February 10, 2011

कातळावरची कविता

कातळावरची कविता  
कातळावरची कविता  - रेमीजीयस डिसोजा - मुंबई  
वार्‌याने बीज उडाले  
कातळावर पडले  
पाणी कोसळले  
वानस उगवले. 
मुंबई : ०१ .०२ .२०११

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 03, 2011

इंडिया, भारत की गोंडवन?

इंडिया, भारत, हिंदुस्तानआर्यावर्त, तामिलनाडू की गोंडवन ?
Image 1: Bhill children at Holi festival in Satpuda Ranges, Gujarat
इंडियातील आदिवासी धनुर्धर आजमीतीपर्यंत 
आपल्या अंगठ्याचा वापर करीत नाहीत. 
हे एकलव्याचे जिवंत स्मारक आहे म्हणा, किंवा अलिखित इतिहास म्हणा.

स्वातंत्र्यानंतर देशाचे नांव काय असावे यावर वाद किंवा चर्चा झाली होती असे कधीतरी वाचनात आले होते. आता एवढेच आठवते. तपशील आठवत नाही. त्या चर्चेत अपघाताने पण 'गोंडवन' असणे शक्यच नव्हते. पण एक लक्षात आले: कोणीही आपापल्या सोईप्रमाणे, प्रसंगानुरूप इंडिया, भारत किंवा हिंदुस्तान कोणत्याही नांवाचा उपयोग करतात.

पण देशातील सूज्ञ नागरिक, पुढारी, इतिहासतज्ञ, विद्वान मंडळीने 'इंडिया' 'भारत' अशी दोन नांवे का घ्यावी? यातला तर्क, शहाणपण, व्यवहार, भावना, निकष काय असतील हे माझ्या अल्पमतीस कधीही न सुटणारे एक कोडेच आहे. किंवा त्यांच्यापुढे काय पर्याय होते हे पण मला नाही. ही माहिती असेल सरकारी दप्तरी कुठेतरी पिचत कड्याकुलुपात!

इंडिया हा 'हिंद' या फारसी शब्दाचा अपभ्रंश असावा. 'सिंधू' नदीच्या नांवावरून 'हिंदू' हा फारसी शब्द आला. तसेच 'इंडिया' शब्दाचे 'भारत' हे भाषांतर नव्हे. पण ते जाऊदे. प्रश्न असा कि दोन नांवे का? हे लक्षण द्विधा मनस्थितीचे की दुटप्पी धोरणाचे की न्यूनगंडाचे

शेजारचा छोटा देश श्रीलंकापण ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होता. पण 'सिलोन' हे नांव बाजूला सारायला त्याना काहीच अडचण आली नाही. 'पूर्व बंगाल'ने 'पूर्व पाकिस्तान' बाजूला सारले व 'बांगलादेश' ही ओळख शाबूत ठेवली.

मग आमचें घोडें कोठे अडलें? खरं पाहता आम्हाला इतरांच्या, विशेषतः गोर्‌यांच्या प्रशस्तिपत्रांची व मान्यतेची फार गरज व हौस असते. आणि नांवांची (व्यक्तिपुजेची), नांवे बदलायची व नांवे ठेवायची पण!

मात्र 'इंडिया' हें नांव आमच्या राजकीय व बौध्दिक गुलामगिरीचे स्मारक म्हणून चालू ठेवले असावे. स्वातंत्र्यानंतर नजरेस पडणारे विदेशी आयात मालाचे आम्ही करीत असलेले लांगूलचालन पाहिले तर हें शक्य आहे. काय करणार? इतिहासावर आमचे फारच प्रेम!

भाषाशास्त्रावर एक मराठी पुस्तक चाळत होतो. मराठी आर्यभाषा आहे  व संस्कृत - प्राकृत - मराठी या क्रमाने मराठीची उत्क्रांती झाली असा त्याचा रोख होता. (मला वाटते या गृहीत प्रमेयावर हे पुस्तक आधारलेले असावे.)
Social and Cultural sub-groups in India
नकाशा-१ इंडियातील  सांस्कृतिक विविधता
पण आर्य येण्यापूर्वीं या देशात भाषा नव्हत्या का? इतर संस्कृती व समाज नव्हते का? यांचा उल्लेख नाही. हे पुस्तक मराठी भाषाशास्त्रावर असल्याने त्याला सहाजिक मर्यादा आहेत. तरीही हा अनुल्लेख खटकला.

तसेच काहीसे आपल्या देशाचे नांव ठरवताना झाले असावे! या संदर्भांत देशाच्या इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती इत्यादींच्या वैविध्याचे भान राहिले नसावे असे वाटते. सारें चित्त भावनातिरेकाने आर्य संस्कृतीभोवती फिरत राहिले असणार!

देशाचे नामकरण: वस्तूनिष्ठापूर्वक हाताळायचा हा विषय. मुळात सर्व देशातील विस्कळीत राज्यांना व प्रदेशांना इंग्रजांनी एकत्र आणून 'राष्ट्रा'चा आकार दिला. (पुरातत्वशास्त्र आणि मानववंशशास्त्र या वेळेपावेतो नांवारूपास आलीं होतीं हे पण ध्यानात घ्यायला हवे.) 
नकाशा २ : वैदिक कालीन भारत (लेखक माहित नाही)
विंध्याच्या उत्तरेस असलेल्या भागास फारसी भाषेने "हिंदुस्तान" हे नांव दिले. 
"हिंदू" हा शब्दच मुळी फारसी आहे.

सिंधू नदीच्या परीसरात सिंधू संस्कृती (Indus Civilization) 3000 इ. स. पूर्वी होती. ती संस्कृती गेली, पण माणसे राहिली. महान साम्राज्ये / संस्कृती लोप पावतात, पण सामान्य माणसे राहतात. इतिहासाचा हा साधा धडा आहे. नाहीतरी आज आर्य  व वैदिक संस्कृती आहेत कुठे? आज जे काही दिसतेय ते केवळ विडंबन असावे?

आर्य येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती, द्रविड संस्कृती, त्यांच्याही फार पूर्वीपासून आदिवासी जमाती [aborigine communities] होत्या. त्यांना भाषा व संस्कृती होत्या अन आजही आहेत.

खरं पाहता मानव [Homo Sapiens] अस्तित्वात आल्यापासूनच त्याला भाषा व संस्कृती या देणग्या सृष्टीने दिलेल्या आहेत. आणि स्थळ-काळ-पर्यावरण परिस्थितीनुसार आपल्या राहाणीत बदल वा परिवर्तन करण्याची त्याला अक्कलपण दिलेली आहे.

जगातील सर्व आदिवासींची जीवन प्रवृत्ती निसर्ग-संवादी आहे. रूढ शब्दांत सांगायचे तर हजारो वर्षें ध्यानीं-मनीं-अंगीं-अंतरीं भिनलेली ही धार्मिकता [religiousness] आहे, सहजधर्म आहे; नागरी समाजांना अभिप्रेत असलेला धर्म नव्हे.

यामुळे नागरतेने [civilized societies] वेळोवेळी अनेक प्रकारे केलेल्या उच्छादांतूनही आदिवासी आजतगायत टिकून आहेत. निसर्गनिवासी आदिवासी प्राग्-ऐतहासिक जमान्यात राहात नाहीत. पण त्यांची काळाच्या परिक्षेत तावून सुखालून उतरलेली असामान्य जीवनप्रेरणा [जीवन-शैली नव्हे] अटळ आहे.

पण आदिवासींचा निसर्गनिवासी परिसर, व त्याचे पर्यावरण हिरावून घेणे किँवा त्यांचा विनाश करणे म्हणजे आदिवासींना जीवे मारणे; त्यांचा खून करणे एवढाच त्याचा अर्थ होतो.

रूढ कायद्याने हे मान्य असेलही पण 'न्याय्य' नाही. नागरी जीवनशैली त्याच्यावर लादणे हा अन्याय आहे, अधर्म आहे, धार्मिक अत्याचार आहे.

सृष्टीच्या नियमांत, नागरी संस्कृतींच्या सनातनवादी धेंडाना जागा नाही. किंबहुना मानवाने निर्माण केलेल्या उच्च-नीच इ. अधिश्रेणीना पण कांहिही स्थान नाही. अशा संस्कृती भूतकाळात जमा होतात. इतिहास याला साक्षी आहे.

इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाला अनेक वस्तूनिष्ठ व व्यक्तीनिष्ठ मर्यादा असतात. तत्कालीन कार्य-कारण, साध्य-साधन यांच्या अवशिष्ठ परिणामांनी इतिहास आपल्यासमोर सतत साक्षात उभा असतो. तो निस्पृहपणे वाचायची हिंमत आणि क्षमता हवी.

भूशास्त्रिय कालात [geological time] पृथ्वीवर सतत उलथापालथ होत असते. पण ती दृष्टीस पडतेच असं नाही. पृथ्वीच्या इतिहासात जमिनीचा एक अधिभूखंड [super-continent] सुटा झाला आणि त्याचे पांच भूखंड होऊन पसरत गेले. हेच आजचे दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. इंडिया. आफ्रिका व अंटार्कटिका होत. परंतु अधिभूखंडात असलेली इंडिया आजची नव्हती. ती होती दक्षिणेचा तिकोनी भाग - दख्खनचे पठार. त्यावेळी उत्तर इंडिया व हिमालय अस्तित्वात नव्हते.
Gondawana in History of Earth (Source: scotese.com) 
नकाशा ३
Eduart Suess, [1831-1914] या ऑस्ट्रियन भूशास्त्राज्ञाने या महाभूखंडाची सिध्दांत-कल्पना मांडली होती व त्याला 'गोंडवनलँन्ड' - Gondwanaland - हे नाव दिले [इ. स. 1861].
 
गोंडवन मध्य भारतात आहे. येथे गोंड आदिवासी जमाती हजारों वर्षांपासून राहतात. अजूनही येथे घनदाट जंगल आहे. एडवर्डचे हितसंबंध इंडिया, गोंडवन किंवा गोंड आदिवासी यापैकी कशातही गुंतलेले नव्हते. तो तर जगाचा नागरिक होता.
गोंडवनाचे मध्य भारतात/इंडियात  स्थळ
नकाशा ४

Map of Central Provinces (1903 AD) shows Gondwana
नकाशा ५: या नकाशात इंग्रजानी "गोंडवन" दाखवले आहे. 
परंतु इंडियाच्या आत्ताच्या नकाशात मात्र हा एकमेवाद्वितीय प्रदेश दाखवलेला नाही किंवा त्या नावाचा उल्लेखपण केलेला नाही. एवढं कारण इंडियाचे आजचे राजकरते किती कोत्या बुध्दीचे व वंशवादी (racist) आहेत हे दाखवायला पुरेसे नाही का?

एका बाजूला निधर्मी राज्याची ग्वाही देत असता, आधुनिक इंडियाने किंवा 'प्रथम जगत इंडियाने' आर्य वंशवादाचा वारसा कसा चालू ठेवला आहे त्याचा हा एक मासला! सर्व आदिवासी जगताला - चतुर्थ जगत इंडियाला - अनुल्लेखाने मारले.

इंडियाच्या घटनेत हे शब्द आहेत, ‘India that is Bharat'. आतापर्यंत घटनेत चौर्‌याण्णव वेळां दुरूस्त्या केल्या. आणखी एक केली तर फार होणार नाही. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या 'Land Acquisition Act' या जुलमी कायद्यात मात्र आतापर्यंत जेमतेम दहा वेळां दुरुस्त्या झाल्या. आता हा कायदा नव्याने लिहितायत असे ऐकिवात आहे.

भारतीय गणराज्याची साठी उलटली. बरं आहे. सुप्रीम कोर्टाला तरी, उशिराने का होईना, जाग आली. तारिख १२ जानेवारी २०११ रोजी मध्यवर्ती न्यायालयाने दिलेल्या निकालात आदिवासींच्या संदर्भात पहिला व महत्वाचा निर्णायक टप्पा गाठला.(संदर्भाचा दुवा पाहा:India, largely a country of immigrants says Supreme Court of India)

हे झाले 'न्याय देणार्‌या सरकारचे' काम. आता राहिले 'कायदे करणार्‌या सरकारचे' आणि 'अंमलबजावणी करणार्‌या सरकारचे' काम. हे अधिक कठिण आहे.

मानसिक अवरोधाचा [mind block] अडसर दूर करणे, मोडणे सोपे नसते. भूखंडाच्या सीमा बदलतात; नद्यांची पात्रे बदलतात; सागराचे किनारे सरकतात; सपाट जमिनीच्या जागी पर्वत येतात; देशांच्या सीमा बदलतात. बलाढ्य सोविएट देशाची शकले होतात. नांवात काय आहे

नांवांपासूनच स्वतंत्र इंडिया/भारत देश ऐतहासिक चुका करीत आला. या चुकांची दुरूस्ती करायलाच हवी. म्हणजे पुढे करू घातलेल्या / पुढे होणार्‌या चुका टाळता येतील. याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर दूरगामी परिणाम होतीलच - जसे सनातन्यांचे विरोध, व विचाराना नवी दिशा - आणि या देशाचा सन्मान हिमालयाप्रमाणे उंचावेल! [29] एडवर्डने "गोंडवन" या गोंडस व यथार्थ नावाने दिडशे वर्षांपूर्वीच या महान देशाच्या नावाचे सूतोवाच केलेय. फक्त एका घटनादुरूस्तीचा शिक्का मारायचा एवढेच काम राहिलेय!

येथून पुढे भौतिक व नैतिक चुकांच्या दुरुस्तीची मालिका सुरू होते. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्यापारशास्त्र व इतर विषयांवर, थोरांसाठी व लहानांसाठी, नवी पाठ्यपुस्तके लिहिणे आलेच. देशातील कोट्यवधी सुशिक्षित व साक्षर-निरक्षर बेकाराना काम-रोजगार मिळेल. देशातील शेकडो भाषांना फुलाफळांचा बहर येइल. अंतराळात अवकाशयान पाठवण्यापेक्षा हे काम जास्त "गरजेचे" व "कमी खर्चाचे" आहे.

'कमळ' हे राष्ट्रिय फूल! ते खरोखरच सहस्र पाकळ्या धारण करील. मग त्यावर सत्यार्थाने सरस्वती विराजेल. आता जो वानसांचा व वनांचा विनाश होतोय त्याला थोडाफार आळा बसेल; वनवासींना अन किसानाना फक्त बोलाचे नव्हे तर खरोखरीचे "सुजलाम सुफलाम" दिवस बघायला गवसतील अशी अशा करुया!


टीप: वर दिलेले नकाशे इंटरनेट वरून घेतलेले आहेत. नकाशा -१  "सेमिनार" (नवी दिल्ली) या मासिकाच्या मुखापृष्टावरून नक्कल केलेला आहे. आदिवासी मुलांचा फोटो लेखकाने चाळीस वर्षांपूर्वी काढला होता.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape