Showing posts with label राजकारण. Show all posts
Showing posts with label राजकारण. Show all posts

July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 28, 2011

रेमीची मुक्ताफळे -१७ : विश्व-लोक-ऊर्जा


विश्व-लोक-ऊर्जा
सामाजिक वर्गांची विभागणी सत्तेच्या केंद्रीकरणाला आधारभूत असते.
जेवढ्या वर्ग-विभागण्या अधिक तेवढी केंद्राची सत्ता अधिक. 
७ अब्ज-लोक-ऊर्जा येई संपुष्टात, ऊर्जेच्या जागतिक युद्धात.

टीप: ट्विटर वरील संदेशाचे भाषांतर
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

March 04, 2009

माझी यात्रा

पृथ्वी माझी सुरू होते
पायाखालच्या जमीनीपासून
जेव्हा जेथे असें मी तेथून

वर वर चढणारया नजरेत
गोल गोल क्षितिजे सामावत
उंच उंच हिमाद्रीच्या कड्यावर;

इथे अहंकाराचे अस्थिर कड़े - सागर
हरघडी वितळतात - वाफारातात,
विरतात मातीत - अवकाशात.

काळजातली उब पुरेशी होते
कवेत घ्यायला नविन क्षितिजे;
हरघडी विस्तारते स्वत्व माझे.

बंध मातीचा अतूट सामावत
सारी पृथ्वी भाकरीच्या चतकोरात
ओळख उरते धरतीच्या चतकोरात.


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape