June 15, 2011

तांबूस मायणी काम हवे कुणा

तांबूस मायणी काम हवे कुणा? : एक व्यत्यासकथा  (metafiction)
भातशेती
मुंबईत पावसाला सुरवात झालीय. गांवाच्या - कोंकणच्या आठवणीने काळजात उमाळे येतात. आता पेरणीला सुरवात झाली असणार! शेतात काम करायला घरांत - गांवांत माणसे उणी पडणार! जो उठला तो शहरात जातो. पूर्वी हातात चलन नसायचे, पण कधी कमतरता भासली नव्हती. आता चालनावाचून पाऊल पुढे पडत नाही... असे कैक विचार मनात खळबळ उठवतात.

तांबूस (brown) मायणी (collar) काम म्हणजे शेती - कृषीकला. इलेक्ट्रोनी-माहिती-तंत्र (ET-IT) युगांत अशा कामाला कोण बरें तयार होईल? सर्वांना सफेत मायणीचें किंवा निळ्या मायणीचें काम हवें असतें, नगद पैसे देणारें काम हवें असतें. कुणाला पोटापाण्यासाठीं काम नको. बापजाद्यांनी कमाई करून ठेवलेली आहे नं! मातीचिखलांत, ऊन-हींव-पावसांत शेतीकाम कोणाला करायाचे आहे? सुधारलेल्या प्रगत जमान्यात माती अस्पृश्य झालेली आहे आणि शेतकरी नगण्य झालेले आहेत.

शेतकाम म्हणजे कृषीकला, कला व विज्ञान यांचें संयुग; जैवतंत्राचे (biotechnology) उगमस्थान; पंचमहातत्वांशीं सतत संपर्क.

"उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी"
कोणता होता तो जमाना जेव्हां "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ट नोकरी" ही म्हण आमच्या कानावर नेहमी यायची? त्यावेळीं आमचा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावार होता. काय स्वप्नें पाहिलीं असतील आमच्या कष्टाळू कृषीवलानीं?

आज वेगळाच प्रकार नजरेस येतोय. शेतकरी कर्जबाजारी होतोय, आत्महत्येचा मार्ग पत्करतोय, सुयोग्य शिक्षणाला वंचित राहिलाय, त्याची जमीन औद्योगिक विकासासाठी सरकार कायद्याने हिरावून घेत आहे, त्याचा संसार कुटुंब विस्थापित होत आहे. अशा लाखों विस्थापितांचे लोंढे शहरांकडे लोटलेले आहेत. नगरानगरांत महानगरांत रस्तोरस्ती हे नजरेस पडतात आणि झोपडपट्टयांतून (सरकारी परिभाषेंत त्यांना "गलिच्छ वस्ती" हें नांव आहे). त्यांच्या या वस्त्या बेकायदेशीर समजल्या जातात.


मुंबईत विस्थापित - १
 
मुंबईत विस्थापित  - २
मुंबई शहराचे पद-चिन्ह जेथे जेथे उमटले तेथून विस्थापित झालेले खेडूत 
उदरनिर्वाहाच्या शोधात येथे दाखल झाले. आता त्यांच्या आयुष्यावर नव्हे तर 
  जीवावरच या शहराने पर्यायाने लोकशाही सरकारने "कर" लावलेला आहे.
(Taxing the Life of the displaced)

आणि अडत्यांना, दलालांना आता सुगीचे दिवस आलेले आहेत. आता नोकरदारांना पण हुद्यानुसार वरची कमाई होते असे ऐकिवात आहे.

"पांगिरा" करमुक्त चित्रपट
"पांगिरा" या नांवाचा चित्रपट हल्लींच पाहिला. करमणूक करापासून मुक्त आहे म्हणून पाहिला. विश्वास पाटिल यांच्या "झाडाझाडोरा" कादंबरीवर हा चित्रपट आधारलेला असावा असें वाटले. पण पुस्तकाच्या नांवाचा उल्लेख चित्रपटात दिसला नाही. या कादंबरीला अनेक पारितोषकें दिलींत. आजच्या ग्रामिण परिस्थितीवर चित्रपट व कादंबरी, दोनही चांगले माहितीपट आहेत. मला वाटते हा चित्रपट ज्या प्रसंगाने संपवला आहे पोलिसानी शेतकर्‌यांवर केलेला गोळीबार तेथून सुरू करायला हवा होता. तसं न केल्यामुळे पटकथेची सर्जनशील निर्मितीची संधी हुकली असं मला वाटतं. मला प्रांजळपणे वाटते की कलावंताने तत्कालीन समस्यांना उत्तरे द्यायला हवीत. सरकार मात्र दानशूर आहे. तें चित्रपटाला करमुक्ती - बक्षिसे - पदके देते. पण विस्थापितांच्या जीवावर घाण पाणी वापरायचा कर लावायला मागेपुढे पहात नाही. हे इंडियाच्या आर्थिक राजधानीचे खरे स्वरूप!

या निमित्ताने मला शरच्चंद्र चटर्जींची "सव्यसाची" – पथेर दाबी – ही कादंबरी आठवते.
या कादंबरीचा शरच्चंद्र चतर्जी यांनी केलेला शेवट साधा, स्वाभाविक व विधायक सर्जनशीलतेचा नमुना आहे. कथेचा विषय आहे, भारतांत सशस्त्र स्वातंत्र्यसंग्राम. या संबंधांत पुढील परिच्छेद पुढें उद्धृत करतों.

लोकशिक्षण व साक्षरता
"... इथून पुढे खेड्याची सेवा हे माझं एकमेव व्रत. असा एक काळ होता, की या आपल्या कृषिप्रधान भारतदेशाचा खेडेगाव हाच प्राण होता. खेडेगावच त्यांचं अस्थि-मज्जा-रक्त होतं. आज ते खेडेगाव विध्वंसाच्या मार्गाला लागलं आहे. पांढरपेशे लोक खेडेगाव सोडून शहरात येतात, शहरातूनच खेडेगावावर सत्ता गाजवतात आणि तिथूनच त्यांची पिळवणूक करतात. खेडेगावाशी त्यांचा लागाबांधा असेल तर तो हाच. दुसरा कसलाच नाही. न का ठेवीनात? पण आजवर ज्या शेतकर्‌यानं त्यांना पोटाला अन्न आणि पांघारला वस्त्र दिलं, तोच शेतकरी आज अन्नाला मोताद झाला आहे. निरक्षर आहे, निरुपाय होऊन मरणाच्या पंथाला लागलाय! यापुढं मी आता त्यांच्या कल्याणासाठीच स्वतःला वाहून घेणार. भारतीनंसुद्धा या कामी मला जीव तोडून मदत करायचं कबूल केलंय. आता आम्ही गावोगाव शाळा उघडूं. जरूर पडली तर त्यांच्या घराघरातून फिरून मुलाबाळांना शिक्षण द्यायचं काम हिनं पत्करलंय. माझा संन्यास देशासाठी आहे — स्वत:साठी नव्हे डॉक्टर." (पृ. ३९९-४००)
दर वर्षी देशांत विज्ञान-शाखांत लाखो पदवीधर तयार होतात. त्यांत वनस्पतीशास्त्रज्ञ पण असतात. त्यातले बहुतेक कारकुनी करण्यात बाकीचे आयुष्य खर्च करत असावेत? त्यांनी चुकूनही टिनाच्या डब्यात माती भरून मिरची, मोहरी, हळद आलं इ. रुजत घातली असतील का शंकाच आहे. त्यांचे शिक्षण प्रयोगशाळेतच राहते.
* * *
टीप:
१. "सव्यसाची" – बंगाली नांव: पथेर दाबी – या कादंबरीला ब्रिटीश सरकारने बंदी घातली होती, ती स्वातंत्र्यानंतर उठवण्यात आली. मामा वरेरकरांनी इचे मराठी भाषांतर केले. शरच्चंद्र देशांतील प्रत्यक्ष वस्तुस्थिती पूर्णत: जाणून होते. यात कुठही अतिरंजीत भाग नाही. कुठंही भडकपणा नाही.
२. वाचकांनी आपल्या अनुक्रिया - प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्या.
~ ~ ~ ~ ~ 
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

4 comments:

 1. 'मायणी' हा शब्द पहिल्यांदाच वाचनात आला. तो कितपत आवडला ते सांगता नाही येणार वापरल्याशिवाय.

  ReplyDelete
 2. @aativas,मार्केटात आतां बरंच कांहीं रेडीमेड मिळतं: नवजात मुलांसाठी, मिल्क-फूड बूट, कपडे, घर, अन्न, पेयं, मनोरंजन, सरोगेट मदर; शेल्फवर पसंतीचे मूलपण मिळतें दत्तक घ्यायला - प्रसूतीचे कष्ट नाहीत. बलुतेदार-अलुतेदार कधीच गेले. वने गेली. शेती गेली. जमीन-पाणी-हवा दुषित झाली. मायणीचें काय? आतां फक्त भाषणं द्यायचीं. आणि रोमचा सम्राट निरोप्रमाणे आपापला अहंकार गोंजारत बसायचे.

  ReplyDelete
 3. सविताजी, या ब्लोग-पोस्टाचे इंग्रजी रुपांतर / संपादन ARCHETYPES INDIA वर प्रकाशित करत आहे. जरूर वाचा

  ReplyDelete
 4. खुलासा: "तांबूस मायणी" हा खरं अप-प्रयोग आहे. चिखला-मातीत काम करणारे शेतकरी, त्यांच्या बंडी - पैरणीला मायणी कुठून! इथं तो खास उच्चभ्रू लोकांसाठी आहे.

  ReplyDelete