December 31, 2010

निर्माल्य (Nirmalya)

निर्माल्य (Nirmalya): 
याला इंग्रजी शब्द मला माहित नाही. 
 ॥ निर्माल्य ॥
येणार्‌या फुलांची असती नावे अनेक ।
जाणार्‌या फुलांचे नाव एकच निर्माल्य ॥ 


  निर्माल्य : ज्याना आमच्या मुंबैत दर्या दूर पडतो ते शेजारच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळावरच निर्माल्य सोडतात, बुंध्यावर खिळा ठोकून त्यावर. कोणी जवळपासच्या चुकल्यामाकल्या तळ्यावर जातात; ते तळे कधीकधी पाण्याऐवजी निर्माल्यानेच भरलेले असते! त्यांचा उपसा कधीच होत नाही. आमच्या मुंबईत तळी राहिलीत कुठे? ब्रिटिशांनी कधीच तळी बुजवली, खाड्या बुजवल्या. दर्या बुजवला. (आम्ही ऐकले की त्याना पाण्याची एलर्जी आहे. म्हणून ते पाण्याऐवजी कागद वापरतात.) ज्या आहेत त्यांच्या गटारगंगा झाल्या. 

मुंबईच्या पावसाळ्यात रस्त्यांवर नद्या वाहतात. तर कोरड्या दिवसात रस्त्याखालच्या गटारांना भरती येते. मग पावसाळा माथ्यावर आला की म्युन्सिपालटी गटारांचा उपसा सुरू करते. आतातर विस्थापितांच्या आयुष्याचे - जीवनाचे - झालेले निर्माल्य रस्तोरस्ती पाहायला  मिळते. फुलांचे निर्माल्य! पाण्याचे निर्माल्य! जित्याजागत्या माणसांच्या आयुष्यांचे निर्माल्य! जमीन - जळ - जीवन कसणार्‌यांचे, त्यात स्त्रियापण आहेत, निर्माल्य. बाल्य होते अकाली निर्माल्य. बाजारू आकडेमोडीत फसलेल्या आयुष्यात जीवन झाले निर्माल्य!    
रेमीजीयस डिसोजा  
ख्रिस्त जयंती २०१०
मुंबई

 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 22, 2010

मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द

भाषा, परंपरा, संस्कृती व प्रकृति या सर्वाँचे एकमेकाशी अतिप्राचिन घनिष्ट नाते आहे, अगदी जगातील सर्व नागर संस्कृतिंच्या उदयापुर्वीचे, माणूस अस्तित्वात आल्यापासूनचे आहे. माणसाचे अध्यन अध्यापन (शिक्षण) जन्मल्या क्षणापासून सुरु होते. अर्थातच ते मायबोलीत होते यात आक्षेपार्ह काहीच नाही!
मायबोली : मी कोकणचा रहिवासी, माझी मायबोली कोकणी. सरकारने आता कोकणीला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोकणी भाषेत अनेक बोली आहेत, त्यांपैकी मुख्य बोली मालवणी, गोमंतकी व कारवारी होत. आमची मायबोली कोकणी असली तरी ती मराठीचीच एक बोली असे आम्हास नेहमीच वाटत आले. विंदानी मालवणीत व बोरकरानी गोमंतकीत कविता रचलेल्या आहेत. कोकणीत नोंदणी केलेले व न केलेले लोकसाहित्य अपार आहे.  

मायभाषा: इंग्रजांच्या राजवटीत आमचे शिक्षण मराठीतच झाले. तरीही मराठीला बोलीचा (vernacular) दर्जा होता. लहानपणी शाळेत वाचलेल्या एका कवितेच्या दोनच ओळी ध्यानात आहेत
"मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे.
... ... ... ... ... ... ... … ... ...
तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू."
(
शाळेत वाचलेली कविता. कवीचे नाव आठवत नाही. फक्त
पहिली व शेवटची ओळ आठवते, मेंदूत कायमचे कोरलेली! . 

राजभाषा मराठी: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठीला भाषेचा दर्जा सरकारने दिला. तोवर राजभाषा इंग्रजी होती. तरीही अनेकांच्या परिश्रमानी मराठी संपन्न होत राहिली. आता मात्र भाषांमध्ये राजकारणाने जागा पकडली आहे. उदा. केंद्र सरकारने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. त्याने भाषांची व शिक्षणाची कशी प्रगती होते हे काळच ठरवेल

भाषेची समृध्दी: तेवढ्याने भाषेची समृध्दी होईल याची हमी देता येत नाही. त्यासाठी सर्वात प्रथम साक्षरतेची गरज आहे. त्या उपरांत शिक्षण व लेखी-छापील साहित्य व आता इ-साहित्य येतात. साक्षरता पसरवण्यात व यशस्वी करण्यात लोकबोली महत्वाचा वाटा उचलू शकतात. कारण लोकबोलीतही साहित्याची वाण नाही. त्याना हवी असते लिपी व त्यांच्या साहित्याची लेखी नोंदणी. ही त्याना दिलेल्या मानत्येची पहिली पोहोच समजा

लोकबोली: लोकबोलीभाषांची महत्ता आहे त्यांच्या प्रादेशिक जैवविविधतेत. सृष्टीचे वैविध्य भाषांची जडणघडण व समृध्दी करते. त्यात कैक पिढ्यांचे अनुभव, शिक्षण, शहाणपण व कौशल्ये गुंफलेली असतात. या सर्वच भाषा देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहेत. भाषेच्या राजकारणात त्या नष्ट व्हायला किती काळ लागेल? भाषेचा वापर करण्याने ती टिकून राहते; विविध व्यवहारांसाठी वापर केल्याने ती संपन्न होते यात शंकाच नाही

मराठी भाषा: मराठी भाषेत सुमारे एक लाख शब्द आहेत असे सांगतात. तेव्हा अनाहूतपणे इंग्रजीत पाच लाखाहून अधिक शब्द असल्याची आठवण पण केली जाते. येथे तुलना करायचा प्रश्नच येत नाही किंवा वैषम्य वाटायचे कारण नाही. मराठी भाषेत कधी एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. कधी अनेक शब्दांचा एकच अर्थ होतो, जसे विष्णूची सहस्र नावे, पृथ्वी, पाणी, वेश्या इ. शब्दांसाठी मराठीत अनेक प्रतिशब्द आहेत. कधी एक शब्द फरक करून लिहिता येतो. संस्कृती ही जळ व जमीन पर्यायाने जैवविविधतेची देणगी आहे;  कोणतीही भाषा संस्कृतिची (culture) अभिव्यक्ती असते व ती एकमेवाद्वितीय असते. ज्या विषयाचा व्यासंग त्यात नैपुण्य
 
सृष्टीचे भाषेशी नाते: सृष्टी सर्व जीवमात्राची जन्मदात्री - आई आहे. ती सर्व जीवांना पोषण देते. आणि मानवाला संस्कृती देते. आपल्या देशात जैवविविधता अजूनही संपन्न आहे, थोडीफार टिकून आहे. आपल्या सर्व परंपरा, कला, शास्त्रे, . तसेच भाषापण येथील जैवविविधतेने घडवल्या. (आधुनिकतेच्या अथवा इतर कितीही वावटळी आल्या तरी हे अभिमानपूर्वक नेहमी ध्यानी ठेवायला हवे, व तिचे निष्ठापूर्वक संवर्धन करायला हवे. कदाचित कोणत्याही नीतीशास्त्रात हे लिहिलेले नसेलही.) आपल्या देशातील जैवविविधतेचे "वैद्यक" हे एकच उदाहरण पुरे!  

वैद्यक: एकेकाळी मुंबईच्या बाजारांतील करियाणांना शेजारच्या रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी नियमित वनौषधी पुरवत. मुंबई बांधण्यात रायगड जिल्ह्याची जंगले संपली. कातकर्‌यांची कला गेली. आणि इंग्रजी औषधे आली. आयुर्वेदात असंख्य औषधींची नोंदणी आहे. पण ग्रामिण जनता व आदिवासी जे निसर्गनिवासात राहतात त्यांच्या पारंपरिक, मौखिक ज्ञानाची कुठे नोंदणी कुठे आहे? आदिवासी भाषांतील वनौषधींच्या नावांची नोंद कुठे असणार? आता येथील वानसांची ग्रीक-लातीन भाषेत जंत्री केली जाते

परिभाषा: असा संयोग येतो की जेव्हा समाज काळानुसार एक किंवा अनेक स्थित्यंतरांतून जात असतो. इंडियात अनेक स्थित्यंतरे आली. यांचा भाषा, कामे व जीवनशैली यांवर बदल करणारे परिणाम झाले. फिरंगी सत्ता देशावर आल्या तेव्हा अशी विषेश परिस्थिती निर्माण झाली. आतापावेतो भाषा-कला यांवर प्रमुख्याने देवदेवता, धर्मकर्म, पुराणे, महाभारत, रामायण वा स्मृति यांचा प्रभाव होता. श्रुती, वेदवेदांगे इ. पंडित पुरोहित यांचे क्षेत्र होते.  

त्याशिवाय वर्णाश्रम व्यवस्था, धर्म-अर्थ-काम-मोक्ष, अध्यात्म . मूळ विकसित वा विडबन झालेल्या संकल्पना बहुसंख्य समाजात अजून रूढ होत्या, आजही असतील. त्यातील अलुतेदार - बलुतेदार ही एक सामुहिक सर्जकतेची नमुनेदार व्यवस्था म्हणता येईल. हा बहुसंख्य समाज म्हणजे ग्रामिण शेतकरी 'वर्ग' होय, सदाचा सावकार, राजेरजवाडे, सरदार, ईनामदार यानी अव्याहत नाडलेला, व साक्षरतेला वंचित राहिलेला. या समाजात अनेक लोककलांची परंपरा आजही जिवंत आहे.  

इंग्रजानी हा खंडप्राय देश एका अंमलाखाली आणला. आपली यांत्रिकी-औद्योगिक संस्कृति वा समाजधारणा येथे आणली. कारभारासाठी कारकून हवे म्हणून शाळा - सांघिक शिक्षण - सुरू केल्या. या घटना आज आपण गृहित धरतो. गेल्या शतकाच्या सुरवातीस (१९०१) देशाची लोकसंख्या सुमारे २० कोटी होती. त्यात जेमतेम ५ ते ६ टक्के लोक शिक्षित होते. हा रानडे-गोखले यांचा जमाना. आज १२० कोटी जनतेत ४८ कोटी लोक निरक्षर आहेत. जे शिक्षित व सु-शिक्षित आहेत ते शिक्षणाचा कसा सद्उपयोग करतात हा प्रश्न वेगळा

पश्चिमी औद्योगिक युग इंडियात आले नवे यंत्र-मंत्र-तंत्र विधी घेऊन. शतकानुशतके आमच्या व्यासंगाचे विषय वेगळेच होते हे सांगायला नकोच. परमार्थाच्या नावाने जातपात, सोवळेओवळे, कर्मकांड, टीकासमिक्षा यात पंडित अडकलेले. शेतीभातीत अशिक्षित शेतकरी गुंतलेला. कणाद, आर्यभट, शून्याचा शोध इ. कधीच मागे पडले होते. भौतिकी शास्त्रांच्या व्यासंगाचा अभावच म्हणाना. याचे मुख्य कारण ही शास्त्रें कधी बहुजन समाजापर्यंत पोहोचली नाही हे असावे. अर्वाचीन काळात ४० टक्के माणसे, संख्या नव्हे, साक्षरतेपासून अजूनही वंचित आहेत. ही गेल्या ६० नव्हे ६००० वर्षांची आमची थोर परंपरा आहे 

तरिही बहुसंख्य जनता प्राकृतिक निसर्गाच्या सान्निध्यात रहात आली; विशेषतः आदिवासी, याना तर सृष्टियोगीच म्हणायला हवे. याचे एक आत्यंतिक उदाहरण: अलिकडच्या सुनामीत अंदमान-निकोबार येथील आदिवासी वेळीच उंच जागी निघून गेले होते व सारे बचावले. दृश्य सृष्टीच्या अंगप्रत्यंगाच्या अनुभवाचा हजारों वर्षे जतन केलेला ठेवा त्यांच्यापाशी आहे 

देशातील जीवघेण्या विषमतेच्या वणव्यात तो ठेवा कितपत टिकेल याची घोर शंकाच आहे. सत्तेच्या महानगरात बसून देशप्रेमावर भाषणे देणे सोपे आहे. देश म्हणजे नकाशा नव्हे. पदव्या, बिरूदे, अधिश्रेण्या, पैशांची गंगाजळी त्यागून किती हरीचे लाल निसर्गनिवासात आपल्या अद्यावत ज्ञानाच्या बळावर टिकून रहायला तयार होतील?  

शिक्षण: महाराष्ट राज्य सरकार मराठीत वाङ्मय, भाषा, कृषी, भू, भूगोल, जीव, भौतिकी, रसायन, अर्थ, राज्य , वाणिज्य इ. अनेक शास्त्रांचे उपयुक्त परिभाषाकोश गेली चाळीस वर्षें तयार करित आहे. शिवाय मराठी लोकभाषा यावर काही पुस्तके प्रसिध्द केलेली आहेत, मात्र ही इंग्रजी भाषेत आहेत; बरोबरच देवनागरी पण समाविष्ट केली असती तर तीं अधिक सुगम झालीं असतीं. मात्र पारिभाषिक शब्द रोज व्यवहारात वापरले तर भाषा संपन्न होत जाते.  

पर्यायी शब्द: मराठीत सांघिक शिक्षण (mass education) आणि विविध विषय जसे उपलब्ध व विस्तृत होत गेले तसे पारिभाषिक शब्दांची पण गरज भासू लागली. अर्थातच अनेकदा संस्कृत सुलभपणे उपयोगास येते, उदा. 'प्राणवायू',  'क्षेपणास्त्र', व असे अनेक शब्द!  

अनेक नवनवीन विदेशी संकल्पना पण येत राहिल्या, विषेशतः सामाजिक संदर्भात. उदा. community participation (community, लोकसमूह; participation, सहभाग) हा शब्दसमूह सध्या फार चलनात आहे. याला पर्यायी शब्द कोशांत नाही. यांचा जोडशब्द बोजड होईल. शिवाय 'लोकसमूह' हा युक्त वाटत नाही. 'जमात' / 'जमाती' अधिक जवळचा आहे. आता दोन पर्याय शक्य होतात: लोकसहभाग व जमातसहभाग / जमातीसहभाग. पण रायगड जिल्ह्यात आगरी समाजाच्या भाषेत 'झोळ' हा शब्द प्रचलित आहे जो तंतोतत जुळतो. असे शब्द अनेक लोकभाषेत गवसतील

'झोळ' म्हणजे 'community participation ', ही आमची प्राचीन लोकपरंपरा आहे, जरी ती नागरी उच्चभ्रू लोकाना आयात केलेले कल्पना वाटली तरी. तसेच water conservation, 'जलसंधारण, ज्यासाठी प्रदेशांनुसार अनेक देशी परंपरा आहेत, आणि त्यांची रीतसर नोंदणी पण काही संस्थांनी केलीय. पण लक्षात कोण घेतो!  
'... युध्दोत्तर बेकारीमुळे शिक्षणाचा जुगार झाला आहे ...' गो. वी. (विंदा) करंदीकर (बेडूक, शब्दकोडी आणि संस्कृती, [जुलै, १९५२]  करंदीकरांचे समग्र लघुनिबंध, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ट २९) 
आजचे समीकरण आहेः शिक्षण म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा धंदा करण्याचे साधन. पण हे खरे नव्हे; याची कोणही हमी देऊ शकणार नाही. शिक्षणाचा धंदा करणार्‌या पूंजीवादी भांडवलदारानी आणि त्यांच्या नोकरशाही कठपुतळ्यानी उठवलेली ही अफवा आहे.   

* * * 
टीपा: 
१.  ना. गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) यांनी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सिल मध्ये १९१० साली "प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे व प्रादेशिक परिस्थितीनुसार असावे" असा ठराव ठेवला होता. ते गेल्यावर १९१८ साली बहुतेक राज्यांत ते अमलात आणले गेले.
२. पूरक माहितीसाठी पहा: 
२.१. "British Educational Policy and Growth of Modern Education";
 
शीर्षक: "मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द
लेखक: रेमीजीयास डिसोजा | मुंबई | २०१०   
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 15, 2010

मीच तेजोमय आभास (प्रेमगीत)

जवळ आलीस हरवलीशी
पुळणीवरची विरणारी लाट
स्मिताच्या शुभ्र फेनील गुदगुल्या
खिन्न तळपायांना करता करता
सावरत ओचेपदर
खळाळणारया  हास्याचा लोट
बागडत गेलीस लाटेलाटेवर
छायाप्रकाशाच्या धूसर
क्षितिज रेषेपार अंतर्धान

मी त्यात सूर शून्यात
घनघटांच्या बरसातीत
भिरभिरलो भूलभुलैयात
सहस्त्रधारा तुझ्या रुपाचा
भ्रम ओघळला
अबोध रेषा गुणगुणल्या कानांशी
मीच तेजोमय आभास
या महासागराच्या उधाणावरचा
अनंतापर्यंत.

-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 13, 2010

टिटवी आमची बरी

टिटवी ट्वीटर वर

ट्वीटर पेक्षा टिटवी बरी ।
भाकीत करी; येती सरी ।
चुली पेटती घरोघरी ।
 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

हायकू मात करी

हायकू आणि ट्विटर

ट्वीटरवरी हायकू मात करी 
हायकू वसे हजारोंच्या मनी   


* * * * * 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 10, 2010

पाचोळा - २

पाचोळा २

प्रत्येकासाठी कुणीतरी साद घालत असावं 
जन्माला आल्यापासूनच 
कुणी ऐके 
कुणी काणाडोळा करतं 
आणि आयुष्यभर वणवण करीत जातं 
भिरभिरत  जातं
कानोसा घ्यावा आणि चुकावं 
असही होत असावं. 
वावटळीतला पाचोळा कुठतरी स्थिर व्हावा 
आणि जीवनचक्र पुन्हा परत सुरू व्हावं 
भिजणं सडणं कुजणं आणि अन्नब्रम्हाच्या कारणी लागावं 
वैराणातून मार्ग काढीत 
-- जंगल - वैराण - महापूर - महानगर -- 
आणि सर्व जीवनेच्छा पणाला लागावी  
विरघळत जाणारा मी आणि माझे मीपण  

*****

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 01, 2010

उधळण

उधळण  
केली मनाच्या सांदी कोपऱ्याची 
अगदी आतडं पिळवटून तरीही 
तुझा पीळ उसवणार नाही
अळवाचं पान ओलावणार नाही -
भिजणार नाही.  

 
रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape