Showing posts with label सृष्टीयोग. Show all posts
Showing posts with label सृष्टीयोग. Show all posts

December 26, 2013

शौचाचे परिवर्तन कशात होते?

शौचाचे परिवर्तन कशात होते?
संगीतमग्न वारली (आदिवासी)

निसर्गनीर्मित जीवमात्राने, प्राणी (त्यात अत्यन्त बुध्दीमान माणूस पण आला) आणि वनस्पती यानी केलेले शौच जीवनोपयोगी खत बनते.

पण गेल्या पाच हजार वर्षांच्या संघटित नागर समाजाच्या (civilized society) इतिहासात माणसाने केलेल्या शौचाचे परिवर्तन कशात होते?

पिरामिड - ताजमहाल पासून ते प्रचंड शहरे; ग्रंथ-पोथ्या-पुराणे पासून ते देवदास-स्लमकुत्रा करोडपती पर्यंत; अवकाशयानापासून सैपाक घरातील मिक्सर-ग्राइंडर पर्यंत सारे सारे काही मैल निर्माण करतात. . याला इंतरनेट - आंतरजाल - पण अपवाद नाही। नाही हा माझा ब्लॉग! या सर्व मैल्याचं परिवर्तन कशात होते?

हे सारेच सृष्टीतील सिमित ऊर्जा स्रोतांचा क्षणोक्षणी होणारा प्रचंड वापर संपूर्ण पर्यावानाला विनाशाकडे नेत असतात; एन्ट्रपीचा - प्रगतिरोधाचा नवा नवा उच्चांक गाठत जातात.

अलेक्झांड्रिया शहरात म्हणे एक प्रचंड लायब्ररी होती. विलायतेच्या परिसरात किरिस्ताव (Christian) आणि मुसलमान यांच्यात धर्मयुध्दे (जिहादे) चाललेली असताना हे ग्रंथालय खपले - जळून खाक झाले. पण कुणाचेच काही बिघडले नाही.

एवढे अवतार - प्रेषित झाले. आले. गेले. काही फरक पडत नाही. त्यांच्या नावाने प्रचंड उर्जेचा विनाश मात्र चालूच आहे: या ना त्या निमित्ताने. जो तो आपापला अंहकार गोंजारत असतो. त्यात मी पण एक.

पण सृष्टीचा आदर, कला आणि विज्ञान यानी माणसाला फार हातभार दिलेला आहे: लाख वर्षापूर्वी पासून; नागरी समाजाचा उदय होण्यापूर्वी. कला आणि विज्ञान ही काही पांढरपेशांची, भटोंची, गोऱ्या कातडीची मक्तेबाजी नाही.

सुसंस्कृत समजल्या जाणारया समाजांच्या पाच हजार वर्षांच्या हाणामारीतून अजूनही तगून राहिलेल्या काही आदिम जमाती आहेत. त्यांच्याकडे अजूनही सृष्टीयोगाची मूल्यवान गुपिते आहेत. फक्त आमच्यामध्ये थोडासा नम्रपणा हवाय.

(टीप: १: माझ्या "यंत्र-मंत्र-तंत्र : विधी आणि कर्मकांड - ३" या पोस्ट वर सतीश रावले यांची टिप्पणी वाचून सुचलेले काही विचार येथे मांडले.
२: वरील छायाचित्रात एकतारीच्या सूरात गाणे म्हणत असलेला तल्लीन वारली आदिवासी: मुंबईच्या मागील दारी. अधिक वाचा Warali Art
३: आनंद कुमारास्वामींच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकाचे परिक्षण माझ्या इंग्रजी ब्लॉग वर पाहा: LINK: )

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 10, 2013

भग्नमूर्ती

सृष्टीयोग 

 
मातृदेवता

सुमारे तीस हजार वर्षांपुर्वीची मूर्ती, पाश्चिमात्यांनी तिला नाव दिले 'व्हिनस'. मी नाव  दिले 'मातृदेवता. आदिवासी जमातीत अजूनही योनी-पूजा अस्तित्वात आहे.

 

१. भग्नमूर्ती


कल्पना, विचार, तर्क, तर्काच्या पलिकडे... युरेकाऽऽऽ ।
वर्षांमागून वर्षें गेली, दशके गेली; एक ठिणगी अनेक घटनांच्या राखेच्या थराखाली जीवंत राहिली, उलटसुलट सतत येणार्‌या चक्रीवादळांत, झंझावातांत तगून राहिली. 


सर्जनाचा कस लागतो आपल्याच लेखी. लोकप्रवाद मागे पडतात. मळलेल्या वाटा संपतात. पुढचे मार्ग कुंठीत होतात. मागे वाळवंटे खंडारे भगदाडे पन्नास शतकांची. समोर खोल खाई मृत्युची. त्यापल्याड हिरवाई, छलांगाच्या अंतरावर.

आता माघारा फिरलास, गड्या, तर वेसण कायमची. आणि षंढाचे जीणे. कुणाचे काही जात नाही. प्राण एकवटून मार छलांग!

२. अवतरण : ' भग्नमूर्ती ' (मुक्तछंद)


निसर्गस्वभाव, निसर्ग शक्ति, ।
निसर्गांत जें जें आहे तें सारें मानवांतहि ।
आणिक अधिक त्याहून आहे ।
निसर्गाची जी अंतिम सीमा ।
मनुजकार्याचा आरंभ तेथे ।
तेथून विकास मानवतेचा ।
तेथून पुढे जाण्यासाठीच धडपड त्याची ।
तेंच उद्दिष्ट साधायासाठी ।
त्याची कला शास्त्रें विद्या तत्त्वज्ञान ।
धर्म आचार विचार आणि ।
नीतिनियम. ।
(टीप : 
हे अवतरण काव्यशास्त्राच्या एका पुस्तकात मिळाले. लेखकाने कवीचे नाव दिलेले नाही. अशाच अनेक अवतरणांचे संदर्भ / नावे दिलेली नाहीत. मुक्तछंदात लिहिलेले हे मराठीतले पहिले दीर्घकाव्य आहे असा उल्लेख मात्र आहे. वाचकांना माहित असल्यास अवश्य कळवावे.)

' भग्नमूर्ती ' चे वरील अवतरण वाचून सुचलेले विचार :


 कवीची निसर्गासंबंधीची कल्पना बालसदृश किंवा बालिशपण नाहिय. आणि आधुनिकपण नाहीय. निसर्गाला एवढे तुच्छ लेखून कोणाचाच निभाव लागणार नाही हे नक्कीच. पश्चिमेचा प्रभाव कवीवर नक्कीच असावा!
 
प्रागैतिहासिक काळातील मानवाने, जेव्हा सुसंस्कृत समाज अस्तित्वात नव्हते, कधीही या कवीप्रमाणे विचार केला नसता. त्या मानवांचा निसर्गाशी सुसंवाद जुळलेला होता यात शंकाच नाही. याचा अर्थ तेव्हा कला आणि विज्ञान अस्तित्वात नव्हते असा नाही. आतासारखे ते एकमेकापासून वेगळे नव्हते.


आजही तथाकथित अश्मयुगात राहणारे मानव भूतलावर आहेत.
अथवा भविष्यात नागरी संस्कृतिंचा विनाश झाल्यानंतरचे मानवपण असा विचार करण्याचे धारिष्ट्यपण करणार नाहीत.


३. भग्नमूर्ती 


प्राथमिक शाळेत शिकताना मला भातशेती-शाकशेती, सूत कताई-विणाई, मातीची घरबांधणी - अन्न, वस्त्र, निवारा - या मूलभूत गरजा भागवण्याचे शिक्षणपण गावले. तसेच परिसरातील बारा बलुतेदार आणि अठरापगड जाती यांना जवळून बघायची संधीपण मिळाली (घेतली). त्यावेळी मी 'मानववंशशास्त्र' हा शब्द ऐकलापण नव्हता.
इथूनच माझा लोकजीवन बघायचा छंद सुरू झाला. आणि छंदात कविता रचायचा छंदपण ! कालांतराने माझ्या कवितेतील छंद, वृत्त, जाति, अलंकार आयुष्याच्या पायवाटेवर कधी हरवले समजलेच नाही. आयुष्यात एक विद्रोह सुरू झाला.


४. 'भग्नमूर्ती'


निरपेक्ष आयुष्य जगण्याचा छंद आला. जगणेच काव्य झाले, छंद झाले, मुक्त-छंद झाले. मीच कवी आणि माझा मीच रसिक !
 

एक जाणीव आकारत गेली : 'जीवन हे सर्वश्रेष्ठ आहे; सर्व स्थल-कालांत नागरी संस्कृतींनी निर्मिलेल्या सर्व कला, विज्ञाने, धर्म, तत्वज्ञाने व्यापारउदीम, अर्थसंस्था, राज्यसंस्था इत्यादिहून सर्वतोपरी उच्चतम आहे'.

५. 'भग्नमूर्ती'


भ्रमनिरासाच्या प्रक्रियेतून जाताना एक रचना, "अशी एक कविता : एक कोडे" आकारली. तिला अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव यांनी गायली. त्यावर काही नमुनेदार प्रतिक्रिया आल्या. या वाचनीय आहेत. पण कोडे मात्र अनुत्तरित राहिले.
चवाठ्यावरच्या चर्चेत कधी कधी मूलभूत मुद्दा बाजूला होतो. आणि शब्दच्छल राहातो.
दुवा :

 गायक : अत्त्यानंद उर्फ प्रमोद देव

अशी कविता: एक कोडें

ह्या कवितेत रूपके नाहीत, अलंकार नाहित.
ही कविता फक्त वाचता येते; गाता नाही येत.
ही कविताच एक रूपक आहे, अलंकार आहे,
वास्ताविकतेचा. या कवितेस काय म्हणावे?

कवी:रेमी डिसोजा 


टीप :
१. हल्लीच लिओनार्द दा विंची " कलावंत कि वैज्ञानिक ? " असा वाद विलायतेत झाला.
दुवा : Is Leonardo da Vinci a great artist or a great scientist?
 भरल्यापोटी असे वाद घालणे हा पंडितांचा उद्योगाच आहे म्हणा ना !
२. निसर्गाची एक झलक : शरीरधर्म  BODY DHARMA
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

October 01, 2012

सृष्टीत आम्ही सातत्याने

 सृष्टी स्तवन



भारताला संपन्न जैवविविधतेची देणगी सृष्टीकडून मिळाली आहे. त्यातूनही भारतीयांनी नारळाच्या झाडाला 'कल्पवृक्ष' असे संबोधले. नारळाला 'श्रीफळ' म्हटले. सृष्टी सर्व जीव मात्राला जगण्याचे साधन देते, आणि मानवाला संस्कृती देते. संगीत, काव्य, नाट्य, साहित्य, चित्र, वास्तू, महाकाव्ये ही केवळ संस्कृतीची अभिव्यक्ती आहेत. संस्कृती केवळ मानवात वसते.

सृष्टीत आम्ही सातत्याने


सृष्टी मानवप्राण्याला तिची लाडकी जीवजाती म्हणून ओळखत नाही, की नाही नागरी समाजाच्या कुंपणाना व त्यांच्या सामाजिक अधिश्रेणींना.



वानसे सुसंस्कृत समाजाची कुंपणे व अधिश्रेणी ओळखत नाहीत 
नागरी समाजांना कुंपणे - भिंती बांधायचे, वर्गवारी करायचे फारच वेड आहे. ते एवढ्यावरच थांबत नाही. त्या भिंतीवर नक्षीकाम करायचे, त्याच्यावर अलंकार चढवायचे, त्यांची स्मारके घडवायची, आणि टाळ्या वाजवायच्या हे पण पर्यायाने आलेच. उदाहरण: चीनची भिंत: ते तर सरंजामदारशाहीचे प्रतिक आहे.

तसेच वानसे आणि अन्य प्राणीजातीपण त्यांची सामाजिक बंधने व अधिश्रेणी ओळखत नाहीत.
पाळीव पशुपक्षीपण सायंकाळी निवार्‌याला घरी परतून येतात. त्यांना तेवढ्यापुरतीच कुंपणाची म्हणजेच मालकीची ओळख असते. सामाजिक अधिश्रेणी – सोपान ते ओळखत नाहीत.
लहानपणी आईच्या दुधाव्यतिरिक्त इतर अन्न आपणास सुरू केले की जीवाणूंच्या झुंडी आपल्या उदरात कायम घर करून राहायला सुरवात करतात. त्यांच्या अनेक जातींची संकुले उदरात असतात!

आशा करूया, 'हिरवाई' — बगिचे, झाडी, शेते, उरली सुरली जंगले, आणि नद्या-सरोवर-सागर — यांच्यापल्याड; वर्डस्वर्थ याच्या कविता, टर्नरची चित्रे, यांच्यापल्याड; आणि फोटो सिनेमा विडयो - ही कितिही अद्यावत असली तरी - त्यापल्याड जावून आपण कधीतरी सृष्टीचा अनुभव घेऊ ! कारण ही सर्व माध्यमे मनोरंजक व दृष्टीसुख देणारी असली तरी ते सृष्टीला पर्याय नव्हेत.

वरील दाखले आपणांस निसर्गाच्या मनोहर / भयावह अनुभवांची आठवण करायला मदत करतील.
जीवशास्त्र आणि पुरातत्त्वशास्त्र, त्यांनी केलेली प्रगती आम्हाला निसर्गाची अधिकाधिक माहिती देते, शिवाय निसर्गातील आपले स्थान काय हेपण समजायला मदत करतात.
कदाचित चक्रीवादळे, मेघस्फोट, ज्वालामुखी, धरणीकंप, हिमवादळे, सुनामी... इत्यादि आणि आता वायुमान बदल (ही काही कल्पित कथा नव्हे) या रौद्रभयानक रूपांत निसर्गाचे सामर्थ्य आपणास दिसते. 

सृष्टीचे प्राथमिक निरिक्षण 


सृष्टीशी मौलिक संबंध प्राथमिक आणि वैयक्तिक स्तरावर प्रस्थापित करणे हे सर्वात उत्तम. स्वतःच्या शरीर व मनाचे निरिक्षण करणे; त्यासाठी नाही मुहूर्त, नाही मंत्र-तंत्र विधी, ना शुभाशुभ स्थानाचे, विषेश बैठकीचे अथवा वेशभूषेचे नियम. केवळ निरिक्षण, लक्षपूर्वक व करुणापूर्वक. कारण शरीर आणि मन आम्हाला या जगात टिकून राहाण्याची मिळालेली साधने आहेत व आम्ही त्यांचे विश्वस्त आहोत, मालक नव्हे. यात कोणतेही गूढ नाही; जशी बाहेरची हिरवाई तसेच आम्हीही सष्टीचेच केवळ भाग आहोत.

सृष्टीच्या निरिक्षणाचे दुसरे साधन  


उष्ण कटिबंधात वानसे  कोठेही उगवतात


आम्ही भारतीय पंच महाभूते — पृथ्वी, आप, तेज, वायू आणि पैस — परंपरेने मानतो.
स्वतःनंतर सष्टीच्या निरिक्षणाचा दुसरा उत्तम पर्याय असा : वानसांबरोबर संबंध जोडणे व त्यांचे निरिक्षण करणे. त्याहूनही चांगले प्रत्यक्ष कृती: सैपाकघरातून काही बीजे घेऊन मातीत पेरणे. त्यासाठी टीनाची प्लस्टीकची अथवा मातीची लहान कुंडी चालेल. मातीची कुंडी बरी कारण माती श्वासोश्वास करते. अशी पेरणी प्रत्येक ऋतूत केलेली बरी. आणि रुजलेल्या रोपांच्या वाढीस सूर्यप्रकाश व पाणी देऊन मदत करणे. मार्गदर्शक पुस्तके शक्यतो टाळावी. काही चूका झाल्या तरी हरकत नाही.
प्रत्येक बीज रुजेलच असं नाही. त्यांना येणारे कोंब पहावे, सूर्यप्रकाश व पाणी घालावे. हे सर्व करीत असताना रोपांबरोबर आपणही पंच महाभूतांच्या संपर्कात येतो, पर्यायाने सृष्टीच्या संपर्कात जाणीवपूर्वक येतो.

निसर्गाच्या प्रयोगशाळेत कृषीक्रांती

दहा हजार वर्षांपूर्वी अर्धनग्न मानवांनी रानटी वानसे आणि पशूपक्षांचे गृहसंवर्धन केले. आणि बिकट नैसर्गिक वातावरणात कृषीक्रांतीची सुरवात झाली. आणि ती सर्व जगभर पसरली (विना बौद्धिक मालकी हक्क).
त्या काळी नागरी संस्कृती किंवा सुसंस्कृत समाज किंवा civilization अस्तित्वात आले नव्हते. कृषिक्रांतीनंतर पाच हजार वर्षांनी सुसंस्कृत समाज Civilization म्हणजेच Urban Revolution, 'नागरी क्राती'चा उदय झाला.
औद्येगिक क्रांती Industrial Civilization काही शतकांपूर्वीच विलायतेत उदयास आणि पाहता पाहता सर्व जगभर पसरली. पण ती कधीच 'वैश्विक' universal झाली नाही. आपण उच्चभ्रू वर्ग मात्र येथे पोहोचलो. आपले अध्ययन सांघिक शिक्षण पद्धतिच्या जुळवणी पंक्तीवर Assembly Line झाले.
अजूनही वेळ नाही का आली सृष्टीशी संयोग करायची?

टीप : वरील मजकूर लिहित असताना एका इंग्रजी ब्लॉग वरील लेख Humans and Nature: Can the Gulf Be Bridged?  वाचनात आला. याचा मथळा वाचताच विलायती समाज आणि त्यांचे अनुकरण करणारे इतर समाज निसर्गापासून कसे दुरावलेले आहेत हे.ध्यानात येते. या लेखावरील माझी टिप्पणी – प्रतिक्रिया अवश्य वाचावी.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 31, 2011

जागतिक महायुद्धे नादाविना

आय-टेक्नोमॅन, रेमीची स्व-प्रतिमा
अहंकार उर्मट उच्च-तंत्रज्ञाचा
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा
निर्मीतो कॉम्प्यूटर, उपग्रह, महानगर
अन् करी कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनही, धरतरीच्या उरावर :
जागतिक
महायुद्धे नादाविना.
* * *
(मधुकोष गोंडवनी या ब्लॉगवर प्रसिद्द केलेल्या मूळ "WORLD WARS WITHOUT BANG" इंग्रजी कवितेचा अनुवाद)
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | २८-१२-२०११

कांही इंग्रजी दुवे - १. Missed Target of 9/11, २. iTECHNOMAN
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 28, 2011

रेमीची मुक्ताफळे -१७ : विश्व-लोक-ऊर्जा


विश्व-लोक-ऊर्जा
सामाजिक वर्गांची विभागणी सत्तेच्या केंद्रीकरणाला आधारभूत असते.
जेवढ्या वर्ग-विभागण्या अधिक तेवढी केंद्राची सत्ता अधिक. 
७ अब्ज-लोक-ऊर्जा येई संपुष्टात, ऊर्जेच्या जागतिक युद्धात.

टीप: ट्विटर वरील संदेशाचे भाषांतर
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 15, 2011

रेमीची मुक्ताफळे-१५


॥ सृष्टीयोग ॥
 सृष्टीने दिलेल्या या जीवनाचा मी केवळ परिरक्षक, आणि शारीरिक व मानसिक शक्तिंचा विश्वस्त आहे. वांट्याला आलेल्या या एका आयुष्याचे सार्थक मीच करायचे.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

October 27, 2011

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

॥ जेथे जातो तेथे ती माझी सांगाती ॥

रेखाचित्र, शब्दचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, चलत्‌चित्र... वा कल्पनाचित्र सारें कांहीं सृष्टीतून आलें; आणि व्यापार-उद्योगांत विरून गेलें.
 
की त्यांचे लक्ष्मी (तिजोरी) -पूजा व दुर्गा (युद्धें-अतिरेक-आतंक-सत्ता...) -पूजा यांत सार्वजनिक परिवर्तन झालें?
 
या धबडग्यांत सरस्वती-पूजा कुण्या वाळवंटात लुप्त झाली माहित नाही. मग सार्वजनिक शारदोत्सव कुठून ?

अनादि काळापासून जळ-जमिन-जीव यांनी - मूलतः सर्वच ज्ञात व अज्ञात सृष्टीने मानवाला संस्कृती प्रदान केली; त्यांचे भरण पोषण संवर्धन केले अशी माझी श्रद्धा !

त्या काळांत नागरी समाज अस्तित्वात नव्हते; ते निर्माण केले त्यांच्या स्वयंकेंद्रित सत्तेच्या आकांक्षेने !
 
हा अलिखित इतिहास आजही वर्तमान परिस्थितीत गम्य आहे. नागरतेच्या तथाकथित प्रगतीत, विषेशतः आजच्या औद्योगिक समाजाच्या मनात सृष्टीमातेचे काय स्थान आहे सांगायला नकोच. ते त्याच्या कृतीने सिद्ध होते.
अर्थात सृष्टीला त्याचे ना सोयर ना सुतक ! ती त्याचे वरदान व दंड - स्वर्ग व नरक - येथेच देते.
 

अधिक वाचा >> Civilization Trap In Our Era

दिवाळीचा पाडवा भातशेती झाली की येतो. शालिवाहन शक आणि अनेक पौर्वात्य शक वसंताच्या आगमनाने सुरु होतात. या व अशा अनेक परंपरा सृष्टीशी निगडीत आहेत. या सर्व संस्कृतीच्या अभिव्यक्ती ! मानवी संस्कृती सृष्टीतून उगम पावते व तिच्यात लोप होते. आता या परिस्थितीत माणसाच्या कर्तुताने फरक होत चालला आहे... व त्याचे परिणाम रोज पाहायला मिळतात.

मुंबई | दीपावली २०११
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

May 23, 2011

वानसे जीवनदायी

हायकू

Photo: Spring 2011©  Soojung Cho, Artist, Photographer
 वानसे मूक भाषी
भरुनी काढिती
अनेकपरी माझ्या क्षती.
 
 मूळ  इंग्रजी कवितेचे (Rain, Rain, Come again-6) भाषांतर
वानसे हर प्रकारे — अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, औषधी, रंजन, शिक्षण, कागद, रंग, सुगंध, संतती किंवा संततिनियमन ... व पर्यावरण — आयुष्याच्या हरेक क्षेत्रात सतत जीवनदायी होत असतात. पण रोजच्या धावपळीच्या धबडग्यात वनसाचा क्षणभर पण विचार शिवत नाही. मग आठवडा-महिना-वर्षातून एकदा बाडबिस्तरा बांधून दृष्टीसुख घ्यायला पिकनिकला निघायचे. बॉलीवूडच्या नट-नटी बघायला जेव्हढा वेळ खर्च होतो त्याच्या शतांश-सहस्रांश पण वानसाना आपण देत नसतो.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 19, 2011

शरीरधर्म : BODY-DHARMA

स्त्री-पुरुष मानव सांगाडे
शरीरधर्म

आधुनिक चक्रव्युहात फसलेल्या आयुष्याच्या मुक्तीला
नाहीत कुठे विद्यापीठे आयुष्याची कलाशास्त्रे शिकवायला.

त्यासाठी असते गरज शांत विरामाची
आणि अनिर्बंध उत्सवाची वारंवार.

या बजबजपुरीच्या साठमारीतून निघाया बाहेर
हवीय उसंत मोकळ्या निश्वासाची वारंवार;

जशी शरीराला असते टाकायची कात
आयुष्याच्या कामकांडात फसलेल्यास वारंवार;

हे कधी जाणवले नाही. ऐकले तरी उमजले नाही.
समजेल तेव्हा उशीर तर नसेल झाला फार?

आहे एकच विद्यापीठ आपलेसे, आपलेच वर्म –
घेऊन सदाची भिरभिर – विसरलेला शरीरधर्म.

रेमीजीयस  डिसोजा | मुंबई | १२-१२-२००५

टीप: प्रतिमा – स्त्री-पुरुष मानव सांगाडे, मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! विज्ञान आता मदत करते. वरील प्रतिमेत प्रौढ स्त्री-पुरुषाचे सांगाडे दाखवलेत. सृष्टीच्या संकल्पनेत अत्यंत सूक्ष्म फरक गरजेनुसार केलेले आहेत, पण कोठेही अपव्यय नाही. अशा शरीराला आपण सुंदर (?) करण्यासाठी केवढा आटापिटा करतो! जणू सृष्टीची चूक सुधारण्याचा आमचा प्रयत्न!!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

April 04, 2011

गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा

वासंतिक नव्या वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.
मुंबईत गुढी पाडवा
गुढीपाडव्याच्या सर्वां हार्दिक शुभेच्छा!
केवळ कॅलेंडरच नाही, आपल्या देशातील चालीरीती, पूजा, विधि, परंपरा, सण, सोहळे, जत्रा, बारशापासून अंतयात्रेपर्यंत होणारे अनेक विधी हे सृष्टीमातेशी कुठे ना कुठे निगडीत असतात, जशी वटपूजा.
अनेक विधी आता जरी कधीकधी यांत्रिक पणे होत असले तरी सृष्टी आपल्या मनात, मातीत पडलेल्या बीजाप्रमाणे सुप्तावस्थेत असते.
केव्हा ना केव्हा ती रुजेल, फुलेल अशी आशा करायला पुष्कळ जागा आहे.
― रेमीजीयस डिसोजा

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 05, 2011

सृष्टी महात्म्य

॥सृष्टी महात्म्य॥

किती गुण गाऊ मी सृष्टीचे! तिची लीला अगाध! तिचे गूढ अगाध! तिचे औदार्य अपार! तिचा न्याय निष्ठूर तसाच निस्पृह! अवतार, प्रेषित, संतमहात्मे, राजेरजवाडे, चोरदरवडेखोर, किडेमुंग्या, कीटक, पशूपक्षी, तृणे, झाडेवेली सर्व तिला समान. पर्वतराई, महासागर, महाभूखंड, गृहतारे पण अपवाद नाहीत.

सृष्टीला संतुष्ट करायला पूजापाठ, भजनकीर्तन, जपजाप्य, मुहूर्त-शुभाशुभ वेळ... कशाचीही गरज नाही. फक्त तिच्या नियमाचे पालन करायचे. अति खाल्ल्याने अपचन / अतिसार होणार हे अटळ आहे. गंमत अशी की सृष्टी आपल्या बाहेर तशीच आतही आहे. आणि ती काही वेगळी नाही. तीच मूलद्रव्ये. पण हे कधी आईबाबानी, मास्तरांनी की धर्मोपदेशाकांनी सांगितले नाही. नाही वैज्ञानिकानी सांगितले. ते बिचारे हुकुमाचे ताबेदार! ते नवीन नवीन मशिने, शस्त्रास्त्रें, अण्वास्त्रें, संगणके इत्यादि शोधण्यात गुंतलेले आहेत. अर्वाचीन - आधुनिक युगातले सुधारलेले गुलामच म्हणाना. 
२.
विज्ञानाने आधुनिक युगात केवढी तरी प्रगति केलीय. रोज नवनव्या बातम्या ऐकायला मिळतात. सृष्टीचे एक रहस्य उलगडते. त्याहून अनेक पटीने सृष्टी रहस्यमय होत जाते. त्याहूनही मजेची गोष्ट अशी, माणसाला आपलेच शरिर (आणि मन) तरी पूर्णतः कुठे माहित झालेय?

संशोधनासाठी विज्ञानाने नवीन भाषा व यंत्रादि साधने तयार केली, जी माझ्यासारख्या अडाणी माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत, पूर्वी जशी देवभाषा संस्कृत होती तशी. (जर शूद्रांनी त्या भाषेचा उच्चार केला तर तिला विटाळ होत असे. आजही ते चित्र बदललेले नाही. तर अधिक सोवळे झालेय; त्याला 'Intellectual Property Rights' असे नाव आहे.) आपण वैज्ञानिकांवर भाविकपणे विश्वास ठेवायचा एवढेच आपल्या हाती राहते. वैज्ञानिकाना जर विवेक नसेल तर आपण विषमतेच्या आगीत होरपळायचे -- मग ती आग अण्वास्त्रांची असो, कि आर्थिक-सामाजिक-राजकीय, किवा पर्यावरण-पारिस्थितिकी-ऊर्जेची असो. याचे साधे कारण विज्ञान तसेच ज्ञानाच्या इतर शाखा काळाबरोबर लोकाभिमुख वा सार्वत्रिक झालेल्या नाहीत. अशी विषमता नागरी संस्कृतिंत सत्तेला पूरक व पायाभूत असते. किंबहुना 'सत्तेचे केंद्रीकरण' हे नागरी समाजांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. 
3.
अशा सत्तापिपासूंनी या ना त्या कारणांनी पृथ्वीवरच्या सर्व जमिनीचे वाळवंट केले तरी सृष्टीला त्याचे काहीही सोयरसुतक नाही. कदाचित सहारा वाळवंटातील पिग्मी आदीवासी जमात सोडून इतर सारे मानवप्राणी नष्ट होतील. कदाचित कल्पित स्वर्गातील काल्पनिक देव हळहळतील. पण सृष्टीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही.

सृष्टीचा आद्य नियम - सृष्टी सर्व सजीव योनीँना, अतिसूक्ष्म जीवाणू ते वनस्पती, व मानवासह सर्व प्राणीमात्राला, जगण्याची सुयोग्य साधने, सक्षमता व स्वायत्तता देते. या नियमात कुणालाही हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. ही सक्षमता अथवा कार्यक्षमता अशी: "श्रम, विश्राम, आरोग्य, अध्ययन व प्रजनन" होत. ही पंच-कार्यें कोणत्याही व्यक्तिच्या वा संस्थेच्या -- ना राजसंस्था, ना धर्मसंस्था -- अखत्यारात येत नाही. ज्यानी असा हस्तक्षेप इतिहासकाळापासून केला ते सारेच सृष्टीचे व जीवमात्राचे घोर अपराधी आहेत. त्यांचा निवाडा करायला सृष्टी सर्वतोपरी समर्थ आहे. ते सारे काळाच्या प्रवाहात वाहून गेले.
शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास
४.
सृष्टी समजून घ्यायची तर तिच्याशी अंतर्बाह्य नियमित संपर्क ठेवायला हवा. अर्थात हा स्वतःपासून सुरू होतो, तो पण आपल्या शरिर व मन यापासून. आपले सर्व अवयव - नाड्या, हृदय, फुफ्फुसे, यकृत इ. - सहजधर्माने चालतात; ते आमच्या मर्जीने चालत नाहीत. लहान बालकांना याची गरज लागत नाही. कारण तीं निसर्गतः सहजधर्माचे किंवा सृष्टीच्या धर्माचे पालन करतात. मात्र आपण - पालक, कुटुंब व समाज - त्याना गर्भधारणेपासून अनेक निमित्तांनी सहजधर्मापासून जाणता-अजाणता दूर करीत असतो. आमच्या अनेक संतांनी अनेकदा सहजधर्माचा पाठपुरावा केला, पण कधी ध्यानातच आले नाही! मुले स्वाभाविकतः सृष्टीयोगाची साधना करतात.

सृष्टीयोगाच्या साधनेत आपणच आपले गुरू! यात कोणतेही विधी नाहीत. आजच्या शहरी धकाधकीत स्वतःसाठी वेळ काढणे फार कठिण झाले आहे. चित्त विचलित करणारी किंवा आपल्या मोकळ्या वेळेचा कबजा घेणारी आमिषे आकर्षणे अमाप असतात. आपल्या शरिर व मनाचे व्यवहार लक्षपूर्वक निरखणे खरोखरच मनोरंजक असते.फक्त एकवार अनुभवायला हवे.
५ 
सृष्टीने सर्व जीवमात्राला पाच कार्यक्षमता दिलेल्या आहेत: "श्रम, विश्राम, स्वाथ्य, अध्ययन व प्रजनन" (दुवा: Work-Leisure-Health-Learning-Propagation)  ही स्वायत्त कार्ये प्रत्येक योनीच्या संरचनेला अनुरूप आहेत. 

पण इतिहास काळापासून नागरी समाजांतील राजसत्ता व धर्मसंस्था यांनी चढत्या भाजणीने व्यक्तिच्या व समष्टीच्या जीवनात या कार्यांवर कमी अधिक प्रमाणात कबजा केला. आता तर प्रगति व सुधारणा यांच्या नावाखाली या सर्वच कार्यांवर नव्या सत्ताधिशानी कबजा घेतलेला आहे. 

या सत्ता आपल्याला सर्कशीतल्या जनावरासारखे वागवतात. आपण मुक्तपणे गाणे नाचणे कधीच विसरलो. आता आपण बॉलीवुडच्या तालावर गातो. मात्र पाच हजार वर्षांच्या सवयीने आपल्याला हेच सत्य आहे असे वाटते. या सत्तेच्या राजकारणातून सुटका करून घ्यायची असेल तर ती व्यक्तिगत, कौटुंबिक व 'जमाती'च्या (community) पातळीवरच होऊ शकते. कोणतीही संस्था वा संघटणा हे करू शकणार नाही .
*  *  * 
उद्धरण :
प्राण्यात 'जाणीव' । चैतन्य असते
वर्तन घडते । त्यातूनही;
तरी जगातील । सर्व व्यवहार
होती नियमानुर । सृष्टीच्याच.
कुणा सृष्टीकर्त्या । ईश्वराची नाही
जरूरीच काही । त्यांच्यासाठी.

(विंदा करंदीकर,  चार्वाकदर्शन, "अष्टदर्शने",   पॉप्युलर प्रकाशन, २००३, पृष्ठ पृ. ७७ )

टीप: प्रतिमा: "शरीरात सूक्ष्म जीवाणूंचा निवास" - संदर्भ: इंटर्नेट, हे चित्र रद्दीत मिळाले. याचे मालकी हक्क New Scientist या विज्ञान साप्ताहिकाचे आहेत/असावेत.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

December 22, 2010

मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द

भाषा, परंपरा, संस्कृती व प्रकृति या सर्वाँचे एकमेकाशी अतिप्राचिन घनिष्ट नाते आहे, अगदी जगातील सर्व नागर संस्कृतिंच्या उदयापुर्वीचे, माणूस अस्तित्वात आल्यापासूनचे आहे. माणसाचे अध्यन अध्यापन (शिक्षण) जन्मल्या क्षणापासून सुरु होते. अर्थातच ते मायबोलीत होते यात आक्षेपार्ह काहीच नाही!
मायबोली : मी कोकणचा रहिवासी, माझी मायबोली कोकणी. सरकारने आता कोकणीला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. कोकणी भाषेत अनेक बोली आहेत, त्यांपैकी मुख्य बोली मालवणी, गोमंतकी व कारवारी होत. आमची मायबोली कोकणी असली तरी ती मराठीचीच एक बोली असे आम्हास नेहमीच वाटत आले. विंदानी मालवणीत व बोरकरानी गोमंतकीत कविता रचलेल्या आहेत. कोकणीत नोंदणी केलेले व न केलेले लोकसाहित्य अपार आहे.  

मायभाषा: इंग्रजांच्या राजवटीत आमचे शिक्षण मराठीतच झाले. तरीही मराठीला बोलीचा (vernacular) दर्जा होता. लहानपणी शाळेत वाचलेल्या एका कवितेच्या दोनच ओळी ध्यानात आहेत, 
"मराठी असे आमुची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे.
... ... ... ... ... ... ... … ... ...
तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू."
(
शाळेत वाचलेली कविता. कवीचे नाव आठवत नाही. फक्त
पहिली व शेवटची ओळ आठवते, मेंदूत कायमचे कोरलेली! . 

राजभाषा मराठी: महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर मराठीला भाषेचा दर्जा सरकारने दिला. तोवर राजभाषा इंग्रजी होती. तरीही अनेकांच्या परिश्रमानी मराठी संपन्न होत राहिली. आता मात्र भाषांमध्ये राजकारणाने जागा पकडली आहे. उदा. केंद्र सरकारने हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा दिला. त्याने भाषांची व शिक्षणाची कशी प्रगती होते हे काळच ठरवेल. 

भाषेची समृध्दी: तेवढ्याने भाषेची समृध्दी होईल याची हमी देता येत नाही. त्यासाठी सर्वात प्रथम साक्षरतेची गरज आहे. त्या उपरांत शिक्षण व लेखी-छापील साहित्य व आता इ-साहित्य येतात. साक्षरता पसरवण्यात व यशस्वी करण्यात लोकबोली महत्वाचा वाटा उचलू शकतात. कारण लोकबोलीतही साहित्याची वाण नाही. त्याना हवी असते लिपी व त्यांच्या साहित्याची लेखी नोंदणी. ही त्याना दिलेल्या मानत्येची पहिली पोहोच समजा. 

लोकबोली: लोकबोलीभाषांची महत्ता आहे त्यांच्या प्रादेशिक जैवविविधतेत. सृष्टीचे वैविध्य भाषांची जडणघडण व समृध्दी करते. त्यात कैक पिढ्यांचे अनुभव, शिक्षण, शहाणपण व कौशल्ये गुंफलेली असतात. या सर्वच भाषा देशाचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहेत. भाषेच्या राजकारणात त्या नष्ट व्हायला किती काळ लागेल? भाषेचा वापर करण्याने ती टिकून राहते; विविध व्यवहारांसाठी वापर केल्याने ती संपन्न होते यात शंकाच नाही. 

मराठी भाषा: मराठी भाषेत सुमारे एक लाख शब्द आहेत असे सांगतात. तेव्हा अनाहूतपणे इंग्रजीत पाच लाखाहून अधिक शब्द असल्याची आठवण पण केली जाते. येथे तुलना करायचा प्रश्नच येत नाही किंवा वैषम्य वाटायचे कारण नाही. मराठी भाषेत कधी एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. कधी अनेक शब्दांचा एकच अर्थ होतो, जसे विष्णूची सहस्र नावे, पृथ्वी, पाणी, वेश्या इ. शब्दांसाठी मराठीत अनेक प्रतिशब्द आहेत. कधी एक शब्द फरक करून लिहिता येतो. संस्कृती ही जळ व जमीन पर्यायाने जैवविविधतेची देणगी आहे;  कोणतीही भाषा संस्कृतिची (culture) अभिव्यक्ती असते व ती एकमेवाद्वितीय असते. ज्या विषयाचा व्यासंग त्यात नैपुण्य! 
 
सृष्टीचे भाषेशी नाते: सृष्टी सर्व जीवमात्राची जन्मदात्री - आई आहे. ती सर्व जीवांना पोषण देते. आणि मानवाला संस्कृती देते. आपल्या देशात जैवविविधता अजूनही संपन्न आहे, थोडीफार टिकून आहे. आपल्या सर्व परंपरा, कला, शास्त्रे, इ. तसेच भाषापण येथील जैवविविधतेने घडवल्या. (आधुनिकतेच्या अथवा इतर कितीही वावटळी आल्या तरी हे अभिमानपूर्वक नेहमी ध्यानी ठेवायला हवे, व तिचे निष्ठापूर्वक संवर्धन करायला हवे. कदाचित कोणत्याही नीतीशास्त्रात हे लिहिलेले नसेलही.) आपल्या देशातील जैवविविधतेचे "वैद्यक" हे एकच उदाहरण पुरे!  

वैद्यक: एकेकाळी मुंबईच्या बाजारांतील करियाणांना शेजारच्या रायगड जिल्ह्यातील कातकरी आदिवासी नियमित वनौषधी पुरवत. मुंबई बांधण्यात रायगड जिल्ह्याची जंगले संपली. कातकर्‌यांची कला गेली. आणि इंग्रजी औषधे आली. आयुर्वेदात असंख्य औषधींची नोंदणी आहे. पण ग्रामिण जनता व आदिवासी जे निसर्गनिवासात राहतात त्यांच्या पारंपरिक, मौखिक ज्ञानाची कुठे नोंदणी कुठे आहे? आदिवासी भाषांतील वनौषधींच्या नावांची नोंद कुठे असणार? आता येथील वानसांची ग्रीक-लातीन भाषेत जंत्री केली जाते. 

परिभाषा: असा संयोग येतो की जेव्हा समाज काळानुसार एक किंवा अनेक स्थित्यंतरांतून जात असतो. इंडियात अनेक स्थित्यंतरे आली. यांचा भाषा, कामे व जीवनशैली यांवर बदल करणारे परिणाम झाले. फिरंगी सत्ता देशावर आल्या तेव्हा अशी विषेश परिस्थिती निर्माण झाली. आतापावेतो भाषा-कला यांवर प्रमुख्याने देवदेवता, धर्मकर्म, पुराणे, महाभारत, रामायण वा स्मृति यांचा प्रभाव होता. श्रुती, वेदवेदांगे इ. पंडित पुरोहित यांचे क्षेत्र होते.  

त्याशिवाय वर्णाश्रम व्यवस्था, धर्म-अर्थ-काम-मोक्ष, अध्यात्म इ. मूळ विकसित वा विडबन झालेल्या संकल्पना बहुसंख्य समाजात अजून रूढ होत्या, आजही असतील. त्यातील अलुतेदार - बलुतेदार ही एक सामुहिक सर्जकतेची नमुनेदार व्यवस्था म्हणता येईल. हा बहुसंख्य समाज म्हणजे ग्रामिण शेतकरी 'वर्ग' होय, सदाचा सावकार, राजेरजवाडे, सरदार, ईनामदार यानी अव्याहत नाडलेला, व साक्षरतेला वंचित राहिलेला. या समाजात अनेक लोककलांची परंपरा आजही जिवंत आहे.  

इंग्रजानी हा खंडप्राय देश एका अंमलाखाली आणला. आपली यांत्रिकी-औद्योगिक संस्कृति वा समाजधारणा येथे आणली. कारभारासाठी कारकून हवे म्हणून शाळा - सांघिक शिक्षण - सुरू केल्या. या घटना आज आपण गृहित धरतो. गेल्या शतकाच्या सुरवातीस (१९०१) देशाची लोकसंख्या सुमारे २० कोटी होती. त्यात जेमतेम ५ ते ६ टक्के लोक शिक्षित होते. हा रानडे-गोखले यांचा जमाना. आज १२० कोटी जनतेत ४८ कोटी लोक निरक्षर आहेत. जे शिक्षित व सु-शिक्षित आहेत ते शिक्षणाचा कसा सद्उपयोग करतात हा प्रश्न वेगळा. 

पश्चिमी औद्योगिक युग इंडियात आले नवे यंत्र-मंत्र-तंत्र विधी घेऊन. शतकानुशतके आमच्या व्यासंगाचे विषय वेगळेच होते हे सांगायला नकोच. परमार्थाच्या नावाने जातपात, सोवळेओवळे, कर्मकांड, टीकासमिक्षा यात पंडित अडकलेले. शेतीभातीत अशिक्षित शेतकरी गुंतलेला. कणाद, आर्यभट, शून्याचा शोध इ. कधीच मागे पडले होते. भौतिकी शास्त्रांच्या व्यासंगाचा अभावच म्हणाना. याचे मुख्य कारण ही शास्त्रें कधी बहुजन समाजापर्यंत पोहोचली नाही हे असावे. अर्वाचीन काळात ४० टक्के माणसे, संख्या नव्हे, साक्षरतेपासून अजूनही वंचित आहेत. ही गेल्या ६० नव्हे ६००० वर्षांची आमची थोर परंपरा आहे.   

तरिही बहुसंख्य जनता प्राकृतिक निसर्गाच्या सान्निध्यात रहात आली; विशेषतः आदिवासी, याना तर सृष्टियोगीच म्हणायला हवे. याचे एक आत्यंतिक उदाहरण: अलिकडच्या सुनामीत अंदमान-निकोबार येथील आदिवासी वेळीच उंच जागी निघून गेले होते व सारे बचावले. दृश्य सृष्टीच्या अंगप्रत्यंगाच्या अनुभवाचा हजारों वर्षे जतन केलेला ठेवा त्यांच्यापाशी आहे.   

देशातील जीवघेण्या विषमतेच्या वणव्यात तो ठेवा कितपत टिकेल याची घोर शंकाच आहे. सत्तेच्या महानगरात बसून देशप्रेमावर भाषणे देणे सोपे आहे. देश म्हणजे नकाशा नव्हे. पदव्या, बिरूदे, अधिश्रेण्या, पैशांची गंगाजळी त्यागून किती हरीचे लाल निसर्गनिवासात आपल्या अद्यावत ज्ञानाच्या बळावर टिकून रहायला तयार होतील?  

शिक्षण: महाराष्ट राज्य सरकार मराठीत वाङ्मय, भाषा, कृषी, भू, भूगोल, जीव, भौतिकी, रसायन, अर्थ, राज्य , वाणिज्य इ. अनेक शास्त्रांचे उपयुक्त परिभाषाकोश गेली चाळीस वर्षें तयार करित आहे. शिवाय मराठी लोकभाषा यावर काही पुस्तके प्रसिध्द केलेली आहेत, मात्र ही इंग्रजी भाषेत आहेत; बरोबरच देवनागरी पण समाविष्ट केली असती तर तीं अधिक सुगम झालीं असतीं. मात्र पारिभाषिक शब्द रोज व्यवहारात वापरले तर भाषा संपन्न होत जाते.  

पर्यायी शब्द: मराठीत सांघिक शिक्षण (mass education) आणि विविध विषय जसे उपलब्ध व विस्तृत होत गेले तसे पारिभाषिक शब्दांची पण गरज भासू लागली. अर्थातच अनेकदा संस्कृत सुलभपणे उपयोगास येते, उदा. 'प्राणवायू',  'क्षेपणास्त्र', व असे अनेक शब्द!  

अनेक नवनवीन विदेशी संकल्पना पण येत राहिल्या, विषेशतः सामाजिक संदर्भात. उदा. community participation (community, लोकसमूह; participation, सहभाग) हा शब्दसमूह सध्या फार चलनात आहे. याला पर्यायी शब्द कोशांत नाही. यांचा जोडशब्द बोजड होईल. शिवाय 'लोकसमूह' हा युक्त वाटत नाही. 'जमात' / 'जमाती' अधिक जवळचा आहे. आता दोन पर्याय शक्य होतात: लोकसहभाग व जमातसहभाग / जमातीसहभाग. पण रायगड जिल्ह्यात आगरी समाजाच्या भाषेत 'झोळ' हा शब्द प्रचलित आहे जो तंतोतत जुळतो. असे शब्द अनेक लोकभाषेत गवसतील. 

'झोळ' म्हणजे 'community participation ', ही आमची प्राचीन लोकपरंपरा आहे, जरी ती नागरी उच्चभ्रू लोकाना आयात केलेले कल्पना वाटली तरी. तसेच water conservation, 'जलसंधारण, ज्यासाठी प्रदेशांनुसार अनेक देशी परंपरा आहेत, आणि त्यांची रीतसर नोंदणी पण काही संस्थांनी केलीय. पण लक्षात कोण घेतो!  
'... युध्दोत्तर बेकारीमुळे शिक्षणाचा जुगार झाला आहे ...' गो. वी. (विंदा) करंदीकर (बेडूक, शब्दकोडी आणि संस्कृती, [जुलै, १९५२]  करंदीकरांचे समग्र लघुनिबंध, पॉप्युलर प्रकाशन, पृष्ट २९) 
आजचे समीकरण आहेः शिक्षण म्हणजे नोकरी, व्यवसाय किंवा धंदा करण्याचे साधन. पण हे खरे नव्हे; याची कोणही हमी देऊ शकणार नाही. शिक्षणाचा धंदा करणार्‌या पूंजीवादी भांडवलदारानी आणि त्यांच्या नोकरशाही कठपुतळ्यानी उठवलेली ही अफवा आहे.   

* * * 
टीपा: 
१.  ना. गोपाळ कृष्ण गोखले (मे ९, १८६६ - फेब्रुवारी १९, १९१५) यांनी इंग्लंडच्या प्रीव्ही कौन्सिल मध्ये १९१० साली "प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे व प्रादेशिक परिस्थितीनुसार असावे" असा ठराव ठेवला होता. ते गेल्यावर १९१८ साली बहुतेक राज्यांत ते अमलात आणले गेले.
२. पूरक माहितीसाठी पहा: 
२.१. "British Educational Policy and Growth of Modern Education";
 
शीर्षक: "मराठी भाषा, परिभाषा व पर्यायी शब्द" 
लेखक: रेमीजीयास डिसोजा | मुंबई | २०१०   
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape