April 25, 2011

टिपणीचे प्रकार अनेक: मौन आणि इतर

जीवनाच्या दिशा व मार्ग

टिपणीचे प्रकार अनेक: १ मौन, २. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ.

१. मौन, हे श्रेणीने व संख्येने सर्वांत प्रथम क्रमांकाला आहे. पण मौन नेहमीच शहाणपणाचे असते असे नाही. कारणे काहीही असोत, पण त्यात आपले हितसंबंध गुंतलेले असतात नक्कीच! मौनपण बोलके असते, ऐकता आले पाहिजे. उदा. इंडियाच्या सरकारला बहुसंख्य असलेल्या दुय्यम दर्जाच्या नागरिकांचे मौन ऐकू यात नाही. यास्तव सर्वच लहान-मोठ्या राजकीय पक्षांना सत्तेसाठी गटबाजी करायला लागते.

२. अनुक्रिया, प्रतिक्रिया. प्रतिसाद, टिका, समीक्षा, पुरवणी, प्रशस्तीपत्र, शेरे-ताशेरे, शेले-शालजोडीतले इ. कोणतीही घटना आपण पाहतो, ऐकतो, वाचतो किंवा तिची चव घेतो तेव्हा मन निर्विकार, सुन्न असतेच असे नाही. नवरसांपैकी कोणतातरी रस उद्भवत असेल की?

घटना वैयक्तिक किवा सार्वजनिक क्षेत्रात असेल. आजचे जीवन एवढे जटील झालेले आहे की क्षुल्लक वाटणारी घटना दूरगामी परिणाम करू शकते. एक म्हण आहे, 'फुलपाखरू वादळ आणते'.

आज जो लाचखोरी, हेराफेरी, काळाबाजार, दडपशाही, भ्रष्टाचार इ. यांचा अचानक डोंब उसळलेला दिसतो त्याची सुरवात पण अशीच झालेली असेल. एकाद्या मौन प्रतिक्रियेने? किंवा निरुपद्रवी वाटणार्‌या घटनेने? आणि आज त्याचे चटके सर्वानाच लागत आहेत.

टिपणीचे स्वरूप मौन असो की शाब्दिक, ही पण घटना असते अन्‌ काहीतरी सांगून जाते. टिपणीमुळे घटनेच्या विषयाला कधी जोड मिळते, कधी नवी बाजू समोर येते. चूका नजरेस येतात. आणि व्यक्ती समष्टीला जोडल्या जातात.

एकाद्या घटनेचा विषय जर लोकहिताचा असेल तर खर्‌याखुर्‌या लोकशाहीत दखल घेतली जाते.

याचे एक उत्तम उदाहरण: अमेरिकेत एक फोटोग्राफर नियमितपणे तेथील अनेक कारखान्यात काम करणार्‌या बाल मजूरांचे फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध करीत असे. त्याचा परिणाम 'बालमजूरी विरोधी कायदा' करण्यात झाला. त्याने काढलेले फोटो पण तत्कालीन समाजावर केलेली निर्भीड टिपणी होती. अशी अनेक उदाहरणे असतील.

घटना: समोर दिसणारी/घडणारी वस्तुस्थिती ही एक घटना, व दुसरी – शब्दचित्र, रेखाचित्र, रंगचित्र, शिल्पचित्र, छायाचित्र, किंवा चलत्‌चित्र इ. अशा स्वरूपाची – कला या सदरातील असेल.

खरं पाहता ही सर्व चित्रे तत्कालीन समाजावर केलेली टिपणी असते, पण ती निस्पृह असतेच असे नाही. आजची वस्तुस्थिती ही भूतकाळ आणि वर्तमान यांचा संमिश्र परिणाम असतो.
दोनही घटना – वस्तुस्थिती वा चित्रे  –  पाहताना एक लक्षात आले. माझ्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती, पूर्वग्रह, अत्याग्रही मते, संस्कार इ. सर्व मी केवल सत्य समजून माझे निर्णय घेतो. अनाहूतपणे मी एका चाकोरीत चालतोय. त्यापलिकडे असलेली वास्तविकता टाळतो. रोजचा पेपर वाचतानाही असेच! फक्त आवडीचे सदर पहायचे. बाकीचे दरवाजे बंद!

अधिक युक्त उदाहरण म्हणजेः मी स्वतःला दिवसात अनेकदा आरशात पाहतो, पण आंतला मी बघायचा आरसा माझ्यापाशी नाही अन्‌ मला हे कधी जाणवत पण नाही! पण आरशात दिसणारा मी उलटा दिसतो, मी मागे सरलो हा पण दूर जातो!
हे निरिक्षण माझे नव्हे, सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका बालिकेने Alice in Wonderland या पुस्तकाच्या लेखकाला, लुईस कॅरोल याला हे निरीक्षण सांगितले होते. (त्यावरून त्याला Through the Looking-Glass हे पुस्तक लिहायची स्फूर्ती मिळाली.) लहान मुले कधी चाकोरीत बंदिस्त नसतात, तीं सृष्टीच्या नियमाने चालतात. पण वडिल माणसे, पालक. शाळा, संप्रेषणाची आधुनिक साधने इ. त्यांची सहजता, निरागसता, उत्स्फुर्तता शिक्षणाच्या नावाने हिरावून घेतात.
अखेर मला गुरू भेटला. आनंद कुमारस्वामींनी मला विधायक, सर्जनशील टीका शिकवली. माझ्या मगदुराप्रमाणे मी शिकलो.

आपल्या सात संवेदना व संवेदन-सक्षमता (माझी इंग्रजी लेखमाला) क्रियाशील असतील तर कोणतेही घटीत साकल्याने समजणे शक्य असते.

― रेमीजीयस डिसोजा, मुंबई
प्रतिमा: "जीवनाच्या दिशा व मार्ग"; ही पण आपल्या जीवन-शैलीवर (life-style?) टिपणी आहे असं समजावं.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

No comments:

Post a Comment