November 23, 2012

सर्जनाची वाटचाल : समीक्षा सर्जनाची


सृष्टीयोग 

 सर्जनाची मूळ प्रेरणा


सर्जन आणि सर्जनशीलता या क्रिया आपण स्थूलपणे कलांच्या अभिव्यक्तींना वापरतो. परंतु सर्जनाची मूळ प्रेरणा केवळ जीवनाचे संधारण करणे एवढेच. जीवाच्या धारणेपासून ते बाळाला अंगावर पाजणे आणि यापुढे आयुष्यभर येणाऱ्या असंख्य क्रिया सर्जानाचाच भाग आहे. यांत्रिकी जीवनामुळे आपल्याला याचे भान राहत नाही एवढेच!
१. भिल्लांची पावरी 
भिल्ल स्वतःच आपली पावरी तयार करतात. खरे तर याचा इतिहास हजारो वर्षें मागे जातो.

२. प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व)

ही पक्ष्याच्या अस्थीपासून केलेली बांसरी २००९ साली पुराशास्त्रज्ञांना गवसली. हिला पाच छिद्रे आहेत. विशेष म्हणजे भिल्लांच्या बांबूच्या बांसरीलापण पाच छिद्रे असतात. 


विधायक टीका

ज्याला विधायक टीका/समिक्षा म्हणता येईल ती मी आनंद कुमारस्वामी यांच्यापासून शिकलो. (टीप १.) अनेक प्रकारे ते उपयोगी आले. मुख्यत: मी व्यक्तिनिष्ठ प्रतिक्रिया सोडली आणि वस्तुनिष्ठ प्रतिसादाकडे वळलो, कोणतीही घटना असो.

पर्यावरणाचा अभ्यास, जो निवारा किंवा वास्तूचे मूळ उद्दिष्ट — वारा, ऊन, पाऊस, थंडी यांच्यापासून संरक्षण करणे — आहे. त्याने मी व्यक्तिगत व सामाजिक क्षेत्राच्याही पलिकडे जाऊ शकलो.

पारिस्थितिकी समजण्यास माझ्या लाडक्या तुकारामाचा महत्वाचा वाटा आहे : "वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे" या पाच शब्दांच्या मंत्रात. हा मंत्र समजण्यास भातशेती-शाकशेती, स्वयंपाक, मातीची घरबांधणी, सूतकताई-विणाई या क्षेत्रांत माझे शारीरिक परिश्रम आणि लोकसहभाग Community Participation उपयोगास आले. हे माझ्या घडणीच्या काळात झाले. त्यावेळी मी माझ्या गावी प्राथमिक शाळेत होतो.

वास्तूविद्या शिकताना माझ्या ध्यानात आले, इमारतीत असलेल्या अनेक खोल्या आणि घटक त्यांच्या नियोजनात कसे परस्परावलंबी असतात. एक खोली किंवा घटक जरी हलवला, बदलला किंवा काढून टाकला तरी सबंध रचना बिघडते. त्यामुळे संपूर्ण संरचनेवर पुनश्च काम करावे लागते. हे समाजरचनेसारखे असते. वस्तुतः एक घर बांधले तरी ते नैसर्गिक पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्या संतुलनावर अनिष्ट परिणाम करते.

तुकारामाचा पाच शब्दांचा मंत्र उलगडा करतो पर्यावरण, पारिस्थितिकी आणि ऊर्जा एकमेकाशी कसे संलग्न आहेत. आपण जर साध्यासुध्या दिसणारया कामावर, जशी शेती, सैपाक किंवा निवारा यावर, ध्यान केले तर निसर्गात पर्यावरणाचे हे तीन घटक कसे परस्परावलंबी व अधिव्यापी असतात हे समजायला मदत होते.

ही वाट जेवढी अपरिहार्य, अटळ आणि कष्टाची तेवढीच आनंदादायी आहे. शॉर्टकट नाहीत. पुस्तकं नाहीत. केवळ क्षेत्र अभ्यास उपयोगी.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर आनंद कुमारस्वामी १९४७ सालीं परदेशी निवर्तले. (त्यांची भारताच्या भूमीवर देह ठेवायची इच्छा होती.) इथून पुढे, स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश सत्तेने भारतात आणलेल्या 'बदला'चा वेग वाढला.

हा 'बदल' जवळजवळ जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत होत होता. त्याने सर्वात अधिक हानी केली ती बहुसंख्याकांची, अर्थात भारताच्या शेतीप्रधान समाजाची, खेडूत कृषीवलांची. त्यांचे संधारण प्रथम प्राधान्य देऊन करणे अत्यंत गरजेचे होते, ब्रिटिशांनी हा देश सोडताच. पण तसे झाले नाही; अजूनही होत नाहीय.

या बदलाचे मूलभूत कारण गेल्या शतकापासून पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्राचा भारतात झालेला विकास हे असावे. हा बदल सर्व जगभर होतोय. तथापि पाश्चिमात्य देश या 'बदला'बरोबर, म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या उदयापासून, वाढले. तर भारतात तो लादला होता.

गेल्या ६५ वर्षात आपण वाढलो असे म्हणता येणार नाही. आम्ही वयस्क मात्र झालो आणि आमचे संस्कार व परंपरा यांनुसार आपण वयाचा आदर करतो, माणूस असो की पाषाण !

खरे पहाता हा बदल (ज्याला आपण 'विकास' म्हणतो तो अपप्रयोग आहे) आपल्या मूलभुत गरजांना — अन्न, निवारा, वस्त्र, आणि सर्व जीवमात्राच्या निसर्गदत्त स्वायत्त कार्यांना — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन आणि प्रजनन — विघातक झालेला आहे. केवळ मानव जगच नव्हेत तर जगभरच्या जळ, जमीन आणि हवा यातील जीवमात्र याला बळी गेलेले आहेत.

जेव्हा या मूलभूत गरजांची आणि निसर्गदत्त स्वायत्त कार्यांची हानी होतेय तेव्हा सामाजिक, राजकीय, धार्मिक वगैरे वगैरे संस्था, किंवा स्वर्ग आणि नरक-पाताळ यांचा काय पाड ?

सर्जनाला समीक्षेची गरज 


उदाहरणार्थ, आम्ही आता वर्षभर – २४/७/५२ – दूरचित्रवाणीवरील अनेक वाहिन्यावर काय पहातो? त्या आम्हास दाखवतात, गुळचट प्रेम, पांचट शृंगार आणि विच्छिन्न कुटुंब संस्थेतील भपकेबाज लग्नांच्या कहाण्या, गुन्हेगारी आणि हिंसाचार यांचा बेसुमार नाविन्यपूर्ण मसाला घातलेल्या. जणू आमची करमणूक करायला दुसरे काहीच साधन राहिलेले नाही, की नाही विचार करण्याजोगे.

मुंबईत, उदाहरणार्थ, दरवर्षी सुमारे २००-३०० चित्रपट बनवले जातात. पण त्यांनी खर्च केलेल्या साधनसंपदेचे मूल्य काय? त्यांची पर्यावरण-परिस्थितीकी-ऊर्जा (प-पा-ऊ) मूल्य काय? अक्रीय करमणूकीशिवाय कोणत्या सामाजिक साध्यासाठी? ही एक सार्वजनिक घटना आहे!

जेव्हा भारताच्या लक्षावधी रयतेपुढे जीवन-मरणाचा संघर्ष उभा आहे, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी अब्जावधी प्रश्न उभे आहेत त्यांची उत्तरे कोण देणार? सरकार? पार्लमेंट? बॉलीवूड-टेलीवूड? मितव्यय? शेयर बाजार?
केवळ रयतच वरील प्रश्नांचे उत्तर देऊ शकेल. कोणत्याही नियोजनाचे, प्रकल्पाचे किंवा विकासाचे "साध्यही रयत; साधनही रयत".
विधायक टीका / समीक्षा कोणत्याही घटनेत किंवा क्रियेत, केवळ साहित्यिक कृतीच नव्हे, गाळलेले संदर्भ आणि आशय उपस्थित करते आणि सर्वाच्या हितासाठी समर्पक सूचना देते.

कलेचे उद्दिष्ट

कोकणात लोकसहभागाने भातशेती । फोटो : पूजा राणी 
शेती ही प्राचीन आणि सर्वात उच्चतम कला, जेथे पंचमहाभूतांशी संपर्क येतो, जेथे भुईचा कॅनवास वापरला जातो, जेथे कलेच्या मूळ प्रेरणेला स्थान असते, पण हिला उच्चभ्रू समाज मान्यता देत नाही.


उत्स्फूर्त आत्माविष्कारातून कलेची निर्मिती आत्माभिव्यक्तीत अवतरते. ती कोणत्याही वयात व काळात होते. कलेची व्याख्या नाही. सुसंस्कृत समाजाने कलेसाठी अनेक दालने, सदरे, शैली, पंथ, घराणी इत्यादी निर्माण केली असतील, पण ते सर्व वरकरणी आहेत.

आत्माभिव्यक्तीत कुणी उत्स्फूर्तपणे नाचेल, गाणे गाईल, मातीत वा भिंतीवर चित्र रेखाटेल, मातीचे खेळणे बनवील किंवा कहाणी सांगेल...

सुसंस्कृत किंवा नागरी समाजाला फार आवडते करायला विभाजन, श्रेणी, जातवारी, वर्गवारी आणि अधिश्रेणी. याने तो आवश्यकतेपासून दूर मात्र होतो. म्हणून आपण या सर्व वेडगळापणाकडे दुर्लक्ष करू.

कला – आत्माभिव्यक्ती – घडते ती वास्तवाच्या अनुभवातून आणि भावनांतून. हे वास्तव म्हणजे निसर्ग, नैसर्गिक घटना, इतर जीव – व्यक्ती, वानसे, प्राणी... आणि त्या संबंधांतून आलेली भावानुभूती.

कला ही भावनांतून निर्माण झालेल्या ऊर्जेला सर्जनशील कृतीत वाट करून देते, जी प्रगतिरोध Entropy रोखते. नाहीतर त्याचे पर्यावसान मानसिक किंवा शारीरीक रोगात होणे शक्य असते. हेपण एकप्रकारे प्रजनन म्हणता येईल. कला ही कोणत्याही वर्गाची वा व्यवसायिकांची मक्तेदारी नाही.

विज्ञानाचे उद्दिष्ट


जशी कलेची व्याख्या नाही तशीच 'जीवना'चीपण नाही, विज्ञानाने पण ती केलेली नाही. जीवन आणि कला यांचे अर्थ शब्दकोशांत असतात. तरीपण 'जीवन' काय आहे हे आम्हाला उपजतच समजते (जीवाच्या मरणामुळे ज्याचे अक्रीय वस्तूत परिवर्तन होते).

'ईश्वर' ही कल्पना निसर्गाच्या आत्यंतिक घटनांमुळे आली असावी (प्रागैतिहासिक आदिवासी काळात); त्याने  निसर्गाची अपार शक्ती चित्रात आणि विधींत व्यक्त करण्यात आली असावी.

हल्लीच वैज्ञानिकांना एक शोध लागला ज्याला त्यांनी 'ईश्वर' कण असे नाव दिलेय. ते पूर्ण 'सत्य' नव्हे; निसर्गाचे गूढ मात्र आणखीच अगम्य होतंय.

नागरी संस्कृतीत विज्ञानाची पद्धती विश्लेषण करण्याची असते, तर कला संश्लेषण करते. एके काळी कला आणि विज्ञान व तांत्रिकी यांचे असे खातेवाटप अस्तित्वात नव्हते, जेव्हा अग्नी, तरफ, तीरकमठा, मातीची भांडी, जंगली वानसांचे व प्राण्यांचे गृहसंवर्धन इत्यादि शोध मानवाने लावले. आता आम्ही ज्याला कला, विज्ञान, तंत्रज्ञान या नावांनी ओळखतो ते पूर्वी वेगवेगळे नव्हते आणि ते सर्व लोकांच्या हितासाठी होते.

एके काळी कला विज्ञान आणि तांत्रिकी विभक्त नव्हते. आता विज्ञान आणि तांत्रिकी यांच्या सीमारेषा अंधूक झालेल्या आहेत. त्याचे कारण दोन्ही शाखांच्या मितव्ययात economy भांडवलदारांचे गुंतलेले हितसंबंध होत.

समीक्षा सर्जनाची

सर्जनशील सकलजन । रेमीजीयस डिसोजा । मुंबई 
मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर 

कला, विज्ञान, तांत्रिकी, इतर ज्ञानशाखा, तसेच संस्था यांचे  उद्दिष्ट सर्व लोकांचे हित साधणे हे तर आहेच, शिवाय 'इतर' मानवसमूह, जीव आणि त्यांचा निसर्गनिवास जतन करणेपण आलेच. निसर्गाने केलेली निर्मिती आणि विनाश विनाहेतू नसतात. फक्त आम्हास त्यांचे आकलन होत नाही एवढेच.

विधायक समीक्षा केवळ कला, साहित्य आणि त्यांच्या शाखा एवढ्यापुरतीच मर्यादित नाही. ती इतर ज्ञानशाखा, खाजगी आणि सार्वजनिक संस्था-संघटना यांनाही लागू होते. त्यानी केवळ न्यायसंस्थेचेच कायदे नव्हेत, तर नैसर्गिक न्यायपण हिशेबात घ्यायला हवा. न्याय हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

सृजनशीलता हा शब्द आता "मूलमंत्र" buzzword झाला आहे. तो आता कोणत्याही संदर्भात (उदा. युद्धसाहित्य) वापरला जातो, मग त्याचे दुष्परिणाम काही का असेनात. विशेषत: जेजे बाजार आणि चंगळवादाच्या सदरांत येते त्यात्या वस्तूला, कल्पनेला सर्जनशील हे लेबल सर्रास लावले जाते. जे कुणी त्यांचे पाठीराखे असतील ते वातानुकूल अद्यावत बोर्डरूममध्ये बसलेले असतात. नफ्यावतिरिक्त दुसर्‌या कशाचेही सोयरसुतक त्यांना नसते.

परंतु तथाकथित सर्जनशील वस्तूची वा घटनेची गुणवत्ता क्वचितच पारखली जाते; ती पर्यावरण पारिस्थितिकी आणि ऊर्जा यांच्या मूल्याच्या कसावर, विधायक की विध्वंसक आहे का हे ठरवावे लागेल. आजच्या झपाट्याने बदलणारया परिस्थितीत निष्क्रिय राहणे किंवा डोळेझाक करणे अयोग्यच नव्हे घातक ठरेल. स्वायत्त तिबेट आठवावे !

सर्जन विधायक आहे की विघातक हे पाहाणे निर्णायक आहे. याचा निकष तथाकथित तज्ञांच्या दालनात राहून न करता सृष्टीच्या साकल्याच्या मार्गाने लावायला हवा, जेथे नागर संस्कृतीप्रमाणे खातेवाटप नाही. असे निर्णय व्यक्तिगत आणि समष्टीच्या स्तरावर वेळोवेळी घेतले गेले पाहिजेत. तरच सरकार कार्यक्षम आणि तत्पर राहील.

टीप १. मी लिहिलेल्या समीक्षेत पहा - परिच्छेद- Indian Architectural Terms, Essays in early Indian architecture (Book Review)
२. प्रतिमा २.प्रागैतहासिक अस्थी-बांसरी (30,000 वर्षें सद्यपूर्व), ऋणनिर्देश : New York Times, अधिक वाचा, Flutes Offer Clues to Stone-Age Music

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

2 comments:

  1. अभिनंदन आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर करण्यात आला आहे.
    अधिक माहितीसाठी भेट द्या.

    www.Facebook.com/MarathiWvishv
    www.MWvishv.Tk
    www.Twitter.com/MarathiWvishv


    धन्यवाद..!!
    मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
    आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.

    ReplyDelete