January 01, 2013

टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध, निळू दामले (समीक्षा)

भारताच्या प्रस्तुतकालीन इतिहासाचे एक पानटेक्नियम ; मुखपृष्ठ -१
टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध । लेखक निळू दामले | प्रकाशक : अक्षर प्रकाशन । ऑगस्ट २०१२ । किंमत २८० रुपये । पृष्ठे २८० ।

टेक्नियम  : उद्याच्या बदलाचा वेध' हे पुस्तक लायब्ररीत आले होते. मी पोहोचताच कांउटरवरच्या मुलीनं ते माझ्या हातात दिलं. मी काय वाचतो त्याची तिला कल्पना आहे. पुस्तकं आपसूकच माझ्याकडे येतात. आत्ता ते वाचतोय. प्रथम तिसरा भाग टेक्नियम वाचला. नंतर सुरवातीकडे वळलो. या विषयातही रस आहे. आवडी नावडी बाजूला ठेवून वाचतो.

हे पुस्तक तीन मुख्य भागांत आहे, १. टेली-वर्तन १९९८, २. पुन्हा टेली-वर्तन २००८, आणि ३. टेक्नियम, याशिवाय प्रास्ताविक, ओळख (रमेश तेंडुलकर) आणि संदर्भ वगैरे.
पहिल्या दोन भागांत लातूर आणि वाराणसी व त्यांच्या परिसरांतील गावे येथील नागरिकांच्या व खेडूतांच्या मुलाखती आहेत. त्यांत कॉलजचे तरूण तरुणी पण आहेत.
या मुलाखती दोनदा, १९९८ व २००८ साली पुन्हा त्याच स्थळी जावून घेतल्या आहेत. मुलाखतींचा विषय आहे 'टेलीव्हीजन'  — जेव्हा प्रथम टीवी नुकताच आला होता व दहा वर्षांनंतर : टीवीचे परिणाम, उपयोग व त्यावरच्या प्रतिक्रिया इ. नोंदण्यासाठी.
हे सर्वेक्षण / संशोधन आहे. याचे उद्धिष्ट काय आणि ते कोण व कसे वापरणार — यासाठी या प्रकल्पाला भांडवल पुरवणारे, लेखक, वाचक, सरकार, ग्रामपंचायत. शिक्षणसंस्था - प्राथमिक शाळेपासून विद्यापीठ,   सेवासंस्था, टीवीवाले, जाहिरातवाले, आणि सरतेशेवटी साक्षर रयत — हा प्रश्न उरतोच.

लातूर आणि वाराणसी व तेथील खेडी यांची निवडही माझी उत्सुकता वाढवण्यास कारणीभूत झाली.
दोन्ही वेळच्या बहुतेक मुलाखती वाचल्या. कोठेही कंटाळवाणे वाटले नाही. प्रत्येक मुलाखत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र त्यांचा एकत्रित परिणाम मला तरी परिचित आहे.
जुन्या व नव्या पिढ्यांवर टीवीने केलेले परिणाम, त्यांच्या प्रतिक्रिया व प्रतिसाद अपेक्षित आहेत. युवा पिढी जर बिघडलीय वाटत असेल तर त्याला टीवी-सेलफोन यांच्यापेक्षा शिक्षण व शिक्षणपद्धती जास्त कारणीभूत आहेत असे मला वाटते.

पुस्तकातील एक संदर्भ इथं देतो :


रंगा राचुरे :
"शिक्षणाचीही फार वाईट अवस्था आहे...
...त्यांना नोकर्‌या कुठं मिळणार आहेत?
या परिस्थितीवर माझ्याकडंही उत्तरं नाहीत, कोणाकडंही ती नाहीत..."
(पृष्ठ १७०)
शिक्षण या विषयावर मी लिहिलेल्या काही लेखांचे दुवे Links इथं देतो. त्यांत श्री. रंगाच्या वरील प्रश्र्नांची उत्तरे माझ्या परीने शोधण्याचा प्रयत्न केला आहे.
१. Politics of Literacy in India - Challenges of 21st Century

तंत्रज्ञान म्हणजे कंप्युटर-तंत्रज्ञान असे समीकरण


तंत्रज्ञान म्हणजे कंप्युटर-तंत्रज्ञान असे समीकरण आता झाले आहे, जसे मितव्यय म्हणजे पैसे. विज्ञानात तंत्राचा उगम आहे याचा आता विसर पडलाय. कधीतरी प्रागैतिहासिक काळात कला, विज्ञान व तंत्रज्ञान वेगळ्या दालनात विभागलेले नव्हते. सुसंस्कृत समाजाला जातपात निर्माण करायचा फारच सोस. कारण त्याचे केंद्रीत सत्तेशी हितसंबंध गुंतलेले असतात.
तंत्रज्ञानाची ही लाट सत्तेचे नवे आयुध आहे. तंत्रज्ञान मानवाला संस्कृती देऊ शकते का? ते फक्त झॉम्बी, मोरोन, रोबो, डॉली, क्लोन, आणि मायावी वास्तव निर्माण करू शकते, संस्कृती नाही. जन्मांधाला वास्तव कसे कळणार?

टेलीव्हीजन आणि अर्थात तंत्रज्ञान यांच्या चष्म्यातून पाहिल्यामुळे या पुस्तकाला चाकोरीची मर्यादा पडलेली आहे. वास्तवात असे घडत नसते. संस्कार आणि संस्कृती या बाबी संक्रमणात टिकून राहाणे गौण ठरतात.
भारतावर, विषेशतः उत्तरेवर अनेक संक्रमणे आली. त्यांचे लोण देशभर पसरले. त्यांतही बहुसंख्य कृषिक तग धरून राहिले. पण आजचे संक्रमण 'बिनचेहर्‌याचे' आहे.

सर्व विकासाचे साधन आणि साध्य केवळ रयत 


त्यापुढे हतबल झालेला 'सामान्य' माणूस टीवीकडे प्रथम नाविन्य, नंतर विरंगुळा पहात होता, आता त्याला चटक लागलेली. मग ती घरकामात गुंतलेली बाई असो की सार्वजनिक आयुष्य जगणारे शाळकरी असोत. जेथे सर्जनशीलता नष्ट होऊन यांत्रिकीपण, रट्टा मारणे आले, तेथे 'साध्य आणि साधन' यांची गल्लत झाल्यावाचून कशी राहिल? जसे रोजची भाकर बनवणे सर्जनशील असते तसे टीवी पाहणेही सर्जनशील असू शकते. माझी आई आणि आजीला ऐशी वर्षांत कंटाळा माहित नव्हता. आणि शेतकरी कधी निवृत्त होत नाही कारण त्याचे काम कला असते. त्याला माहित असते पेरलेले एक बीज शंभर दाणे देते, प्रगतीरोध रोखते, ऊर्जेच्या वापरातून पुनः जैवऊर्जा निर्माण होते. जेव्हा त्याला समजेल टीवी, इंटरनेट, सेलफोन इत्यादिमुळे जागतिक स्तरावर ऊर्जेचा केवढा प्रचंड व्यय होतो तेव्हा या लाटेला आळा बसेल.

अशा किती लाटा आल्या आणि गेल्या. संकरित बियाणी आली आणि स्थानिक टिकाऊ धान्ये नाहिशी झाली, जैविक शेती संपुष्टात आली. आता एकीकडे GM बियाणी तयार होत आहेत आणि पश्चिमी इतरेजनांनी organic farming मोहिम सुरू केलीय.
नेहरूंच्या काळांत सुरू झालेली व्याज-हरितक्रांती बाजूला झाली आणि आता इ-क्रांती झालेली आहे. गांवाने निर्माण केलेली संपत्ती पैशाच्या अवतारात धोधो वाहून दर मिनिटला जागतिक भांडवलशाहीच्या महासागरात विलीन होतेय. तरीही हल्लीच अनेक पाश्चिमात्य देशांच्या मितव्ययाचा बाजा वाजलाच.

गावातील वित्त गावातच कसे राहिल हे आमच्या कारभारी लोकाना एकतर कळत नाही किंवा ते वेड पांघरून पेडगावाला जातायत. पण याच्यावर संशोधन करायला एकही माईचा लाल तयार नाही.
कधीकाळी बोस यांनी वानसांना संवेदना असतात (अडाणी समजल्या जाणाऱ्या खेडूतांना हे केव्हाचे माहित होते), आणि रमण यांनी भारतीय पारंपरिक वाद्यांवर संशोधन केले होते. अमेरिकेचे थोरो यांनी भाकर किती आरोग्यदायी असते याचे कौतुक केले होते. मातीची पारंपरिक भांडी ऊर्जेचा उपयोग अतिशय काटकसरीने करतात. या उदाहरणांतून कला, विज्ञान, तंत्र वेगळी काढता येत नाहीत.

विधायक सर्जन 


टेक्नियम या कल्पनेचा जनक, केविन केली याची कल्पकता प्रचंड आहे पण... तो आहे प्रथम जगत समाजाचा नागरिक, त्याची दुनिया चौकोनी, दोन मितींची, सपाट आहे. त्याच्या दुनियेला साजेशी आहे. आजपर्यंत मानवप्राण्यासह किती प्रजातींचा संहार प्रगत सुसंस्कृत समाजांनी — प्रतिनिधीद्वारा किंवा प्रत्यक्ष —  केला त्याची गणतीच नाही. कोणतेही यंत्र-मंत्र-तंत्र किती विधायक कि विघातक सर्जनातून निर्माण झाले हे कोण ठरवणार?
जेथे आज मातीचे तेल नाही, तर उद्या ग्यास नाही, कधी वीज नाही, कधी पाणी नाही, कुठे जाळायला लाकूडफाटा नाही... त्यांच्या सुखाची ग्यारंटी टीवी आणि सेलफोन कसे देणार?

कोणतेही निर्णय/निष्कर्ष या पुस्तकावर आधारता येणार नाहीत. संस्कृती कधीच जागतिक नसते. ती नेहमीच स्थानिक असते. धर्म, व्यवसाय, नाव बदलल्याने ती बदलत नाही.
स्थळ बदलले की संस्कृती बदलते. कारण ती जळ आणि जमीन यांच्याशी निगडीत असते. दर दहा कोसांवर भाषा बदलते म्हणतात.
कोणतेही यंत्र-मंत्र-तंत्र कशाप्रकारे हाताळायचे याचा निर्णयपण स्थानिक पातळीवर 'लोकसहभागाने' घ्यायला हवा. जशी त्यांच्या नैसर्गिक परिस्थितीत तफावत तशीच ती या निर्णयांतपण असणार. हे स्वाभाविक आहे.
भारतात सहा लक्ष खेडी आहेत, हे कधीही विसरून चालणार नाही. सरकार नावाचे जे यंत्र-मंत्र-तंत्र आहे ते रयतेच्या सोईसाठी आहे. सरकारांसाठी रयत नाही.
स्थानिक पातळीवर ही कार्यवाही अंमलात आणायची कुवत नसेल तर सुधारणा आणि भविष्य यांच्या गप्पांतून काय निष्पन्न होणार? अपना अपना उल्लू सीधा करो, एवढंच राहातं. आताही तेच चाललंय.

टेक्नियम ; मलपृष्ठ-२
थोडेसे व्यक्तिगत : मी सेलफोन पासून बरीच वर्षे दूर राहिलो. गेली तीन वर्षे मी मोबयल वापरतोय. या ब्लॉगवरचे मराठी-इंग्रजी लेखन - भाषांतर मोबायलवर केले. तसेच अनेक छायाचित्रे टिपली. यंत्र-मंत्र-तंत्र कसे व कशासाठी वापरावे हे ज्याचे त्याने ठरवावे.   

_________________
 टीप :
 • नागरी (किंवा सुसंस्कृत) समाज - civilization - सुमारे ५००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. त्यांचा पाया सत्तेचे केंद्रीकरण आणि वर्गभेद/जातीभेद यावर आधारलेला आहे, राजसत्ता आणि तिचे भाट / पुरोहित म्हणजे धर्मसत्ता. आताच्या पर्वात या जागा भांडवलशाही आणि तिचे भाट / पुरोहित, तंत्रज्ञानाचे निर्माते वैज्ञानिक यांनी घेतलेली आहे. आर्थिक पाठबळावाचून या नव्या भाटांना कांही अस्तित्व नाही.
 • (मराठीत सुसंस्कृत या शब्दाचा संबंध थेट संस्कृत भाषेशी, देवभाषेशी जातो. इंग्रजीत 'सिटी' शब्द सिव्हलायझेशनला जोडतो. Urban Revolution, नगर निर्मितीची क्रांती. तेव्हापासून नगर - शहर - सत्तेच्या केंद्रीकरणाचे अटळ प्रतीक symbol झालेले आहे. भारतात खेड्यांची दुर्दशा पाहिली कि हे चांगलेच ध्यानात येते. इतिहास अशा रीतीने आपल्या समोर सतत उभा असतो. पुस्तकी इतिहासाला अनेक मर्यादा असतात. हे ध्यानी यायला साकल्याने - holistic - पाहावे लागते.)
 • टेक्नियम : "...केवीन केलीचं म्हणणं आहे की तंत्रज्ञान हे माणसाचंच एक अंग आहे. तंत्रज्ञान म्हणजेच माणूस. ...आपल्या सभोवतालच्या जगाला निसर्ग नव्हे, टेक्नियम असं म्हणतो. ...म्हणून तो जगाचं टेक्नियम, टेक्नोलॉजी या शब्दाचं असीम रूप असं ठेवतो" (पृष्ठ ७). हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. नागरी क्रांतीच्या सुरवातीला जन्माला आलेल्या 'परमेश्वर' या कल्पनेचा  "टेक्नियम" हा अर्वाचीन अवतार! मुळात "शब्द"आणि "चित्र" तसेच तत्सम इतर माध्यमे केवळ मायावी वास्तव आहेत. शब्दप्रामाण्याला किती मान्य करावे, आणि कुणाला अवतार / प्रेषित म्हणावे, हे ज्याचे त्याने ठरवावे.
 • दुवा : Kevin Kelly (editor)
 • अक्षर प्रकाशनवर या पुस्तकाचे मुखपृष्ठ मिळाले नाकी. म्हणून कंप्युटरवर स्कॅन करून इथे दिले आहेत.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

6 comments:

 1. वाचकाची आवड जाणून नवं पुस्तक त्याने/तिने न मागताच हवाली करणारे लोक अजून ग्रंथालयात आहेत हे वाचून बरं वाटलं.

  बाकी 'टेक्नियम'ही संकल्पना नीट समजली नाही मला. निवांत वाचावं लागेल या विषयावर.

  ReplyDelete
  Replies
  1. मी जेवढं 'टेक्नियम' वाचलं. पुस्तकात आणि पुस्तकाच्या बाहेर, ते सर्व अगम्य होते.

   Delete
 2. नीलकंठ दामले यांनी इ-मेलने प्रतिक्रिया कळवली :
  तुमचं परिक्षण वाचलं. तंत्रज्ञानाकडं, तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांकडं कसं पहायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हिंदुस्तानामधे काळाच्या ओघात वस्तूंची निर्मिती मर्यादित राहिली, त्यामुळं तिच्याकडं पहायचा दृष्टीकोनही त्या बाजूनं विकसित झाला. जगाच्या इतर भागात वस्तूंच्या निर्मितीनं वेग घेतला, तिथले विचार त्या अंगानं विकसित झाले. वस्तू हाताशी नसणं ही गोष्ट एकूण संस्कृतीत हिंदुस्तानात गुंफली गेली. त्यातूनच वस्तूंच्या निर्मितीशी जोडलेलं ज्ञान-विचारही आकारले. गेल्या शतकात, आताच्या शतकाच्या सुरवातीपासून भूगोलात अडकेलेले समाज जागतिक होत आहेत. स्थानिकता ही गोष्ट आता वेगळ्या रीतीनं विकसित होत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाचा धावता आढावा घेत असताना जे काही दिसलं ते मी मोकळेपणानं पहाण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या शतकात, त्याच्या आधी, त्याच्या आधी काय घडलं त्या कसोट्या न लावण्याचा माझा प्रयत्न आहे. (2 Jan 13)

  ReplyDelete
  Replies
  1. रेमीचे उत्तर
   आपल्या उत्तराबद्दल आभारी. आपले उत्तर ब्लॉगवरपण नोंदवले असते तर बरे झाले असते. त्याने मला विचार करायला प्रवृत्त केले तसेच वाचकांना पण नव्या मिती दिसल्या असत्या. जे काही थोडे वाचक आहेत ते मला प्रिय आहेत.
   एक अवश्य लिहावेसे वाटते : आज पर्यावरण, पारिस्थितिकी, उर्जा, जैवविविधता आणि सांस्कृतिक cultural विविधता ही क्षेत्रे विचारांत घेणे अनिवार्य आहे. मग ते कोणतेही क्षेत्र असो. कृपया जरूर नोंद करा.

   Delete
  2. नीलकंठ दामले लिहितात :
   आभार. माझी प्रतिक्रिया तुम्ही ब्लॉगवर टाकायला हरकत नाही. तुम्ही उल्लेख केलेले मुद्दे म्हणजे पर्यावरण, परिस्थितिकी, ऊर्जा, जैवविविधता ( जो पर्यावरणाचाही भाग आहे ) आणि सांस्कृतीक. ते महत्वाचे आहेतच. त्यावर वेळोवेळी विचार व्हायलाच हवा. हे सर्व मुद्दे जगण्याशी संबंधित आहेत. जगण्यासाठी वस्तू आणि सेवांचं वैपु्ल्य हवं. त्यात तंत्रज्ञान, विज्ञान, उत्पादन, अर्थव्यवहार येतात. तुम्ही उल्लेख केलेले मुद्दे आणि क्षेत्रं ही जगण्याचाच एक महत्वाचा भाग आहेत. त्यामुळं जगण्याशी जोडत जोडत त्यांचा विचार झाला पाहिजे. तुम्ही उल्लेखलेले मुद्दे महत्वाचे आहेतच. पुन्हा एकदा आभार.
   4 Jan 13

   Delete
  3. लोकशाहीत विकासाचे साध्य आणि साधन फक्त लोकच असू शकतात. मंत्र-तंत्र-यंत्र किंवा वित्त-व्यापार-उद्योग नव्हेत. हा माझा विश्वास. पण हे स्वातंत्र्य त्यांना द्यायला कोण तयार होणार? सत्ताधारी अल्पसंख्यांक उच्चभ्रू? हे वेळोवेळी पुन: पुन्हा लिहायला अजिबात कंटाळा नाही.
   मानव जात्याच गतीशील प्राणी आहे. प्रागैतिहासिक काळापासून जगभर भटकत आलाय. मुंबईत हे स्थलांतरण मी रोज पहातो. मग ते आरसेमहालात राहोत की फूटपाथवर. मीसुद्धा त्यांच्यापैकी एक. त्यांच्या बुद्धीत आणि त्यांच्या प्रज्ञेत काय फरक आहे हे कोण व कसे ठरवणार? गरज आणि हवस needs and wants यांना न्याय आणि नीती यांचा निकष लावणे आता निकडीचे झालेय. प्रसिद्धी, सिद्धी, भोगवाद,सौंदर्यशास्त्र हे सर्व गौण आहेत असे मला प्रांजळपणे वाटते.
   आपण केलेल्या चर्चेने माझ्या उठाठेवीचे सार्थक झाले. धन्यवाद!

   Delete