September 30, 2011

बा. भ. बोरकरांची "कृतार्थ जीवित" आणि पांच कविता

बालकृष्ण भगवंत बोरकर (१९१०-१९८५)
 "कृतार्थ जीवित" ― कविता बोरकरांची झाली माझी प्रार्थना

    ॥  कृतार्थ जीवित ॥ 

ओळखतिल जे मला आणि मज
दावितील मम यथार्थ ओळख.
कणकणिं माझ्य, देतिल किंवा
अवघ्या ब्रम्हांडाची पारख.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ १ ॥

निसर्गसम जे संतत सुंदर
नित्य निरामय जे बाह्यांतर.
सुखदुःखाच्या स्थित्यंतरिं जे
अखंड आनंदाचे निर्झर.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ३ ॥

आकाशापरि कवळिति जग जे
उजळिति, जिवविति तेजें अविरत,
ढग जे येती भाळीं त्यांच्या
धुळींत पिकते त्यांनी दौलत.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ ३ ॥

सागरसम जीं विशाल हृदयें
गगन धराया करिती तडफड
अपेश जडलें तरि जयांना
धडपडण्याची दुर्दम आवड.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ४ ॥

(दूधसागर, १९४७; बोराकरांची समग्र कविता, २००५| पृष्ठ २२९) 
शाळेच्या पाठ्यपुस्तकात ही कविता शिकलो होतो. अगदी तोंडपाठ. पुढे आयुष्यभर ती कधी मनातल्या मनांत, कधी मुक्त आवाजात गात आलो. पण एकदा वाचकाच्या एका टिप्पणीला प्रतिसाद देताना ही कविता शान्ता ज. शेळके यांची आहे असा उल्लेख केला होता. त्या चुकीची जाहीर दुरुस्ती इथं करतो. टागोरांच्या "उच्च जेथा शिर..." या कवितेप्रमाणे "कृतार्थ जीवित" ही पण आयुष्यभर माझ्यासाठी प्रार्थना झाली.

* * *
     ॥ मागणें ॥

माझें थकलें मागणें तुझें सरेना दान
गिमामागून अमाप तुझें पिके समाधान

दिसा वरुषे चांदणें स्वर्ग रात्रीचा आंदण
दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण

आतां खुंटली रे तृष्णा माझें कुंठलें मागणें
मीच झालो तुझ्या हातीं तुझें लाडकें खेळणें

तुझें माझें दयासिंधो जगावेगळालें नातें
तुझ्या माझ्या जिव्हाळ्यांत उभें त्रैलोक्यच न्हातें

माझ्या मागण्याहुनी रे तुझें देणेंच शहाणें
'तुझें-माझें' हेहि आतां फक्त शब्दांचे बहाणे

६ .१२ .१९५९ (चित्रवीणा, १९६० | बोरकरांची कविता, १९६०  | बोरकरांची समग्र कविता, २००५, पृष्ठ ४३१)
बोरकरांनी कोणाला उद्धेशून ही कविता लिहिली हें स्पष्टच आहे. मला मात्र हा ज्याचा अनुभव घेतां येतो असा निसर्ग दिसतो - सृष्टी दिसते.
* * *
 ॥ भाताचें रोप ॥ 

चिमणें इवलालें बीज
रम्य त्यांत होती शेज
दीड वितीचें कुणी रोप
घेत तिथें होतें झोप

ऊन म्हणालें, "ऊठ गड्या !"
पाऊस वदला, "मार उड्या
जगात येरे या उघड्या
करीं जळाच्या पायघड्या."

वायु बोलला, "ऊठ किं रे
माझ्याशीं धर फेर बरें
हसलें जर आपणां कुणी
दावुं वाकुल्या नाचोनी!"

भूमि म्हणाली, "चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा
आंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळां. "

झोप झटकुनी तें उठलें
नंदबाळ जणुं अवतरलें
पाउस, वारा, ऊन तसें
जमले भवंतीं गोप जसे

अद्भुत याचा खेळ अहा!
जरा येउनी पहा तरी
उगवे, चमके पहा पहा
मोरपिसांचा तुरा शिरीं

केपें, ८.८.१९४० (बोरकरांची कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५ पृष्ठ  ३२७)
मी माझ्या निकटच्या लोकांना सांगतो तुमच्या लहान-मोठ्या मुलांना हंगामांत भातशेती दाखवायला "ट्रीप" काढा. डिस्ने-लॅंड नाही पहिले तरी चालेल.
* * *

    ॥ माडाचें भावगीत ॥

ताठ उंच मी उभा नभास नित्य बाहुनी
राहिलो तुझ्याचसाठिं बाहु हे उभारुनी

स्वर्ग सांडिला मुदें तुझ्याच मुक्तिकारणें
देव वाहिला तुला, तुलाच वाहिलें जिणें

तापतां उन्हीं तुला दिली प्रशान्त सांवली
भागवावया तहान गोड गार शाहळीं

मेघ वारिले किती सुरम्य बांधुनी मठी
खावया दिलीं तुला फळें रसाळ गोमटीं

स्नान उष्ण घातलें तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल तया मुठेल त्यात वाहुनी

रात दाटतां घरीं सुवर्णदीप लाविले
कुंतलीं प्रभातकालिं दैन्य सर्व झाडिलें

लग्नकारणीं, सणासुदीस, दुःखसंकटीं
साह्य मीं दिलें तुला सदैव बांधुनी कटी

स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहलों शिडी
चांदण्यांचिया तुला दिल्या भरून कावडी

गीत ऐकुनी तुझें तरारलों, थरारलों
नी चितारुनी भविष्य मी सहर्ष डोललो

तू परी कृपेमुळेंच होसि नित्य आंधळा
अन्‌ सुखामुळेंच जासि दुर्गतीचिया तळा

शंभु ठाकतां समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिंच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी

कोटितीर्थ, मानवा ! असून माझाया शिरीं
तूं विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी

स्वर्ग लाभतां करीं तयास नेसि रौरवा
धन्य धन्य बुद्धि रे तुझी विचित्र मानवा !

दुर्गतींत परी तुला करीन साथ मी
भावबद्ध मी तुला, तुझाच मित्र नेहमीं

भाविलें तुझ्यासवेँ रमेन दिव्य गौरवीं
स्वप्न तें विरून आज मी विषण्ण रौरवीं !

मुंबई, २६.५.१९४६ (आनंदभैरवी, १९५० | बोरकरांच्या कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५  पृ. २८२-२८३)
हल्लीच एक विज्ञान विषयक लेख वाचला. (दुवा : Coconuts and sunshine will power South Pacific islands )   आता नारळापासून वीज तयार करण्यात येणार आहे. आमच्या अतिउत्साही राजकर्त्यांनी जर असा प्रकल्प सुरु केला तर तो आणखी किती शेतकरी लोकांचा बळी घेईल? दक्षिण अमेरिकेत मक्यापासून डिझेल तयार करण्याचा कट तर जगजाहिर झाला आहे. भांडवलशाहीची हवस कोठवर जाईल याला मर्यादा नाही. म्हणून का माड म्हणतो मी विषण्ण रौरवीं?
* * * 

  ॥ कवि कोण ? ॥

देवलसी जीव सदाचा उदासी
                  फुकाचा सुखाची पार नसे
भावनेचा फूल भक्तीचा गोसावी
                  दिसे तसें गोंवी काव्याभासें
लोण्याहून मऊ मायेचे अंतर
                  दुर्बळा अंतर देत नसे
देवाचे संदेश उकलुनी दावी
                  विश्वासी सुखवी आत्मज्ञानीं
मनाने बालक बुद्धीने जो वृद्ध
                  तोडितो संबंध जगे जरी
सौंदर्याचा भोगी जीवनी विरागी
                  निद्रेतही जागी जगासाठीं
कर्तव्याची चाड कुडीच्यापरीस
                  दगडा परीस करूं शके
मतीने कृतीने उक्तीने निर्मळ
                 तेजाने उजळ करी जना
हाच खरा कवी प्रीत पाझरवी
                  तेजें दिपे रवि ईश्वर हा

धारवाड १९२८ (प्रतिभा, १९३० | बोरकरांच्या कविता १९६० | बोसक. २००५ पृष्ठ ७०)
बोरकरांनी अठराव्या वर्षीं लिहिलेली ही कविता त्यांचे "दिशाभिमुखन" (orienetation) दाखवते. व्यक्तीच्या पुढील आयुष्याची मांडवळ संगोपन, अध्ययन, पर्यावरण व दिशाभिमुखन पहिल्या पंधरा ते अठरा वयापर्यंत होते, त्याचा हा दाखला. नंतरच्या काळांत त्यांनी एका संमेलनांत "संत कवी" आणि "साहित्यिक कवी" यांतला फरक स्पष्ट केला होता.
#
टीप : या कविता निवडक नाहीत. पण त्यांना प्रातिनिधिक म्हणता येईल. बोरकरांच्या कविता म्हणजे "आरसा". म्हणून या कविता आवड - नावड अशी प्रतवारी लावून निवडलेल्या नाहीत. तरीही अशी एक कविता, "मी अश्रांत प्रवासी", जिने माझ्यातल्या भटक्याला स्पर्श केला, ती इथे उद्धृत केलेली नाही.

 ॠणनिर्देश : या कविता "बोरकरांची समग्र कविता - खंड : १ " या पुस्तकांतून घेतल्या आहेत. (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे | २००५ | मूल्य : ४५० रुपये | पृष्ठें : एकवीस + ४४९) या पुस्तकांत ३४३ कविता संग्रहित केल्या आहेत.  


Images: Sorce: Google Sites

© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 24, 2011

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिस

सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र  
ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन्‌ मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!

मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, भारावलो. सारी दुपार तेथेच काढली. संकुलात सभोवार भटकलो. कधी झाडांच्या सावलीत ताणून दिली. आणि आठवणीसाठी त्याचा एक आराखडा रेखाटला. जवळ कॅमेरा होता, पण एकही फोटो टिपला नाही. सारा वेळ तेथील शांत शीतळ वातावरणाचा सर्व संवेदना एकवटून आस्वाद घेत राहिलो.

सोलापूर, विजापूर जिल्हे कमी २५ ते ३० ईंच पावसाचे, उष्ण-कोरड्या हवामानाचे. अर्थात येथे पाण्याची कमतरता! आणि इथे पाहातो तर पारंपरिक वास्तुशिल्पाने ओयासिस निर्माण केले होते.

आजच्या सुधारलेल्या युगात पर्यावरणाचा बराच गवगवा होतोय. पण व्यवहारात मात्र उलटेच होत असलेले दिसते.

शहरांत इमारतींची उंची वाढत जातेय तर खेडोपाडीं पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढतेय. कोंकणात १००-१२०  इंच पाऊस पडतो पण जमिनीतील पाणी १५० मात्र फूटाहून खाली गेलेय. मुंबई महानगरात पाण्याची कशी वाताहात होतेय विचारू नका!

वास्तू-महाविद्यालयात भारतीय वास्तूशिल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या मंदिराचा उल्लेख कधी आला नाही. अर्थात ती पुस्तके परदेशी विद्वानांनी लिहिली होती.

या वास्तू-इतिहासाचा अभ्यास करताना (शिकवताना व शिकताना) समकालीन नैसर्गिक, तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक पर्यावरणाचा विचार कधी शिवलाच नाही. केवळ सौंदर्यशास्त्राच्या रूढ संकेतांचा रट्टा मारणे चालत असे.

मूलतः वास्तू व पर्यावरण यांचा घनिष्ट संबंध आहे. किबहुना पर्यावरणात बदल करणे हा वास्तूचा मूल उद्देश आहे, मग ती झोपडी असो की प्रासाद असो, शेती असो वा उपवन असो, विहीर असो वा तलाव असो (हे सर्व वास्तशिल्पाचे प्रकार). पर्यायाने वास्तू पारिस्थितिकीत पण बदल करते आणि ऊर्जेचा व्यय पण करते.*

जेथे जळ आले तेथे जीवन आले, तेथे जलचर आले, तेथे वानसे आली, तेथे वनचर आले, त्याने समृद्धी आली.

उजाड फतेपूर सिक्री : ही वास्तू मोगल बादशहा अकबराने आपल्या नव्या राजधानीसाठी बांधली. हे सर्वश्रूत आहे. तेथे खास तानसेनसाठी एक छोटा कृत्रिम तलाव बांधलेला आहे व मध्यभागी गाण्यासाठी बैठक आहे.

अकबराने सर्व लवाजमा घेऊन त्याच्या नव्याकोर्‌या राजधानीत स्थलांतर केले. पण काही दिवसांनंतर तो आपला बाडबिस्तरा घेऊन परत मागे गेला. कारण तेथे पाणी पुरवठा नव्हता. मुंबईची पण अशी अवस्था व्हायला फार काळ जाणार नाही!

उजाड पडलेली फतेपूर सिक्री 'वास्तूशिल्पा' चे एक वस्तूसंग्रहालय musium होऊन राहिली.

सिद्धेश्वर मंदिराची वास्तू निवांतपणे पाहिली. मंदिराच्या चारी बाजूंना सिद्धेश्वर तलावाचे पाणी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नियोजन व संधारण यांचे हे अनन्यसाधारण जीवंत - जागृत - उदाहरण आहे! अशा इतरत्र अनेक विहिरी, तलाव, मंदिरे, मशिदी, राजवाडे, गांवे, किल्ले, उपवने, शेतीवाड्या इ. वास्तू सर्व भारतभर आहेत. प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय! पण यासम ही! एक सुजलाम सुफलाम वास्तू!

अशा पारंपरिक वास्तू लोकशिक्षणाची लोकाभिमुख साधने असतात असा माझा निष्कर्ष आहे आणि श्रद्धा पण! जो शिकला नाही तो करंटा. येथे प्रात्यक्षिकाने, उदाहरण देऊन व्यावहारिक पाठ दिले जातात असे मला प्रांजळपणे वाटते. याला देव पावले म्हणायचे नाही का?

माणसे ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत लक्षावधी वर्षें चित्रविचित्र नैसर्गिक परिस्थितीत राहात आले.

सृष्टी मानव समाजाना ओळखत नाही मग तो समाज आपल्या कल्पनेप्रमाणे मागासलेला असो वा पुढारलेला. सृष्टी मानवाच्या सामाजिक अधिश्रेणी वा हुद्दे ओळखत नाही, मग ते सम्राट-पंतप्रधान, संत-महंत वा काळे-गोरे-पिवळे-ब्राऊन असोत. सृष्टीच्या लेखी जीवाणू व मानव यांत काहीच फरक नाही.

ती सर्वांचा भार वाहण्यास समर्थ आहे. सृष्टीचे अलिखित नियम जाणून त्यानुसार वागले तर दुसऱ्याचा भार उचलायची गरज राहणार नाही; खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल. मात्र उद्दाम उर्मट माणूस समाजातील आपल्या सत्तेच्या जोरावर हे विसरतो.

इथून पुढची माझी यात्रा विजापूर, ऐहोळी, पडत्कल (इंग्रजी अपभ्रंश - Pattadakal), बदामी - लेणी व गांव; नंतर बागलकोट - बेळगांव मार्गें माझ्या घरी कोंकणात. मायला माझा अवतार पाहून रडूं कोसळले. दहा दिवसांत माझे दहा किलो वजन घातले होते.

मग आठवडाभर घरी असताना रोज सकाळी सड्यावर लक्या धनगराच्या वाड्यावर जायचे, अनशापोटी शेळीचे धारोष्ण दुध ग्लास भरून प्यायचे हा माझा रोजचा क्रम. आठवड्याभरात माझ्या गालांवर गुलाबी आली.

आयुष्यभर केलेले भटकणे केवळ यात्रा होत्या, प्रवास (tours) नव्हते, की कधी प्रवासवर्णने लिहिली नाहीत. उद्धेश केवळ अध्ययन. वर लिहिलेले प्रवासवर्णन नव्हे. मी काय शिकलो त्याची केवळ नोंद आहे.

टीप: घर आणि परिसर झोपडी, प्रासाद, शेतीवाडी, उपवन, तलाव, विहीर, इ. सर्वांचा वास्तूमध्ये समावेश होतो.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 03, 2011

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

किरिस्तावांची दफनभूमी (फोटो : रेमी डिसोजा)
आजच्या सुधारलेल्या नागर समाजात जगणे  तर  महागले, त्याहूनही मरण महागले. 
नैसर्गिक जगणे व  नैसर्गिक मरणही आता दुरापास्त झाले.
 
त्याच्या तर्काच्या अंती होतसे  काम-लोप
ना ऊर्जा-विनियोग ना श्रम,
जे गेले त्याच्यामागे  नाही जाणे
नाही अनुताप जरी,
वा जे न परते कदापि
वातावरणात अशा,
असो वैरभावी वा उभयभावी
स्वाभाविक वर्तन परी
जेव्हा तन अणि मन
अन आत्मा असती सुसंवादी

अंतर्यामी अंतरीक्ष स्वायत्त
नसे अचेतन जड वस्तू
नसे गुलाम ना राहे अलिप्त
बाह्य जगतापासून
असे तेथे निर्भय जावानल
कदापि विझवता न येणारा
क्षूद्र यकच्र्छित सांघिक वेडांना,
जीं येती लाटामागून लाटानी
ज्या उंचावती, कोसळती नी नाहीशा होती.
स्वेच्छेचे निर्वाण अंतर्ज्योतीचे

मीलन योजिले जीवनदात्या जळीं.

मुंबई
(मूळ इंग्रजीचे (Non-action Action) भाषांतर)
* * *
टीप १ : एक कल्पनाविलास
आभाळाचा टिचभर तुकडा त्याला होता पुरेसा जगायला, ज्यावर नाही कुणाची सत्ता. जन्मतः होती त्याच्या पायांवर भिंगरी. ती त्याला घेऊन फिरली जन्मभर घरवाडी बकोटीला मारून गांवोगांव, विंचवाचे बिर्‌हाड पाठीवर म्हणतात तसे; असा होता एक दरवेश!
त्याने कधीं  नाही केला संग्रह, नाही ठेवल्या आकांक्षा, अपेक्षा, ना ध्येय, ना लक्ष्य. या गोष्टी जीवनाने त्याला कधी सांगितल्याच नव्हत्या. ती सारी गणिते होती नागरी सत्तेने मांडलेली आणि सत्तेच्या भक्तांची व गुलामांची. ती गणिते होती नागरी संस्कृतिने जन्मास घातलेल्या सत्तेच्या दुष्टचक्रात जे अडकले त्यांनी निर्माण केलेली.
सत्तेच्या या चक्राने नैसर्गिक जगणे व मरणे माणसाला दुरापास्त करून ठेवले. यातूनही त्याने मार्ग काढला.
सर्वांत सहज असा मार्ग : मरणोत्तर नाही जाळणे - ऊर्जेचा व्यय टाळणे, नाही गाडणे - जगायला जमीन नाही मग महागले मरणे.
राहिले जळ - जेथे जीवन गवसले तेथेच अर्पिणे.
Underwater life & death
 चित्रसंदर्भ : इंटरनेट
टीप २ : नुकतीच बीबीसीवर बातमी वाचली : New body 'liquefaction' unit unveiled in Floridafuneral home (BBC News Science-Environmrnt). फार गम्मत वाटली. एकीकडे पर्यावरणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सर्व मानवजातीला कारणीभूत ठरवायचे, दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करायचे नवेनवे मार्ग शोधायचे!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape