Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

January 18, 2011

मकरसंक्रांतीच्या सर्वाना शुभेच्छा

'एक तीळ सात जणात वाटून खावा'  
ही म्हण मराठी अस्मितेला सामाजिक बांधिलकीची अनाहूतपणे जाणीव देते. किती हृद्य परंपरा! विषेशतः संक्रमण काळी हे फारच जाणवते.
Winter in Mumbai : मुंबईत शिशिर ऋतू
भौगोलिक काळात पृथ्वीचा आंस बदलला काय अन् ऋतुंचा चमत्कार झाला. जैवविविधतेत फरक झाला. हवामान बदलले. उत्तरायण आले : सूर्य (!) दक्षिण गोलार्धातून उत्तरेकडे जाऊ / जाताना दिसू लागला.

इंडियात सहा ऋतू आहेत. तर चीनमध्ये २४ ऋतू ओळखले जातात; तेथे दर पंधरवड्याला ऋतू बदलतो: हा संवेदनशील निरिक्षणाचा निष्कर्ष. ध्रुवीय प्रदेशांत सहा महिने दिवस (की संध्या?) - सहा महिने रात्र! सृष्टीचा असा हा सतत चालणारा चलत्‌चित्रपट! नित्य नवा! सृजनशीलांचे - व्यक्ति व समष्टीचे - कधीही न आटणारे हे स्फूर्तीचे संपन्न भांडार (No copyright attached here or price-tag)!

संक्रातिच्या दिवशी वसंत ऋतु नवा उल्हास घेऊन येणार याची आशा पालवते.
असे वसंत आपल्या आयुष्यात पण आले तर किती मजा येईल! पण त्यासाठी मानवाला वानस व्हावे लागेल आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार सोडून. पण ते कसे शक्य आहे?

खरं तर 'प्रथम जगतात' सर्व ब्लॉगवाल्यांचा हा अंतरिक्षाला जोडणारा दिवस खास असायला हवा.
नकळत, या तीळ वाटायच्या देशी परंपरेची आठवण देणारा हा दिवस त्यानी साजरा केला नाही तरी, ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली करून, हे संक्रमणाचा दिवस रोजच साजरा करतात नाही का! आणि इंटरनेटवर इतरही अनेक : Wikipedia, Firefox, Open Office, WikiLeaks इ. त्यातलेच नाहीत का? हे सारेच लोकशाहीचा खडतर मार्ग सुकर करायला हातभार नाही का लावित?
जेवढी भौतिक प्रगति अधिक तेवढी लोकशाहीची वाट ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते अधिक बिकट करणार यात शंकाच नाही.

एका जगात अनेक 'जगते'

'प्रथम जगत इंडिया' शिवाय अर्वाचीन युगात इतर जगते पण आहेत.
'तृतीय जगत इंडिया' कृषिवलांचे, जे तीळ तसेच अन्नधान्यादी लागवड करतात; 'चतुर्थ जगत इंडिया' निसर्गनिवासी आदिवासींचे; आणि 'पंचम जगत इंडिया' विस्थापित, बेघर, बेकार व स्थलांतरण झालेल्यांचे.
'पंचम जगते' सर्व जगभर आहेत. मुंबईत यांची वसती सुमारे ६० ते ७० लाख आहे. यांचीपण शीरगणती आता होणार असे ऐकिवात आहे! 

शेतकरी आयुष्यभर पशू - पक्षी - वानसे यांची आयुष्यभर पालन पोषण जोपासना करतो. शहरी लोकांचे आयुष्य यांत्रिकी झाले तर नवल काय! मग शेतकर्‌याचे काय? त्याचा संपर्क सतत पंचमहाभूतांशी येतो.  
एका बिजातून वाढलेले वानस अगणित फळे / फुले / दाणे देते; केवळ मानवाला नाही तर प्राणी-पक्षी-कीटक या सर्वाना. असा 'सत्संग' ज्याला लाभला तो 'मानव' सहजपणे 'वानस' होऊ असू शकतो, कारण ती शेतकऱ्याचा "स्वधर्म" किंवा "सहज प्रवृत्ती" (vocation) असते. शहरी समाजातील व्यक्तींची "सहज प्रवृत्ती" शहर घडवीत असते. त्यांनी जमिनीपासून निसर्गापासून फारकत किंवा काडीमोड घेतलेला असतो. जमीन व निसर्ग या व्यापारी व दृष्टीसुखाच्या उपभोग्य वस्तू आहेत एवढेच त्यांना माहित असते. (ज्याने त्याने आपापले चित्त तपासून पाहावे.)   

Spring-time in Mumbai : वसंत ऋतू मुंबईत
वानसांप्रमाणे शेतकरी पण दानशूर असतो. गांवढ्यातल्या चंद्रमौळीत आलेल्या पाहुण्याचे स्वागत तो गूळपाणी देऊन होते. अन तो सर्वाना अन्न पुरवतो. बळीराजाची पौराणिक कथा सर्वश्रूत आहे. शेतकर्‌याला यास्तव 'बळीराजा' म्हणतात. शेतकऱ्याला अर्वाचीन युगाच्या एकविसाव्या शतकात 'प्रथम जगत इंडिया'ने येनकेन प्रकारेण या बळीराजाला पुन्हा एकदा पाताळात गाडण्याचा चंग बांधलेला आहे का?  


 विस्थापित मुंबईत २०११ 
हे विस्थापित देशाच्या ग्रामीण विभागातून पोटापाण्याचा उद्योग शोधायला मुंबईत तसेच इतर शहरांत पसरलेले आहेत. या मुंबई नगरीत पांढऱ्या पायाच्या गोऱ्या फिरांग्यांचे मात्र हार्दिक स्वागत होते. पण यांना बेकादेशीर आगंतुक समजतात. यांना गुळपाणी कुठले, पाणी, सर्व जीवसृष्टीची 'प्राथमिक' गरज, पण कुणी देत नाही. यांची अवस्था "आई वाढीना, बाप भिक मागू देईना" अशी झालेली आहे. पण "आई" आहे कुठे? 
टिप: प्रतिमा: रेमीजीयस डिसोजा 
रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 19, 2010

ल सा वि: ३ निसर्गाचा मूलभूत धर्मनियम:


-----


----

मागील दोन लेखांच्या संदर्भाने हा जीवन व्यवहारातील अंकगाणिताचा शोध पुढे चालु. ही प्राथमिक वस्तुस्थिति कधी ना कधी, कळत नकळत जाणून घेणे अपरिहार्य होते.


"श्रम - विश्राम - स्वास्थ्य - अध्ययन - प्रजनन" ही संपूर्ण जीवामात्राची अंगभूत कार्ये आहेत. ही कार्ये निसर्गदत्त असल्याने या कार्यांची स्वायत्तता पण सर्व जीवामात्राला आहे.


या जीवामात्रात सारे प्राणी व वनस्पती आले: सूक्ष्मदर्शीय जीवाणु पासून ते मनुष्यप्राणी, सूक्ष्मदर्शीय शैवालापासून वडासारखे महावृक्ष. कुणीही याला अपवाद नाही; मग ते मानवातले राजा असोत की रंक.


(इंडियात अनेकांची श्रध्दा आहे की जगात ८४ लक्ष योनी किंवा जीव (species) आहेत. आधुनिक विज्ञान काही फारसे वेगळे सांगत नाही. ज्ञान असो की विज्ञान असो, तेवढ्यावर थांबून चालत नाही. ते पोथ्यामधेच राहून जाते, आणि त्या पोथ्या हितासंबंधियांच्या तिजोरीत; जे आजवर घडत आले. ते ज्ञान वैश्विक व्हायला हवे. )


हा झाला निसर्गाचा मूलभूत धर्मनियम. (वाटल्यास परमेश्वर म्हणा. फक्त निसर्ग मूर्त वस्तुस्थिति आहे; निसर्ग संकल्पना नाही, गृहीत प्रमेय नाही.) याला कुणी "सहज-धर्म" म्हणत असावे. बहुधा तो मनुष्य-प्राण्याच्या संदर्भात वापरत असावे. पण "सहज-धर्म" विस्तृत केल्यास सर्वच जैविक - अजैविक मात्रास लागू होतो. जसा लोखंडाचा धर्म.


ही "अंगभूत कार्यात्मक स्वायत्तता" निसर्गदत्त असल्याने इथे दुसऱ्या कुणाचीही "सत्ता" अभिप्रेत नाही; नाही व्यक्तीची ना मनुष्य-निर्मित संस्थेची.


मग ते अवतार/प्रेषित, राजे/पुढारी असोत, अथवा धर्मसंस्था, राज्यसंस्था, न्यायसंस्था, शिक्षणसंस्था ... वगैरे वगैरे. कारण त्यांची मानवी "सत्तेशी" कुठेतरी बांधिलकी असते, लागेबांधे असतात, सरळ किंवा आडवळणाने, कसेही करून, कुठून तरी. जेथे मानवी सत्ता आली तेथे आतंक, अतिरेक, युध्द, संहार, गुलामगीरी, आधिपत्य, लाचलुचपत, अर्जविनंत्या... आले, मग ते शारीरिक, मानसिक किंवा बौध्दिक असोत.


गंमत अशी, निसर्गाने या मूलभूत कार्यांचे सुसंस्कृत समाजांप्रमाणे (civilized societies) खातेवाटप केलेले नाही. निसर्गाने सुपूर्त केलेली ही कार्ये अधिव्यापी (overlapping) आणि एकात्मीकृत (interrelated) असतात व आयुष्यभर कार्यरत असतात (जीवात जीव असेतो). शरीर, मन व बुध्दी / प्रज्ञा या कार्यात निगडित असतात.


मनुष्येतर जीवांमध्ये, उदा. वनस्पतीमध्ये सर्वच कार्ये आपल्याला दिसत नाहीत. पण फुले-फळे लागलेली दिसतात. जमिनीत पडलेल्या बीतून रोप आलेले दिसते. आपला स्पर्श झाला की लाजाळू पाने मिटून घेते. अर्थात शास्त्रज्ञाना अवजारांच्या व प्रयोगांच्या साह्याने बरेच काही दिसते.


जगदीश चन्द्र बोस यानी प्रयोगशाळेत " वनस्पतीना भावना असतात' हे सिध्द केले. पण त्यापूर्वीच इंडियातील निरक्षर खेडुताना पण हे बोधनेने (intuition) माहीत होते. पण बोधना - अंतर्ज्ञान असले तरी ते निरीक्षणावाचून - अभ्यासावाचून - विकासित होत नाही. दिवस मावळल्यानंतर ते झाडाचे पान पण खुडत नाहीत; ती झाडांची विश्रामाची वेळ असते.


आपण निरक्षण केल्यास, लहान मुलांमध्ये जन्माच्या क्षणापासून ही कार्ये चाललेली आपणास जाणवतात. अर्थातच ती गर्भधारणे पासूनच सुरू झालेली असतात. ही पारिस्थितिक घटना असते. टारझनची गोष्ट काल्पनिक असली तरी मासलेवाईक आहे.


विज्ञान जैव इ. विषयांवर उदबोधक प्रकाश टाकते. सायन्सने वनस्पति व प्राणी यांच्यावर थोडे - बहुत काम केलेले आहे. जे "थोडे' केले ते माझ्यासारख्याला "बहुत" आहे. जेवढे अधिकाधिक काम केले जाते तेवढेच निसर्गाचे गूढ़ अधिकाधिक वाढत जाते.


-------------------


१. परसातील "रेन ट्री" - विलायती शिरीष: सकाळी
पाने उमलतात


२. परसातील "रेन ट्री" - विलायती शिरीष: सायंकाळी
पाने मालवतात
-----

आपले प्रतिसाद जरूर लिहा.

क्रमश:

या मूळ मराठी मालिकेचे इंग्रजी भाषांतर माझ्या इंग्रजी ब्लॉग (Archetypes India )वर आठ भागांत प्रसिध्द केलेय. आपण ते पण जरूर पाहू शकता.
(Links to English Posts: 1. Arithmetic in Real Life, 2. Dharma or Fundamental Law by Nature, 3. WORK - Breaking the Mind Block, 4. Leisure - Perpetual Crave for Rest, 5. LCM-5: HEALTH - Forgotten Nature Within and Outside, 6. LCM-6: Learning to Learn, 7. LCM-7: PROPAGATION or Survival of the Species 8. LCM-8 A great epoch fiels at a tangent

-------
Links to my series on Senses: 1. Senses and SenseAbility, 2. Senses and SenseAbility2, 3. Homeostasis, 4. Touch, 5. Hearing, 6. Smell, 7. Sixth Sense, 8. Sex-as-Sense.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 23, 2009

आंबा मोहरला शरदात

आपला परिसर : आंबा मोहरला शरदात





या वर्षी शरादातच आंब्याला मोहर आला. त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस पडला. वाटले मोहराची वाट लागली. पण तसे काही झाले नाही. हे छायाचित्र टिपताना आणिक मोहर आला आणि पिटुकल्या कैरया पण दिसू लागल्या.

मुंबईत सहसा आंब्याची झाडे दिसत नाहित. इथे बहुतेक शोभेची (?) झाडे वाढवतात. काही लहान-मोठ्या मुलाना विचारून पाहिले पण त्याना ते झाड कसे दिसते माहीत नव्हते. आंबे जरी आवडीने खात असले तरी कुतूहल नावाची चीजच नाही त्याला काय करणार?

यात काय आश्चर्य! मी एकदा परदेशी विज्ञ्यान सप्ताहिकात वाचले, इंग्लंड येथील लोकाचा समज होता कापूस प्राण्यापासून पैदा होतो, जशी लोकर मेंढ्यापासून मिळते.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 07, 2009

रेमीची मुक्ताफळे १४

रेमीची मुक्ताफळे १४


"निसर्गाचे मौन होते

जेव्हा
शीवाचे तांडव,

येते
सुनामीचा अवतार घेऊन."




(अधिक वाचा "मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता")

-----------------------------------------------










टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 27, 2009

मुक्ताफळें - ११


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल, नि आवळ्याची तुरट चव!


"ज्यानी निसर्गाशी संवाद साधून जगणे अनुभवले नाही त्याना नैसर्गिक मरण कसे येणार!"

क्रमश:
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 12, 2009

मुक्ताफळें - ९


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल.


झाडांवर लक्षावधी पाने असतात. प्रत्येक पानाच्या शिरा (bar-code by Nature) एकमेवाद्वितीय असतात. तरीत्यांच्यापुढे व्यक्तित्व-पेचप्रसंग (identity- crisis) उद्भवत नाही.


(उद्या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. लोक मूर्ख नाहित. कुणालाच बहुमत मिळणार नाही याची खात्रीआहे. मग खरेदी-विक्रीचा बाजार सुरु होईल. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या माथ्यावर पण त्याची किंमतलिहिलेली असणार, जशी शर्यतीत धावणारे घोडे, IPL चे  क्रिकेट खेळाडू,  चोर दरोडेखोर वगैरेंच्या डोक्यावर लिहिलेली असते. दरेक निवडणूकीत अशीच निकाल येत आहेत. पण हरघडी प्रांतांच्या व केंद्र सरकारच्या निवडणूकींच्य  निकालांपासून कुणीच कसा धडा शिकत नाही? कधी हे तथाकथित पुढारी आपला हेकेखोरपणा सोडून कधी लोकाभिमुख होणार?) 


-- रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 21, 2009

मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता

पाखरांची किलबिल, पाचोळ्याची सळसळ, ढगांचे बरसणे, फुलांचे सुगंध, फळांच्य चवी, हवेची झुळूक... सारे किती रमणीय, किती सुंदर, किती काव्यमय! सारेंच सृष्टीची अभिव्यक्ति.


यापेक्षाही सृष्टीचे मौन अनेक पटीने मोठे, फार मोठे, आहे. असे सांगतात, वसुंधरेच्या उदरात सतत उकळणारा तप्त रस आहे. पण वसुंधरेचे मौन आपणास जाणवते ते जेव्हा आपल्या पायाखालची जमीन हादरते, जेव्हा ज्वालामुखी उफाळतात, जमीनी पाण्याखाली जातात, पर्वत वर येतात...

सागराच्या पाण्यातील बिंदू खालून वर, वरून खाली सतत फिरतो, शीत / उष्ण प्रवाहातून जगभर हिंडतो, वाफ होऊन आकाशात जातो... हे सारे जाणवतेच असे नाही. (बहुतेक वेळा ते पुस्तकात राहते.) यातील मौनाची जाणीव होते जेव्हा आकाशातून विजेचा लोळ कडाडत उतरतो वाटेत येणारे खाक करीत, सुनामीची महालाट जमीन धुवून काढते... तेव्हा.

असेच काहीसे होते जगातील अफाट जनसागारांचे. त्यांचे मौन तरी कुठे ऐकू येते राजजकर्त्याना? केवळ यादवी युध्देच का त्याना जागे करायला हवीत जी होत आली अल्ल्याड पल्ल्याडच्या काळात?

माझ्या जगण्याच्या सर्वसामान्य स्तरावर घडणार्या घटना - बोलणे - वाचणे इ. अगणित प्रसंगी यांचे पण असेच काहीसे होत.

शब्द... वाक्ये... परिच्छेद... यामधील अंतरें "मोकळ्या" जागा नसतात, ते पण "मौन" असते. हे मौन ऐकू आले तर बरेच काही अध्याहृत असलेले उघडे होते: अंहकार, पाखंड, हेत्वाभास, दंभ, क्लेश, कारुण्य...

कोणती अभिव्यक्ति विधायक की विघातक सर्जनशीलता आहे याचा कस लागतो जेव्हा मौनाचा ध्वनी ऐकू येतो. उदाहरणार्थ, अण्वास्त्रे, किंवा आता अणु उर्जा, विघातक आहे की विधायक आहे हे कोण ठरवणार? आजच्या आधारलेला सुधारलेल्या पण अवनत नागर समाजातील निर्मिति करणारा, विकणारा की विकत घेणारा?

मौन ऐकणे असेल तर मौन पाळणे पण आले. (काही समाजात, मर्यादित कालासाठी का होईना, मौन पाळण्याची प्रथा आहे.) " मौन" (silence) म्हणजे "गप्प" (silent) राहणे नव्हे. डोक्यात जर कुरव कहर असला तर ऐकू काय येणार? , बोललेले - वाचलेले पण ऐकू येणार नाही. फक्त आपले पूर्वग्रहच येणार. व आपण "जैसे थे" यापुढे जात नाही.
यास्तव मौन पाळणे आवश्यक असते. पाहताना - वाचताना - ऐकताना आपल्या व्यक्तिगत आवडी - निवडी, पूर्वाग्रह यावर आधारलेला न्याय-निवडा बाजूला ठेवणे ही प्राथमिक गरज आहे. मग साकल्य- (holistic) दृष्टी - विचार - विवरण शक्य होते अन सुरू होते. मग मौन ऐकू येते, मौनाची सांगता होते.


- - - - -
टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट।
मला वाटते कलावंत हे सर्रास मौन पाळतात. अर्थातच कलावंत त्यांच्या युगांची नाडी बरोबर ओळखतात.

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape