Showing posts with label होळी. Show all posts
Showing posts with label होळी. Show all posts

March 29, 2012

रेमीची "विद्रोही कविता": एक व्यत्यासकथा

कविता सुटका करते माझी अनेक जंजाळातून, जेव्हा जेव्हा अशक्य होते तर्कसंगत गद्य लिहिणे एकाद्या घटनेवर, जी होते पीडायायक समस्ताना अन स्वत:ला. जेव्हा अशक्य होते मुद्देसूद लिहिणे, ५०० अक्षरात, ५०० शब्दात, ५०० वाक्यात, ५०० पृष्टांत लिहिले तरीही विपर्यास अटळ असतो. (अशाच एका प्रसंगी लिहिली होती कविता "Who is the giver? Who is the receiver? ": जेव्हा त्या घटनेचे परीक्षण लिहिणे अशक्य झाले होते.)

अशावेळी कविता येते धावून मदतीला, "लिही" म्हणते, "खुंटीवर टांगून व्याकरण आणि सौंदार्यशास्त्राचे नियम". "लिही" म्हणते, "पंधरा किंवा पाचच शब्दात, आनंदाची लकेर किंवा वेदनेची किंकाळी, किंवा भावपूर्ण श्रध्दांजली... भावनेचा उद्रेक..."

होळीच्या उत्सवात भिल्ल कुटुंबांबरोबर जत्रेच्या गावी / जागी जाताना बायामुलींनी गायलेली गाणी आठवतात. "सांदी खुटी ओ ऽ ऽ हेंडो मेला ऽ ऽ ऽ ऽ य ऽ से..." ("चांदी खुंटली - कमी पडली - ओ, चला मेळ्याला..."). गाण्याच्या तालावर डोंगर खडकातून पण चालणे चालणे रहात नाही, त्याला नाचाची लय येते आणि मैलांचे अंतर कधी कसे संपते कळत नाही.

"ग्यानोबाबा तुकाराम माऊली" बोलांवर वारकरी स्थल - काळाच्या परिमितींच्या पार जातात.

"जो! जो ना बा पाणी!" ("बघ! बघ ना आई पाणी!") एसटी बसमधली एक तरुणी उत्स्फूर्त शब्दात आईला सांगते. ती लग्नाच्या व्हराडाबरोबर आहे. काठेवाडहून ते व्हाराड बडोद्याला जात होते. बस खेडा जिल्ह्यात आली. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली होती. हे लोक तीन वर्षे अवर्षणाच्या झळा सोशित आले होते. तिच्या वडिल मंडळीने अशी अनेक अवर्षणे अनुभवली असतील. त्या यौवनेच्या पाचच शब्दात त्या सर्वांची आर्तता आणि आनंद एकाच वेळी व्यक्त होत होता.

"होळये माय तुजां रोंबाट गे
चिचेचां पान तुजां आंबाट गे"
कोकणात होळीच्या उत्सवात लहानपणी ऐकलेले हे गाणे. होळी-आईला जेवणात चिंचेचे पान पण पुरेसे होते.
तीच गोष्ट खेडोपाडीं बायकांच्या जात्यावरच्या श्रमापरिहार करणारया ओव्यांची.

अशा एक-दोन ओळींच्या अभिव्यक्तित -- मग ती अभिजात कविता, गीत नसेल, त्यात कल्पनाविलास नसेल, त्याना साहित्य विशारदांची मान्यता नसेल, पण वास्तव जीववनाचे काव्य ओतप्रोत भरलेले असते.

तृतीय जगत आणि चतुर्थ जगत इंडियातील (Third World and Fourth World India) सहा लाखांहून अधिक खेड्यात लोक गीतांचे तसेच इतर साहित्याचे केवढे भांडार भरलेले असेल याची कल्पनापण करत येणार नाही। दूरदर्शनवर आणखी शंभर वाहिन्यापण त्यांचे प्रतिनिधित्व करायला पुरे पडणार नाहीत.

कुठेही उधळपट्टी नाही. अपव्यय नाही: नाही शब्दांचा, नाही जीवनावश्यक साधनसामग्रीचा. इंडियातील कोट्यावधी शेतकरी, खेडूत, आदिवासी जनतेला उधळपट्टी परवडणारी नाही.

त्यांचे हे धोरण "प्रथम जगत इंडियाच्या" (First World India) अगदी उलट आहे, मग तो ताजमहल असो की चंद्रयान असो, बॉलीवूड असो की टेलीवूड! पण हे "प्रथम जगत इंडियन लोकांच्या मट्ठ मेंदूत जाईल तेव्हा ना? माझा हा ब्लॉगपण याला अपवाद नसेल!

त्या अद्वितीय लोक गीतांचे काही कण लहानपणीच माझ्या कानावर पडले हे माझे सुदैवच. त्या दिवट्यांचा प्रकाश पण या अरण्यातील अंधारलेल्या रात्रीं पुरेसा होतो, हरवलेल्या शब्दांचा, अर्थांचा, सूरांचा, मुद्रांचा, नादांचा शोध घ्यायला -- वाट दाखवायला -- दिशा दाखवायला.

माझे देशी मानस जाणते, "जीवनासाठी कला" आहे, "कलेसाठी कला" नाही. माझे जे काही विलायती सांघिक पध्दतीने शिक्षण झाले ते काही फारसे परिणामकारक ठरले नाही. मी जरी अंशत: नागरी समाजाचा (civilized society) भाग असलो तरी त्यानेही काही फरक पडत नाही.

माझा एक साधा सरळ समज किंवा विश्वास किंवा श्रध्दा आहे:
"जीवन सर्वश्रेठ आहे; कला - विज्ञान, धर्म - तत्वज्ञान इत्यादी पेक्षा श्रेठ आहे, ही सारी केवळ साधने आहेत. जीवन या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठतम आहे."

रेमीची मराठी बोली प्रस्थापित संकल्पनेतून अंशत: तरी मुक्त झालीय. तरी तिचे लोकगीतापर्यंत -- लोकसाहित्यापर्यंत पोहोचणे बाक़ी आहे. ही झाली प्रवृत्ती, महत्वाकांक्षा नव्हे.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 01, 2010

पळस

पळस
आभार : Flowers of  India


आभार : Flowers of India 




पळस  
वैशाखाच्या मध्यान्ही
पळसाच्या
पाकळ्यांचा
उल्हास

उजळतो
राने डोंगर.

(ले. १६-३-८४)
टीप: वरील प्रतिमा Flowers of India या वेब साईटवरून घेतल्या आहेत.
पळसावर काळाचा वास असतो अशी श्रध्दा आहे. काळ म्हणजे मृत्यू, समय, प्रेम, काळ म्हणजे यम. "पळसाला पाने तीन" अशी म्हण आहे. होळीत या फुलांचा रंग पूर्वीच्या काळी वापरत असत. या रंगाच्या पाण्याने आंघोळ केल्याने चामडीचे रोग दूर होतात. हा मूळ भारतीय वृक्ष आहे. सुधारलेल्या आधुनिक पलास पलास सिंथेटिक रंग वापरतात. अन् जंगले नष्ट होताहेत. त्याबरोबरच वानासांची सामान्य माहितीपण नाहीशी होतेय.

काही वर्षांपूर्वी मुंबईत होळी उत्सवात माझ्या एका सहाकारयाची लहान पुतणी विषबाधेने वारली व तिच्या बरोबरीची आठ मुले अत्यवस्थ झाली होती. त्यांच्याच शेजारी तरुणाने कौतुकाने ते रंग मुलाना आणून दिले होते. आयत्या आलेल्या सुधारणेची पारख कोण, कशी, केव्हा करणार? या घटनेला तीस वर्षे झाली तरीही अशा घटना आजही सुवर्णनगरी मुंबईत घडतात.

पळस
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 28, 2010

होळी - एक शब्द रेखा, रेमी - एक स्व-चित्र रेखा

'ओक्टोपसचे जाल', रेमीची स्व-प्रतिमा


होळी (वृक्षपूजेचा एक प्रकार. तो आदिम जमातीपासून चालत आलेला, नंतर नागरी समाजाने अनेक प्रकारे अंगीकारला.)

रेमीने स्वदेशी अनेक वर्षे केलेली, काही लक्ष मैलांची भटकंती, तथाकथित अद्यावत समाजांपासून ते आदिम जमातींचे दर्शन यानी वरील तथाकथित कला व खालील तथाकथित कविता साकारली. जरी वेगवेगळ्या दिवशी रेखाटलेली असली तरी एकाच जीवनरेखेने बांधलेली आहेत.
हर्षदा विनया या ब्लॉग लेखिकेने एकदा रेमीची चार स्व-व्यक्ति चित्रे (उजव्या बाजूच्या स्तंभात) पाहून (टीपेत) आश्चर्य व्यक्त केले होते त्याचा हा खुलासा।

आरशात दिसणारा रेमी किंवा छायाचित्रात टिपलेला रेमी, दोन्ही "मायावी वास्तवता", जसे "झाड" हा शब्द किंवा झाडाचे चित्र. वास्तवता (reality), मायावी वास्तवता (virtual reality) किंवा कलेतील अतिवास्तवता (surreality) समजायला आपापली बोधना (perception) वापरत असतो. तीच वस्तुस्थिती होळीची!

होळीत वानस जाळले जाते. माझ्यापुरता याचा अन्वय असा: वानसे आपल्या जीवनाला आधार - अन्न, निवारा, वस्त्र, ओषधी व अनेक जीवनोपयोगी साधने देतात. वानस सर्वप्रिय आहे. या आहुतीतून त्यांचे पुनरुज्जीवन - पुनरुत्थान होणार असते. बीज उनात भाजले जाते - मृत्यु पावते - त्यातून झाड उगवते. जसे गणेश विसर्जन - दुर्गा विसर्जन तसाच हा वानसाचा यज्ञ.

* * *

होळी!
इथे रात्रंदिवस रोजच होळीचा उत्सव चाललेला असतो!
अनेक होळ्या पेटतात इथे:
मानवी ऊर्जेची होळी;
नैसर्गिक साधनसंपत्तीची होळी;
पैशाअड़क्याची होळी;
वैयक्तिक - सामाजिक स्वास्थ्याची होळी;
लोकशाही हक्कांची व जबाबदारीची होळी...

या आधुनिक होळीला म्हणा आता वणवा!
ऊर्जेच्या होळी बरोबर होते
पाण्याची होळी; भूईची होळी;
जंगलांची होळी; जीव जंतूची होळी;
पर्यावरणाची - वातावरणाची होळी;
पारिस्थितिकिची होळी;
या होळीत तू अन् मी असतो संतत
कार्यरत... तडफडत चाचपड़त...
उत्तराच्या शोधात.

मग तू अन् मी बोलावतो
ही होळी थांबवण्यास
जागतिक दादा लोकांची
जागतिक परिषद.

तेथेही जागतिक दादागिरी देते
आधुनिक शास्त्रोक्त उपचार;
त्यांचे आधुनिक तंत्र - मंत्र - विधी
जे करिती साह्य पेटवण्यास हा वणवा,
लावते होतात आणिकच हातभार.

आधुनिक विज्ञ्यानाचा आधुनिक विश्वामित्र
देतो आश्वासन राजकर्त्याना त्यांच्यासाठी
प्रतिविश्व - नवा कल्पलोक,
नि हा महत्वाकांक्षी आधुनिक त्रिशंकू
लटकत राहतो अधांतरी...

त्यात तू पण, अन् मीही सामील.
होळी! या होळीला म्हणा आता वणवा!!

* * *
(रोम - रोमन साम्राज्याची राजधानी - जळत असताना सम्राट नीरो फिडल वाजवत बसला होता असे सांगतात. ही गोष्ट प्रसिध्द आहे. पण आजही त्याची पुनरावृत्ती होते!)
 अधिक वाचा:  होळी 


रेमीजीयस डिसोजा
होळी पौर्णिमा २०१०
मुंबई

~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved।
Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 30, 2009

अग्निफुलांचा उत्सव

अग्निफुलांचा उत्सव

मी व्याकूळ आर्तता
तुझ्या रोमरोमात उमटेल
रंग सुने नाहीत जाणार चुकवून
इथे तिथे मी पाहीन
तुला रंगछटामध्ये कैक
गर्भ तुझ्या स्निग्धोष्ण उद्ररी
होवून राहीन मी सदाचा
तहान भूक निश्वसने तृप्तीचा
साक्षी आणि वाटेकरी
लाख फुललेले अंगार माझ्या
नजरेतले पाहीन माझा मला
वाढत असलेला
प्रसवाच्या निरंतर प्रतिक्षेत
धगधगत्या अग्निपुराच्या पडछाया
लेवून प्रश्नाचिन्हांकित
उभ्या गर्भवती हजार
मी धरित्रिच्या अंगांगावर
नाचेन अग्निफुलांचा उत्सव उत्तरारात्रीँ
- - - - -
(सातपुड्याच्या कुशीत होळी पुनवेची रात्र)
२४-०३-१९७०


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 23, 2009

सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव


सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव
भिल्लांचा होळीचा उत्सव पाच दिवस चालतो. गावोगावी मेळे भरतात.नाच, गाणे, संगीत यानी भारलेले. असे मेळे नदीकिनारी अथवा तळ्यांच्या काठी असतात, आणि बाजारपेठेच्या गावी.
होळी आणि वृक्षपूजा हे मूळचे आदीवासी सण आणि परंपरा आहेत असे वंशशास्त्राचे अभ्यासक (कुमारस्वामी) मानतात. नंतर आर्यानी आणि बौध्धानी त्यांचा स्वीकार केला.

------

विंध्य- सातपुड्याच्या रांगांमध्ये नर्मदा नदीच्या अनेक उपनद्या वाहतात. इथली जंगले आदिवासींची जीवनरेखा आहे.हजारों वर्षे आदिवासी इथे निसर्गाशी सुसंवाद साधून राहिले।विंध्य आणी सातापुड्याच्या रांगामध्ये भिल्लानी आसरा घेतला. पण आता तेथली जंगलेही नागरी समाजानी संपुष्टात आणली. आणि भिल्लांच्या चरितार्थावरच घाला घातला.

----

भिल्लांची संस्कृति एवढी संपन्न आहे की त्याला जागतिक वारसा समजणे आणि त्याचे जतन करणे आजची निकड आहे. दहा हजार वर्षांहून अधिक या पुरातन जमाती निसर्गाशी संवाद राखून आतापर्यंत जगत आले. पण आता सुधारणेच्या वावटळीत कितपत टिकेल याची शंकाच आहे.

-----
भिल्लांची जमात (community) एकसंध असते. त्यांच्यामध्ये सुसंस्कृत समजल्या जाणारया नागरी समाजाप्रमाणे (society) श्रमाची विभागणी केलेली नसते. प्रत्येक व्यक्ति सारया जमातीचे प्रतिक / प्रतिनिधी असतो। श्रम - विश्राम - अध्ययन - स्वास्थ्य यानी परिपूर्ण आदिवासी माणसांचे व्यक्तिमत्व नागरी माणसासरखे दुभंगलेले नसते.


----
होळीच्या रात्री अनेक वाड्यांवरून लहान थोर, बाया पुरूष होली पेटवायच्या जागी जमा होतात. येताना तादीने भरलेली मदकी, मक्याच्या भाकरया आणि अंडी बरोबर घेवून येतात.

चंद्र माथ्यावर आला की होळी पेटवतात. सारे बायका, पुरूष, मुले गाणी गात फेर धरून होळी भोवती नाचतात. अधून मधून ताडी पिने चालते. नाच गाण्यात ताडी पिण्यात रात्र संपते. दीवार वर येतो. सारे होलीभोवती जमा होतात. म्होरक्या सगळयानी आणलेल्या भाकरया एका मोठ्या बांबूच्या टोपलीत कुस्करून घालतो. त्यात कोंबडीची कच्ची अंडी फोडून घालतात, भाकरीचे तुकडे आणि अंड्यांचा बलक एकमेकात मिसळतात. हा होळीचा प्रसाद, सर्वाना वाटला जातो। आणी होळीच्या उपवासाची सांगता होते.



----

या तरुणानी ल्यालेले श्रृंगार कुतुंबांतील स्त्रीयांचे आहेत. बहुतेक दागिने काचमण्यांचे स्वत:च गुंतलेले असतात.
त्यांच्या बांसरीला पाचच सूर असतात.
मोराची चित्रे बायका मुली अंगावर गोंदून घेतात. तर वाघाला ते वाघदेव मानतात.


----
तरुण युवक युवती आपला पसंतीचे जोडीदार निवडतात आणि मेळ्यातून पळून जातात. मग तरुणाचे आई वडिल मुलीच्या घरी जातात आणि मुलीला मागणी घालतात, मुलीच्या घराच्याना हुंडा देवून दोघांचे लग्न लावतात. यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. ठिकठिकाणी पाच दिवस हे मेळे जत्रा भरतात. इथे गावोगावीच्या आप्तस्वकीयांच्या भेटी होतात.

----


ज्यावेळी माझे सहाध्यायी आणि सहकारी विलायातेला - अमेरिकेला जात होते आणि तेथेच स्थायिक होत होते तेंव्हा मी दरयाखोरयात - वाळवंटात - विशेषत: आदीवासी जमातीमध्ये भटकत होतो. शोधत होतो नागर समाजापुर्वीचे लोक आजही आहेत, जेथवर माझी पाळेमूळे नक्कीच पोहोचलेली असणार.

आणि माझी जीवानाशैलीच पार बदलून गेली -- कोणतेही विधी संस्कार न करता माझे धर्मांतर झाले म्हणा.
मी काढलेली ही छायाचित्रे मी प्रथमच प्रसिध्द करीत आहे. मन फारच अस्वस्थ आहे. वाटते मी काही चूक तर करीत नाही? कारण माणसावर माझा विश्वास असला तरी सुसंकृत समजल्या जाणारया समाजावरचा माझा विशवास केव्हाचा डळमळला आहे.

मी
लिहिलेले संशोधित निबंध १: "Tribal housing: Buddha and the art and science of Karavi hut"; आणि २: "Tribal housing and Habitat-2"
१: "Tribal housing: Buddha and the art and science of karvi hut" आणि
२: "
Tribal Housing and Habitat-2"
वारली
जमातीचे घर आणि परिसर, कला आणि संस्कृति संबधिं असले तरी इतर जमातींना पण लागू पडतात. कृपया वरील दुव्यावर टिचकी मारा.



~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 08, 2009

होळी पौर्णिमा


कलणारे तालवृक्ष
चंद्राचे पूर्णबिंब
प्रकाशाच्या रजईत
बासरीचे संगीत
---
(फाल्गून पौर्णिमा १९७६)

(छायाचित्र: होळीच्या उत्सवात भिल्ल आदीवासी सातपुड्याच्या कुशीत)
~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape