Showing posts with label Environment / पर्यावरण. Show all posts
Showing posts with label Environment / पर्यावरण. Show all posts

December 31, 2011

जागतिक महायुद्धे नादाविना

आय-टेक्नोमॅन, रेमीची स्व-प्रतिमा
अहंकार उर्मट उच्च-तंत्रज्ञाचा
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा
निर्मीतो कॉम्प्यूटर, उपग्रह, महानगर
अन् करी कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनही, धरतरीच्या उरावर :
जागतिक
महायुद्धे नादाविना.
* * *
(मधुकोष गोंडवनी या ब्लॉगवर प्रसिद्द केलेल्या मूळ "WORLD WARS WITHOUT BANG" इंग्रजी कवितेचा अनुवाद)
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | २८-१२-२०११

कांही इंग्रजी दुवे - १. Missed Target of 9/11, २. iTECHNOMAN
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

September 24, 2011

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिस

सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र  
ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन्‌ मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!

मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, भारावलो. सारी दुपार तेथेच काढली. संकुलात सभोवार भटकलो. कधी झाडांच्या सावलीत ताणून दिली. आणि आठवणीसाठी त्याचा एक आराखडा रेखाटला. जवळ कॅमेरा होता, पण एकही फोटो टिपला नाही. सारा वेळ तेथील शांत शीतळ वातावरणाचा सर्व संवेदना एकवटून आस्वाद घेत राहिलो.

सोलापूर, विजापूर जिल्हे कमी – २५ ते ३० ईंच – पावसाचे, उष्ण-कोरड्या हवामानाचे. अर्थात येथे पाण्याची कमतरता! आणि इथे पाहातो तर पारंपरिक वास्तुशिल्पाने ओयासिस निर्माण केले होते.

आजच्या सुधारलेल्या युगात पर्यावरणाचा बराच गवगवा होतोय. पण व्यवहारात मात्र उलटेच होत असलेले दिसते.

शहरांत इमारतींची उंची वाढत जातेय तर खेडोपाडीं पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढतेय. कोंकणात १००-१२०  इंच पाऊस पडतो पण जमिनीतील पाणी १५० मात्र फूटाहून खाली गेलेय. मुंबई महानगरात पाण्याची कशी वाताहात होतेय विचारू नका!

वास्तू-महाविद्यालयात भारतीय वास्तूशिल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या मंदिराचा उल्लेख कधी आला नाही. अर्थात ती पुस्तके परदेशी विद्वानांनी लिहिली होती.

या वास्तू-इतिहासाचा अभ्यास करताना (शिकवताना व शिकताना) समकालीन नैसर्गिक, तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक पर्यावरणाचा विचार कधी शिवलाच नाही. केवळ सौंदर्यशास्त्राच्या रूढ संकेतांचा रट्टा मारणे चालत असे.

मूलतः वास्तू व पर्यावरण यांचा घनिष्ट संबंध आहे. किबहुना पर्यावरणात बदल करणे हा वास्तूचा मूल उद्देश आहे, मग ती झोपडी असो की प्रासाद असो, शेती असो वा उपवन असो, विहीर असो वा तलाव असो (हे सर्व वास्तशिल्पाचे प्रकार). पर्यायाने वास्तू पारिस्थितिकीत पण बदल करते आणि ऊर्जेचा व्यय पण करते.*

जेथे जळ आले तेथे जीवन आले, तेथे जलचर आले, तेथे वानसे आली, तेथे वनचर आले, त्याने समृद्धी आली.

उजाड फतेपूर सिक्री : ही वास्तू मोगल बादशहा अकबराने आपल्या नव्या राजधानीसाठी बांधली. हे सर्वश्रूत आहे. तेथे खास तानसेनसाठी एक छोटा कृत्रिम तलाव बांधलेला आहे व मध्यभागी गाण्यासाठी बैठक आहे.

अकबराने सर्व लवाजमा घेऊन त्याच्या नव्याकोर्‌या राजधानीत स्थलांतर केले. पण काही दिवसांनंतर तो आपला बाडबिस्तरा घेऊन परत मागे गेला. कारण तेथे पाणी पुरवठा नव्हता. मुंबईची पण अशी अवस्था व्हायला फार काळ जाणार नाही!

उजाड पडलेली फतेपूर सिक्री 'वास्तूशिल्पा' चे एक वस्तूसंग्रहालय musium होऊन राहिली.

सिद्धेश्वर मंदिराची वास्तू निवांतपणे पाहिली. मंदिराच्या चारी बाजूंना सिद्धेश्वर तलावाचे पाणी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नियोजन व संधारण यांचे हे अनन्यसाधारण जीवंत - जागृत - उदाहरण आहे! अशा इतरत्र अनेक विहिरी, तलाव, मंदिरे, मशिदी, राजवाडे, गांवे, किल्ले, उपवने, शेतीवाड्या इ. वास्तू सर्व भारतभर आहेत. प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय! पण यासम ही! एक सुजलाम सुफलाम वास्तू!

अशा पारंपरिक वास्तू लोकशिक्षणाची लोकाभिमुख साधने असतात असा माझा निष्कर्ष आहे आणि श्रद्धा पण! जो शिकला नाही तो करंटा. येथे प्रात्यक्षिकाने, उदाहरण देऊन व्यावहारिक पाठ दिले जातात असे मला प्रांजळपणे वाटते. याला देव पावले म्हणायचे नाही का?

माणसे ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत लक्षावधी वर्षें चित्रविचित्र नैसर्गिक परिस्थितीत राहात आले.

सृष्टी मानव समाजाना ओळखत नाही – मग तो समाज आपल्या कल्पनेप्रमाणे मागासलेला असो वा पुढारलेला. सृष्टी मानवाच्या सामाजिक अधिश्रेणी वा हुद्दे ओळखत नाही, मग ते सम्राट-पंतप्रधान, संत-महंत वा काळे-गोरे-पिवळे-ब्राऊन असोत. सृष्टीच्या लेखी जीवाणू व मानव यांत काहीच फरक नाही.

ती सर्वांचा भार वाहण्यास समर्थ आहे. सृष्टीचे अलिखित नियम जाणून त्यानुसार वागले तर दुसऱ्याचा भार उचलायची गरज राहणार नाही; खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल. मात्र उद्दाम उर्मट माणूस समाजातील आपल्या सत्तेच्या जोरावर हे विसरतो.

इथून पुढची माझी यात्रा विजापूर, ऐहोळी, पडत्कल (इंग्रजी अपभ्रंश - Pattadakal), बदामी - लेणी व गांव; नंतर बागलकोट - बेळगांव मार्गें माझ्या घरी कोंकणात. मायला माझा अवतार पाहून रडूं कोसळले. दहा दिवसांत माझे दहा किलो वजन घातले होते.

मग आठवडाभर घरी असताना रोज सकाळी सड्यावर लक्या धनगराच्या वाड्यावर जायचे, अनशापोटी शेळीचे धारोष्ण दुध ग्लास भरून प्यायचे हा माझा रोजचा क्रम. आठवड्याभरात माझ्या गालांवर गुलाबी आली.

आयुष्यभर केलेले भटकणे केवळ यात्रा होत्या, प्रवास (tours) नव्हते, की कधी प्रवासवर्णने लिहिली नाहीत. उद्धेश केवळ अध्ययन. वर लिहिलेले प्रवासवर्णन नव्हे. मी काय शिकलो त्याची केवळ नोंद आहे.

टीप: घर आणि परिसर – झोपडी, प्रासाद, शेतीवाडी, उपवन, तलाव, विहीर, इ. सर्वांचा – वास्तूमध्ये समावेश होतो.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 03, 2011

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

किरिस्तावांची दफनभूमी (फोटो : रेमी डिसोजा)
आजच्या सुधारलेल्या नागर समाजात जगणे  तर  महागले, त्याहूनही मरण महागले. 
नैसर्गिक जगणे व  नैसर्गिक मरणही आता दुरापास्त झाले.
 १
त्याच्या तर्काच्या अंती होतसे  काम-लोप
ना ऊर्जा-विनियोग ना श्रम,
जे गेले त्याच्यामागे  नाही जाणे
नाही अनुताप जरी,
वा जे न परते कदापि
वातावरणात अशा,
असो वैरभावी वा उभयभावी
स्वाभाविक वर्तन परी
जेव्हा तन अणि मन
अन आत्मा असती सुसंवादी
२
अंतर्यामी अंतरीक्ष स्वायत्त
नसे अचेतन जड वस्तू
नसे गुलाम ना राहे अलिप्त
बाह्य जगतापासून
असे तेथे निर्भय जावानल
कदापि विझवता न येणारा
क्षूद्र यकच्र्छित सांघिक वेडांना,
जीं येती लाटामागून लाटानी
ज्या उंचावती, कोसळती नी नाहीशा होती.
स्वेच्छेचे निर्वाण अंतर्ज्योतीचे

मीलन योजिले जीवनदात्या जळीं.

मुंबई
(मूळ इंग्रजीचे (Non-action Action) भाषांतर)
* * *
टीप १ : एक कल्पनाविलास
आभाळाचा टिचभर तुकडा त्याला होता पुरेसा जगायला, ज्यावर नाही कुणाची सत्ता. जन्मतः होती त्याच्या पायांवर भिंगरी. ती त्याला घेऊन फिरली जन्मभर घरवाडी बकोटीला मारून गांवोगांव, विंचवाचे बिर्‌हाड पाठीवर म्हणतात तसे; असा होता एक दरवेश!
त्याने कधीं  नाही केला संग्रह, नाही ठेवल्या आकांक्षा, अपेक्षा, ना ध्येय, ना लक्ष्य. या गोष्टी जीवनाने त्याला कधी सांगितल्याच नव्हत्या. ती सारी गणिते होती नागरी सत्तेने मांडलेली आणि सत्तेच्या भक्तांची व गुलामांची. ती गणिते होती नागरी संस्कृतिने जन्मास घातलेल्या सत्तेच्या दुष्टचक्रात जे अडकले त्यांनी निर्माण केलेली.
सत्तेच्या या चक्राने नैसर्गिक जगणे व मरणे माणसाला दुरापास्त करून ठेवले. यातूनही त्याने मार्ग काढला.
सर्वांत सहज असा मार्ग : मरणोत्तर नाही जाळणे - ऊर्जेचा व्यय टाळणे, नाही गाडणे - जगायला जमीन नाही मग महागले मरणे.
राहिले जळ - जेथे जीवन गवसले तेथेच अर्पिणे.
Underwater life & death
 चित्रसंदर्भ : इंटरनेट
टीप २ : नुकतीच बीबीसीवर बातमी वाचली : New body 'liquefaction' unit unveiled in Floridafuneral home (BBC News Science-Environmrnt). फार गम्मत वाटली. एकीकडे पर्यावरणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सर्व मानवजातीला कारणीभूत ठरवायचे, दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करायचे नवेनवे मार्ग शोधायचे!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 01, 2010

सवाल लाखांचा आहे ना?

कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्याची पहिली सुमारे सतरा-अठरा वर्षे व्यक्तित्वाच्या घडणीच काळ असतो. या काळातील त्याला मिळणारे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखता (orientation) व पर्यावरण (नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय)" ही त्यास कारणीभूत असतात. पारिस्थिकी (ecology) व उर्जा (energy) ही दोनही पर्यावरणाची अंगे असतात. ही स्थिती त्या व्यक्तीच्या पुढच्या आयुष्याची दिशा पण ठरवतात. यानंतरच्या काळात व्यक्तिमत्व (personality) घडते; जसे नवीन कौशल्य / नैपुण्य (skills) व माहिती (information) जमा करणे. याची दिशा पण हा घडणीचा काळच ठरवतो.

याचे एकच उदाहरण पुरे:
वियेतनाम येथे विसाव्या शतकात बरीच वर्षे युघ्द चालले. या काळात एक पिढी बेचिराख झालेल्या युध्दभूमीवर जन्माला आली, वयात आली व बंदूक हातात घेऊन युघ्दात सामील झाली.

मुंबईत (व इतर शहरात) एक-दोन पिढ्या झोपडपट्टीत व रस्त्याकडेस जन्मास आल्या व वाढलेल्या लेखकाने पाहिल्या. त्या फक्त लोकसंख्येच्या आकडेवारीत जमा झाल्या: एक निशब्द युध्द चालू राहिले, कसलाही आवाज न करता. त्यांची वसती आता मुंबईत साठ टक्के आहे असं म्हणतात. इथे अधून मधून आतंक, अतिरेक, दंगली इत्यादींचे स्फोट होत असतात. अर्थातच यामागे धनवानच असणार! या विस्थापितांची पुढची दिशा कोणती?

सद्या दूरचित्रवाणीवर "Indian Idol" दाखवत आहेत. शहरा-शहरांतून हजारो उमेदवार रांगा-रांगांत आपला नंबर लागेल या आशेने उभे असलेले दिसतात. काही यौवनावस्थेत, काही पोक्त आहेत. .
मुंबईच्या झोपडपट्टीत सुमारे १२ - १५ लाख मुले असतील.

"घडणीच्या काळात" या सर्वांचे "संगोपन, अध्ययन, दिशाभिमुखन व पर्यावरण" कोणत्या अवस्थेत झाले असेल?
शासक, प्रशासक, प्रव्यवसायिक किंवा अनु मलिक आणि कंपनीला याचा विचार करायला वेळ कुठे? सवाल लाखांचा आहे ना?

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 23, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

तंत्र युग (Technology Age)

सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध असावा असे वाटत नाही. पण जास्त खोलात जावेसे कधी वाटले नाही.

रोज सकाळी अंगणात शेण सडा सारवून रांगोळी घालण्यापासून सैपाकघरातील असंख्य क्रिया तंत्र विधीच आहेत. हा ब्लॉग लिहिणे पण तंत्राचा भाग आहे. कारखान्यात लेथ मशिनावर वेगवेगळ्या इंजीनाना लागणारया हजारो भागांच्या हजारो नकला तयार केल्या जातात. हे पण तंत्र आहे. झोपडी, गगनचुंबी इमारत, शहर - नगर बांधणे ... हे सारे तंत्र विधी आहेत. अण्वास्त्रे, बंदुका, युध्ये- महायुध्दे हे सारे आधुनिक "जारण-मारण-तंत्र" विधीच होत.

ध्यानाच्या अभावी यातील कितिक हीन, अमानुष, निकृष्ट असतात - सुख समृध्दी, पर्यावरणाला घातक होतात. कित्येक शेकडों हिन्दी इत्यादि चित्रपटांप्रमाणे छूमंतर होतात. घरातल्या मिक्सरपासून अवकाशयानापर्यंत कोणते यंत्र कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. अगदी मझ्यासमोराचा संगणक पण! एवढेच काय? मी पण (संगणकाच्या रेडिएशनमुळे)! जर्मनीत झालेला यहुद्यांचा संहार, नागासाकी-हिरोशिमावर टाकलेली अण्वास्त्रे, ग्रामीण जनतेचे विस्थापन, पर्यावरणाचा होणारा सतत विनाश... हे सर्व आधुनिक जारण-मारण तंत्र विधिच होत.

मी पाहतो, दिवाळीत पुस्तकात पाहून रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीचा फराळ बाजारात तयार मिळतो. पूर्वी जे मसाले घरोघर तयार केले जात होते ते आता वाण्याच्या दुकानावर आयते मिळतात. तयार सदरे, तयार विजारी, तयार काय काय! पन्नास कोटी बाया बापड्यांची सोय झाली! शंभर कोटी जनताजनार्दनाची सोय झाली!

स्वावलंबन गेले! स्वायत्तता पण गेली! नियोजनाने जमीनी गेल्या. हे सारे कायद्याच्या कक्षेत राहून. तरीही मुंबईच्या मागील दारी कितिकाना धड एका वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते. म्हणून दयाळू मायबाप सरकारने शाळेतल्या मुलाना दुपारचे जेवण मोफत द्यायची योजना केलीय. पण पालकांचे - भावंड़ांचे काय? कुठे गेले सरकारचे "ध्यान"?


संस्कृति (culture): उगम अणि अभिव्यक्ति

पितृप्रधान समाजाताही संसाराचा भार उचलण्यात स्त्रीचा वाटा वरचढच असतो, मग ती शहरात असो की खेड्यात की जंगलात. युगानुयुगे स्त्रीने संस्कृतीची जोपासना केली हे सर्वमान्य आहे, अजून तरी.
संस्कृति केवळ शास्त्रात - ग्रंथात नसते, ती केवळ पंडितानी केलेली नोंद असते. संस्कृती काही शाळांत, महाविद्यालयांत नसते; तिथे केवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहिली जातात, त्यात आचरणाची हमी नसते.

"अन्न, वस्त्र, निवारा" या तीन मूलभूत गरजामध्ये संस्कृतीची प्रचिती येते.
"श्रम, विश्राम, आरोग्य, शिक्षण" या चार जगण्याच्या मूलभूत क्रिया होत. त्या सर्व जीवमात्राला -- प्राणी, वनस्पती: पाण्यातले, जमिनीवरचे, वातावरणातले, भूमीगत -- लागू होतात. या चार मूलभूत जैविक क्रियामध्ये मानवाच्या संसकृतिंच्या अभिव्यक्तिची नोंद होत असते.

माझी मायभूमी: हजार पाकळ्यांचे कमळ

पाण्यात जीवमात्र निर्माण झाले; म्हणून तर आपण त्याला "जीवन" म्हणतो. पाणी आणि जमीन यानी मानवाला संस्कृति दिली. मग तो अर्धनग्न आदीमानव असो की सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजातील असो.
म्हणून तर भारतातच काय सर्व जगभर संस्कृतिंची विविधता दिसते. यात काय आश्चर्य! सारया जमाती, सारे समाज विविधतेने नटलेले दिसतात.
त्यात भारत - एक "सहस्त्र पाकळ्य़ांचे कमळ". येथे दिसते जेवणातील विविधता, पेहरावातील विविधता, घरांची विविधता, चालीरीतींची विविधता, आणि संगीत, नाटक, कथा, काव्य, चित्र, शिल्प... भाषा सर्वच वैविध्यपूर्ण.


औधोगिक संस्कृति (Industrial Civilisation): अमर्याद अनिर्बंध हवस

आधुनिक मन्त्र - तंत्र - यंत्र युगांत समाजाचे विघटन मात्र झाले. पर्यायाने कुटुंबाचे पण विघटन झाले. त्याबरोबरच अनेक संस्कृतींचा विनाश झाला. उरल्या सुरल्यांचा होत आहे. सारे कसे कतारीत उभे राहिलेले ठोकळे होऊ घातलेले आहेत. संस्कृति कधीच जागतिक (ग्लोबल) असूच शकत नाही. जागतिक असतो व्यापार उदीम. संस्कृति स्थानीय असते.

आतापावेतो पांच हजार वर्षांत कितीतरी संघटीत धर्मांचा, पंथांचा उदय (शेवट) झाला असेल. अनेक अवतार प्रेषित अवतरले. अनेक आस्तिक-नास्तिक पंथ, सिध्दांत आले-गेले. सर्वानी मानवाला भवसागर तरुन जाण्याचे, समृध्दीचे आणि शाश्वत सुखाचे - इहलोकी आणि परलोकी - मंत्र दिले, आश्वासने दिली. याला इतिहास साक्षी आहे.

पण आज प्रत्यक्षात काय घडते याला मात्र आपण साक्षी आहोत - आणि म्हणूनच आम्ही जबाबदार आहोत -- निदान स्वत:पुरते स्वत:ला तरी. आधुनिक औद्योगिक समाजाने आणि विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैद्यक यानी दिलेले यन्त्र-मंत्र-तंत्र पण हीच आश्वासन देतात. हे सारे काळाच्या कसास लागेपर्यंत किती उशीर झालेला असेल?

हे सारे लिहिताना नेहमी प्रमाणे आठवते एकोणीस वर्षांच्या संता-कवी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान:
"दुरिताचे तिमीर जावो..."
अस्तु.
------------------------------
(ही मालिका केवळ एक निरिक्षण, विहंगम दृश्य (birds-eye-view) आहे, इथे कोणतेही सिध्दांत वा गृहीत प्रमेयं नाहीत.
असे समजा ही एका पाखराची चिंव चिंव आहे, जसे लोककथेत तोता-मैना बोलतात. या फांदीवर सर्व पाखारांचे स्वागत आहे.)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 16, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -२

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड -२


मंत्र युग (Inforamation Age)

मी राहतो त्या परिसरात दर वर्षी सार्वजनिक धार्मिक उत्सव होतात. दिवसभर बोंबल्यावर तार स्वरात तबकड्या व फीतीवर धनीमुद्रित केलेले गायत्री मंत्र, आणि हिंदी मराठी सिनेमातील गाणी भक्तिगीते भावगीते पुन्हा पुन्हा वाजत असतात. पाच-दहा भाविकानी पुस्तकात बघून म्हटलेल्या आरत्या मात्र सकाळी एकदा व संध्याकाळी एकदा ऐकू येतात.

या सर्वाचा उत्सव साजरा करणारया समष्टीला (त्यात मी पण असतो - वर्गणी भरून) काय आध्यात्मिक आणि आर्थिक लाभ होतो याची कल्पना नाही. (कारण मी अधिकारी व्यक्ती नाही.) पण ही सामग्री तयार करणारी, विकणारी वा भाड्याने देणारी मंडळी मात्र आपला नफा वसूल करतात.

गायत्री मंत्र असो कि सिनेमातील गाणे, "मार गोली भेजेमेँ" असो, कि तुका म्हणे "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती".
या आणि आशा प्रकारच्या शब्दाना मंत्राचे सामर्थ्य कसे येते? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या शब्दांची कळत - नकळत आपल्याला व जनमानसाला आणि व्यापार धंद्याला काय लागणी होते?

प्रसिध्दीच्या अनेक माध्यमातून नित्यनवीन माहितीचा आपल्यावर अहोरात्र (२४ x ७) भडिमार चालू असतो. आपल्याला कशाची गरज आहे या गोष्टी ते आर्जवून सांगत असतात. त्यात आपल्याला शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक श्रमातून मुक्ति देणारया सोयी -- यंत्र आणि मंत्र - यांच्या जाहिराती पण आल्या. आपल्याला मायावी वास्तवतेच्या (Virtual reality) दुनियेत घेऊन जाणारी करमणुकिची साधने पण आली.

ही सारी माहिती अल्पजीवी तर असतेच. पण कशालाच वैश्विक मूल्यच काय पण तत्कालीन सार्वत्रिक आणि सामाजिक मूल्य पण नसते. प्रगतिच्या नावाखाली त्यांच्या सुधारलेल्या आवृत्या मात्र काढल्या जातात. उदा. नव्या वेष्टनात साबणाची वडी / चोकलेट वगैरे. आणि अहर्निश जाहिरातबाजीने त्याना सतत पेटत ठेवले जाते.

या सर्व यंत्र-मंत्र-तंत्र उद्योग धंद्यात काही मूठभर लोकांचे आर्थिक - राजकीय सत्तेचे लागेबांधे मात्र गुंतलेले असतात. या जंजाळात कालची समीकरणे - सिध्दांत आज बाद होतात व नवी तयार होतात. त्यात वैज्ञानिक, आर्थिक, सामाजिक, राजकारण, अन्न, शिक्षण, औषधी... सारे काही आले.

मुकी गाईगुरें चरत असतात; पण तेवढाच वेळ रवंथ पण करतात. आम्ही काय पाहिले, काय ऐकले, काय वाचले याचा रवंथ करायला कुठे आहे सवड?

मग "गरज आणि हवस" याचा ताळमेळ - संतुलन रहात नाही. आणि मग जगण्याचे -- "श्रम, विश्राम, आरोग्य आणि शिकणे" या चार मूलभूत जैवीक कार्यांचे -- समीकरणच चुकत जाते. आणि मग येतें भौगोलिक (आर्थिक) शिख्नरांचें वितळणे -- आणि हिमालयाच्या हिमशिखरांचे वितळणे -- ध्रुवीय प्रदेशांत हिमनगांचे वितळणे. यात अधिक महत्वाचे काय?

आपण आपले म्हणतो ते "आयुष्य" आपले नसतेच मुळी. आपला असतो फक्त अंहकार. "आयुष्या"वर आपला काहीच हक्क चालत नाही. आणि देव दयाळू असले तरी "आयुष्याला" दया माया मुळीच नसते. आपण फक्त मर्यादीत काळापुरते त्याचे विश्वस्त असतो असे म्हणा वाटल्यास. आयुष्य - वाटल्यास सृष्टी म्हणा, वा निसर्ग म्हणा -- त्याच्या मार्गाने जात असते.

(पहा: शरीरधर्म )

~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 29, 2009

सृष्टीयोग


सृष्टीयोग
सृष्टीयोग म्हणजे निसर्गाचा - प्रकृतीचा - मार्ग, जो अनादी कालापासून अस्तित्वात आहे, अगदी सुसंस्कृत समाज अस्तित्वात यायच्या पूर्वीपासून.
सुसंस्कृत समाजानी अनेक योगांची उपासना केली, जसे ज्ञानयोग - विज्ञानयोग पासून ते कर्मयोग - भक्तीयोग ते हटयोग - तंत्रयोग इत्यादी.
वैदिक काळातील किंवा "एडनच्या बगीच्यातील" लोक कदाचित भरपूर फळे आणि मुबलक पाण्याने समृद्ध होते.
पण आम्ही मात्र कल्पनेने "सुजलाम् सुफलाम्" गात असतो पण कृतीत कमी पडतो.
आता इथेच सृष्टीयोगाची उपासना करण्याची - निसर्गाशी - प्रकृतीशी अंतर्बाह्य समन्वय साधण्याची घटका आलेली आहे. अस्तु.
(मूळ इंग्रजीचे स्वैर भाषांतर )
-----------


"Srishtiyoga" -- Way of Nature – is an ancient unwritten law long before the birth of civilizatio. Civilizations have been following a number of Yoga practices, from Jnan Yoga – Vijnan Yog to Karma Yoga – Bhakti Yoga to Hatha Yoga – Tantra Yoga. People in the Vedic times or in the ‘Garden of Eden’ were perhaps blessed with plentiful of water and fruits. It is only our wishful thinking that we sing “Sujalam, Sufalam” - abundant water, abundant fruits – that falls short of action. It is time now for ‘Srishtiyoga’ – Communion with Nature.


~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 22, 2008

माझी लक्तरांची पुंजी

बाभळीच्या तप्त पिवळ्या
काटेरी सावळ्या
ओरखाडतात
माझी लक्तरांची पुंजी
राखलेली शतकांच्या
वाटचालीत
***
(भालप्रदेश, गुजरात )

लोथलच्या (जेथे इंडस - सिंधू - संस्कृतीचे अवशेष आहेत ) परिसरात अनेक वर्षे भटकताना हे जाणवले: तथाकथित प्रगत विसाव्या शतकात येथील भूमीचे पुनरुज्जीवन झाले नाही।

एक गोष्ट ऐकलीय: रोम जळत असताना रोम साम्राज्याचा बादशहा म्हणे फिडल वाजवत बसला होता । बलाढ्य रोम साम्राज्य आणि संस्कृति त्यानंतर लवकरच लोप पावली।

पुरातत्वशास्त्रात मला जरी रस असला तरी मी लोथल बघायला कधीच गेलो नाही। उगाच इतिहासाची प्रौढी मिरवण्यात काय तथ्य?

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 14, 2008

नर्मदेची बाळें आणि माझी नर्मदेची परिक्रमा

नर्मदेची बाळें


माझी नर्मदेची परिक्रमा
माझी नर्मदेची परिक्रमा रूढ़ अर्थाने परिक्रमा नव्हतीच. नाही मौजेसाठी अथवा संशोधनासाठी केला हा प्रवास. इतर नद्या, सरोवरें आणि सागर यांच्या बरोबर नर्मदासुद्धा सर्व जीवामात्रांची जीवनरेखा आहे ही जाणीव मात्र असायची, आताही मी जारी शहरात असलो तरी आहे, अधिकच प्रखर आहे.


मी काही मूर्तिपूजक नाही. नाही मी संघटीत धर्मसंस्थामध्ये विश्वास ठेवीत. नाही मी ईश्वरवादी, नाही मी निरीश्वरवादी. कोणत्याही धर्माच्या, कुणाच्याही ईश्वराच्या वादात पडायचे नाही. श्रध्दा जर कृतीमध्ये परिवर्तीत होत नसेल आणि त्यात सर्व जीवमात्राची जाणीव नसेल तर तिला अंधश्रध्दा म्हणावी लागेल.

महाकालीचापण रूढ़ अर्थाने मी भक्त नाही. पण महाकालीच्या संकल्पनेचे वास्तव दर्शन मला नर्मदेमध्ये झाले. नुकत्याच संपन्न झालेल्या नवरात्राच्या उत्सवाची सांगता मी सोबतच्या छायाचित्राने करतो.
~~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 09, 2008

आई नर्मदे!

आई नर्मदे

चण्डिकेचा अवतार धारण करून
गावे राने धुवून काढतेस
तरीही लोक तुझा जयघोष करतात...

आई नर्मदे
हरघडी मी अनिवार्य ओढीने
तुझ्याकडे येतो सर्जनशीलतेला जेव्हा होतात
सामाजिकतेचे बांध असह्य...
कितिक ओंजली भरभरून मी पीतो
आणी श्रध्दा माझी प्रत्येक ओंजळीतून
सामर्थ्याचं प्राशन करते...

आई नर्मदे
तुझ्या पाण्याच्या प्रत्येक ओंजळीने
माझ्या आतला अग्नी प्रज्वलीत करावा
जागा ठेवावा;
आणी त्या अग्नीचा मलाच विरघळून
टाकणारा महापूर बनावा;
मनातील सामाजिकतेची सारी जळमटे
धूवून टाकणारा अग्नीपूर भडकून उठावा;
त्यात स्वत:च निर्माण केलेल्या
दंभाच्या साऱ्या प्रतिमा नष्ट व्हाव्या;
त्या साऱ्या पतिमानी डागाळलेले
जीवन मुक्त मनसोक्त व्हावे...

आई नर्मदे
त्या अग्नीपूरात तुझीही प्रतिमा नष्ट झालीय;
आता मीतूचा भावही संपलाय;
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने मी नर्मदामय झालोय.

माते वैराग्यभूमी,
युगायुगांची साक्षी
तुझ्या पाण्याच्या प्राशानाने
दुर्बलांचे अश्रू लाव्हारासा बनू दे;
त्यांचे निश्वास ज्वालामुखी बनू दे;
आणी त्यांची जीवने अग्नीपूर होवूं दे।
-----
स्थळ:
सन : १९६९
~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 07, 2008

नर्मदा, गुरुडेश्वर

नर्मदा, गरुडेश्वर

पाण्याची धार कापते
काळ्याकभिन्न पुरातन पथ्थराना.





~~~~~

© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 06, 2008

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्हः

अन्न परम ब्रम्ह: म्हणे --
भांग प्यायली होती तेव्हा.
अन्न घशाखाली विष हौउन उतरते.
बाजार आहे अन्नाचा
विक्रय आहे शरीराचा
सिनेमा थेटरात मनाचाही

आम्ही हलाहल पचवले
नशा नाही कामी येत
आम्ही विषवृक्ष -

मुखावट्या आड़ कंठ आहे
काळा ठिक्कर जळणारा
तडफडणारा
आशा निराशेच्या जाळ्यात
गुरफटून टाकणारी चाहूल
मरणाची दाबून आम्ही ठेवतो.
---
स्थळ: बडोदे
तारीख: ३१-३-१९६९

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2008

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठलो आहे माझ्या फोंसिलमधून

आता उठालो आहे माझ्या फोंसिलमधून
माझ्या न्यायाचा क्रूस नको घेऊन जाऊ
आता वाढलीय महागाई - साखर
अन्नधान्य हवापानी कापडचोपड
शब्द पण महाग आहेत
आणि वाढलाय व्यापार
कमाई उरण्याची खिंडारे भगदाडे.
---
बडोदे
फेब्रुवारी १९७०

~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 12, 2008

व्यावसायिकाना सलाम!

व्यावसायिकाना सलाम!

अर्जुनाला पोपटाचा डोळाच दिसता होता.
व्यावसायिकाना सलाम!
मला अभाग्याला डोळा दिसतो.
पोपट दिसतो.
फांदी दिसते.
झाड दिसते.
जमीन दिसते.
अन्न-पाणी देणारी जमीन दिसते.
पाऊस पाडणार्या आकाशाचे
त्याच्या डोळ्यावर प्रतिबिंब दिसते.
डोळ्याचा आतला अंधार दिसतो.
त्यावर उमटलेले निळ्या आकाशाचे
चित्र दिसते.
अर्जुनाचा तीर सुटला.
पण माझे तीर-धनुष्य गळून पडले.
पोपट त्याच्या जन्मातून मुक्त झाला.
मी माणसाच्या जन्मातून मुक्त झालो नाही.
(मला पुनर्जन्माचे वरदान मिळाले.)

----
बडोदे
नोव्हेंबर १९७०
(इंग्रजी भाषांतर पहा)
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape