February 28, 2010

होळी - एक शब्द रेखा, रेमी - एक स्व-चित्र रेखा

'ओक्टोसचे जाल', रेमीची स्व-प्रतिमा


होळी (वृक्षपूजेचा एक प्रकार. तो आदिम जमातीपासून चालत आलेला, नंतर नागरी समाजाने अनेक प्रकारे अंगीकारला.)

रेमीने स्वदेशी अनेक वर्षे केलेली, काही लक्ष मैलांची भटकंती, तथाकथित अद्यावत समाजांपासून ते आदिम जमातींचे दर्शन यानी वरील तथाकथित कला व खालील तथाकथित कविता साकारली. जरी वेगवेगळ्या दिवशी रेखाटलेली असली तरी एकाच जीवनरेखेने बांधलेली आहेत.
हर्षदा विनया या ब्लॉग लेखिकेने एकदा रेमीची चार स्व-व्यक्ति चित्रे (उजव्या बाजूच्या स्तंभात) पाहून (टीपेत) आश्चर्य व्यक्त केले होते त्याचा हा खुलासा।

आरशात दिसणारा रेमी किंवा छायाचित्रात टिपलेला रेमी, दोन्ही "मायावी वास्तवता", जसे "झाड" हा शब्द किंवा झाडाचे चित्र. वास्तवता (reality), मायावी वास्तवता (virtual reality) किंवा कलेतील अतिवास्तवता (surreality) समजायला आपापली बोधना (perception) वापरत असतो. तीच वस्तुस्थिती होळीची!

होळीत वानस जाळले जाते. माझ्यापुरता याचा अन्वय असा: वानसे आपल्या जीवनाला आधार - अन्न, निवारा, वस्त्र, ओषधी व अनेक जीवनोपयोगी साधने देतात. वानस सर्वप्रिय आहे. या आहुतीतून त्यांचे पुनरुज्जीवन - पुनरुत्थान होणार असते. बीज उनात भाजले जाते - मृत्यु पावते - त्यातून झाड उगवते. जसे गणेश विसर्जन - दुर्गा विसर्जन तसाच हा वानसाचा यज्ञ.

* * *

होळी!
इथे रात्रंदिवस रोजच होळीचा उत्सव चाललेला असतो!
अनेक होळ्या पेटतात इथे:
मानवी ऊर्जेची होळी;
नैसर्गिक साधनसंपत्तीची होळी;
पैशाअड़क्याची होळी;
वैयक्तिक - सामाजिक स्वास्थ्याची होळी;
लोकशाही हक्कांची जबाबदारीची होळी...

या आधुनिक होळीला म्हणा आता वणवा!
ऊर्जेच्या होळी बरोबर होते
पाण्याची होळी; भूईची होळी;
जंगलांची होळी; जीव जंतूची होळी;
पर्यावरणाची - वातावरणाची होळी;
पारिस्थितिकिची होळी;
या होळीत तू अन् मी असतो संतत
कार्यरत... तडफडत चाचपड़त...
उत्तराच्या शोधात.

मग तू अन् मी बोलावतो
ही होळी थांबवण्यास
जागतिक दादा लोकांची
जागतिक परिषद.

तेथेही जागतिक दादागिरी देते
आधुनिक शास्त्रोक्त उपचार;
त्यांचे आधुनिक तंत्र - मंत्र - विधी
जे करिती साह्य पेटवण्यास हा वणवा,
लावते होतात आणिकच हातभार.

आधुनिक विज्ञ्यानाचा आधुनिक विश्वामित्र
देतो आश्वासन राजकर्त्याना त्यांच्यासाठी
प्रतिविश्व - नवा कल्पलोक,
नि हा महत्वाकांक्षी आधुनिक त्रिशंकू
लटकत राहतो अधांतरी...

त्यात तू पण, अन् मीही सामील.
होळी! या होळीला म्हणा आता वणवा!!

* * *
(रोम - रोमन साम्राज्याची राजधानी - जळत असताना सम्राट नीरो फिडल वाजवत बसला होता असे सांगतात. ही गोष्ट प्रसिध्द आहे. पण आजही त्याची पुनरावृत्ती होते!)
 अधिक वाचाहोळी 


रेमीजीयस डिसोजा
होळी पौर्णिमा २०१०
मुंबई

~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved।
Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 24, 2010

पडछाया - २: कविताजळीं पाहिली दु:खाची पडछाया:
एक बिंदू टपकला
नि पसरत गेली पडछाया चक्राकार;
दुसरा बिंदू टपकला
नि गुंफले तरंग एकमेकात अनंत.
पडछायेच्य़ा तरंगांवर प्रकाश हसला,
नाचला, तु़षारांच्या लोलकांवर बसून
अवकाशात उडाला.

* * *

टीप: वरील प्रतिमा आंतरजालावरून घेतलेली आहे.

~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 22, 2010

पडछाया: मुंबईत आपला परिसर

मुंबईची बदलती क्षितीजरेषा
------------------------------------------------

Survival - Squattrs in Mumbai - 4

पडछाया -मुंबईत आपला परिसर

मुंबईतील एका उड्डानपुलाखाली राहतात ही मुले. त्यातील दोघे इयत्ता पांचवीत व एक सातवीत मुंबई नगर पालिकेच्या शाळेत शिकतात. त्यांच्या अनेक विनामूल्य खेळांपैकी हा पण आनंदाचे लेणे घेऊन येतो. यात मी पाहतो संस्कृतीची अभिव्यक्ती. हे चित्र अनेक दृष्टीकोनातून पाहता येईल. Survival या शब्दाचा अर्थ "टिकून राहणे" असला तरी कृष्ण्मूर्ती म्हणतात, "to live sanely" - शहाणपणे जगणे.

मुंबई विस्थापितांची आसरा झाली. जेथे जेथे आधुनिक विकासाने आपली पदचिन्हे उमटवली तेथून कोट्यवधी ग्रामीण जनता विस्थापित झाली. सरकारकडे याच्यावर अजूनही परिणामकारक पर्याय नाही. अन् लोकशाहीत अजूनही सरकारला - प्रशासनाला "मायबाप सरकार" समजतात. मुंबईतच सुमारे ६० लक्ष लोक झोपडपट्टीत (सरकारी परिभाषेत - गलिच्छ वस्ती) व रस्त्यावर, पुलाखाली, मिळेल तेथे राहतात. म्युनिसिपालिटीने एका जागेवरून दुसरीकडे जागा पहावयाची!

मुंबईच्या विकासाची म्हणजे बदलत्या क्षितिजरेषेची ही पडछाया!
रेमीजीयस डिसोजा
* * *
छायाचित्रे : रेमीजीयस डिसोजा.


~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 19, 2010

लोकभारती व अभिजात-भारती वाहिन्या

(मुख्य शब्द : वारसा संवर्धन)


रेडियो ऐकल्यापासून नेहमी वाटले नभोवाणीवर - "ऑल इंडिया रेडियोवर" - विविधभारती प्रमाणे "लोकभारती" व "अभिजात-भारती" अशी २४ तास चालणारी आणखी दोन केंद्रे हवीत. (कारण अरुणाचल प्रदेशात पहाट मुंबईच्या पूर्वी होते.) साने गुरुजीनी सुरु केलेली "आंतर भारती" नेहेमी आठवायची; अजूनही आठवते.

नंतर आली "दूरचित्रवाणी".

एवढा "मेरा भारत महान', एवढी तिची परंपरा प्राचीन, एवढी तिची विविधता रम्य... नृत्य नाट्य चित्र शिल्प कथा काव्य! प्रत्येक प्रदेश, प्रत्येक मानव समूह संपन्न या विविध संकृति माध्यमातून!

पण राष्ट्रभाषा हिंदी, म्हणून तिला प्राधान्य; म्हणून बौलीवूडला प्राधान्य. नंतर आल्या राजभाषा; त्यांचीही केंद्रे आली. बरे झाले.

नभोवाणी आली - चित्रपट आला - दूरचित्रवाणी आली. पण लोककला अन् अभिजात कला या माध्यामावर मात्र दिवसेदिवस मागे पडत गेल्या.

पण लोककला व अभिजात कला कोपऱ्यात पडल्या. त्यांच्या नावाने चित्रपटातून विडंबने (की विटंबना?) मात्र ऐकायला / पहायला मिळते. म्हणे आम्ही देशभक्त.

परदेशात "वारसा संवर्धनाची" (heritage conservation) टूम निघाली की आम्ही तिची सरसावून नक्कल करतो. पण परदेशी क्लासिकल संगीताची २४ तास चालणारी केंद्रे आहेत हे फार थोड्याना माहीत असेल. शेवटी वारसा वस्तूंमध्ये नसतो: तो लोकांमध्ये असतो हे आम्ही विसरतो. लोकांचे संवर्धन करा मग वारशाचे संवर्धन आपोआप होईल.
* * *
रेमीजीयस डिसोजा
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 12, 2010

सरस्वतीचे ओयासिस.


वैराणात मध्यान्ही
क्षणभर उनाची
झाली साउली.
तप्त तळपायाना
गुदगुल्या करीत
रेताडाचे कण कण
हसले खळ्खळ;
पिवळेधम्म हिरवेगार
फुलले तुषार;
रणाखालून क्षणभर
तिचे पात्र आले वर
सरस्वतीचे ओयासिस.
* * *

प्रतिमा : सरस्वतीचे वरील "चिन्ह" शारदोत्सवात आम्ही मुलानी दगडी पाटीवर दर वर्षी काढले:
सरस्वती, शक्तीच्या - उर्जेच्या तीन -- महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती -- पैकी एक. सरस्वती म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तसेच लक्ष्मी म्हणजे तिजोरीतील पैसाअडका, पण वैश्य वृत्तिमुळे सर्वच परिभाषा आता बदलेल्या असाव्या.

आयुष्यात उन्हाळे - पावसाळे अनेक येतात. वसंत मात्र एकदाच येतो. असे का? मात्र सरस्वतीच्या उपासनेने --- कृषीकला - पाककला - नृत्य - गाणे - गायन - चित्र - शिल्प - कहाणी --- यानी मात्र आयुष्यभर वसंत कुणालाही शक्य असतो. यासाठी नाही सिध्दिची ना प्रसिध्दिची गरज. हवी असते सर्जनशीलता जागरूक ठेवायची.

(सुधारित पोस्ट )

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 01, 2010

बोला छापा की काटा

हॉलीवुड-बॉलीवुड-टेलीवूड
इत्यादींची

जीवनरेखा

जशी
दूरचित्रवाणी
असे
तशी
गावढळांची
असे
जळ-जमीन.
बोला,
तुमचा
छापा
कोणता?


~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape