June 25, 2012

पर्यावरणाची अनेक अंगे

 पर्यावरणाची अनेक अंगे

रेमीची स्व-प्रतिमा 
पर्यावरण केवळ निसर्ग हवामान व जलवायूतापमान यांच्यापुरते मयादित नसते. हा चक्क अपसमज आहे. कारण विज्ञान केवळ वस्तुस्थितीचे एकेक अंग घेऊन विश्लेषण करते.

वास्तू  


पर्यावरण सुरू होते अन्न, निवारा व वस्त्र या तीन गरजांपासून; त्यात परिसर पण आला. मग आपण निसर्गनिवासात असूं कि नागरीनिवासात असूं. याला "वास्तू" हा देशी शब्द आहे. याचा अर्थ विस्तृत आहे. त्यात झोपडी, प्रासाद, मंदिर, उपवने, पाणोठा - तलाव, रस्ते, नगर इत्यादिंचा साकल्याने समावेश  होतो. घर किंवा वास्तू मूलतः नैसर्गिक पर्यावरणात आपले उष्णता, हींव, वारा, पाऊस इत्यादिपासून संरक्षणासाठी राहाणीयोग्य बदल करते. अर्थातच निवारा या गरजेबरोबरच अन्न आणि वस्त्र ही पण आली.

औद्योगिक क्रांतिने नगरनिवासांची अनेक कप्प्यांत - रहिवास, काम, प्रवास, पर्यटण, खेळ, शिक्षण, मनोरंजन इ. विभागणी केली.

औद्योगिक क्षेत्राचे अधिष्टान विज्ञान असल्याने त्याच्या सर्वच कारभारात कार्याँची कार्यशाळांत विभागणी केली जाते. अर्थातच त्यात सकल (holistic) दृष्टीचा अभाव असतो. त्यामुळे घर ही पण रांधायचे, जेवायची, झोपायची, पोरांची पैदास करायची (न करायची) कार्यशाळा बनते. व माणसे आकडेवारीत मोडतात. 

शिक्षण द्यायची / घ्यायची कार्यशाळा, कामाची कायशाळा (कारखाना हपीस इ.), तसेच रोग्याची कार्यशाळा, दवाखाना, खेळायची कार्यशाळा पटांगण, वगैरे वगैरे. सर्व काही रीतसर एकेका रकान्यात बसवलेले! याच्या / याचा अनेक अर्थाँपैकी एक असाः आपल्याकडे जशा अनेक जाती उपजाती आहेत तशाच औद्योगिक समाजाने पण निर्माण केल्या - उद्योगपती कारखानदार अंमलदार राष्ट्रपती प्रधानमंत्री  मंत्री नोकरशाही प्रव्यवसायिक कामगार-किसान-जवान वगैरे - त्यांचे नाव वर्ग! अर्थ तोच.

याचा परिणामः इंडियन समाज "जाती आणि वर्ग" यांच्या उभ्या व आडव्या विभागणीच्या विषारी जाळ्यात अडकला.

अनिर्बंध औद्योगिक विकास


अनिर्बंध औद्योगिक विकासामुळे नैसर्गिक पर्यावरणाची अमाप हानी तर झालीच पण पर्यावरणाच्या, सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, शहरी पर्यावरण, या अंगांची पण बेसुमार हानी झाली. ही सर्व अंगे एकमेकाशी निगडित व परस्परावलंबी असतात. त्यासाठी बहुसंख्य भारतीय समाजाची आजही तयारी नाही. विदेशात काही वेगळे होत नाही. 

वैज्ञानिकानी आणिक एक विभाजन केलेले आहे. ते म्हणजे पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा वेगळे केले. हे तीनही निसर्गतः एकमेकाशी संलग्न व परस्परावलंबी असतात.

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही निसर्गाची त्रिमूर्ती

 

पर्यावरण - परिस्थितीकी - उर्जा ही त्रिमूर्ती (trinity) सृष्टीतील सर्व जीवन व्यवहार एकाच क्षणी चालवते, त्यात सचिवलायासारखे खातेवाटप केलेले नसते, जेथे एक खात्याचे काम  दुसऱ्या खात्याला माहित नसते. एवढेच नाही तर ज्या एकंदर जीवमात्रासाठी सृष्टी हे काम करते त्या सर्वाना पर्यावरणाचे उपजत ज्ञान असते. जन्मत: आईच्या गर्भातून बाहेर आलेले मूल का रडते? कारण त्याच्या पर्यावरणात आमुलाग्र बदल होतो.
मग  वैज्ञानिकांनी या त्रिमूर्तीला कापून वेगळे का केले?
कारण ते सत्तेचे मिंधे आहेत. ही भेदनिती सत्ताधीशांच्या (औद्योगिक समाज) हितसंबंधातून आलेली आहे.
या समाजाचा उदय झाल्यापासून, दोन महायुद्धे तर झालीच, सर्व जगभर गेली दोनशे वर्षे सतत युद्धे चालू आहेत.
 

जागतिक गाव (global village) हे गोंडस नाव दिशाभूल करणारे आहे. सारा पृथ्वीतळ यांनी युध्दभूमी केलेली आहे: उर्जेसाठी युद्धे; व्यापारासाठी युद्धे; धर्मासाठी युद्धे; जमिनीसाठी युद्धे...  भूगर्भातील साधनसामग्री काढण्यासाठी यांनी निर्मनुष्य ध्रुव प्रदेश पण सोडले नाही; कीटकांचा नाश करायचे युध्द तर आपण रोज टीवीवर बघतो. या साऱ्या उप्द्व्यापाचे लक्ष्य एकच: सत्तेचे केंद्रीकरण.

या मुठभर (आजच्या जमान्यातील) कौरवांनी आपल्या स्व-अभिषिक्त एकाधिकार (monopoly) सत्तेसाठी सर्व जगभरच्या जळ-जमीन-जीव-हवा यांना वेठीस धरलेले आहे. आपल्या संगणकाच्या बटन-संचावरील प्रत्येक टिचकी कुणाच्या गंगाजळीत किती पैसे जमा करते याचा आपल्याला थांगपत्ता नसतो. (पहा: आंतरजाळें एक अत्यंत महागडे माध्यम
) परिणामत: अशिक्षित आणि शिक्षित - सुशिक्षित - प्रशिक्षित यामधील गर्ता वाढत जाणार. हा सामाजिक पर्यावरणाचा एक नमुना. 

आणखी एक समारंभ: ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून जाहिर केलेला आहे. हा दर वर्षी साजरा केला जातो असे म्हणतात. जोवर माणसे - जनावरे - वानसे यांना न्याय मिळत नाही तोवर समारंभ कसले? हे तर जाहिर पाखंड!   
  अस्तु | 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape