June 28, 2011

धू ऽ ऽ ऽ म - वन्, टू' थ्री, फोर...

 ॥ धू ऽ ऽ ऽ म - वन्, टू, थ्री, फोर...॥

महिषांची चढाई । कमाटी बाग, वडोदरा । १९६९
 स्टुडिओत मधल्या विरामाची वेळ होती. आणि मला दृष्टीभ्रम (apparition - आकृति-आभास अशा अर्थाने) झाला असावा. कित्येक यमदूत चढाई करून येताहेत असे दिसले.

खरं पहाता खिडकीतून फक्त कमाटी बागेतील मनमोहक उपवन दिसत होते, चिमण्या पक्षांचें संगीत सतत ऐकू येत होते. नागरी निवासात - urban habitat - निसर्गाच्या सान्निध्यात वास म्हणजे अलभ्य लाभ! अहो भाग्यम! मग हे रेडे आले कोठून? कदाचित ही भविष्यवाणी असेल! तो क्षण आणि ती नोंद भूतकाळांत जमा झाली होती.

मुंबईस आल्यावर मात्र गेल्या काही वर्षांत मला हे चित्र वारंवार आठवतेय. रस्त्यावर चालताना भरवेगाने फटफटीवरून येणारे स्वार पाहिले की काळजात धडकी भरते. वाटते यमदूच येतायत.

मुंबईत काही भागांत तर रस्त्यावर चालणार्‌या बायकांच्या गळ्यांतले सोन्याचे दागिने खेचून काढण्यापर्यंत काही फटीफटीस्वारांची मजल गेली. पोलिसांनी अशा कांही वाटमारी करणार्‌याना पकडले पण. याना कुठून प्रेरणा मिळाली असेल हे सांगायला नको.

वास्तवता - reality, मायावी वास्तवता - virtual reality, व अतिवास्तवता surreality यांतील भेद व सीमारेषा केव्हा लोप होतात ?

हे समजणे आजच्या सांस्कृतिक संक्रमण काळांत अत्यंत क्लिष्ट व पेचाचे झालेले आहे. भावविवशतेने तर हे समजणे अधिकच दुष्कर होईल. याचे उत्तर कोण देईल? सरकार ज्याला अन्न-पाणी-निवारा-उपजीविका हेच मूलभूत प्रश्न कधी सोडवता आले नाहीत? की गोरे देवदूत ज्याना त्यांच्या समृद्धिने निर्माण केलेले प्रतिविश्वाचे यक्षप्रश्न सोडवता येत नाहीत?

एक आख्यायिका आठवते. गोरे साहेब खंडाळ्याच्या घाटात मुंबई व पुणे जोडण्यसाठी रस्त्याचा शोध घेत होते - सर्वेक्षण करीत होते. प्रश्न फार अवघड होता. काहीं दिवसानंतर न राहावून तेथे येणार्‌या एका धनगराने विचारले "काय अडचण आहे?"

गोरे आमच्या भाषा शिकले पण आमची संस्कृती त्याना कधी समजलीच नाही. (आणि मलातरी कितपत समजलीय शंकाच आहे!) कारण संस्कृती लोकसमूहात स्थित असते, पुस्तक-चित्र-शिल्प-इमला इ. यांत नसते - या तिच्या अभिव्यक्ती होत.)

एक आख्यायिका आठवते. गोरे साहेब खंडाळ्याच्या घाटात मुंबई व पुणे जोडण्यसाठी रस्त्याचा शोध घेत होते - सर्वेक्षण करीत होते. प्रश्न फार अवघड होता. काहीं दिवसानंतर न राहावून तेथे येणार्‌या एका धनगराने विचारले "काय अडचण आहे?"

गोरे आमच्या भाषा शिकले पण आमची संस्कृती त्याना कधी समजलीच नाही. (आणि मलातरी कितपत समजलीय शंकाच आहे!) कारण संस्कृती लोकसमूहात स्थित असते, पुस्तक-चित्र-शिल्प-इमला इ. यांत नसते - या तिच्या अभिव्यक्ती होत.)

त्या लंगोटीबहाद्दराने त्याना रस्त्याची आखणी दाखवली. तेव्हा कुठे सायबाच्या डोक्यात उजेड पडला. त्यानी त्या धनगराला तेथेच गोळी मारून ठार केले. तो रस्ता अजूनही आहे. (ताजमहालच्या वास्तुशिल्पीची ज्याचे हात प्रेमाचे प्रतिक बांधणाऱ्या बादशाहने तोडले ही गोष्ट सर्वश्रूत आहे.)

लोकांच्या प्रश्नांची उत्तरें त्यांच्यापाशीच असतात, व तीं उत्तरे समष्टीनेच शोधायची असतात. धुरिणांजवळ उत्तरें नसतात, फक्त आज्ञा असतात.

॥ सरता पालव ॥
वरील चित्रांतील आकृति-आभास दुसर्‌याही एका भविष्याची नांदी असवी. जागतिक (Global) स्तरावरून अनेक नव-वसाहतवादी महिष वेगवेगळे बुरखे पांघरून आक्रमण करणार होते - नाही, त्याची सुरवात झाली होती. अमेरिकेतून 'Peace Corps' चे स्वयंसेवक संकरित बियाणांचा प्रचार करायला गुजराथेत खेडोपाडीं दाखल झाले होते. अनेक उदाहरणे आहेत, त्यापैकी हा एक मासला.
-------------

View Kamati Bagh in a larger map

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 15, 2011

तांबूस मायणी काम हवे कुणा

तांबूस मायणी काम हवे कुणा? : एक व्यत्यासकथा  (metafiction)
भातशेती
मुंबईत पावसाला सुरवात झालीय. गांवाच्या - कोंकणच्या आठवणीने काळजात उमाळे येतात. आता पेरणीला सुरवात झाली असणार! शेतात काम करायला घरांत - गांवांत माणसे उणी पडणार! जो उठला तो शहरात जातो. पूर्वी हातात चलन नसायचे, पण कधी कमतरता भासली नव्हती. आता चालनावाचून पाऊल पुढे पडत नाही... असे कैक विचार मनात खळबळ उठवतात.

तांबूस (brown) मायणी (collar) काम म्हणजे शेती - कृषीकला. इलेक्ट्रोनी-माहिती-तंत्र (ET-IT) युगांत अशा कामाला कोण बरें तयार होईल? सर्वांना सफेत मायणीचें किंवा निळ्या मायणीचें काम हवें असतें, नगद पैसे देणारें काम हवें असतें. कुणाला पोटापाण्यासाठीं काम नको. बापजाद्यांनी कमाई करून ठेवलेली आहे नं! मातीचिखलांत, ऊन-हींव-पावसांत शेतीकाम कोणाला करायाचे आहे? सुधारलेल्या प्रगत जमान्यात माती अस्पृश्य झालेली आहे आणि शेतकरी नगण्य झालेले आहेत.

शेतकाम म्हणजे कृषीकला, कला व विज्ञान यांचें संयुग; जैवतंत्राचे (biotechnology) उगमस्थान; पंचमहातत्वांशीं सतत संपर्क.

"उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी"
कोणता होता तो जमाना जेव्हां "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी" ही म्हण आमच्या कानावर नेहमी यायची? त्यावेळीं आमचा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावार होता. काय स्वप्नें पाहिलीं असतील आमच्या कष्टाळू कृषीवलानीं?

आज वेगळाच प्रकार नजरेस येतोय. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्येचा मार्ग पत्करतोय, सुयोग्य शिक्षणाला वंचित राहिलाय, त्याची जमीन औद्योगिक विकासासाठी सरकार कायद्याने हिरावून घेत आहे, त्याचा संसार कुटुंब विस्थापित होत आहे. अशा लाखों विस्थापितांचे लोंढे शहरांकडे लोटलेले आहेत. नगरानगरांत महानगरांत रस्तोरस्ती हे नजरेस पडतात आणि झोपडपट्टयांतून (सरकारी परिभाषेंत त्यांना "गलिच्छ वस्ती" हें नांव आहे). त्यांच्या या वस्त्या बेकायदेशीर समजल्या जातात.


मुंबईत विस्थापित - १
 
मुंबईत विस्थापित  - २
मुंबई शहराचे पद-चिन्ह जेथे जेथे उमटले तेथून विस्थापित झालेले खेडूत 
उदरनिर्वाहाच्या शोधात येथे दाखल झाले. आता त्यांच्या आयुष्यावर नव्हे तर 
  जीवावरच या शहराने पर्यायाने लोकशाही सरकारने "कर" लावलेला आहे.
(Taxing the Life of the displaced)

आणि अडत्यांना, दलालांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत. आता नोकरदारांना पण हुद्यानुसार वरची कमाई होते असे ऐकिवात आहे.

"पांगिरा" करमुक्त चित्रपट
"पांगिरा" या नांवाचा चित्रपट हल्लींच पाहिला. करमणूक करापासून मुक्त आहे म्हणून पाहिला. विश्वास पाटिल यांच्या "झाडाझाडोरा" कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला असावा असें वाटले. पण पुस्तकाच्या नांवाचा उल्लेख चित्रपटात दिसला नाही. या कादंबरीला अनेक पारितोषकें दिलींत. आजच्या ग्रामिण परिस्थितीवर चित्रपट व कादंबरी, दोनही चांगले माहितीपट आहेत. मला वाटते हा चित्रपट ज्या प्रसंगाने संपवला आहे पोलिसानी शेतकर्‌यांवर केलेला गोळीबार तेथून सुरू करायला हवा होता. तसं न केल्यामुळे पटकथेची सर्जनशील निर्मितीची संधी हुकली असं मला वाटतं. मला प्रांजळपणे वाटते की कलावंताने तत्कालीन समस्यांना उत्तरे द्यायला हवीत. सरकार मात्र दानशूर आहे. तें चित्रपटाला करमुक्ती - बक्षिसे - पदके देते. पण विस्थापितांच्या जीवावर घाण पाणी वापरायचा कर लावायला मागेपुढे पहात नाही. हे इंडियाच्या आर्थिक राजधानीचे खरे स्वरूप!

या निमित्ताने मला शरच्चंद्र चटर्जींची "सव्यसाची" – पथेर दाबी – ही कादंबरी आठवते.
या कादंबरीचा शरच्चंद्र चतर्जी यांनी केलेला शेवट साधा, स्वाभाविक व विधायक सर्जनशीलतेचा नमुना आहे. कथेचा विषय आहे, भारतांत सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम. या संबंधांत पुढील परिच्छेद पुढें उद्धृत करतों.

लोकशिक्षण व साक्षरता
"... इथून पुढे खेड्याची सेवा हे माझं एकमेव व्रत. असा एक काळ होता, की या आपल्या कृषिप्रधान भारतदेशाचा खेडेगाव हाच प्राण होता. खेडेगावच त्यांचं अस्थि-मज्जा-रक्त होतं. आज ते खेडेगाव विध्वंसाच्या मार्गाला लागलं आहे. पांढरपेशे लोक खेडेगाव सोडून शहरात येतात, शहरातूनच खेडेगावावर सत्ता गाजवतात आणि तिथूनच त्यांची पिळवणूक करतात. खेडेगावाशी त्यांचा लागाबांधा असेल तर तो हाच. दुसरा कसलाच नाही. न का ठेवीनात? पण आजवर ज्या शेतकर्‌यानं त्यांना पोटाला अन्न आणि पांघारला वस्त्र दिलं, तोच शेतकरी आज अन्नाला मोताद झाला आहे. निरक्षर आहे, निरुपाय होऊन मरणाच्या पंथाला लागलाय! यापुढं मी आता त्यांच्या कल्याणासाठीच स्वतःला वाहून घेणार. भारतीनंसुद्धा या कामी मला जीव तोडून मदत करायचं कबूल केलंय. आता आम्ही गावोगाव शाळा उघडूं. जरूर पडली तर त्यांच्या घराघरातून फिरून मुलाबाळांना शिक्षण द्यायचं काम हिनं पत्करलंय. माझा संन्यास देशासाठी आहे — स्वत:साठी नव्हे डॉक्टर." (पृ. ३९९-४००)
दर वर्षी देशांत विज्ञान-शाखांत लाखो पदवीधर तयार होतात. त्यांत वनस्पतीशास्त्रज्ञ पण असतात. त्यातले बहुतेक कारकुनी करण्यात बाकीचे आयुष्य खर्च करत असावेत? त्यांनी चुकूनही टिनाच्या डब्यात माती भरून मिरची, मोहरी, हळद आलं इ. रुजत घातली असतील का शंकाच आहे. त्यांचे शिक्षण प्रयोगशाळेतच राहते.
* * *
टीप:
१. "सव्यसाची" – बंगाली नांव: पथेर दाबी – या कादंबरीला ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, ती स्वातंत्र्यानंतर उठवण्यात आली. मामा वरेरकरांनी इचे मराठी भाषांतर केले. शरच्चंद्र देशांतील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पूर्णत: जाणून होते. यात कुठही अतिरंजीत भाग नाही. कुठंही भडकपणा नाही.
२. वाचकांनी आपल्या अनुक्रिया - प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्या.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape