March 29, 2012

रेमीची "विद्रोही कविता": एक व्यत्यासकथा

कविता सुटका करते माझी अनेक जंजाळातून, जेव्हा जेव्हा अशक्य होते तर्कसंगत गद्य लिहिणे एकाद्या घटनेवर, जी होते पीडायायक समस्ताना अन स्वत:ला. जेव्हा अशक्य होते मुद्देसूद लिहिणे, ५०० अक्षरात, ५०० शब्दात, ५०० वाक्यात, ५०० पृष्टांत लिहिले तरीही विपर्यास अटळ असतो. (अशाच एका प्रसंगी लिहिली होती कविता "Who is the giver? Who is the receiver? ": जेव्हा त्या घटनेचे परीक्षण लिहिणे अशक्य झाले होते.)

अशावेळी कविता येते धावून मदतीला, "लिही" म्हणते, "खुंटीवर टांगून व्याकरण आणि सौंदार्यशास्त्राचे नियम". "लिही" म्हणते, "पंधरा किंवा पाचच शब्दात, आनंदाची लकेर किंवा वेदनेची किंकाळी, किंवा भावपूर्ण श्रध्दांजली... भावनेचा उद्रेक..."

होळीच्या उत्सवात भिल्ल कुटुंबांबरोबर जत्रेच्या गावी / जागी जाताना बायामुलींनी गायलेली गाणी आठवतात. "सांदी खुटी ओ ऽ ऽ हेंडो मेला ऽ ऽ ऽ ऽ य ऽ से..." ("चांदी खुंटली - कमी पडली - ओ, चला मेळ्याला..."). गाण्याच्या तालावर डोंगर खडकातून पण चालणे चालणे रहात नाही, त्याला नाचाची लय येते आणि मैलांचे अंतर कधी कसे संपते कळत नाही.

"ग्यानोबाबा तुकाराम माऊली" बोलांवर वारकरी स्थल - काळाच्या परिमितींच्या पार जातात.

"जो! जो ना बा पाणी!" ("बघ! बघ ना आई पाणी!") एसटी बसमधली एक तरुणी उत्स्फूर्त शब्दात आईला सांगते. ती लग्नाच्या व्हराडाबरोबर आहे. काठेवाडहून ते व्हाराड बडोद्याला जात होते. बस खेडा जिल्ह्यात आली. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली होती. हे लोक तीन वर्षे अवर्षणाच्या झळा सोशित आले होते. तिच्या वडिल मंडळीने अशी अनेक अवर्षणे अनुभवली असतील. त्या यौवनेच्या पाचच शब्दात त्या सर्वांची आर्तता आणि आनंद एकाच वेळी व्यक्त होत होता.

"होळये माय तुजां रोंबाट गे
चिचेचां पान तुजां आंबाट गे"
कोकणात होळीच्या उत्सवात लहानपणी ऐकलेले हे गाणे. होळी-आईला जेवणात चिंचेचे पान पण पुरेसे होते.
तीच गोष्ट खेडोपाडीं बायकांच्या जात्यावरच्या श्रमापरिहार करणारया ओव्यांची.

अशा एक-दोन ओळींच्या अभिव्यक्तित -- मग ती अभिजात कविता, गीत नसेल, त्यात कल्पनाविलास नसेल, त्याना साहित्य विशारदांची मान्यता नसेल, पण वास्तव जीववनाचे काव्य ओतप्रोत भरलेले असते.

तृतीय जगत आणि चतुर्थ जगत इंडियातील (Third World and Fourth World India) सहा लाखांहून अधिक खेड्यात लोक गीतांचे तसेच इतर साहित्याचे केवढे भांडार भरलेले असेल याची कल्पनापण करत येणार नाही। दूरदर्शनवर आणखी शंभर वाहिन्यापण त्यांचे प्रतिनिधित्व करायला पुरे पडणार नाहीत.

कुठेही उधळपट्टी नाही. अपव्यय नाही: नाही शब्दांचा, नाही जीवनावश्यक साधनसामग्रीचा. इंडियातील कोट्यावधी शेतकरी, खेडूत, आदिवासी जनतेला उधळपट्टी परवडणारी नाही.

त्यांचे हे धोरण "प्रथम जगत इंडियाच्या" (First World India) अगदी उलट आहे, मग तो ताजमहल असो की चंद्रयान असो, बॉलीवूड असो की टेलीवूड! पण हे "प्रथम जगत इंडियन लोकांच्या मट्ठ मेंदूत जाईल तेव्हा ना? माझा हा ब्लॉगपण याला अपवाद नसेल!

त्या अद्वितीय लोक गीतांचे काही कण लहानपणीच माझ्या कानावर पडले हे माझे सुदैवच. त्या दिवट्यांचा प्रकाश पण या अरण्यातील अंधारलेल्या रात्रीं पुरेसा होतो, हरवलेल्या शब्दांचा, अर्थांचा, सूरांचा, मुद्रांचा, नादांचा शोध घ्यायला -- वाट दाखवायला -- दिशा दाखवायला.

माझे देशी मानस जाणते, "जीवनासाठी कला" आहे, "कलेसाठी कला" नाही. माझे जे काही विलायती सांघिक पध्दतीने शिक्षण झाले ते काही फारसे परिणामकारक ठरले नाही. मी जरी अंशत: नागरी समाजाचा (civilized society) भाग असलो तरी त्यानेही काही फरक पडत नाही.

माझा एक साधा सरळ समज किंवा विश्वास किंवा श्रध्दा आहे:
"जीवन सर्वश्रेठ आहे; कला - विज्ञान, धर्म - तत्वज्ञान इत्यादी पेक्षा श्रेठ आहे, ही सारी केवळ साधने आहेत. जीवन या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठतम आहे."

रेमीची मराठी बोली प्रस्थापित संकल्पनेतून अंशत: तरी मुक्त झालीय. तरी तिचे लोकगीतापर्यंत -- लोकसाहित्यापर्यंत पोहोचणे बाक़ी आहे. ही झाली प्रवृत्ती, महत्वाकांक्षा नव्हे.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 20, 2012

यक्षप्रश्न – कालचा अन् आजचा

जाल ऑक्टोपस रेमीचे (स्वप्रतिमा)
यक्षप्रश्न – कालचा अन् आजचा
लेखक : रेमी डिसोजा 
 चव्वलाच्या नादात पाणपोया
वाहून गेल्या,
हे रस्ते, हे रस्ते
आयुष्याचे छेद उभे आडवे. 


पाणी टंचाई व त्यामुळे होणारे रोग; शुद्ध पाण्याची टंचाई व त्यामुळे होणारे रोग; पूर व त्यामुळे झालेली दैना; कारखान्यांतील अवशिष्ठ पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण व त्याने होणारी रोगराई; अवर्षण आणि दुष्काळ; अशी अवस्था हजारों खेड्यांत आणि महानगरांत आजही नियोजनाच्या आधुनिक जमान्यात आहे. आणि आम्ही आमचा अहंकार, ढुंगणावरचे गळू गोंजारावे तसे, गोंजारीत प्रगतीच्या वल्गना उठल्याबसल्या करीत असतो. आणि संधी मिळताच आमच्या महान गतकाळाचे गोडवे गाणे हा तर आमचा आवडीचा छंद.

शिवाय पाण्याच्या वाटपावरून राज्यांमध्ये, राष्ट्रांमध्ये तंटेबखेडे होतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्र-कर्नाटक, कर्नाटक-तामिलनाडू, भारत-बांगलादेश, भारत-पाकिस्तान इत्यादी आपणांस माहित आहेतच. अशी अनेक उदाहरणे जगभर असतील. पाण्याच्या बंद बाटलीचा धंदा आता सुरू झालाय.

'यक्षप्रश्न' : हा शब्द सामान्य व्यवहारांतला, पण मी याचा संदर्भ विसरलो होतो: फक्त पाणी आठवत होते. या शब्दाचा उगम आहे जातकात. "देवधम्म जातक" या जातकात 'यक्षप्रश्न' येतो (दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १, पृ. २८-३२).

एका धनवान भिक्षूला संग्रहाची हवस होती. प्रव्रज्या (दीक्षा) घेतल्यावरही त्याची हवस गेली नाही.
तो नंतरच्या जन्मी तो यक्ष झाला. त्याने कुबेराकडून वनातलं तळं मागून घेतलं. ते देताना कुबेर त्याला म्हणाला होता की, "देवधर्म म्हणजे काय हे ज्यांना समजतं, त्याना सोडून बाकीचे जे या तळ्यात उतरतील त्यानाच तुला खाता येईल. जे तळ्यात उतरत नाहीत, त्यांना खाता कामा नयेस."

या जातककथेत... बोधिसत्वाने पाणी आणायला आपला भाऊ सूर्यकुमाराला या यक्षाच्या तळ्यावर पाठवले... यक्षाने त्याला खाण्यासाठी बंदी केला. तेव्हा बोधिसत्व भावाला शोधायला तळ्यावर गेला. त्यालाही यक्षाने तोच प्रश्न केला.

...बोधिसत्व यक्षास म्हणाला "देवधर्म म्हणजे काय ते ऐक आता. लज्जा आणि पापभिरुता या गुणांना, त्याचपमाणं कुशलधर्मानं युक्त सत्पुरुष व संत असतात, त्यांनाच देवधर्म म्हणतात..." इत्यादि. यक्षाला आपल्या पापी जीवनाविषयी उपरती झाली. त्याने ते तळे सोडले व बोधिसत्वाचा रक्षक झाला.यक्षाने विनंती केल्यावरुन बोधिसत्वाने त्याला सद्धर्माविषयी ही गाथा सांगितली :
"पापभिरू तसे नम्र सुखधर्म जयां कळे ।
नाव त्यां संतपुरुषां देवधर्मी असे मिळे ॥"
(सिद्धार्थ जातक खंड-१, पृष्ठ ३२)

जातके म्हणजे अतीत कथा. यांत इ.स. पूर्वीचा लोक-इतिहास येतो, आणि जातकांनी केलेले लोकशिक्षणाचे कार्य. तत्कालीन सत्तेने बौद्ध धर्माचे भारतातून जवळजवळ उच्चाटन केले. त्याबरोबरच जातकेपण नजरेआड झाली. अर्थातच हे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे सत्तेचे राजकारण होते. एकोणिसाव्या-विसाव्या शतकात जातकांचे संशोधन व इंग्रजीत भाषांतरे केली गेली. पाली-इंग्रजी शब्दकोश तयार केले. मात्र मराठी शब्दकोशात पालीचा उल्लेख फारसा पाहायला मिळत नाही.

औद्योगिक 'यंत्र-मंत्र-तंत्रा' ची प्रगती म्हणजे मानवाची प्रगती असे समीकरण आता रूढ झालेय. ज्यावेळी औद्योगिक मानव दुष्कर्म करतात तेव्हा त्यांच्या दुष्परिणामांना ते सर्व मानव जातीस कारणीभूत ठरवतात. जाताकांत उल्लेख केलेले स्वर्ग आणि नरक याच सत्तापिपासू लोकांनी आता पृथ्वीवर निर्माण केलेले आहेत; सत्तेचा स्वर्ग त्यांच्यासाठी, नरक मात्र इतरांसाठी. याचे नाव "सुधारणा".

 —  रेमीजीयस डिसोजा
ऋणनिर्देश : दुर्गा भागवत, सिद्धार्थ जातक खंड - १. 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 12, 2012

बांबूला काटा आला!

बांबूला काटा आला! बांबूला मुंबईत फुले आली!!

"चव्वलाच्या नादात पाणपोया ~ वाहून गेल्या"  हे रस्ते, हे रस्ते
माझा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया । विस्थापितांची मुंबई - १ 
प्रथमच सांगतो, आमच्याकडे कोकणात कोणी 'बांबूला फुले आली' असे म्हणत नाहीत. हे चक्क इंग्रजीचे भाषांतर आहे; हा केवळ सांस्कृतिक संक्रमणाचा परिणाम आहे. संस्कृती लोकांना मिळालेली सृष्टीची देणगी आहे. भाषा केवळ संस्कृतीची, पर्यायाने लोकांची अभिव्यक्ती असते, जी नैसर्गिक जैवविविधतेने घडवलेली असते. इंग्लंडला बांबू होत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - २ 
सामान्य ग्रामिण जनतेला 'बांबूला काटा आला' ही बातमी म्हणजे त्यामागून येणार्‌या अवर्षणाची आकाशवाणी असते. हा एक समज आहे की वास्तविकता आहे याला मी कधीच आव्हान देणार नाही. असे वारसाने आलेले अनेक आडाखे त्यांच्यापाशी असतात.
निवारा बांबूचा - विस्थापितांची मुंबई - ३
बांबूला काटा आला (फुलं आली असं म्हणणं क्रौर्य आहे की अभद्र?) म्हणजे बांबूचे मरण आले. आयुष्याच्या अखेरीला आपल्या बीजांचे भरघोस पीक देऊन तो देहदान करतो. असे हे हरकामी विलक्षण वानस आहे. सारीच गवते अशी असतात. किंबहुना सर्व वानसे अशीच असतात. आपले सर्वस्व 'पर्यावरण, पारिस्थितिकी व उर्जा' यांसाठी स्वाहा करतात. पण यापरी हा, एकमेवाद्वितीय! 
फक्त नागरी बुद्धिमंत मानव आणि त्यांचे कर्तुत मात्र याला अपवाद असतील. 
बांबूचे खुंट-भांडवलशाहीचे भोगवादी सौंदर्यशास्त्र
बांबूच्या बीया उंदरांना मेजवानी असते! आणि उपासमारीनं पिडलेल्या माणसांना अन्नाचा घास!!
    बांबूचे बीज तांदळाच्या दाण्याएवढे असते. जमीनीत पडलेल्या बीजातून / बेटात बांबू पुन्हा रुजतो आणि वाढतो. त्याच्या जातीचे इतर बांबू कोठेही असले तरी त्याना एकाच वेळी काटा येतो.
    खरंच, कोणत्याही जातीच्या वेळूचे वय कोणाला सांगता येईल? कदाचित एकाद्या शेतकरी आजी-आजोबाना कुंपणातल्या बांबूचे वय आठवत असेल. किंवा आदिवासींना माहित असेल, कारण त्याना पिढ्यानपिढ्या परंपरेने ज्ञानाचा वारसा मिळतो!

॥ मुंबईत बांबूची फुले ॥ 
विस्थापितांची मुंबई - ४
या महानगराच्या महामार्गांवर मी पायी भटकताना नजरेस पडतात कैक बांबूची फुले. 
   अनेक उड्डान-पुलांखाली, फूटपाथवर, गटार-नाले-रेल्वेलायनी-महामार्ग यांच्या शेजारी... उघड्यावर आणि झोपडपट्ट्यांत (सरकारी परिभाषेत : गलिच्छ वस्ती). 
    येथे साठ लक्ष बांबूची फुले रोज फुलतात, रोज निर्माल्य होतात व पुन्हा नव्याने फुलतात. 
    हे आहेत भारताच्या औद्योगिक यंत्र-तंत्र-मंत्र या "विकासाच्या आधुनिक साधनाने" विस्थापित केलेले लोक. 

गेली पाच हजार वर्षें या जनतेने राजे-रजवाडे, संस्थानिक, सम्राट, बादशहा यांची तळी उचलून धरली. त्यांच्या आपापसांतिल वैमनस्यांत हे मृत्युमुखी पडले. 
विनामूल्य विश्राम - विस्थापितांची मुंबई - ५ 
त्यांच्या अहंकाराची स्मारके उभारण्यासाठी अनेक खर्व-निखर्व मोलाचे रक्ताच्या घामाचे पाट वाहिले.
    लोकशाहीच्या नावाने आजही तेच शोषण चालले आहे. कायद्याने ते वाजवी असेलही. पण कुठे आहे न्याय?
    आता जो विकास घडवला जातोय त्याचा लाभ कोणाला व कसा होतोय? आता लोकांना विकासातील विषमता नजरेस येत आहे. काही व्यक्ती व संस्थांच्या  सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेमुळे भ्रष्टाचाराची कुलंगडी उघडी होताहेत. पण अजून किती वर्षांची, दशकांची, शतकांची वाटचाल पुढे आहे? याचे निदान करणारा कोणीही तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, प्रेषित आज अस्तित्वात नाही.
    साकल्याने पाहता, या वस्तुस्थितीमुळे केवळ घृणा येते, शिसारी येते, किळस येते.
विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - १ 
केवळ मुंबईतच सुमारे साठ लक्ष, घरवाडीला मुकलेले, विस्थापित रोज अवर्षणाच्या छायेत रहातात. हे अवर्षण केवळ पाण्याचेच नाही. त्यात अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण... आले. आणि सर्वात भयानक : 'उद्या' हा शब्द त्यांच्या भाळी लिहिलेला नाही.
विस्थापितांना मुंबईत रोजच अवर्षण - २
सर्व देशभरच्या विस्थपितांची खात्रीलायक आकडेवारी नाही, कारण ही माणसे देशाच्या शिरगणतीत अजूनही नाहीत.
 अध्ययनाचे अध्ययन - सृष्टीची देणगी । विस्थापितांची मुंबई - ६
विकासाचे नियोजन व अंमलबजावणी यांचे "साधन आणि साध्य" कोणत्याही लोकाभिमुख राज्यात केवळ "जनता" हेच असले पाहिजेत, भांडवलशाहीचे यंत्र  मंत्र  तंत्र नव्हेत.  
हे जेव्हा साध्य होईल तेव्हाच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक विकासाचे संतुलन साध्य होईल. दुसरा कोणताही नियम - सिद्धांत - प्रमेय - पर्याय  युक्त नाही.
रेमीजीयस डिसोजा 
मुंबई । २१.०२.१२

टीप: वरील सर्व छायाचित्रे रेमी डिसोजा याने काढलेली आहेत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 07, 2012

इ-मराठीला महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय

इ-मराठीला महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय 
मराठी भाषा दिन २७ फेब्रूवारी २०१२ रोजी कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी मुंबईत साजरा करण्यात आला. स्थळ : पु ल देशपांडे कला अकादमी । 

मराठी भाषा दिन २०१२ सरकारी जाहिरात 
मराठी भाषा कित्येक शतके लोकाश्रयावर वाढली. अजूनही वाढतेय. राजे-नबाब यांनी आपापल्या कुवतीप्रमाणे कलावंताना राजाश्रय दिला. उदाहरणादाखल, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहूमहाराज यांनी बदलत्या काळानुसार शिक्षण, पर्यायाने भाषा व साहित्य, लोकांपर्यत पोचवले. या विभूति खरोखरी लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. 
    शिक्षणाला  मौखिक असो की लिखापट्टीचे  भाषेचे व प्रत्यक्ष कृतीचे, दोन्ही माध्यमे हवी. केवळ एकाने शिक्षण अपुरे रहाते. शब्दकोशातील लाखो शब्दांना काहीच अर्थ नसतो. तसेच शिक्षण जर जीविकेचे साधन झाले नाही तर तेही शब्दकोशाप्रमाणे निरर्थकच! जशा हल्लीच्या घोषणा व जाहिरातबाजी! 
    मराठी भाषादिनाला पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले होते. त्यात सरकारी 'मराठी विभाग' व National Book Trust यांचा सहभाग होता. याचे काम फार मोलाचे आहे. मात्र येथे भेट देणारे लोक विरळाच. इंग्रजी पेपरातली जाहिरात पाहून मी फक्त दुसर्‌या दिवशी प्रदर्शन पाहायला दाखल झालो : नवीन काय आहे बघायला. 
    इ-मराठी विश्वकोश हेच ते नाविन्य! विश्वकोशाचे आठ खंड आता फ्लॉपीवर उपलब्ध केलेत. कालमानाने यापुढे नवीन संशोधनाने येणारी माहितीपण याच्यात वेळोवेळी भर घालील अशी आशा करुं! इतर साहित्याची भर इ-पुस्तकांत आणायची सरकारी योजना आहे. 
    राज्य मराठी विकास संस्थेने संगणकावर वापरण्यासाठी युनिकोड-आधारित मराठी टंक (फॉण्ट) यावेळी सूचित केला. 'संस्कृत 2003' हा खालील संकेतस्थळावर विनामूल्य मिळतो. 
http://www.omkarananda-ashram.org/Sanskrit/itranslator2003.htm  इतरही मराठी टंक आहेत. माझी शुद्धलेखनाची अडचण लक्षांत घेता, मला वाटते, मराठी शुद्ध लेखन व व्याकरण संगणकावर मला या जन्मी मिळणार नाही.
  
आता इ-जमाना आलाय. जुन्या-नव्या उपयुक्त दर्जेदार मराठी साहित्याची व संशोधनाची भर आता विश्वजालावर टिचकी मारताच मिळेल आशा मनात उगवली! दैनंदिन आयुष्यातील गरजेचे कितीतरी विषय एकामागून एक मनात येतात, जातात...! हेपण मराठीत संगणकावर मिळतील का?
    राजाश्रय आला की मला हमखास तुकाराम आठवतो. शिवाजीमहाराजांनी तुकारामाला पाठवलेली किमती भेट, आणि त्याने ती नाकारून परत केली ते आठवते. 
    दुसराही एक हल्लीचाच प्रसंग आठवतो. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राचा एक मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला मोटारीने (वारीला) गेला होता. बरोबर लालबत्ती आणि सायरनच्या मोटारी, नोकरशहा, चमचे इ. लवाजमापण आलाच की! 
    आठी दिशांनी गात-नाचत वारकरी येत होते. पण मुख्यमंत्रीसाहेब राजेशाही मोटारीतून उतरायला तयार नाही. शेवटी सर्व वारकर्‌यानी पंढरीच्या वाटेवरच बसकण मारली. तेव्हाकुठे साहेबाने आपले पाय जमिनीला लावले. मराठी संत शतकानुशतके जे लोकशिक्षणाचे काम करीत आले त्याला इतिहासात तोड नाही. (या संतांचा उल्लेख आम्ही "भूतकाळात" करीत नाही. तुकारामाची गाथा काळाच्या महानदात तरंगली!)    

भाषा संचनालय वेळेवेळी अनेक पुस्तके वाजवी किंमतीत प्रसिद्ध करते. पण त्याच्या किती प्रती छापल्या जातात, किती खप होतो म्हणजे किती लोक लाभ घेतात, पुनर्मुद्रण इत्यादि माहिती मला नाही. एक माहित आहे : पुस्तकाचा खप जेवढा अधिक तेवढे ते अधिक स्वस्त, तेवढी त्या उपलब्धीने वाचनाची आवडही वाढते.
    महाराष्ट्रात खेडोपाडी व लहानमोठ्या शहरांत मराठी माध्यमाच्या हजारो शाळा-कॉलेजात यातील किती पुस्तके जात असतील? मला शंका आहे. 
    यांतील अनेक संस्थांना सरकारी अनुदानपण मिळत असेल. त्यांच्या श्रेणीनुसार योग्य पुस्तके "अनुदानाचा भाग" म्हणून समावेश करता येईल. शिक्षण आणि भाषा यांच्या अभेद्य नात्यात माझी अशी ग्राम्य व्यापार-नीती बसेल का?  
    'धुळाक्षरे' ते दगडी पाटी पेन्सील, फळा खडू, कागद लेखणी पर्यंत साक्षरता व शिक्षण यांचा प्रवास मनोज्ञ आहे. कोट्यवधी जनता अजूनही या साधनांपासून वंचित आहे. "इ-साक्षरता" तर फार दूरची गोष्ट : साध्या सरळ व्यवहाराचे गणित. पण ही केवळ साधने आहेत, शहाणपणाची ग्यारंटी नव्हेत. 

कोष्टी कबीराची गोष्ट आठवते!
याने तर कधी लेखणी हातात धरली नाही. 

—  रेमीजीयस डिसोजा
मुंबई । होळी पौर्णिमा २०१२
१. संबंधित एक कविता : देणारे कोण? घेणारे कोण?  यात विठ्ठलाला कौल लावलेला आहे!
२. संबंधित शिक्षणावर माझा पहिला स्फुट लेख : INDIAN SCHOOLING  याचे मराठी भाषांतर करायची इच्छा अजून पुरी व्हायची आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 01, 2012

प्रश्न जिव्हाळ्याचे — उत्तरे मात्र अधिव्यापी!

प्रश्न जिव्हाळ्याचे — उत्तरे मात्र अधिव्यापी!
सर्वच मुलांना प्रश्न पडतात. पण त्यातून कुणाची सांघिक शिक्षणाच्या कारखान्यात जुळवणी पट्टीवर (assembly line) रवानगी झाली की बालीश वाटणारे पण मौलिक प्रश्न विचारणे हळूहळू कमी होऊन संपुष्टात येते.
माझ्यासमोर माझ्या कधीही न संपणार्‌या प्रश्नांची मालिका चालू असते. एवढेच नाही; ती वाढतही असते, सोन्याच्या लंकेला आग लावणार्‌या *मारुतीच्या शेपटीसारखी. ही झाली माझ्या सवालांची बाब.
    पण आता मी निगरगठ्ठ झालोय. माझ्या वैयक्तिक किंवा खाजगी प्रश्नांना मी दाद देत नाही. हे सवाल मीच वा संबंधित व्यक्ति आणि समष्ठी यानी आणलेले असतात. त्यांची वासलात तेथल्या तेथेच वस्तूनिष्ठतेच्या कसाला लावून करायची. इथे रे'मी' ला थारा नाही; स्तोम नाही की तक्रार नाही. अब्ज लोकांपैकी एक रेमी! दुसरे काय करणार?

दुसरे प्रश्न : बाहेरून येणारे.
    रूढ सांघिक शिक्षणामुळे वयाच्या सहाव्या वर्षापासून अशा प्रश्नांना तोंड देत आलो, ते वयाची बावीस वर्षें उलटेपर्यंत — प्रश्न विचारले जात होते. उत्तरे देणे किंवा शिक्षा भोगणे अनिवार्य होते.
    पण बाहेरचे सवाल तेवढ्यावरच थांबत नाहीत. नंतरही चालूच, नोकरी-व्यवसाय यांच्या निमित्ताने. आणि इतरत्र, उदा. बँकेत खाते खोलायचे वगैरे. जणूकाय त्यामुळे सर्व संस्था-संघटना सुरळीत चालल्या आहेत व पुढेही चालणार. त्यांच्या सर्व सवालांची उत्तरे मिळाली की व्यवहारात कुठेही काहीही वांधा येणार नाही.
    प्राथमिक शाळेपासूनच प्रश्नांची मालिका सुरू होते. रोज पंचेचाळीस मिनटांत जे शिकलो त्यावर प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरे लिहायची. पण त्याने रोजची भाकर मिळत नाही. का हे कोणत्याच तज्ञाला, मास्तराला, पालकाला माहित नसते. मग ते विद्या-अर्थीला कसे माहित असणार?
    वयाची सोळा-सतरा वर्षें शाळा-कॉलेजात पूर्ण वेळ शिकण्यात घातली. पण शिक्षण घेताना शिकणे ही क्रिया आजिविकेचे साधन बहुधा होत नाही; होऊ शकत नाही.
    एक साधे उदाहरण : विहिरीतून पाणी काढले तर प्यायला मिळते इत्यादि. पण तसे शाळेत शिकत असताना होत नाही. शिकल्यानंतर ते होईल असा गृहित धरलेला समज किंवा आश्वासन असते.
    हा माझा एक अगत्याचा प्राथमिक सवाल. असेच इतरही अनेक अत्यंत निकडीचे प्रश्न आहेत. मला वाटते यांचे स्वरूप सार्वत्रिक आहे.

बाळपणापासून आजपावेतो माझ्या अनेक प्रश्नांना उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे एक उत्तम घडले : आपणच उत्तरे शोधायची, एकलव्यी मार्गाने! (एक नमूद करावेसे वाटते : एकलव्य आदिवासी आहे.)
    जेव्हा माझ्या सर्व प्रश्नांकडे मी बारकाईने, साकल्याने पाहातो तेव्हा एक ध्यानात येते. ते सारे एकमेकाशी कुठेतरी जोडलेले असतात. एकाचा इतरांशी संबंध असतो; अनेक मुद्यांशी त्यांचा दुवा असतो.
    एकलव्याचेच वरील उदाहरण घेऊ. त्याचा धनुर्विद्या शिकण्याचा प्रश्न, कोणत्याही समकालीन समाजात, केवळ "शिक्षणखात्यात" बसतो असं नाही. वंश - वर्ग - वर्ण - सत्ता - जात - जमात - समाज - धर्म असे इतरही संदर्भ त्याला कारणीभूत असतात. आधुनिक जमान्यातही सुधारलेल्या अमेरिकेत टस्केगी युनिव्हर्सिटीचा जन्मही अशा परिस्थितिकीत (ecology) झाला.

देशाच्या बहुतेक समस्या कमीअधिक प्रमाणांत मुंबई महानगरात तसेच इतर महानगरांत नजरेस पडतात. पाणी, अन्न, निवारा, लोक-विस्थापन, हवा, दवा, काम (श्रम/ लैंगिकता/कामुकता), आराम, शिक्षण, भ्रष्टचार इत्यादि समस्यांची यादी लिहायला ही जागा फारच तोकडी आहे. 
    या समस्या सार्वत्रिक – Universal – आहेत, व जागतिक – Global – पण आहेत. जगाचा नकाशा पाहिला की हे लक्षात येते. बरोवर जर ब्रिटिश साम्राज्याचा, 'ज्यावर सूर्य कधीही मावळत नसे', नकाशा पाहिला तर हे ध्यानात यायला मदत होते. याबरोबरच औद्योगिक क्रांतीचा (Mechanical and Industrial Revolution) उगम व विकास, आणि तिच्या जोडीने आलेला वसाहतवाद, हे आठवले तर फारच उत्तम!
    कधीकाळी अशा समस्या नैसर्गिक होत्या, आता त्यात कृत्रिम समस्यांची भर पडलीय. सर्व मानवनिर्मीत समस्यावर ईलाज आहेत. पण अहंकार, मताभिनिवेश (dogma), गंड, -वाद (-ism), इत्यादि आडवे येतात.
    पण सर्वांत जालिम समस्या आहे ती सबलांचा सत्ता व संपत्ती यांचा अनावर लोभ, ज्यांतून निर्माण होणारे अतिरेक, आतंक, भ्रष्टाचार. या सर्व समस्यांना विधायक उत्तरे आहेत, पण ती सोपी नक्कीच नाहीत.
    एक उत्तम उदाहरण : दोन हजार वर्षांपूर्वी बौद्ध भिक्षूंनी एक अहिंसक मार्ग, "जीजुत्सू", शोधला (हल्लीच्या सत्याग्रहापेक्षा परिणामकारक). चीनला जाताना त्यांना वाटेत लुटारूंचा अतोनात उपद्रव होत असे. त्याची प्राथमिक अट होती, "नैतिक धैर्य" हवे.

भारताची बहुसंख्य सामान्य जनता, अल्पसंख्यांक उच्चभ्रू नागरिक नव्हेत, गेली काही दशके कोणत्याच राजकीय पक्षाला निर्णायक बहुमत देत नाहीय. त्यांना सत्तेसाठी "कंपू" करावे लागतात.  जनतेने आपल्या सृजनतेने, कल्पकतेने काढलेला हा मार्ग "जीजूत्सू"चाच प्रकार आहे. 
    पदरीं साक्षरता, शिक्षण, प्रसारण माध्यमे, भौतिक साधने-संपत्ती नाहीत. अशा अवस्थेत, या खंडप्राय देशात, या अवाक्‌ जनतेला एका फटक्यात "लोकसभा टांगून ठेवायची" कृतिपूर्ण अभिव्यक्ती कशी साध्य झाली? याला सामुहिक सबोधता – Collective Consciousness – म्हणतात. ही सर्व जीवमात्रांत स्वायत्त आहे. जे शेतकरी अहोरात्र सृष्टीशी एकजीव झालेले असतात, त्याहून अधिक दुसरा कोण जाणे?
भारताच्या प्रस्तुतकालीन इतिहासात जनतेने लिहिलेली ही "लोकसभा टांगती ठेवण्याची" कथा, आज दुर्लक्षित राहिली तरी, 'भारतीय आदिमप्रत' – Indian Archetypes – म्हणून नोंदवली जाईल.

Detail-Election Campaign Ad
सोबतच्या चित्रात लिहिलेली इंडियातील भ्रष्टाचारांची ही यादी भारतीय समाजाला लागलेल्या महा-रोगाची केवळ ठळक लक्षणे आहेत. ईलाज (corrective measures) हवा रोगावर, लक्षणांवर (curative measures) ईलाज कामाचे नव्हेत. हे चित्र मुंबईत १६ फेब्रूवारी २०१२ रोजी महापालिकेची निवडणुक झाली तेव्हा 'हिंदुस्थान टाईम्स'च्या पूर्ण मुखपृष्टावर शिवसेनेच्या जाहिरातीतील मजकूराचे हे कात्रण आहे.
    आम्हास माहित आहे, की यादीत असलेल्या-नसलेल्या भ्रष्टाचारांचा भुर्दंड शेवटी देशातील सामान्य जनतेला - त्यांचा समतेचा न्याय्य हक्क नाकारून - भोगावा लागतो. आम्हास हेपण माहित आहे की जेथे सत्ता तेथे भ्रष्टाचार आला. देवांनापण वशिला, नवसाणे, भोग, नैवेद्य लागतो. मात्र या भ्रष्टाचाराचे मूळ कशात आहे हे शोधणे महत्वाचे ठरेल.
    तथापि आम्हास हे पण माहित आहे की या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे कोणत्याही अधिकारी व्यक्तिला-व्यक्तिंना आजतरी माहित नाहीत.
    ती उत्तरे फक्त जनतेपासून मिळू शकतील. त्यासाठी आपली पदे-पदव्या-अहंकार-स्वार्थ बाजूला ठेऊन लोकांपासून नम्रपणे शिक्षण्याची तयारी ठेवायला तर पाहिजेच, पण कृतीची नितांत गरज आहे.
    माझ्या अनेक प्रश्नांच्या – विशेषतः शिक्षण-विषयक – उत्तरांचा शोध घेताना मला जनता मार्गदर्शक झाली. आणि माझ्या कुवतीनुसार ती उत्तरे मी वेळोवेळी शब्दांकित केली. काही नियतकालिकांत व माझ्या इंग्रजी ब्लॉगवर प्रसिद्ध केली आहेत.
हा देश कृषिवलांचा, ज्यानी धान्य-शाक-फलादि वन्य जातींचे गृहसंवर्धन केले, वन्य पशूपक्ष्यादि जाती माणसाळवल्या, ज्यांनी या भूमीत कृषिक्रांति आणली; जेव्हा या भूमीला नाव नव्हते, जेव्हा येथे नागरी समाज-धर्म-राज्य-लष्करी-आर्थिक संस्था यांनी निर्माण केलेल्या केंद्रीय "सत्तेच्या सीमा" अस्तित्वात नव्हत्या. ते मानव आजही अस्तित्वात आहेत, भले त्यांतिल काहींचा वर्णसंकर झाला असेल! आजच्या औद्योगिक युगातही आम्ही म्हणतो, "भारत कृषिप्रधान देश आहे", ते केवळ समृद्ध राष्ट्रांकडून आर्थिक, तांत्रिक साह्य आणि सहानुभूती मिळावी एवढ्याच उद्देशाने! मात्र लोकाभिमुख कृती घोषणांच्या पुढे जात नाहीत. उच्चभ्रूंचा हा "बौद्धिक भ्रष्टाचार" नव्हे तर काय?
टीप : वरील चित्र हिंदुस्थान टाईम्सच्या मुखपृष्ठावरील जाहिरातीचे कात्रण आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.