Showing posts with label विद्रोही कविता. Show all posts
Showing posts with label विद्रोही कविता. Show all posts

July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 29, 2012

रेमीची "विद्रोही कविता": एक व्यत्यासकथा

कविता सुटका करते माझी अनेक जंजाळातून, जेव्हा जेव्हा अशक्य होते तर्कसंगत गद्य लिहिणे एकाद्या घटनेवर, जी होते पीडायायक समस्ताना अन स्वत:ला. जेव्हा अशक्य होते मुद्देसूद लिहिणे, ५०० अक्षरात, ५०० शब्दात, ५०० वाक्यात, ५०० पृष्टांत लिहिले तरीही विपर्यास अटळ असतो. (अशाच एका प्रसंगी लिहिली होती कविता "Who is the giver? Who is the receiver? ": जेव्हा त्या घटनेचे परीक्षण लिहिणे अशक्य झाले होते.)

अशावेळी कविता येते धावून मदतीला, "लिही" म्हणते, "खुंटीवर टांगून व्याकरण आणि सौंदार्यशास्त्राचे नियम". "लिही" म्हणते, "पंधरा किंवा पाचच शब्दात, आनंदाची लकेर किंवा वेदनेची किंकाळी, किंवा भावपूर्ण श्रध्दांजली... भावनेचा उद्रेक..."

होळीच्या उत्सवात भिल्ल कुटुंबांबरोबर जत्रेच्या गावी / जागी जाताना बायामुलींनी गायलेली गाणी आठवतात. "सांदी खुटी ओ ऽ ऽ हेंडो मेला ऽ ऽ ऽ ऽ य ऽ से..." ("चांदी खुंटली - कमी पडली - ओ, चला मेळ्याला..."). गाण्याच्या तालावर डोंगर खडकातून पण चालणे चालणे रहात नाही, त्याला नाचाची लय येते आणि मैलांचे अंतर कधी कसे संपते कळत नाही.

"ग्यानोबाबा तुकाराम माऊली" बोलांवर वारकरी स्थल - काळाच्या परिमितींच्या पार जातात.

"जो! जो ना बा पाणी!" ("बघ! बघ ना आई पाणी!") एसटी बसमधली एक तरुणी उत्स्फूर्त शब्दात आईला सांगते. ती लग्नाच्या व्हराडाबरोबर आहे. काठेवाडहून ते व्हाराड बडोद्याला जात होते. बस खेडा जिल्ह्यात आली. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली होती. हे लोक तीन वर्षे अवर्षणाच्या झळा सोशित आले होते. तिच्या वडिल मंडळीने अशी अनेक अवर्षणे अनुभवली असतील. त्या यौवनेच्या पाचच शब्दात त्या सर्वांची आर्तता आणि आनंद एकाच वेळी व्यक्त होत होता.

"होळये माय तुजां रोंबाट गे
चिचेचां पान तुजां आंबाट गे"
कोकणात होळीच्या उत्सवात लहानपणी ऐकलेले हे गाणे. होळी-आईला जेवणात चिंचेचे पान पण पुरेसे होते.
तीच गोष्ट खेडोपाडीं बायकांच्या जात्यावरच्या श्रमापरिहार करणारया ओव्यांची.

अशा एक-दोन ओळींच्या अभिव्यक्तित -- मग ती अभिजात कविता, गीत नसेल, त्यात कल्पनाविलास नसेल, त्याना साहित्य विशारदांची मान्यता नसेल, पण वास्तव जीववनाचे काव्य ओतप्रोत भरलेले असते.

तृतीय जगत आणि चतुर्थ जगत इंडियातील (Third World and Fourth World India) सहा लाखांहून अधिक खेड्यात लोक गीतांचे तसेच इतर साहित्याचे केवढे भांडार भरलेले असेल याची कल्पनापण करत येणार नाही। दूरदर्शनवर आणखी शंभर वाहिन्यापण त्यांचे प्रतिनिधित्व करायला पुरे पडणार नाहीत.

कुठेही उधळपट्टी नाही. अपव्यय नाही: नाही शब्दांचा, नाही जीवनावश्यक साधनसामग्रीचा. इंडियातील कोट्यावधी शेतकरी, खेडूत, आदिवासी जनतेला उधळपट्टी परवडणारी नाही.

त्यांचे हे धोरण "प्रथम जगत इंडियाच्या" (First World India) अगदी उलट आहे, मग तो ताजमहल असो की चंद्रयान असो, बॉलीवूड असो की टेलीवूड! पण हे "प्रथम जगत इंडियन लोकांच्या मट्ठ मेंदूत जाईल तेव्हा ना? माझा हा ब्लॉगपण याला अपवाद नसेल!

त्या अद्वितीय लोक गीतांचे काही कण लहानपणीच माझ्या कानावर पडले हे माझे सुदैवच. त्या दिवट्यांचा प्रकाश पण या अरण्यातील अंधारलेल्या रात्रीं पुरेसा होतो, हरवलेल्या शब्दांचा, अर्थांचा, सूरांचा, मुद्रांचा, नादांचा शोध घ्यायला -- वाट दाखवायला -- दिशा दाखवायला.

माझे देशी मानस जाणते, "जीवनासाठी कला" आहे, "कलेसाठी कला" नाही. माझे जे काही विलायती सांघिक पध्दतीने शिक्षण झाले ते काही फारसे परिणामकारक ठरले नाही. मी जरी अंशत: नागरी समाजाचा (civilized society) भाग असलो तरी त्यानेही काही फरक पडत नाही.

माझा एक साधा सरळ समज किंवा विश्वास किंवा श्रध्दा आहे:
"जीवन सर्वश्रेठ आहे; कला - विज्ञान, धर्म - तत्वज्ञान इत्यादी पेक्षा श्रेठ आहे, ही सारी केवळ साधने आहेत. जीवन या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठतम आहे."

रेमीची मराठी बोली प्रस्थापित संकल्पनेतून अंशत: तरी मुक्त झालीय. तरी तिचे लोकगीतापर्यंत -- लोकसाहित्यापर्यंत पोहोचणे बाक़ी आहे. ही झाली प्रवृत्ती, महत्वाकांक्षा नव्हे.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

January 10, 2012

शोध — प्रतिशोध

शोध — प्रतिशोध

ओघाच्या उलट्या दिशेने
चाललेली वाटचाल
तिस्तेच्या झंझावाती
झोतात पोचली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  १

कोयनेच्या उदरातून
उसळलेल्या उद्रेकात
आश्रय घेतला तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही  २

नर्मदामाईच्या उफाळत्या
महापुरातील भोवर्‌यात
ओंडक्याची भिरभिरणार्‌या
संगत केली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  ३

सायरनच्या गोँगाटाने
अन्‌ तोफगोळ्यांच्या धडाक्याने
भरलेल्या निष्टावंत संस्कृतीत
कुशीत मरूभूमिच्या
केली तप्त गोठवणारी शय्या
तेव्हाही असुरक्षितता जाणवली नाही  ४

मिनिटापळांच्या हिशेबात
कितिक आयुष्यांची माती करणार्‌या
अंगावरील अखेरच्या वस्त्राची लक्तरे करणाऱ्या
सुधारक संस्कृतींच्या वावटळीत
झेप घेतली तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही.  ५ 

दिशाशृन्य नागरी अरण्यात
बिनसावलीच्या वाटाना अनंत
अराजकतेचे असंख्य चक्रावणारे
फुटतात धुमारे
तेव्हाही असुरक्षित नाही वाटले  ६ 

या शोधाची सांगता कधी होणार?
रक्ताची कारंजी शुष्क झाल्यावर?
की संवेदनांचे स्फुल्लिंग पिचल्यावर?
भावनांचे श्रोत वाफारल्यावर?
की दगडातील अणुरेणू जागे झाल्यावर?  ७

तारिख ७ .८ .१९९१
***
रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

September 03, 2011

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

किरिस्तावांची दफनभूमी (फोटो : रेमी डिसोजा)
आजच्या सुधारलेल्या नागर समाजात जगणे  तर  महागले, त्याहूनही मरण महागले. 
नैसर्गिक जगणे व  नैसर्गिक मरणही आता दुरापास्त झाले.
 १
त्याच्या तर्काच्या अंती होतसे  काम-लोप
ना ऊर्जा-विनियोग ना श्रम,
जे गेले त्याच्यामागे  नाही जाणे
नाही अनुताप जरी,
वा जे न परते कदापि
वातावरणात अशा,
असो वैरभावी वा उभयभावी
स्वाभाविक वर्तन परी
जेव्हा तन अणि मन
अन आत्मा असती सुसंवादी
२
अंतर्यामी अंतरीक्ष स्वायत्त
नसे अचेतन जड वस्तू
नसे गुलाम ना राहे अलिप्त
बाह्य जगतापासून
असे तेथे निर्भय जावानल
कदापि विझवता न येणारा
क्षूद्र यकच्र्छित सांघिक वेडांना,
जीं येती लाटामागून लाटानी
ज्या उंचावती, कोसळती नी नाहीशा होती.
स्वेच्छेचे निर्वाण अंतर्ज्योतीचे

मीलन योजिले जीवनदात्या जळीं.

मुंबई
(मूळ इंग्रजीचे (Non-action Action) भाषांतर)
* * *
टीप १ : एक कल्पनाविलास
आभाळाचा टिचभर तुकडा त्याला होता पुरेसा जगायला, ज्यावर नाही कुणाची सत्ता. जन्मतः होती त्याच्या पायांवर भिंगरी. ती त्याला घेऊन फिरली जन्मभर घरवाडी बकोटीला मारून गांवोगांव, विंचवाचे बिर्‌हाड पाठीवर म्हणतात तसे; असा होता एक दरवेश!
त्याने कधीं  नाही केला संग्रह, नाही ठेवल्या आकांक्षा, अपेक्षा, ना ध्येय, ना लक्ष्य. या गोष्टी जीवनाने त्याला कधी सांगितल्याच नव्हत्या. ती सारी गणिते होती नागरी सत्तेने मांडलेली आणि सत्तेच्या भक्तांची व गुलामांची. ती गणिते होती नागरी संस्कृतिने जन्मास घातलेल्या सत्तेच्या दुष्टचक्रात जे अडकले त्यांनी निर्माण केलेली.
सत्तेच्या या चक्राने नैसर्गिक जगणे व मरणे माणसाला दुरापास्त करून ठेवले. यातूनही त्याने मार्ग काढला.
सर्वांत सहज असा मार्ग : मरणोत्तर नाही जाळणे - ऊर्जेचा व्यय टाळणे, नाही गाडणे - जगायला जमीन नाही मग महागले मरणे.
राहिले जळ - जेथे जीवन गवसले तेथेच अर्पिणे.
Underwater life & death
 चित्रसंदर्भ : इंटरनेट
टीप २ : नुकतीच बीबीसीवर बातमी वाचली : New body 'liquefaction' unit unveiled in Floridafuneral home (BBC News Science-Environmrnt). फार गम्मत वाटली. एकीकडे पर्यावरणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सर्व मानवजातीला कारणीभूत ठरवायचे, दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करायचे नवेनवे मार्ग शोधायचे!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 13, 2010

समकालीन त्रिशंकूचे गाणे

मीपण माझे कुरवाळीत असे मी निरंतर  
माझ्याच कल्पलोकात.   
अठराविश्वे  अन्नान्नगत  दारिद्र्य    
तीस कोटी माणसे मायदेशी भोगत असले तर?     
तर मला काय त्यांचे?   
ते भोगतात त्यांच्या दैवाची फळे!    

मग मी का बरे शोधतोय माझी तोंड-देखली     
जात-जमात आंतरंजालाच्या     
मायावी वास्तवाच्या प्रतिविश्वात     
महागड्या उपग्रहावर संदेश पाठवून?      
माझ्या बलवत्तर दैवाने        
एक पुष्पक विमानच का नाही खरेदी केले?    
"नशीब गांडू तर काय करी पांडू?"     

अरेऽमी असा आसामी!    
यंत्र-मंत्र-तंत्र  विधींच्या आधुनिक विश्वामित्राने    
सुखसमृद्धीचे प्रतिविश्व निर्माण करून   
द्यायची ग्वाही देऊन केला माझा त्रिशंकू!    

आणि हाडामांसाच्या, रक्ताकुडीच्या, जित्याजागत्या 
घरच्याच माणसांना लाविले की रे    
माझ्या हव्यासाने देशोधडीला!    
असा मी उर्मट उद्याम समकालीन त्रिशंकू!   

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | १०-०८-२०१० 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 15, 2010

संधिप्रकाश मंडल: विसाव्या शतकाचे श्राध्द

 (मूळ "Twilight Zone" (१६-०८-१९९९)  या प्रकाशित इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर: पहा दुवा )
संधिप्रकाश  (Image Source: Internet)
गवाक्ष कुटीचे - नजर जगतावर 
सरकते पुढे पुढे, ढगांच्या पंखांवर
यात्रा दिवस-रात्रीच्या संधीवर 
जेथे धरती व तारकांचा वसे परिवार 
येथे ना कुणी स्पर्शू करू शके, येथे ना
स्थान कःपदार्थ सिध्दांताना
व्यापार, राजकारण अन् दर्शनांच्या; 
अन भूचरांना जयाना नसे घरोबा 
वसुंधरा व दिवाकराशी, जे जगतात
आत्मप्रतारणेत अन फुगवलेल्या वादंगांत
प्रमाणाबाहेर. काम - काम - काम,
काम जो सोडीजे मागे भव्य भग्नावशेष 

दैवते, भगत, जे जगती देऊन प्रवचने   
मुक्तीच्या आशेची व उभारती स्मारके
रक्ताच्या साड्यांवर भूचारांच्या, जे जखडलेले 
सर्वकाळ अराजकांच्या साखळदंडांत.









पावन आहेत गांडुळे दुरस्त 
सार्वजनिक नजरेआड, ते नाही निर्मित
धर्मशास्त्रे वा स्मारके आपल्या

विष्टेतून वारसांसाठी, वा  संहार जीवनाचा.



रेमीची स्-प्रतिमा 
*    *    *    *    *
टीप: १. प्रतिमा - गांडूळे, मृदा संधारण करणारा पर्यावरणातील एक महत्वाचा जीव, जो अजूनपर्यंत दुर्लक्षित होता.  
२. प्रतिमा - रेमीची स्व-प्रतिमा, विसाव्या शतकाचे प्रतिक - स्वत:चेच एक विडंबन चित्र   
३. प्रतिमा: संधिप्रकाश (source - Internet )

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2009

त्याना देवकळा पाषाणाची

त्याना देवकळा पाषाणाची 
नेते महात्मे समाजधुरंधर  
अरे परमेश्वर तर कधीचा गेला 
पाषाण होवून राहिला
मीच आहे ब्रम्ह म्हणून 
इमान राखावे स्वत:शी. 



त्याना देवकळा पाषाणाची 
संत महंत संस्क्रुतिंचे आधार 
मी आहे ना जीव हाडामासाचा
इमान राहू दे जिवाशी-जीवनाशी



त्याना देवकळा पाषाणाची
पोथ्या पुराणे दर्शने  
धरतीची लेकुरे आम्ही 
आम्ही प्रेषित आमच्या जिंदगीचे 
मी आहे पूत मातीचा 
शपथ आहे रक्ताची. 

ऋतु वर्षांचे चक्र चक्र
परंपरा संस्कृतिंचे 
त्या वाळवंटात हौतात्म्य 
पिचत राहिले मानवतेचे 
त्या बलिदानाशी 
इमान राहु दे.
*    *    *

 (स्थळ: वडोदरा
सन: १९६७)

 
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 31, 2009

वळवाचा पाऊस (पावसाचे गाणे)

वळवाचा पाऊस येई वाजत गाजत --
विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट,
कधी पाऊस , ऊन कधी, सप्तरंगी इंद्रधनू कधी
मुलेबाळे मस्त होती घरकुलांच्या गच्चीवरती

महानगरीँ जाती पावसाळे होऊनी पळें
शेवटच्या टप्प्यावरी पाऊस वळवाचा परी
आणितसे अमोल लेणे साळीच्या पिकाचे
विधिलिखित असें विद्रोही कवितेचे

(जन्म-मरणाच्या चक्रात अरे ऽ मी गुंते )
* * *
टीप १: शेवटच्या ओळीतील "अरे ऽ मी " हा शब्दश्लेष आहे.
(१) यातील "मी" म्हणजे मीपण / अंहकार;
(२) "मी" हा लेखक असेल किंवा वाचक;
(३) "अरे ऽ मी " हा मध्यम पद-लोपी समास पण होतो: मी मालवणला माझ्या जन्मगावी प्राथमिक शाळेत शिकत होतो. वर्गात एकदा मास्तर बोलले, "अरे ऽ मी काय बोलतोय ऐकलस का?" सर्वानी वर पाहिले. पण मास्तर माझ्या नजरेला नजर भिडवून म्हणाले, "होय, मी तुलाच विचारतोय..." झाले. वारयासाराखे "अरे ऽ मी " नाव गावभर पसरले. मास्तरानी "अरे रेमी" तील एक "रे" गाळला होता.
टीप २: पहा "इंद्रधनुष्ये" (इंग्रजी)


रेमीजीयस डिसोजा
मुंबई
२७-०८-२००९


~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 19, 2009

जेव्हा आम्ही भेटू मरणा समोरा समोरी

"...आज करेसो अब कर" — कबीर


जेव्हा आम्ही भेटू मरणा
समोरा समोरी
पुरेसे एक अनेकवार
हरवण्या काहीच नसे

जेव्हा आम्ही एकमेका भेटतो
जेव्हा आम्ही घरा परततो
जेव्हा आम्ही कामासी जातो
दरेक वेळी अखेरच्या वेळी

दरेक भेटणे,
दरेक परतणे
दर दिनी कार्य प्रतिक्षा
दरेक क्षण आत्ता इथे
आहे उत्सव जीवनाचा
नमन असे मरणासी
* * *

(मूळ इंग्रजीचे भाषांतर)

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 14, 2009

अशी कविता: एक कोडें

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 29, 2009

एका समकालीन आदीवासीचे आनंदगान


एका समकालीन आदीवासीचे आनंदगान



आमच्या पितरांच्या मातीत अणि पाण्यात 
मी नाही रेव किंवा नाही उपोत्पादन
या अमानुष अराजकाचा नागर-सांस्कृतिक,
जी देत
असते आव्हाने दरेक श्वासागणिक
मानवतेच्या प्रतिष्टेला आणि आत्मसन्मानाला.


आम्ही नाही उदास किंवा नाही निराश
आमच्या हवस-विरहित जीवन शैलीमुळे. आम्हास
जीवन आहे
श्रेष्टतम सर्वतोपरी वस्तुंपेक्षा मानवनिर्मित.
आमचा हरेक श्वास असतो निमित्त खचित
जीवनोत्सवाचा सोहळा साजरा हरेक कर्मात
आनंदाचे लेणे घेऊन येणारा सदोदीत;

असे जरी सभोवार हीणकस कितीही अराजकता.
तिचे
मुक्त पतन करतात तिचीच समीकरणे
आणि आरोपणे, तिचे कुप्रसिध्द
अन् सुप्रसिध्द भाट ; तें सारेंच जाणार धुपून
काळ-पुराच्या महाद्वारातून
होणार अज्ञातात विलीन.

सुपूर्त करतो मी माझ्या निष्टेचे आश्वासन
आमच्या पुनर्भेटीचे प्राचिनतेत
आमची जीजीविषा उड्डाणास तयार सदोदीत
ओ, माझ्या आप्तस्वकीयानो, आदिम प्रकृतित!
 

 - - - - - -
 (मूळ "Song of an aborigine in our time" या इंग्रजी कवितेचे भाषांतर)
- - - - - - -




प्रतिमा: १, भिल्ल आदीवासी होळीचा उत्सव साजरा करतात सातपुड्याच्या कुशीत.
पतिमा २ व ३, भिल्ल आदीवासी षोडशांचे नृत्य अन गान; गांव चिखली, सातपुड्याच्या कुशीत.
(छाया-प्रकाश चित्रे: रेमीजीयस डिसोजा)
पावसाळ्याचे दिवस होते. मक्याचे पीक तयार झाले होते. योगायोगाने तो दिवस होता "दिवासौ" सणाचा, पितरांच्या आठवणीत. चिखली गांवाचे आदरातिथ्य स्नेहाने भरलेले. सर्वानी मोहाची मदिरा घेतली. ती पिण्यास खास एक वीतभर लांबीचा छोटा तुंबडा घेतात, त्यात जेमतेम २-३ चमचे दारू मावते. ताडी पिण्यासाठी मात्र हातभार लांबीचा तुंबडा वापरतात. मोहाची दारू घरोघर तयार करतात. त्यामुळे तिला हस्तकलेचा दर्जा प्राप्त होतो. कोणतीही विलायती कारखान्यात तयार केलेली दारू तिची बरोबरी करू शकत नाही.
मोहाचे झाड अनन्यसाधारण आहे. त्याला बहार येतो तेव्हा साऱ्या गावात आणि वनात त्याच्या फुलांचा मधूर सुगंध पसरतो. बहराच्या हंगामात त्याच्या फुलांची भाजी करतात, तसेच सुकवून ठेवतात आणि दारू पण गाळतात. ती खास दिवशीच काढतात. त्या दिवशी मोहाच्या फुलांचे पीठ मक्याच्या पिठात मिसळून बिस्किटा सारख्या रोटल्या तयार केल्या होत्या. त्यांची चव मधुर होती. सुगंधाला पण चव असते.



~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2008

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठालो आहे माझ्या फोंसिलमधून
माझ्या न्यायाचा क्रूस नको घेऊन जाऊ
आता वाढलीय महागाई - साखर
अन्नधान्य हवापानी कापडचोपड
शब्द पण महाग आहेत
आणि वाढलाय व्यापार
कमाई उरण्याची खिंडारे भगदाडे.
---
बडोदे
फेब्रुवारी १९७०

~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape