October 22, 2011

एक कालातीत कवी : बालकवी - त्र्यं. बा. ठोमरे

एक कालातीत कवी : बालकवी
बालकवींची सृष्टी
(बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे, जन्म- १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू- ५ मे १९१८)

शंभरीनंतरी बालकवींच्या कविता आजही नुकत्याच उमलणार्‌या कळीसारख्या ताज्या आहेत.

आज नागरी समाजाच्या जीवनशैलीत, भाषेत, अभिरुचीत फरक झाला आहे. पण आजही या कवितांच्या नाविन्यावर कांहिंही परिणाम झालेला मलातरी जाणवला नाही.

'समग्र बालकवी' [टीप १] हें पुस्तक वाचनालयातून आणले. तेथे समजले, एका संस्थेने हें ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी नेलें होतें. ऐकून फार आनंद झाला.

पुस्तक घेतल्यावर प्रथम पहिल्या पानापासून शेवटपर्यंत चाळले, कुठे काय आहे पाहिले. ओळखीच्या दोन कविता भेटल्या.

'ती फुलराणी' मी शाळेंत असताना वाचली होती. पहिले चार चरण मात्र कायमचे ध्यानांत राहिले होते. तेंच 'आनंदी आनंद गडे' या कवितेचे. चार ओळी का असेनात पण कायम आठवणींत कोरल्या गेल्या, अन त्या वेळोवेळी आठवतात पण. यांनी बालमनावर केलेले संस्कार पण कधीं पुसले जात नसावेत.

गेल्या शंभर वर्षात अनेक समर्थ साहित्यिकांनी, समिक्षकांनी, अभ्यासकांनी त्यांच्यावर व कवितांवर विविध लेखन केलें, टीका लिहिल्या, संपादन केले, प्रबंध लिहिले. अगदी काल परवांपर्यंत.

॥ बालकवींची सृष्टी ॥
 अवतरण १
_______________________________________________
॥ सृष्टि ॥
चाल : अरुण
सृष्टि मला हांसविते। स्वर्गसौख्य दाखविते
शांतीने पालविते। आनंदें डोलविते
मन माझें टाकि गडे नित्य गुंगुंनी ॥१
(अपूर्ण कविता पृ. २१७) 
_________________________________________________

"सृष्टी" हा शब्द कवितांत बत्तीस वेळां येतो. कांही नजरेतून सुटले असतील. ते वेगवेगळी रुपे घेऊन आलेत. त्यांत एक आहे "अंत:सृष्टी". तसेच निसर्ग, जग, विश्व इ. शब्द या संदर्भाने येतात. त्यांच्या कविता सृष्टीने - निसर्गाने, प्रकृतिने - अंतर्बाह्य समृद्ध केलेल्या आहेत हें सर्वांना माहित आहे. पण त्यांची सृष्टी प्रातिनिधिक नाही, सांप्रदायिक नाही हे विशेष आहे.

ती सृष्टी वास्तव आहे, इंद्रियगम्य आहे. सूर्य चंद्र तारे... ब्रम्हांडापासून जळ जमीन जीव... गवतापर्यंत सर्व जैव-अजैव निसर्ग तिच्यांत सामावतो. एवढेंच नाही तर तिचें आंतरिक अस्तित्वपण संवेदना, भावना, प्रज्ञा, विचार... यांनी प्रतीत झालेले जाणवते.

"सृष्टी" शब्दाचे कांही निवडक उल्लेख

सृष्टीचे मंजुळ ताल
... ... ...
         ही सृष्टीचीं
         निगूढतेचीं
         तत्त्वें साचीं
सांग उकलुनी आह्मांतें
गा गा गा विहगा गीतें ॥२॥ (८३),

| मनोवेधका सृष्टीसतीच्या अगा चिमुकल्या बाळा (६८) | हें तान्हें । सृष्टीचें गोजिरवाणें! (९१) | सृष्टि बालिका (२१८) | सृष्टीदेवीच्या सगुणा बाळा (११९) | सृष्टि तुझी ही --- हेंच तुझें घर --- विहार (१५०) | सृष्टिसतीने साज घेतला (१८८) | दिव्यरूपिणी सृष्टी (१९२) | ती आशा मग सृष्टीबंधनीं पुन्हां जीवास घे गोंवुनी (२०७) | हालवीत कचभार सृष्टीचें उत्थापन बोले (२१९) | हे रवी शशी तारका तसे ग्रहगोल. / ही सृष्टिसुंदरी मजला गाया शिकवी, / हीं चराचराचीं निगूढ गीतें कांहीं. (२३५) | हर्षविल अंतःसृष्टी मला (२४९) | विविधा सृष्टी (२५९) |कविता शीर्षक, 'सृष्टीच्या गायकास' पृ. 83. । "कवीच झाला सृष्टि, सारी सृष्टि झाली कवी" (प्रस्तावना, संदर्भाचा उल्लेख नाही, पृ. बत्तीस) ।

साकल्याने [टीप २] पाहिल्यास, त्यांच्या सर्व कवितासंभारांत जाणवते की मानवाला सृष्टीपासून वेगळे अस्तित्व नाही, तसेंच ती भोग्य वस्तूपण नाही. दिव्य, देवता, दिव्यत्व इत्यादि उल्लेख पाश्चिमात्य Divinity या धार्मिक कल्पनेपेक्षा आत्मिकतेवर -- religiousness -- आधारलेले आहेत; जशी त्यांची पहाट स्थल-विशिष्ट नाही तर वैश्विक आहे.

॥ बालकवी : एक कालातीत कवी॥

त्यांच्या अनेक कवितांत वेगवेगळ्या नव्या अपारंपरिक देवतांचे उल्लेख येतात, त्यांत मानव नव्हे, 'श्रीमानवता'देवी सुद्धा येते. आणि त्या अभावितपणे सृष्टींत उगम पावतात. यामुळे त्यांची सृष्टि-देवता व आत्मिक-ता नास्तिकाला किंवा अज्ञेयवाद्याला पण नाकारता येणार नाहीत. 
आज जडवाद व चंगळवाद यांच्या वावटळी संप्रेषण-माध्यमांतून फोफावत आहेत. या आधुनिकतेने लोकांचे आयुष्य चाकोरीबद्ध तर केले आहेच व त्यांची त्रेधा पण उडवलेली आहे. याची सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली.
 
बालकवींच्या कवितेत कधीकधी निराशेचे जे सांवट दिसते त्याचे कारणही यांत असावे असे मला वाटते. पण त्यांचा सहजधर्म व सर्जनशीलता या स्थितिला पुरून उरणारी होती. बालकवींची कविता या आधुनिकतेच्या फार पुढे गेलेली आहे.
 
वडाचें बीज मोहरीपेक्षाही लहान असते. आणि ते कोठेही रुजते, खडकावरपण. पण त्यांत या महावृक्षाचे संपूण आलेखन (DNA) लिहिलेले असते हें  कदापि विसरून चालणार नाही. बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी आधुनिकतेची नाडी बरोबर ओळखली होती.
अशा वेळी अनेक लोकांस त्यांची कविता नैतिक आधार देऊ शकेल. आणि ही अत्यंत निकडीची गरज आहे असं मला प्रांजळपणे वाटते.
अवतरण २
________________________________________
 श्रीमानवता ॥
चाल : सूर्यकांत (समुदितमदना)
ग्रंथारंभीं नमन देवते श्रीमानवते तुला ।
दिव्यदेवता विविधरूपिणी तूंच एक निस्तुला ॥
(
पृ. २०९)
_____________________________________

॥ चिरयौवना सृष्टी ॥

 ॥ जेथे जातो ती माझी सांगाती ॥ ( रेमी डिसोजा)

मला अभिप्रेत असलेली सृष्टी: ती सतत सर्जनशील निर्मितीत रममाण असते. ती जीवाणू ते वानसें-मानव यांना समान लेखते. ती मानव समाजांतील भेद - उच्च - नीच, त्यांची शास्त्रें - नीतिनियम, त्यांचे ईश्वर - अवतार - महात्मे, कशालाच वोळखत नाही. एकदा संपूर्ण जीवलोकाला पोषण, संवर्धन, संरक्षण इ. साधने दिल्यावर तिचे पुढील काम - शौचाचे परिवर्तन (recycle) - चालू राहते. जेव्हा साध्य आणि साधन यांच्यांत दुजाभाव असतो तेव्हा अराजक (chaos) निर्माण होते. सृष्टीयोग म्हणजे साध्य आणि साधन, दोनही एकच - सृष्टी - असते.

आयुष्याच्या दिशा
बालकवींच्या अल्प-आयुष्यांत त्यांची भटकंती; मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याचा अभ्यास; व भौतिक परिस्थितीशी केलेला सामना साकल्याने पाहता जाणीव होते की हा असामान्य कवी काळाच्या फार पुढे गेला होता, नव्हे काळाला पुरून उरलेला आहे.

टीप  १ :  "समग्र बालकवी" । लेखक : त्र्यंबक बापूजी ठोमरे । संपादक : नंदा आपटे । प्रस्तावना, संपादित आवृत्त्या, संदर्भसूची : एस. एस. नाडकर्णी । पॉप्युलर प्रकाशन मुंबई । प्रथम आवृत्ती, २००५ । किंमत रु. ४००/- । बालकवींच्या एकत्रित कविता आता उपलब्ध नाहीत. या पुस्तकाने ती एक फारच मोठी उणीव भरून काढलेली आहे. सर्व अवतरणें व संदर्भ या पुस्तकांतून घेतलेले आहेत. या पुस्तकाचे कॉपीराइट प्रकाशकाच्या स्वाधिन आहेत.
टीप २ : Holistic: In nature a whole is larger than the sum of all its parts. साकल्य : निसर्गाची पूर्ण कृति तिच्या सर्व भागांच्या बेरजेपेक्षा अधिक असते.उदाहरण: पाण्याची वैज्ञानिक व्याख्या जरी "H2O" असली तरी पाणी त्याहूनही अधिक असते. बालकवींच्या कविता वेगवेगळ्या करून साहित्य शास्त्राच्या व सौंदर्य शास्त्राच्या चौकटीतून पाहिल्या की बरेंच कांही हातातून निसटून जाते.

© Remigius de Souza. All rights reserved.|

Labels: , ,

1 Comments:

At 2 November 2011 at 11:39 , Blogger Archetypes India said...

"ढिंक चिका ढिंक चिका ए ए ऐऽ..." आणि "डम डम डिगा डिगा मौसम भिगा भिगा"च्या जमान्यांत व यंत्रयुगाच्या वाळवंटात बालकवींची कविता शंभर वर्षांपासून थंडावा देणारी मरूहिरवळ - ओयासिस आहे.
त्यांच्या कवितेंत एकाच नजरेत मला जोडणारी सृष्टीची तार गवसली. ती मला अंतर्मुख करते माझी कविता बघायला, पण तुलना करायसाठी नव्हे.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home