Showing posts with label Image. Show all posts
Showing posts with label Image. Show all posts

December 31, 2011

जागतिक महायुद्धे नादाविना

आय-टेक्नोमॅन, रेमीची स्व-प्रतिमा
अहंकार उर्मट उच्च-तंत्रज्ञाचा
झडपा लेवून, हिमालयाएवढ्या उंचीचा
निर्मीतो कॉम्प्यूटर, उपग्रह, महानगर
अन् करी कायमची भगदाडे खोलवर,
उल्कांहूनही, धरतरीच्या उरावर :
जागतिक
महायुद्धे नादाविना.
* * *
(मधुकोष गोंडवनी या ब्लॉगवर प्रसिद्द केलेल्या मूळ "WORLD WARS WITHOUT BANG" इंग्रजी कवितेचा अनुवाद)
रेमीजीयस डिसोजा | मुंबई | २८-१२-२०११

कांही इंग्रजी दुवे - १. Missed Target of 9/11, २. iTECHNOMAN
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

November 15, 2011

रेमीची मुक्ताफळे-१५


॥ सृष्टीयोग ॥
 सृष्टीने दिलेल्या या जीवनाचा मी केवळ परिरक्षक, आणि शारीरिक व मानसिक शक्तिंचा विश्वस्त आहे. वांट्याला आलेल्या या एका आयुष्याचे सार्थक मीच करायचे.


~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.

September 24, 2011

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिस

सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र  
ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन्‌ मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!

मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, भारावलो. सारी दुपार तेथेच काढली. संकुलात सभोवार भटकलो. कधी झाडांच्या सावलीत ताणून दिली. आणि आठवणीसाठी त्याचा एक आराखडा रेखाटला. जवळ कॅमेरा होता, पण एकही फोटो टिपला नाही. सारा वेळ तेथील शांत शीतळ वातावरणाचा सर्व संवेदना एकवटून आस्वाद घेत राहिलो.

सोलापूर, विजापूर जिल्हे कमी – २५ ते ३० ईंच – पावसाचे, उष्ण-कोरड्या हवामानाचे. अर्थात येथे पाण्याची कमतरता! आणि इथे पाहातो तर पारंपरिक वास्तुशिल्पाने ओयासिस निर्माण केले होते.

आजच्या सुधारलेल्या युगात पर्यावरणाचा बराच गवगवा होतोय. पण व्यवहारात मात्र उलटेच होत असलेले दिसते.

शहरांत इमारतींची उंची वाढत जातेय तर खेडोपाडीं पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढतेय. कोंकणात १००-१२०  इंच पाऊस पडतो पण जमिनीतील पाणी १५० मात्र फूटाहून खाली गेलेय. मुंबई महानगरात पाण्याची कशी वाताहात होतेय विचारू नका!

वास्तू-महाविद्यालयात भारतीय वास्तूशिल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या मंदिराचा उल्लेख कधी आला नाही. अर्थात ती पुस्तके परदेशी विद्वानांनी लिहिली होती.

या वास्तू-इतिहासाचा अभ्यास करताना (शिकवताना व शिकताना) समकालीन नैसर्गिक, तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक पर्यावरणाचा विचार कधी शिवलाच नाही. केवळ सौंदर्यशास्त्राच्या रूढ संकेतांचा रट्टा मारणे चालत असे.

मूलतः वास्तू व पर्यावरण यांचा घनिष्ट संबंध आहे. किबहुना पर्यावरणात बदल करणे हा वास्तूचा मूल उद्देश आहे, मग ती झोपडी असो की प्रासाद असो, शेती असो वा उपवन असो, विहीर असो वा तलाव असो (हे सर्व वास्तशिल्पाचे प्रकार). पर्यायाने वास्तू पारिस्थितिकीत पण बदल करते आणि ऊर्जेचा व्यय पण करते.*

जेथे जळ आले तेथे जीवन आले, तेथे जलचर आले, तेथे वानसे आली, तेथे वनचर आले, त्याने समृद्धी आली.

उजाड फतेपूर सिक्री : ही वास्तू मोगल बादशहा अकबराने आपल्या नव्या राजधानीसाठी बांधली. हे सर्वश्रूत आहे. तेथे खास तानसेनसाठी एक छोटा कृत्रिम तलाव बांधलेला आहे व मध्यभागी गाण्यासाठी बैठक आहे.

अकबराने सर्व लवाजमा घेऊन त्याच्या नव्याकोर्‌या राजधानीत स्थलांतर केले. पण काही दिवसांनंतर तो आपला बाडबिस्तरा घेऊन परत मागे गेला. कारण तेथे पाणी पुरवठा नव्हता. मुंबईची पण अशी अवस्था व्हायला फार काळ जाणार नाही!

उजाड पडलेली फतेपूर सिक्री 'वास्तूशिल्पा' चे एक वस्तूसंग्रहालय musium होऊन राहिली.

सिद्धेश्वर मंदिराची वास्तू निवांतपणे पाहिली. मंदिराच्या चारी बाजूंना सिद्धेश्वर तलावाचे पाणी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नियोजन व संधारण यांचे हे अनन्यसाधारण जीवंत - जागृत - उदाहरण आहे! अशा इतरत्र अनेक विहिरी, तलाव, मंदिरे, मशिदी, राजवाडे, गांवे, किल्ले, उपवने, शेतीवाड्या इ. वास्तू सर्व भारतभर आहेत. प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय! पण यासम ही! एक सुजलाम सुफलाम वास्तू!

अशा पारंपरिक वास्तू लोकशिक्षणाची लोकाभिमुख साधने असतात असा माझा निष्कर्ष आहे आणि श्रद्धा पण! जो शिकला नाही तो करंटा. येथे प्रात्यक्षिकाने, उदाहरण देऊन व्यावहारिक पाठ दिले जातात असे मला प्रांजळपणे वाटते. याला देव पावले म्हणायचे नाही का?

माणसे ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत लक्षावधी वर्षें चित्रविचित्र नैसर्गिक परिस्थितीत राहात आले.

सृष्टी मानव समाजाना ओळखत नाही – मग तो समाज आपल्या कल्पनेप्रमाणे मागासलेला असो वा पुढारलेला. सृष्टी मानवाच्या सामाजिक अधिश्रेणी वा हुद्दे ओळखत नाही, मग ते सम्राट-पंतप्रधान, संत-महंत वा काळे-गोरे-पिवळे-ब्राऊन असोत. सृष्टीच्या लेखी जीवाणू व मानव यांत काहीच फरक नाही.

ती सर्वांचा भार वाहण्यास समर्थ आहे. सृष्टीचे अलिखित नियम जाणून त्यानुसार वागले तर दुसऱ्याचा भार उचलायची गरज राहणार नाही; खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल. मात्र उद्दाम उर्मट माणूस समाजातील आपल्या सत्तेच्या जोरावर हे विसरतो.

इथून पुढची माझी यात्रा विजापूर, ऐहोळी, पडत्कल (इंग्रजी अपभ्रंश - Pattadakal), बदामी - लेणी व गांव; नंतर बागलकोट - बेळगांव मार्गें माझ्या घरी कोंकणात. मायला माझा अवतार पाहून रडूं कोसळले. दहा दिवसांत माझे दहा किलो वजन घातले होते.

मग आठवडाभर घरी असताना रोज सकाळी सड्यावर लक्या धनगराच्या वाड्यावर जायचे, अनशापोटी शेळीचे धारोष्ण दुध ग्लास भरून प्यायचे हा माझा रोजचा क्रम. आठवड्याभरात माझ्या गालांवर गुलाबी आली.

आयुष्यभर केलेले भटकणे केवळ यात्रा होत्या, प्रवास (tours) नव्हते, की कधी प्रवासवर्णने लिहिली नाहीत. उद्धेश केवळ अध्ययन. वर लिहिलेले प्रवासवर्णन नव्हे. मी काय शिकलो त्याची केवळ नोंद आहे.

टीप: घर आणि परिसर – झोपडी, प्रासाद, शेतीवाडी, उपवन, तलाव, विहीर, इ. सर्वांचा – वास्तूमध्ये समावेश होतो.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 03, 2011

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

॥ कर्मसन्याशाची जलसमाधी ॥

किरिस्तावांची दफनभूमी (फोटो : रेमी डिसोजा)
आजच्या सुधारलेल्या नागर समाजात जगणे  तर  महागले, त्याहूनही मरण महागले. 
नैसर्गिक जगणे व  नैसर्गिक मरणही आता दुरापास्त झाले.
 १
त्याच्या तर्काच्या अंती होतसे  काम-लोप
ना ऊर्जा-विनियोग ना श्रम,
जे गेले त्याच्यामागे  नाही जाणे
नाही अनुताप जरी,
वा जे न परते कदापि
वातावरणात अशा,
असो वैरभावी वा उभयभावी
स्वाभाविक वर्तन परी
जेव्हा तन अणि मन
अन आत्मा असती सुसंवादी
२
अंतर्यामी अंतरीक्ष स्वायत्त
नसे अचेतन जड वस्तू
नसे गुलाम ना राहे अलिप्त
बाह्य जगतापासून
असे तेथे निर्भय जावानल
कदापि विझवता न येणारा
क्षूद्र यकच्र्छित सांघिक वेडांना,
जीं येती लाटामागून लाटानी
ज्या उंचावती, कोसळती नी नाहीशा होती.
स्वेच्छेचे निर्वाण अंतर्ज्योतीचे

मीलन योजिले जीवनदात्या जळीं.

मुंबई
(मूळ इंग्रजीचे (Non-action Action) भाषांतर)
* * *
टीप १ : एक कल्पनाविलास
आभाळाचा टिचभर तुकडा त्याला होता पुरेसा जगायला, ज्यावर नाही कुणाची सत्ता. जन्मतः होती त्याच्या पायांवर भिंगरी. ती त्याला घेऊन फिरली जन्मभर घरवाडी बकोटीला मारून गांवोगांव, विंचवाचे बिर्‌हाड पाठीवर म्हणतात तसे; असा होता एक दरवेश!
त्याने कधीं  नाही केला संग्रह, नाही ठेवल्या आकांक्षा, अपेक्षा, ना ध्येय, ना लक्ष्य. या गोष्टी जीवनाने त्याला कधी सांगितल्याच नव्हत्या. ती सारी गणिते होती नागरी सत्तेने मांडलेली आणि सत्तेच्या भक्तांची व गुलामांची. ती गणिते होती नागरी संस्कृतिने जन्मास घातलेल्या सत्तेच्या दुष्टचक्रात जे अडकले त्यांनी निर्माण केलेली.
सत्तेच्या या चक्राने नैसर्गिक जगणे व मरणे माणसाला दुरापास्त करून ठेवले. यातूनही त्याने मार्ग काढला.
सर्वांत सहज असा मार्ग : मरणोत्तर नाही जाळणे - ऊर्जेचा व्यय टाळणे, नाही गाडणे - जगायला जमीन नाही मग महागले मरणे.
राहिले जळ - जेथे जीवन गवसले तेथेच अर्पिणे.
Underwater life & death
 चित्रसंदर्भ : इंटरनेट
टीप २ : नुकतीच बीबीसीवर बातमी वाचली : New body 'liquefaction' unit unveiled in Floridafuneral home (BBC News Science-Environmrnt). फार गम्मत वाटली. एकीकडे पर्यावरणाच्या नावाने बोंबा मारायच्या आणि सर्व मानवजातीला कारणीभूत ठरवायचे, दुसरीकडे नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश करायचे नवेनवे मार्ग शोधायचे!

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 15, 2011

कुरूक्षेत्रानंतर..., महाश्वेतादेवी (समीक्षा)

मुखपृष्ठ: चंद्रमोहन कुलकर्णी
'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी । अनुवाद : वर्षा काळे । प्रकाशक : मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे । २०१० । किं. साठ रुपये ।

अनुवाद: वर्षा काळे यांनी इंग्रजी भाषांतर चपखलपणे मराठीत बसवलेय. कांही नवीन पण समजायला सोपे शब्द आजच्या परिस्थितीनुसार येतात हे स्वागतार्ह आहे. जसे: राजवृत्त (राजा?) लोकावृत्त (प्रजा?) हे तत्कालीन परिस्थितीला योग्यच आहेत; जो बळी तो राजा. जे दुर्बल ते प्रजा! असे अनेक शब्द संवाद - गाणी - वर्णने यांत येतात. आणि विशेष म्हणजे राजवृत्तातील व लोकवृत्तातील सारी माणसे एकच बोली बोलतात. 'लोकांच्या' तोंडीं गांवठी भाषा घातलेली नाही.
अवतरण -१ अनुवादिकेचे मनोगत, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अनुवादिकेचे मनोगत : ही प्रस्तावना प्रसंगानुरूप लांबी-रुंदी-खोलीसह आहे. हे महाश्वेतादेवींचे मराठीत पहिलेच पुस्तक असावे! वर्षा काळे यांनी लेखिकेचा, आपला व दोघांचा संबंध याचे पुरेसे वर्णन केलेले आहे. नाहीतर हे पुस्तक अपुरे राहिले असते.

महाश्वेतादेवी यांचे 'कुरुक्षेत्रानंतर...' हा अनुवाद अंजुम सन्याल यांनी केलेल्या 'After Kurukshetra' या इंग्रजी भाषांतरावरून केलेला आहे. त्यांचे साहित्य, भाषांतरीत का असेना, मी पहिल्यांदाच वाचत होतो.
त्यांच्याविषयी - त्यांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्याना मिळालेले पुरस्कार यासंबंधात - वर्तमानपत्रांत येणार्‌या बातम्या वाचत होतो. पण मुद्दाम शोधून कथा-कादंबर्‌या वाचणे मला जमत नाही. व सहज हाती आलेले साहित्य दर्जेदार असले तर मी वाचायचे टाळीत नाही.

प्रस्तुत समीक्षा एक मुक्तचिंतन
 महाश्वेतादेवींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे फलीत काय झाले वा होतेय किंवा होणार हे माहित नाही, पण कोणीही कल्पना करू शकेल.

'कुरूक्षेत्रानंतर...' यांत तीन कथा आहेत. महाभारत-युद्धाने केलेल्या संहारानंतर राजवृत्तातील व लोकवृत्तातील स्त्रियांच्या अवस्थेवर या कथा आहेत. त्या उत्तरा, कुंती आणि सौवाली यांच्या भोवती गोवलेल्या आहेत.

या कथा राजवृत्त, उच्चभ्रू (elite) समाज व लोकवृत्त, शूद्र / आदिवासी (peasant /aborigine) जमाती यांच्या स्त्रियांना जोडतात, आणि दोन समाजांतील सांस्कृतिक (cultural) द्विभाजन (dichotomy) दाखवतात.
आज  हे चित्र अधिकाधिक स्पष्ट होत असलेले तर दिसतेच आहे आणि विकोपास जातेय हेपण दिसते.

पहिली कथा: 'पंचकन्या': उत्तरा ऐन तारुण्यात विधवा झालीय, अवाक, विमनस्क आहे. तिला रिझवायला भग्न रणांगणावरून पांच तरुणी तिच्या सख्या होतील या अटीवर आणल्या जातात; त्या दासी म्हणून यायला तयार नसतात. त्या उत्तरेच्या वयाच्या होत्या. त्यापण या युद्धात विधवा झाल्या होत्या, आपल्या पतींची कलेवरं शोधायला कुरुजंगलातील त्यांच्या गावातून आल्या होत्या.

अवतरण-२  'पंचकन्या', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
अवतरण-३  'पंचकन्या, 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
राजवाड्यातील सर्व विधवा ज्या व्रतस्त आहेत आणि आदिवासी विधवा ज्यांना भविष्य आहे. अशी ही कथानकाची अत्यंत युक्त व परिणामकारक मांडणी आहे.

दुसरी कथा: 'कुंती आणि निषादीन' (निषाद आदिवासी स्त्री). वारणावत नगरातील लाक्षागृहात आपल्या पांच मुलांसह एक निषादीन आदिवासी स्त्री, कुंती व पांडवांच्याऐवजी जळून मेली होती. ही कथा सर्वांना माहित आहे. पण तिचे विश्लेषण येथे येते जे नजरेआड राहिले होते.
कुंती वानप्रस्थाश्रमात धृतराष्ट्र व गांधारी यांच्यासह अरण्यात राहात होती. त्या निषादिनीची ज्येष्ठ सून तिला शोधून काढते. ती कुंतीला तिच्या कपट कारस्थानाची आठवण करून देते व जाब विचारते. पण ती निरुत्तर होते.

तिसरी कथा : 'सौवाली' ही वैश्य स्त्री धृतराष्ट्राची दासी होती. त्यांचा अनौरस मुलगा सौवाल्य जो युयुत्सू नावाने ओळखला जातो. युद्धात तो पांडवांना जावून मिळाला होता.

अवतरण-४  'सौवाली', 'कुरूक्षेत्रानंतर...', महाश्वेतादेवी
'सौवाली' या कथेत कुंती, गांधारी व धृतराष्ट्र रानातल्या वणव्यात जळून मेले. व युयुत्सूने बापाचे तर्पण केले. (लेखिकेचे संदर्भ- 'महाभारत सरनौबत', लेखक - राजशेखर बसू। सौवाली: संदर्भ- 'पौराणिक अभिधान', लेखक- सुधीनचंद्र सरकार)

या कमीअधिक लांबीच्या तीनही पौराणिक कथेत लेखिकेने तत्कालिन सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वातावरण निर्माण केलेले आहे. शब्दांचा मितव्यय डोळ्यांत भरणारा आहे.

महाभारत वाचताना तत्कालीन वातावरण आपल्या ध्यानात- नजरेसमोर क्वचितच येते. तत्कलीन लोकसंख्या किती असेल हा विचारपण आपल्या मनास कधी शिवत नाही. किंबहुना आपले लक्ष गोष्ठीत गुंतलेले असते.

लेखिकेला हे कसे साध्य झाले याचे कारण ती नागरसमाजाचा एक भाग आहे, व तिचा आदिवासी जमाती व लोकसमुहांचा व्यासंगपूर्ण अभ्यास. आदिवासी प्रागैतहासिक काळात आजही रहात आहेत असं म्हणता येणार नाही.

आदिवासी संस्कृती जतन करायचा वैश्विक वारसा
पण त्यांची सांस्कृतिक मूल्ये व जमातीचा एकसंध आकारबंध मात्र अबाधित आहेत, जी त्याना निसर्गमातेशी जोडून ठेवतात. पांच हजार वर्षे सर्व जगभर नागरसमाजांनी केलेल्या उच्छेदांतूनही ते टिकून आहेत त्याचे हेच कारण. गेल्या पांचशे वर्षांत मात्र वसाहतवाद्यांनी अनेकांचे शिरकाण केले.

या कथांत आदिवासींची निसर्गाशी संवाद साधून राहाण्याची धारणा व जीवनरीती (जीवनशैली नव्हे) ही त्यांच्या घर-परिसराची प्रसंगोचित वर्णने, संभाषणे, गाणी,  प्रसंगयोजना यांतून लेखिकेने सूचकपणे दाखवली आहेत.

त्याचबरोबर युद्धाच्या भीषणतेचे सम्यग दर्शनपण येथे आहे! खरं पाहाता पहिले व दुसरे जागतिक महायुद्धें, गेल्या शतकात जगभर झालेली अनेक युद्धें, कलिंगचे युद्ध, पानिपतचे युद्ध आणि या पौराणिक यद्धांत काहीच लाक्षणिक फरक नाही.

फक्त एकदा वेगळे घटित घडले : सम्राट अशोकाची उपरती व मन:पालट. अन् त्याचा इ. स. दोनशे वर्षांपूर्वीचा अहिंसक वसाहतवाद! अनन्यसाधारण!

महाभारत एक कालातीत ((timeless) कृती! त्याची आतापर्यंत अनेक रूपांत, माध्यमांत - दशावतारापासून कार्टूनपर्यंत - कोट्यवधी पारायणे जगभर झाली असतील.

या तीन कथा मात्र त्यांतील एका दुर्लक्षित भागावर नजर टाकतात. हा आहे आदिवासी संस्कृती आणि नागरी समाज यांतील द्वैत (dichotomy) व त्यांतून निर्माण होणारा संघर्ष.

तसं पाहिल्यास एकलव्य, नागवंशी आदिमजमातीच्या निसर्गनिवासाचा, खांडव वनाचा, विनाश आणि त्याचे पर्यावसान म्हणून पांडवांचा झालेला कुळक्षय या ठळक कथा अनेकांस माहित आहेत. पण तत्कालिन नैसर्गिक व सामाजिक पारिस्थितिकीवर होणार्‌या परिणामांचा विचार कोणी केला असल्यास माहित नाही.

मानववंश व पुरातत्व या शास्त्रांचा उदय गेल्या दोन शतकांतला. आपल्या देशातील बहुतत्वी समाजाला 'मानववंशशास्त्र' या विषयाचा अभ्यास शिक्षणाच्या सर्वच शाखांत अत्यंत निकडीचे आहे. विषेशतः इतिहास विषयात याचा सर्व शैक्षणिक स्तरांवर समावेश केला पाहिजे. सरकारी अंमलदार-दरकदार-सांसद-आमदार-खासदार यांस विशेष धड़े देण्याची व्यवस्था करायला हवी!

आजच्या सुशिक्षितांसाठी आधुनिक शिक्षणाची गरज 
पर्यावरणाच्या शास्त्रोक्त विचाराला चालना मिळाली ती गेल्या पन्नास वर्षांत. पण प्राणी व वानसें मात्र पर्यावरणासंबंधांत अज्ञान नसतात; नवजात बालकपण संवेदनशील असते. कृषीवलांचा तर पर्यावरण, पारिस्थितिकी व ऊर्जा यांच्याशी रात्रंदिवस संबंध येतो, भले ते उच्चभ्रू वर्गासरखे वाचाळ नसतील!

आमच्या सरकारने तर आता इयत्ता पहिलीपासूनच पर्यावरण हा विषय शिकवायला सुरवात केलीय. खरं पाहता पंतप्रधान-मुख्यमंत्र्यापासून ते पटेवाल्यापर्यंत सर्वांसाठी या विषयाच्या खास सक्तीच्या शिकवण्या द्यायला हव्या. मग प्रगतिची कोणत्या क्षेत्रात अधिक गरज आहे ते सरकारला थोडेफार कळेल.

महाभारतातील एक अवतरण वाचलेले आठवते. पांडव अज्ञातवासात होते. ते वनात रहात असताना तेथल्या ऋषीँनी त्यांना सांगितले, "त्या वनांत त्यानी एकाच जागी तीन दिवसांहून अधिक काळ वसती करू नये. नाहीतर वनाचे — जळ-जमीन-वानसे-वनचर — नैसर्गिक संतुलन बिघडते."
हे अवतरण अर्थातच सर्व युगांतील व प्रदेशांतील सरकारांना उद्धेशून आहे. पण व्यवहारात याचा उपयोग फ़क्त अवतरणापुरता मर्यादित राहतो.

दुर्गा भागवत, लेखक व मानववंशशास्त्रज्ञ, यांनी अदिवासींचा अभ्यास व संशोधन त्यांच्या परिसरांत जाऊन केले होते, व बरंच साहित्य पण इंग्रजी व मराठीत लिहिलं. त्यानी आदिवासींच्या लोककथापण मराठीत आणल्या. दुर्गा भागवतांनी 'व्यासपर्व' या पुस्तकात लिहिलेली एकलव्याची व्यक्तिरेखा (मोहरीतली ठिणगी) आठवणीत कायम लेणं कोरून राहिलेली आहे.

महाश्वेतादेवींच्या या तीन कथा ('कुरूक्षेत्रानंतर...') आपले स्थान ध्रुव तार्‌यासारखे कायम करतात. कारण साधेच आहे : उत्तर/ दक्षिण/ पूर्व/ पश्चिम, कोठेही गेलो तरी ही अवस्था अनेक अवतारानी सतत नजरेस येते. मानवतेची नागरी संस्कृतिच्या शापातून कधी सुटका होईल माहित नाही?

टीप: आदिवासी घर व परिसर (पहाः Tribal Housing and Habitat -1) या विषयाचा, आणि त्या अनुषंगाने येणारी इतर अंगांचा (पहा:TRIBAL SKILLS - आदिवासी हुन्नर), अभ्यास मी काही वर्षें केला. त्यातून बरंच काही शिकायला मिळाले. त्याची नोंदणी नंतर केली. या पुस्तक-परिक्षणाची पाळेमुळे माझ्या या स्वतंत्र अभ्यासात आहेत आणि त्याचे श्रेय सर्व आदिवासी जमातींना जाते.

रेमीजीयस डिसोजा
१५ ऑगस्ट २०११ 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 09, 2011

मेटाफिक्शन - व्यत्यासकथा (metafiction): एक वाङमय प्रकार

व्यत्यासकथा (metafiction): एक वाङमय प्रकार
९-८-२०११ ऑगस्ट क्रांती दिन
'i'ness (self-portrait) 'मी'पण (स्व-प्रतिमा) 
  १९६७ साली खडूने चितारलेली ही स्वप्रतिमा 'i'ness graphic - 'मी'पण - शोधते,
 पण रूढ शैलीचे / प्रथेचे विडंबन करताना स्वत:शी प्रामाणिक राहते.
विज्ञानात जसे संकेत चिन्हे येतात तसे हे एक भौमितिक चिन्ह!

व्यत्यासकथा (metafiction) [टीप १] हा साहित्यप्रकार हल्लीच्या इंग्रजी साहित्यात आढळला. याची ठाम व्याख्या नाही किंवा ज्या आहेत त्या संदिग्ध आहेत. हे एक बरं झालं. ठळक अर्थ असा : यांत कथा असते जी वास्तव असते, बातमी असते पण हे बातमीपत्र नसते, समीक्षा, भाष्य असते. थोडक्यात - व्यत्यासकथा ही संकल्पना आहे, तंत्र नव्हे.

हे असते एकप्रकारे प्रस्थापित चौकटीच्या बाहेर जाणारे चित्र! किंवा शाब्दिक त्रिमिती 3D दृश्य असं पण म्हणता येईल? अथवा भारतीय पारंपरिक शैलीतील चित्राप्रमाणे, ज्यात perspective [टीप २] नसतो, पण वस्तुस्थितिच्या बाजू व तल दिसतात; हेपण त्रिमिती दृश्य असते. आणखी जवळचे उदाहरण- भारतीय कथा-कीर्तन. व्याख्येपेक्षा उदाहरण देणे अधिक बरे असे मला वाटते. व्याख्या वस्तुस्थितीला मर्यादा घालतात, कप्प्यात बसवतात. हे तर अनैसर्गिक आहे.

मी १९७५-८०  च्या दरम्यान इंग्रजी गद्य लिहायला सुरवात केली. त्यापूर्वी कोंडलेली वाफ काढण्यासाठी मराठी, कधी इंग्रजी, पद्य लिहित असे; ही माझी खात्रीची सुरक्षा झडप (वेड लागू नये म्हणून हा स्वाभाविक प्रतिकार/ईलाज असावा) होती. रेखा-रंग चित्रेपण चितारीत असें. पण ही स्वत:साठी होती. आता वाटले त्यांना ब्लॉगवर ठेवावे.

पिकासो-डोरा
हे इंग्रजी निबंध (?) मी कांही परिचित जाणकाराना वाचायला दिले तेव्हा माझे कसे हसें झाले असेल याची कोणीही कल्पना करू शकेल. एकाने सांगितले यात syntex नाही. कोणी म्हटले यात संदर्भ, प्रमाणे देऊन गृहित प्रमेय सिद्ध केलेले नाही. कोणी म्हणाले 'वेडा', कोणी म्हणाले 'कवी'; अर्थ एकच : हे गद्य लेखन कोणत्याही चाकोरीत बसत नव्हते- अजूनही नाही. शुद्धलेखनाचे तर विचारूच नका. (इंग्रजी माझी तिसरी भाषा!) एकूण सारे काही उलटेपुलटे दिसत होते, पिकासोच्या चित्रासारखे.

चारपाच वर्षांपूर्वी माझ्या ध्यानात आले, इंग्रजीत ज्याला metafiction म्हणतात ते हेच असावे. लेखन असो की चित्र असो, कच्चे मडके ठोकून थोपटून घडवावे लागतेच. तरीही साकल्याने लिहिलेल्या बहुपेडी साहित्याला कधी मान्यता मिळेल माहित नाही.

भारतीय परंपरेत 'जीवनासाठी कला' असते; 'कलेसाठी कला' ही आहे आधुनिक पाश्चिमात्य धारणा. इंडिक भाषांत 'काळ' याचे अर्थ आहेत 'समय व मृत्यू'! हे सर्वाना माहित आहे. घड्याळावर वाटप केले तरी काळ किंवा वेळ तेथेच असते. बदलतो ते आपण, आपणच निर्माण केलेला "जमाना". कारागिरी (vocation) गेली व प्रव्यवासाय (proffession) आला.  काळाच्या कप्प्यात प्रव्यवसायिक उच्चभ्रू लोक तंत्रज्ञानाच्या वेगवान पटरीवर दौड करू लागले. व्यावसायिकाना सलाम!

सर्जनशीलता काय केवळ शिल्प-चित्र-लेखन-अभिनय इ. कला निवडक वर्गाची - प्रतिभावंतांची मिरासदारी आहे? तिची उपलब्धी सर्वानाच आहे. ती नाकारणे म्हणजे निसर्गदत्त जन्मजात देणगीचा निव्वळ अवमान आहे.

अर्थात असे भेद करणे हे सत्तभिलाषी नागरी संस्कृतींचे व्यवच्छेदक लक्षण आहे, जसा वेश्या-व्यवसाय (उदा. देवदासी नृत्यांगना). कधी काळी या देशांत ६४ कला उपलब्ध होत्या, ज्या लोकाभिमुख होत्या.

ब्रिटिश-बनावटीच्या अभ्यासक्रमात चौसष्ट कला गुदमरल्या. हे आम्ही देशाभिमानी आमच्या 'मानसिक गुलामगिरी'त विसरून गेलो. 'बौद्धिक भ्रष्टाचार' हे त्याच दुसरे नांव - जो सर्वात अधिक भयानक!


या मानसिक गुलामगिरी किंवा बौद्धिक भ्रष्टाचार यावर एकच इलाज : तथाकथित सामान्य जनांनी विधायक सर्जनशीलतेची - सरस्वतीची - कांस धरणे. मग ती आराधना कोणत्याही माध्यमाने का करेनात! त्याकरिता रोजव्यवहारातील यांत्रिकीपणा काढून टाकावा लागेल. मग पुढची वाट आपोआप तयार होते, सुकर होते!

मी या निबंधाना  "व्यत्यासकथा" नांव देणे म्हणजे  कांट्याने कांटा काढण्याचा जीजुत्सू प्रकार आहे. रेमीच्या बोलीचा हा एक प्रयोग एवढेच!

टीप १. Metafiction - याला परिभाषा कोशांत पर्यायी मराठी शब्द नव्हता. तेव्हा मीच एक जुळवला, 'व्यत्यासकथा'.
टीप २. Perspective - सरकारी परिभाषा कोशात याला यथार्थदर्शन, परिदर्शन, सम्यक्‌दर्शन, त्रिमितिदर्शन हे पर्यायी शब्द दिले आहेत. याना वहिवाटीने अर्थ येईल. अशा दृश्याचे वैशिष्ठ्य असे : ज्या भागाला 'महत्व' द्यायचे तो सामोरा आणायचा, इतर मजकूर पार्श्वभागी एक, दोन किंवा तीन बिंदूंत अस्तंगत होत शून्यात जातो. असे दृश्य आधुनिक समाजातपण नजरेस पडते.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 23, 2011

वानसे जीवनदायी

हायकू

Photo: Spring 2011©  Soojung Cho, Artist, Photographer
 वानसे मूक भाषी
भरुनी काढिती
अनेकपरी माझ्या क्षती.
 
 मूळ  इंग्रजी कवितेचे (Rain, Rain, Come again-6) भाषांतर
वानसे हर प्रकारे — अन्न, निवारा, वस्त्र, आरोग्य, औषधी, रंजन, शिक्षण, कागद, रंग, सुगंध, संतती किंवा संततिनियमन ... व पर्यावरण — आयुष्याच्या हरेक क्षेत्रात सतत जीवनदायी होत असतात. पण रोजच्या धावपळीच्या धबडग्यात वनसाचा क्षणभर पण विचार शिवत नाही. मग आठवडा-महिना-वर्षातून एकदा बाडबिस्तरा बांधून दृष्टीसुख घ्यायला पिकनिकला निघायचे. बॉलीवूडच्या नट-नटी बघायला जेव्हढा वेळ खर्च होतो त्याच्या शतांश-सहस्रांश पण वानसाना आपण देत नसतो.
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

May 02, 2011

नेता ऽ गिरी ऽऽ

सृष्टीयोग
विज्ञान युंगात सृष्टीची अनेक अंगे माहित झाली
पण त्याबरोबरच तथाकथित पुरोगामी समाजाची निसर्गापासून फारकत पण होत गेलीय.
आणि माणसांची माणसांपासून.
इंग्रजीत एक वाक्प्रचार आहे, 'किंग ईज डेड, लॉंग लीव द किंग' - राजा मेला, राजा अमर रहो! राजेशाही गेली. लोकशाही आली. आणि राजे लोकांची जागा पुढारी लोकांनी घेतली.

   हे झाले विशेषतः नव्याने आलेल्या लोकशाहींत. तसं पाहिल्यास जगातील प्रस्थापित लोकशाही देशपण याला अपवाद नाहीत. वासरांत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना! नवे पुढारी तयार करण्यासाठी किती संस्थांचा, विद्यापिठांचा केवढा आटापिटा चाललाय काही विचारूं नका.

   रानडे - गोखले - गांधी - विनोबा यांची गुरूशिष्य परंपरा अनुभवाच्या पाठशाळेत, क्षेत्रिय अभ्यासांत (field study) कधीकाळी तयार झाली होती.

   आता पाठ्यक्रम तयार झालेत. पुस्तकी अभ्यासक्रम, वर्गाच्या चार भिंतीआड, अधूनमधून नमुन्याचे सर्वेक्षण, आणि तशाच धर्तीच्या देशीविदेशी पदव्या घेऊन आलेली प्राध्यापक मंडळी शिकवायला; अशी असते या पाठ्यक्रमाची रूपरेखा.

   अरे हो! आणि हमखास मदतीला आंतरजालाचे (Internet) प्रतिविश्व आहेच. त्यातली किती माहिती कधी कालबाह्य होईल हे कोणालाच, खुद्द लेखक / संपादक मंडळीलापण माहित नसते.

   मात्र प्राकृतिक जैवविविधतेत स्थानिक जळ, जीवन व जीव ही अनन्यसाधारण असतात; पर्यायाने त्यांच्या प्रभावाने स्थानिक लोकसंस्कृतिपण.

   ही वस्तुस्थिती किती पुढारी किंवा नेते ध्यानात घेत असतील याची शंकाच आहे. कारण ते शालेय शिक्षणाच्या एकसंवर्ध मशागतीत तयार झालेले असतात. आणि सृष्टीला मानवीय अधिश्रेणींची तमा नसते.

   सृष्टी कधी तथाकथित प्रगत नागरतेने निर्माण केलेली 'तृतिय पारिस्थितिकी' (Third Ecology) ओळखत नाही. तिच्यापुढे नेते महात्मे सारे नगण्य !

   आतापर्यंत सृष्टीची समज येण्याइतपत विज्ञान प्रगत झालेले आहे. खरं पाहता नि:पक्ष, विनापूर्वग्रह दृष्टीने कुणासही ही वस्तुस्थिती दिसेल. त्यासाठी विज्ञानादि शास्त्रांच्या मान्यतेचीपण गरज नाही.

   पण पांच हजार वर्षांच्या नागरी संस्कृतिच्या विचारधारेच्या संवयीने हे आमच्या गळी उतरणे सहजी शक्य नाही.

   शरद्चंद्र चटर्जींच्या (१८७६ - १९३८) स्पष्ट, रोकड्या शब्दांत सांगायचे तर :
'ही सारी बडबड - ही दर्शनशास्त्र वेदांताची बोली - हे नुसते शब्द - या शब्दांच्या जोरावर जग चालत नाही' (भैरवी - 'देना पावना', आ. १९६२ पृ. २१६).
   सृष्टीच्या लेखी समाज, धर्मसंस्था, राज्यसंस्था, अर्थसंस्था, राष्ट्रवाद, देशभक्ती, नेते-पुढारी, इत्यादी, किंबहुना निसर्गावर 'मानवी सत्ता' या शब्दांना काही अर्थ असू शकतो का?

टीप:१.  भैरवी (मराठी शीर्षक) - 'देना पावना' (कर्ज आणि तहशील) या कादंबरीत (१९२३) शरदबाबूनी शंभर वर्षांपूर्वीची देशातील खेडी, खेड्यांची व तेथील उच्चभ्रू व ग्रामिण-दलित समाजाची अवस्था वर्णन केलेली आहे. या कादंबरीचे भा. वि. वरेरकर यांनी १९४२ साली मराठी भाषांतर केले.
२.    आजच्या परिस्थितीचे आम्हीच साक्षी! फक्त आपल्या डोळ्यांवरचे वाद - विवाद - प्रतिवाद - युक्तिवाद - अपवाद... इ. चष्मे काढून बाजूला ठेवायचे व साकल्याने बघावे! एवढेंच!
३.   सृष्टीयोग हा काही कंपू नव्हे. प्रत्येकाचा सृष्टीयोग वैयक्तिक - स्वतंत्र मार्ग आहे.
 
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 09, 2010

प्रलय


 "The Great Wave" by Katsushika Hokusai (1760-1849) colour woodcut

सर्व अंगागांतील प्राण  
एकवटले पापणीआड  
अन् पांच हजार वर्षांचा  
पाखंडाचा बांध उलथला  
प्रलयाचे थैमान घेऊन आला  
दंभाचे महावृक्ष उलथून गेला  
- - - 
२३ - ५ - १९९७  

टीप: चित्र-सदर्भ - "The Great Wave " "द ग्रेट वेव", चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) याचा  रंगीत वुडकट.
पावसाचा हंगाम सुरू झाला की लोक जीव मुठीत घेऊन असतात, वेगवेगळ्या कारणासाठी -- पाऊस पडेल का, वेळेवर पडेल का, की अवर्षण की पूर येतील का, वर आलेली शेती बुडेल का? 
पण कोणता प्रलय - सामाजिक की नैसर्गिक - किती हानिकारक आहे की लाभदाई ठरेल हे कोण व कशाच्या आधारावर ठरवणार?  
माझा लाडका तुकाराम मात्र मला ऐकू येतो: "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती".  कितीक युद्धे - महायुद्धे गेली पाचशे वर्षे चालूच आहेत. तरीही (गरिबांची) लोकसंख्या वाढतेच आहे; त्यांना जगायला पुरेसे जेवण मिळत नाही मग औषधपाणी कुठले? का हे कोणी महाभाग शास्त्रज्ञ का ते सांगू शकत नाही. याच्यात निसर्गाचा वाटा किती आणि तथाकथित आधुनिक मानवीय सुधारणेचा वाटा किती? 
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

July 15, 2010

संधिप्रकाश मंडल: विसाव्या शतकाचे श्राध्द

 (मूळ "Twilight Zone" (१६-०८-१९९९)  या प्रकाशित इंग्रजी कवितेचे स्वैर भाषांतर: पहा दुवा )
संधिप्रकाश  (Image Source: Internet)
गवाक्ष कुटीचे - नजर जगतावर 
सरकते पुढे पुढे, ढगांच्या पंखांवर
यात्रा दिवस-रात्रीच्या संधीवर 
जेथे धरती व तारकांचा वसे परिवार 
येथे ना कुणी स्पर्शू करू शके, येथे ना
स्थान कःपदार्थ सिध्दांताना
व्यापार, राजकारण अन् दर्शनांच्या; 
अन भूचरांना जयाना नसे घरोबा 
वसुंधरा व दिवाकराशी, जे जगतात
आत्मप्रतारणेत अन फुगवलेल्या वादंगांत
प्रमाणाबाहेर. काम - काम - काम,
काम जो सोडीजे मागे भव्य भग्नावशेष 

दैवते, भगत, जे जगती देऊन प्रवचने   
मुक्तीच्या आशेची व उभारती स्मारके
रक्ताच्या साड्यांवर भूचारांच्या, जे जखडलेले 
सर्वकाळ अराजकांच्या साखळदंडांत.









पावन आहेत गांडुळे दुरस्त 
सार्वजनिक नजरेआड, ते नाही निर्मित
धर्मशास्त्रे वा स्मारके आपल्या

विष्टेतून वारसांसाठी, वा  संहार जीवनाचा.



रेमीची स्-प्रतिमा 
*    *    *    *    *
टीप: १. प्रतिमा - गांडूळे, मृदा संधारण करणारा पर्यावरणातील एक महत्वाचा जीव, जो अजूनपर्यंत दुर्लक्षित होता.  
२. प्रतिमा - रेमीची स्व-प्रतिमा, विसाव्या शतकाचे प्रतिक - स्वत:चेच एक विडंबन चित्र   
३. प्रतिमा: संधिप्रकाश (source - Internet )

~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

June 16, 2010

जीजुत्सू प्रतिकार-विद्या


बलिष्टांचे शक्तीस्थान त्यांचे मर्मस्थान पण असते. कुस्तीवरच्या एका कथेत फारा वर्षापूर्वी वाचलेले वाक्य. गुरू आपल्या शिष्याला हा उपदेश देतो. मल्लयुध्दाच्या डावपेचांतील हे एक इंगितः आपल्यापेक्षा अधिक ताकदीच्या मल्लाला चीतपट करायचे असल्यास त्याचे वर्म ओळखणे जरूरीचे असते. 

भारतातून सुमारे इ. स. 200 वर्षापूर्वी बौध्ध भिक्षू चीनमध्ये धर्मप्रचारासाठी हिमालयातून जात असत. वाटेत लुटारू हल्ले करीत. तेव्हा त्या निशस्त्र भिक्षूनी जीजूत्सू  विद्येचा शोध लावला. ही खरीखुरी विधायक सर्जनशीलता.  


आज याची भारतातील बहुसंख्य दीनदलीत, पिडीत, कृषिक वर्गाला गरज आहे, विद्येची गरज आहे, नक्षलवाद्यांची नाही, परजीवी संघटनांची नाही. भारतातील उच्चवर्गीयानी, किंवा उच्चवर्णीयानी म्हणा, त्याना हजारो वर्षे विद्येपासून वंचित ठेवले, व या निधर्मी लोकशाहीत अजूनही ठेवलेय. ही विद्या बदलत्या
काळानुसार बदलायला हवी. ही विद्या कृषिक भारतीयांसाठी समर्पक आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
Page copy protected against web site content infringement by Copyscape

February 24, 2010

पडछाया - २: कविता



जळीं पाहिली दु:खाची पडछाया:
एक बिंदू टपकला
नि पसरत गेली पडछाया चक्राकार;
दुसरा बिंदू टपकला
नि गुंफले तरंग एकमेकात अनंत.
पडछायेच्य़ा तरंगांवर प्रकाश हसला,
नाचला, तु़षारांच्या लोलकांवर बसून
अवकाशात उडाला.

* * *

टीप: वरील प्रतिमा आंतरजालावरून घेतलेली आहे.

~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

January 01, 2010

सृष्टीमाता


- - -


सृष्टीमातेच्या घरी नाहीत दैवते-मूर्ती-व्यक्तींचे पुजारी
चराचर सृष्टीच अंतर्बाह्य जाणवे साक्षात परमात्मा

ती सर्वदा दृश्य, श्राव्य, स्वादिष्ट, स्पर्शीय, लिंगमय...
जननी, मर्त्याना आशिष ती, जननमरणाचे तांडवहि

सृष्टी सामावे एकची भाषा-धर्म-धर्मशास्त्र-धर्मनियम
ती आदिगुरू - आद्यशाळा, सर्वांसी विनामूल्य उपलब्धी

* * *
या रचनेत नवीन काहीच नाही. पूर्वाश्रमीनी हे अनेकदा वेगवेगळ्या शब्दांत सांगितले असेल. आपल्या भारतीय / इंडियन मानसात हे कधी सुप्त, कधी जाणीवेत असेल. देशातील बहुसंख्य सामान्य समजले जाणारे जन आपापल्या सहजधर्माप्रमाणे कळत नकळत, कोणताही शब्दच्छल न करता निसर्गाचा धर्म (पहा: सृष्टीयोग) आचरणात आणीत असतील. शंकाच नाही. ते सारे निसर्गाचे संतुलन राखण्यात आपल्या जीवनशैलीने मदत करतात, जगाच्या नजरेआड राहून. त्या सर्वांस माझे शतश: प्रणाम.

आज विलायती कैलेंड़रच्या (Gragorian calender) नव्या वर्षाच्या दिवशी, कोपनहेगनला नुकत्याच तथाकथित प्रगत देशांची बड़ी धेंडें "जागतिक हवामान परिवर्तनाचे" नियोजन करायला जमा झाले होते, त्याना सृष्टीमाता सदबुध्दी देवो अशी प्रार्थना करुया.

रेमीजीयस डिसोजा
मुंबई
१ जानेवारी २००१
~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

December 23, 2009

आंबा मोहरला शरदात

आपला परिसर : आंबा मोहरला शरदात





या वर्षी शरादातच आंब्याला मोहर आला. त्यानंतर दोन तीन दिवस पाऊस पडला. वाटले मोहराची वाट लागली. पण तसे काही झाले नाही. हे छायाचित्र टिपताना आणिक मोहर आला आणि पिटुकल्या कैरया पण दिसू लागल्या.

मुंबईत सहसा आंब्याची झाडे दिसत नाहित. इथे बहुतेक शोभेची (?) झाडे वाढवतात. काही लहान-मोठ्या मुलाना विचारून पाहिले पण त्याना ते झाड कसे दिसते माहीत नव्हते. आंबे जरी आवडीने खात असले तरी कुतूहल नावाची चीजच नाही त्याला काय करणार?

यात काय आश्चर्य! मी एकदा परदेशी विज्ञ्यान सप्ताहिकात वाचले, इंग्लंड येथील लोकाचा समज होता कापूस प्राण्यापासून पैदा होतो, जशी लोकर मेंढ्यापासून मिळते.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 24, 2009

नागरता (civilization) इंडियावर मराठी लघुकविता

नागरता किंवा नागर-संस्कृती (civilization) ही लघु कविता इंडियाला उद्देशून आहे. ती सर्व जगाला पण लागू होऊ शकते.
- - -


- - -

आमची देशभक्ति केवळ तळ हातावर मावेल एवढ्या नकाशापुरती नाही. ती ज़मीन, पाणी व माणसा सह समस्त जीवमात्राला सामावते.

उदे उदे करतो आम्ही "पर्यावरण (environment) + पारिस्थितिकी (ecology) + ऊर्जा (energy)" यांचा निसर्गाने दिलेला अतिप्राचीन, अलिखित मूल धर्मं नियम, जो मानव-निर्मित सर्व वस्तू आणि कल्पना-संकल्पना यापेक्षाही सर्वश्रेष्ट आहे, मग ते कला आणि शास्त्रे, धर्म आणि तत्वज्ञाने असोत.

आम्हास जाणीव आहे, नागरतेने वेळोवेळी निर्माण केलेल्या भौतिक / ऐहिक सीमा बदलाच्या अधीन आहेत. एवढेच नव्हे तर पृथ्वीच्या इतिहास काळापासून जमीन व पाणी यांच्या प्राकृतिक सीमा पण संतत बदलत असतात.

टीप:

ही कविता मूळ इंग्रजी "Civilization" या कवितेचे भाषांतर आहे. काही सेवाभावी संस्थानी "राष्ट्रीय एकत्माते" साठी गांधी जयन्ती २००० दिवशी मुंबईत मिरवणूक, व ती "आगस्ट क्रांति उद्यान" येथे सार्वजनिक सभेत परिवर्तित झाली. त्या घटनेत सामिल होण्यासाठी जाताना लोकल ट्रेनमध्ये मूळ इंग्रजी कविता मी लिहिली होती.

ही प्रसिध्द करावयास गांधी जयंतीच्या दिवसाची वाट पहायची मला गरज वाटत नाही.


रेमी डिसोजा
मुंबई

~ ~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

November 16, 2009

चुकतात माझी गणिते केवळ



 घड्याळाचे  जागतिक महाभारत


लेखक: रेमीजीयस डिसोजा 


नेमेची सूर्योदय रोज पाहता
चुकुनच कधी येई ध्यानी
माझ्या विचारांच्या गतीहुनी
अफाट आहे धरतीची गती
नि
सूर्य रोजच्या रोज जागा बदलतो,
उगवायची वेळ बदलतो, ऋतु बदलतो,
कधी रात्र मोठी कधी दिवस,
वारयाची दिशा बदलतो;
नि
मी मात्र असतो जागच्या जागी
धावता धावता अधांतरी फिरत्या
प्रचंड चक्राच्या परिघावर वेगाने.
तरीही रोजच्या रोज सूर्य सांगे,
बा रेमी,
ही तुझी घड्याळाची टिक टिक
जळवेसारखी चिकटलेली तुला
आहे एक हुलकावणी देणारी
वादग्रस्त संकल्पना केवळ.
नि
कितीही आटापिटा केला तरी
चुकत नाही काळ; परी
लिहिलेली एक रेषेवर सरळ
चुकतात माझी गणिते केवळ
नेमेची.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

September 21, 2009

मौनाचा ध्वनी : मौनाची सांगता

पाखरांची किलबिल, पाचोळ्याची सळसळ, ढगांचे बरसणे, फुलांचे सुगंध, फळांच्य चवी, हवेची झुळूक... सारे किती रमणीय, किती सुंदर, किती काव्यमय! सारेंच सृष्टीची अभिव्यक्ति.


यापेक्षाही सृष्टीचे मौन अनेक पटीने मोठे, फार मोठे, आहे. असे सांगतात, वसुंधरेच्या उदरात सतत उकळणारा तप्त रस आहे. पण वसुंधरेचे मौन आपणास जाणवते ते जेव्हा आपल्या पायाखालची जमीन हादरते, जेव्हा ज्वालामुखी उफाळतात, जमीनी पाण्याखाली जातात, पर्वत वर येतात...

सागराच्या पाण्यातील बिंदू खालून वर, वरून खाली सतत फिरतो, शीत / उष्ण प्रवाहातून जगभर हिंडतो, वाफ होऊन आकाशात जातो... हे सारे जाणवतेच असे नाही. (बहुतेक वेळा ते पुस्तकात राहते.) यातील मौनाची जाणीव होते जेव्हा आकाशातून विजेचा लोळ कडाडत उतरतो वाटेत येणारे खाक करीत, सुनामीची महालाट जमीन धुवून काढते... तेव्हा.

असेच काहीसे होते जगातील अफाट जनसागारांचे. त्यांचे मौन तरी कुठे ऐकू येते राजजकर्त्याना? केवळ यादवी युध्देच का त्याना जागे करायला हवीत जी होत आली अल्ल्याड पल्ल्याडच्या काळात?

माझ्या जगण्याच्या सर्वसामान्य स्तरावर घडणार्या घटना - बोलणे - वाचणे इ. अगणित प्रसंगी यांचे पण असेच काहीसे होत.

शब्द... वाक्ये... परिच्छेद... यामधील अंतरें "मोकळ्या" जागा नसतात, ते पण "मौन" असते. हे मौन ऐकू आले तर बरेच काही अध्याहृत असलेले उघडे होते: अंहकार, पाखंड, हेत्वाभास, दंभ, क्लेश, कारुण्य...

कोणती अभिव्यक्ति विधायक की विघातक सर्जनशीलता आहे याचा कस लागतो जेव्हा मौनाचा ध्वनी ऐकू येतो. उदाहरणार्थ, अण्वास्त्रे, किंवा आता अणु उर्जा, विघातक आहे की विधायक आहे हे कोण ठरवणार? आजच्या आधारलेला सुधारलेल्या पण अवनत नागर समाजातील निर्मिति करणारा, विकणारा की विकत घेणारा?

मौन ऐकणे असेल तर मौन पाळणे पण आले. (काही समाजात, मर्यादित कालासाठी का होईना, मौन पाळण्याची प्रथा आहे.) " मौन" (silence) म्हणजे "गप्प" (silent) राहणे नव्हे. डोक्यात जर कुरव कहर असला तर ऐकू काय येणार? , बोललेले - वाचलेले पण ऐकू येणार नाही. फक्त आपले पूर्वग्रहच येणार. व आपण "जैसे थे" यापुढे जात नाही.
यास्तव मौन पाळणे आवश्यक असते. पाहताना - वाचताना - ऐकताना आपल्या व्यक्तिगत आवडी - निवडी, पूर्वाग्रह यावर आधारलेला न्याय-निवडा बाजूला ठेवणे ही प्राथमिक गरज आहे. मग साकल्य- (holistic) दृष्टी - विचार - विवरण शक्य होते अन सुरू होते. मग मौन ऐकू येते, मौनाची सांगता होते.


- - - - -
टीप: चित्र-सदर्भ - "द ग्रेट वेव" चित्रकार कात्सुशिका होकुसाही (१७६०-१८४९) रंगित वुडकट।
मला वाटते कलावंत हे सर्रास मौन पाळतात. अर्थातच कलावंत त्यांच्या युगांची नाडी बरोबर ओळखतात.

~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape

August 22, 2009

गणेश उत्सवात मुंबईचा फूल बाजार

बाजार किंवा हाट ही प्राचीन देशी परंपरांपैकी एक आहे. बाजार ही आपल्या शेतीप्रधान देशातील सहा लाख खेड्यांची हजारों वर्षांची परंपरा आहे. देशभर अनेक प्रकारचे बाजार भरतात. त्यांत आठवड्याचा बाजार हा सर्वसाधारण नमुना. पंचक्रोशीतल्या खेडेगावांत ठरल्या वारी वेगवेगळ्या गावात किंवा बाजारपेठ असलेल्या गावी, तसेच जवळपासच्या शहरात असे बाजार भरतात.

या बाजारात भाज्या, फले, धान्ये, तसेच माती-बांबू-लाकुड-धातू यांच्या घर, कुटुंब, शेती यांच्या उपयोगी वस्तू (हस्तकला) विकायला लोक आणतात. त्याशिवाय गईगुरेँ, शेळ्या मेंढ्या उंट इ. जनावरे विक्रीसाठी आणली जातात. राजस्थानच्या वाळवंटात तरणेतर येथील जत्रेत इतर वस्तू आणि जनावरांबरोबर उंटांचा पण बाजार भरतो. ही जत्रा वर्षात एकदा भरते.


Dancing Ganesh: नर्तक गणेश

-------------------------------------------------------------

मुंबई पण इतर कोणत्याही शहराप्रमाणे परजीवी नगर म्हणजे "बांडगुळ" आहे, ते जवळच्या व दूरच्या प्रदेशांवर जगते. इतकेच नाही, तर त्याचे जगणे हायड्रोपोनिक्सचे आहे। "Hydroponics " म्हणजे "मृदाविराहीत रासायनिक जलशेती " मुंबईतील दादरचा फूलाबाजार हे याचे दृश्य उदाहरण आहे. येथे फुले, पाने, गवते... दांतण पण विकली जातात.




स्थळ: सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई.

ही फूल गल्ली किंवा फूलबाजार कितिक दशके जुना आहे. कदाचित शंभर - दीडशे वर्षें झाली असतील. कोणाला माहीत नाही. मुंबई शहराच्या स्थापनेपासून इंग्रजीतून शिकलेल्या विदेशी - देशी नगररचनाकाराना पण माहीत नाही. किंवा त्याना देशी लोकपरंपरेची पर्वा नसावी हे जास्त खरं!
नाहीतर
याला मुंबईच्या वेळोवेळी आखलेल्या नकाशांत पारंपरिक वारसा (heritage) म्हणून मानाचे स्थान व स्थळ मिळाले असते.

गणेशोत्सवात येथे आजूबाजूच्या गावांतून - डोंगरांतून खेडूत अनेक जातींची फुले, फले, पाने, गवते (दूर्वा) जी भक्त गणपतीची पूजा व आरास करायला वापरतात. आपल्या वनश्रीची संपन्न विविधता आपल्याला इथे बघायला मिळते.
मुंबईची लोकसंख्या जशी वाढतेय तशी यांची मागणी पण वाढतेय। त्याबरोबरच श्रीच्या मूर्तींची
मागणी पण.



काही वर्षांपूर्वी दादरच्या रेल्वे स्टेशन बाहेर, सेनापती बापट मार्गावर (पूर्वीच्या तुळशी पाइप रोडवर) मोटारींसाठी उड्डान पूल, आणि इथून दोन फर्लांगावर सरकारी फूलबाजार बांधले.
अर्थातच वहिवाटीनुसार लोक इथेच बाजार मांडतात - जेथे जागा मिळेल तेथे - पुलाखाली, रस्त्यावर, फूटपाथवर, आणि आजूबाजूच्या रस्त्यांवर पसरतात। मूळ दुकानदार पण तेथेच राहिले.
उत्सवाच्या दिवशी वाजन्त्र्यांचे आवाज, "बाप्पा मोरया"चा घोष ठिकठिकाणी ऐकू येतात.



काळानुसार लोक प्रथा, रिती, रिवाज, परंपरा यात फरक करतात.
आता या बाजारात श्रीमंतांसाठी महागडी ऑर्किड फुले आणली जातात, गोरगरिबांसाठी कचकड्याची आरास विकत मिळते.




पाश्चिमात्य शिक्षणात वाढलेले व शिकलेले आधुनिक नगर-रचनाकार अर्थातच माणसांसाठी शहरांचे आलेखन करण्यात अपेशी झालेले आहेत. ते पाश्चिमात्यानी ठरवलेल्या प्रमाणांसाठी नकाशे बनवतात. शेकडो शहरे या देशात हजारो वर्शांपासून वसलेली आहेत. पण आधुनिक देशी शिक्षण पध्दतीने या शहरांचा अभ्यास कधी केला नाही. ही शहरे हजार वर्षे का टिकून आहेत याचा या शिक्षण संस्थानी आणि त्यांच्या शिक्षण पध्दतीने कधी रितसर केला नाही.
गणपती बाप्पा त्याना सदबुध्दी देवो!

श्री गणेशावर काही इंग्रजी लेख:
१। My "Sri Ganesh"
२। Dancing Ganesh
३। Flowers Forever (Poem)

आनंद कुमारस्वामी यानी त्यांच्या "YAKSAS: Essays in the Water Cosmology" या पुस्तकात "महायक्ष" गणपतीवर फार उदबोधक लेख लिहिला आहे. त्या पुस्तकाचे मी केलेले परिक्षण : दुवा


~~~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.

Page copy protected against web site content infringement by Copyscape