एक मध्यांतर या ब्लॉगच्या ओटीवर
![]() |
माझ्या घराची ओटी |
हा ब्लॉगच आहे मध्यांतर, जशी पारंपरिक ग्रामिण घराला असते ओटी. एक आंतले जग - वैयक्तिक, खाजगी ; एक बाहेरचे जग - जळ, जमीन, वानसें, वनचर, सगेसोयरे, शेती, नेआण...
दोन्ही जगे कार्यरत असण्याची - श्रम, विश्राम, स्वास्थ्य, अध्ययन आणि प्रजनन या सृष्टीने सजीवांना प्रदान केलेल्या पांच अंगभूत स्वायत्त कार्यांची; व्यक्ती आणि समष्टीची.
सिनेमाघरालापण ओटी हवी असते. अंधारातून उजेडात येण्यासाठी. मायावी वास्तवाच्या दुनियेतून वास्तव जगात येण्यासाठी! उत्तरेच्या शीत कटीबंधातून दक्षिणेच्या उष्ण कटीबंधात यायला!
वर उल्लेखलेल्या नैसर्गिक पांच कार्यात जसे संतुलन हवे तसेच वास्तव आणि मायावी वास्तव यात पण हवे; शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी या संतुलनाची अनिवार गरज असते.
कारण साधेच आहे. आजच्या ET-IT च्या युगात, पर्यायाने औद्योगिक संस्कृतीत, अनेक माध्यमातून 'मायावी वास्तवता' अती अवास्तव बोकाळलेली आहे यात शंकाच नाही. एव्हढी की कुप्रसिद्ध गोबेल्सच्या तंत्रामुळे आपल्याला हेच सत्य वाटू लागते. मग आपण मायावी वास्तवाचा उपभोग घेत असूं, किंवा ते निर्माण करण्याचे करण्यासाठी उपजिविकेचे काम करीत असूं.
घराची ओटी म्हणजे आंतबाहेर येणे-जाणे यांमधील सबोध जाणीवेचे मूर्त साधन (concious entry and exit) असं आल्डो वान आय्क हा वास्तुविद म्हणतो. याची सर्वपरिचित उदाहरणे: मंदिराचे गोपूर, किंवा घराचे प्रवेशद्वार जेथे तोरण बांधले जातें, समोर रांगोळी घातली जाते !
मला वाटते ब्लॉगचं पण असंच काहीसं.
मात्र येथे आपले सर्वच परिचित आपला ब्लॉग वाचायला येतीलच असं नाही.
पण खेडेगांवात दोनशे घरांतली बाराशे पंधराशे लहानथोर माणसे सर्वांनाच परिचित असतात. त्याशिवाय पंचक्रोशीतील इतर व्यक्ती परिचित असतात. खेडेगांवात समष्टीचे विश्व प्रसारण पावते व आपले खाजगी विश्व लघुत्तम किंवा किमानोत्तम होते; त्यामुळे आपल्याला ओळखीची - स्वत्वाची - (identity) उणीव कधीच जाणवत नाही, भासतही नाही. समष्टी एकसंध जमात बनते. मग घरातल्या लग्न-बारशाच्या कार्यासाठी नारळ घेऊन तोंडी आमंत्रण दिले तरी चालते. शेवटच्या रवानगीसाठी लोक स्वत:हून जमा होतात.
पण* ब्लॉगचे अस्तित्व "जगभर अरण्य" - जाल (www: world wide wilderness) अशा अवस्थेत असते. यास्तव मला नेहमीच जाणीव होत असते : एवढे महागडे माध्यम कशासाठी कितपत वापरायचे? वैयक्तिक बाबींना येथे जागा नाही. तरीपण लिहिणारा मी व लेखनातला मी आणि वाचणारा मी (वाचक) हे जाणता-अजाणता एकमेकास, दुसर्यास किंवा स्वत:स पहात असतात.
मायावी वास्तव:
शब्द किंवा चित्र - जसे 'झाड' हा शब्द किंवा झाडाचे चित्र केवळ मायावी वास्तवता असते; ते कधीच सत्य, वास्तव नसते. आपली बोधना (perception) त्या शब्दाचा / चित्राचा अर्थ दाखवते. जितकी बोधना विस्तृत, प्रगल्भ तेवढा त्याचा अर्थही. म्हणून प्राचीन सूक्ताचा साकल्याने अर्थ समजणे कधीकधी दुष्कर होते. मग आदिशंकराचार्य एका कडव्यावर वीस कडव्यांची टीका लिहितात, आचार्य रजनीश वीस पृष्ठांची टिप्पणी लिहितात. 'ॐ' हे संकेत चिन्ह (icon) कोणाला क्षणार्धात समजले असेल. पण या लेखकाला मात्र कधी समजेल याची खात्री नाही; उगाच भावूक होण्यात काय अर्थ?
(आज गटारी अमावास्या!)
~ ~ ~ ~ ~ © Remigius de Souza. All rights reserved.|