May 27, 2012

गावकुसाबाहेरील माणसं : समकालीन लोककथा

गावकुसाबाहेरील माणसं, लेखक : रामचंद्र नलावडे 

पुस्तकं आपसूकच माझ्याकडे येतात माझ्या गरजेला. 'गावकुसाबाहेरील माणसं', कथासंग्रह, त्यांपैकी एक. पुस्तक व लेखक दोनही नावे मला नवीन. गवंडी, वडार, बेलदार, पाथरवट लोक मात्र मला नवीन नाहीत; फार जुनी ओळख.
    वास्तुविद म्हणून वडारांशी अधूनमधून संपर्क यायचा. खंडाळा-लोणावळ्याच्या परिसरात दगडांच्या खाणीवर कधीतरी घंटोगणती बघत वेळ घालवला होता. तेथील दगडफोड्यांनी दिलेले स्फटिक अजूनही माझ्याकडे आहेत.  
    लोणावळा आता थंड हवेचं ठिकाण राहिलं नाहीय. आता तिथं कॉंक्रिटचं जंगल झालंय. भर उनात दगडफोड्यांच्या काळ्या पीळदार शरिरांवर निथळणार्‌या घामाच्या धारा त्यांना थंडावा देता देता वाफ व्हायच्या.
    ऐकून माहित आहे की तुरुंगात सक्तमजूरीला दगडफोड / खडीफोड ही एक सजा आहे ! पण इथल्या दगडफोड्यांनी दयाभावाने त्यांच्या हुन्नरीचे अनेक बारकावे मला समजावून सांगितले. कारण एकच : मी माझ्या व्यक्तिमत्वाची ओळख शून्य करून नम्रपणे तेथे गेलो होतो. 
    समोर सरळ उंच जाणार्‌या काळ्याशार कड्याखाली कमालीच्या आत्मविश्वासाने हे गडी काम करित होते. पाषाण आणि माणूस यांच्यांत दुजाभाव राहिला नव्हता. दगड लोणी झाला होता.
लहानपणी कोंकणात मी असाच कुंभारमाटीकडच्या जांभ्या दगडाच्या खाणीवर जात असे.

वडार जमातीचे जीवनदर्शन 

रामचंद्र नलावडे यांच्या कथांनी मला वडार जमातीचे जवळून, अगदी आतून 'दर्शन' दिले. या कथांना अनेक परिमिती आहेत. सामाजिक सत्याच्या अनेक स्तरांचे निखळ दर्शन इथे होते.
    विसाव्या-एकविसाव्या शतकात हजारो वर्षांचा भारतीय समाजाचा इतिहास येथे अवशिष्ठ रुपाने साक्षात उभा आहे. समकालिन इतिहासाची ही बखर आहे असे मला प्रांजळपणे वाटते.
    साहित्यिक मूल्यांना फार वरच्या थरावर नेणार्‌या या कहाण्या आहेत. गतकाळाच्या प्रचंड इतिहासात या जाति-जमातिचा उल्लेख कुठे आहे का मला माहित नाही.

वडार जमातीचे गोत्र ?

भिल्ल जमात आजही तीरकमान वापरताना आंगठ्याचा उपयोग करत नाहीत : एकलव्याचे हे जीवंत स्मारक!
    सह्याद्री पर्वतात राहाणारे कातकरी सांगतात क ते हनुमान-सुग्रीव यांचे वंशज आहेत : काही वर्षांपूर्वीपर्यंत रायगडचे कातकरी मुंबईच्या करियाणांना वनौषधी पुरवत. हे पुरातन वनस्पतीशास्त्रज्ञ !
    मुंबई फूटपाथवर राहाणारे मातंग आपल्या बकाल झोपड्यांशेजारी आपला पूर्वज वाल्मिकीच्या झोपडीवजा मंदिराची स्थापना करतात.
    कुंभार स्वत:ला प्रजापती म्हणतात, तर सुतार स्वत:ला विश्वकर्मा म्हणतात.
   व्यासाच्या गोत्राचे कैक लोक चाळी-इमल्यांत वसलेले आहेत.
   दोन हजार वर्षांपूर्वी जंगलाने झाकलेला डोंगर पाहून कोणत्या जागी लेणे कोरता येणे शक्य आहे हे केवळ भूशास्त्रज्ञच सांगू शकला असता, सम्राट नव्हे. आणि खडकाचे अंतर्बाह्य ज्ञान वडारावाचून दुसऱ्या कोणाला असणार?

लोककथा - लोकभाषा - लोककला 

यातील काही कथा पूर्णतः लोकभाषेत आहेत. या सर्वच कथांना लोकभाषेचे व लोक-इतिहासाचे मूळ आधार – Primary Source – आहेत असं म्हणता येईल. खरं म्हणजे यांना लोक-कथा, लोक-साहित्य म्हणता येईल.
    निवारा ही मानवाची मूलभूत गरज समजली जाते. तसेच ती संस्कृतीची अभिव्यक्तीपण आहे, नृत्य-संगीत-चित्र-साहित्य यांप्रमाणे! तसेच पुराशास्त्राच्या संशोधनाचा एक मूल आधारपण आहे.
    प्राचीन काळापासून संस्कृतिच्या या अभिवक्तिला आकार देण्यात वडारांचा – मग ते कोणत्याही नावाने ओळखले जात असोत – महत्त्वाचा वाटा आहे.
    खडकात पाया खोदण्यापासून ते कळसापर्यंत वास्तूशिल्पात बेलदारांचा सहभाग असतो. पण समाजात – विषेशतः उच्चभ्रू, पांढरपेशा वर्गात – त्यांना पायाच्या दगडाइतकेपण मोल नाही. असा हा आमचा समाज !
   कांही वर्षांपूर्वी वेरूळ मंदिराबाहेर पुराशास्त्राच्या संशोधकांना एका प्राचीन वस्तीचे अवशेष सापडले. ही तेथे काम करणाऱ्या कारागिरांची वस्ती होती.

वडार आणि वास्तुशिल्प 

काही काळ मी वास्तुविद्यालयात अभ्यागत अध्यापक व प्रबंध मार्गदर्शक होतो. त्यावेळी इतिहासाच्या संदर्भात बोलण्याचे प्रसंग येत. त्यातील एक इथे उद्धृत करतो : मुंबईच्या परिसरात व पश्चिम घाटात अनेक जगप्रसिद्ध लेणी आहेत.
    एका प्रसंगी मी एक (वाह्यात) प्रश्न शेवटच्या (पाचव्या) वर्षाच्या विद्यार्थ्यांना विचारला होता. "कार्ल्याच्या चैत्याची मोजमापे तुमच्याकडे आहेत. त्यावरून आजच्या मजुरीच्या भावाने केवळ तेथील दगड खोदण्याच्या कामाची काय किंमत होते काढा. त्यात शिल्पांचे कोरीव काम जमेत घ्यायचे नाही."
    त्यापूर्वी व नंतरही हा प्रश्न कोणीही विचारला नसेल. त्याचे उत्तर माझ्या विद्यार्थ्यांपैकी कुणी दिले नाही. खरं तर वास्तुविद्येचे शिक्षण आणि व्यवसाय आज लोकाभिमुख नाहीत. ते कलाभिमुख किंवा व्यवसायाभिमुख आहेत. आर्थिक भ्रष्टाचाराचे अनेक किस्से प्रस्तुत पुस्तकात आहेत. पण 'बौद्धिक भ्रष्टाचार' किंवा 'जाणिवेचे भ्रष्टीकरण' त्याच्या किती पटीने मोठा/लहान आहे हे कोण बुद्धिजीवी सांगू शकतील?
    अजिंठा, वेरूळ, कार्ला, भाजा, कान्हेरी, घारापुरी इत्यादि लेणी कोरणारे वडारांचे पूर्वज तर नव्हते ना? हा प्रश्न अनेक वर्षांपासून माझ्या मनात अधूनमधून डोकावतो. मुंबईच्या रस्त्यांवरून भटकताना खडीचे ढीग तसेच दगडी बांधकामे नजरेस पडतात. विचार येतो : हे शहर उभारायला किती जंगलावरून (डोंगरावरून) गाढवाचा नांगर फिरवला असेल?
ललित साहित्यात अशा प्रश्नांची उत्तरे मिळणे कठिणच. बरेचसे साहित्य प्रश्न नमूद करतात आणि जेथे कथा-कादंबरी-चित्रपट सुरू करायला हवेत तेथे संपवतात. नाही म्हणायला शरतचंद्र चटर्जी हे मला माहित असलेले एक लेखक अपवाद आहेत. उदाहरण : 'भैरवी' (भाषांतरित नाव) ही तत्कालिन सामाजिक प्रश्नांची उत्तरे देणारी कादंबरी.

सरकारी उपाययोजना 

या कहाण्या वास्तव घटना आहेत. त्या कल्पनेहूनही विदारक आहेत. दारिद्य्र, अनारोग्य, निवारा आणि साक्षरता व शिक्षण यांचा अभाव, व्यसन यांतून निर्माण झालेले प्रश्न यांत चित्रित केले आहेत. त्या सर्वांना उत्तर एकच : सरकारी उपाययोजना.
     पण या सरकारी उपाययोजनांत जनतेचा स्वाभिमान, स्वावलंबन, पारंपरिक हुन्नरीला मान्यता व तिचा समावेश आणि विकास यांना शिक्षणात व सरकारी प्रकल्पांत कुठेही जागा नाही. सर्वाँत भयानक आहे तो प्रचलित शिक्षणातून निर्माण होणारा दुरात्मभाव, जो सार्वत्रिक आहे. आणि त्याची तुलना केवळ कर्करोगाशीच करता येईल. रामचंद्र नलावडे यांची सामाजिक बांधिलकी या कथांत स्पष्ठ होते.
    हे पुस्तक आवडले असा Facebook-छाप आंगठा मी दाखवणार नाही, नाही छापणार 'इमेल'वरची smiley.
    वाचकाना एकच सुचना करू इच्छितो. ज्यांनी हे पुस्तक उधार, विकत किंवा वाचनालयातून घेऊन वाचले असेल त्यांनी निदान एक चवरखा अभिप्राय लिहून लेखकाला अगत्याने पाठवावा. तेवढीच आपली साक्षरता कामास येईल. पुस्तकावर लेखकाचा पत्ता आहे.

पुस्तकासंबंधी 

या कथांत कुठेही भावनातिरेक - melodrama - नाही. शब्दांचा कुठेही अपव्यय नाही. या कथांनी मराठीच्या शब्दकोशात मोलाची भर घातलेली आहे : शब्द, म्हणी आणि वाक्प्रचार(जसा : "परमेसराच्या काठीला आवाज नसतो").
     पण या कथा लोकांपर्यंत पोहोचणार कशा, आणि मुख्यतः वडार समाजापर्यंत ज्यांच्या या कथा आहेत? किती शिक्षित वडारांपर्यँत या पोचल्या असतील हे लेखकाला व प्रकाशकांनापण माहित नसेल ?
    त्या जनसामान्यांपर्यंत कशा जातिल ? कापडाची बांधणी, पुठ्ठ्याची बांधणी, कागदी बांधणी अशा प्रकाशनाच्या प्रती असतात. त्यामुळे किंमत कमीजास्त होते, पण मूल्य कमी होत नाही. एका परदेशी कंपनीने भारतीय जीवनमान लक्षात घेऊन रुपयात वेगळ्या किमती पुस्तकांवर छापल्या होत्या. असाच आणखी एक प्रकार आहे, जो मराठीत वापरात नाही, पण हिंदीत रूढ आहे. ते वृत्तपत्राचा कागद वापरतात. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर ही पुस्तके बघायला मिळतात, स्वस्त असतात. भारतीय समाजात / जनतेत जीवनमानाचे किती स्तर आहेत ते सरकारला पण माहित नसेल.
     मी तर सुचवीन की भारताच्या राज्यघटनेची अशी आवृत्ति सर्व प्रादेशिक भाषांत काढावी. आणि एकेक प्रत देशभरच्या प्रत्येक प्राथमिक शाळेत विनामुल्य पोहोचती करावी. प्रत्येक घटनादुरुस्तीला संपूर्ण नवी आवृत्ति. पाच वर्षांत १२० कोटी लोकांपर्यंत घटना घरोघरी! 

सरता पालव 

लोकशाही सरकार म्हणजे केवळ सुयोग्य सोई (बहुसंख्य जनतेला, अल्पसंख्य भांडवलदारांना नव्हे) उपलब्ध करून देणारे साधन आहे; नाही स्वामी (सरंजामी मायबाप किंवा संत). सत्तेसाठी लाच किंवा लालुच देऊन निवडून येणारे भ्रष्टाचारी आमदार-खासदार हे स्वामी कसचे? असे नेते मायबाप जनतेला कुठेनेणार? शासन म्हणजे अनुशासन, दन्मठेपेची शिक्षा नव्हे. शासन म्हणजे न्याय होय, कायदा नव्हे.

टीप : शीर्षक : गावकुसाबाहेरील माणसं | लेखक : रामचंद्र नलावडे, पत्ता : मु. पो. वेरळ, त. खेड, जि. रत्नागिरी, पिन ४१५६२१. मोबा. ९६२३९७०६१६ | प्रकाशक : प्रतीक प्रकाशन | डिसेंबर २०११ | पृष्ठसंख्या १५+११३| मूल्य : रु. १२५/-.। © रामचंद्र नलावडे । 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 15, 2012

विसाव्या शतकात मूर्तीभंजन

विसाव्या शतकात मूर्तीभंजन : व्यत्यासकथा

अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद) 

"निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति,
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि
आणिक अधिक त्याहून आहे
निसर्गाची जी अंतिम सीमा
मनुजकार्याचा आरंभ तेथे
तेथून विकास मानवतेचा
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची
तेंच उद्दिष्ट साधायासाठी
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान
धर्म आचार विचार आणि
नीतिनियम."

वरील अवतरणात कविता आहे कि काव्य आहे ? कदाचित कांही लोकांना ही कविता आहे, चांगली आहे, उत्तम आहे असंही वाटलं असेल. किंवा नाविन्यपूर्ण वाटेल! पण तिच्या अर्थाकडे पाहता ती आत्मकेंद्रीत, आत्मसुखी, प्रौढी मात्र वाटते.

कवीची निसर्गाची कल्पना काय आहे? बगिच्यात लावलेली झाडे आणि हिरवळ ? कि निसर्ग म्हणजे मुंबईची मलबार हिल ? कि केवळ भोग्य वस्तू ?

मूर्तीभंजन 

बालकवी, म. ज्यातिबा फुले, फार-पूर्वी-चार्वाक आणि बुद्ध -महावीर यांच्यानंतर कवीची निसर्गाची कल्पना फारच अपरिपक्व / तोकडी, तसेची फिरंगी सत्तेने प्रभावित झालेली दिसते.

बालकवींचे निसर्ग – सृष्टी – तर आराध्य आणि स्फूर्तीदेवता होती. म. फुले यांनी ईश्वर ही संकल्पना बाजूला सारली आणि त्याच्या जागी "निर्मिक" नाव देऊन सृष्टीला बसवले. अर्थातच सनातन्यांचा तीळपापड झाला असणार? त्यांच्याही पूर्वी चार्वाकाने सृष्टीला जीवनाची अधिधात्री मानले.

आणि बुद्धाने ईश्वर, देव, देवता, पूजा, यज्ञ, प्राण्यांचे बळी इ. प्रथा नाकारल्या. सिद्धार्थ जातकांत दशसहस्त्र ब्रम्हांडांचा उल्लेख अनेकदा येतो. आणि सर्व उपासकांचा ध्यानविषय सृष्टी किंवा तिची अंगे होती.

सृष्टीशी सुसंवाद 

कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.

आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत. अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानव असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.

शाळेबाहेर शिक्षण

प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी – अन्न, वस्त्र, निवारा – या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले.

तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.

इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. लोकजीवनाच्या दर्शनाने सर्व आयुष्य घुसळून काढले. सर्व गृहीत मूल्यांची उलथापालथ झाली, आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.

निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !

एक जाणीव आकारत गेली : 

'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.
भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी कविता - एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी चाल दिली अन गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.

चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
— रेमीजीयस डिसोजा
टीप :
1. सुरवातीला दिलेले अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच इतर अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे.
2. हल्लीच दा विंची "महान कलावंत कि महान वैज्ञानिक ?" Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist? असा वाद विलायतेत झाला. या चर्चेत मी माझ्या कुवतीप्रमाणे सहभाग दिला. माझा प्रतिसाद या लेखावर आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 05, 2012

माझ्या सानुल्या सैंपाकघरी

माझ्या सानुल्या सैंपाकघरी

कोंकणात भातशेती  : छाया - पूजा राणी 


मी भेटते माझ्या सानुल्या सैंपाकघरी
रोज-रोज पुनरपी माझे आप्तसोयरी
निःशब्द एक संवाद घडतसे
समर्पणांत अन बलिदानांत.
ते मजसी नेती दूरवरच्या स्थळांत
आणिक नवख्या स्त्रीया नि पुरुषांत,
आणि त्यांचे परिश्रम निर्व्याज प्रेमाचे
जळीं-मळीं ऊन-हींव नि पावसात.

माझ्या सानुल्या सैपाकघरी बरोबरी
करितो अमुचे समर्पण यज्ञकुंडावरी,
जगण्यांत – वाढण्यांत – मरण्यांत,
बरोबरीने, अनुरागे अन त्यागांत.
तेथे विस्तारते एक वैश्विक गीत,
जे घेऊनी जाई मज नव्या प्रदेशी.

मुंबई | ०१ -०५ -२०१२

अधिक वाचा : १. वय वर्षे साठ सत्तर 
२. भारतात आर्थिक, लैंगिक, शैक्षणिक इ. विषमता एवढी प्रबळ आहे, कि डोक्यात कधी घंटी वाजणे अपवादानेच शक्य आहे. अशीच एक बातमी - दुवा पहा.
टीप : ही कविता एका सर्वसामान्य स्त्रीचे मनोगत आहे. ते जोडते शेतकऱ्यांना अन ग्रामीण परिसराला. शहर मात्र त्यांच्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञ आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.