October 27, 2011

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

रेखाचित्र, शब्दचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, चलत्‌चित्र... वा कल्पनाचित्र सारें कांहीं सृष्टीतून आलें; आणि व्यापार-उद्योगांत विरून गेलें.
 
की त्यांचे लक्ष्मी (तिजोरी) -पूजा व दुर्गा (युद्धें-अतिरेक-आतंक-सत्ता...) -पूजा यांत सार्वजनिक परिवर्तन झालें?
 
या धबडग्यांत सरस्वती-पूजा कुण्या वाळवंटात लुप्त झाली माहित नाही. मग सार्वजनिक शारदोत्सव कुठून ?

अनादि काळापासून जळ-जमिन-जीव यांनी - मूलतः सर्वच ज्ञात व अज्ञात सृष्टीने मानवाला संस्कृती प्रदान केली; त्यांचे भरण पोषण संवर्धन केले अशी माझी श्रद्धा !

त्या काळांत नागरी समाज अस्तित्वात नव्हते; ते निर्माण केले त्यांच्या स्वयंकेंद्रित सत्तेच्या आकांक्षेने !
 
हा अलिखित इतिहास आजही वर्तमान परिस्थितीत गम्य आहे. नागरतेच्या तथाकथित प्रगतीत, विषेशतः आजच्या औद्योगिक समाजाच्या मनात सृष्टीमातेचे काय स्थान आहे सांगायला नकोच. ते त्याच्या कृतीने सिद्ध होते.
अर्थात सृष्टीला त्याचे ना सोयर ना सुतक ! ती त्याचे वरदान व दंड - स्वर्ग व नरक - येथेच देते.
 

अधिक वाचा >> Civilization Trap In Our Era

दिवाळीचा पाडवा भातशेती झाली की येतो. शालिवाहन शक आणि अनेक पौर्वात्य शक वसंताच्या आगमनाने सुरु होतात. या व अशा अनेक परंपरा सृष्टीशी निगडीत आहेत. या सर्व संस्कृतीच्या अभिव्यक्ती ! मानवी संस्कृती सृष्टीतून उगम पावते व तिच्यात लोप होते. आता या परिस्थितीत माणसाच्या कर्तुताने फरक होत चालला आहे... व त्याचे परिणाम रोज पाहायला मिळतात.

मुंबई | दीपावली २०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 22, 2011

एक कालातीत कवी : बालकवी - त्र्यं. बा. ठोमरे

एक कालातीत कवी : बालकवी
बालकवींची सृष्टी
(बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे, जन्म- १३ ऑगस्ट १८९०, मृत्यू- ५ मे १९१८)

शंभरीनंतरी बालकवींच्या कविता आजही नुकत्याच उमलणार्‌या कळीसारख्या ताज्या आहेत.

आज नागरी समाजाच्या जीवनशैलीत, भाषेत, अभिरुचीत फरक झाला आहे. पण आजही या कवितांच्या नाविन्यावर कांहिंही परिणाम झालेला मलातरी जाणवला नाही.

'समग्र बालकवी' [टीप १] हें पुस्तक वाचनालयातून आणले. तेथे समजले, एका संस्थेने हें ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी नेलें होतें. ऐकून फार आनंद झाला.

पुस्तक घेतल्यावर प्रथम पहिल्या पानापासून शेवटपर्यंत चाळले, कुठे काय आहे पाहिले. ओळखीच्या दोन कविता भेटल्या.

'ती फुलराणी' मी शाळेंत असताना वाचली होती. पहिले चार चरण मात्र कायमचे ध्यानांत राहिले होते. तेंच 'आनंदी आनंद गडे' या कवितेचे. चार ओळी का असेनात पण कायम आठवणींत कोरल्या गेल्या, अन त्या वेळोवेळी आठवतात पण. यांनी बालमनावर केलेले संस्कार पण कधीं पुसले जात नसावेत.

गेल्या शंभर वर्षात अनेक समर्थ साहित्यिकांनी, समिक्षकांनी, अभ्यासकांनी त्यांच्यावर व कवितांवर विविध लेखन केलें, टीका लिहिल्या, संपादन केले, प्रबंध लिहिले. अगदी काल परवांपर्यंत.

॥ बालकवींची सृष्टी ॥
 अवतरण १
_______________________________________________
॥ सृष्टि ॥
चाल : अरुण
सृष्टि मला हांसविते। स्वर्गसौख्य दाखविते
शांतीने पालविते। आनंदें डोलविते
मन माझें टाकि गडे नित्य गुंगुंनी ॥१
(अपूर्ण कविता पृ. २१७) 
_________________________________________________

"सृष्टी" हा शब्द कवितांत बत्तीस वेळां येतो. कांही नजरेतून सुटले असतील. ते वेगवेगळी रुपे घेऊन आलेत. त्यांत एक आहे "अंत:सृष्टी". तसेच निसर्ग, जग, विश्व इ. शब्द या संदर्भाने येतात. त्यांच्या कविता सृष्टीने - निसर्गाने, प्रकृतिने - अंतर्बाह्य समृद्ध केलेल्या आहेत हें सर्वांना माहित आहे. पण त्यांची सृष्टी प्रातिनिधिक नाही, सांप्रदायिक नाही हे विशेष आहे.

ती सृष्टी वास्तव आहे, इंद्रियगम्य आहे. सूर्य चंद्र तारे... ब्रम्हांडापासून जळ जमीन जीव... गवतापर्यंत सर्व जैव-अजैव निसर्ग तिच्यांत सामावतो. एवढेंच नाही तर तिचें आंतरिक अस्तित्वपण संवेदना, भावना, प्रज्ञा, विचार... यांनी प्रतीत झालेले जाणवते.

"सृष्टी" शब्दाचे कांही निवडक उल्लेख

सृष्टीचे मंजुळ ताल
... ... ...
         ही सृष्टीचीं
         निगूढतेचीं
         तत्त्वें साचीं
सांग उकलुनी आह्मांतें
गा गा गा विहगा गीतें ॥२॥ (८३),

| मनोवेधका सृष्टीसतीच्या अगा चिमुकल्या बाळा (६८) | हें तान्हें । सृष्टीचें गोजिरवाणें! (९१) | सृष्टि बालिका (२१८) | सृष्टीदेवीच्या सगुणा बाळा (११९) | सृष्टि तुझी ही --- हेंच तुझें घर --- विहार (१५०) | सृष्टिसतीने साज घेतला (१८८) | दिव्यरूपिणी सृष्टी (१९२) | ती आशा मग सृष्टीबंधनीं पुन्हां जीवास घे गोंवुनी (२०७) | हालवीत कचभार सृष्टीचें उत्थापन बोले (२१९) | हे रवी शशी तारका तसे ग्रहगोल. / ही सृष्टिसुंदरी मजला गाया शिकवी, / हीं चराचराचीं निगूढ गीतें कांहीं. (२३५) | हर्षविल अंतःसृष्टी मला (२४९) | विविधा सृष्टी (२५९) |कविता शीर्षक, 'सृष्टीच्या गायकास' पृ. 83. । "कवीच झाला सृष्टि, सारी सृष्टि झाली कवी" (प्रस्तावना, संदर्भाचा उल्लेख नाही, पृ. बत्तीस) ।

साकल्याने [टीप २] पाहिल्यास, त्यांच्या सर्व कवितासंभारांत जाणवते की मानवाला सृष्टीपासून वेगळे अस्तित्व नाही, तसेंच ती भोग्य वस्तूपण नाही. दिव्य, देवता, दिव्यत्व इत्यादि उल्लेख पाश्चिमात्य Divinity या धार्मिक कल्पनेपेक्षा आत्मिकतेवर -- religiousness -- आधारलेले आहेत; जशी त्यांची पहाट स्थल-विशिष्ट नाही तर वैश्विक आहे.

॥ बालकवी : एक कालातीत कवी॥

त्यांच्या अनेक कवितांत वेगवेगळ्या नव्या अपारंपरिक देवतांचे उल्लेख येतात, त्यांत मानव नव्हे, 'श्रीमानवता'देवी सुद्धा येते. आणि त्या अभावितपणे सृष्टींत उगम पावतात. यामुळे त्यांची सृष्टि-देवता व आत्मिक-ता नास्तिकाला किंवा अज्ञेयवाद्याला पण नाकारता येणार नाहीत. 
आज जडवाद व चंगळवाद यांच्या वावटळी संप्रेषण-माध्यमांतून फोफावत आहेत. या आधुनिकतेने लोकांचे आयुष्य चाकोरीबद्ध तर केले आहेच व त्यांची त्रेधा पण उडवलेली आहे. याची सुरवात ब्रिटीश राजवटीत झाली.
 
बालकवींच्या कवितेत कधीकधी निराशेचे जे सांवट दिसते त्याचे कारणही यांत असावे असे मला वाटते. पण त्यांचा सहजधर्म व सर्जनशीलता या स्थितिला पुरून उरणारी होती. बालकवींची कविता या आधुनिकतेच्या फार पुढे गेलेली आहे.
 
वडाचें बीज मोहरीपेक्षाही लहान असते. आणि ते कोठेही रुजते, खडकावरपण. पण त्यांत या महावृक्षाचे संपूण आलेखन (DNA) लिहिलेले असते हें  कदापि विसरून चालणार नाही. बालकवी - त्र्यंबक बापूजी ठोमरे यांनी आधुनिकतेची नाडी बरोबर ओळखली होती.
अशा वेळी अनेक लोकांस त्यांची कविता नैतिक आधार देऊ शकेल. आणि ही अत्यंत निकडीची गरज आहे असं मला प्रांजळपणे वाटते.
अवतरण २
________________________________________
 श्रीमानवता ॥
चाल : सूर्यकांत (समुदितमदना)
ग्रंथारंभीं नमन देवते श्रीमानवते तुला ।
दिव्यदेवता विविधरूपिणी तूंच एक निस्तुला ॥
(
पृ. २०९)
_____________________________________

॥ चिरयौवना सृष्टी ॥

 ॥ जेथे जातो ती माझी सांगाती ॥ ( रेमी डिसोजा)

मला अभिप्रेत असलेली सृष्टी: ती सतत सर्जनशील निर्मितीत रममाण असते. ती जीवाणू ते वानसें-मानव यांना समान लेखते. ती मानव समाजांतील भेद - उच्च - नीच, त्यांची शास्त्रें - नीतिनियम, त्यांचे ईश्वर - अवतार - महात्मे, कशालाच वोळखत नाही. एकदा संपूर्ण जीवलोकाला पोषण, संवर्धन, संरक्षण इ. साधने दिल्यावर तिचे पुढील काम - शौचाचे परिवर्तन (recycle) - चालू राहते. जेव्हा साध्य आणि साधन यांच्यांत दुजाभाव असतो तेव्हा अराजक (chaos) निर्माण होते. सृष्टीयोग म्हणजे साध्य आणि साधन, दोनही एकच - सृष्टी - असते.

आयुष्याच्या दिशा
बालकवींच्या अल्प-आयुष्यांत त्यांची भटकंती; मराठी, संस्कृत व इंग्रजी साहित्याचा अभ्यास; व भौतिक परिस्थितीशी केलेला सामना साकल्याने पाहता जाणीव होते की हा असामान्य कवी काळाच्या फार पुढे गेला होता, नव्हे काळाला पुरून उरलेला आहे.

टीप  १ :  "समग्र बालकवी" । लेखक : त्र्यंबक बापूजी ठोमरे । संपादक : नंदा आपटे । प्रस्तावना, संपादित आवृत्त्या, संदर्भसूची : एस. एस. नाडकर्णी । पॉप्युलर प्रकाशन मुंबई । प्रथम आवृत्ती, २००५ । किंमत रु. ४००/- । बालकवींच्या एकत्रित कविता आता उपलब्ध नाहीत. या पुस्तकाने ती एक फारच मोठी उणीव भरून काढलेली आहे. सर्व अवतरणें व संदर्भ या पुस्तकांतून घेतलेले आहेत. या पुस्तकाचे कॉपीराइट प्रकाशकाच्या स्वाधिन आहेत.
टीप २ : Holistic: In nature a whole is larger than the sum of all its parts. साकल्य : निसर्गाची पूर्ण कृति तिच्या सर्व भागांच्या बेरजेपेक्षा अधिक असते.उदाहरण: पाण्याची वैज्ञानिक व्याख्या जरी "H2O" असली तरी पाणी त्याहूनही अधिक असते. बालकवींच्या कविता वेगवेगळ्या करून साहित्य शास्त्राच्या व सौंदर्य शास्त्राच्या चौकटीतून पाहिल्या की बरेंच कांही हातातून निसटून जाते.

© Remigius de Souza. All rights reserved.|

October 18, 2011

॥ आई ॥

॥ आई ॥
रेमजीयस डिसोजा

आईविना पोरक्या पोरी
वणवण तुही वाळवंटीं
आई नाही दारी घरी
आई नाही हाटी बाजारी
आई नाही तरुवरी
आई नाही शेतावारी
आई नाही कड्याकपारी
आई नाही तरीवरी
आई नाही रानझरी
आई नाही देवाचे मंदिरी
आई नाही राजदरबारी
आईविना पोरक्या पोरी
हरवलीशी आठोप्रहारी
आईविना पोरक्या पोरी
परवड तुही कवण्या दिशी?
* * *
२७-२-१९९४
(टीप: इथे आई कोण आणि मुलगी कोण हे वाचकाने ठरवायचे)
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 10, 2011

बाप माझा - एक महाकाव्य

बाप माझा - एक महाकाव्य

विस्मरणाच्या धुक्यातून ते क्षण
मावळतीच्या किरणांत
लख्ख चमकले क्षणभर!

तेव्हा माझा बाप चालता बोलता
महायात्रेस निघून गेला होता.
त्याच्या कलेवराच्या चेहरयावर
तेव्हासुघ्धा तृप्तीचे शांत
भाव चिकटून होते.
आणिक अंगावर फक्त
हातभर सूती लंगोट.

सुखी माणसाचा सदरा शोधणारया राजास
माझ्याच बापाने तर फसवले
नव्हते ना?
पण त्याने मला तर
नक्कीच फसवले होते.

शेत बंधाऱ्यावर आड्याओढ़्यांत
मुळ्या काटक्या गवत पाल्यांत
या लंगोटी बहद्दराला गवसले
रहस्य विश्वाचे
ज्याच्यासाठी विश्वामित्राने
घोर तपस्या केली होती म्हणे
आणि संपला होता प्रतिविश्व
निर्माण करण्याच्या महत्वाकांक्षेत.

माझा हेकेखोर
अंविश्वासाने भारलेला बाप
फक्त लन्गोटीच्या एका कमाईवर
राहीला जन्मभर
आणि त्याचे जडीबुटीचे गुपित
उराशी घेऊन मेला.

माझ्या विलायती पदव्या
आणि माझी शल्यविद्या
कशाला कशाला त्याने नाही जुमानले
आपल्या जुनाट बुरसटलेल्या कल्पनांची
आणि अंधश्रद्धेची खातिर करताना.

म्हणे विद्धेचा व्यापार करायचा नाही;
एकादशीला जेवायचे नाही;
'बाहेरच्या' बाईचे वारे घ्यायचे नाही;
सामिष अन्नास स्पर्श नाही;
शेणमातीच्या जमिनीवर बसायचे
आणि बांबूच्या तरटावर झोपायचे।


म्हणायचा, 'तू पोपट सोनेरी पिंजरयातला;
ही विद्या देऊन तुला
मुक्ती नाही मिळणार मला
जन्मोजन्मी'.
सर्वच नन्नाचा पाढा.

आता माझ्या मरणशय्येवर या
पंगू शररिराला जीवदान देणाऱ्या
नालिकानी ढगाळलेल्या
अवकाशात जाणिवेच्या
हा आठवणीचा किरण येतो
कुठूनसा आणि स्पर्श करतो
माझ्या विकलांग मनास.

नदी केव्हाची वाहून गेलीय;
राहिलेत फक्त रेताडाचे पूर
आणिक एक किरण जाणीवेचा।
~~~~~
© remigius de soujaa. al rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape