Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

July 30, 2012

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती

चेहरा सावली हरवलेली आधुनिक संस्कृती  (विद्रोही कविता)
रेमीजीयस डिसोजा
उलगुलान : भयानक विद्रोह (महाश्वेता देवी, अरण्येर अधिकार)
कुणी कुणाशी विद्रोह केला?

बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

पुरातन काळी सांगतात होते राजे दुष्ट दयाळू
अत्याचारी व्यभिचारी प्रियदर्शी परमकृपाळू
तरी म्हणे होते अभिषिक्त अंश ईश्वरी .

कोणी म्हणतात प्रत्येकात - माझ्यातही -
वृक्ष वेली कीटक जनावरात - माती धोंड्यातही -
आहे तो अंश ईश्वरी; माहीत नाही.

पण असलेच तर ते होते रक्ता कुडीची
मन आत्म्याने घडवलेली माणूस नावाची
एक वास्तू चक्रावलेली जन्म-मृत्युच्या भोवरयात.

काळाच्या ओघात घेऊन काडीचे आधार
ईश्वरी अंशाचे राजे आधुनिकतेच्या लाटेत
गेले. आले त्यांच्या जागी राजकर्ते मुजोर

जनता जनार्दनाचे स्वाभिषिक्त अंश होऊन
आभुषणे अलंकार लोकमताचे लेवून
त्यांची स्मारकेपण अजस्त्र सहस्त्र पावन.

राजे गेले. राजकर्ते आले. आले गेले - आले गेले -
लोकमताच्या हिंदोळ्यावर सदैव विराजलेले,
काळाच्या उदरात बघता बघता लुप्त झाले,

हरवले जग जवळ आणायच्या खटाटोपात
डोंगराएवढ्या इतिहासाच्या पोथ्यापुराणात
हरवले हरघडी उंचावत जाणारया अहंकारात.

त्यांच्या अहंकाराचे बोडके पर्वत डोंगर
बसले पंडितांच्या बोडक्यावर उरावर
जेथे हिरवळ सुध्दा उगवत नाही.

आधुनिकतेच्या वावटळीत गेले ईश्वरी अंशाचे अवतार
गेले जनाताजनार्दानाच्या रेतातून उठलेले भार,
झाडे वेली डोंगर मातीपण धुपून गेले पार.

माणुसकीची संवेदना नसलेल्या संगणकाचे हत्यार
घेऊन आल्या तालेवार विश्वव्यापी संघटना अपार,
संपत्तीचे उध्दारक अनावर, सुधारणेचे ठेकेदार,

उभ्या ठाकल्या बटनांचे संच अद्दृश्य हाती घेऊन
गोजीरवाण्या नावांनी बारसे करून सजून
नगरात उजाड गावात बोडक्या डोंगरात रेताडात

तंत्राच्या झगमगातात विज्ञान मंत्राच्या आकडेमोडीत
चेहरा सावली हरवून माणसे निघाली मोडीत,
इश्वरी अंशाची दिवाळखोरी कवटाळून झोपली संस्कृती

अतिआधुनिक समाजांच्या कर्तुतात
विज्ञानधर्माची अफू खाऊन मदमस्त
संस्कृतीने घडवली माणसाची प्रतिकृती;

घातला त्यात माणसाचा अंशत: मेंदू,
वादग्रस्त देवाच्या पावलावर पाऊल टाकीत
घाईगर्दीने आली संस्कृति अतिआधुनिक

आणि कळीकाळाचे भान विसरून
बाजारू खेळण्यातल्या माकड़ासारखी
चावीच्या आधारे टाळ्या पिटीत बसली.

* * *
मुंबई
१७-४-१९९५
NOTE: Image- Clapping toy monkey, Source Internet.
~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 10, 2011

काळाचा महिमा

काळाचा महिमा
प्रतिमा: अस्थिवर चंद्र-कला (सुमारे ३०,००० वर्षांपूर्वी)
काळ अर्थात "मृत्यू" व "समय" दोन्हीही. ही आमची देशी समज. पण औद्योगिक किंवा पाश्चिमात्य जगांत काळ म्हणजे फक्त वेळ, 'time', जो केवळ घड्याळाच्या कांट्यावर, कैलेंडरच्या पानांवर एकमार्गी चाल चालतो.

खरं पाहतां काळ, Time, चालतबिलत नाहीं. आमचा देशी 'समय', घटका पळं प्रहर... कांहींही म्हणा, पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला यांच्याबरोबर चक्राकार फिरत असतो, cyclic असतो. तो अर्थातच सृष्टीशी जोडलेला असतो. यास्तव आपण सहज बोलून जातों, 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'.

हा दोन समाजांतील सांस्कृतिक फरक आहे. संस्कृती ही सृष्टीची मानवाला त्याच्या उत्पत्तिपासून मिळालेली देणगी आहे. जेव्हा समाज-धर्म-राज्य-न्याय इ. संस्था कांही स्वार्थी बलिष्टांनी निर्माण केल्या नव्हत्या तेव्हापासून !

खरं तर काळ बदलत नाही. बदलत असते सामाजिक परिस्थिती कांही बलवानांच्या इशार्‌यावर. बदलतों आम्ही; बदलतात आमच्या संवयी आणि श्रद्धा; आणि त्याच आमचा धर्म होऊन बसतात; त्याच अंतिम सत्य आहेत वाटूं लागते. यांना धक्का लागलेला आपणांस खपत नाही.

तर्क आणि विवेकबुद्धी वापरून कोणत्याही विधानाचा, घटनेचा वा परिस्थितीचा छडा लावणे आपण टाळतो, क्रिकेट असो कि कारगिल.

त्याऐवजी आपणास 'शब्दाप्रमाण्यावर' वर विश्वास ठेवणे सोयीचे वाटते. वस्तुनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा, विभूतीपूजा आपणास अधिक भावते. शारिरिक, मानसिक, बौद्धिक गुलामगिरीचे जूं मानेवर घ्यायला आपण नेहमीच तत्पर. डोक्याला त्रास नाही! गोपाळ गणेश आगरकर किती लोकांस आठवतात बरें!

औद्योगिक समाजावर वेळेचा पगडा विलक्षण आहे. रोजव्यवहारात एक म्हण आहे : "Time is Money", समय म्हणजे पैसा; असं वेळेचं मूल्य-मापन केलं जातं. जसं जमीन व जळ यांनापण पैशानं मोल लावलं जातं. खरंच, वेळेचं मूल्य, किंमत, उपयोग व लायकी जीवनाकडे पाहतां काय आहे? अशा वेळेला पैशाचे मोल लावायच्या कल्पनेला कोणी आव्हान दिल्याचं ऐकिवात नाही. पण तीही वेळ येईल.

। कालाय तस्मै नमः ।

Scale-drawing by Marshak A. (1970)

"गॅलिलियोचा दोलक"

अलिकडच्या 'काळीं' गॅलिलियोने 'वेळ' या आधुनिक संकल्पनेचा व साधनाचा शोध लावला, जसे न्युटनचे 'सफरचंद'. चर्चमध्ये बसला असता त्याने वर दोलायमान होत असलेले झुंबर पाहिले मात्र ! हा गॅलिलियोचा 'दोलक' (दुवा पहा : Galileo and the Pendulum) ! आज विज्ञान व्यवसाय (proffesion) झाले आहे, कधी ते कारागिरी (vocation) होते. गॅलिलियो (संक्षिप्त चरित्र) अर्वाचीन विज्ञानाचा जनक समाजाला जातो.

 टीप: वरील चित्र मी प्रथम John C. Eccles यांच्या "Evolution of the Brain: Creation of the Self " या पुस्तकांत व त्याच्या मुखपृष्ठावर पहिले. चित्रातील (b) हे प्रमाणबद्ध रेखाचित्र  Marshack, A. (१९७०) या वैज्ञानिकाने केले होते (Source: Internet). ही चित्रे येथे निवडायचं कारण: यात "काळा"चं प्रतिक चित्रित केलेलं आहे. 

या शिल्पाची कला, विज्ञान वा खगोलशास्त्र अशी वर्गवारी लावणे चूक ठरेल. या आदिमकाळातील कांही भित्तीचित्रे व शिल्पे संशोधकांना सापडली आहेत.

वरील चंद्र-कला कोरताना या कलावंताने केलेला साधनांचा मितव्यय (economy) विशेष महत्वाचा आहे. नाहीतर आमचे बॉलीवूड-टेलीवूड वरचे कार्यक्रम पहा! वेळेचा आणि पैशाचा धूर! तूप नाही; तेल नाही; हातीं धुपाटणं घेऊन परतायचं!

त्यांच्या नृत्य, काव्य, संगीत इ. कलांची कल्पनापण आज करता येणार नाही. पण त्यांची प्रतिभा, मौलिकता, कल्पकता व सर्जनशील निर्मिती कोणत्याही युगापेक्षा रतीभरही उणी नसणार. तीपण अत्यंत बिकट वातावरणांत केलेली! मग आपण सुधारणा म्हणतो ती कुणाची / कशाची?
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

January 05, 2011

सृष्टी महात्म्य

॥सृष्टी महात्म्य॥

किती गुण गाऊ मी सृष्टीचे! तिची लीला अगाध! तिचे गूढ अगाध! तिचे औदार्य अपार! तिचा न्याय निष्ठूर तसाच निस्पृह! अवतार, प्रेषित, संतमहात्मे, राजेरजवाडे, चोरदरवडेखोर, किडेमुंग्या, कीटक, पशूपक्षी, तृणे, झाडेवेली सर्व तिला समान. पर्वतराई, महासागर, महाभूखंड, गृहतारे पण अपवाद नाहीत.

सृष्टीला संतुष्ट करायला पूजापाठ, भजनकीर्तन, जपजाप्य, मुहूर्त-शुभाशुभ वेळ... कशाचीही गरज नाही. फक्त तिच्या नियमाचे पालन करायचे. अति खाल्ल्याने अपचन / अतिसार होणार हे अटळ आहे. गंमत अशी की सृष्टी आपल्या बाहेर तशीच आतही आहे. आणि ती काही वेगळी नाही. तीच मूलद्रव्ये. पण हे कधी आईबाबानी, मास्तरांनी की धर्मोपदेशाकांनी सांगितले नाही. नाही वैज्ञानिकानी सांगितले. ते बिचारे हुकुमाचे ताबेदार! ते नवीन नवीन मशिने, शस्त्रास्त्रें, अण्वास्त्रें, संगणके इत्यादि शोधण्यात गुंतलेले आहेत. अर्वाचीन - आधुनिक युगातले सुधारलेले गुलामच म्हणाना. 
२.
विज्ञानाने आधुनिक युगात केवढी तरी प्रगति केलीय. रोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात. सृष्टीचे एक रहस्य उलगडते. त्याहून अनेक पटीने सृष्टी रहस्यमय होत जाते. त्याहूनही मजेची गोष्ट अशी, माणसाला आपलेच शरिर (आणि मन) तरी पूर्णतः कुठे माहित झालेय?

संशोधनासाठी विज्ञानाने नवीन भाषा व यंत्रादि साधने तयार केली, जी माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत, पूर्वी जशी देवभाषा संस्कृत होती तशी. (जर शूद्रांनी त्या भाषेचा उच्चार केला तर तिला विटाळ होत असे. आजही ते चित्र बदललेले नाही. तर अधिक सोवळे झालेय; त्याला 'Intellectual Property Rights' असे नाव आहे.) आपण वैज्ञानिकांवर भाविकपणे विश्वास ठेवायचा एवढेच आपल्या हाती राहते. वैज्ञानिकाना जर विवेक नसेल तर आपण विषमतेच्या आगीत होरपळायचे -- मग ती आग अण्वास्त्रांची असो, कि आर्थिक-सामाजिक-राजकीय, किवा पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्जेची असो. याचे साधे कारण विज्ञान तसेच ज्ञानाच्या इतर शाखा काळाबरोबर लोकाभिमुख वा सार्वत्रिक झालेल्या नाहीत. अशी विषमता नागरी संस्कृतिंत सत्तेला पूरक व पायाभूत असते. किंबहुना 'सत्तेचे केंद्रीकरण' हे नागरी समाजांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. 
3.
अशा सत्तापिपासूंनी या ना त्या कारणांनी पृथ्वीवरच्या सर्व जमिनीचे वाळवंट केले तरी सृष्टीला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. कदाचित सहारा वाळवंटातील पिग्मी आदीवासी जमात सोडून इतर सारे मानवप्राणी नष्ट होतील. कदाचित कल्पित स्वर्गातील काल्पनिक देव हळहळतील. पण सृष्टीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.

सृष्टीचा आद्य नियम - सृष्टी सर्व सजीव योनीँना, अतिसूक्ष्म जीवाणू ते वनस्पती, व मानवासह सर्व प्राणीमात्राला, जगण्याची सुयोग्य साधने, सक्षमता व स्वायत्तता देते. या नियमात कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. ही सक्षमता अथवा कार्यक्षमता अशी: "श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन" होत. ही पंच-कार्यें कोणत्याही व्यक्तिच्या वा संस्थेच्या -- ना राजसंस्था, ना धर्मसंस्था -- अखत्यारात येत नाही. ज्यानी असा हस्तक्षेप इतिहासकाळापासून केला ते सारेच सृष्टीचे व जीवमात्राचे घोर अपराधी आहेत. त्यांचा निवाडा करायला सृष्टी सर्वतोपरी समर्थ आहे. ते सारे काळाच्या प्रवाहात वाहून गेले.
शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास
४.
सृष्टी समजून घ्यायची तर तिच्याशी अंतर्बाह्य नियमित संपर्क ठेवायला हवा. अर्थात हा स्वतःपासून सुरू होतो, तो पण आपल्या शरिर व मन यापासून. आपले सर्व अवयव - नाड्या, हृदय, फुफ्फुसे, यकृत इ. - सहजधर्माने चालतात; ते आमच्या मर्जीने चालत नाहीत. लहान बालकांना याची गरज लागत नाही. कारण तीं निसर्गतः सहजधर्माचे किंवा सृष्टीच्या धर्माचे पालन करतात. मात्र आपण - पालक, कुटुंब व समाज - त्याना गर्भधारणेपासून अनेक निमित्तांनी सहजधर्मापासून जाणता-अजाणता दूर करीत असतो. आमच्या अनेक संतांनी अनेकदा सहजधर्माचा पाठपुरावा केला, पण कधी ध्यानातच आले नाही! मुले स्वाभाविकतः सृष्टीयोगाची साधना करतात.

सृष्टीयोगाच्या साधनेत आपणच आपले गुरू! यात कोणतेही विधी नाहीत. आजच्या शहरी धकाधकीत स्वतःसाठी वेळ काढणे फार कठिण झाले आहे. चित्त विचलित करणारी किंवा आपल्या मोकळ्या वेळेचा कबजा घेणारी आमिषे आकर्षणे अमाप असतात. आपल्या शरिर व मनाचे व्यवहार लक्षपूर्वक निरखणे खरोखरच मनोरंजक असते.फक्त एकवार अनुभवायला हवे.
५ 
सृष्टीने सर्व जीवमात्राला पाच कार्यक्षमता दिलेल्या आहेत: "श्रम, विश्राम, स्वाथ्य, अध्ययन व प्रजनन" (दुवा: Work-Leisure-Health-Learning-Propagation)  ही स्वायत्त कार्ये प्रत्येक योनीच्या संरचनेला अनुरूप आहेत. 

पण इतिहास काळापासून नागरी समाजांतील राजसत्ता व धर्मसंस्था यांनी चढत्या भाजणीने व्यक्तिच्या व समष्टीच्या जीवनात या कार्यांवर कमी अधिक प्रमाणात कबजा केला. आता तर प्रगति व सुधारणा यांच्या नावाखाली या सर्वच कार्यांवर नव्या सत्ताधिशानी कबजा घेतलेला आहे. 

या सत्ता आपल्याला सर्कशीतल्या जनावरासारखे वागवतात. आपण मुक्तपणे गाणे नाचणे कधीच विसरलो. आता आपण बॉलीवुडच्या तालावर गातो. मात्र पाच हजार वर्षांच्या सवयीने आपल्याला हेच सत्य आहे असे वाटते. या सत्तेच्या राजकारणातून सुटका करून घ्यायची असेल तर ती व्यक्तिगत, कौटुंबिक व 'जमाती'च्या (community) पातळीवरच होऊ शकते. कोणतीही संस्था वा संघटणा हे करू शकणार नाही .
*  *  * 
उद्धरण :
प्राण्यात 'जाणीव' । चैतन्य असते
वर्तन घडते । त्यातूनही;
तरी जगातील । सर्व व्यवहार
होती नियमानुर । सृष्टीच्याच.
कुणा सृष्टीकर्त्या । ईश्वराची नाही
जरूरीच काही । त्यांच्यासाठी.

(विंदा करंदीकर,  चार्वाकदर्शन, "अष्टदर्शने",   पॉप्युलर प्रकाशन, २००३, पृष्ठ पृ. ७७ )

टीप: प्रतिमा: "शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास" - संदर्भ: इंटर्नेट, हे चित्र रद्दीत मिळाले. याचे मालकी हक्क New Scientist या विज्ञान साप्ताहिकाचे आहेत/असावेत.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 23, 2009

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - 3

तंत्र युग (Technology Age)

सुख, समृध्दी (आणि सूड) यांच्या अपेक्षेने केलेले धार्मिक (आणि जारण मारण ) तंत्र विधी अनेक समाजात ऐतहासिक काळापासून प्रचलित आहेत. गौतम बुद्धाच्या काळापसून सुरू झालेला तंत्र योग सुमारे अकराव्या शतकानंतर भूमीगत झाला असे सांगतात. हल्ली आधुनिक चित्रकलेंत तंत्र शैली आलेली आहे. त्याचा पुरातन तंत्र योगाशी काही संबंध असावा असे वाटत नाही. पण जास्त खोलात जावेसे कधी वाटले नाही.

रोज सकाळी अंगणात शेण सडा सारवून रांगोळी घालण्यापासून सैपाकघरातील असंख्य क्रिया तंत्र विधीच आहेत. हा ब्लॉग लिहिणे पण तंत्राचा भाग आहे. कारखान्यात लेथ मशिनावर वेगवेगळ्या इंजीनाना लागणारया हजारो भागांच्या हजारो नकला तयार केल्या जातात. हे पण तंत्र आहे. झोपडी, गगनचुंबी इमारत, शहर - नगर बांधणे ... हे सारे तंत्र विधी आहेत. अण्वास्त्रे, बंदुका, युध्ये- महायुध्दे हे सारे आधुनिक "जारण-मारण-तंत्र" विधीच होत.

ध्यानाच्या अभावी यातील कितिक हीन, अमानुष, निकृष्ट असतात - सुख समृध्दी, पर्यावरणाला घातक होतात. कित्येक शेकडों हिन्दी इत्यादि चित्रपटांप्रमाणे छूमंतर होतात. घरातल्या मिक्सरपासून अवकाशयानापर्यंत कोणते यंत्र कधी कोलमडून पडेल याचा नेम नाही. अगदी मझ्यासमोराचा संगणक पण! एवढेच काय? मी पण (संगणकाच्या रेडिएशनमुळे)! जर्मनीत झालेला यहुद्यांचा संहार, नागासाकी-हिरोशिमावर टाकलेली अण्वास्त्रे, ग्रामीण जनतेचे विस्थापन, पर्यावरणाचा होणारा सतत विनाश... हे सर्व आधुनिक जारण-मारण तंत्र विधिच होत.

मी पाहतो, दिवाळीत पुस्तकात पाहून रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीचा फराळ बाजारात तयार मिळतो. पूर्वी जे मसाले घरोघर तयार केले जात होते ते आता वाण्याच्या दुकानावर आयते मिळतात. तयार सदरे, तयार विजारी, तयार काय काय! पन्नास कोटी बाया बापड्यांची सोय झाली! शंभर कोटी जनताजनार्दनाची सोय झाली!

स्वावलंबन गेले! स्वायत्तता पण गेली! नियोजनाने जमीनी गेल्या. हे सारे कायद्याच्या कक्षेत राहून. तरीही मुंबईच्या मागील दारी कितिकाना धड एका वेळचे जेवण मोठ्या मुश्किलीने मिळते. म्हणून दयाळू मायबाप सरकारने शाळेतल्या मुलाना दुपारचे जेवण मोफत द्यायची योजना केलीय. पण पालकांचे - भावंड़ांचे काय? कुठे गेले सरकारचे "ध्यान"?


संस्कृति (culture): उगम अणि अभिव्यक्ति

पितृप्रधान समाजाताही संसाराचा भार उचलण्यात स्त्रीचा वाटा वरचढच असतो, मग ती शहरात असो की खेड्यात की जंगलात. युगानुयुगे स्त्रीने संस्कृतीची जोपासना केली हे सर्वमान्य आहे, अजून तरी.
संस्कृति केवळ शास्त्रात - ग्रंथात नसते, ती केवळ पंडितानी केलेली नोंद असते. संस्कृती काही शाळांत, महाविद्यालयांत नसते; तिथे केवळ प्रश्नपत्रिकेची उत्तरे लिहिली जातात, त्यात आचरणाची हमी नसते.

"अन्न, वस्त्र, निवारा" या तीन मूलभूत गरजामध्ये संस्कृतीची प्रचिती येते.
"श्रम, विश्राम, आरोग्य, शिक्षण" या चार जगण्याच्या मूलभूत क्रिया होत. त्या सर्व जीवमात्राला -- प्राणी, वनस्पती: पाण्यातले, जमिनीवरचे, वातावरणातले, भूमीगत -- लागू होतात. या चार मूलभूत जैविक क्रियामध्ये मानवाच्या संसकृतिंच्या अभिव्यक्तिची नोंद होत असते.

माझी मायभूमी: हजार पाकळ्यांचे कमळ

पाण्यात जीवमात्र निर्माण झाले; म्हणून तर आपण त्याला "जीवन" म्हणतो. पाणी आणि जमीन यानी मानवाला संस्कृति दिली. मग तो अर्धनग्न आदीमानव असो की सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजातील असो.
म्हणून तर भारतातच काय सर्व जगभर संस्कृतिंची विविधता दिसते. यात काय आश्चर्य! सारया जमाती, सारे समाज विविधतेने नटलेले दिसतात.
त्यात भारत - एक "सहस्त्र पाकळ्य़ांचे कमळ". येथे दिसते जेवणातील विविधता, पेहरावातील विविधता, घरांची विविधता, चालीरीतींची विविधता, आणि संगीत, नाटक, कथा, काव्य, चित्र, शिल्प... भाषा सर्वच वैविध्यपूर्ण.


औधोगिक संस्कृति (Industrial Civilisation): अमर्याद अनिर्बंध हवस

आधुनिक मन्त्र - तंत्र - यंत्र युगांत समाजाचे विघटन मात्र झाले. पर्यायाने कुटुंबाचे पण विघटन झाले. त्याबरोबरच अनेक संस्कृतींचा विनाश झाला. उरल्या सुरल्यांचा होत आहे. सारे कसे कतारीत उभे राहिलेले ठोकळे होऊ घातलेले आहेत. संस्कृति कधीच जागतिक (ग्लोबल) असूच शकत नाही. जागतिक असतो व्यापार उदीम. संस्कृति स्थानीय असते.

आतापावेतो पांच हजार वर्षांत कितीतरी संघटीत धर्मांचा, पंथांचा उदय (शेवट) झाला असेल. अनेक अवतार प्रेषित अवतरले. अनेक आस्तिक-नास्तिक पंथ, सिध्दांत आले-गेले. सर्वानी मानवाला भवसागर तरुन जाण्याचे, समृध्दीचे आणि शाश्वत सुखाचे - इहलोकी आणि परलोकी - मंत्र दिले, आश्वासने दिली. याला इतिहास साक्षी आहे.

पण आज प्रत्यक्षात काय घडते याला मात्र आपण साक्षी आहोत - आणि म्हणूनच आम्ही जबाबदार आहोत -- निदान स्वत:पुरते स्वत:ला तरी. आधुनिक औद्योगिक समाजाने आणि विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, वैद्यक यानी दिलेले यन्त्र-मंत्र-तंत्र पण हीच आश्वासन देतात. हे सारे काळाच्या कसास लागेपर्यंत किती उशीर झालेला असेल?

हे सारे लिहिताना नेहमी प्रमाणे आठवते एकोणीस वर्षांच्या संता-कवी श्री ज्ञानेश्वरांचे पसायदान:
"दुरिताचे तिमीर जावो..."
अस्तु.
------------------------------
(ही मालिका केवळ एक निरिक्षण, विहंगम दृश्य (birds-eye-view) आहे, इथे कोणतेही सिध्दांत वा गृहीत प्रमेयं नाहीत.
असे समजा ही एका पाखराची चिंव चिंव आहे, जसे लोककथेत तोता-मैना बोलतात. या फांदीवर सर्व पाखारांचे स्वागत आहे.)
~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape