Showing posts with label धरतरी. Show all posts
Showing posts with label धरतरी. Show all posts

December 26, 2013

शौचाचे परिवर्तन कशात होते?

शौचाचे परिवर्तन कशात होते?
संगीतमग्न वारली (आदिवासी)

निसर्गनीर्मित जीवमात्राने, प्राणी (त्यात अत्यन्त बुध्दीमान माणूस पण आला) आणि वनस्पती यानी केलेले शौच जीवनोपयोगी खत बनते.

पण गेल्या पाच हजार वर्षांच्या संघटित नागर समाजाच्या (civilized society) इतिहासात माणसाने केलेल्या शौचाचे परिवर्तन कशात होते?

पिरामिड - ताजमहाल पासून ते प्रचंड शहरे; ग्रंथ-पोथ्या-पुराणे पासून ते देवदास-स्लमकुत्रा करोडपती पर्यंत; अवकाशयानापासून सैपाक घरातील मिक्सर-ग्राइंडर पर्यंत सारे सारे काही मैल निर्माण करतात. . याला इंतरनेट - आंतरजाल - पण अपवाद नाही। नाही हा माझा ब्लॉग! या सर्व मैल्याचं परिवर्तन कशात होते?

हे सारेच सृष्टीतील सिमित ऊर्जा स्रोतांचा क्षणोक्षणी होणारा प्रचंड वापर संपूर्ण पर्यावानाला विनाशाकडे नेत असतात; एन्ट्रपीचा - प्रगतिरोधाचा नवा नवा उच्चांक गाठत जातात.

अलेक्झांड्रिया शहरात म्हणे एक प्रचंड लायब्ररी होती. विलायतेच्या परिसरात किरिस्ताव (Christian) आणि मुसलमान यांच्यात धर्मयुध्दे (जिहादे) चाललेली असताना हे ग्रंथालय खपले - जळून खाक झाले. पण कुणाचेच काही बिघडले नाही.

एवढे अवतार - प्रेषित झाले. आले. गेले. काही फरक पडत नाही. त्यांच्या नावाने प्रचंड उर्जेचा विनाश मात्र चालूच आहे: या ना त्या निमित्ताने. जो तो आपापला अंहकार गोंजारत असतो. त्यात मी पण एक.

पण सृष्टीचा आदर, कला आणि विज्ञान यानी माणसाला फार हातभार दिलेला आहे: लाख वर्षापूर्वी पासून; नागरी समाजाचा उदय होण्यापूर्वी. कला आणि विज्ञान ही काही पांढरपेशांची, भटोंची, गोऱ्या कातडीची मक्तेबाजी नाही.

सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजांच्या पाच हजार वर्षांच्या हाणामारीतून अजूनही तगून राहिलेल्या काही आदिम जमाती आहेत. त्यांच्याकडे अजूनही सृष्टीयोगाची मूल्यवान गुपिते आहेत. फक्त आमच्यामध्ये थोडासा नम्रपणा हवाय.

(टीप: १: माझ्या "यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - ३" या पोस्ट वर सतीश रावले यांची टिप्पणी वाचून सुचलेले काही विचार येथे मांडले.
२: वरील छायाचित्रात एकतारीच्या सूरात गाणे म्हणत असलेला तल्लीन वारली आदिवासी: मुंबईच्या मागील दारी. अधिक वाचा Warali Art
३: आनंद कुमारास्वामींच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकाचे परिक्षण माझ्या इंग्रजी ब्लॉग वर पाहा: LINK: )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 07, 2009

धरतरी

धरतरी

तुझ्या अस्तित्वाचा मोहोर
सुगंध वाऱ्यावर
चंद्र तारकांच्या किरणांवर
हरवते महानगर ।


तुझ्या संगीताचा मोहोर
फुलतो आठही  प्रहर
दाही दिशा अनावर
चिरंतन समागम ।


तुझ्या आठवणीचा मोहोर
फुलतो रोमांचकारी
तीनही काळ रंध्रारंध्रावर
काळ काम वेग होतात स्थिर ।


तुझ्या हास्याचा बहर 
रानोमाळी कडेकपारीं
रेताडातून मध्यानी
सरस्वती येते वर ।


तुझ्या मौनाचा मोहोर
पुलकित सदाबहार
केसांच्या अग्रांवर
सदोदीत चमत्कार ।


चिमण्या पतंग फुलपाखरे
रंग तरंग माती धोंडे
तुझ्या अस्तित्वाचा साक्षात्कार
महाकाव्य रस्ताभर ।


तुझ्या नृत्याचा उल्लास सदाबहार
वृक्ष वेलींच्या माथ्यावर
बरसणारया ढगांवर
सुकदुकीचा सदा विसर ।


अनुभूतीचे सारे थर
पृथ्वी आकाश पाताळ
अस्तित्वाच्या पार
तुझी सय अपरंपार ।


अनादी अंत महोत्सव
आनंदाचा गजर गजर
आनंदी आनंद आनंदी आनंद
आनंदी आनंद आनंदी आनंद...

* * *
"सुकदुक" (कोंकणी), सुख दुःख
- - - - - -
स्थळ: मुंबई
काळ: २८ - ४ - १९९९
- - - - - -
धरतरी झाली माझे माता पिता गुरु.
--- रेमी डिसोजा
गुरु पौर्णिमा (१८.७.२००८)

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 17, 2009

भातशेती


भातशेती

भादरव्याची सरगंध आणतेहिरवट पिवळा

(१२-९-१९८५)
गो. नी. दांडेकरानी लिहिलेली गोष्ट वाचली होती. त्यात कथेच्या नायकाला एक साधू मातीचा सुगंध पकडलेल्या अत्तराची कुपी देतो. पहिल्या पावसाच्या सरीनंतर येणारा मातीचा सुगंध अनुभवलाय. भाताचा सुगंध अत्तरात पकडलेला कधी ऐकला नाही. पण अनुभवलाय मात्र खूप, भाताच्या शेतात. ज्याना हा हवा असेल त्यानी जवळपासच्या शेतात भाताला फुलोरा येतो तेव्हा जरूर जावे.

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 16, 2009

फुलावी धरतरी कष्टिली

फुलावी धरतरी कष्टिली


अंतरातल्या जळत्या ज्योतीचे
जोडावे जळणे समस्त व्यक्तिमात्राचे
निर्झर ठायीठायी पामरांच्या अश्रूंचे
त्यांचा जोडावा महानद
ताप अनशन कष्टांचे तांडव
त्याने फुलावी धरतरी कष्टिली.
* * *
गुजरात (३१.१०.१९६९)


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 10, 2009

धरती, जळ आणि सांगाती

धरती, जळ आणि सांगाती

लाख लोकानी जी पुस्तके वाचली
ती मी कुवतेनुसार वेळोवेळी वाचली ॥


त्यातल्या ख़ास हजार लोकानी जी वाचली
ती म्या कधी ना वाचली ना पाहिली ना ऐकली ॥


धरती माझी आई - जळ माझे जीवन -
लाख माझे सांगाती - त्यानी केले औक्ष पूर्ण ॥


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 30, 2009

अग्निफुलांचा उत्सव

अग्निफुलांचा उत्सव

मी व्याकूळ आर्तता
तुझ्या रोमरोमात उमटेल
रंग सुने नाहीत जाणार चुकवून
इथे तिथे मी पाहीन
तुला रंगछटामध्ये कैक
गर्भ तुझ्या स्निग्धोष्ण उद्ररी
होवून राहीन मी सदाचा
तहान भूक निश्वसने तृप्तीचा
साक्षी आणि वाटेकरी
लाख फुललेले अंगार माझ्या
नजरेतले पाहीन माझा मला
वाढत असलेला
प्रसवाच्या निरंतर प्रतिक्षेत
धगधगत्या अग्निपुराच्या पडछाया
लेवून प्रश्नाचिन्हांकित
उभ्या गर्भवती हजार
मी धरित्रिच्या अंगांगावर
नाचेन अग्निफुलांचा उत्सव उत्तरारात्रीँ
- - - - -
(सातपुड्याच्या कुशीत होळी पुनवेची रात्र)
२४-०३-१९७०


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 23, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

तंत्र युग (Technology Age)

सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध असावा असे वाटत नाही. पण जास्त खोलात जावेसे कधी वाटले नाही.

रोज सकाळी अंगणात शेण सडा सारवून रांगोळी घालण्यापासून सैपाकघरातील असंख्य क्रिया तंत्र विधीच आहेत. हा ब्लॉग लिहिणे पण तंत्राचा भाग आहे. कारखान्यात लेथ मशिनावर वेगवेगळ्या इंजीनाना लागणारया हजारो भागांच्या हजारो नकला तयार केल्या जातात. हे पण तंत्र आहे. झोपडी, गगनचुंबी इमारत, शहर - नगर बांधणे ... हे सारे तंत्र विधी आहेत. अण्वास्त्रे, बंदुका, युध्ये- महायुध्दे हे सारे आधुनिक "जारण-मारण-तंत्र" विधीच होत.

ध्यानाच्या अभावी यातील कितिक हीन, अमानुष, निकृष्ट असतात - सुख समृध्दी, पर्यावरणाला घातक होतात. कित्येक शेकडों हिन्दी इत्यादि चित्रपटांप्रमाणे छूमंतर होतात. घरातल्या मिक्सरपासून अवकाशयानापर्यंत कोणते यंत्र कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. अगदी मझ्यासमोराचा संगणक पण! एवढेच काय? मी पण (संगणकाच्या रेडिएशनमुळे)! जर्मनीत झालेला यहुद्यांचा संहार, नागासाकी-हिरोशिमावर टाकलेली अण्वास्त्रे, ग्रामीण जनतेचे विस्थापन, पर्यावरणाचा होणारा सतत विनाश... हे सर्व आधुनिक जारण-मारण तंत्र विधिच होत.

मी पाहतो, दिवाळीत पुस्तकात पाहून रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीचा फराळ बाजारात तयार मिळतो. पूर्वी जे मसाले घरोघर तयार केले जात होते ते आता वाण्याच्या दुकानावर आयते मिळतात. तयार सदरे, तयार विजारी, तयार काय काय! पन्नास कोटी बाया बापड्यांची सोय झाली! शंभर कोटी जनताजनार्दनाची सोय झाली!

स्वावलंबन गेले! स्वायत्तता पण गेली! नियोजनाने जमीनी गेल्या. हे सारे कायद्याच्या कक्षेत राहून. तरीही मुंबईच्या मागील दारी कितिकाना धड एका वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते. म्हणून दयाळू मायबाप सरकारने शाळेतल्या मुलाना दुपारचे जेवण मोफत द्यायची योजना केलीय. पण पालकांचे - भावंड़ांचे काय? कुठे गेले सरकारचे "ध्यान"?


संस्कृति (culture): उगम अणि अभिव्यक्ति

पितृप्रधान समाजाताही संसाराचा भार उचलण्यात स्त्रीचा वाटा वरचढच असतो, मग ती शहरात असो की खेड्यात की जंगलात. युगानुयुगे स्त्रीने संस्कृतीची जोपासना केली हे सर्वमान्य आहे, अजून तरी.
संस्कृति केवळ शास्त्रात - ग्रंथात नसते, ती केवळ पंडितानी केलेली नोंद असते. संस्कृती काही शाळांत, महाविद्यालयांत नसते; तिथे केवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहिली जातात, त्यात आचरणाची हमी नसते.

"अन्न, वस्त्र, निवारा" या तीन मूलभूत गरजामध्ये संस्कृतीची प्रचिती येते.
"श्रम, विश्राम, आरोग्य, शिक्षण" या चार जगण्याच्या मूलभूत क्रिया होत. त्या सर्व जीवमात्राला -- प्राणी, वनस्पती: पाण्यातले, जमिनीवरचे, वातावरणातले, भूमीगत -- लागू होतात. या चार मूलभूत जैविक क्रियामध्ये मानवाच्या संसकृतिंच्या अभिव्यक्तिची नोंद होत असते.

माझी मायभूमी: हजार पाकळ्यांचे कमळ

पाण्यात जीवमात्र निर्माण झाले; म्हणून तर आपण त्याला "जीवन" म्हणतो. पाणी आणि जमीन यानी मानवाला संस्कृति दिली. मग तो अर्धनग्न आदीमानव असो की सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजातील असो.
म्हणून तर भारतातच काय सर्व जगभर संस्कृतिंची विविधता दिसते. यात काय आश्चर्य! सारया जमाती, सारे समाज विविधतेने नटलेले दिसतात.
त्यात भारत - एक "सहस्त्र पाकळ्य़ांचे कमळ". येथे दिसते जेवणातील विविधता, पेहरावातील विविधता, घरांची विविधता, चालीरीतींची विविधता, आणि संगीत, नाटक, कथा, काव्य, चित्र, शिल्प... भाषा सर्वच वैविध्यपूर्ण.


औधोगिक संस्कृति (Industrial Civilisation): अमर्याद अनिर्बंध हवस

आधुनिक मन्त्र - तंत्र - यंत्र युगांत समाजाचे विघटन मात्र झाले. पर्यायाने कुटुंबाचे पण विघटन झाले. त्याबरोबरच अनेक संस्कृतींचा विनाश झाला. उरल्या सुरल्यांचा होत आहे. सारे कसे कतारीत उभे राहिलेले ठोकळे होऊ घातलेले आहेत. संस्कृति कधीच जागतिक (ग्लोबल) असूच शकत नाही. जागतिक असतो व्यापार उदीम. संस्कृति स्थानीय असते.

आतापावेतो पांच हजार वर्षांत कितीतरी संघटीत धर्मांचा, पंथांचा उदय (शेवट) झाला असेल. अनेक अवतार प्रेषित अवतरले. अनेक आस्तिक-नास्तिक पंथ, सिध्दांत आले-गेले. सर्वानी मानवाला भवसागर तरुन जाण्याचे, समृध्दीचे आणि शाश्वत सुखाचे - इहलोकी आणि परलोकी - मंत्र दिले, आश्वासने दिली. याला इतिहास साक्षी आहे.

पण आज प्रत्यक्षात काय घडते याला मात्र आपण साक्षी आहोत - आणि म्हणूनच आम्ही जबाबदार आहोत -- निदान स्वत:पुरते स्वत:ला तरी. आधुनिक औद्योगिक समाजाने आणि विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैद्यक यानी दिलेले यन्त्र-मंत्र-तंत्र पण हीच आश्वासन देतात. हे सारे काळाच्या कसास लागेपर्यंत किती उशीर झालेला असेल?

हे सारे लिहिताना नेहमी प्रमाणे आठवते एकोणीस वर्षांच्या संता-कवी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान:
"दुरिताचे तिमीर जावो..."
अस्तु.
------------------------------
(ही मालिका केवळ एक निरिक्षण, विहंगम दृश्य (birds-eye-view) आहे, इथे कोणतेही सिध्दांत वा गृहीत प्रमेयं नाहीत.
असे समजा ही एका पाखराची चिंव चिंव आहे, जसे लोककथेत तोता-मैना बोलतात. या फांदीवर सर्व पाखारांचे स्वागत आहे.)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 12, 2009

काव्य जगणे...


काव्य जगणे...

काव्य जगणे आणि काव्य लिहिणे यात असते जमीन आणि अस्मान या मधील अंतर. जमिनीवरून, डोंगराच्या माथ्यावरून, अथवा विमानातून पहाताना वाटते दूर क्षितिजापाशी आकाश जमिनीला भेटतेय पण हा केवळ भास - दृष्टीभ्रम - असतो.

म्हणून तर ढगाला जमिनीवर उतरायचे असते; पक्ष्याना झाडावर घरटे बांधायचे असते; गरुडाला पर्वताच्या कड्यावर उतरायचे असते, आणि गांडुळाला चांदण्याशी - चांदण्यांशी हितगूज करायाचे असते.

काव्य जगणे म्हणजे जीवनाच्या काव्याचा आनंद जगणे म्हणजेच सृष्टीयोगाची उपासना - सृष्टी - प्रकृती - निसर्गाशी शरीर, मन आणि आत्म्याने सर्वस्पर्शी जीवन जगणे.

त्यासाठी जीवनाला होणारा क्षणाभराचाही उत्कट स्पर्श आमूलाग्र क्रांती आणावयास पुरेसा होतो. मग रूरू होते मरण आणि जन्माचे निरंतर चक्र - "पुनरपि जननम् पुनरपि मरणम्" - आता इथे.


हे कुणालाही - रंक असो की श्रीमंत, शिक्षित वा अशिशिक्षित - शक्य असते. अन अशा अगणित व्यक्ति या पृथ्वीतलावर नक्कीच आहेत यात शंकाच नाही. नाहीतर मानवजातीचा संपूर्ण संहार कधीच झाला असता.

इथे कोणी नाही स्वामी की सेवक; नाही कोणी पुढारी की अनुयायी; इथे संपतात पुराण अथवा आधुनिक अभिजात समाजांचे यमनियम, मग ते असोत संघटीत धर्मसंस्था की राज्यसंस्था की ज्ञान - विज्ञान - मंत्रज्ञान - यंत्रज्ञान यांचे दलाल; की असोत उच्चतम किताब - पदव्या - हुद्दे ; की असोत पांडित्याचे महामार्ग: सारे, सारेच गौण.

सृष्टीशी जेव्हा जुळते आपली तार तेव्हा आपण काव्य लिहित नसतो तर काव्य आपणास लिहिते. उदा. मी बासरी वाजवत नाही तर मला बासरी वाजवते। मग उरते फक्त एकच एक: या उपेक्षित दलित धरतरीच्या कुशीत काव्य जगायची पायवाट.

* * *

ब्लॉग म्हणजे चाव्ह्वाटा: याच्यावर पाहिलेल्या घट्नांचा काय अर्थ लावायचा याचे स्वातंत्र्य वाचाकाना असते. इथे कुणीही आपल्या प्रतिक्रया, शेरे / ताशेरे, वाद / प्रतिवाद, सूचना /आलोचना यांची नि:संकोच नोंद करावी. तेव्हा या लेखनाला संवादाचे स्वरूप येईल, नाही तर ते केवळ स्वगत रहातील.धन्यवाद.

¬¬¬¬¬
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 29, 2009

सृष्टीयोग


सृष्टीयोग
सृष्टीयोग म्हणजे निसर्गाचा - प्रकृतीचा - मार्ग, जो अनादी कालापासून अस्तित्वात आहे, अगदी सुसंस्कृत समाज अस्तित्वात यायच्या पूर्वीपासून.
सुसंस्कृत समाजानी अनेक योगांची उपासना केली, जसे ज्ञानयोग - विज्ञानयोग पासून ते कर्मयोग - भक्तीयोग ते हटयोग - तंत्रयोग इत्यादी.
वैदिक काळातील किंवा "एडनच्या बगीच्यातील" लोक कदाचित भरपूर फळे आणि मुबलक पाण्याने समृद्ध होते.
पण आम्ही मात्र कल्पनेने "सुजलाम् सुफलाम्" गात असतो पण कृतीत कमी पडतो.
आता इथेच सृष्टीयोगाची उपासना करण्याची - निसर्गाशी - प्रकृतीशी अंतर्बाह्य समन्वय साधण्याची घटका आलेली आहे. अस्तु.
(मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर )
-----------


"Srishtiyoga" -- Way of Nature – is an ancient unwritten law long before the birth of civilizatio. Civilizations have been following a number of Yoga practices, from Jnan Yoga – Vijnan Yog to Karma Yoga – Bhakti Yoga to Hatha Yoga – Tantra Yoga. People in the Vedic times or in the ‘Garden of Eden’ were perhaps blessed with plentiful of water and fruits. It is only our wishful thinking that we sing “Sujalam, Sufalam” - abundant water, abundant fruits – that falls short of action. It is time now for ‘Srishtiyoga’ – Communion with Nature.


~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 08, 2009

भुईगोलाचा पाठ

भुईगोलाचा पाठ

"पृथ्वीचा आकार कसा बरे बाळ",
सवाल गोऱ्या दिप्टी साहेबाचा.
"साहेब पृथ्वी आहे गोल गोल
सोमवारी - उरले दिवस चौकोनी
तपकिरीच्या डबीसारखी मास्तरांच्या. "
खर्रँ खर्रं सांगते पिंकी.

भुईगोलाचा चुकवून तास
आवडते मला खेळायास.
पोरे खेळतात घसरगुंडी
तालीम रंगीत आईबाबांच्या
प्राक्तानाची पुन्हा पुन्हा
रोजच्या रोज नियमाने.

तपकिरीचा भरण्यात बार
तल्लीन मास्तरांची मिटली नजर
चुकवून ठोकतो मी धुम्म;
मला आवडतो खेळ खुप्प
पिसाच्या मनोगोऱ्यावर चढायचा
गोल गोल उंच उत्तरेच्या
नि सातव्या मजल्यावरून झुकलेल्या
मारायचा सूर गंगेत दक्षिणेच्या.

त्या दिवशी झाले काय:
भुईगोलाच्या तासाला
तपकिरीची डबी गोल
घरंगळत आली सोमवारी
सह्याद्रीच्या पायथ्याशी.
खेळता खेळता पाय ठेवून
पिंकीच्या हत्तीने केली चपटी
रुपयाच्या गोलासारखी.

एका बाजूला छापा
गोरया गोऱ्या राजाचा,
दुसऱ्या बाजूला काटा
उजाड़ झाल्या सह्याद्रीचा.


त्या दिवशी गलिलीओ आला
तारकांच्या जगातून उल्केवर बसून
भूईगोलावर उतरला नि फुक्कट मेला
सह्याद्रीचा काटा उरात खुपसून.

----
रेमीजियस डिसोजा ( २ - १२ - २००२ )
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 22, 2008

माझी लक्तरांची पुंजी

बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तरांची पुंजी
राखलेली शतकांच्या
वाटचालीत
***
(भालप्रदेश, गुजरात )

लोथलच्या (जेथे इंडस - सिंधू - संस्कृतीचे अवशेष आहेत ) परिसरात अनेक वर्षे भटकताना हे जाणवले: तथाकथित प्रगत विसाव्या शतकात येथील भूमीचे पुनरुज्जीवन झाले नाही।

एक गोष्ट ऐकलीय: रोम जळत असताना रोम साम्राज्याचा बादशहा म्हणे फिडल वाजवत बसला होता । बलाढ्य रोम साम्राज्य आणि संस्कृति त्यानंतर लवकरच लोप पावली।

पुरातत्वशास्त्रात मला जरी रस असला तरी मी लोथल बघायला कधीच गेलो नाही। उगाच इतिहासाची प्रौढी मिरवण्यात काय तथ्य?

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 23, 2008

जीवनरेखा - Life-line (Image)


जीवनरेखा
मातीतून येई वर
एका आयुष्याचा दोर
गुंफीत जाई वळेसार
मातीच्या स्पंदनांचा
काळाच्या वेशीवर...
अनावर गर्दीत सभोवार
नाही कधीही होत धरतीला भार।

* * *
टीप: वळेसार (मालवणी) गजरा (मराठी)
---
(रेमीचे सौभाग्य असे की तो झाला असेल कधी ना कधी सभोवतालच्या माणसाना भार पण कधीही नव्हता धरतीला भार। इतरांचे माहीत नाही। अशी ही रेमीची नागडी उघडी कविता। )
~~~~~

© Remigius de Souza. All rights reservede.
Page copy protected against web site content infringement by Copyscape