August 15, 2011

कुरूक्षेत्रानंतर..., महाश्वेतादेवी (समीक्षा)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी । अनुवाद : वर्षा काळे । प्रकाशक : मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे । २०१० । किं. साठ रुपये ।

अनुवाद: वर्षा काळे यांनी इंग्रजी भाषांतर चपखलपणे मराठीत बसवलेय. कांही नवीन पण समजायला सोपे शब्द आजच्या परिस्थितीनुसार येतात हे स्वागतार्ह आहे. जसे: राजवृत्त (राजा?) लोकावृत्त (प्रजा?) हे तत्कालीन परिस्थितीला योग्यच आहेत; जो बळी तो राजा. जे दुर्बल ते प्रजा! असे अनेक शब्द संवाद - गाणी - वर्णने यांत येतात. आणि विशेष म्हणजे राजवृत्तातील व लोकवृत्तातील सारी माणसे एकच बोली बोलतात. 'लोकांच्या' तोंडीं गांवठी भाषा घातलेली नाही.
अवतरण -१ अनुवादिकेचे मनोगत, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अनुवादिकेचे मनोगत : ही प्रस्तावना प्रसंगानुरूप लांबी-रुंदी-खोलीसह आहे. हे महाश्वेतादेवींचे मराठीत पहिलेच पुस्तक असावे! वर्षा काळे यांनी लेखिकेचा, आपला व दोघांचा संबंध याचे पुरेसे वर्णन केलेले आहे. नाहीतर हे पुस्तक अपुरे राहिले असते.

महाश्वेतादेवी यांचे 'कुरुक्षेत्रानंतर...' हा अनुवाद अंजुम सन्याल यांनी केलेल्या 'After Kurukshetra' या इंग्रजी भाषांतरावरून केलेला आहे. त्यांचे साहित्य, भाषांतरीत का असेना, मी पहिल्यांदाच वाचत होतो.
त्यांच्याविषयी - त्यांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्याना मिळालेले पुरस्कार यासंबंधात - वर्तमानपत्रांत येणार्‌या बातम्या वाचत होतो. पण मुद्दाम शोधून कथा-कादंबर्‌या वाचणे मला जमत नाही. व सहज हाती आलेले साहित्य दर्जेदार असले तर मी वाचायचे टाळीत नाही.

प्रस्तुत समीक्षा एक मुक्तचिंतन
 महाश्वेतादेवींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे फलीत काय झाले वा होतेय किंवा होणार हे माहित नाही, पण कोणीही कल्पना करू शकेल.

'कुरूक्षेत्रानंतर...' यांत तीन कथा आहेत. महाभारत-युद्धाने केलेल्या संहारानंतर राजवृत्तातील व लोकवृत्तातील स्त्रियांच्या अवस्थेवर या कथा आहेत. त्या उत्तरा, कुंती आणि सौवाली यांच्या भोवती गोवलेल्या आहेत.

या कथा राजवृत्त, उच्चभ्रू (elite) समाज व लोकवृत्त, शूद्र / आदिवासी (peasant /aborigine) जमाती यांच्या स्त्रियांना जोडतात, आणि दोन समाजांतील सांस्कृतिक (cultural) द्विभाजन (dichotomy) दाखवतात.
आज  हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत असलेले तर दिसतेच आहे आणि विकोपास जातेय हेपण दिसते.

पहिली कथा: 'पंचकन्या': उत्तरा ऐन तारुण्यात विधवा झालीय, अवाक, विमनस्क आहे. तिला रिझवायला भग्न रणांगणावरून पांच तरुणी तिच्या सख्या होतील या अटीवर आणल्या जातात; त्या दासी म्हणून यायला तयार नसतात. त्या उत्तरेच्या वयाच्या होत्या. त्यापण या युद्धात विधवा झाल्या होत्या, आपल्या पतींची कलेवरं शोधायला कुरुजंगलातील त्यांच्या गावातून आल्या होत्या.

अवतरण-२  'पंचकन्या', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अवतरण-३  'पंचकन्या, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
राजवाड्यातील सर्व विधवा ज्या व्रतस्त आहेत आणि आदिवासी विधवा ज्यांना भविष्य आहे. अशी ही कथानकाची अत्यंत युक्त व परिणामकारक मांडणी आहे.

दुसरी कथा: 'कुंती आणि निषादीन' (निषाद आदिवासी स्त्री). वारणावत नगरातील लाक्षागृहात आपल्या पांच मुलांसह एक निषादीन आदिवासी स्त्री, कुंती व पांडवांच्याऐवजी जळून मेली होती. ही कथा सर्वांना माहित आहे. पण तिचे विश्लेषण येथे येते जे नजरेआड राहिले होते.
कुंती वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासह अरण्यात राहात होती. त्या निषादिनीची ज्येष्ठ सून तिला शोधून काढते. ती कुंतीला तिच्या कपट कारस्थानाची आठवण करून देते व जाब विचारते. पण ती निरुत्तर होते.

तिसरी कथा : 'सौवाली' ही वैश्य स्त्री धृतराष्ट्राची दासी होती. त्यांचा अनौरस मुलगा सौवाल्य जो युयुत्सू नावाने ओळखला जातो. युद्धात तो पांडवांना जावून मिळाला होता.

अवतरण-४  'सौवाली', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
'सौवाली' या कथेत कुंती, गांधारी व धृतराष्ट्र रानातल्या वणव्यात जळून मेले. व युयुत्सूने बापाचे तर्पण केले. (लेखिकेचे संदर्भ- 'महाभारत सरनौबत', लेखक - राजशेखर बसू। सौवाली: संदर्भ- 'पौराणिक अभिधान', लेखक- सुधीनचंद्र सरकार)

या कमीअधिक लांबीच्या तीनही पौराणिक कथेत लेखिकेने तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वातावरण निर्माण केलेले आहे. शब्दांचा मितव्यय डोळ्यांत भरणारा आहे.

महाभारत वाचताना तत्कालीन वातावरण आपल्या ध्यानात- नजरेसमोर क्वचितच येते. तत्कलीन लोकसंख्या किती असेल हा विचारपण आपल्या मनास कधी शिवत नाही. किंबहुना आपले लक्ष गोष्ठीत गुंतलेले असते.

लेखिकेला हे कसे साध्य झाले याचे कारण ती नागरसमाजाचा एक भाग आहे, व तिचा आदिवासी जमाती व लोकसमुहांचा व्यासंगपूर्ण अभ्यास. आदिवासी प्रागैतहासिक काळात आजही रहात आहेत असं म्हणता येणार नाही.

आदिवासी संस्कृती जतन करायचा वैश्विक वारसा
पण त्यांची सांस्कृतिक मूल्ये व जमातीचा एकसंध आकारबंध मात्र अबाधित आहेत, जी त्याना निसर्गमातेशी जोडून ठेवतात. पांच हजार वर्षे सर्व जगभर नागरसमाजांनी केलेल्या उच्छेदांतूनही ते टिकून आहेत त्याचे हेच कारण. गेल्या पांचशे वर्षांत मात्र वसाहतवाद्यांनी अनेकांचे शिरकाण केले.

या कथांत आदिवासींची निसर्गाशी संवाद साधून राहाण्याची धारणा व जीवनरीती (जीवनशैली नव्हे) ही त्यांच्या घर-परिसराची प्रसंगोचित वर्णने, संभाषणे, गाणी,  प्रसंगयोजना यांतून लेखिकेने सूचकपणे दाखवली आहेत.

त्याचबरोबर युद्धाच्या भीषणतेचे सम्यग दर्शनपण येथे आहे! खरं पाहाता पहिले व दुसरे जागतिक महायुद्धें, गेल्या शतकात जगभर झालेली अनेक युद्धें, कलिंगचे युद्ध, पानिपतचे युद्ध आणि या पौराणिक यद्धांत काहीच लाक्षणिक फरक नाही.

फक्त एकदा वेगळे घटित घडले : सम्राट अशोकाची उपरती व मन:पालट. अन् त्याचा इ. स. दोनशे वर्षांपूर्वीचा अहिंसक वसाहतवाद! अनन्यसाधारण!

महाभारत एक कालातीत ((timeless) कृती! त्याची आतापर्यंत अनेक रूपांत, माध्यमांत - दशावतारापासून कार्टूनपर्यंत - कोट्यवधी पारायणे जगभर झाली असतील.

या तीन कथा मात्र त्यांतील एका दुर्लक्षित भागावर नजर टाकतात. हा आहे आदिवासी संस्कृती आणि नागरी समाज यांतील द्वैत (dichotomy) व त्यांतून निर्माण होणारा संघर्ष.

तसं पाहिल्यास एकलव्य, नागवंशी आदिमजमातीच्या निसर्गनिवासाचा, खांडव वनाचा, विनाश आणि त्याचे पर्यावसान म्हणून पांडवांचा झालेला कुळक्षय या ठळक कथा अनेकांस माहित आहेत. पण तत्कालिन नैसर्गिक व सामाजिक पारिस्थितिकीवर होणार्‌या परिणामांचा विचार कोणी केला असल्यास माहित नाही.

मानववंश व पुरातत्व या शास्त्रांचा उदय गेल्या दोन शतकांतला. आपल्या देशातील बहुतत्वी समाजाला 'मानववंशशास्त्र' या विषयाचा अभ्यास शिक्षणाच्या सर्वच शाखांत अत्यंत निकडीचे आहे. विषेशतः इतिहास विषयात याचा सर्व शैक्षणिक स्तरांवर समावेश केला पाहिजे. सरकारी अंमलदार-दरकदार-सांसद-आमदार-खासदार यांस विशेष धड़े देण्याची व्यवस्था करायला हवी!

आजच्या सुशिक्षितांसाठी आधुनिक शिक्षणाची गरज 
पर्यावरणाच्या शास्त्रोक्त विचाराला चालना मिळाली ती गेल्या पन्नास वर्षांत. पण प्राणी व वानसें मात्र पर्यावरणासंबंधांत अज्ञान नसतात; नवजात बालकपण संवेदनशील असते. कृषीवलांचा तर पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्याशी रात्रंदिवस संबंध येतो, भले ते उच्चभ्रू वर्गासरखे वाचाळ नसतील!

आमच्या सरकारने तर आता इयत्ता पहिलीपासूनच पर्यावरण हा विषय शिकवायला सुरवात केलीय. खरं पाहता पंतप्रधान-मुख्यमंत्र्यापासून ते पटेवाल्यापर्यंत सर्वांसाठी या विषयाच्या खास सक्तीच्या शिकवण्या द्यायला हव्या. मग प्रगतिची कोणत्या क्षेत्रात अधिक गरज आहे ते सरकारला थोडेफार कळेल.

महाभारतातील एक अवतरण वाचलेले आठवते. पांडव अज्ञातवासात होते. ते वनात रहात असताना तेथल्या ऋषीँनी त्यांना सांगितले, "त्या वनांत त्यानी एकाच जागी तीन दिवसांहून अधिक काळ वसती करू नये. नाहीतर वनाचे जळ-जमीन-वानसे-वनचर नैसर्गिक संतुलन बिघडते."
हे अवतरण अर्थातच सर्व युगांतील व प्रदेशांतील सरकारांना उद्धेशून आहे. पण व्यवहारात याचा उपयोग फ़क्त अवतरणापुरता मर्यादित राहतो.

दुर्गा भागवत, लेखक व मानववंशशास्त्रज्ञ, यांनी अदिवासींचा अभ्यास व संशोधन त्यांच्या परिसरांत जाऊन केले होते, व बरंच साहित्य पण इंग्रजी व मराठीत लिहिलं. त्यानी आदिवासींच्या लोककथापण मराठीत आणल्या. दुर्गा भागवतांनी 'व्यासपर्व' या पुस्तकात लिहिलेली एकलव्याची व्यक्तिरेखा (मोहरीतली ठिणगी) आठवणीत कायम लेणं कोरून राहिलेली आहे.

महाश्वेतादेवींच्या या तीन कथा ('कुरूक्षेत्रानंतर...') आपले स्थान ध्रुव तार्‌यासारखे कायम करतात. कारण साधेच आहे : उत्तर/ दक्षिण/ पूर्व/ पश्चिम, कोठेही गेलो तरी ही अवस्था अनेक अवतारानी सतत नजरेस येते. मानवतेची नागरी संस्कृतिच्या शापातून कधी सुटका होईल माहित नाही?

टीप: आदिवासी घर व परिसर (पहाः Tribal Housing and Habitat -1) या विषयाचा, आणि त्या अनुषंगाने येणारी इतर अंगांचा (पहा:TRIBAL SKILLS - आदिवासी हुन्नर), अभ्यास मी काही वर्षें केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. त्याची नोंदणी नंतर केली. या पुस्तक-परिक्षणाची पाळेमुळे माझ्या या स्वतंत्र अभ्यासात आहेत आणि त्याचे श्रेय सर्व आदिवासी जमातींना जाते.

रेमीजीयस डिसोजा
१५ ऑगस्ट २०११ 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. हे पुस्तक वाचायचे राहिले होते .. आता नक्की वाचेन.

    ReplyDelete
  2. सविताजी, पुस्तक वाचल्यावर आपली प्रतिक्रिया या ब्लॉगवर जरूर नोंदवावी. व्यक्ति तितक्या प्रतिक्रिया!

    ब्लॉग एवढ्याच, किंबहुना जास्तच, प्रतिक्रिया पण जरूर असतात, असे मला वाटते. माझ्या एका तरुण मित्रास हे पुस्तक अजिबात आवडले नाही, एकाद पान वाचून हातावेगळे केले. दुर्गा भागवतांची लोककथांची पुस्तके मात्र त्याने आवडीने वाचली.

    ReplyDelete