Showing posts with label मायावी वास्तवता. Show all posts
Showing posts with label मायावी वास्तवता. Show all posts

December 26, 2013

शौचाचे परिवर्तन कशात होते?

शौचाचे परिवर्तन कशात होते?
संगीतमग्न वारली (आदिवासी)

निसर्गनीर्मित जीवमात्राने, प्राणी (त्यात अत्यन्त बुध्दीमान माणूस पण आला) आणि वनस्पती यानी केलेले शौच जीवनोपयोगी खत बनते.

पण गेल्या पाच हजार वर्षांच्या संघटित नागर समाजाच्या (civilized society) इतिहासात माणसाने केलेल्या शौचाचे परिवर्तन कशात होते?

पिरामिड - ताजमहाल पासून ते प्रचंड शहरे; ग्रंथ-पोथ्या-पुराणे पासून ते देवदास-स्लमकुत्रा करोडपती पर्यंत; अवकाशयानापासून सैपाक घरातील मिक्सर-ग्राइंडर पर्यंत सारे सारे काही मैल निर्माण करतात. . याला इंतरनेट - आंतरजाल - पण अपवाद नाही। नाही हा माझा ब्लॉग! या सर्व मैल्याचं परिवर्तन कशात होते?

हे सारेच सृष्टीतील सिमित ऊर्जा स्रोतांचा क्षणोक्षणी होणारा प्रचंड वापर संपूर्ण पर्यावानाला विनाशाकडे नेत असतात; एन्ट्रपीचा - प्रगतिरोधाचा नवा नवा उच्चांक गाठत जातात.

अलेक्झांड्रिया शहरात म्हणे एक प्रचंड लायब्ररी होती. विलायतेच्या परिसरात किरिस्ताव (Christian) आणि मुसलमान यांच्यात धर्मयुध्दे (जिहादे) चाललेली असताना हे ग्रंथालय खपले - जळून खाक झाले. पण कुणाचेच काही बिघडले नाही.

एवढे अवतार - प्रेषित झाले. आले. गेले. काही फरक पडत नाही. त्यांच्या नावाने प्रचंड उर्जेचा विनाश मात्र चालूच आहे: या ना त्या निमित्ताने. जो तो आपापला अंहकार गोंजारत असतो. त्यात मी पण एक.

पण सृष्टीचा आदर, कला आणि विज्ञान यानी माणसाला फार हातभार दिलेला आहे: लाख वर्षापूर्वी पासून; नागरी समाजाचा उदय होण्यापूर्वी. कला आणि विज्ञान ही काही पांढरपेशांची, भटोंची, गोऱ्या कातडीची मक्तेबाजी नाही.

सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजांच्या पाच हजार वर्षांच्या हाणामारीतून अजूनही तगून राहिलेल्या काही आदिम जमाती आहेत. त्यांच्याकडे अजूनही सृष्टीयोगाची मूल्यवान गुपिते आहेत. फक्त आमच्यामध्ये थोडासा नम्रपणा हवाय.

(टीप: १: माझ्या "यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - ३" या पोस्ट वर सतीश रावले यांची टिप्पणी वाचून सुचलेले काही विचार येथे मांडले.
२: वरील छायाचित्रात एकतारीच्या सूरात गाणे म्हणत असलेला तल्लीन वारली आदिवासी: मुंबईच्या मागील दारी. अधिक वाचा Warali Art
३: आनंद कुमारास्वामींच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकाचे परिक्षण माझ्या इंग्रजी ब्लॉग वर पाहा: LINK: )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 30, 2011

मध्यांतर ओटीवर

एक मध्यांतर या ब्लॉगच्या ओटीवर 

माझ्या घराची ओटी
हा ब्लॉगच आहे मध्यांतर, जशी पारंपरिक ग्रामिण घराला असते ओटी. एक आंतले जग - वैयक्तिक, खाजगी ; एक बाहेरचे जग - जळ, जमीन, वानसें, वनचर, सगेसोयरे, शेती, नेआण...

दोन्ही जगे कार्यरत असण्याची - श्रम, विश्राम, स्वास्थ्य, अध्ययन आणि प्रजनन या सृष्टीने सजीवांना प्रदान केलेल्या पांच अंगभूत स्वायत्त कार्यांची; व्यक्ती आणि समष्टीची.

सिनेमाघरालापण ओटी हवी असते. अंधारातून उजेडात येण्यासाठी. मायावी वास्तवाच्या दुनियेतून वास्तव जगात येण्यासाठी! उत्तरेच्या शीत कटीबंधातून दक्षिणेच्या उष्ण कटीबंधात यायला!

वर उल्लेखलेल्या नैसर्गिक पांच कार्यात जसे संतुलन हवे तसेच वास्तव आणि मायावी वास्तव यात पण हवे; शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी या संतुलनाची अनिवार गरज असते.

कारण साधेच आहे. आजच्या ET-IT च्या युगात, पर्यायाने औद्योगिक संस्कृतीत, अनेक माध्यमातून 'मायावी वास्तवता' अती अवास्तव बोकाळलेली आहे यात शंकाच नाही. एव्हढी की कुप्रसिद्ध गोबेल्सच्या तंत्रामुळे आपल्याला हेच सत्य वाटू लागते. मग आपण मायावी वास्तवाचा उपभोग घेत असूं, किंवा ते निर्माण करण्याचे करण्यासाठी उपजिविकेचे  काम करीत असूं.

घराची ओटी म्हणजे आंतबाहेर येणे-जाणे यांमधील सबोध जाणीवेचे मूर्त साधन (concious entry and exit) असं आल्डो वान आय्‌क हा वास्तुविद म्हणतो. याची सर्वपरिचित उदाहरणे: मंदिराचे गोपूर, किंवा घराचे प्रवेशद्वार जेथे तोरण बांधले जातें, समोर रांगोळी घातली जाते !

मला वाटते ब्लॉगचं पण असंच काहीसं.
मात्र येथे आपले सर्वच परिचित आपला ब्लॉग वाचायला येतीलच असं नाही. 
पण खेडेगांवात दोनशे घरांतली बाराशे पंधराशे लहानथोर माणसे सर्वांनाच परिचित असतात. त्याशिवाय पंचक्रोशीतील इतर व्यक्ती परिचित असतात. खेडेगांवात समष्टीचे विश्व प्रसारण पावते व आपले खाजगी विश्व लघुत्तम किंवा किमानोत्तम होते; त्यामुळे आपल्याला ओळखीची - स्वत्वाची - (identity) उणीव कधीच जाणवत नाही, भासतही नाही. समष्टी एकसंध जमात बनते. मग घरातल्या लग्न-बारशाच्या कार्यासाठी नारळ घेऊन तोंडी आमंत्रण दिले तरी चालते. शेवटच्या रवानगीसाठी लोक स्वत:हून जमा होतात.

पण* ब्लॉगचे अस्तित्व "जगभर अरण्य" - जाल (www: world wide wilderness) अशा अवस्थेत असते. यास्तव मला नेहमीच जाणीव होत असते : एवढे महागडे माध्यम कशासाठी कितपत वापरायचे? वैयक्तिक बाबींना येथे जागा नाही. तरीपण लिहिणारा मी व लेखनातला मी आणि वाचणारा मी (वाचक) हे जाणता-अजाणता एकमेकास, दुसर्‌यास किंवा स्वत:स पहात असतात.

मायावी वास्तव:
शब्द किंवा चित्र - जसे 'झाड' हा शब्द किंवा झाडाचे चित्र केवळ मायावी वास्तवता असते; ते कधीच सत्य, वास्तव नसते. आपली बोधना (perception) त्या शब्दाचा / चित्राचा अर्थ दाखवते. जितकी बोधना विस्तृत, प्रगल्भ तेवढा त्याचा अर्थही. म्हणून प्राचीन सूक्ताचा साकल्याने अर्थ समजणे कधीकधी दुष्कर होते. मग आदिशंकराचार्य एका कडव्यावर वीस कडव्यांची टीका लिहितात, आचार्य रजनीश वीस पृष्ठांची टिप्पणी लिहितात. 'ॐ' हे संकेत चिन्ह (icon) कोणाला क्षणार्धात समजले असेल. पण या लेखकाला मात्र कधी समजेल याची खात्री नाही; उगाच भावूक होण्यात काय अर्थ?

(आज गटारी अमावास्या!)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 09, 2011

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संतोष कुमार, मुंबईत एका फुलांच्या दुकानात काम करणारा शिक्षित नोकर,
फावल्या वेळात  कलाकुसर करतो. हा त्याचा स्वायत्त अधिकार आहे.

झुंडीत हरवले व्यक्तिस्व

संवयींचे आम्ही गुलाम 
चालतो, बोलतो, बघतो

दुनिया सारी सवयीने;
अन्‌ रोजची धावाधाव –

फुरसत नाही थांबाया;
पुजा, अर्चा, खाणे, पिणे,

नशा, झिंगणेही संवयीने;
सत्ता, सट्टाबाजार, ग्यान,

जातपात, वंश, गतकाळ...
मग राही कशाचे भान?

व्यक्तिस्व सदा हरवलेले
स्वातंत्र्यही बाळपणीचे

चालता झुंडीच्या आधारे
अजाणता हातींचे गेलेले

झुंडीत सांडले सगेसोयरे
कसे जोडावे सुटले दुवे?
* * *

पूर्वपिठीका
व्यक्ति आणि समष्टी व नागरी आवास यांत मानवी मापनश्रेणी (human scale) पुनः प्रस्थापित होणे, विशेषतः आजच्या यंत्रयुगात व नागरी पर्यावरणात अनिवार्य झालेले आहे. यांत्रिकी राहणीने व मायावी वास्तवतेच्या प्रभावाने व्यक्तिचे व समष्टीचे जीवन ढवळून निघालेय, अस्तव्यस्त झालेय. त्यात वेग व घाई वाढलीय. ज्ञान व माहिती यांचा संग्रह वाढला पण त्यांचा रवंथ करायला वेळ नाही. परिणामतः समाजाच्या सर्व स्तरांवर सर्जनशीलतेची गुणवत्ता आता किती राहिलीय याचीपण शंकाच आहे. विधायक सर्जनशीलता सर्वांतच असते. ही एकल्या-दुकल्याची मक्तेदारी नाही. अनेकात ती सुप्त असते. तिला जागी करणे ही खरे पाहता समष्टिची जबाबदारी, इतर कोणत्याही संस्थांची नव्हे! पण लक्षात कोण घेणार?
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 05, 2010

इंडीयन आयडॉल ५ (Indian Idol 5)

सूचक शब्द: लोककला, मायावी वास्तवता, संस्कृती, आदिवासी    


इंडीयन आयडॉल ५ दूरचित्रवाणीवर चालले आहे. मी स्वरूप खानचे राजस्थानी लोकगीत ऐकतो. आणि हेलावून जातो. मी अवकाशात उचलला जातो, उंच उंच थरावर, कितीतरी वर्षांनंतर.
मी डोळे मिटून घेतो. टीवी च्या पडद्यावरील रोषणाई नजरेआड करतो.
वाळवंटात दूरवर जाणाऱ्या गाण्याच्या ताना मी अंतर्यामात पाहतो, ऐकतो. माझा "देस", माझी धरतरी, माझे अनामिक लोक,  सारे काही नजरेत येते. सर्व अंगांगाला स्पर्श करतात. गंगा यमुना मुक्त होतात.
मनोमन मी आशा करतो, येणाऱ्या काळात स्वरुपचे आणि त्याच्या लोककलेचे बॉलीवूडच्या मायावी
वास्तवापासून रक्षण होऊदे, त्यांना टिकून राहूदे.
एक काळ असा होता जेव्हा लोककलेतून अभिजात कला जन्मल्या आणि वाढल्या, इथेच नव्हे, सर्व जगभर. आता फक्त  कलेच्या नावाने वारंवार विडंबन आणि विटंबना पाहायला मिळते. आता मानलेल्या गुरूंची नक्कल बघायला मिळते.
हा काळाचा नव्हे मुक्त बाजाराचा (फ्री मार्केट) महिमा आहे. 


इथे इंडिया शब्दाचा अर्थ "प्रथम  जगत इंडिया" जेथे "तृतीय जगत इंडिया" व "चतुर्थ जगत इंडिया" (आदिवासी व वनवासी जमाती) यांना स्थान नाही. तरीही बहुविध जन माध्यमामुळे स्वरुपसारखे तरुण आपले नशीब अजमावयास येतात. इतर वाहिन्यावर  असे तरुण अधून मधून बघायला मिळतात. समता फक्त घटनेत लिहिलेली आहे. ती कधी अस्तित्वात येईल याचे भाकीत कोण करू शकेल?   

प्रथम जगत इंडियाचे नागरिक कालही अल्पसंख्यांक होते, आणि वाढत्या लोकसंख्येबरोबर आजही आहेत. सत्तेचे - आर्थिक, राजकीय, सामाजिक - लगाम जोवर त्यांच्या हातीं आहेत तोवर समता व लोकशाही कल्पलोक राहणार. 
दुसरी गोष्ट: इतर स्पर्धकांबद्दल काय सांगणार? ते सर्व धादांत नकलाकार! Crafty!! अर्रर्र, न-कलाकार!!! नकली  मालाला बाजारात फार मागणी आहे म्हणतात.   

टीप: छायाचित्रे - १ वारली आदिवासी मुंबईच्या मागील दारी राहतात. यांच्यावर इंग्रजीत लिहिलेला संशोधन निबंध माझ्या ARCHETYPES INDIA या ब्लॉगवर प्रसिध्द केलेला आहे (दुवा).
२ भिल्ल आदिवासींच्या होळी उत्सवावर व आदिवासी लोकजीवनावर
सचित्र पोस्ट याच ब्लॉगवर पहा (दुवा). 
३ ही सर्व छायाचित्रे व लेख माझ्या मते "मायावी वास्तवता" आहे, यांचा अर्थ आपण आपापल्या बोधानेप्रमाणे समजतो. 

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 23, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

तंत्र युग (Technology Age)

सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध असावा असे वाटत नाही. पण जास्त खोलात जावेसे कधी वाटले नाही.

रोज सकाळी अंगणात शेण सडा सारवून रांगोळी घालण्यापासून सैपाकघरातील असंख्य क्रिया तंत्र विधीच आहेत. हा ब्लॉग लिहिणे पण तंत्राचा भाग आहे. कारखान्यात लेथ मशिनावर वेगवेगळ्या इंजीनाना लागणारया हजारो भागांच्या हजारो नकला तयार केल्या जातात. हे पण तंत्र आहे. झोपडी, गगनचुंबी इमारत, शहर - नगर बांधणे ... हे सारे तंत्र विधी आहेत. अण्वास्त्रे, बंदुका, युध्ये- महायुध्दे हे सारे आधुनिक "जारण-मारण-तंत्र" विधीच होत.

ध्यानाच्या अभावी यातील कितिक हीन, अमानुष, निकृष्ट असतात - सुख समृध्दी, पर्यावरणाला घातक होतात. कित्येक शेकडों हिन्दी इत्यादि चित्रपटांप्रमाणे छूमंतर होतात. घरातल्या मिक्सरपासून अवकाशयानापर्यंत कोणते यंत्र कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. अगदी मझ्यासमोराचा संगणक पण! एवढेच काय? मी पण (संगणकाच्या रेडिएशनमुळे)! जर्मनीत झालेला यहुद्यांचा संहार, नागासाकी-हिरोशिमावर टाकलेली अण्वास्त्रे, ग्रामीण जनतेचे विस्थापन, पर्यावरणाचा होणारा सतत विनाश... हे सर्व आधुनिक जारण-मारण तंत्र विधिच होत.

मी पाहतो, दिवाळीत पुस्तकात पाहून रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीचा फराळ बाजारात तयार मिळतो. पूर्वी जे मसाले घरोघर तयार केले जात होते ते आता वाण्याच्या दुकानावर आयते मिळतात. तयार सदरे, तयार विजारी, तयार काय काय! पन्नास कोटी बाया बापड्यांची सोय झाली! शंभर कोटी जनताजनार्दनाची सोय झाली!

स्वावलंबन गेले! स्वायत्तता पण गेली! नियोजनाने जमीनी गेल्या. हे सारे कायद्याच्या कक्षेत राहून. तरीही मुंबईच्या मागील दारी कितिकाना धड एका वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते. म्हणून दयाळू मायबाप सरकारने शाळेतल्या मुलाना दुपारचे जेवण मोफत द्यायची योजना केलीय. पण पालकांचे - भावंड़ांचे काय? कुठे गेले सरकारचे "ध्यान"?


संस्कृति (culture): उगम अणि अभिव्यक्ति

पितृप्रधान समाजाताही संसाराचा भार उचलण्यात स्त्रीचा वाटा वरचढच असतो, मग ती शहरात असो की खेड्यात की जंगलात. युगानुयुगे स्त्रीने संस्कृतीची जोपासना केली हे सर्वमान्य आहे, अजून तरी.
संस्कृति केवळ शास्त्रात - ग्रंथात नसते, ती केवळ पंडितानी केलेली नोंद असते. संस्कृती काही शाळांत, महाविद्यालयांत नसते; तिथे केवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहिली जातात, त्यात आचरणाची हमी नसते.

"अन्न, वस्त्र, निवारा" या तीन मूलभूत गरजामध्ये संस्कृतीची प्रचिती येते.
"श्रम, विश्राम, आरोग्य, शिक्षण" या चार जगण्याच्या मूलभूत क्रिया होत. त्या सर्व जीवमात्राला -- प्राणी, वनस्पती: पाण्यातले, जमिनीवरचे, वातावरणातले, भूमीगत -- लागू होतात. या चार मूलभूत जैविक क्रियामध्ये मानवाच्या संसकृतिंच्या अभिव्यक्तिची नोंद होत असते.

माझी मायभूमी: हजार पाकळ्यांचे कमळ

पाण्यात जीवमात्र निर्माण झाले; म्हणून तर आपण त्याला "जीवन" म्हणतो. पाणी आणि जमीन यानी मानवाला संस्कृति दिली. मग तो अर्धनग्न आदीमानव असो की सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजातील असो.
म्हणून तर भारतातच काय सर्व जगभर संस्कृतिंची विविधता दिसते. यात काय आश्चर्य! सारया जमाती, सारे समाज विविधतेने नटलेले दिसतात.
त्यात भारत - एक "सहस्त्र पाकळ्य़ांचे कमळ". येथे दिसते जेवणातील विविधता, पेहरावातील विविधता, घरांची विविधता, चालीरीतींची विविधता, आणि संगीत, नाटक, कथा, काव्य, चित्र, शिल्प... भाषा सर्वच वैविध्यपूर्ण.


औधोगिक संस्कृति (Industrial Civilisation): अमर्याद अनिर्बंध हवस

आधुनिक मन्त्र - तंत्र - यंत्र युगांत समाजाचे विघटन मात्र झाले. पर्यायाने कुटुंबाचे पण विघटन झाले. त्याबरोबरच अनेक संस्कृतींचा विनाश झाला. उरल्या सुरल्यांचा होत आहे. सारे कसे कतारीत उभे राहिलेले ठोकळे होऊ घातलेले आहेत. संस्कृति कधीच जागतिक (ग्लोबल) असूच शकत नाही. जागतिक असतो व्यापार उदीम. संस्कृति स्थानीय असते.

आतापावेतो पांच हजार वर्षांत कितीतरी संघटीत धर्मांचा, पंथांचा उदय (शेवट) झाला असेल. अनेक अवतार प्रेषित अवतरले. अनेक आस्तिक-नास्तिक पंथ, सिध्दांत आले-गेले. सर्वानी मानवाला भवसागर तरुन जाण्याचे, समृध्दीचे आणि शाश्वत सुखाचे - इहलोकी आणि परलोकी - मंत्र दिले, आश्वासने दिली. याला इतिहास साक्षी आहे.

पण आज प्रत्यक्षात काय घडते याला मात्र आपण साक्षी आहोत - आणि म्हणूनच आम्ही जबाबदार आहोत -- निदान स्वत:पुरते स्वत:ला तरी. आधुनिक औद्योगिक समाजाने आणि विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैद्यक यानी दिलेले यन्त्र-मंत्र-तंत्र पण हीच आश्वासन देतात. हे सारे काळाच्या कसास लागेपर्यंत किती उशीर झालेला असेल?

हे सारे लिहिताना नेहमी प्रमाणे आठवते एकोणीस वर्षांच्या संता-कवी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान:
"दुरिताचे तिमीर जावो..."
अस्तु.
------------------------------
(ही मालिका केवळ एक निरिक्षण, विहंगम दृश्य (birds-eye-view) आहे, इथे कोणतेही सिध्दांत वा गृहीत प्रमेयं नाहीत.
असे समजा ही एका पाखराची चिंव चिंव आहे, जसे लोककथेत तोता-मैना बोलतात. या फांदीवर सर्व पाखारांचे स्वागत आहे.)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape