December 31, 2011

जागतिक महायुद्धे नादाविना

आय-टेक्नोमॅन, रेमीची स्व-प्रतिमा
अहंकार उर्मट उच्च-तंत्रज्ञाचा
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा
निर्मीतो कॉम्प्यूटर, उपग्रह, महानगर
अन् करी कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनही, धरतरीच्या उरावर :
जागतिक
महायुद्धे नादाविना.
* * *
(मधुकोष गोंडवनी या ब्लॉगवर प्रसिद्द केलेल्या मूळ "WORLD WARS WITHOUT BANG" इंग्रजी कवितेचा अनुवाद)
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | २८-१२-२०११

कांही इंग्रजी दुवे - १. Missed Target of 9/11, २. iTECHNOMAN
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 27, 2011

मनोगत : औद्योगीकरण की पश्चिमीकरण

मनोगत: पश्चिमेचा समाज तीनशे वर्षे औद्योगिकरणाबरोबर वाढला. सहाजिकच त्याचा परिणाम त्यांची संस्कृती व भाषा यांवरही झाला. इंडीयात आम्ही फक्त उसनवारी करून घोकंपट्टी केली. मग मायबाप सरकारने समित्या नेमून परिभाषा कोश तयार करविले. पण प्रथम -- वाचणार कोण, आणि दुसरे, वापरणार कोण? ... इथे चार बुके शिकायचे वांधे!


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 25, 2011

पशू-पक्षी-वानसांची बोली

पशू-पक्षी-वानसांची बोली
जर कधी असती समजली
(टॉम जेरीची मायावी चित्रे पाहिली
व्यर्थ; व्यर्थ पंचतंत्र-जातके वाचली)
तर औकातील व्याप टळले असते
निदान सुधरली असती रेमीची बोली


रेमीजीयस डिसोजा | मुंबई |
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 18, 2011

मनाची रात्र काळोखी (कविता)

 अंधारी रात्र हवी विश्व दर्शनाला
पंच-मूल-तत्त्वे
मनाची रात्र काळोखी
मी निरखी
विश्व चमत्कारी


रेमीजीयस डिसोजा हायकू
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 15, 2011

मनोगत: शेतकरी

मनोगतः जोवर ग्रामीण जनतेला, यातील तीस टक्के लोक शहरांतील झोपडपट्टींत खितपत पडले आहेत, कायदा व व्यवस्था यांपुढे जावून न्याय मिळत नाही तोवर लाचलुचपत, आतंक, अतिरेक, दंगली, भाववाढ, अवर्षण, पूर, दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांचा सुकाळ असणार.


रेमीजीयस डिसोजा 
 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 09, 2011

रेमीची मुक्ताफळे - १८ : लोकशाही


शंभर कोटी दुय्यम दर्जाचे भारतीय अनुभवाने शिकतात (व शहाणे होतात).
परिणामतः कंपू (युती/आघाडी)  करून तगलेल्या लोकसभा!
पण राजकारणी लोक धडा घेत नाहीत... 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

December 01, 2011

भारतात समकालीन समाज व सामाजिक कार्य

लोक-उर्जा
 सूचक शब्द- समाज, संस्था, सृष्टीचे संधारण, लोकसंधारण, ग्राम-शिक्षण

कोणतिहि घटना वाचली, पाहिली की मी अंतर्मुख होतो, माझ्या पांयांखाली काय जळतंय व सभोवतीं काय घडतंय तें बघतो, अगदी नजर पोहचेल तेथवर... जीं साधने उपलब्ध असतील त्यांनी.
२. समज आल्यापासून मी ज्या चारही जगतांतून — तृतिय जगत भारत (किसान), पंचम जगत भारत (विस्थापित), चतुर्थ जगत भारत (आदिवासी), व प्रथम जगत इंडिया (औद्योगिक) — राहिलो, फिरलो, काम केले व अनुभव घेतले, त्याचा चित्रपट झर्रकन समोरून जातो.

समाज
भारतीय समाजाची सांस्कृतिक विविधता
३. समाज हा शब्द आपण सर्व मानवसमूहांना सर्रास वापरतो. या समूहांत कांही विषेश भिन्नता आहेत. कांही नागरसमाज आहेत. कांही आदिम व वंशविशिष्ट जमाती आहेत.
४. कांही आदिम किंवा आदिवासी जमाती आहेत. याना जमाती म्हणणे युक्त आहे. कारण त्याची घडण नागरसमाजांप्रमाणे श्रमाच्या विभागणीवर, वर्ण किंवा वर्ग यावर आधारलेली नाही. इथे प्रत्येक व्यक्ति संपूर्ण जमातिचा प्रातिनिधिक घटक असतो. आदिम जमातीत वेश्या नसतात, हें विशेष!
५. कांही वंशविशिष्ठ जमाती असतात. उदा. केरळात आजही एक मातृसत्ताक जमात आहे. आर्य इंडियात येण्यापूर्वी कर्नाटकात मातृसत्ताक कुटुंबपद्धति होती (भारतीय संस्कृतिकोश, संपादक : पं. महादेवशास्त्री जोशी). शिवाय लमाण, धनगर आदि जमाती पण आहेत.
६. भारतात जशी जैवविविधता आहे तशी सांस्कृतिक-विविधता पण आहे. ही सृष्टीचीच मानवाला मिळालेली देणगी! यासाठी उच्च शिक्षणाच्या सर्व शाखांत मानवशास्त्रचा समावेश करणे जरूरीचे आहे.

संस्था
७. विलायतेहून फिरंग्यांनी इथे औद्योगिकरण आणले. त्याने कुणाच्या ध्यानात येण्यापूर्वी सारा सुशिक्षित व अशिक्षित समाज व्यापला. ही क्रांति नव्हती, उसनवारी होती. औद्योगिकरण आले, बरोबरच अनेक "संस्था" आल्या, क्लिष्ट कायदे आले. त्यांनी व्यक्ति व समष्टीचे खाजगी व सार्वजनिक जीवन कबजांत घेतले. आणि दोन्ही आपली स्वावलंबन व स्वयंनिर्णयाची स्वायत्तता गमावून बसले.

सामाजिक कार्य
८. सामाजिक कार्य करणारया संस्था, चळवळी, चळवळे (activists)... इ. देशातील अमानुष आर्थिक सामाजिक विषमतेतून कालपरवां सुरू झाल्या. आपण मंचावर उभे राहून बोलतो तेव्हा मंचाखाली असलेली वस्तुस्थिती गृहित धरतो, जी सतत बदलत असते. आपण "आहे हे असंच चाललंय - चालायचे" म्हणायचे. आणि बरे करायचे तोटके, curative measures, शोधायचे. एवढेच कातडी-बचाऊ काम प्रशिक्षिताना उरते. सर्जनशीलता, मौलिकता काय करायचीय?
९.  शिक्षक, डॉक्टर, तंत्रज्ञ, इंजिनीयर, आर्किटेक्ट, सरकारी-निमसरकारी सेवक, नगरनियोजक, अर्थज्ञ, शास्त्रज्ञ... पोलिस यांचे काम "सामाजिक कार्य" नसते का ? ते सर्वजण समाजाचा भाग नाहीत का ? अर्थातच अधोगत, अवनत, भग्न समाजांत — मग ते पश्चिमात्य असोत कि पौर्वात्य — असें घडत नाही हे दिसतेच आहे. आपण मात्र आपापला अहंकार भावूकपणे गोंजारत असतो. एवढेच!

सेवाभावी संस्था
१०. उदात्त उद्धिष्ठानी सुरू झालेल्या कांहीं संस्थांना कार्यकर्त्यांचा पगार देण्यासाठी पैसे जमा करणे व तगून राहाणे एवढेच कार्य उरते. तर काहींचे लक्षण सरंजामदारीचे दिसते. ग्रामीण भागांतील बहुतेक संस्था मागासल्या समजल्या जाणार्‌या निरक्षर किसान व आदिवासींना "अशिक्षित" समजून त्याना शिकवायला आलेले असतात; या शहरी सार्वजनिक वा सामजिक कार्य करणार्‌या लोकांना त्यांच्याकडून "शिकण्यासारखे" कांहीच नसते.

शिक्षण
११. विसाव्या शतकाच्या सुरवातीला – रानडे-गोखले याचा काळ – दोन टक्के लोक "सुशिक्षित" होते. गोखले तेव्हा 'मोफत व सक्तिचे प्राथमिक शिक्षण' विधेयक प्रीव्ही कौन्सिलात आणायची धडपड करित होते. त्याला शंभर वर्षे झाली!
१२. शिक्षण – शिकणे, शिकवणे – व्यवसाय झाले आहे; तें प्रशिक्षित, व्यवसायिक, प्रव्यवसायिक उमेदवार नोकरी-धंद्यासाठी तयार करते.पण ही "सार्वजनिक शिक्षण-संस्था" बहुसंख्य जनतेला गेल्या साठ वर्षांत साक्षर व शिक्षित मात्र करू शकली नाही. हा "राजदुर्विलास" नव्हे तर काय?

सर्वप्रथम सुयोग्य शिक्षण
१३.  प्रचलित शिक्षणपद्धतीवर माझा रोष इयत्ता दुसरीपासून सुरू झाला. त्यावेळी तो फारच विरल होता. पण तो मानसिक अवरोध नव्हता! माझा व्यक्तिनिष्ट रोष कालांतराने निरिक्षण, विश्लेषण, संश्लेषण, तर्क, तर्काचा अंत इत्यादि प्रक्रियेतून बदलत वस्तूनिष्ठ होत गेला.
१५.  त्यामुळे पुढचे शिक्षण, श्रम (काम), नोकरी, व्यवसाय – तसेच अर्थार्जन अन् व्यय – या सर्वांवरच एक अदृश्य सावली नेहमीच राहिली, आजतयागत. ती सावली म्हणजे "सामाजिक बांधिलकीची जाणीव". त्या जाणीवेतून व आजवरच्या प्रवासातून काढलेले कांही निष्कर्ष येथे नमूद केलेले आहेत.
१६. प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयीन शिक्षण / व्यवसायिक प्रशिक्षण कुणाच्या खर्चाने होते? एक उदाहरण- एका वास्तूविदाच्या शिक्षणासाठी सुमारे पंधरा ते वीस लाख रुपये खर्च येतो; आता याहून अधिक येत असेल. याचा बोजा अखेरीं जनतेच्याच डोक्यावर पडतो. वास्तू (शिल्प-शास्त्र-विद्या) या अभिजात शाखेचा उगम आणि विकास (?) "निवारा" या मूलभूत गरजेतून झालेला आहे. पण कुणालाच माहित नाही की आमच्या थोर लोकशाहीत "बेघर" लोक किती आहेत!

सामाजिक बांधिलकी
१७. सामाजिक बांधिलकी याचा अर्थ काय व ती कुणास लागू होते?मेलेल्या माणसास अग्नी, मूठमाती देणे किंवा मृत व्यक्तिच्या (माहित असल्यास) श्रध्देप्रमाणे अंतक्रिया करणे, या कार्याचा, मला वाटते, सामाजिक बांधिलकीत सर्वांत वरचा नंबर लागावा. कल्पना करा मढं वेळेवर उचललं नाही तर समाजावर काय प्रसंग ओढवेल?
१८. पण समाजाला, धर्मसंस्थेला किंवा व्यक्तीला त्याच्या या बांधिलाकिची कांही चिंता नको. सृष्टी समर्थ आहे. तिने त्या मुडद्याची विल्हेवाट लावायची व्यवस्था अगोदरच करून ठेवलेली असते. करोडो जीवाणू त्याच कलेवरात जन्माला येऊन त्याचा फडशा पाडतील, आणि ते मरून त्यांची माती पण होईल.

सामाजिक बांधिलकीचे एक सामान्य उदाहरण
१९. आमच्याकडे मुंबईतल्या घरी अस्पृश्य जातीची, झोपडपट्टीत राहणारी अशिक्षित बाई घरकामाला होती. एकदा रस्त्यावरच्या एका आजारी, बेवारशी, मरायला टेकलेल्या म्हातार्‌याला ती आपल्या झोपडीत घेऊन आली. त्याची सुश्रुषा केली. दोनेक दिवसानंतर त्याची अंतःक्रियापण तिनेच केली. खरं सांगूं? माझ्याकडून हें झालें नसतें.

सृष्टीचे संधारण (conservation)
२०. गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्याचे आठवते.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.
२. दान – मनुष्य-समाज, आईबाप, गुरू, आप्तेष्ट इ. आपल्यासाठी मेहनत घेतात, त्यांचे उतराई होण्यासाठीं, झिज भरून काढण्यासाठी दान करणे. हा परोपकार नव्हे.
३. तप – आपण शरीर – मन, बुद्धि, इंद्रियें – वापरतो. त्यांची झीज भरून काढणें, त्याची विकारांपासून शुद्धी करणें. हे झालें तप. समाज व शरीर सष्टीबाहेर नाहीत. तसेच या तीनही क्रिया यज्ञच आहेत. (संदर्भ : विनोबा भावे, गीता-प्रवचनें, अध्याय १७)
२१. पिरामिड, ताजमहाल, अंतराळयानें... बांधायला लागणारा पैका सरकारी टांकसाळीत का तयार होतो? मानव वापरत असलेली सर्व साधनसंपदा मूलतः भूईतून येते. सर्व संपत्ती तेथेच उगम पावते. पण त्या भूईवर सर्व जीवमात्राचा समान हक्क आहे. वरील उदाहरणे व्यक्ती, वर्ण किंवा वर्ग यांच्या सरंजामदारशाहीचे लक्षण आहे. दुर्दैवाने आजच्या लोकशाही राष्ट्रांत याची पुनरावृत्ती होत असलेली दिसते. आणि धरती कुणाची मालमत्ता नाही. कुणालाच तो मालकीचा नैतिक अधिकार नाही. पांच हजार वर्षांच्या इतिहासात नागरी समाजाने या भूमिचा किती उच्छेद केला असेल!

लोकशाहीत राज-कारभाराचे लक्ष्य
२२. कोणत्याही लोकशाही राज्य-कारभाराचे लक्ष्य जनता हेच असायला हवे :  जनता हेच "साधन व साध्य". सर्व योजना, प्रकल्प, कायदे, नियोजन कसे करावे वा कसे तडीस न्यावे यांचे मार्गदर्शन व उत्तरे केवळ जनतेकडूनच मिळणार. सरकार वा इतर संस्था फक्त निमित्तमात्र असतात, असाव्या, याहून अधिक काही नाही.
२३. सरकार व विविध संस्था केवळ बिनचेहर्‌याचीं अवजारे आहेत. त्यांचे प्राथमिक कर्तव्य आहे जनतेच्या मूलभूत गरजांचे — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन — संरक्षण करणे, आणि बदलणार्‌या परिस्थितिनुसार सुधारणा व विकासाचे प्रकल्प जनतेला सुलभ, उपलब्ध करून देणे.

सुयोग्य शिक्षणाची गरज
२४. अन्न-निवारा-वस्त्र या मूलभूत गरजा आहेत हे हाडूक कोट्यवधी वेळां जाणकारांनी सार्वजनिक पीठावर चघळले असेल. हे मान्यवर एक वस्तुस्थिती शहाजोगपणे विसरतात : मुक्या जनावरानांपण हे ज्ञान उपजत असते. हे शिकवायला नाही राजाची गरज, ना गुरूची, ना कोणा तज्ञाची, नाही सुपरमॅनची ना स्पायडरमॅनची!
२५. ज्या सृष्टीने जन्माला घातले त्या सर्व जीवमात्राला — प्राणी अन वनस्पती — या गरजा भागवण्याची सक्षमता आणि स्वायत्तता दिलेली आहे. त्यासाठी लागणारी स्वयत्त पंचकर्में — श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन — सर्व जीवमात्राला दिलेली असतात. त्यांचा मक्ता  कोणत्याही मानवी सत्तेला आणि संस्थेला सृष्टीने दिलेला नाही.
२६. तसेच पुनः पुन्हा इतिहासाची उजळणीपण करायची 'गरज' नाही. आज तो अवशिष्ट रुपाने आपल्या समोर आहे. प्रश्न आहे तो यावर इलाज काय ? चुकीची मूलभूत दुरुस्ती करायची की नविन तंत्र शोधायचे की जुजबी फेरफार करून "जैसे थे" धोरण चालू ठेवायचे की आयते परदेशी तंत्र आयात करायचे? सर्जनशीलता, मौलिकता काय करायची?

लोकसंधारण व सामाजिक संतुलन
२७. शेतकरी लागोपाठ आत्महत्या करताहेत. ३० कोटी माणसे दारिद्र्य रेषेखाली आहेत. ४० कोटी निरक्षर भारतीय जनता आताच्या ग्रेगरीयन शकाच्या एकविसाव्या शतकात कॉम्प्युटर-साक्षरतेच्या युगात आहे. शहरांतील गलिच्छ वस्तींत सडणारे किती लोक आहेत त्यांचा सुमार नाही. ती जनता यापुढे "टेक्नोक्रसी"कडून येणार्‌या बलिदानाला कसे तोंड देणार?

सहा लाख खेड्यांसाठी नवी शिक्षण पद्धती
२८. कुणासाठी कोणते शिक्षण योग्य आहे हे कसे ठरवणार? कोणाला किती केव्हा प्राधान्य (priority) देणार?
देशात सहा लाख खेडी आहेत. तेथे सुमारे नव्वद कोटी माणसे राहतात (लोकसंख्या नव्हे). तेथे अन्न, पाणी, शिक्षण, आरोग्य, उपज... यांची काय दैन्यावस्था याची खात्रीलायक माहिती कोणती संस्था, कोणते संप्रेषण माध्यम देऊ शकेल? यासाठीच सत्तेचे विकेंद्रीकरण करणे अत्यंत निकडीचें झाले आहे.
२९. प्रचलित शिक्षणपद्धती वेळोवेळी जुजबी फरक करून साठ वर्षें चालू ठेवण्यात आलेली आहे. त्यात कांहीही मूलभूत फरक करायचा असेल तर पुढील मुद्यांची दखल घ्यावी लागेल. आणि त्यांची तपशीलवार नोंदणी करावी लागेल.

लाख गांवांच्या स्थानिक वस्तुस्थितीचे सर्वेक्षण
३०. हे सर्वेक्षण अर्थातच सर्व गांवकरी लोकांच्या सहभागानेच करायला हवे. असे सर्वेक्षण लोकशिक्षणाचा भाग तर होतोच, पण इथे लपवा-छपवी करायला जागा राहत नाही. कारण हे काम स्थानिक पातळीवर करायला हवे;
३०.१. स्थानिक पर्यावरण : नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय इ. पर्यावरणाच्या सर्व शाखा;
३०.२. पारिस्थितिकी : लोक-बोली व भाषा, आणि त्यांची मौखिक ज्ञानसंपदा, लोककला, चरितार्थाचे पारंपरिक ज्ञान व साधने;
३०.३. ऊर्जा : जलवायूमान, मानव-ऊर्जा, प्राणी-ऊर्जा, जैव-ऊर्जा, खनिज संपत्ती, आणि वन संपत्ती, जसे अन्न, तेलबिया, औषधी-सुगंधी-रंगरोगण-इमारती-तंतू वानसें, इत्यादि. वानसे जळ व जमीनीतली. वानसे तृणे-शैवालांपासून वेली-महावृक्षांपर्यंत;
३०.४. भौगोलिक स्थान आणि प्रादेशिक संलग्नता (linkages)

३१. ग्राम-शिक्षणात येणारे विषय
३१.१. जळ संधारण, जमीन संधारण, कृषी व फलोद्यान, पशुपालन, जैवतंत्रशास्त्र;
३१.२. व्यापार वाणिज्य, ऊर्जा साधन निर्मिती;
३१.३. स्थानिक स्वराज्य संस्था, जमीन महसूल व तत्संबंधीं कायदे;
३१.४. हे शिक्षण प्रात्यक्षिकावर आधारलेले असावे.
३१.५. या शिक्षणसोयी - शाळा - सर्व वयाच्या मुलाना व प्रौढाना, स्त्री-पुरुषाना, उपलब्ध करायला हव्या.

सरता पालव
बदलत्या परिस्थितीनुसार स्वावलंबी होण्यासाठी बहुसंख्य जनतेला साक्षरतेबरोबर सुयोग्य शिक्षण आवश्यक व निकडीचे आहे. सहा लक्ष खेड्यांची व तेथील 'जनते'ची ओळख आमच्या देशांत किती 'नागरिकां'ना आहे? कोणत्या नकाशावर आहे त्यांचे अस्तित्व बघायला मिळते? तळहाताएवढ्या नकाशातपण आम्ही पाहतो दिल्ली मुंबई कोलकता चेन्नाई... आणि आम्ही देशप्रेमाने राष्ट्रभक्तीने भारून जातो. खेड्यांना त्यांच्या हक्काचा वांटा मिळायलाच हवा. नाहीतर आतापर्यंत केलेली प्रगती केवळ पुच्छप्रगती ठरेल. अरबस्तानात "अरब स्प्रिंग" आला, भारतात दुसरे कुरुक्षेत्र येईल.
सृष्टीयोग
टीप: गेल्या वीस वर्षांत शिक्षण या विषयावर कांही संशोधन केले, प्रयोग केले, लेख लिहिले. ते सर्व लिखाण हेतुपूर्वक इंग्रजीत लिहिले. हे लेख नियतकालिकांत प्रसिध्द झाले होते. व आता माझ्या इंग्रजी ब्लॉगवर आहेत.  त्यापैकी काहींचे दुवे येथे देतो.
१. Politics of Literacy in India : Challenges of 21st Century
२. Farming: Politics of Education in India
३. Letters and Numbers, plus ‘Things to Make'
४. Work-Leisure-Health-Learning-Propagation

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.