March 27, 2009

"सावित्री": लेख़क पु. शि. रेगे


पु. शि. रेगेंची "सावित्री" [टीप १] वीस वर्षांपुर्वी वाचली तेव्हा तिने माझ्या मनाची एकतारी छेडली. मधल्या काळात अनेकदा वाचली. आजही ती तेवढीच नविन आहे, आणि युक्त पण.

त्यातली नायिका सावित्री किंवा साऊ अनन्यसाधारण बाई आहे, जशा शरत्चंद्र चटर्जींच्या बाया (पाथेर दाबी, शेष्रप्रश्न इ. कादंबरयात). अर्थात अनन्यसाधारण व्यक्तिंची तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही.

सावित्रीने "त्याला" लिहिलेली ३९ पत्रे ३९ प्रकरणांत ११७ पृष्टावर मावतात. प्रत्येक पृष्टावर फार तर पंधरा ओळी. स्थळ: तिरुपेट, कूर्ग; सायमा मोटो (बोट); क्योटो, जापान; आणि पुन्हा तिरुपेट, कूर्ग. काळ: एप्रिल १९३९ ते जून १९४७; स्वातंत्र्य संग्राम आणि दुसऱ्या महायुध्दाचा काळ.

आजच्या SMS च्या जमान्याला लाजवेल अशी ही पत्ररूप लघुकादंबरी- सर्वार्थाने अर्थपूर्ण: तळहाताएव्हढे (४.२५" x ६.४'), खिशात मावेल असे आणि तुमच्या खिशाला अन वेळेला परवडेल असे पुस्तक.

"सावित्री" एक वेगळी प्रेमकथा आहे: सावित्री लिहिते, "प्रेम, प्रीती, अनुराग यांसारख्या शब्दांची मला अपूर्वाई वाटत नाही" (पृ. ३६). पुढें ती एकदा लिहिते "आज तुमचं ओळखीचं लाडकं अक्षर घेऊन मी मला मिरवलं" (पृ. १००, प्र. ३४).

पुस्तकात कुठही "त्याचं" नाव येत नाही. पण त्याचं व्यक्तिमत्व मात्र नजरेसमोर येते. सूचकता पण या कादंबरीचं विशेष. त्यामुळे वाचकाच्या सर्जनशिलतेला कितीतरी मोकळीक मिळते. अर्थात "गाइडबुके" वाचून ज्यांचे शिक्षण झाले त्याना थोडेसे अवघड जाईल. पण थोडेसे परिश्रम वाया जाणार नाहित. वाचताना जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा रसग्रहणाने मिळणारा आनंद अजोड आसतो. त्यात वाचकाच्या  सर्जनशीलतेला वाव मिळतो. ते मोजायला कोणतीही फूटपट्टी नाही.

"लच्छिचा मोर" आणि "गाणारे झाड"

कादंबरीत इतर उपकथा- कथानके आहेत. त्यातलेच लच्छीच्या मोराचा नाच (प्र.१) आणि गाणारया झाडाचे नाटक (प्र.२७) ही कथानके. यांचे प्रयोग कुणीही करू शकेल: घरात, गल्लीत, शाळेत, महाविद्यालयात, गावढ्यातील आळीत, जंगलातील आदिवासींच्या वाडीत; स्थानिक मुले माणसे. नाच, गाणी, संवाद आपले आपणच तयार करायचे - रचायचे. माझ्या जन्मगावी पिढ्यान पिढ्या चालत आलेली हजारो "दशावतारी" नाटके याचा उत्तम नमूना आहे.

सर्जनशीलता, पर्यावरण आणि चारित्र्य हे या कथानाकांचे मूलभूत पर्याय. विशेषत: इंडियातील हजारो आदिवासी जमातीना ही दोन्ही कथानके फारच भावातील यात शंकाच नाही.

आवाहने अणि आव्हाने

पहिल्याच पत्रात सावित्री लिहिते, "मोर हवा तर आपणच मोर व्हायचे (पृ. ४). रेगे इथे सुचवत असावे: तात्पर्य, अर्थ ठरवायचे स्वातत्र्य वाचकाला असते. किंवा कलानंद - जीवनानंद या संदर्भात आशा, आकांक्षा, अपेक्षा यांची पण ही आलोचना असावी! उदाहरणार्थ:

"And I have begun to feel that this is possible only if we give up the catagories we have built into our mind and its ways of thinking -- catagories of time, of space and all manner of social and personal habits which we call values" (पृ. ७३-७४).

"विश्लेशणानं कांहींच साधत नाहीं" (पृ.१०४). मला वाटते विश्लेषण ही विज्ञानाची पृवृत्ति, तर संश्लेषण (synthesis) ही कलांची पृवृत्ति, मग ती शेती (भातशेती वगैरे) असो की काव्य, शिल्प, नाच, संगीत असो. भातशेतीला मात्र शिष्ठ लोकांनी कलेचा दर्जा दिलेला नाही यात त्यांचे अज्ञान मात्र दिसून येते.

"प्रश्नोत्तराने कधींच कांहीं निकाल लागत नाहीं" (पृ. ९१). (see Link: The Slumdog Millionioare Laugh: Review)

"एखादा शब्द किंवा वाक्य फिरवून ती सहज त्याला अर्थांकित करी. तुम्ही मनांत आणलंत तर ही स्थळं हुडकून काढू शकाल." (मनांत आलं, रेगे मलाच सांगतायत.)

'कलेसाठी कला' अशी एक टूम विलायातेत आली होती। तिचा उदो उदो इंदियन काही कमी नसतील. भारतीय पारंपरिक कलेचे मात्र तसे नव्हते. या संदर्भांत आनंद कुमारस्वामीना उध्दृत करतो (मूळ इंग्रजीत):

“Modern pragmatism, of course, deals with the bastard truth of facts, according to which, we expect (though we do not know) that the sun will rise tomorrow, and act accordingly: Hence, also, the modern concept of art as a merely aesthetic experience”, (Anand Coomarswamy, “Time and Eternity”, Select Books, Bangalore, 1989, p 5).

ही कादंबरी भारतीय अभिजात संगीताप्रमाणे आरोह अवरोहातून जाते. एकविसाव्या प्रकरणात दहा परिच्छेदांत एक काव्यमय गद्य आहे -- असे काव्य साऱ्या कथेत जळींमळीं (मालवणी शब्द: जळांत - मळ्यांत) आहे. रेगे पत्राचा शेवट लोककथांच्या थाटात करतात: "कुणाच्या तरी साठ संभाळलेल्या प्रश्नांची हीं पांच संगतवार उत्तरं" पृ.४४).

------
टीप: १. "सावित्री", लेखक पु. शि.रेगे, प्रकाशक: मौज प्रकाशन गृह, तृतीय आवृत्ति, सन १९८२, किंमत बारा रुपये

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 23, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

तंत्र युग (Technology Age)

सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध असावा असे वाटत नाही. पण जास्त खोलात जावेसे कधी वाटले नाही.

रोज सकाळी अंगणात शेण सडा सारवून रांगोळी घालण्यापासून सैपाकघरातील असंख्य क्रिया तंत्र विधीच आहेत. हा ब्लॉग लिहिणे पण तंत्राचा भाग आहे. कारखान्यात लेथ मशिनावर वेगवेगळ्या इंजीनाना लागणारया हजारो भागांच्या हजारो नकला तयार केल्या जातात. हे पण तंत्र आहे. झोपडी, गगनचुंबी इमारत, शहर - नगर बांधणे ... हे सारे तंत्र विधी आहेत. अण्वास्त्रे, बंदुका, युध्ये- महायुध्दे हे सारे आधुनिक "जारण-मारण-तंत्र" विधीच होत.

ध्यानाच्या अभावी यातील कितिक हीन, अमानुष, निकृष्ट असतात - सुख समृध्दी, पर्यावरणाला घातक होतात. कित्येक शेकडों हिन्दी इत्यादि चित्रपटांप्रमाणे छूमंतर होतात. घरातल्या मिक्सरपासून अवकाशयानापर्यंत कोणते यंत्र कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. अगदी मझ्यासमोराचा संगणक पण! एवढेच काय? मी पण (संगणकाच्या रेडिएशनमुळे)! जर्मनीत झालेला यहुद्यांचा संहार, नागासाकी-हिरोशिमावर टाकलेली अण्वास्त्रे, ग्रामीण जनतेचे विस्थापन, पर्यावरणाचा होणारा सतत विनाश... हे सर्व आधुनिक जारण-मारण तंत्र विधिच होत.

मी पाहतो, दिवाळीत पुस्तकात पाहून रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीचा फराळ बाजारात तयार मिळतो. पूर्वी जे मसाले घरोघर तयार केले जात होते ते आता वाण्याच्या दुकानावर आयते मिळतात. तयार सदरे, तयार विजारी, तयार काय काय! पन्नास कोटी बाया बापड्यांची सोय झाली! शंभर कोटी जनताजनार्दनाची सोय झाली!

स्वावलंबन गेले! स्वायत्तता पण गेली! नियोजनाने जमीनी गेल्या. हे सारे कायद्याच्या कक्षेत राहून. तरीही मुंबईच्या मागील दारी कितिकाना धड एका वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते. म्हणून दयाळू मायबाप सरकारने शाळेतल्या मुलाना दुपारचे जेवण मोफत द्यायची योजना केलीय. पण पालकांचे - भावंड़ांचे काय? कुठे गेले सरकारचे "ध्यान"?


संस्कृति (culture): उगम अणि अभिव्यक्ति

पितृप्रधान समाजाताही संसाराचा भार उचलण्यात स्त्रीचा वाटा वरचढच असतो, मग ती शहरात असो की खेड्यात की जंगलात. युगानुयुगे स्त्रीने संस्कृतीची जोपासना केली हे सर्वमान्य आहे, अजून तरी.
संस्कृति केवळ शास्त्रात - ग्रंथात नसते, ती केवळ पंडितानी केलेली नोंद असते. संस्कृती काही शाळांत, महाविद्यालयांत नसते; तिथे केवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहिली जातात, त्यात आचरणाची हमी नसते.

"अन्न, वस्त्र, निवारा" या तीन मूलभूत गरजामध्ये संस्कृतीची प्रचिती येते.
"श्रम, विश्राम, आरोग्य, शिक्षण" या चार जगण्याच्या मूलभूत क्रिया होत. त्या सर्व जीवमात्राला -- प्राणी, वनस्पती: पाण्यातले, जमिनीवरचे, वातावरणातले, भूमीगत -- लागू होतात. या चार मूलभूत जैविक क्रियामध्ये मानवाच्या संसकृतिंच्या अभिव्यक्तिची नोंद होत असते.

माझी मायभूमी: हजार पाकळ्यांचे कमळ

पाण्यात जीवमात्र निर्माण झाले; म्हणून तर आपण त्याला "जीवन" म्हणतो. पाणी आणि जमीन यानी मानवाला संस्कृति दिली. मग तो अर्धनग्न आदीमानव असो की सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजातील असो.
म्हणून तर भारतातच काय सर्व जगभर संस्कृतिंची विविधता दिसते. यात काय आश्चर्य! सारया जमाती, सारे समाज विविधतेने नटलेले दिसतात.
त्यात भारत - एक "सहस्त्र पाकळ्य़ांचे कमळ". येथे दिसते जेवणातील विविधता, पेहरावातील विविधता, घरांची विविधता, चालीरीतींची विविधता, आणि संगीत, नाटक, कथा, काव्य, चित्र, शिल्प... भाषा सर्वच वैविध्यपूर्ण.


औधोगिक संस्कृति (Industrial Civilisation): अमर्याद अनिर्बंध हवस

आधुनिक मन्त्र - तंत्र - यंत्र युगांत समाजाचे विघटन मात्र झाले. पर्यायाने कुटुंबाचे पण विघटन झाले. त्याबरोबरच अनेक संस्कृतींचा विनाश झाला. उरल्या सुरल्यांचा होत आहे. सारे कसे कतारीत उभे राहिलेले ठोकळे होऊ घातलेले आहेत. संस्कृति कधीच जागतिक (ग्लोबल) असूच शकत नाही. जागतिक असतो व्यापार उदीम. संस्कृति स्थानीय असते.

आतापावेतो पांच हजार वर्षांत कितीतरी संघटीत धर्मांचा, पंथांचा उदय (शेवट) झाला असेल. अनेक अवतार प्रेषित अवतरले. अनेक आस्तिक-नास्तिक पंथ, सिध्दांत आले-गेले. सर्वानी मानवाला भवसागर तरुन जाण्याचे, समृध्दीचे आणि शाश्वत सुखाचे - इहलोकी आणि परलोकी - मंत्र दिले, आश्वासने दिली. याला इतिहास साक्षी आहे.

पण आज प्रत्यक्षात काय घडते याला मात्र आपण साक्षी आहोत - आणि म्हणूनच आम्ही जबाबदार आहोत -- निदान स्वत:पुरते स्वत:ला तरी. आधुनिक औद्योगिक समाजाने आणि विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैद्यक यानी दिलेले यन्त्र-मंत्र-तंत्र पण हीच आश्वासन देतात. हे सारे काळाच्या कसास लागेपर्यंत किती उशीर झालेला असेल?

हे सारे लिहिताना नेहमी प्रमाणे आठवते एकोणीस वर्षांच्या संता-कवी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान:
"दुरिताचे तिमीर जावो..."
अस्तु.
------------------------------
(ही मालिका केवळ एक निरिक्षण, विहंगम दृश्य (birds-eye-view) आहे, इथे कोणतेही सिध्दांत वा गृहीत प्रमेयं नाहीत.
असे समजा ही एका पाखराची चिंव चिंव आहे, जसे लोककथेत तोता-मैना बोलतात. या फांदीवर सर्व पाखारांचे स्वागत आहे.)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 22, 2009

वैशाखाच्या मध्यान्ही

केसुड्याच्या पाकळ्यांचा

उल्लास

उजळीत राने डोंगर(१६-३-१९८४)~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 16, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -२

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -


मंत्र युग (Inforamation Age)

मी राहतो त्या परिसरात दर वर्षी सार्वजनिक धार्मिक उत्सव होतात. दिवसभर बोंबल्यावर तार स्वरात तबकड्या व फीतीवर धनीमुद्रित केलेले गायत्री मंत्र, आणि हिंदी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते भावगीते पुन्हा पुन्हा वाजत असतात. पाच-दहा भाविकानी पुस्तकात बघून म्हटलेल्या आरत्या मात्र सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा ऐकू येतात.

या सर्वाचा उत्सव साजरा करणारया समष्टीला (त्यात मी पण असतो - वर्गणी भरून) काय आध्यात्मिक आणि आर्थिक लाभ होतो याची कल्पना नाही. (कारण मी अधिकारी व्यक्ती नाही.) पण ही सामग्री तयार करणारी, विकणारी वा भाड्याने देणारी मंडळी मात्र आपला नफा वसूल करतात.

गायत्री मंत्र असो कि सिनेमातील गाणे, "मार गोली भेजेमेँ" असो, कि तुका म्हणे "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती".
या आणि आशा प्रकारच्या शब्दाना मंत्राचे सामर्थ्य कसे येते? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या शब्दांची कळत - नकळत आपल्याला व जनमानसाला आणि व्यापार धंद्याला काय लागणी होते?

प्रसिध्दीच्या अनेक माध्यमातून नित्यनवीन माहितीचा आपल्यावर अहोरात्र (२४ x ७) भडिमार चालू असतो. आपल्याला कशाची गरज आहे या गोष्टी ते आर्जवून सांगत असतात. त्यात आपल्याला शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक श्रमातून मुक्ति देणारया सोयी -- यंत्र आणि मंत्र - यांच्या जाहिराती पण आल्या. आपल्याला मायावी वास्तवतेच्या (Virtual reality) दुनियेत घेऊन जाणारी करमणुकिची साधने पण आली.

ही सारी माहिती अल्पजीवी तर असतेच. पण कशालाच वैश्विक मूल्यच काय पण तत्कालीन सार्वत्रिक आणि सामाजिक मूल्य पण नसते. प्रगतिच्या नावाखाली त्यांच्या सुधारलेल्या आवृत्या मात्र काढल्या जातात. उदा. नव्या वेष्टनात साबणाची वडी / चोकलेट वगैरे. आणि अहर्निश जाहिरातबाजीने त्याना सतत पेटत ठेवले जाते.

या सर्व यंत्र-मंत्र-तंत्र उद्योग धंद्यात काही मूठभर लोकांचे आर्थिक - राजकीय सत्तेचे लागेबांधे मात्र गुंतलेले असतात. या जंजाळात कालची समीकरणे - सिध्दांत आज बाद होतात व नवी तयार होतात. त्यात वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, राजकारण, अन्न, शिक्षण, औषधी... सारे काही आले.

मुकी गाईगुरें चरत असतात; पण तेवढाच वेळ रवंथ पण करतात. आम्ही काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले याचा रवंथ करायला कुठे आहे सवड?

मग "गरज आणि हवस" याचा ताळमेळ - संतुलन रहात नाही. आणि मग जगण्याचे -- "श्रम, विश्राम, आरोग्य आणि शिकणे" या चार मूलभूत जैवीक कार्यांचे -- समीकरणच चुकत जाते. आणि मग येतें भौगोलिक (आर्थिक) शिख्नरांचें वितळणे -- आणि हिमालयाच्या हिमशिखरांचे वितळणे -- ध्रुवीय प्रदेशांत हिमनगांचे वितळणे. यात अधिक महत्वाचे काय?

आपण आपले म्हणतो ते "आयुष्य" आपले नसतेच मुळी. आपला असतो फक्त अंहकार. "आयुष्या"वर आपला काहीच हक्क चालत नाही. आणि देव दयाळू असले तरी "आयुष्याला" दया माया मुळीच नसते. आपण फक्त मर्यादीत काळापुरते त्याचे विश्वस्त असतो असे म्हणा वाटल्यास. आयुष्य - वाटल्यास सृष्टी म्हणा, वा निसर्ग म्हणा -- त्याच्या मार्गाने जात असते.

(पहा: शरीरधर्म )

~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 09, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड

यंत्र, मंत्र आणि तंत्र या तीन धार्मिक विधीमध्ये 'ध्यान' अभिप्रेत आहे. वेगवेगळ्या धर्मांचे श्रध्दाळू या विधिंची उपासना करतात; आपापल्या रिवाजाप्रमणे यंत्रांची घरात ख़ास जागी स्थापना करतात; मंत्रांचे पठाण करतात; तसेच तंत्र विधीपण करतात.

हे विधी घरात तसेच प्रार्थनेच्या जागीपण केले जातात. त्यासाठी ठरलेल्या वेळा - दिवस (रात्र), महीने, वर्ष, वय इ. आयुष्याच्या खातेवहीत एका रकान्यात राखून ठेवलेल्या असतात. यात श्रध्दा असते - असावी असे सर्व मानतात. कि हे पण यांत्रिकी होतात? 'ध्यान' मात्र जो तो जाणे.

याव्यतिरिक्त दिनचर्येच्या इतर वेळात सुद्धा प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात यंत्र-मंत्र-तंत्र विधित आयुष्यभर गुंतलेला असतो. चरितार्थासाठी हे आवश्यक असते. इथेही 'ध्यान', 'ध्यानाची प्रेरणा' व 'ध्यानाचा मार्ग' काय असतात, असतात की नाही हे जो तो जाणे.

आजच्या यंत्रयुगात (machine age), मंत्रयुगात (information age) आणि तंत्रयुगात (technology age) ध्यानाला काही जागा असते का - निदान शहरी वातावरणात? आजच्या धावपळीच्या जगण्यात ध्यान क्रियेसाठी कुणाला फुरसत आहे? त्यात आर्थिक लाभ काय? कदाचित वरवर पहाणारयाला 'लाभ' दिसत नसावा?

याचे कारण असेही असेल की 'ध्यान' म्हणजे काही भव्य दिव्य किंवा गूढ़ क्रिया असते. घ्यानात विचाराला, तर्काला जागा नसते हे ज्याना कळते त्याना वळत नसावे. परिणाम असा की समष्टीच्या थराला "निर्मितीक्षमता" निकृष्ट झालेली दिसते.

यन्त्र युग (Machine Age)

यंत्र मग ते कोणतेही असो - घर, खुर्ची, मिक्सर, टेलीविजन, पायताण- पायपोस, टेलीफोन, संगणक, मोबाइल फोन... अथवा आतंकवाद्याच्या / अतिरेक्याच्या हातातील तरवार / बंदूक. सारी यंत्रेच. या काय घ्यान करायच्या वस्तू आहेत?

आता इंडियातील कित्येक समाज घर पवित्र मानतात. कुदळ, फावडे, जनावरे, होड्या... तिजोरी यांची पूजा करतात. ही गोष्ट वेगळी. पण ध्यान?

तुकाराम म्हणतो:
"अरे संसार संसार जसा चुला तव्यावर।
आधी हाताला चटके मग मिलते भाकर॥
आणि तुकाराम कुणबी असला तरी व्यापारी पण आहे --- तुमच्या माझ्यासारखा.

आपण आयुष्यभर काहीतरी विकत असतो - आणि खरेदी करत असतो. हे चक्र आता अगदी बाळपणपासून चालू असते. पालक पैसे खर्च करतात. पण आपण आपले रम्य ते बाळपण पणाला लावून परीक्षेत गुण कमावतो. नाही का?
- - - -

ही झाली यंत्रयुगाची कथा. ही समाज आणि समाजधारणेची पण आहे.
पुढच्या वेळी मंत्र युग आणि तंत्र युग यांची कथा. कारण श्रमाची विभागणी हे त्यांचे एक लक्षण असते. या कथेत कुठे खोट असली तर कृपा करून कळवा. आभारी.

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 04, 2009

माझी यात्रा

पृथ्वी माझी सुरू होते
पायाखालच्या जमीनीपासून
जेव्हा जेथे असें मी तेथून

वर वर चढणारया नजरेत
गोल गोल क्षितिजे सामावत
उंच उंच हिमाद्रीच्या कड्यावर;

इथे अहंकाराचे अस्थिर कड़े - सागर
हरघडी वितळतात - वाफारातात,
विरतात मातीत - अवकाशात.

काळजातली उब पुरेशी होते
कवेत घ्यायला नविन क्षितिजे;
हरघडी विस्तारते स्वत्व माझे.

बंध मातीचा अतूट सामावत
सारी पृथ्वी भाकरीच्या चतकोरात
ओळख उरते धरतीच्या चतकोरात.


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 02, 2009

शब्द-अर्थ-नाद (मुक्त छंद कविता)

कधी कोकिळेची साद - कधी भिल्लाची पावरी
कधी मोराचा केकारव - कधी सिंहाची गर्जना
कधी किलबिल पाखरांची, कधी पोरीबाळींची
कधी हिरव्या गवतावर पवास्सची संतत धार
कधी रिक्शा कर्कश - कधी चिमण्यांची चिवचिव
कधी भिल्लिणीचे शुभ्र हसू - कधी लाल जास्वंद
कधी किरमिजी काठेवाडी ओढणी
कधी आवळ्याच्या सावळीत दांत शिवशिवणे
कधी ऊनाची तिरीप - कधी पुसटती आठवण
कधी त्या आठवणीत रेंगाळणे - कधी स्वप्न - कधी
उघडे नागडे सामोरे जाणे - कधी ताप - कधी अनुताप -
कधी अनुनय - कधी हिरवीगार वनराई - कधी पिवळेधमक ऊन.


¬¬¬¬
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape