Showing posts with label आदिवासी. Show all posts
Showing posts with label आदिवासी. Show all posts

December 26, 2013

शौचाचे परिवर्तन कशात होते?

शौचाचे परिवर्तन कशात होते?
संगीतमग्न वारली (आदिवासी)

निसर्गनीर्मित जीवमात्राने, प्राणी (त्यात अत्यन्त बुध्दीमान माणूस पण आला) आणि वनस्पती यानी केलेले शौच जीवनोपयोगी खत बनते.

पण गेल्या पाच हजार वर्षांच्या संघटित नागर समाजाच्या (civilized society) इतिहासात माणसाने केलेल्या शौचाचे परिवर्तन कशात होते?

पिरामिड - ताजमहाल पासून ते प्रचंड शहरे; ग्रंथ-पोथ्या-पुराणे पासून ते देवदास-स्लमकुत्रा करोडपती पर्यंत; अवकाशयानापासून सैपाक घरातील मिक्सर-ग्राइंडर पर्यंत सारे सारे काही मैल निर्माण करतात. . याला इंतरनेट - आंतरजाल - पण अपवाद नाही। नाही हा माझा ब्लॉग! या सर्व मैल्याचं परिवर्तन कशात होते?

हे सारेच सृष्टीतील सिमित ऊर्जा स्रोतांचा क्षणोक्षणी होणारा प्रचंड वापर संपूर्ण पर्यावानाला विनाशाकडे नेत असतात; एन्ट्रपीचा - प्रगतिरोधाचा नवा नवा उच्चांक गाठत जातात.

अलेक्झांड्रिया शहरात म्हणे एक प्रचंड लायब्ररी होती. विलायतेच्या परिसरात किरिस्ताव (Christian) आणि मुसलमान यांच्यात धर्मयुध्दे (जिहादे) चाललेली असताना हे ग्रंथालय खपले - जळून खाक झाले. पण कुणाचेच काही बिघडले नाही.

एवढे अवतार - प्रेषित झाले. आले. गेले. काही फरक पडत नाही. त्यांच्या नावाने प्रचंड उर्जेचा विनाश मात्र चालूच आहे: या ना त्या निमित्ताने. जो तो आपापला अंहकार गोंजारत असतो. त्यात मी पण एक.

पण सृष्टीचा आदर, कला आणि विज्ञान यानी माणसाला फार हातभार दिलेला आहे: लाख वर्षापूर्वी पासून; नागरी समाजाचा उदय होण्यापूर्वी. कला आणि विज्ञान ही काही पांढरपेशांची, भटोंची, गोऱ्या कातडीची मक्तेबाजी नाही.

सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजांच्या पाच हजार वर्षांच्या हाणामारीतून अजूनही तगून राहिलेल्या काही आदिम जमाती आहेत. त्यांच्याकडे अजूनही सृष्टीयोगाची मूल्यवान गुपिते आहेत. फक्त आमच्यामध्ये थोडासा नम्रपणा हवाय.

(टीप: १: माझ्या "यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - ३" या पोस्ट वर सतीश रावले यांची टिप्पणी वाचून सुचलेले काही विचार येथे मांडले.
२: वरील छायाचित्रात एकतारीच्या सूरात गाणे म्हणत असलेला तल्लीन वारली आदिवासी: मुंबईच्या मागील दारी. अधिक वाचा Warali Art
३: आनंद कुमारास्वामींच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकाचे परिक्षण माझ्या इंग्रजी ब्लॉग वर पाहा: LINK: )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 15, 2012

अर्वाचीन महाभारत-कुरूक्षेत्र भारतभर

दोन गाणी : प्रस्तूतकालीन महाभारताची समीक्षा


लोक-उर्जा संधारण 
 आर्थिक-तांत्रिक-ओद्योगिक विकासाच्या नशेत लोकाविकासाचे कुणाला भान?


मला'खो' देते 'हर्षदा' आणि मी समीक्षा करायला निवडतो पुस्तकाऐवजी एक विषय, ज्याला म्हणता येईल : "प्रस्तुतकालीन महाभारत-कुरूक्षेत्र"! हे पुस्तक वास्तव रुपात आपल्यासमोर आहे. त्याचे स्वरूप "मायावी वास्तवता", Virtual Realty, नाही. ही टीका मी पुढील दोन गाण्यात आटोपतो.

पहिल्या गाण्यात आहे सत्तेशी केलेला संवाद जो विफल होतो, आणि त्याचे स्वरूप केवळ 'स्वगत' उरते. दुसऱ्या गाण्यात पहिल्या गाण्यातील वैफल्याचे निदान केलेले आहे.


प्रगती = पंचम जगत भारताचा उदय
ही मुले मुंबईची काय आठवण घेऊन मोठी होतील ?

 

अलिखित अर्वाचीन महाभारत- कुरुक्षेत्राची समीक्षा 

गाणे १. स्वगत सत्तेशी (नाट्यछटा) :  सत्तेशी संवाद अशक्यप्राय


मी सत्त्याशी लुडबुड करू इच्छित नाही
वाटल्यास ते आपसूकच प्रगट होईल.
पण जेव्हा आम्ही विविक्षित तथ्य बोलतो
ज्यात मी गुंतलो आहे ते जाणणे माझा हक्क नाही का?
संवादात प्रतिसादाने बरोबरीचा हक्क नाही का?
किंवा कोणत्याही नात्याने — सर्व वाटांवर सर्वदा?
एक तथ्य उरतेच, जेव्हा मी विचारणा करतो
तेव्हा तू संवाद तोडतेस किंवा उत्तर टाळतेस.
कारण काहीही असो.

याला संवाद का म्हणावे? कि
याचा अर्थ माझ्याच खर्चाने माझी टवाळी?
तू माझ्या परिश्रमांची पैशाने किंमत देऊ शकतेस पण मोल नाही
(जर का तू कधी परिश्रमाचे मोल समजलीस तर
पुरवठ्याच्या बाजारी?).

मी नाही विकावू कि नाही भाड्याचा माल.
पसंत करीन मी तुला सोडचिठ्ठी देणे
देण्याहून औषधांची चिठ्ठी रोगांवर
ज्या जन्माला घालतात केवळ प्रतिक्रिया, प्रति-प्रतिक्रिया.
नाईलाज आहे! अशा लुडबुडींना येथे नाही वाव
केवळ एकच जन्म हा!
(नाट्यछटा हा प्रकार दिवाकर यांनी मराठीत आणला. नाटक-सिनेमात स्वगते येतात.)

 

गाणे २. माझे गाणे जन्मले... 


माझे गाणे जन्मले भूईत आणि जळांत,
पोसले वानसांनी, लोकानी अन प्रेमाने,
सत्तेच्या हवसेने वेड्या नागरी समाजांत,
अंध कोपाने जगणेच उध्वस्त करणार्‌या.—
गांडूळे, हिंस्र जनावरे बरी त्याहूनी !  


विश्राम अमूल्य विनामोल
श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही सृष्टीने समस्त जीवमात्राला दिलेली पाच स्वायत्त मूलभूत कार्यें. यात हस्तक्षेपाचा कोणत्याही मानवी सत्तेला अधिकार नाही (पहा : टीप 1).

  सत्तेचे अनेक अवतार

सत्तेच्या अनेक रूपांत लोकाशी सरकारपण गृहीत आहे. पण सत्ता कुठल्याही स्तरावर असू शकते, कुटुंबापासून समष्ठीपर्यंत. त्यांत शाळा-शिक्षक आणि विद्यार्थी, अगणित सार्वजनिक संस्था, कॉपोरेशन, पोलीस, आमदार-खासदार, नोकरशहा, इत्यादी सर्व आले. कुटुंब — नवरा आणि बायको, सासू-सासरा आणि सून, पालक आणि मुले यांच्या संबंधांतही सत्ता अवतार घेते.

अर्थात यात सत्ता आणि रयत, किंवा सत्तेसाठी संबंधितांचा संघर्ष आलाच. नागरी समाजात हा संघर्ष अपरिहार्य आहे. खरं तर सत्तेचे केंद्रीकरण हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे. नागरी समाजाच्या इतिहासात हे अव्याहत चालत आले आहे.

आणि या सत्तेने सत्तेसाठी केलेल्या संघर्षांत कितीक बलाढ्य नागरी संस्कृती नामषेश झाल्या, पण त्यांची रयत नव्हे. मात्र टिकून राहिल्या आदिवासी जमाती, ज्या आहेत सान प्रजासत्ताके, अनादी काळापासून... आजही!!


स्वावलंबनाला वेळूचा आधार
 यंत्रोद्योग = बहुसंख्य ग्रामीण जनतेच्या हस्तोद्योगांवर गाढवाचा नांगर आला. बांबू प्राचीन काळापासून भारतीय ग्रामीण जीवनाशी जोडलेला आहे, मग बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला?

या गाण्यांना काव्य म्हणता येईल का माहीत नाही ! ही आहेत रेमीच्या बोलीत राकट गावठी प्रेमगीते. येथे नाही अभिजात शैली, नाहीत अलंकार-उपमा, नाही शब्दांची वा कल्पनांची आतिषबाजी. शेतकर्‌याच्या पिंडाला अशी चंगळ परवडणारी नाही, मग ते पाणी असो की शब्द असोत.

एक प्रश्न उरतो. या रचनांना समिक्षा, टीका अथवा दुसर्‌या कोणत्या सदरात ठेवता येईल का? कोणत्याही सृजनशील अभिव्यक्तीत वैयक्तिक व सामाजिक यांच्या पलिकडे जाण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे यातील 'मी' नेहमीच गौण राहातो. दोन्ही गाण्यांचा विषय प्रेम आहे, पण हल्लीच्या रूढ (लैंगिक) अर्थाने नव्हे.  

प्रस्तुतकालीन महाभारत (कुरूक्षेत्र) आज काव्यात कोण लिहिणार, आणि वाचणार कोण? ते तर प्रत्येक व्यक्ती रोजच अनुभवते! मात्र त्याचे ऑपरेशन (कि डिसेक्शन, कि पोस्टमोर्टेम?) सुटसुटीत व्हायला काय हरकत! आजच्या परिस्थितीवर लेखातून, पुस्तकातून केलेल्या असंख्य टीका वेगवेगळ्या दालनात राहून केल्या जातात. कितिही प्रयत्न केले त्या अपुर्‌या राहातात. किंबहुना त्या जेवढ्या लठ्ठ तेवढ्या आकलनास कठीण.


अन्नपाण्यासाठी रयत दाही दिशा - जगण्यावर कर अनारोग्याचा
 चव्वलाच्या नादात पाणपोया वाहून गेल्या - हे रस्ते हे रस्ते


साधे उदाहरण : एकाद्या घटनेची, वस्तूची व्याख्या तिचे पूर्ण वर्णन करू शकत नाही. व्याख्यांच्या जागी समर्पक उदाहरणे सोईची होतात असं मला वाटतं! ... पाण्याची शास्त्रीय व्याख्या H2O असली तरी ते त्याहून अधिक असते. तुका म्हणे 'प्रयत्नें वाळूचे कण रगडीता तेलही गळे'. अर्वाचिन युगांत रूसी शास्त्रज्ञांनी भूगर्भातील खडकांना दाब देऊन पाणी काढले. दगडाच्या खाणीत मिळालेल्या स्फटीकाच्या पोकळीत पाणी असते. ऐकावे ते नवल!

अर्वाचीन युगाची व्याख्या मला माहित नाही. पण चार्ली चाप्लीनचा मूक चित्रपट Modern Times शब्दही न वापरता त्याची व्याख्या समर्पकपणे चित्रित करतो. ते पाहून आणि वारंवार आठवून मी मात्र अभिजात शैलीच्या शब्दजंजाळातून मोकळा होत गेलो.

अर्वाचीन महाभारत-कुरुक्षेत्र!  एवढा क्लिष्ट, अनेकांगी आणि विस्तृत विषय! या देशाची घटनाच लिहायला किती विद्वानांना किती वर्षें लागली? आजच्या सुधारलेल्या प्रगत समाजात कुठून मिळणार डिक्टेशन देणारा व्यास आणि लिहून घेणारा गणपती! प्राचीन काळातील कुरुक्षेत्र एकाच रणांगणावर होते. आज ते सर्व भारत व्यापून राहिले आहे. सामाजिक संधारण आर्थिक फॉर्म्युला लावून कसे होणार?

प्रेमावाचून दुसरा कोणताही पर्याय किंवा साधन किंवा अहिंसक शस्त्र हे ऑपरेशन करायला मला सापडले नाही!


आमचा पत्ता : मुक्काम - मुंबई, पोस्ट - इंडिया
आज सीमांत प्रदेश. उद्याचं ?माहित नाही

सरता पालव

इंडियन आयडल ६ च्या मंचावर पं. जसराज


टीवीच्या पडद्यावर सारा वेळ माझे ध्यान – कान आणि नजर – होते पंडितजींवर. कधीकाळी लोककलांतून अभिजात कलांचा – शिल्प, संगीत, नृत्य आदि– उगम आणि विकास झाला. अर्वाचीन काळातही पं. कुमार गंधर्वांनी ते केले. आजही लोकबोलीतला कबीर–तुकाराम अभिजात संगीताच्या गळ्यातला ताईत (रत्नहार नव्हे, तो राजे लोकांसाठी, तुकोबासाठी नव्हे.) आहे.

आता अभिजात संगीतातून बॉलीवुडच्या इंडिपॉप संगीताचा उगम झाला. त्याचा उदो करण्यासाठीच तर हा मंच आहे. आता त्यांच्या चालींवर श्रद्धाळू भजनं गातात. आता करूण-शांत-शृंगार रसांची जागा राजरोस बीभत्स रसाने घेतली आहे; हवा, जळ, जमीन, जीव ही प्रदुषित होताहेत.
या प्रदूषणाच्या जाणीवेवाचून कविता-कथा-कादंबरीची कशी सुटका होईल? मानवाने निर्माण केलेल्या सर्व प्रश्नांस उत्तरे आहे.कालचा व्यास नागरी समाजाच्या केंद्रित सत्तेचा कवी होता.

आजचे देशव्यापी "महाभारत आणि त्यात सतत चालले कुरुक्षेत्र" जेव्हा शंभर कोटी कवी लिहितील तेव्हा नागरी समाजाचे सत्तेचे केंद्रीकरण समाप्त होईल.

परिशिष्ट

आद्य महाभारतातील तीन प्रसंग


• एकलव्य – दुर्गा भागवत याला 'मोहरीतील ठिणगी' (व्यासपर्व) म्हणतात;
• लाक्षागृहातील कांड – संन्यस्थ कुंती गांधारी व धृतराष्ट्र ... रानाला लागलेल्या नैसर्गिक वणव्यात जळून मरतात, कुरुक्षेत्रानंतर...महाश्वेतादेवी (समीक्षा).
• खांडव वनाचा विनाश – राजधानी इंद्रप्रस्थ बांधण्यासाठी लावलेल्या वणव्यात वानसे, पशूपक्षी व नाग जमात भक्ष्यस्थानी पडतात. त्याचे पर्यवसान पांडवांच्या वंश-विच्छेदांत होतो – तक्षक जीवाणू (वायरस) होऊन परिक्षिताचा वध करतो.

आदिवासी जीवन 

भिल्लांची आगळी होळी

आदिवासींची संस्कृती किती प्राचीन असेल याची कल्पना नाही. पण आज ते काही प्राचीन वातावरणात राहात नाहित.प्रस्तुत कालीन नैसर्गिक आणि सामाजिक-राजकीय-आर्थिक-इ. पर्यावरणात, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते कसे टिकतात - sustain - याचं कारण ते निसर्गाशी संवाद साधून जगतात एवढं खरं!
ते  खरे सृष्टीयोगी !
भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य -१
त्यांना विश्राम विनामूल्य मिळतो. करमणुकीसाठी त्यांना सिनेमा, टीवी अशा कुबड्यांची गरज किंवा हवास नसते.
त्यांचा  होळीचा सण पाच दिवस चालतो.
बाजूच्या व खालील  फोटोत दीवासौ या सणाला या भिल्ल षोडशा उत्स्फूर्त नाच करताना. यावेळी मक्याचे पिक तयार झालेले आहे.



भिल्ल शोडषांचे उत्स्फूर्त नृत्य - २

वरील चित्रांतील आनंदी भिल्ल व इतर आदिवासींचे नागरी समाजाने गेल्या पाच हजार वर्षांत केलेल्या नुकसानाची परतफेड आजचे लोकशाही सरकार कधीतरी करू शकेल का?


आता मी 'खो' देतो 'सविता' (अब्द शब्द) आणि 'अत्यानंद' यांना. दोघंही मातबर ज्येष्ठ लेखक. शिवाय सावितादी प्रवासी आणि फोटोग्राफर आहेत. तर अत्यानंद (प्रमोद देव) हे शास्त्रीय संगीताचे व्यासंगी गायक आहेत; त्यानी माझी एक, वरीलप्रमाणे कोणत्याही सदरात न बसणारी, कविता - 'अशी कविता एक कोडे' - गाईली होती हे आवर्जून सांगावेसे वाटते.

टीप : १. श्रम - विश्राम - आरोग्य - अध्ययन - प्रजनन ही माझी मूळ लेखमाला अपुरी राहिली आहे. पण तिचे इंग्रजी भाषांतर Archetypes India माझ्या ब्लॉगवर प्रसिद्ध केलेय. त्याचा tag Work-Leisure-Health-Learning-Propagation.  ही माझी पुनर्शोधन (संशोधन नव्हे) मालिका आहे. त्याची स्फूर्ती, शिक्षण आणि दिशा मला माझे आदिवासी आप्तेष्ठ आणि आई-आजी यांच्याकडून  मिळाली.
२. नुकताच New Scientist या साप्ताहिकात प्रसिद्ध झालेला लेख Climate change: The great civilisation destroyer? अवश्य वाचावा. त्यासाठी नाव-नोंदणी Sign-in करावी लागेल. हा लेख मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. त्याची वर्ड-कॉपी हवी असल्यास इ-मेलने माझ्याशी संपर्क करावा.  

स्वातंत्र्यदिनानिमित्त | १५ ऑगस्ट २०१२ | मुंबई
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

August 15, 2011

कुरूक्षेत्रानंतर..., महाश्वेतादेवी (समीक्षा)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी । अनुवाद : वर्षा काळे । प्रकाशक : मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे । २०१० । किं. साठ रुपये ।

अनुवाद: वर्षा काळे यांनी इंग्रजी भाषांतर चपखलपणे मराठीत बसवलेय. कांही नवीन पण समजायला सोपे शब्द आजच्या परिस्थितीनुसार येतात हे स्वागतार्ह आहे. जसे: राजवृत्त (राजा?) लोकावृत्त (प्रजा?) हे तत्कालीन परिस्थितीला योग्यच आहेत; जो बळी तो राजा. जे दुर्बल ते प्रजा! असे अनेक शब्द संवाद - गाणी - वर्णने यांत येतात. आणि विशेष म्हणजे राजवृत्तातील व लोकवृत्तातील सारी माणसे एकच बोली बोलतात. 'लोकांच्या' तोंडीं गांवठी भाषा घातलेली नाही.
अवतरण -१ अनुवादिकेचे मनोगत, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अनुवादिकेचे मनोगत : ही प्रस्तावना प्रसंगानुरूप लांबी-रुंदी-खोलीसह आहे. हे महाश्वेतादेवींचे मराठीत पहिलेच पुस्तक असावे! वर्षा काळे यांनी लेखिकेचा, आपला व दोघांचा संबंध याचे पुरेसे वर्णन केलेले आहे. नाहीतर हे पुस्तक अपुरे राहिले असते.

महाश्वेतादेवी यांचे 'कुरुक्षेत्रानंतर...' हा अनुवाद अंजुम सन्याल यांनी केलेल्या 'After Kurukshetra' या इंग्रजी भाषांतरावरून केलेला आहे. त्यांचे साहित्य, भाषांतरीत का असेना, मी पहिल्यांदाच वाचत होतो.
त्यांच्याविषयी - त्यांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्याना मिळालेले पुरस्कार यासंबंधात - वर्तमानपत्रांत येणार्‌या बातम्या वाचत होतो. पण मुद्दाम शोधून कथा-कादंबर्‌या वाचणे मला जमत नाही. व सहज हाती आलेले साहित्य दर्जेदार असले तर मी वाचायचे टाळीत नाही.

प्रस्तुत समीक्षा एक मुक्तचिंतन
 महाश्वेतादेवींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे फलीत काय झाले वा होतेय किंवा होणार हे माहित नाही, पण कोणीही कल्पना करू शकेल.

'कुरूक्षेत्रानंतर...' यांत तीन कथा आहेत. महाभारत-युद्धाने केलेल्या संहारानंतर राजवृत्तातील व लोकवृत्तातील स्त्रियांच्या अवस्थेवर या कथा आहेत. त्या उत्तरा, कुंती आणि सौवाली यांच्या भोवती गोवलेल्या आहेत.

या कथा राजवृत्त, उच्चभ्रू (elite) समाज व लोकवृत्त, शूद्र / आदिवासी (peasant /aborigine) जमाती यांच्या स्त्रियांना जोडतात, आणि दोन समाजांतील सांस्कृतिक (cultural) द्विभाजन (dichotomy) दाखवतात.
आज  हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत असलेले तर दिसतेच आहे आणि विकोपास जातेय हेपण दिसते.

पहिली कथा: 'पंचकन्या': उत्तरा ऐन तारुण्यात विधवा झालीय, अवाक, विमनस्क आहे. तिला रिझवायला भग्न रणांगणावरून पांच तरुणी तिच्या सख्या होतील या अटीवर आणल्या जातात; त्या दासी म्हणून यायला तयार नसतात. त्या उत्तरेच्या वयाच्या होत्या. त्यापण या युद्धात विधवा झाल्या होत्या, आपल्या पतींची कलेवरं शोधायला कुरुजंगलातील त्यांच्या गावातून आल्या होत्या.

अवतरण-२  'पंचकन्या', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अवतरण-३  'पंचकन्या, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
राजवाड्यातील सर्व विधवा ज्या व्रतस्त आहेत आणि आदिवासी विधवा ज्यांना भविष्य आहे. अशी ही कथानकाची अत्यंत युक्त व परिणामकारक मांडणी आहे.

दुसरी कथा: 'कुंती आणि निषादीन' (निषाद आदिवासी स्त्री). वारणावत नगरातील लाक्षागृहात आपल्या पांच मुलांसह एक निषादीन आदिवासी स्त्री, कुंती व पांडवांच्याऐवजी जळून मेली होती. ही कथा सर्वांना माहित आहे. पण तिचे विश्लेषण येथे येते जे नजरेआड राहिले होते.
कुंती वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासह अरण्यात राहात होती. त्या निषादिनीची ज्येष्ठ सून तिला शोधून काढते. ती कुंतीला तिच्या कपट कारस्थानाची आठवण करून देते व जाब विचारते. पण ती निरुत्तर होते.

तिसरी कथा : 'सौवाली' ही वैश्य स्त्री धृतराष्ट्राची दासी होती. त्यांचा अनौरस मुलगा सौवाल्य जो युयुत्सू नावाने ओळखला जातो. युद्धात तो पांडवांना जावून मिळाला होता.

अवतरण-४  'सौवाली', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
'सौवाली' या कथेत कुंती, गांधारी व धृतराष्ट्र रानातल्या वणव्यात जळून मेले. व युयुत्सूने बापाचे तर्पण केले. (लेखिकेचे संदर्भ- 'महाभारत सरनौबत', लेखक - राजशेखर बसू। सौवाली: संदर्भ- 'पौराणिक अभिधान', लेखक- सुधीनचंद्र सरकार)

या कमीअधिक लांबीच्या तीनही पौराणिक कथेत लेखिकेने तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वातावरण निर्माण केलेले आहे. शब्दांचा मितव्यय डोळ्यांत भरणारा आहे.

महाभारत वाचताना तत्कालीन वातावरण आपल्या ध्यानात- नजरेसमोर क्वचितच येते. तत्कलीन लोकसंख्या किती असेल हा विचारपण आपल्या मनास कधी शिवत नाही. किंबहुना आपले लक्ष गोष्ठीत गुंतलेले असते.

लेखिकेला हे कसे साध्य झाले याचे कारण ती नागरसमाजाचा एक भाग आहे, व तिचा आदिवासी जमाती व लोकसमुहांचा व्यासंगपूर्ण अभ्यास. आदिवासी प्रागैतहासिक काळात आजही रहात आहेत असं म्हणता येणार नाही.

आदिवासी संस्कृती जतन करायचा वैश्विक वारसा
पण त्यांची सांस्कृतिक मूल्ये व जमातीचा एकसंध आकारबंध मात्र अबाधित आहेत, जी त्याना निसर्गमातेशी जोडून ठेवतात. पांच हजार वर्षे सर्व जगभर नागरसमाजांनी केलेल्या उच्छेदांतूनही ते टिकून आहेत त्याचे हेच कारण. गेल्या पांचशे वर्षांत मात्र वसाहतवाद्यांनी अनेकांचे शिरकाण केले.

या कथांत आदिवासींची निसर्गाशी संवाद साधून राहाण्याची धारणा व जीवनरीती (जीवनशैली नव्हे) ही त्यांच्या घर-परिसराची प्रसंगोचित वर्णने, संभाषणे, गाणी,  प्रसंगयोजना यांतून लेखिकेने सूचकपणे दाखवली आहेत.

त्याचबरोबर युद्धाच्या भीषणतेचे सम्यग दर्शनपण येथे आहे! खरं पाहाता पहिले व दुसरे जागतिक महायुद्धें, गेल्या शतकात जगभर झालेली अनेक युद्धें, कलिंगचे युद्ध, पानिपतचे युद्ध आणि या पौराणिक यद्धांत काहीच लाक्षणिक फरक नाही.

फक्त एकदा वेगळे घटित घडले : सम्राट अशोकाची उपरती व मन:पालट. अन् त्याचा इ. स. दोनशे वर्षांपूर्वीचा अहिंसक वसाहतवाद! अनन्यसाधारण!

महाभारत एक कालातीत ((timeless) कृती! त्याची आतापर्यंत अनेक रूपांत, माध्यमांत - दशावतारापासून कार्टूनपर्यंत - कोट्यवधी पारायणे जगभर झाली असतील.

या तीन कथा मात्र त्यांतील एका दुर्लक्षित भागावर नजर टाकतात. हा आहे आदिवासी संस्कृती आणि नागरी समाज यांतील द्वैत (dichotomy) व त्यांतून निर्माण होणारा संघर्ष.

तसं पाहिल्यास एकलव्य, नागवंशी आदिमजमातीच्या निसर्गनिवासाचा, खांडव वनाचा, विनाश आणि त्याचे पर्यावसान म्हणून पांडवांचा झालेला कुळक्षय या ठळक कथा अनेकांस माहित आहेत. पण तत्कालिन नैसर्गिक व सामाजिक पारिस्थितिकीवर होणार्‌या परिणामांचा विचार कोणी केला असल्यास माहित नाही.

मानववंश व पुरातत्व या शास्त्रांचा उदय गेल्या दोन शतकांतला. आपल्या देशातील बहुतत्वी समाजाला 'मानववंशशास्त्र' या विषयाचा अभ्यास शिक्षणाच्या सर्वच शाखांत अत्यंत निकडीचे आहे. विषेशतः इतिहास विषयात याचा सर्व शैक्षणिक स्तरांवर समावेश केला पाहिजे. सरकारी अंमलदार-दरकदार-सांसद-आमदार-खासदार यांस विशेष धड़े देण्याची व्यवस्था करायला हवी!

आजच्या सुशिक्षितांसाठी आधुनिक शिक्षणाची गरज 
पर्यावरणाच्या शास्त्रोक्त विचाराला चालना मिळाली ती गेल्या पन्नास वर्षांत. पण प्राणी व वानसें मात्र पर्यावरणासंबंधांत अज्ञान नसतात; नवजात बालकपण संवेदनशील असते. कृषीवलांचा तर पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्याशी रात्रंदिवस संबंध येतो, भले ते उच्चभ्रू वर्गासरखे वाचाळ नसतील!

आमच्या सरकारने तर आता इयत्ता पहिलीपासूनच पर्यावरण हा विषय शिकवायला सुरवात केलीय. खरं पाहता पंतप्रधान-मुख्यमंत्र्यापासून ते पटेवाल्यापर्यंत सर्वांसाठी या विषयाच्या खास सक्तीच्या शिकवण्या द्यायला हव्या. मग प्रगतिची कोणत्या क्षेत्रात अधिक गरज आहे ते सरकारला थोडेफार कळेल.

महाभारतातील एक अवतरण वाचलेले आठवते. पांडव अज्ञातवासात होते. ते वनात रहात असताना तेथल्या ऋषीँनी त्यांना सांगितले, "त्या वनांत त्यानी एकाच जागी तीन दिवसांहून अधिक काळ वसती करू नये. नाहीतर वनाचे — जळ-जमीन-वानसे-वनचर — नैसर्गिक संतुलन बिघडते."
हे अवतरण अर्थातच सर्व युगांतील व प्रदेशांतील सरकारांना उद्धेशून आहे. पण व्यवहारात याचा उपयोग फ़क्त अवतरणापुरता मर्यादित राहतो.

दुर्गा भागवत, लेखक व मानववंशशास्त्रज्ञ, यांनी अदिवासींचा अभ्यास व संशोधन त्यांच्या परिसरांत जाऊन केले होते, व बरंच साहित्य पण इंग्रजी व मराठीत लिहिलं. त्यानी आदिवासींच्या लोककथापण मराठीत आणल्या. दुर्गा भागवतांनी 'व्यासपर्व' या पुस्तकात लिहिलेली एकलव्याची व्यक्तिरेखा (मोहरीतली ठिणगी) आठवणीत कायम लेणं कोरून राहिलेली आहे.

महाश्वेतादेवींच्या या तीन कथा ('कुरूक्षेत्रानंतर...') आपले स्थान ध्रुव तार्‌यासारखे कायम करतात. कारण साधेच आहे : उत्तर/ दक्षिण/ पूर्व/ पश्चिम, कोठेही गेलो तरी ही अवस्था अनेक अवतारानी सतत नजरेस येते. मानवतेची नागरी संस्कृतिच्या शापातून कधी सुटका होईल माहित नाही?

टीप: आदिवासी घर व परिसर (पहाः Tribal Housing and Habitat -1) या विषयाचा, आणि त्या अनुषंगाने येणारी इतर अंगांचा (पहा:TRIBAL SKILLS - आदिवासी हुन्नर), अभ्यास मी काही वर्षें केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. त्याची नोंदणी नंतर केली. या पुस्तक-परिक्षणाची पाळेमुळे माझ्या या स्वतंत्र अभ्यासात आहेत आणि त्याचे श्रेय सर्व आदिवासी जमातींना जाते.

रेमीजीयस डिसोजा
१५ ऑगस्ट २०११ 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 03, 2011

इंडिया, भारत की गोंडवन?

इंडिया, भारत, हिंदुस्तान, आर्यावर्त, तामिलनाडू की गोंडवन ?
Image 1: Bhill children at Holi festival in Satpuda Ranges, Gujarat
इंडियातील आदिवासी धनुर्धर आजमीतीपर्यंत 
आपल्या अंगठ्याचा वापर करीत नाहीत. 
हे एकलव्याचे जिवंत स्मारक आहे म्हणा, किंवा अलिखित इतिहास म्हणा.

स्वातंत्र्यानंतर देशाचे नांव काय असावे यावर वाद किंवा चर्चा झाली होती असे कधीतरी वाचनात आले होते. आता एवढेच आठवते. तपशील आठवत नाही. त्या चर्चेत अपघाताने पण 'गोंडवन' असणे शक्यच नव्हते. पण एक लक्षात आले: कोणीही आपापल्या सोईप्रमाणे, प्रसंगानुरूप इंडिया, भारत किंवा हिंदुस्तान कोणत्याही नांवाचा उपयोग करतात.

पण देशातील सूज्ञ नागरिक, पुढारी, इतिहासतज्ञ, विद्वान मंडळीने 'इंडिया' व 'भारत' अशी दोन नांवे का घ्यावी? यातला तर्क, शहाणपण, व्यवहार, भावना, निकष काय असतील हे माझ्या अल्पमतीस कधीही न सुटणारे एक कोडेच आहे. किंवा त्यांच्यापुढे काय पर्याय होते हे पण मला नाही. ही माहिती असेल सरकारी दप्तरी कुठेतरी पिचत कड्याकुलुपात!

इंडिया हा 'हिंद' या फारसी शब्दाचा अपभ्रंश असावा. 'सिंधू' नदीच्या नांवावरून 'हिंदू' हा फारसी शब्द आला. तसेच 'इंडिया' शब्दाचे 'भारत' हे भाषांतर नव्हे. पण ते जाऊदे. प्रश्न असा कि दोन नांवे का? हे लक्षण द्विधा मनस्थितीचे की दुटप्पी धोरणाचे की न्यूनगंडाचे? 

शेजारचा छोटा देश श्रीलंकापण ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होता. पण 'सिलोन' हे नांव बाजूला सारायला त्याना काहीच अडचण आली नाही. 'पूर्व बंगाल'ने 'पूर्व पाकिस्तान' बाजूला सारले व 'बांगलादेश' ही ओळख शाबूत ठेवली.

मग आमचें घोडें कोठे अडलें? खरं पाहता आम्हाला इतरांच्या, विशेषतः गोर्‌यांच्या प्रशस्तिपत्रांची व मान्यतेची फार गरज व हौस असते. आणि नांवांची (व्यक्तिपुजेची), नांवे बदलायची व नांवे ठेवायची पण!

मात्र 'इंडिया' हें नांव आमच्या राजकीय व बौध्दिक गुलामगिरीचे स्मारक म्हणून चालू ठेवले असावे. स्वातंत्र्यानंतर नजरेस पडणारे विदेशी आयात मालाचे आम्ही करीत असलेले लांगूलचालन पाहिले तर हें शक्य आहे. काय करणार? इतिहासावर आमचे फारच प्रेम!

भाषाशास्त्रावर एक मराठी पुस्तक चाळत होतो. मराठी आर्यभाषा आहे  व संस्कृत - प्राकृत - मराठी या क्रमाने मराठीची उत्क्रांती झाली असा त्याचा रोख होता. (मला वाटते या गृहीत प्रमेयावर हे पुस्तक आधारलेले असावे.)
Social and Cultural sub-groups in India
नकाशा-१ इंडियातील  सांस्कृतिक विविधता
पण आर्य येण्यापूर्वीं या देशात भाषा नव्हत्या का? इतर संस्कृती व समाज नव्हते का? यांचा उल्लेख नाही. हे पुस्तक मराठी भाषाशास्त्रावर असल्याने त्याला सहाजिक मर्यादा आहेत. तरीही हा अनुल्लेख खटकला.

तसेच काहीसे आपल्या देशाचे नांव ठरवताना झाले असावे! या संदर्भांत देशाच्या इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती इत्यादींच्या वैविध्याचे भान राहिले नसावे असे वाटते. सारें चित्त भावनातिरेकाने आर्य संस्कृतीभोवती फिरत राहिले असणार!

देशाचे नामकरण: वस्तूनिष्ठापूर्वक हाताळायचा हा विषय. मुळात सर्व देशातील विस्कळीत राज्यांना व प्रदेशांना इंग्रजांनी एकत्र आणून 'राष्ट्रा'चा आकार दिला. (पुरातत्वशास्त्र आणि मानववंशशास्त्र या वेळेपावेतो नांवारूपास आलीं होतीं हे पण ध्यानात घ्यायला हवे.) 
नकाशा २ : वैदिक कालीन भारत (लेखक माहित नाही)
विंध्याच्या उत्तरेस असलेल्या भागास फारसी भाषेने "हिंदुस्तान" हे नांव दिले. 
"हिंदू" हा शब्दच मुळी फारसी आहे.

सिंधू नदीच्या परीसरात सिंधू संस्कृती (Indus Civilization) 3000 इ. स. पूर्वी होती. ती संस्कृती गेली, पण माणसे राहिली. महान साम्राज्ये / संस्कृती लोप पावतात, पण सामान्य माणसे राहतात. इतिहासाचा हा साधा धडा आहे. नाहीतरी आज आर्य  व वैदिक संस्कृती आहेत कुठे? आज जे काही दिसतेय ते केवळ विडंबन असावे?

आर्य येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती, द्रविड संस्कृती, व त्यांच्याही फार पूर्वीपासून आदिवासी जमाती [aborigine communities] होत्या. त्यांना भाषा व संस्कृती होत्या अन आजही आहेत.

खरं पाहता मानव [Homo Sapiens] अस्तित्वात आल्यापासूनच त्याला भाषा व संस्कृती या देणग्या सृष्टीने दिलेल्या आहेत. आणि स्थळ-काळ-पर्यावरण परिस्थितीनुसार आपल्या राहाणीत बदल वा परिवर्तन करण्याची त्याला अक्कलपण दिलेली आहे.

जगातील सर्व आदिवासींची जीवन प्रवृत्ती निसर्ग-संवादी आहे. रूढ शब्दांत सांगायचे तर हजारो वर्षें ध्यानीं-मनीं-अंगीं-अंतरीं भिनलेली ही धार्मिकता [religiousness] आहे, सहजधर्म आहे; नागरी समाजांना अभिप्रेत असलेला धर्म नव्हे.

यामुळे नागरतेने [civilized societies] वेळोवेळी अनेक प्रकारे केलेल्या उच्छादांतूनही आदिवासी आजतगायत टिकून आहेत. निसर्गनिवासी आदिवासी प्राग्-ऐतहासिक जमान्यात राहात नाहीत. पण त्यांची काळाच्या परिक्षेत तावून सुखालून उतरलेली असामान्य जीवनप्रेरणा [जीवन-शैली नव्हे] अटळ आहे.

पण आदिवासींचा निसर्गनिवासी परिसर, व त्याचे पर्यावरण हिरावून घेणे किँवा त्यांचा विनाश करणे म्हणजे आदिवासींना जीवे मारणे; त्यांचा खून करणे एवढाच त्याचा अर्थ होतो.

रूढ कायद्याने हे मान्य असेलही पण 'न्याय्य' नाही. नागरी जीवनशैली त्याच्यावर लादणे हा अन्याय आहे, अधर्म आहे, धार्मिक अत्याचार आहे.

सृष्टीच्या नियमांत, नागरी संस्कृतींच्या सनातनवादी धेंडाना जागा नाही. किंबहुना मानवाने निर्माण केलेल्या उच्च-नीच इ. अधिश्रेणीना पण कांहिही स्थान नाही. अशा संस्कृती भूतकाळात जमा होतात. इतिहास याला साक्षी आहे.

इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाला अनेक वस्तूनिष्ठ व व्यक्तीनिष्ठ मर्यादा असतात. तत्कालीन कार्य-कारण, साध्य-साधन यांच्या अवशिष्ठ परिणामांनी इतिहास आपल्यासमोर सतत साक्षात उभा असतो. तो निस्पृहपणे वाचायची हिंमत आणि क्षमता हवी.

भूशास्त्रिय कालात [geological time] पृथ्वीवर सतत उलथापालथ होत असते. पण ती दृष्टीस पडतेच असं नाही. पृथ्वीच्या इतिहासात जमिनीचा एक अधिभूखंड [super-continent] सुटा झाला आणि त्याचे पांच भूखंड होऊन पसरत गेले. हेच आजचे दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. इंडिया. आफ्रिका व अंटार्कटिका होत. परंतु अधिभूखंडात असलेली इंडिया आजची नव्हती. ती होती दक्षिणेचा तिकोनी भाग - दख्खनचे पठार. त्यावेळी उत्तर इंडिया व हिमालय अस्तित्वात नव्हते.
Gondawana in History of Earth (Source: scotese.com) 
नकाशा ३
Eduart Suess, [1831-1914] या ऑस्ट्रियन भूशास्त्राज्ञाने या महाभूखंडाची सिध्दांत-कल्पना मांडली होती व त्याला 'गोंडवनलँन्ड' - Gondwanaland - हे नाव दिले [इ. स. 1861].
 
गोंडवन मध्य भारतात आहे. येथे गोंड आदिवासी जमाती हजारों वर्षांपासून राहतात. अजूनही येथे घनदाट जंगल आहे. एडवर्डचे हितसंबंध इंडिया, गोंडवन किंवा गोंड आदिवासी यापैकी कशातही गुंतलेले नव्हते. तो तर जगाचा नागरिक होता.
गोंडवनाचे मध्य भारतात/इंडियात  स्थळ
नकाशा ४

Map of Central Provinces (1903 AD) shows Gondwana
नकाशा ५: या नकाशात इंग्रजानी "गोंडवन" दाखवले आहे. 
परंतु इंडियाच्या आत्ताच्या नकाशात मात्र हा एकमेवाद्वितीय प्रदेश दाखवलेला नाही किंवा त्या नावाचा उल्लेखपण केलेला नाही. एवढं कारण इंडियाचे आजचे राजकरते किती कोत्या बुध्दीचे व वंशवादी (racist) आहेत हे दाखवायला पुरेसे नाही का?

एका बाजूला निधर्मी राज्याची ग्वाही देत असता, आधुनिक इंडियाने किंवा 'प्रथम जगत इंडियाने' आर्य वंशवादाचा वारसा कसा चालू ठेवला आहे त्याचा हा एक मासला! सर्व आदिवासी जगताला - चतुर्थ जगत इंडियाला - अनुल्लेखाने मारले.

इंडियाच्या घटनेत हे शब्द आहेत, ‘India that is Bharat'. आतापर्यंत घटनेत चौर्‌याण्णव वेळां दुरूस्त्या केल्या. आणखी एक केली तर फार होणार नाही. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या 'Land Acquisition Act' या जुलमी कायद्यात मात्र आतापर्यंत जेमतेम दहा वेळां दुरुस्त्या झाल्या. आता हा कायदा नव्याने लिहितायत असे ऐकिवात आहे.

भारतीय गणराज्याची साठी उलटली. बरं आहे. सुप्रीम कोर्टाला तरी, उशिराने का होईना, जाग आली. तारिख १२ जानेवारी २०११ रोजी मध्यवर्ती न्यायालयाने दिलेल्या निकालात आदिवासींच्या संदर्भात पहिला व महत्वाचा निर्णायक टप्पा गाठला.(संदर्भाचा दुवा पाहा:India, largely a country of immigrants says Supreme Court of India)

हे झाले 'न्याय देणार्‌या सरकारचे' काम. आता राहिले 'कायदे करणार्‌या सरकारचे' आणि 'अंमलबजावणी करणार्‌या सरकारचे' काम. हे अधिक कठिण आहे.

मानसिक अवरोधाचा [mind block] अडसर दूर करणे, मोडणे सोपे नसते. भूखंडाच्या सीमा बदलतात; नद्यांची पात्रे बदलतात; सागराचे किनारे सरकतात; सपाट जमिनीच्या जागी पर्वत येतात; देशांच्या सीमा बदलतात. बलाढ्य सोविएट देशाची शकले होतात. नांवात काय आहे? 

नांवांपासूनच स्वतंत्र इंडिया/भारत देश ऐतहासिक चुका करीत आला. या चुकांची दुरूस्ती करायलाच हवी. म्हणजे पुढे करू घातलेल्या / पुढे होणार्‌या चुका टाळता येतील. याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर दूरगामी परिणाम होतीलच - जसे सनातन्यांचे विरोध, व विचाराना नवी दिशा - आणि या देशाचा सन्मान हिमालयाप्रमाणे उंचावेल! [29] एडवर्डने "गोंडवन" या गोंडस व यथार्थ नावाने दिडशे वर्षांपूर्वीच या महान देशाच्या नावाचे सूतोवाच केलेय. फक्त एका घटनादुरूस्तीचा शिक्का मारायचा एवढेच काम राहिलेय!

येथून पुढे भौतिक व नैतिक चुकांच्या दुरुस्तीची मालिका सुरू होते. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्यापारशास्त्र व इतर विषयांवर, थोरांसाठी व लहानांसाठी, नवी पाठ्यपुस्तके लिहिणे आलेच. देशातील कोट्यवधी सुशिक्षित व साक्षर-निरक्षर बेकाराना काम-रोजगार मिळेल. देशातील शेकडो भाषांना फुलाफळांचा बहर येइल. अंतराळात अवकाशयान पाठवण्यापेक्षा हे काम जास्त "गरजेचे" व "कमी खर्चाचे" आहे.

'कमळ' हे राष्ट्रिय फूल! ते खरोखरच सहस्र पाकळ्या धारण करील. मग त्यावर सत्यार्थाने सरस्वती विराजेल. आता जो वानसांचा व वनांचा विनाश होतोय त्याला थोडाफार आळा बसेल; वनवासींना अन किसानाना फक्त बोलाचे नव्हे तर खरोखरीचे "सुजलाम सुफलाम" दिवस बघायला गवसतील अशी अशा करुया!


टीप: वर दिलेले नकाशे इंटरनेट वरून घेतलेले आहेत. नकाशा -१  "सेमिनार" (नवी दिल्ली) या मासिकाच्या मुखापृष्टावरून नक्कल केलेला आहे. आदिवासी मुलांचा फोटो लेखकाने चाळीस वर्षांपूर्वी काढला होता.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape