंबई
प्रतिमा: "जीवनाच्या दिशा व मार्ग"; ही पण आपल्या जीवन-शैलीवर (life-style?) टिपणी आहे असं समजावं.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 19, 2011

शरीरधर्म : BODY-DHARMA

स्त्री-पुरुष मानव सांगाडे
शरीरधर्म

आधुनिक चक्रव्युहात फसलेल्या आयुष्याच्या मुक्तीला
नाहीत कुठे विद्यापीठे आयुष्याची कलाशास्त्रे शिकवायला.

त्यासाठी असते गरज शांत विरामाची
आणि अनिर्बंध उत्सवाची वारंवार.

या बजबजपुरीच्या साठमारीतून निघाया बाहेर
हवीय उसंत मोकळ्या निश्वासाची वारंवार;

जशी शरीराला असते टाकायची कात
आयुष्याच्या कामकांडात फसलेल्यास वारंवार;

हे कधी जाणवले नाही. ऐकले तरी उमजले नाही.
समजेल तेव्हा उशीर तर नसेल झाला फार?

आहे एकच विद्यापीठ आपलेसे, आपलेच वर्म –
घेऊन सदाची भिरभिर – विसरलेला शरीरधर्म.

रेमीजीयस  डिसोजा | मुंबई | १२-१२-२००५

टीप: प्रतिमा – स्त्री-पुरुष मानव सांगाडे, मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! विज्ञान आता मदत करते. वरील प्रतिमेत प्रौढ स्त्री-पुरुषाचे सांगाडे दाखवलेत. सृष्टीच्या संकल्पनेत अत्यंत सूक्ष्म फरक गरजेनुसार केलेले आहेत, पण कोठेही अपव्यय नाही. अशा शरीराला आपण सुंदर (?) करण्यासाठी केवढा आटापिटा करतो! जणू सृष्टीची चूक सुधारण्याचा आमचा प्रयत्न!!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 11, 2011

जगभर वनमहोत्सव – आंतरराष्ट्रीय वन वर्ष २०११

Save Forests-Save Lives
जगभर वनमहोत्सव – आंतरराष्ट्रीय वन वर्ष २०११:
सांगणारे कोण - करणारे कोण?

युनोने राष्ट्रसंघाने वर्ष २०११ वन वर्ष जाहीर केलेय असे ऐकिवात आहे.

'सौ चूहे खाकर बिल्ली हज़ करने चली' अशी एक म्हण आहे. युनो आपले पुरोहिताचे काम चालू ठेवते. आता आणखी एक विधी. या संस्थेवर कुणाचें वर्चस्व चालतें हें सांगायला नकोच!

या निमित्ताने मला चाचा नेहरूंची आठवण होते. त्यांनी पण वनमहोत्सव हा विधी सुरु केला होता. नर्सरीतून आणलेली झाडे लावायची, टाळ्या वाजवायच्या आणि विसरून जायचे. त्यांची निगा राखायला कोणाला फुरसत आहे? अशी स्थलांतरित केलेली वानसे सहसा टिकत नाहीत. वादळ आले की  उन्मळून पडतात.

ज्यांचे हितसंबंध खाणी, लाकूड-उद्योग, नव्या वसाहती बांधणे, महा-धरणांचे बांधकाम  इत्यादि उद्योगधंद्यांशी गुंतलेले आहेत ते सोयीस्कर दुर्लक्ष करतील. ज्यांचे पालनपोषण वने करतात आदिवासी व किसान त्यांना 'युनो' काय चीज आहे माहितही नसेल. अपघाताने माहित असलेच तर या विधीची चाहूल पण लागली नसेल. सरकारें व इतर कांहीं संस्था कदाचित एक दिवस सभासंमेलने भाषणे आयोजित करून हा विधी साजरा करतील झाले.

असे विधी चाकोरीत राहून चालतात. साकल्याने holistic बघायला फुरसत आणि संवय कुणाला आहे? याचे एक उदाहरण देतो.

'वाघोबांना वाचवा' मोहीम चालली होती तेव्हाची गोष्ट. एका मोबायल कंपनीने या मोहिमेचा भाग म्हणून पोस्टर दैनिक पेपरात प्रसिद्ध केले. अर्थात ही चक्क 'जाहिरातबाजी' होती. मी पण निर्लज्जपणे त्या पोस्टरचे विडंबन केले; खरं म्हणजे सर्जनशील दुरुस्ती केली.

वाघांना कोण वाचवणार? सकाळचा चहा घेताना पेपर चाळणारे माझ्यासारखे वाचक? ते फारतर आणखी एक मोबायल विकत घेतील गरज नासताना. सरकार वाचवणार? सरकार कायदे करते, घोषणा - आश्वासने देते, पण क्षेत्ररक्षण किंवा अंमलबजावणी करताना डळमळते.

SAVE OUR TIGERS Campaign Corrected by Remigius de Souza

मी माझ्या मतीप्रमाणे विचार करण्याचे स्वातंत्र्य मात्र घेतों. आणि मी दुरुस्ती केलेले पोस्टर माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिध्द करतो (दुवा पहा: SAVE OUR TIGERS Campaign Corrected).

सर्वार्थाने क्षेत्ररक्षण, वनांचे वाघांचे संरक्षण करणे सामान्य जनतेच्या हाती असते, केवळ सैन्य व पोलीस करू शकत नाहीत. पण सरकारने त्यांचीच आबाळ केली तर काय साध्य होणार? आतंकी, अतिरेकी, नक्क्षलवादी, दंगेखोर यांचे मात्र फावते.

याच्यावर पण, केले तर, ईलाज आहेत: १. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि २. जनतेच्या स्वायत्ततेचे संधारण. पण कोणत्याही सत्ताधिशांना हे कदापि रुचरणारे नाही हे पण आम्हाला माहित आहे. एवढेच काय, उच्चभ्रू व बुध्दिवादी मध्यमवर्गीय यांच्यापण गळीं उतरणार नाही!
~~~~~~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 04, 2011

गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा

वासंतिक नव्या वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.
मुंबईत गुढी पाडवा
गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा!
केवळ कॅलेंडरच नाही, आपल्या देशातील चालीरीती, पूजा, विधि, परंपरा, सण, सोहळे, जत्रा, बारशापासून अंतयात्रेपर्यंत होणारे अनेक विधी हे सृष्टीमातेशी कुठे ना कुठे निगडीत असतात, जशी वटपूजा.
अनेक विधी आता जरी कधीकधी यांत्रिक पणे होत असले तरी सृष्टी आपल्या मनात, मातीत पडलेल्या बीजाप्रमाणे सुप्तावस्थेत असते.
केव्हा ना केव्हा ती रुजेल, फुलेल अशी आशा करायला पुष्कळ जागा आहे.
रेमीजीयस डिसोजा

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 01, 2011

मातीचा माणूस - मातीचा सुगंध : Son of the Soil

मातीचा माणूस - मातीचा सुगंध

मातीचा गोळा     माणूस त्यातून केला
नांव त्याचे ठेवले     मातीचा पूत

पावसांत त्याला     भिजत ठेवला कुजत ठेवला
ठोकून थोपटून घडवला     उनांत त्याला करपला

मातीचा गोळा     केला त्याचा एकाच प्याला
साठवली     पहिल्या धारेची त्यात नशा
    मध्य रात्रीच्या     नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा गोळा     त्याची केली     पणती
वात त्यात पेटवली     मध्य रात्रीच्या
    नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा माणूस     विसाव्या शतकाच्या अखेरीला
चावूनझ चालायमा राजकारणी     लोकांची पंथास लागलेला.

माणसाची माती    उंबरठ्यावर     एकविसाव्या शतकाच्या.

मातीचा सुगंध.   

* * *
मुंबई | ६.३.१९८९
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape