July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)


तीस दिवसांचे ७२० तास तो पाळीव प्राण्याचे जीवन जगतोय. भिंतीवर टांगलेल्या दिनदार्शिकेची पाने बदलत असतात, व दिनदर्शिका पण. तरीही याचे आयुष्य असेच चाललेय.

कधी तो गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा असतो, तर कधी चुलीच्या उबेस बसलेलं मांजर...
कधी तो होतो बळीचा बकरा; कधी तो असतो ओझे वाहणारा टोणगा; तर कधी गोठ्यात बांधलेली दुभती गाय.

कधी तो असतो गळ्यात दोरी बांधलेला माकड -- त्याच दोरीच्या इशारयावर कोलांट्या उड्या मारणारा... तेच त्याचे काम.
कधी तो असतो पिंजरयातला पोपट; ऐकत असतो मुक्ताफळे:
"पोपटा, पोपटा, खा ना जरा पेरूची फोड,
आणि बोल माझ्याशी गोड गोड."

कधी तो असतो घाण्याला बांधलेला बैलोबा, फिरत असतो वर्तुळात, पण त्याच्या जूं वाहाणारयां खांद्यावरच्या जखमेवर कोणी कधी तेलाची घडी घालत नाही.

कधी तो असतो राजेशाही बगीला बांधलेला, डोळ्याना झडपा लावलेला उमदा घोडा -- माहीत नसते त्याला तो कुठे कशासाठी सतत धावत असतो.

शेवटी, आजच्या आधुनिक सुधारलेल्या सुसंस्कृत समाजात परावलंबी आयुष्य काढायचे असले तर अशा या सर्व भूमिका नकोत का निभावायला? इथे परस्परावलंबी समष्टीला कुठे थारा?


रेमीजीयस डिसोजा । मुंबई

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 23, 2012

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर

आज मध्यान्ही हसलो माझ्या मढ्यावर
माहित झाले यात माझ्या सुखाची ग्यारंटी आहे.
टळली नव्हती दुपार तरी
डामरी रस्ते  आपलेसे वाटले —
रामबोलोच्या नादात.
काळ्या दुपारी काजवे कवडसे
हरवणाऱ्या शुध्दीचे  
पराकाष्टा करतात वाट उजवायची  
— रेमीजीयस डिसोजा   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape