March 12, 2011

आशीर्वाद (कविता) : लक्ष्मीबाई टिळक

आशीर्वाद

ये घे देतें आशीर्वचना आज तुला बाई 
धनधान्याने पूरित केतन, उणें न तुज कांहीं 

विद्येचा तूं हात धरोनी येशिल गे पुढतीं
बाळ गोजिरें घेउन बसशिल तूं अंकावरतीं 

पति सौख्याचा लाभ लाडके तुजला होईल 
नवे नवे वर परमेशाची कृपाहि वर्षेल.
[लक्ष्मीबाई टिळक, 'भरली घागर', पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, आ. १९९० पृ. ८३]

बाईंची आशीर्वाद द्यायची पात्रता कालाबाधित अन् अनन्यसाधारण आहे. कितीक अनाथ-सनाथ मुलामुलींचे संगोपन केले असेल! किती बाळंतपणें काढली असतील! हें सारें करताना जातपातधर्म भेद कधीच लोपले होते. यांची आकडेवारी ठेवायला बाई का नोंदणी केलेली सेवाभावी संस्था किंवा सरकारी खातेवही थोड्याच होत्या? तो त्यांचा सहजधर्म [vocation]* किंवा 'कारागिरी' होता; नाही व्यवसाय [profession]*; नाही धंदारोजगार [occupation]*. त्यांनी जें जें काम केलें तें तें चित्तपूर्वक केलें, यंत्रवत् नव्हे. हा कारागिरांचा सहजधर्म असतो.

लक्ष्मीबाईंचा 'आशीर्वाद' बायांना उद्देशून आहे हें विषेश! शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांची काय अवस्था होती, आणि त्यांच्या आजच्या स्थितीत काय फरक झालाय याची कल्पना 'स्मृतीचित्रे' तसेच 'भरली घागर' या पुस्तकांवरून येते.

धनधान्य, पती, संतती, परमेश यांबरोबरच लक्ष्मीबाई विद्येचा जाणीवपूर्वक औचित्यपूर्ण उल्लेख करतात; 'अष्टपुत्रा' नाही. 'धन' यात विद्याधन गृहित धरलेले नाही व पुढे येण्यास विद्येवाचून दुसरा पर्याय पण नाही; काळ व समाज दोहोंची नाडी बाईंनी अचूक ओळखलेली आहे. त्यांचे अपार परिश्रम, अनुभव, सहानुभाव,  प्रेम, करूणा या तीन कडव्यांत सामावलेले आहेत. हे आमचे सौभाग्य !

टीप: * सहजधर्म किंवा कारागिरी - vocation * ; व्यवसाय - profession*; आणि धंदारोजगार occupation* या तीन इंग्रजी शब्दांना "व्यवसाय" हा एकच शब्द बहुधा वापरला जातो. vocation या शब्दाला 'सहजधर्म' हा शब्द आनंद कुमारस्वामी यांनी वापरलेला आहे, व तो ग्राह्य वाटतो. हे तीन शब्द प्रवृत्तींत महत्वाचा फरक दाखवतात. कारागिरी किंवा सहजधर्म म्हणजेच चिंतनपूर्वक [contemplation] केलेले काम. व्यवसाय म्हणजे जबाबदारीने केलेले काम, पण आता यात "नफा-तोटा" [bottom line] व वेळापत्रक [time schedule] हे भाग महत्वाचे झालेले आहेत. धंदा-रोजगार या दोहोत जबाबदारी आणि चिंतन किती असते हे ज्याचे त्याने ठरवायचे. उदाहरण: अन्न तयार करणे यात 'बीज रुजत घालण्यापासून जेवण जेवण्यापर्यंत अनेक क्रिया व प्रक्रिया घरी-बाहेरी-बाजारी गुंतलेल्या असतात.

~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 02, 2011

स्मृतिचित्रें : लक्ष्मीबाई टिळकांची लोकबखर

 "ह्या काही काही आठवणी म्हणजे श्रुती होत."
 [लक्ष्मीबाई टिळक, 'स्मृतिचित्रे', प्र. १  : सोनेनाणे धुऊन घेतले, भाग पहिला, वाक्य पहिले, पृष्ठ १]
 
स्मृतिचित्रे | लेखिका: लक्ष्मीबाई टिळक |

(पहिली आवृत्ती : भाग १ - १५ डिसेंबर १९३४ | भाग २ - १९३५ | भाग ३ - १५ डिसेंबर १९३५ | भाग ४ - डिसेंबर १९३६ | नवी आवृत्ती: प्रकाशक: वरदा प्रकाशन, पुणे. | एकत्र चार भाग: २४ फेब्रुवारी १९८७ | दुसरी आवृत्ती: १ जानेवारी १९८९ | तिसरी आवृत्ती: १ जानेवारी १९९३ | चौथी आवृत्ती: मे २००० | किंमत: रुपये २५०=०० | पृष्टसंख्या: ४५८ ) 


वर अवतरणात दिलेल्या या पहिल्याच वाक्यांत लक्ष्मीबाईंच्या प्रज्ञेची झेप केवढी विशाल आहे याची कल्पना येते.  'आठवणी' म्हणजे 'स्मृती' - पुराणे, महाकाव्ये - किंवा 'इतिहास' म्हटले जाते, आणि 'श्रुती' अर्थातच वेद इत्यादि नाही का?  
लोक-इतिहास :  या आत्मकथेत समकालीन सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महाभारत येते. आणि गीता पानोपानी विखुरलेली आहे. टिळक व लक्ष्मीबाई दोघांनीही समाजकार्याला वाहून घेतले होते. यामुळे आत्मचरित्राला लोक-इतिहासाचे स्वरूप आलेय. त्यांपुढे कथा-कादंबरी यांची काय कथा! 
असे काहीसे सातशे कोटी व्यक्तिंच्या आयुष्यांतही घडत असावे. फक्त क्वचितच कोणी व्यक्ति त्यांचे शब्दांकन करतात. मात्र ग्रामिण व आदिवासी लोककथा-गीते यांत त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. 

'स्मृतिचित्रे' वाचताना वेळोवेळी वाटले एका अथांग विशाल सरोवराच्या काठावर मी बसलोय व पाण्यात मला माझे प्रतिबिंब दिसतेय. ते कधी स्पष्ट दिसते, तर कधी झुळुक आली किंवा शिवार गळले की तरंगांत मिसळून जाते, ऊन आले कि ते स्पष्ट दिसते. वेळोवेळी माझ्या आठवणींच्या तारा छेडल्या जातात.

या हिर्‌याला अगणीत पैलू आहेत. त्या सर्वांची समीक्षा करायची तर त्यापूर्वी अस्तव्यस्त असलेली माझी कुवत मला प्रथम एकत्र करावी लागेल व काही काळ तिची जोपासना पण करावी लागेल. यास्तव 'शिक्षण', जे क्षेत्र लक्ष्मीबाईंना व टिळकांना प्रिय होते, या एका पैलूपुरतेच मी हे लेखन मर्यादित ठेवतो. 
"मला कवितेने भंडावून सोडले. ... माझी सर्वात मोठी प्रसिद्ध झालेली मोठी कविता 'पतिपत्नी' ही ... कविता विशेषत: रात्री अंधारात सुचायची. ओळीच्या ओळी डोक्यात यायच्या. त्या मी खडूने जमिनीवर उतरून ठेवायच्या. एखादेवेळेस जवळ टांक नसला की आगपेटीची काडीच दौतीत बुडवून तंकाची भूक काडीवर मी भागवी. सकाळी  ठोंब-यांनी ही रात्रीची बिगार कागदावर नोंदवून घ्यावी. असे करता करता पावणेतीनशे ओळींची कविता तयार झाली" (प्र. ६५ : करंज्यातला मोदक, पृ. ३०५).
लक्ष्मीबाईंचा जन्म सत्तावनच्या [१८५७] बंडानंतर बारा-तेरा वर्षांनी झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय अकरा व टिळकांचे सतरा-अठरा वर्षांचे होते. बाई निरक्षर व टिळक इंग्रजी शाळेत शिकत होते.
 
हे पुस्तक बीएच्या अभ्यासाला होते असे ऐकिवात आहे. त्या पदवीधरांपैकी किती व्यक्तिना या साहित्यलक्ष्मीने सर्जनशील साहित्य लिहायला प्रेरित केले असेल? ते जाऊदे. किती साक्षर, शिक्षित, सुशिक्षित, प्रव्यवसायिक आपली साक्षरता नोकरी-व्यवसाय या व्यतिरिक्त इतर कोणत्या कामासाठी वापरत असतील? 
शिक्षण किंवा साक्षरता याविषयी दोन महत्वाची प्रात्यक्षिके या पुस्तकात नोंदवलेली आहेत. एक: कोणीही व्यक्ती कधीही साक्षर होऊ शकते. त्याकरीता सरकारमान्यता, प्रशस्ति व शाळा या इमारतीची गरज नाही. दोन : टिळकानी ऐन तारुण्यात ज्या गांवी राहिले तेथे शाळा सुरू केल्या व विद्यार्थ्यानी त्याना खुशीने मानधन दिले.
दुदैवाने सद्याचे सरकार व्यक्तिच्या व समष्टिच्या खाजगी जीवनांत ढवळाढवळ करते. सरकारने शिक्षणखात्याचा एवढा मोठा डोलारा उभा केलाय पण स्वावलंबी होण्याचे साधन व संधी मात्र देत नाही. हे सर्व कशाला? केवळ नोकरशाहीचे पोट भरायला का? गेल्या साथ वर्षांत संपूर्ण साक्षरता का आणता आली नाही? असे कैक प्रश्न उभे राहतात.  

बाईनी प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. पण त्यांची गरिबी स्वत: पत्करलेली होती. औद्योगिक संस्कृतीत बहुसंख्य जनतेवर दारिद्र्य लादले जाते. यात लोकशाही सरकारचा किती सहभाग असेल हे मोजण्यासारखे आहे.  
"... त्यांचा फार संताप होई. तेल, शिकेकाई मला कधी मिळाली नाही. ती मागायला गेले की त्यांनी म्हणावे, मोलाची दळणी दळ आणि आण तेल, शिकेकाई" (प्र.८ : सासुरवास, पृ. ३८).
तरीही बाईंची जीवनोर्मी कमालीची होती. निरक्षर असल्या तरी सृजनशक्ती या आत्मचरित्रात व कवितांत दिसून येते. गावागावातून असंख्य निरक्षर बायांनी अगणित ओव्या लिहिलेल्या नसल्या तरी गायलेल्या आहेत. अन त्या पिढ्यान पिढ्या चालत आल्यात. 
"लिहिता-वाचता त्या वेळेस तर अगदीच येत नसे. आणि अजूनही अगदी बेतापुरते. अजून ड व ढ, क्ष व ज्ञ, कै व खै ही अक्षरे आली, की मी गडबडून जाते ... पण मी म्हणजे अशिक्षितांतील अशिक्षित." (प्र. १३ : सोळा वर्षांची झाली तरी - पृ. ६०). 
निरंतर शिक्षण : मुलभूत शिक्षण म्हणजे मुळाक्षरे व बाराखडी आल्यावर बाई स्वत:च आपल्या शिक्षक झाल्या. मग त्यांची गाडी कुठेही थांबली नाही.
"... त्यांना आपली चूक कळून आली व त्यांनी मला अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे वळवण्यास दिली. ती झाल्यावर क ची बाराखडी करून घेतली. पण हे शिक्षण देत बसण्यात त्यांना काहीच गंमत वाटेना; व माझे शिक्षण तेथेच आटोपले ! मात्र यापुढे माझे वाचन पुष्कळ वाढले व त्या वाचनातच बाकीच्या बाराखड्या व जोडाक्षरे वगैरे मला आपोआपच आली" (प्र. १४ : टिळकांचा धंदा : माझे शिक्षण पृ. ६५-६६).
मुलभूत शिक्षण म्हणजे मुळाक्षरे व बाराखडी आल्यावर बाई स्वत:च आपल्या शिक्षक झाल्या. मग त्यांची गाडी कुठेही थांबली नाही. निरक्षर जनता व निरक्षर लोकभाषा यांना "लिपीची" कमतरता आहे. तेवढे पण या सरकारला साठ वर्षांत शक्य झाले नाही?
भटकंती:  टिळक व लक्ष्मीबाई किती गावांत व शहरांत राहिले असतील याची जंत्रीच तयार करावी लागेल. "केल्याने देशाटन" मिळणारे शिक्षण व शहाणपण याला स्पर्धा करणारे विश्वविद्यालय अजून अस्तित्वात आलेले नाही. म्हणूनच की काय या देशात कुंभ - महाकुंभ आणि जत्रा - उत्सव - तीर्थयात्रा या प्रथा दृष्ट्या लोकांनी सुरु केल्या असाव्या.
"आमचे बिर्‌हाड कोठूनही हलले की ते बिर्‌हाड म्हणजे आम्ही माणसेच तेवढी हलत असू. सामानसुमान तिथल्या तिथे शेजार्‌यापाजर्‌यांना अर्पण करण्यात येत असे" (प्र.१२ : पहिला मुलगा, पृ. ५५). 
या पतीपत्नीला मदत करणारे पण अनेक लोक होते, पण ते त्यांनी केलेल्या लोकसेवेचे उतराई होण्यासाठी. या दोघांनीही कधीच संग्रह केला नाही हे विशेष. 
"काय खुंटावरचा कावळा पाहून दिला !" ... ... "तो करीत जाईल गाणी, आणि तू म्हणत जा. मागा दोघे जण भीक" (प्र. 7: माहेराहून सासरी, पृ. ३२).
"टिळकांनी आपली ध्येये ठरवावी. मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्यात मी त्या गाव्यात. त्यांनी भिक मागावी व मी त्याचं झोळी धरून चालावे" (प्र. ८३: मुंबई, पृ. ४००).
आजचे सार्वजनिक शिक्षण : निरक्षर किंवा अशिक्षित व्यक्ति अडाणी असतेच असं नाही, कारण तिचा अहर्निश प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी संबंध येतो. ग्रामिण जनता गेली कांही दशके केंद्र व राज्य स्थरावर होणार्‌या निवडणुकात कोणत्याही पक्षाला बहुमत देत नाहीय. म्हणून सत्तेसाठी सतरा पक्षांची कडबोळी करावी लागतायत. एवढं एक उदाहरण पुरे. सुशिक्षित माणसं शहाणी असतील असे नाही, कारण त्याना विशिष्ट शाखेचे ज्ञान असते व चाकोरीत विचार करायची संवय लागलेली असते; त्याना पांडित्याचे शब्दप्रामाण्य चालते, किंबहुना हवे असते. 

पुस्तक प्रकाशन :  पौगंडावस्थेत असताना मी प्रथम आवृत्तीतील एक भाग वाचला होता. आता मी वाचत असलेली आवृत्ती सन २००० ची आहे. आणि ही संपादित आहे हे पहिल्या नजरेत लक्षात येते. पण हे नमूद केलेले नाही. हे संपादन महाराष्ट्र सरकारच्या 'शुध्दलेखन नियमावली'नुसार केलेले असावे. त्यामुळे वाचण्याची मजा किरकिरी होते. खरं म्हणजे असं करणे अनुचित आहे. पुस्तकातील शब्दभांडार विशेष आहे, व त्यातील किती शब्दकोशांत सापडतील याची शंका आहे. टिळकांची व बाईंची संक्षिप्त जीवनरेखा दिली असती तर वावगे झाले नसते. भविष्यात कधीतरी या पुस्तकाला संदर्भसूची जोडली जाईल अशी आशा करूया. 


पहिला नीतिपाठ सरकारला : महाराष्ट्र राज्यात ग्राम-तालुका-जिल्हा पंचायती, नगर - महानगरपालिका  विधानसभा व लोकसभा या निवडणुकांसाठी उभे राहणार्‌या सर्व उमेदवारांकरिता महत्वाची अट:
लोकशाही सरकार जनतेच्या बांधिलकीला बद्ध असायला हवे, जनता सरकारला नव्हे. माणसे कायद्यासाठी नसतात. 'मायबाप' सरकार हा काळ कधीच गेला! जणू हाच पाठ सरकारला द्यायला 'स्मृतिचित्रे' अवतरले असावे. या आत्मचरित्रात 'पुराणांतली वांगी' नाहीत. हा लोकइतिहास आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते लोकसभा या अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. यांत अनेक उमेदवार भाग घेतात. त्यांची शैक्षणिक पात्रता काहिही असो. त्यांच्या जाहिरनाम्यांतील आश्वासने काहिही असोत. या सर्वांना हे पुस्तक परिक्षण करण्यास देण्यात यावे. परीक्षण कमीत कमी ३०० शब्दांचे असावे. त्यांनी केलेल्या परीक्षणाच्या नकला त्या त्या मतदारसंघांत मतदानापूर्वी मतदारांना वाटाव्या. तेच त्यांचे खरे परिक्षक समजा. 

[शिक्षणावर माझे दोन पुन:शोधीत लेख पहा: 
1. Politics of Literacy in India: Challenges of 21st Century 
 या इंग्रजी लेखांत सरकारच्या धोरणांचे पितळ उघडे केलेलं आहे.]

आतापावेतो लिहिलेले इतिहास फिरंग्यांच्या पाठ्यपुस्तकांचा नमुना समोर ठेवून लिहिले. त्यात राजे-नबाब, त्यांच्या लढाया - कारस्थाने - लोक संहार यांवरच सारा भर असायचा. लोकांचा इतिहास कोण लिहिणार? राणी लक्ष्मीबाईवर किती चित्रपट - टीवी मालिका काढल्या असतील! देवदास कितीकदा चित्रित केला असेल! पण या साहित्यलक्ष्मीत चटकदार सनसनाटी सेक्सी काहीच नाही! पण पाऊणशे वर्षांपूर्वी घडलेली ही कहाणी लोक माध्यमातून कधी कोणी आणील का? 
----
रेमीजीयस डिसोजा
मुंबई 
महाशिवरात्र  २-३-२०११ 
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

March 01, 2011

कविता जेव्हा लघुनिबंध होई

कविता जेव्हा लघुनिबंध होई
व निबंध जेव्हा महाकाव्य होई
साकारते रेमीची गावठी बोली 

गावें, गल्ल्याबोळ, रानमाळ, नागरी अरण्ये — जाती, जमाती, अनिर्बंध आधुनिक नागरी समाज —  भटकता भटकता रेमीच्या भाषेने अभिजात साहित्य कधी मागे सोडले समजलेच नाही. आणि रेमीचे लेखन — छंद, मात्रा, लय, ताल, अलंकार, विशेषणे इ. — नियमांच्या दावणीतून मोकळे झाले.

~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 10, 2011

कातळावरची कविता

कातळावरची कविता  
कातळावरची कविता  - रेमीजीयस डिसोजा - मुंबई  
वार्‌याने बीज उडाले  
कातळावर पडले  
पाणी कोसळले  
वानस उगवले. 
मुंबई : ०१ .०२ .२०११

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 03, 2011

इंडिया, भारत की गोंडवन?

इंडिया, भारत, हिंदुस्तान, आर्यावर्त, तामिलनाडू की गोंडवन ?
Image 1: Bhill children at Holi festival in Satpuda Ranges, Gujarat
इंडियातील आदिवासी धनुर्धर आजमीतीपर्यंत 
आपल्या अंगठ्याचा वापर करीत नाहीत. 
हे एकलव्याचे जिवंत स्मारक आहे म्हणा, किंवा अलिखित इतिहास म्हणा.

स्वातंत्र्यानंतर देशाचे नांव काय असावे यावर वाद किंवा चर्चा झाली होती असे कधीतरी वाचनात आले होते. आता एवढेच आठवते. तपशील आठवत नाही. त्या चर्चेत अपघाताने पण 'गोंडवन' असणे शक्यच नव्हते. पण एक लक्षात आले: कोणीही आपापल्या सोईप्रमाणे, प्रसंगानुरूप इंडिया, भारत किंवा हिंदुस्तान कोणत्याही नांवाचा उपयोग करतात.

पण देशातील सूज्ञ नागरिक, पुढारी, इतिहासतज्ञ, विद्वान मंडळीने 'इंडिया' व 'भारत' अशी दोन नांवे का घ्यावी? यातला तर्क, शहाणपण, व्यवहार, भावना, निकष काय असतील हे माझ्या अल्पमतीस कधीही न सुटणारे एक कोडेच आहे. किंवा त्यांच्यापुढे काय पर्याय होते हे पण मला नाही. ही माहिती असेल सरकारी दप्तरी कुठेतरी पिचत कड्याकुलुपात!

इंडिया हा 'हिंद' या फारसी शब्दाचा अपभ्रंश असावा. 'सिंधू' नदीच्या नांवावरून 'हिंदू' हा फारसी शब्द आला. तसेच 'इंडिया' शब्दाचे 'भारत' हे भाषांतर नव्हे. पण ते जाऊदे. प्रश्न असा कि दोन नांवे का? हे लक्षण द्विधा मनस्थितीचे की दुटप्पी धोरणाचे की न्यूनगंडाचे? 

शेजारचा छोटा देश श्रीलंकापण ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होता. पण 'सिलोन' हे नांव बाजूला सारायला त्याना काहीच अडचण आली नाही. 'पूर्व बंगाल'ने 'पूर्व पाकिस्तान' बाजूला सारले व 'बांगलादेश' ही ओळख शाबूत ठेवली.

मग आमचें घोडें कोठे अडलें? खरं पाहता आम्हाला इतरांच्या, विशेषतः गोर्‌यांच्या प्रशस्तिपत्रांची व मान्यतेची फार गरज व हौस असते. आणि नांवांची (व्यक्तिपुजेची), नांवे बदलायची व नांवे ठेवायची पण!

मात्र 'इंडिया' हें नांव आमच्या राजकीय व बौध्दिक गुलामगिरीचे स्मारक म्हणून चालू ठेवले असावे. स्वातंत्र्यानंतर नजरेस पडणारे विदेशी आयात मालाचे आम्ही करीत असलेले लांगूलचालन पाहिले तर हें शक्य आहे. काय करणार? इतिहासावर आमचे फारच प्रेम!

भाषाशास्त्रावर एक मराठी पुस्तक चाळत होतो. मराठी आर्यभाषा आहे  व संस्कृत - प्राकृत - मराठी या क्रमाने मराठीची उत्क्रांती झाली असा त्याचा रोख होता. (मला वाटते या गृहीत प्रमेयावर हे पुस्तक आधारलेले असावे.)
Social and Cultural sub-groups in India
नकाशा-१ इंडियातील  सांस्कृतिक विविधता
पण आर्य येण्यापूर्वीं या देशात भाषा नव्हत्या का? इतर संस्कृती व समाज नव्हते का? यांचा उल्लेख नाही. हे पुस्तक मराठी भाषाशास्त्रावर असल्याने त्याला सहाजिक मर्यादा आहेत. तरीही हा अनुल्लेख खटकला.

तसेच काहीसे आपल्या देशाचे नांव ठरवताना झाले असावे! या संदर्भांत देशाच्या इतिहास, भूगोल, समाज, संस्कृती इत्यादींच्या वैविध्याचे भान राहिले नसावे असे वाटते. सारें चित्त भावनातिरेकाने आर्य संस्कृतीभोवती फिरत राहिले असणार!

देशाचे नामकरण: वस्तूनिष्ठापूर्वक हाताळायचा हा विषय. मुळात सर्व देशातील विस्कळीत राज्यांना व प्रदेशांना इंग्रजांनी एकत्र आणून 'राष्ट्रा'चा आकार दिला. (पुरातत्वशास्त्र आणि मानववंशशास्त्र या वेळेपावेतो नांवारूपास आलीं होतीं हे पण ध्यानात घ्यायला हवे.) 
नकाशा २ : वैदिक कालीन भारत (लेखक माहित नाही)
विंध्याच्या उत्तरेस असलेल्या भागास फारसी भाषेने "हिंदुस्तान" हे नांव दिले. 
"हिंदू" हा शब्दच मुळी फारसी आहे.

सिंधू नदीच्या परीसरात सिंधू संस्कृती (Indus Civilization) 3000 इ. स. पूर्वी होती. ती संस्कृती गेली, पण माणसे राहिली. महान साम्राज्ये / संस्कृती लोप पावतात, पण सामान्य माणसे राहतात. इतिहासाचा हा साधा धडा आहे. नाहीतरी आज आर्य  व वैदिक संस्कृती आहेत कुठे? आज जे काही दिसतेय ते केवळ विडंबन असावे?

आर्य येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती, द्रविड संस्कृती, व त्यांच्याही फार पूर्वीपासून आदिवासी जमाती [aborigine communities] होत्या. त्यांना भाषा व संस्कृती होत्या अन आजही आहेत.

खरं पाहता मानव [Homo Sapiens] अस्तित्वात आल्यापासूनच त्याला भाषा व संस्कृती या देणग्या सृष्टीने दिलेल्या आहेत. आणि स्थळ-काळ-पर्यावरण परिस्थितीनुसार आपल्या राहाणीत बदल वा परिवर्तन करण्याची त्याला अक्कलपण दिलेली आहे.

जगातील सर्व आदिवासींची जीवन प्रवृत्ती निसर्ग-संवादी आहे. रूढ शब्दांत सांगायचे तर हजारो वर्षें ध्यानीं-मनीं-अंगीं-अंतरीं भिनलेली ही धार्मिकता [religiousness] आहे, सहजधर्म आहे; नागरी समाजांना अभिप्रेत असलेला धर्म नव्हे.

यामुळे नागरतेने [civilized societies] वेळोवेळी अनेक प्रकारे केलेल्या उच्छादांतूनही आदिवासी आजतगायत टिकून आहेत. निसर्गनिवासी आदिवासी प्राग्-ऐतहासिक जमान्यात राहात नाहीत. पण त्यांची काळाच्या परिक्षेत तावून सुखालून उतरलेली असामान्य जीवनप्रेरणा [जीवन-शैली नव्हे] अटळ आहे.

पण आदिवासींचा निसर्गनिवासी परिसर, व त्याचे पर्यावरण हिरावून घेणे किँवा त्यांचा विनाश करणे म्हणजे आदिवासींना जीवे मारणे; त्यांचा खून करणे एवढाच त्याचा अर्थ होतो.

रूढ कायद्याने हे मान्य असेलही पण 'न्याय्य' नाही. नागरी जीवनशैली त्याच्यावर लादणे हा अन्याय आहे, अधर्म आहे, धार्मिक अत्याचार आहे.

सृष्टीच्या नियमांत, नागरी संस्कृतींच्या सनातनवादी धेंडाना जागा नाही. किंबहुना मानवाने निर्माण केलेल्या उच्च-नीच इ. अधिश्रेणीना पण कांहिही स्थान नाही. अशा संस्कृती भूतकाळात जमा होतात. इतिहास याला साक्षी आहे.

इतिहासकारांनी लिहिलेल्या इतिहासाला अनेक वस्तूनिष्ठ व व्यक्तीनिष्ठ मर्यादा असतात. तत्कालीन कार्य-कारण, साध्य-साधन यांच्या अवशिष्ठ परिणामांनी इतिहास आपल्यासमोर सतत साक्षात उभा असतो. तो निस्पृहपणे वाचायची हिंमत आणि क्षमता हवी.

भूशास्त्रिय कालात [geological time] पृथ्वीवर सतत उलथापालथ होत असते. पण ती दृष्टीस पडतेच असं नाही. पृथ्वीच्या इतिहासात जमिनीचा एक अधिभूखंड [super-continent] सुटा झाला आणि त्याचे पांच भूखंड होऊन पसरत गेले. हेच आजचे दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया. इंडिया. आफ्रिका व अंटार्कटिका होत. परंतु अधिभूखंडात असलेली इंडिया आजची नव्हती. ती होती दक्षिणेचा तिकोनी भाग - दख्खनचे पठार. त्यावेळी उत्तर इंडिया व हिमालय अस्तित्वात नव्हते.
Gondawana in History of Earth (Source: scotese.com) 
नकाशा ३
Eduart Suess, [1831-1914] या ऑस्ट्रियन भूशास्त्राज्ञाने या महाभूखंडाची सिध्दांत-कल्पना मांडली होती व त्याला 'गोंडवनलँन्ड' - Gondwanaland - हे नाव दिले [इ. स. 1861].
 
गोंडवन मध्य भारतात आहे. येथे गोंड आदिवासी जमाती हजारों वर्षांपासून राहतात. अजूनही येथे घनदाट जंगल आहे. एडवर्डचे हितसंबंध इंडिया, गोंडवन किंवा गोंड आदिवासी यापैकी कशातही गुंतलेले नव्हते. तो तर जगाचा नागरिक होता.
गोंडवनाचे मध्य भारतात/इंडियात  स्थळ
नकाशा ४

Map of Central Provinces (1903 AD) shows Gondwana
नकाशा ५: या नकाशात इंग्रजानी "गोंडवन" दाखवले आहे. 
परंतु इंडियाच्या आत्ताच्या नकाशात मात्र हा एकमेवाद्वितीय प्रदेश दाखवलेला नाही किंवा त्या नावाचा उल्लेखपण केलेला नाही. एवढं कारण इंडियाचे आजचे राजकरते किती कोत्या बुध्दीचे व वंशवादी (racist) आहेत हे दाखवायला पुरेसे नाही का?

एका बाजूला निधर्मी राज्याची ग्वाही देत असता, आधुनिक इंडियाने किंवा 'प्रथम जगत इंडियाने' आर्य वंशवादाचा वारसा कसा चालू ठेवला आहे त्याचा हा एक मासला! सर्व आदिवासी जगताला - चतुर्थ जगत इंडियाला - अनुल्लेखाने मारले.

इंडियाच्या घटनेत हे शब्द आहेत, ‘India that is Bharat'. आतापर्यंत घटनेत चौर्‌याण्णव वेळां दुरूस्त्या केल्या. आणखी एक केली तर फार होणार नाही. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी केलेल्या 'Land Acquisition Act' या जुलमी कायद्यात मात्र आतापर्यंत जेमतेम दहा वेळां दुरुस्त्या झाल्या. आता हा कायदा नव्याने लिहितायत असे ऐकिवात आहे.

भारतीय गणराज्याची साठी उलटली. बरं आहे. सुप्रीम कोर्टाला तरी, उशिराने का होईना, जाग आली. तारिख १२ जानेवारी २०११ रोजी मध्यवर्ती न्यायालयाने दिलेल्या निकालात आदिवासींच्या संदर्भात पहिला व महत्वाचा निर्णायक टप्पा गाठला.(संदर्भाचा दुवा पाहा:India, largely a country of immigrants says Supreme Court of India)

हे झाले 'न्याय देणार्‌या सरकारचे' काम. आता राहिले 'कायदे करणार्‌या सरकारचे' आणि 'अंमलबजावणी करणार्‌या सरकारचे' काम. हे अधिक कठिण आहे.

मानसिक अवरोधाचा [mind block] अडसर दूर करणे, मोडणे सोपे नसते. भूखंडाच्या सीमा बदलतात; नद्यांची पात्रे बदलतात; सागराचे किनारे सरकतात; सपाट जमिनीच्या जागी पर्वत येतात; देशांच्या सीमा बदलतात. बलाढ्य सोविएट देशाची शकले होतात. नांवात काय आहे? 

नांवांपासूनच स्वतंत्र इंडिया/भारत देश ऐतहासिक चुका करीत आला. या चुकांची दुरूस्ती करायलाच हवी. म्हणजे पुढे करू घातलेल्या / पुढे होणार्‌या चुका टाळता येतील. याचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर दूरगामी परिणाम होतीलच - जसे सनातन्यांचे विरोध, व विचाराना नवी दिशा - आणि या देशाचा सन्मान हिमालयाप्रमाणे उंचावेल! [29] एडवर्डने "गोंडवन" या गोंडस व यथार्थ नावाने दिडशे वर्षांपूर्वीच या महान देशाच्या नावाचे सूतोवाच केलेय. फक्त एका घटनादुरूस्तीचा शिक्का मारायचा एवढेच काम राहिलेय!

येथून पुढे भौतिक व नैतिक चुकांच्या दुरुस्तीची मालिका सुरू होते. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व्यापारशास्त्र व इतर विषयांवर, थोरांसाठी व लहानांसाठी, नवी पाठ्यपुस्तके लिहिणे आलेच. देशातील कोट्यवधी सुशिक्षित व साक्षर-निरक्षर बेकाराना काम-रोजगार मिळेल. देशातील शेकडो भाषांना फुलाफळांचा बहर येइल. अंतराळात अवकाशयान पाठवण्यापेक्षा हे काम जास्त "गरजेचे" व "कमी खर्चाचे" आहे.

'कमळ' हे राष्ट्रिय फूल! ते खरोखरच सहस्र पाकळ्या धारण करील. मग त्यावर सत्यार्थाने सरस्वती विराजेल. आता जो वानसांचा व वनांचा विनाश होतोय त्याला थोडाफार आळा बसेल; वनवासींना अन किसानाना फक्त बोलाचे नव्हे तर खरोखरीचे "सुजलाम सुफलाम" दिवस बघायला गवसतील अशी अशा करुया!


टीप: वर दिलेले नकाशे इंटरनेट वरून घेतलेले आहेत. नकाशा -१  "सेमिनार" (नवी दिल्ली) या मासिकाच्या मुखापृष्टावरून नक्कल केलेला आहे. आदिवासी मुलांचा फोटो लेखकाने चाळीस वर्षांपूर्वी काढला होता.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape