February 28, 2010

होळी - एक शब्द रेखा, रेमी - एक स्व-चित्र रेखा

'ओक्टोसचे जाल', रेमीची स्व-प्रतिमा


होळी (वृक्षपूजेचा एक प्रकार. तो आदिम जमातीपासून चालत आलेला, नंतर नागरी समाजाने अनेक प्रकारे अंगीकारला.)

रेमीने स्वदेशी अनेक वर्षे केलेली, काही लक्ष मैलांची भटकंती, तथाकथित अद्यावत समाजांपासून ते आदिम जमातींचे दर्शन यानी वरील तथाकथित कला व खालील तथाकथित कविता साकारली. जरी वेगवेगळ्या दिवशी रेखाटलेली असली तरी एकाच जीवनरेखेने बांधलेली आहेत.
हर्षदा विनया या ब्लॉग लेखिकेने एकदा रेमीची चार स्व-व्यक्ति चित्रे (उजव्या बाजूच्या स्तंभात) पाहून (टीपेत) आश्चर्य व्यक्त केले होते त्याचा हा खुलासा।

आरशात दिसणारा रेमी किंवा छायाचित्रात टिपलेला रेमी, दोन्ही "मायावी वास्तवता", जसे "झाड" हा शब्द किंवा झाडाचे चित्र. वास्तवता (reality), मायावी वास्तवता (virtual reality) किंवा कलेतील अतिवास्तवता (surreality) समजायला आपापली बोधना (perception) वापरत असतो. तीच वस्तुस्थिती होळीची!

होळीत वानस जाळले जाते. माझ्यापुरता याचा अन्वय असा: वानसे आपल्या जीवनाला आधार - अन्न, निवारा, वस्त्र, ओषधी व अनेक जीवनोपयोगी साधने देतात. वानस सर्वप्रिय आहे. या आहुतीतून त्यांचे पुनरुज्जीवन - पुनरुत्थान होणार असते. बीज उनात भाजले जाते - मृत्यु पावते - त्यातून झाड उगवते. जसे गणेश विसर्जन - दुर्गा विसर्जन तसाच हा वानसाचा यज्ञ.

* * *

होळी!
इथे रात्रंदिवस रोजच होळीचा उत्सव चाललेला असतो!
अनेक होळ्या पेटतात इथे:
मानवी ऊर्जेची होळी;
नैसर्गिक साधनसंपत्तीची होळी;
पैशाअड़क्याची होळी;
वैयक्तिक - सामाजिक स्वास्थ्याची होळी;
लोकशाही हक्कांची जबाबदारीची होळी...

या आधुनिक होळीला म्हणा आता वणवा!
ऊर्जेच्या होळी बरोबर होते
पाण्याची होळी; भूईची होळी;
जंगलांची होळी; जीव जंतूची होळी;
पर्यावरणाची - वातावरणाची होळी;
पारिस्थितिकिची होळी;
या होळीत तू अन् मी असतो संतत
कार्यरत... तडफडत चाचपड़त...
उत्तराच्या शोधात.

मग तू अन् मी बोलावतो
ही होळी थांबवण्यास
जागतिक दादा लोकांची
जागतिक परिषद.

तेथेही जागतिक दादागिरी देते
आधुनिक शास्त्रोक्त उपचार;
त्यांचे आधुनिक तंत्र - मंत्र - विधी
जे करिती साह्य पेटवण्यास हा वणवा,
लावते होतात आणिकच हातभार.

आधुनिक विज्ञ्यानाचा आधुनिक विश्वामित्र
देतो आश्वासन राजकर्त्याना त्यांच्यासाठी
प्रतिविश्व - नवा कल्पलोक,
नि हा महत्वाकांक्षी आधुनिक त्रिशंकू
लटकत राहतो अधांतरी...

त्यात तू पण, अन् मीही सामील.
होळी! या होळीला म्हणा आता वणवा!!

* * *
(रोम - रोमन साम्राज्याची राजधानी - जळत असताना सम्राट नीरो फिडल वाजवत बसला होता असे सांगतात. ही गोष्ट प्रसिध्द आहे. पण आजही त्याची पुनरावृत्ती होते!)
 अधिक वाचाहोळी 


रेमीजीयस डिसोजा
होळी पौर्णिमा २०१०
मुंबई

~~~~~~
© Remigius de Souza। All rights reserved।
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment