Showing posts with label मुक्तछंद. Show all posts
Showing posts with label मुक्तछंद. Show all posts

September 15, 2013

रेमीची मराठी बोली - एक व्यत्यासकथा

'i'ness - 'मी'पण - रेमीचे सेल्फ-पोर्ट्रेट । सन १९६७ ।
संगणकाचा वापर करून हे चित्र पुन्हा रेखाटले. विज्ञानात अनेक लिप्या सोयीप्रमाणे आल्या. तसाच येथे भूमितीचा वापर केला. स्व-प्रतिमेत चेहरा दिसायला हवाच का!

('रेमीची मराठी बोली' या शीर्षकाखाली हे गद्यकाव्य किंवा व्यत्यास-कथा पूर्वी २१ जून २००८ साली जेव्हा हा ब्लॉग सुरू करताना प्रसिद्ध केला होता. ते "jpg" चित्र होते. त्याच्यात काही फेरफार, दुरुस्त्या करून पुनश्च प्रसिद्ध करतोय.)

रेमीची मराठी बोली

रेमीचा आणखी एक : मराठी ब्लॉग : भाषा मराठी पण बोली वेगळी.
एका कुटुंबात १०, ५, किंवा २ माणसे असतील, त्यांचे उच्चार वा बोलण्याची लकब सारखीच असेल, वा भासेल, पण बोली मात्र कालमान वातावरणानुसार स्वतंत्र असते; जसे बोटांचे ठसे. जसे एकाच झाडावरील प्रत्येक पानावरील शिरांचे चित्र मात्र वेगवेगळे असते.

तसे वाहनतळावर उभ्या असलेल्या मोटारींचे नसते. रंग आणि आकारात कितीही विविधता आणण्याचा  प्रयत्न केला तरीही! तीच गोष्ट शहरातील आधुनिक इमारतींची ! पण गावातील मातीची किंवा दगडाची घरे ग्रामीण शैलीची असली तरी मोहवल्यावाचून राहात नाहीत.

हीच तर नैसर्गिक विविधतेची रंगत आहे.

पन्नास-साठ वर्षे भटकंती केल्यावर त्याची छाप रेमीच्या बोलीवर  — शब्द, अर्थ आणि नाद यावर  — पडल्यावाचून कशी राहील ?

आयुष्यभर भटकंती करणारा नेहमी समासाच्या कडेवर फिरत असतो. पण त्याचे फिरणे टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखे झडपा लावलेले नसते. किंवा  रुळावर दौडणाऱ्या आगगाडीसारखे नसते. किंवा नसते विमानाचे एका टींबापासून दुसऱ्या टींबापर्यंत आखलेले उड्डान. किंवा नसते त्याला जाती-धर्म-वर्गाची बांधिलकी.

त्याची भटकंती असते मधमाशीचा प्रवास  — तिच्याबरोबर तिचे पोळेपण फिरत असते.
त्याची भटकंती असते वनवासीचा अरण्यातील स्वैर स्वच्छंद विहार.

सह्याद्रीच्या पायथ्याशी सुरु झालेल्या या भटकंतीची  सांगता होणार जगल्यावाचल्यास परतल्यावर मायदेशी  — गोंडवनी.
 
रेमिजीयस डिसोजा
२१-०६-२००८
मुंबई

टीप : सुधारित पोस्ट

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


January 10, 2012

शोध — प्रतिशोध

शोध प्रतिशोध

ओघाच्या उलट्या दिशेने
चाललेली वाटचाल
तिस्तेच्या झंझावाती
झोतात पोचली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  १

कोयनेच्या उदरातून
उसळलेल्या उद्रेकात
आश्रय घेतला तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही  २

नर्मदामाईच्या उफाळत्या
महापुरातील भोवर्‌यात
ओंडक्याची भिरभिरणार्‌या
संगत केली तेव्हाही
असुरक्षितता जाणवली नाही  ३

सायरनच्या गोँगाटाने
अन्‌ तोफगोळ्यांच्या धडाक्याने
भरलेल्या निष्टावंत संस्कृतीत
कुशीत मरूभूमिच्या
केली तप्त गोठवणारी शय्या
तेव्हाही असुरक्षितता जाणवली नाही  ४

मिनिटापळांच्या हिशेबात
कितिक आयुष्यांची माती करणार्‌या
अंगावरील अखेरच्या वस्त्राची लक्तरे करणाऱ्या
सुधारक संस्कृतींच्या वावटळीत
झेप घेतली तेव्हाही
असुरक्षित वाटले नाही.  ५ 

दिशाशृन्य नागरी अरण्यात
बिनसावलीच्या वाटाना अनंत
अराजकतेचे असंख्य चक्रावणारे
फुटतात धुमारे
तेव्हाही असुरक्षित नाही वाटले  ६ 

या शोधाची सांगता कधी होणार?
रक्ताची कारंजी शुष्क झाल्यावर?
की संवेदनांचे स्फुल्लिंग पिचल्यावर?
भावनांचे श्रोत वाफारल्यावर?
की दगडातील अणुरेणू जागे झाल्यावर?  ७

तारिख ७ .८ .१९९१
***
रेमीजीयस डिसोजा 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

April 01, 2011

मातीचा माणूस - मातीचा सुगंध : Son of the Soil

मातीचा माणूस - मातीचा सुगंध

मातीचा गोळा     माणूस त्यातून केला
नांव त्याचे ठेवले     मातीचा पूत

पावसांत त्याला     भिजत ठेवला कुजत ठेवला
ठोकून थोपटून घडवला     उनांत त्याला करपला

मातीचा गोळा     केला त्याचा एकाच प्याला
साठवली     पहिल्या धारेची त्यात नशा
    मध्य रात्रीच्या     नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा गोळा     त्याची केली     पणती
वात त्यात पेटवली     मध्य रात्रीच्या
    नि:शब्द सान्निध्यात.

मातीचा माणूस     विसाव्या शतकाच्या अखेरीला
चावूनझ चालायमा राजकारणी     लोकांची पंथास लागलेला.

माणसाची माती    उंबरठ्यावर     एकविसाव्या शतकाच्या.

मातीचा सुगंध.   

* * *
मुंबई | ६.३.१९८९
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2010

मुंबईच्या एका चौपाटीवर (कविता ): मुंबईत आपला परिसर

मुंबईच्या एका चौपाटीवर  
अनेक दर्प, गंध, सुगंध अगणित    
खसखस नायलॉनची 
किलबिल कुणाची    
फडफड पदराची  
वारा येतो गर्दी शोधीत   
गजबज इथे बजबजपुरी  
त्यात तू एक  
अन मी एक  


मीही एक गर्दी शोधीत  
माझे एकटेपण कुरवाळीत गोंजारीत   
उबगलेले उच्छ्वास टाकणयासाठी   
जागा शोधीत   
चौपाटीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ---  
इथल्या पुळणीतसुध्दां संस्कृतीने घाण करून ठेवली आहे ---  
ढुंगण टेकवीन म्हटले तर.  

मधूनच बाहूला तंग चोळीचा मृदू स्पर्श   
बोटात गुंतवलेली बोटे   
एकांत शोधतात    
कोपरखळी आडोसा शोधीत    
पुराण्या संकेतांचे संवाद   
जवळीक करू पाहतात.     

इथल्या वाळूत वाकडी पावले बोचत नाहीत
इथे असती संवाद - विसंवाद - वाद सतत  
ही एक बजबजपुरी   
त्यात तू एक   
अन मी एक   .
*    *    *    *    *
लेखन १९६५     
टीप: १. मजा अशी कि चाळीस वर्षांनंतर मुंबईचे वातावरण / पर्यावरण किती सुधारले / किती बिघडले हे नागरिकांनी ठरवायचे. चित्रातील वरळी-सी-लिंक बघायला  आकाशात कोण जाणार? सिनेमा - टीवी वरच्या जशा "सेलिब्रिटीज" तसाच हा पूल!! दोनीही नागरिकांच्या खिशाला कात्री लावतात - निष्क्रीय करमणूक करतात. आणि समाजातील एक - दोन टक्के लोकांचे खिसे भरतात.
२. छायाचित्र  रेमीजीयस डिसोजा, मुंबई   

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 13, 2010

समकालीन त्रिशंकूचे गाणे

मीपण माझे कुरवाळीत असे मी निरंतर  
माझ्याच कल्पलोकात.   
अठराविश्वे  अन्नान्नगत  दारिद्र्य    
तीस कोटी माणसे मायदेशी भोगत असले तर?     
तर मला काय त्यांचे?   
ते भोगतात त्यांच्या दैवाची फळे!    

मग मी का बरे शोधतोय माझी तोंड-देखली     
जात-जमात आंतरंजालाच्या     
मायावी वास्तवाच्या प्रतिविश्वात     
महागड्या उपग्रहावर संदेश पाठवून?      
माझ्या बलवत्तर दैवाने        
एक पुष्पक विमानच का नाही खरेदी केले?    
"नशीब गांडू तर काय करी पांडू?"     

अरेऽमी असा आसामी!    
यंत्र-मंत्र-तंत्र  विधींच्या आधुनिक विश्वामित्राने    
सुखसमृद्धीचे प्रतिविश्व निर्माण करून   
द्यायची ग्वाही देऊन केला माझा त्रिशंकू!    

आणि हाडामांसाच्या, रक्ताकुडीच्या, जित्याजागत्या 
घरच्याच माणसांना लाविले की रे    
माझ्या हव्यासाने देशोधडीला!    
असा मी उर्मट उद्याम समकालीन त्रिशंकू!   

रेमीजीयस डिसोजा | मुंबई | १०-०८-२०१० 

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape