August 19, 2010

पर्यावरण आणि वन्य जीवन

प्रतिमा १. अतिसूक्ष्म शैवाले जी फक्त इलेक्ट्रोनि सुक्ष्मदर्शीतून दिसतात.

 सूचक शब्द: पर्यावरण अर्थात पर्यावरण, परिस्थितीकी व ऊर्जा ही तीन ही एकत्रित; वन्य जीवन अर्थात सर्व जीव सृष्टी, केवळ वाघ सिंह, इ. हिंस्र श्वापदेच नव्हेत; जैवविविधता (biodiversity )   

प्रतिमा २. प्रवाळ खडक
सोबतच्या चित्रातील प्रवाळ खडक तळहातावर राहिल एवढा, ४" x  5 " आहे. मालवणच्या सिंधूदुर्गाच्या किनारयावर असे पुष्कळ लहान मोठे प्रवाळ खडक पडलेले आहेत. हा तेथून आणला होता.
कधी हा फुलझाडाच्या कुंडीत, तर कधी घरगुती मत्स्यालयाच्या टाकीत ठेवला जातो. आता पावसाळ्यात याच्यावर शेवाळ उगवलेले आहे. सोबतीला दोन तीन रोपे उगवलेली आहेत. एक चिमुकली गोगलगाय सफर करते आहे, आणखीही जीव जिवाणू असतील. एक छोटासा परिवार!
कुंडीत नियमित पाणी घातले जाते तरी हा प्रवाळ कोरडा राहतो. माशांच्या टाकीत मात्र विरळ शेवाळ येते. पण पावसाळा सुरू झाला की मात्र याच्यावर वन्य जीवन बहरते. हा सृष्टीचा चमत्कार नाही तर काय!
शैवाले आतापर्यंत निकृष्ट वनस्पती समजली जात होती. पण आता संशोधनामुळे किती बहुउपयोगी आहे हे शास्त्रज्ञांच्या ध्यानात आलेले आहे. अन्न, नत्रयुक्त खत, ते जागतिक हवामान चक्रात शैवालांचे महत्वाचे योगदान आहे. 
प्रतिमा ३. गुलाबाची कुंडी


पर्यावरणाची काळजी करणार्‌या आमच्या सरकारने प्राथमिक शाळेच्या पहिल्या यत्तेपासून  या विषयाची पुस्तके नेमलेली आहेत. पुस्तकांसाठी टनावारी लाकूड खर्च होते. पुन्हा पुस्तके बदलली की आणखी टनावारी झाडे बळी जातात. शेवटी सुशिक्षित होऊन हे देशाचे "भविष्य" काय करणार? आणखी पंडिती पुस्तके लिहितील. हे मातीत राबणार नाहीत, झाडे लावणार नाहीत, त्यांचे संगोपन करणार नाहीत. ते काम शेतकऱ्यांचे. आम्ही फक्त आख्याने सांगणार - व्याखाने देणार.


एवढ्या टीचभर जागेत जैवविविधता (biodiversity) बघायला मिळते. तेवढ्यासाठी पण पाऊस पडायला हवा. पण वनेच  खपली तर पाऊस कुठून येणार? पुस्तके घोकून भाराभर मार्क मिळाले तर का भरघोस पाऊस पडणार की जंगलें वाढणार? कदाचित काही मोजक्याच लोकांच्या खिशात पैशाचा पाऊस पडेल. व बरचसे लोक बेकारीच्या वाळवंटात भाजून निघतील.


असे सांगतात, घडणीच्या वयात, १७-१८ वयापर्यंत मुलांचे संगोपन, अध्ययन दिशाभिमुखन होते, त्यावर त्यांच्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरते. पर्यावरण काय हे झाडे, वेली, पक्षी, जनावरे, आणि सूक्ष्म शेवाळे व जीवाणू या सर्वाना समजते, अगदी नवजात अर्भकांना पण कळते. फक्त काळात नाही ते लोभी राजकारणी, सत्ताधीश, उद्योगपती, व्यापारी, व आधुनिक पुरोगामी सुधारलेल्या समाजाला; पंडित पर्यावरणाच्या नावाखाली लठ्ठ ग्रंथांचे भारे उभे करतात. मग आमचे सरकार वेडे होते आणि मुलांच्या पाठीवर बुकांचा भार  वाढत जातो.  
जसे सरकार तसे मास्तर-मास्तरणी, तसे पालक ...  या सर्वांची निसर्गापासून केव्हाच फारकत झालेली आहे. निसर्ग फक्त दृष्टीसुख घेण्यासाठी राहिला आहे. या महानगरात पर्यावरण व जैवविविधता निर्माण झालेली व त्यांचा अनुभव घ्यायला वीतभर तरी जागा कुठे आहे?


पर्यावरणाची समज सर्व जीवमात्राला - जातींना (species) उपजतच असते. ही समज संवेदनशीलतेतून, ज्ञानइंद्रियांद्वारे आणि बोधनेतून येते.  जसे धंदा व्यवसायाची समज येते तशीच पर्यावरणाची पण समज मानवाला येते. ती कमी अधिक प्रमाणात असेल.


पर्यावरण (Environment) केवळ हवामान तापमान नव्हे. परिस्थितीकी (Ecology)  व ऊर्जा (Energy) हे दोनही पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहेत. हे तीनही शरीर (व्यक्ती), कुटुंब (समाज), घर, परिसर, शहर एवढेच नव्हे तर सामाजिक, आर्थिक व राजकीय पर्यावरण सुध्दा ते सामावतात. पण राजकारणी व हितसंबंधीयांनी या सर्वाना राजरोस बाजूला सारलेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या रकान्यांत बसवलेले आहेत. 


याचे कारण साधे आहे: कारण आहे केवळ "भेदानिती" - विभाजन करा आणि सत्ता घ्या (Divide and Rule!) - हे सर्वश्रुत आहे. साम, दाम, दंड आणि भेद या चौकडीतील हि अत्यंत जालीम चौथी नीति! आजच्या आमच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात या चारही नीतिंचा अमर्याद वापर होत असलेला दिसतो व अनुभवास पण येतो. कोण करतात हा वापर?

आज व्यक्तीच्या व समष्टीच्या जीवनत येनकेन प्रकारेण अनेक संस्थांचा (सरकारी, बिनसरकारी, व गैर-सरकारी संस्था / संघटना) हस्तक्षेप आपणास बघायला व अनुभवायला मिळतो. आजचा 'संघ समाज' (mass society) याला सहजपणे बळी जातो. अलीकडचेच सरकारी उदाहरण म्हणजे SEZ (special economic zone)! हे सारे सत्तेचे खेळ आहेत.या सत्तेवर अंकुश आणायचा असला तर सत्तेचे विकेंद्रीकरण हा एकच पर्याय आहे.


हे विकेंद्रीकरण फक्त व्यक्ती व कुटुंबाच्या रूपाने समष्टी अंमलात आणू शकतील, कोणत्याही सामाजिक, आर्थिक व राजकीय संस्था / संघटना नव्हे. असे झाले कि अनाहूतपणे सत्तेच्या केंद्रीकरणाचे - विकासाचा सोनेरी मुलामा दिलेले - पितळ उघडे पडेल. 

वीतभर जमिनीवर निर्माण होणारे "वन्य जीवन" पहिले तरी अशी क्रांती संवेदनशील बोधनेतून निर्माण होईल. सर्व दर्शने, ज्ञाने, विज्ञाने, कला... आपले अस्तित्व पण सृष्टीची  - Mother Nature - देणगी आहे. 

टीप: चित्र १, ही शैवालांची चित्रे  आंतरजालावरून घेतलेली आहेत.  शैवालांच्या ७०००० हून अधिक जाती आहेत. ही खार/गोड पाण्यात, ओलसर भिंतीवर, ओल्या लाकडावर, झाडांवर वाढतात. वेंगुर्ला, सिंधुगुर्ग येथील कृषि विद्यापिठात यांच्यावर संशोधन केले जाते.   
चित्र २ व ३ छायाचित्रे: रेमीजीयस डिसोजा.    

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.|
Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment