October 21, 2010

इंडीयाचे संतकवी

 मनोगतः कबीर ते तुकाराम या सुमारे तीनशें वर्षांच्या काळात सर्व देशभर अनेक भाषांत अनेक संतकवी झाले. तेव्हा (अन आताही) सामान्य जनांसाठी पाठशाळा नव्हत्या. संतांसाठी प्रसारमाध्यमे व राजाश्रय नव्हते. तरीही आजपावेतो लाखो लोकाना ते तोंडपाठ आहेत. त्यांच्या रचना लोकभाषेंत आहेत; त्याना गेयता आहे; ध्यानात ठेवायला सोप्या. व सर्वात महत्वाचे, त्या लोकाभिमुख आहेत. कथा, कीर्तन, भवई इ. माध्यमे आणि संतकवी हे जनसामान्यांना आजही चालत्या बोलत्या पाठशाळा आहेत.

~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2010

मुंबईच्या एका चौपाटीवर (कविता ): मुंबईत आपला परिसर

मुंबईच्या एका चौपाटीवर  
अनेक दर्प, गंध, सुगंध अगणित    
खसखस नायलॉनची 
किलबिल कुणाची    
फडफड पदराची  
वारा येतो गर्दी शोधीत   
गजबज इथे बजबजपुरी  
त्यात तू एक  
अन मी एक  


मीही एक गर्दी शोधीत  
माझे एकटेपण कुरवाळीत गोंजारीत   
उबगलेले उच्छ्वास टाकणयासाठी   
जागा शोधीत   
चौपाटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ---  
इथल्या पुळणीतसुध्दां संस्कृतीने घाण करून ठेवली आहे ---  
ढुंगण टेकवीन म्हटले तर.  

मधूनच बाहूला तंग चोळीचा मृदू स्पर्श   
बोटात गुंतवलेली बोटे   
एकांत शोधतात    
कोपरखळी आडोसा शोधीत    
पुराण्या संकेतांचे संवाद   
जवळीक करू पाहतात.     

इथल्या वाळूत वाकडी पावले बोचत नाहीत
इथे असती संवाद - विसंवाद - वाद सतत  
ही एक बजबजपुरी   
त्यात तू एक   
अन मी एक   .
*    *    *    *    *
लेखन १९६५     
टीप: १. मजा अशी कि चाळीस वर्षांनंतर मुंबईचे वातावरण / पर्यावरण किती सुधारले / किती बिघडले हे नागरिकांनी ठरवायचे. चित्रातील वरळी-सी-लिंक बघायला  आकाशात कोण जाणार? सिनेमा - टीवी वरच्या जशा "सेलिब्रिटीज" तसाच हा पूल!! दोनीही नागरिकांच्या खिशाला कात्री लावतात - निष्क्रीय करमणूक करतात. आणि समाजातील एक - दोन टक्के लोकांचे खिसे भरतात.
२. छायाचित्र  रेमीजीयस डिसोजा, मुंबई   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape