April 19, 2011

शरीरधर्म : BODY-DHARMA

स्त्री-पुरुष मानव सांगाडे
शरीरधर्म

आधुनिक चक्रव्युहात फसलेल्या आयुष्याच्या मुक्तीला
नाहीत कुठे विद्यापीठे आयुष्याची कलाशास्त्रे शिकवायला.

त्यासाठी असते गरज शांत विरामाची
आणि अनिर्बंध उत्सवाची वारंवार.

या बजबजपुरीच्या साठमारीतून निघाया बाहेर
हवीय उसंत मोकळ्या निश्वासाची वारंवार;

जशी शरीराला असते टाकायची कात
आयुष्याच्या कामकांडात फसलेल्यास वारंवार;

हे कधी जाणवले नाही. ऐकले तरी उमजले नाही.
समजेल तेव्हा उशीर तर नसेल झाला फार?

आहे एकच विद्यापीठ आपलेसे, आपलेच वर्म –
घेऊन सदाची भिरभिर – विसरलेला शरीरधर्म.

रेमीजीयस  डिसोजा | मुंबई | १२-१२-२००५

टीप: प्रतिमा – स्त्री-पुरुष मानव सांगाडे, मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! विज्ञान आता मदत करते. वरील प्रतिमेत प्रौढ स्त्री-पुरुषाचे सांगाडे दाखवलेत. सृष्टीच्या संकल्पनेत अत्यंत सूक्ष्म फरक गरजेनुसार केलेले आहेत, पण कोठेही अपव्यय नाही. अशा शरीराला आपण सुंदर (?) करण्यासाठी केवढा आटापिटा करतो! जणू सृष्टीची चूक सुधारण्याचा आमचा प्रयत्न!!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

5 comments:

  1. आतला 'मी' बघायला आरसा नसला तरी चालतो, दृष्टी मात्र हवी! :-) ती तयार होण्याचे महत्त्व.. आणि गम्मत म्हणजे त्यात (ती दृष्टी तयार होण्यात) बाहेरच्या जगाचाही मोठा वाटा असतो!

    ReplyDelete
  2. शांता शेळके यांची कविता "ओळखतील जे मला आणि मज | दावतील मम यथार्थ ओळख | कण कणी माझ्या देतील किंवा | अवघ्या ब्रम्हांडाची ओळख..." मला नेहमी आठवते. धन्यवाद

    ReplyDelete
  3. जे देखे कवी ते न देखे रवी. श्री. डिसोजा, काय हो, आपण नेहमीच तिरकस लिहिता का? पण काही म्हणा. आपण येथे नेमके नाडीवर बोट ठेवलेय!
    सविताबाईंनी कविता बाजूला सारली, टिपणी धरली, आणि टिपर्‌यांचा डान्स सुरू केला याचं नवल नाही वाटलं. टिपिकल मराठी बुद्धिवाद, विषयाला सोडून! मला वाटते लेखक सृष्टी'वादी' आहे! मला वाटतं कवी आतलं व बाहेरचं, दोनही जगं येथे दाखवतोय. ही कविता मला तरी रोमँटिक किंवा क्लासिकल आहे असं वाटत नाही. असं बहूपेडी लेखन सहसा कोणाच्या गळी उतरत नाही. स्पेशालिस्टांना कसे रुचेल?

    ReplyDelete
  4. @Anonymous
    वाचकाचे स्वातंत्र्य मी मानतो. त्याशिवाय ब्लॉग हा चव्हाटा आहे. आपण पण अनाहूतपणे टिपणीच्या नाचात सामील झाले याचा आनंद आहे. मी सृष्टीवादी अर्थातच नाहीय. मी सृष्टीयोगाचा साधक आहे म्हणा वाटल्यास. तिरकस लिहिणे बोलणे कोकणच्या मातीचा गुण आहे.

    आयुष्याच्या धिम्या पायवाटेवर कधीतरी लक्षात आलेः वयाच्या पहिल्या पंधरा ते अठरा वर्षांत व्यक्तीव्यक्तीस मिळणारे 'संगोपन, अध्यापन, पर्यावरण [सामाजिक, नैसर्गिक इ.] व दिशाभिमुखन' त्यांचे भवितव्य व दिशा ठरवतात. आणि ते आपापल्या मार्गाने जातात.

    कांही दिवसांपूर्वी 'अशी कविता: एक कोडें' या ब्लॉगवर प्रसिद्ध केली होती. जरूर पहा कोडें सोडवून?
    http://remichimarathiboli.blogspot.com/2009/07/blog-post_14.html

    ReplyDelete
  5. @All-the-readers: क्षमस्व! एक दुरुस्ती! या पूर्वीच्या टिपणीत (ता. २२- ०४-२०११) मी अनावधानाने 'नकळत' या शब्दाऐवजी 'अनाहूत' हा शब्द वापरून अपराध केला. यासाठी मी दिलगीर आहे. माझ्या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत आहे, अनामिकांचे पण.

    ReplyDelete