Showing posts with label जीवन शैली. Show all posts
Showing posts with label जीवन शैली. Show all posts

December 29, 2015

नटणे – जगणे – अस्तित्व : शब्द - चित्र



खाली उद्र्रुत केलेल्या मूळ इंग्रजी "Existance-Survival-Decoration" चे रूपांतर:


मूळ इंग्रजी शब्द-चित्र

मनोगत

मनाच्या उत्कट अवस्थेत हे शब्द - चित्र (painted poem) लिहिले गेले. अशी अवस्था सातत्याने असते, तिला आदी-अंत नसतो.

शहरे, गावे, आदिवासींच्या निसर्गानिवासातिल वाडया, त्यांच्या परिसारात अनेक वर्षे भटकंती केली, त्याशिवाय माझा जन्म आणि वाढ कोंकणातील खेड्यात झालेली. या सारयाचा हा परिणाम असेल कदाचित. सकारण - अकारण केलेल्या या भटकंतीत कोणत्याही प्रकारच्या -- जातपात, धर्म, आदर्श, संस्कार, संस्कृति, आवड-निवड इ. झडपा लावल्या नाहीत. कोणतेही चश्मे लावले नाहीत. आजही नाही.

त्यातल्याच एके दिवशी (सन १९९८५) हे शब्द - चित्र आकारले. तो दिवस पण नोंदला नाही. अशा अवस्थेत काळ-काम-वेग-स्थळ ही परिमाणे पण गौण होतात. अर्थातच हे कोणत्याही कला - सौंदर्य शास्त्रांच्या चौकटीत बसणे शक्यच नव्हते. खरे पाहाता याला कला - काव्य म्हणायचे का याचा संभ्रम पडतो. नागर सुसंस्कृत समाजाने केलेल्या कोणत्याही वर्गावारीत ही रचना बसणारी नाही हे पण मला माहीत आहे.

इतकेच नाही. तर रूढ़ अर्थाने मी कलावंत आहे का याची पण मला शंका येते. पण यामुळे आपल्या अभिव्यक्तीला मर्यादा पडायचे कारण नाही.

वरील मराठी संस्करण संगणकाच्या मदतीने मूळ चित्रात मुद्दाम घातलेले नाही. अशा अवांतर कसरतीची – अलंकारांची पण गरज वाटली नाही.


~ ~ ~ ~ ~

© Remigius de Souza. All rights reserved.

September 15, 2013

रेमीची मराठी बोली - एक व्यत्यासकथा

'i'ness - 'मी'पण - रेमीचे सेल्फ-पोर्ट्रेट । सन १९६७ ।
संगणकाचा वापर करून हे चित्र पुन्हा रेखाटले. विज्ञानात अनेक लिप्या सोयीप्रमाणे आल्या. तसाच येथे भूमितीचा वापर केला. स्व-प्रतिमेत चेहरा दिसायला हवाच का!

('रेमीची मराठी बोली' या शीर्षकाखाली हे गद्यकाव्य किंवा व्यत्यास-कथा पूर्वी २१ जून २००८ साली जेव्हा हा ब्लॉग सुरू करताना प्रसिद्ध केला होता. ते "jpg" चित्र होते. त्याच्यात काही फेरफार, दुरुस्त्या करून पुनश्च प्रसिद्ध करतोय.)

रेमीची मराठी बोली

रेमीचा आणखी एक : मराठी ब्लॉग : भाषा मराठी पण बोली वेगळी.
एका कुटुंबात १०, ५, किंवा २ माणसे असतील, त्यांचे उच्चार वा बोलण्याची लकब सारखीच असेल, वा भासेल, पण बोली मात्र कालमान वातावरणानुसार स्वतंत्र असते; जसे बोटांचे ठसे. जसे एकाच झाडावरील प्रत्येक पानावरील शिरांचे चित्र मात्र वेगवेगळे असते.

तसे वाहनतळावर उभ्या असलेल्या मोटारींचे नसते. रंग आणि आकारात कितीही विविधता आणण्याचा  प्रयत्न केला तरीही! तीच गोष्ट शहरातील आधुनिक इमारतींची ! पण गावातील मातीची किंवा दगडाची घरे ग्रामीण शैलीची असली तरी मोहवल्यावाचून राहात नाहीत.

हीच तर नैसर्गिक विविधतेची रंगत आहे.

पन्नास-साठ वर्षे भटकंती केल्यावर त्याची छाप रेमीच्या बोलीवर  — शब्द, अर्थ आणि नाद यावर  — पडल्यावाचून कशी राहील ?

आयुष्यभर भटकंती करणारा नेहमी समासाच्या कडेवर फिरत असतो. पण त्याचे फिरणे टांग्याला बांधलेल्या घोड्यासारखे झडपा लावलेले नसते. किंवा  रुळावर दौडणाऱ्या आगगाडीसारखे नसते. किंवा नसते विमानाचे एका टींबापासून दुसऱ्या टींबापर्यंत आखलेले उड्डान. किंवा नसते त्याला जाती-धर्म-वर्गाची बांधिलकी.

त्याची भटकंती असते मधमाशीचा प्रवास  — तिच्याबरोबर तिचे पोळेपण फिरत असते.
त्याची भटकंती असते वनवासीचा अरण्यातील स्वैर स्वच्छंद विहार.

सह्याद्रीच्या पायथ्याशी सुरु झालेल्या या भटकंतीची  सांगता होणार जगल्यावाचल्यास परतल्यावर मायदेशी  — गोंडवनी.
 
रेमिजीयस डिसोजा
२१-०६-२००८
मुंबई

टीप : सुधारित पोस्ट

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.


July 30, 2012

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)

एका पाळीव प्राण्याची गोष्ट (एक आत्मकथा)


तीस दिवसांचे ७२० तास तो पाळीव प्राण्याचे जीवन जगतोय. भिंतीवर टांगलेल्या दिनदार्शिकेची पाने बदलत असतात, व दिनदर्शिका पण. तरीही याचे आयुष्य असेच चाललेय.

कधी तो गळ्यात पट्टा बांधलेला कुत्रा असतो, तर कधी चुलीच्या उबेस बसलेलं मांजर...
कधी तो होतो बळीचा बकरा; कधी तो असतो ओझे वाहणारा टोणगा; तर कधी गोठ्यात बांधलेली दुभती गाय.

कधी तो असतो गळ्यात दोरी बांधलेला माकड -- त्याच दोरीच्या इशारयावर कोलांट्या उड्या मारणारा... तेच त्याचे काम.
कधी तो असतो पिंजरयातला पोपट; ऐकत असतो मुक्ताफळे:
"पोपटा, पोपटा, खा ना जरा पेरूची फोड,
आणि बोल माझ्याशी गोड गोड."

कधी तो असतो घाण्याला बांधलेला बैलोबा, फिरत असतो वर्तुळात, पण त्याच्या जूं वाहाणारयां खांद्यावरच्या जखमेवर कोणी कधी तेलाची घडी घालत नाही.

कधी तो असतो राजेशाही बगीला बांधलेला, डोळ्याना झडपा लावलेला उमदा घोडा -- माहीत नसते त्याला तो कुठे कशासाठी सतत धावत असतो.

शेवटी, आजच्या आधुनिक सुधारलेल्या सुसंस्कृत समाजात परावलंबी आयुष्य काढायचे असले तर अशा या सर्व भूमिका नकोत का निभावायला? इथे परस्परावलंबी समष्टीला कुठे थारा?


रेमीजीयस डिसोजा । मुंबई

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 05, 2012

माझ्या सानुल्या सैंपाकघरी

माझ्या सानुल्या सैंपाकघरी

कोंकणात भातशेती  : छाया - पूजा राणी 


मी भेटते माझ्या सानुल्या सैंपाकघरी
रोज-रोज पुनरपी माझे आप्तसोयरी
निःशब्द एक संवाद घडतसे
समर्पणांत अन बलिदानांत.
ते मजसी नेती दूरवरच्या स्थळांत
आणिक नवख्या स्त्रीया नि पुरुषांत,
आणि त्यांचे परिश्रम निर्व्याज प्रेमाचे
जळीं-मळीं ऊन-हींव नि पावसात.

माझ्या सानुल्या सैपाकघरी बरोबरी
करितो अमुचे समर्पण यज्ञकुंडावरी,
जगण्यांत – वाढण्यांत – मरण्यांत,
बरोबरीने, अनुरागे अन त्यागांत.
तेथे विस्तारते एक वैश्विक गीत,
जे घेऊनी जाई मज नव्या प्रदेशी.

मुंबई | ०१ -०५ -२०१२

अधिक वाचा : १. वय वर्षे साठ सत्तर 
२. भारतात आर्थिक, लैंगिक, शैक्षणिक इ. विषमता एवढी प्रबळ आहे, कि डोक्यात कधी घंटी वाजणे अपवादानेच शक्य आहे. अशीच एक बातमी - दुवा पहा.
टीप : ही कविता एका सर्वसामान्य स्त्रीचे मनोगत आहे. ते जोडते शेतकऱ्यांना अन ग्रामीण परिसराला. शहर मात्र त्यांच्या अस्तित्वाबद्दल अनभिज्ञ आहे.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 15, 2011

रेमीची मुक्ताफळे-१५


॥ सृष्टीयोग ॥
 सृष्टीने दिलेल्या या जीवनाचा मी केवळ परिरक्षक, आणि शारीरिक व मानसिक शक्तिंचा विश्वस्त आहे. वांट्याला आलेल्या या एका आयुष्याचे सार्थक मीच करायचे.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमार, मुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतो. हा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 31, 2010

निर्माल्य (Nirmalya)

निर्माल्य (Nirmalya): 
याला इंग्रजी शब्द मला माहित नाही. 
 ॥ निर्माल्य ॥
येणार्‌या फुलांची असती नावे अनेक ।
जाणार्‌या फुलांचे नाव एकच निर्माल्य ॥ 


  निर्माल्य : ज्याना आमच्या मुंबैत दर्या दूर पडतो ते शेजारच्या रस्त्यावर असलेल्या पिंपळावरच निर्माल्य सोडतात, बुंध्यावर खिळा ठोकून त्यावर. कोणी जवळपासच्या चुकल्यामाकल्या तळ्यावर जातात; ते तळे कधीकधी पाण्याऐवजी निर्माल्यानेच भरलेले असते! त्यांचा उपसा कधीच होत नाही. आमच्या मुंबईत तळी राहिलीत कुठे? ब्रिटिशांनी कधीच तळी बुजवली, खाड्या बुजवल्या. दर्या बुजवला. (आम्ही ऐकले की त्याना पाण्याची एलर्जी आहे. म्हणून ते पाण्याऐवजी कागद वापरतात.) ज्या आहेत त्यांच्या गटारगंगा झाल्या. 

मुंबईच्या पावसाळ्यात रस्त्यांवर नद्या वाहतात. तर कोरड्या दिवसात रस्त्याखालच्या गटारांना भरती येते. मग पावसाळा माथ्यावर आला की म्युन्सिपालटी गटारांचा उपसा सुरू करते. आतातर विस्थापितांच्या आयुष्याचे - जीवनाचे - झालेले निर्माल्य रस्तोरस्ती पाहायला  मिळते. फुलांचे निर्माल्य! पाण्याचे निर्माल्य! जित्याजागत्या माणसांच्या आयुष्यांचे निर्माल्य! जमीन - जळ - जीवन कसणार्‌यांचे, त्यात स्त्रियापण आहेत, निर्माल्य. बाल्य होते अकाली निर्माल्य. बाजारू आकडेमोडीत फसलेल्या आयुष्यात जीवन झाले निर्माल्य!    
रेमीजीयस डिसोजा  
ख्रिस्त जयंती २०१०
मुंबई

 ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 04, 2010

लघु्तम साधारण विभाजक : जीवन-व्यवहारात अंकगणित


---

लघु्तम साधारण विभाजक (ल सा वि) : जीवन-व्यवहारात अंकगणित

प्राथमिक शाळेत असताना मास्तरानी आम्हास "लघुतम साधारण विभाजक" (लसावि) शिकवला. का शिकवला ते सांगितले नाही. त्याचा व्यवहारात उपयोग काय ते पण सांगितले नाही.
गोऱ्या सायबाने सांगितले, आणि आम्ही मागे मागे शिकत गेलो, मेंढरासारखे, माकडासारखे, पोपटासारखे. अजूनही आम्ही भविकपणे तेच करतोय. तेव्हा मी कोंकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या जन्मगावी शिकत होतो. माझे शालेय शिक्षण मराठी भाषेतच झाले. कोंकण म्हणजे जैविक विविधतेने नटलेला जगातील सुप्रसिध्द प्रदेशापैकी एक.

त्यावेळी पण आम्हा पोट्ट्याना ठाम माहीत होते, शेतात पेरलेल्या भाताचे एक बीं रुजले की त्याच्या रोपाला पंचवीस-तीस दाण्यानी भरलेली लोंबी येते. वडाची इवलीशी बी रुजली की लाखो फळे देणारा महावृक्ष तयार होतो. त्याच्यावर शेकडो पक्षी आसरा घेतात, पोट भरतात. त्याच्यावर ब्राह्मण - समंध येऊन राहतात.

या साऱ्याचा "लसावि" - "लघुतम साधारण विभाजक" काय?

वयाची पहिली 2+७ / १०/ १२/ १५/ १७ वर्षे मुले / तरुण शाळांत / महाविद्यालयात जसे जेवढे परवडेल तसे आपापल्या ऐपती प्रमाणे शिक्षण घेतात. पण त्यानंतर त्या शिक्षणाच्या आधारे आपले पोट कसे भरावे त्याना माहीत नसते किंवा कळत नाही. त्याना माहित असते, त्यासाठी "नोकरी" मिळावयास हवी असते, नशीब हवे असते, वशिला हवा असतो, लाच द्यावी लागते. किंवा हे सारेच लागते. (त्याना पण "ल सा वि" चा आयुष्याच्या अंकगणितात काय उपयोग -- अगदी पदवीधराना -- पण माहित नसते.)

तोवर त्यांची पंचवीशी उलटून गेलेली असते. म्हणजे आयुष्याचा (अत्यंत जोमाचा) तिसरा हिस्सा निघून गेलेला असतो. देशातील तरूण पिढीच्या मानवी उर्जेचा केवढा अपव्यय!

तसे कारागिरांच्या - शेतकरी, सुतार, लोहार, गवंडी, कोष्टी... आणि व्यापारयांच्या मुलामुलींचे होत नाही. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत ते आपापल्या कुटुंबाच्या कलेत, पेशात, उद्योगात ते पारंगत - पदवीधर होतात. पंधरा वर्षांपर्यंत बाल्यही संपते आणि यौवनात पदार्पण. दोघेही स्वत:च्या पायावर उभे राहावयास तयार. मग योग्य वयात - अठराव्या वर्षी - लग्नाची तयारी.

या सर्वात "लसावि" काय?
-----------
हा "सूतोवाच". ही मालिका क्रमश: पुढील आठ / नुऊ भागात प्रसिध्द करावयाचा विचार आहे. शिक्षण आणि त्या अनुषंगाने इतर अनेक प्रश्न तुम्हाला / मला / सर्वानाच अगत्याचे आहेत. आपल्या सर्वांच्या मनमोकळ्या प्रतिसादाची आशा करतो.

या मूळ मराठीचे इंग्रजी भाषांतर माझ्या इंग्रजी ब्लॉग Archetypes India वर आठ भागांत प्रसिध्द केलेय. आपण ते पण जरूर पाहू शकता.
(Links to English Posts: 1. Arithmetic in Real Life, 2. Dharma or Fundamental Law by Nature, 3. WORK - Breaking the Mind Block, 4. Leisure - Perpetual Crave for Rest, 5. LCM-5: HEALTH - Forgotten Nature Within and Outside, 6. LCM-6: Learning to Learn,
7. LCM-7: PROPAGATION or Survival of the Species 8. LCM-8 A great epoch fiels at a tangent


क्रमश:

~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 12, 2010

सरस्वतीचे ओयासिस.


वैराणात मध्यान्ही
क्षणभर उनाची
झाली साउली.
तप्त तळपायाना
गुदगुल्या करीत
रेताडाचे कण कण
हसले खळ्खळ;
पिवळेधम्म हिरवेगार
फुलले तुषार;
रणाखालून क्षणभर
तिचे पात्र आले वर
सरस्वतीचे ओयासिस.
* * *

प्रतिमा : सरस्वतीचे वरील "चिन्ह" शारदोत्सवात आम्ही मुलानी दगडी पाटीवर दर वर्षी काढले:
सरस्वती, शक्तीच्या - उर्जेच्या तीन -- महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती -- पैकी एक. सरस्वती म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तसेच लक्ष्मी म्हणजे तिजोरीतील पैसाअडका, पण वैश्य वृत्तिमुळे सर्वच परिभाषा आता बदलेल्या असाव्या.

आयुष्यात उन्हाळे - पावसाळे अनेक येतात. वसंत मात्र एकदाच येतो. असे का? मात्र सरस्वतीच्या उपासनेने --- कृषीकला - पाककला - नृत्य - गाणे - गायन - चित्र - शिल्प - कहाणी --- यानी मात्र आयुष्यभर वसंत कुणालाही शक्य असतो. यासाठी नाही सिध्दिची ना प्रसिध्दिची गरज. हवी असते सर्जनशीलता जागरूक ठेवायची.

(सुधारित पोस्ट )

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 16, 2009

चुकतात माझी गणिते केवळ



 घड्याळाचे  जागतिक महाभारत


लेखक: रेमीजीयस डिसोजा 


नेमेची सूर्योदय रोज पाहता
चुकुनच कधी येई ध्यानी
माझ्या विचारांच्या गतीहुनी
अफाट आहे धरतीची गती
नि
सूर्य रोजच्या रोज जागा बदलतो,
उगवायची वेळ बदलतो, ऋतु बदलतो,
कधी रात्र मोठी कधी दिवस,
वारयाची दिशा बदलतो;
नि
मी मात्र असतो जागच्या जागी
धावता धावता अधांतरी फिरत्या
प्रचंड चक्राच्या परिघावर वेगाने.
तरीही रोजच्या रोज सूर्य सांगे,
बा रेमी,
ही तुझी घड्याळाची टिक टिक
जळवेसारखी चिकटलेली तुला
आहे एक हुलकावणी देणारी
वादग्रस्त संकल्पना केवळ.
नि
कितीही आटापिटा केला तरी
चुकत नाही काळ; परी
लिहिलेली एक रेषेवर सरळ
चुकतात माझी गणिते केवळ
नेमेची.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 27, 2009

मुक्ताफळें - ११


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल, नि आवळ्याची तुरट चव!


"ज्यानी निसर्गाशी संवाद साधून जगणे अनुभवले नाही त्याना नैसर्गिक मरण कसे येणार!"

क्रमश:
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 05, 2009

मुक्ताफळें ७


मुक्ताफळें हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


काम नाही, उद्योग नाही... असे कधी झालेय?
स्वस्थ पडून रहा आणि शोध घे.

क्रमश:

रेमीजीयस डिसोजा
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

October 01, 2009

मुक्ताफळें - ६


मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!


पुढची पाच मिनिटे वाट पहाण्यात कधीच निघून गेलेली आहेत!


क्रमश:
रेमीजीयस डिसोजा
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 19, 2009

मुक्ताफळें - २



मुक्ताफळें
हा ख़ास मराठी मौखिक साहित्याचा शब्दप्रयोग / प्रकार आहे. या ब्लॉग वरील मुक्ताफळांवर मालवणी पाणी व लाल मातीचा रंग चढवलेला पण काहीना दिसेल!

आज सवड आहे पण वेळ नाही.
काल वेळ होता पण सवड नव्हती.

(यातला सूचित प्रश्न कसा सोडवणार!!)
क्रमश:
रेमीजीयस डिसोजा,
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 29, 2009

एका समकालीन आदीवासीचे आनंदगान


एका समकालीन आदीवासीचे आनंदगान



आमच्या पितरांच्या मातीत अणि पाण्यात 
मी नाही रेव किंवा नाही उपोत्पादन
या अमानुष अराजकाचा नागर-सांस्कृतिक,
जी देत
असते आव्हाने दरेक श्वासागणिक
मानवतेच्या प्रतिष्टेला आणि आत्मसन्मानाला.


आम्ही नाही उदास किंवा नाही निराश
आमच्या हवस-विरहित जीवन शैलीमुळे. आम्हास
जीवन आहे
श्रेष्टतम सर्वतोपरी वस्तुंपेक्षा मानवनिर्मित.
आमचा हरेक श्वास असतो निमित्त खचित
जीवनोत्सवाचा सोहळा साजरा हरेक कर्मात
आनंदाचे लेणे घेऊन येणारा सदोदीत;

असे जरी सभोवार हीणकस कितीही अराजकता.
तिचे
मुक्त पतन करतात तिचीच समीकरणे
आणि आरोपणे, तिचे कुप्रसिध्द
अन् सुप्रसिध्द भाट ; तें सारेंच जाणार धुपून
काळ-पुराच्या महाद्वारातून
होणार अज्ञातात विलीन.

सुपूर्त करतो मी माझ्या निष्टेचे आश्वासन
आमच्या पुनर्भेटीचे प्राचिनतेत
आमची जीजीविषा उड्डाणास तयार सदोदीत
ओ, माझ्या आप्तस्वकीयानो, आदिम प्रकृतित!
 

 - - - - - -
 (मूळ "Song of an aborigine in our time" या इंग्रजी कवितेचे भाषांतर)
- - - - - - -




प्रतिमा: १, भिल्ल आदीवासी होळीचा उत्सव साजरा करतात सातपुड्याच्या कुशीत.
पतिमा २ व ३, भिल्ल आदीवासी षोडशांचे नृत्य अन गान; गांव चिखली, सातपुड्याच्या कुशीत.
(छाया-प्रकाश चित्रे: रेमीजीयस डिसोजा)
पावसाळ्याचे दिवस होते. मक्याचे पीक तयार झाले होते. योगायोगाने तो दिवस होता "दिवासौ" सणाचा, पितरांच्या आठवणीत. चिखली गांवाचे आदरातिथ्य स्नेहाने भरलेले. सर्वानी मोहाची मदिरा घेतली. ती पिण्यास खास एक वीतभर लांबीचा छोटा तुंबडा घेतात, त्यात जेमतेम २-३ चमचे दारू मावते. ताडी पिण्यासाठी मात्र हातभार लांबीचा तुंबडा वापरतात. मोहाची दारू घरोघर तयार करतात. त्यामुळे तिला हस्तकलेचा दर्जा प्राप्त होतो. कोणतीही विलायती कारखान्यात तयार केलेली दारू तिची बरोबरी करू शकत नाही.
मोहाचे झाड अनन्यसाधारण आहे. त्याला बहार येतो तेव्हा साऱ्या गावात आणि वनात त्याच्या फुलांचा मधूर सुगंध पसरतो. बहराच्या हंगामात त्याच्या फुलांची भाजी करतात, तसेच सुकवून ठेवतात आणि दारू पण गाळतात. ती खास दिवशीच काढतात. त्या दिवशी मोहाच्या फुलांचे पीठ मक्याच्या पिठात मिसळून बिस्किटा सारख्या रोटल्या तयार केल्या होत्या. त्यांची चव मधुर होती. सुगंधाला पण चव असते.



~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 03, 2009

सूरसागराच्या पाळीवर - वडोदरा

  सुरसागर, वडोदरा, गुजरात  

सूरसागराच्या पाळीवर - वडोदरा

-----------------------------------------------------
कोणत्याही एका संध्याकाळी
सूरसागरावरच्या पाळीवरून
पांढुरके करडे ठिपके सरकतात
मागे पुढे संथ कधी द्रुतगती
निओनच्या प्रकाशात
चांदण्यांची प्रतिबिंबे लुप्त होतात


कोणत्याही एका संध्याकाळी
सूरसागराच्या पाळीवर
बसते जोडपे बिंब शोधित
बोटात बोते गुंतवून
झगमगलेल्या विजेरी पाण्यात
हरवतात स्वत:ला

रस्ते गजबजतात
गर्दी शोधित कातरवेळी
फटक प्रकाशात रंगलेली तोंडे
न्याहाळीत कोणतीही एक संध्याकाळ
सूरसागराच्या पाळीवर वखवखलेली
सिंधी ठेल्यावरच्या
भाजियानी वासाळलेली
शिंतोडा चुकवत शिताफिने
फिट्ट नायलोन मध्ये

कोणाही एका संध्याकाळी
सुरसागराच्या पाळीवर
लाल हिरव्या प्रकाशाच्या रोगणात
लपलेला मुखवटा मिचकावतो डोळा
आणि एक वाकडा व्यवहार सरळ बनतो

कोणाही एका संध्याकाळी
सुरसागराच्या पाळीवर
डांबरी पट्ट्यावर काचेरी रंगाचे
लोलक सरकताना
निओनच्या रोगणात एक जादू बनते
सरळ व्यवहार आडोसा शोधतात
आणि वाकडे बनाव सरळ दिसू लागतात

विजेरीच्या झगमगाटात लपल्या
फिकट पणत्या - लामण दिवे
मिजाशीने चुकवली तरी
कातरवेळ टळत नाही

नियमाने कोणत्याही एका संध्याकाळी
उद्याही याच वेळी
हीच धावाधाव पाठीशी लागेल
तोंड लपवण्यासाठी
निओनच्या बदलत्या रंगात
----
(बडोदे - गुजरात । सन १९६९)
(नगर रचनाकार असो की आर्किटेक्ट - व्यावसायिक असला तरी लोकाभिमुख नसला तर त्याचे विज्ञान वा तंत्रज्ञान केवळ निर्जीव यंत्रच निर्माण करेल - जिवंत "वास्तु" नाही. कोणतेही कायदे न्यायाच्या वर असू शकत नाहित.
सूरसागराला अनेक परिमाणे आहेत; ती एक जिवंत वास्तु आहे. त्याच्याशी "कार पार्क" आणि "वाटर पार्क" यांची तुलनाच होऊ शकत नाही. अधिक वाचा )

~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 23, 2009

सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव


सातपुड्याच्या कुशीत असाही एक होळीचा उत्सव
भिल्लांचा होळीचा उत्सव पाच दिवस चालतो. गावोगावी मेळे भरतात.नाच, गाणे, संगीत यानी भारलेले. असे मेळे नदीकिनारी अथवा तळ्यांच्या काठी असतात, आणि बाजारपेठेच्या गावी.
होळी आणि वृक्षपूजा हे मूळचे आदीवासी सण आणि परंपरा आहेत असे वंशशास्त्राचे अभ्यासक (कुमारस्वामी) मानतात. नंतर आर्यानी आणि बौध्धानी त्यांचा स्वीकार केला.

------

विंध्य- सातपुड्याच्या रांगांमध्ये नर्मदा नदीच्या अनेक उपनद्या वाहतात. इथली जंगले आदिवासींची जीवनरेखा आहे.हजारों वर्षे आदिवासी इथे निसर्गाशी सुसंवाद साधून राहिले।विंध्य आणी सातापुड्याच्या रांगामध्ये भिल्लानी आसरा घेतला. पण आता तेथली जंगलेही नागरी समाजानी संपुष्टात आणली. आणि भिल्लांच्या चरितार्थावरच घाला घातला.

----

भिल्लांची संस्कृति एवढी संपन्न आहे की त्याला जागतिक वारसा समजणे आणि त्याचे जतन करणे आजची निकड आहे. दहा हजार वर्षांहून अधिक या पुरातन जमाती निसर्गाशी संवाद राखून आतापर्यंत जगत आले. पण आता सुधारणेच्या वावटळीत कितपत टिकेल याची शंकाच आहे.

-----
भिल्लांची जमात (community) एकसंध असते. त्यांच्यामध्ये सुसंस्कृत समजल्या जाणारया नागरी समाजाप्रमाणे (society) श्रमाची विभागणी केलेली नसते. प्रत्येक व्यक्ति सारया जमातीचे प्रतिक / प्रतिनिधी असतो। श्रम - विश्राम - अध्ययन - स्वास्थ्य यानी परिपूर्ण आदिवासी माणसांचे व्यक्तिमत्व नागरी माणसासरखे दुभंगलेले नसते.


----
होळीच्या रात्री अनेक वाड्यांवरून लहान थोर, बाया पुरूष होली पेटवायच्या जागी जमा होतात. येताना तादीने भरलेली मदकी, मक्याच्या भाकरया आणि अंडी बरोबर घेवून येतात.

चंद्र माथ्यावर आला की होळी पेटवतात. सारे बायका, पुरूष, मुले गाणी गात फेर धरून होळी भोवती नाचतात. अधून मधून ताडी पिने चालते. नाच गाण्यात ताडी पिण्यात रात्र संपते. दीवार वर येतो. सारे होलीभोवती जमा होतात. म्होरक्या सगळयानी आणलेल्या भाकरया एका मोठ्या बांबूच्या टोपलीत कुस्करून घालतो. त्यात कोंबडीची कच्ची अंडी फोडून घालतात, भाकरीचे तुकडे आणि अंड्यांचा बलक एकमेकात मिसळतात. हा होळीचा प्रसाद, सर्वाना वाटला जातो। आणी होळीच्या उपवासाची सांगता होते.



----

या तरुणानी ल्यालेले श्रृंगार कुतुंबांतील स्त्रीयांचे आहेत. बहुतेक दागिने काचमण्यांचे स्वत:च गुंतलेले असतात.
त्यांच्या बांसरीला पाचच सूर असतात.
मोराची चित्रे बायका मुली अंगावर गोंदून घेतात. तर वाघाला ते वाघदेव मानतात.


----
तरुण युवक युवती आपला पसंतीचे जोडीदार निवडतात आणि मेळ्यातून पळून जातात. मग तरुणाचे आई वडिल मुलीच्या घरी जातात आणि मुलीला मागणी घालतात, मुलीच्या घराच्याना हुंडा देवून दोघांचे लग्न लावतात. यासाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. ठिकठिकाणी पाच दिवस हे मेळे जत्रा भरतात. इथे गावोगावीच्या आप्तस्वकीयांच्या भेटी होतात.

----


ज्यावेळी माझे सहाध्यायी आणि सहकारी विलायातेला - अमेरिकेला जात होते आणि तेथेच स्थायिक होत होते तेंव्हा मी दरयाखोरयात - वाळवंटात - विशेषत: आदीवासी जमातीमध्ये भटकत होतो. शोधत होतो नागर समाजापुर्वीचे लोक आजही आहेत, जेथवर माझी पाळेमूळे नक्कीच पोहोचलेली असणार.

आणि माझी जीवानाशैलीच पार बदलून गेली -- कोणतेही विधी संस्कार न करता माझे धर्मांतर झाले म्हणा.
मी काढलेली ही छायाचित्रे मी प्रथमच प्रसिध्द करीत आहे. मन फारच अस्वस्थ आहे. वाटते मी काही चूक तर करीत नाही? कारण माणसावर माझा विश्वास असला तरी सुसंकृत समजल्या जाणारया समाजावरचा माझा विशवास केव्हाचा डळमळला आहे.

मी
लिहिलेले संशोधित निबंध १: "Tribal housing: Buddha and the art and science of Karavi hut"; आणि २: "Tribal housing and Habitat-2"
१: "Tribal housing: Buddha and the art and science of karvi hut" आणि
२: "
Tribal Housing and Habitat-2"
वारली
जमातीचे घर आणि परिसर, कला आणि संस्कृति संबधिं असले तरी इतर जमातींना पण लागू पडतात. कृपया वरील दुव्यावर टिचकी मारा.



~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape