![]() |
स्त्री व पुरुष सांगाड्यांची रचना |
माझे मन ठेचाळत
सरपटत या अंधारात
या कवट्या कवटाळत छातीशी...
वारा एक वेडाच फुंकर मारतो
या कनातून त्या कानातून
मग सर्वच कवट्या शीळ घालतात
त्यांचं विरूप संगीत
मला पिसाळते
छातीत धडकते
पडघम बडवल्यासारखे
हाडकांच्या टिपरयानी
आवाज येतात.
इथं अंधारात कुणाचं थडगं ठेचाळतं!
माती... भुसभुशीत जमीन... मांस सडलेलं
त्यातून दोर आतड्याचा हाती लागतो
सात वार लांब
मी तो तटकन तोडतो
आत कुठंतरी असह्य कळ येते
हे तर माझेच आतडे!
परवाच नाही का दफन झाले!
ही माळः
सात जन्मीच्या सात कवट्यांची...
आणि ही परवाची
अजूनही सडतेय
म्हणून हिला दर्प अहंकाराचा!
इच्यावरचं मांस पुरतं सडून जाईल
तेव्हा हा दर्पही नाहीसा होईल.
तेव्हा हिच्यातून सात सूर निघू लागतील.
सात जन्माच्या कवट्या गळ्रयात बांधून
त्याच्या भेसूर संगीताबरोबर
मी नाच करतो आठव्या जन्मीचा.
(काही समाजांत मरणानंतर पुरण्याची प्रथा आहे. तसेच कोण पुनर्जन्म मानतात, कोणी मानीत नाहीत. येथे "मी" हा कवी आहे असे समजायचे कारण नाही. देशी कलाशास्त्रांत नवरस मानले जातात, त्यापैकी एक येथे आहे. कुणी या कवितेला अतिवास्तववादी (surrrealist ) पण म्हणतील. लिहिताना हा विचार केला नव्हता.)
-- रेमीजीयस डिसोजा
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.
अप्रतिम
ReplyDelete@nimish
ReplyDeleteआयुष्याचं जीवघेण सत्य कोरड्या शब्दात सांगता येत नाही -- सत्य हरवतं. ते कवितेतच सांगावं लागतं. धन्यवाद!