January 10, 2012

शोध — प्रतिशोध

शोध प्रतिशोध

ओघाच्या उलट्या दिशेने
चाललेली वाटचाल
तिस्तेच्या झंझावाती
झोतात पोचली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  १

कोयनेच्या उदरातून
उसळलेल्या उद्रेकात
आश्रय घेतला तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही  २

नर्मदामाईच्या उफाळत्या
महापुरातील भोवर्‌यात
ओंडक्याची भिरभिरणार्‌या
संगत केली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  ३

सायरनच्या गोँगाटाने
अन्‌ तोफगोळ्यांच्या धडाक्याने
भरलेल्या निष्टावंत संस्कृतीत
कुशीत मरूभूमिच्या
केली तप्त गोठवणारी शय्या
तेव्हाही असुरक्षितता जाणवली नाही  ४

मिनिटापळांच्या हिशेबात
कितिक आयुष्यांची माती करणार्‌या
अंगावरील अखेरच्या वस्त्राची लक्तरे करणाऱ्या
सुधारक संस्कृतींच्या वावटळीत
झेप घेतली तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही.  ५ 

दिशाशृन्य नागरी अरण्यात
बिनसावलीच्या वाटाना अनंत
अराजकतेचे असंख्य चक्रावणारे
फुटतात धुमारे
तेव्हाही असुरक्षित नाही वाटले  ६ 

या शोधाची सांगता कधी होणार?
रक्ताची कारंजी शुष्क झाल्यावर?
की संवेदनांचे स्फुल्लिंग पिचल्यावर?
भावनांचे श्रोत वाफारल्यावर?
की दगडातील अणुरेणू जागे झाल्यावर?  ७

तारिख ७ .८ .१९९१
***
रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.