March 02, 2011

स्मृतिचित्रें : लक्ष्मीबाई टिळकांची लोकबखर

 "ह्या काही काही आठवणी म्हणजे श्रुती होत."
 [लक्ष्मीबाई टिळक, 'स्मृतिचित्रे', प्र. १  : सोनेनाणे धुऊन घेतले, भाग पहिला, वाक्य पहिले, पृष्ठ १]
 
स्मृतिचित्रे | लेखिका: लक्ष्मीबाई टिळक |

(पहिली आवृत्ती : भाग १ - १५ डिसेंबर १९३४ | भाग २ - १९३५ | भाग ३ - १५ डिसेंबर १९३५ | भाग ४ - डिसेंबर १९३६ | नवी आवृत्ती: प्रकाशक: वरदा प्रकाशन, पुणे. | एकत्र चार भाग: २४ फेब्रुवारी १९८७ | दुसरी आवृत्ती: १ जानेवारी १९८९ | तिसरी आवृत्ती: १ जानेवारी १९९३ | चौथी आवृत्ती: मे २००० | किंमत: रुपये २५०=०० | पृष्टसंख्या: ४५८ ) 


वर अवतरणात दिलेल्या या पहिल्याच वाक्यांत लक्ष्मीबाईंच्या प्रज्ञेची झेप केवढी विशाल आहे याची कल्पना येते.  'आठवणी' म्हणजे 'स्मृती' - पुराणे, महाकाव्ये - किंवा 'इतिहास' म्हटले जाते, आणि 'श्रुती' अर्थातच वेद इत्यादि नाही का?  
लोक-इतिहास :  या आत्मकथेत समकालीन सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्यातील महाभारत येते. आणि गीता पानोपानी विखुरलेली आहे. टिळक लक्ष्मीबाई दोघांनीही समाजकार्याला वाहून घेतले होते. यामुळे आत्मचरित्राला लोक-इतिहासाचे स्वरूप आलेय. त्यांपुढे कथा-कादंबरी यांची काय कथा
असे काहीसे सातशे कोटी व्यक्तिंच्या आयुष्यांतही घडत असावे. फक्त क्वचितच कोणी व्यक्ति त्यांचे शब्दांकन करतात. मात्र ग्रामिण आदिवासी लोककथा-गीते यांत त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते

'स्मृतिचित्रे' वाचताना वेळोवेळी वाटले एका अथांग विशाल सरोवराच्या काठावर मी बसलोय व पाण्यात मला माझे प्रतिबिंब दिसतेय. ते कधी स्पष्ट दिसते, तर कधी झुळुक आली किंवा शिवार गळले की तरंगांत मिसळून जाते, ऊन आले कि ते स्पष्ट दिसते. वेळोवेळी माझ्या आठवणींच्या तारा छेडल्या जातात.

या हिर्याला अगणीत पैलू आहेत. त्या सर्वांची समीक्षा करायची तर त्यापूर्वी अस्तव्यस्त असलेली माझी कुवत मला प्रथम एकत्र करावी लागेल काही काळ तिची जोपासना पण करावी लागेल. यास्तव 'शिक्षण', जे क्षेत्र लक्ष्मीबाईंना टिळकांना प्रिय होते, या एका पैलूपुरतेच मी हे लेखन मर्यादित ठेवतो
"मला कवितेने भंडावून सोडले. ... माझी सर्वात मोठी प्रसिद्ध झालेली मोठी कविता 'पतिपत्नी' ही ... कविता विशेषत: रात्री अंधारात सुचायची. ओळीच्या ओळी डोक्यात यायच्या. त्या मी खडूने जमिनीवर उतरून ठेवायच्या. एखादेवेळेस जवळ टांक नसला की आगपेटीची काडीच दौतीत बुडवून तंकाची भूक काडीवर मी भागवी. सकाळी  ठोंब-यांनी ही रात्रीची बिगार कागदावर नोंदवून घ्यावी. असे करता करता पावणेतीनशे ओळींची कविता तयार झाली" (प्र. ६५ : करंज्यातला मोदक, पृ. ३०५).
लक्ष्मीबाईंचा जन्म सत्तावनच्या [१८५७] बंडानंतर बारा-तेरा वर्षांनी झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय अकरा टिळकांचे सतरा-अठरा वर्षांचे होते. बाई निरक्षर टिळक इंग्रजी शाळेत शिकत होते.
 
हे पुस्तक बीएच्या अभ्यासाला होते असे ऐकिवात आहे. त्या पदवीधरांपैकी किती व्यक्तिना या साहित्यलक्ष्मीने सर्जनशील साहित्य लिहायला प्रेरित केले असेल? ते जाऊदे. किती साक्षर, शिक्षित, सुशिक्षित, प्रव्यवसायिक आपली साक्षरता नोकरी-व्यवसाय या व्यतिरिक्त इतर कोणत्या कामासाठी वापरत असतील
शिक्षण किंवा साक्षरता याविषयी दोन महत्वाची प्रात्यक्षिके या पुस्तकात नोंदवलेली आहेत. एक: कोणीही व्यक्ती कधीही साक्षर होऊ शकते. त्याकरीता सरकारमान्यता, प्रशस्ति शाळा या इमारतीची गरज नाही. दोन : टिळकानी ऐन तारुण्यात ज्या गांवी राहिले तेथे शाळा सुरू केल्या विद्यार्थ्यानी त्याना खुशीने मानधन दिले.
दुदैवाने सद्याचे सरकार व्यक्तिच्या समष्टिच्या खाजगी जीवनांत ढवळाढवळ करते. सरकारने शिक्षणखात्याचा एवढा मोठा डोलारा उभा केलाय पण स्वावलंबी होण्याचे साधन संधी मात्र देत नाही. हे सर्व कशाला? केवळ नोकरशाहीचे पोट भरायला का? गेल्या साथ वर्षांत संपूर्ण साक्षरता का आणता आली नाही? असे कैक प्रश्न उभे राहतात.  

बाईनी प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढले. पण त्यांची गरिबी स्वत: पत्करलेली होती. औद्योगिक संस्कृतीत बहुसंख्य जनतेवर दारिद्र्य लादले जाते. यात लोकशाही सरकारचा किती सहभाग असेल हे मोजण्यासारखे आहे.  
"... त्यांचा फार संताप होई. तेल, शिकेकाई मला कधी मिळाली नाही. ती मागायला गेले की त्यांनी म्हणावे, मोलाची दळणी दळ आणि आण तेल, शिकेकाई" (प्र. : सासुरवास, पृ. ३८).
तरीही बाईंची जीवनोर्मी कमालीची होती. निरक्षर असल्या तरी सृजनशक्ती या आत्मचरित्रात कवितांत दिसून येते. गावागावातून असंख्य निरक्षर बायांनी अगणित ओव्या लिहिलेल्या नसल्या तरी गायलेल्या आहेत. अन त्या पिढ्यान पिढ्या चालत आल्यात. 
"लिहिता-वाचता त्या वेळेस तर अगदीच येत नसे. आणि अजूनही अगदी बेतापुरते. अजून , क्ष ज्ञ, कै खै ही अक्षरे आली, की मी गडबडून जाते ... पण मी म्हणजे अशिक्षितांतील अशिक्षित." (प्र. १३ : सोळा वर्षांची झाली तरी - पृ. ६०). 
निरंतर शिक्षण : मुलभूत शिक्षण म्हणजे मुळाक्षरे व बाराखडी आल्यावर बाई स्वत:च आपल्या शिक्षक झाल्या. मग त्यांची गाडी कुठेही थांबली नाही.
"... त्यांना आपली चूक कळून आली त्यांनी मला पासून ज्ञ पर्यंत अक्षरे वळवण्यास दिली. ती झाल्यावर ची बाराखडी करून घेतली. पण हे शिक्षण देत बसण्यात त्यांना काहीच गंमत वाटेना; माझे शिक्षण तेथेच आटोपले ! मात्र यापुढे माझे वाचन पुष्कळ वाढले त्या वाचनातच बाकीच्या बाराखड्या जोडाक्षरे वगैरे मला आपोआपच आली" (प्र. १४ : टिळकांचा धंदा : माझे शिक्षण पृ. ६५-६६).
मुलभूत शिक्षण म्हणजे मुळाक्षरे व बाराखडी आल्यावर बाई स्वत:च आपल्या शिक्षक झाल्या. मग त्यांची गाडी कुठेही थांबली नाही. निरक्षर जनता व निरक्षर लोकभाषा यांना "लिपीची" कमतरता आहे. तेवढे पण या सरकारला साठ वर्षांत शक्य झाले नाही?
भटकंती:  टिळक लक्ष्मीबाई किती गावांत शहरांत राहिले असतील याची जंत्रीच तयार करावी लागेल. "केल्याने देशाटन" मिळणारे शिक्षण शहाणपण याला स्पर्धा करणारे विश्वविद्यालय अजून अस्तित्वात आलेले नाही. म्हणूनच की काय या देशात कुंभ - महाकुंभ आणि जत्रा - उत्सव - तीर्थयात्रा या प्रथा दृष्ट्या लोकांनी सुरु केल्या असाव्या.
"आमचे बिर्हाड कोठूनही हलले की ते बिर्हाड म्हणजे आम्ही माणसेच तेवढी हलत असू. सामानसुमान तिथल्या तिथे शेजार्यापाजर्यांना अर्पण करण्यात येत असे" (प्र.१२ : पहिला मुलगा, पृ. ५५). 
या पतीपत्नीला मदत करणारे पण अनेक लोक होते, पण ते त्यांनी केलेल्या लोकसेवेचे उतराई होण्यासाठी. या दोघांनीही कधीच संग्रह केला नाही हे विशेष
"काय खुंटावरचा कावळा पाहून दिला !" ... ... "तो करीत जाईल गाणी, आणि तू म्हणत जा. मागा दोघे जण भीक" (प्र. 7: माहेराहून सासरी, पृ. ३२).
"टिळकांनी आपली ध्येये ठरवावी. मी डोळे झाकून ती आचरणात आणावी. त्यांनी कविता रचाव्यात मी त्या गाव्यात. त्यांनी भिक मागावी मी त्याचं झोळी धरून चालावे" (प्र. ८३: मुंबई, पृ. ४००).
आजचे सार्वजनिक शिक्षण : निरक्षर किंवा अशिक्षित व्यक्ति अडाणी असतेच असं नाही, कारण तिचा अहर्निश प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी संबंध येतो. ग्रामिण जनता गेली कांही दशके केंद्र राज्य स्थरावर होणार्या निवडणुकात कोणत्याही पक्षाला बहुमत देत नाहीय. म्हणून सत्तेसाठी सतरा पक्षांची कडबोळी करावी लागतायत. एवढं एक उदाहरण पुरे. सुशिक्षित माणसं शहाणी असतील असे नाही, कारण त्याना विशिष्ट शाखेचे ज्ञान असते चाकोरीत विचार करायची संवय लागलेली असते; त्याना पांडित्याचे शब्दप्रामाण्य चालते, किंबहुना हवे असते

पुस्तक प्रकाशन :  पौगंडावस्थेत असताना मी प्रथम आवृत्तीतील एक भाग वाचला होता. आता मी वाचत असलेली आवृत्ती सन २००० ची आहे. आणि ही संपादित आहे हे पहिल्या नजरेत लक्षात येते. पण हे नमूद केलेले नाही. हे संपादन महाराष्ट्र सरकारच्या 'शुध्दलेखन नियमावली'नुसार केलेले असावे. त्यामुळे वाचण्याची मजा किरकिरी होते. खरं म्हणजे असं करणे अनुचित आहे. पुस्तकातील शब्दभांडार विशेष आहे, त्यातील किती शब्दकोशांत सापडतील याची शंका आहे. टिळकांची बाईंची संक्षिप्त जीवनरेखा दिली असती तर वावगे झाले नसते. भविष्यात कधीतरी या पुस्तकाला संदर्भसूची जोडली जाईल अशी आशा करूया


पहिला नीतिपाठ सरकारला : महाराष्ट्र राज्यात ग्राम-तालुका-जिल्हा पंचायती, नगर - महानगरपालिका  विधानसभा लोकसभा या निवडणुकांसाठी उभे राहणार्या सर्व उमेदवारांकरिता महत्वाची अट:
लोकशाही सरकार जनतेच्या बांधिलकीला बद्ध असायला हवे, जनता सरकारला नव्हे. माणसे कायद्यासाठी नसतात. 'मायबाप' सरकार हा काळ कधीच गेला! जणू हाच पाठ सरकारला द्यायला 'स्मृतिचित्रे' अवतरले असावे. या आत्मचरित्रात 'पुराणांतली वांगी' नाहीत. हा लोकइतिहास आहे. महाराष्ट्रात ग्रामपंचायत ते लोकसभा या अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात. यांत अनेक उमेदवार भाग घेतात. त्यांची शैक्षणिक पात्रता काहिही असो. त्यांच्या जाहिरनाम्यांतील आश्वासने काहिही असोत. या सर्वांना हे पुस्तक परिक्षण करण्यास देण्यात यावे. परीक्षण कमीत कमी ३०० शब्दांचे असावे. त्यांनी केलेल्या परीक्षणाच्या नकला त्या त्या मतदारसंघांत मतदानापूर्वी मतदारांना वाटाव्या. तेच त्यांचे खरे परिक्षक समजा

[शिक्षणावर माझे दोन पुन:शोधीत लेख पहा: 
1. Politics of Literacy in India: Challenges of 21st Century 
 या इंग्रजी लेखांत सरकारच्या धोरणांचे पितळ उघडे केलेलं आहे.]

आतापावेतो लिहिलेले इतिहास फिरंग्यांच्या पाठ्यपुस्तकांचा नमुना समोर ठेवून लिहिले. त्यात राजे-नबाब, त्यांच्या लढाया - कारस्थाने - लोक संहार यांवरच सारा भर असायचा. लोकांचा इतिहास कोण लिहिणार? राणी लक्ष्मीबाईवर किती चित्रपट - टीवी मालिका काढल्या असतील! देवदास कितीकदा चित्रित केला असेल! पण या साहित्यलक्ष्मीत चटकदार सनसनाटी सेक्सी काहीच नाही! पण पाऊणशे वर्षांपूर्वी घडलेली ही कहाणी लोक माध्यमातून कधी कोणी आणील का? 
----
रेमीजीयस डिसोजा
मुंबई 
महाशिवरात्र  २-३-२०११ 
~~~~~~~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

5 comments:

  1. क्षमस्व! वाचकांना नम्र विनंती. काही चुका नजरेस आल्या. उणीवा तर अनेक आहेत. त्यामुळे हे पोस्ट पुन्हा प्रकाशित केले. — रेमी डिसोजा

    ReplyDelete
  2. I remember that Akashvani used have reading of this work. My mother used to listen to it. She didn't used to write or read marathi. But thanks to this program, her effort and some encouragement, she slowly learned it. Just remembered when you said in post that how many of those who had this book in curriculum got inspired.
    thanks.

    ReplyDelete
  3. @Encounters with Reality:
    Thanks for sharing your experience.
    I am not much learned, just old SSC and some technical training. I learned to use computer all by myself, and help I got at cyber cafe.
    I am nervous about computers, because the chasm between the educated – the illiterate, the rich – the poor will continue to increase…

    ReplyDelete
  4. Dear Remi,
    I crossed this book many times in library. Every time gave it a glance of consideration in reading list. Your post has pushed me to it. I'll get in touch with you once I finish reading it after my Field work.

    Love,
    Harshada

    ReplyDelete
  5. Harshada,
    I am sure you shall never finish reading this book... as you go along, you are bound to re-read and re-read... and it's worth it.
    It's OFFICIAL (read double-talker) "women's day" today; hopefully it would be daily in future, after ages of patriarchal domination!
    Love
    Remi

    ReplyDelete