July 30, 2011

मध्यांतर ओटीवर

एक मध्यांतर या ब्लॉगच्या ओटीवर 

माझ्या घराची ओटी
हा ब्लॉगच आहे मध्यांतर, जशी पारंपरिक ग्रामिण घराला असते ओटी. एक आंतले जग - वैयक्तिक, खाजगी ; एक बाहेरचे जग - जळ, जमीन, वानसें, वनचर, सगेसोयरे, शेती, नेआण...

दोन्ही जगे कार्यरत असण्याची - श्रम, विश्राम, स्वास्थ्य, अध्ययन आणि प्रजनन या सृष्टीने सजीवांना प्रदान केलेल्या पांच अंगभूत स्वायत्त कार्यांची; व्यक्ती आणि समष्टीची.

सिनेमाघरालापण ओटी हवी असते. अंधारातून उजेडात येण्यासाठी. मायावी वास्तवाच्या दुनियेतून वास्तव जगात येण्यासाठी! उत्तरेच्या शीत कटीबंधातून दक्षिणेच्या उष्ण कटीबंधात यायला!

वर उल्लेखलेल्या नैसर्गिक पांच कार्यात जसे संतुलन हवे तसेच वास्तव आणि मायावी वास्तव यात पण हवे; शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी या संतुलनाची अनिवार गरज असते.

कारण साधेच आहे. आजच्या ET-IT च्या युगात, पर्यायाने औद्योगिक संस्कृतीत, अनेक माध्यमातून 'मायावी वास्तवता' अती अवास्तव बोकाळलेली आहे यात शंकाच नाही. एव्हढी की कुप्रसिद्ध गोबेल्सच्या तंत्रामुळे आपल्याला हेच सत्य वाटू लागते. मग आपण मायावी वास्तवाचा उपभोग घेत असूं, किंवा ते निर्माण करण्याचे करण्यासाठी उपजिविकेचे  काम करीत असूं.

घराची ओटी म्हणजे आंतबाहेर येणे-जाणे यांमधील सबोध जाणीवेचे मूर्त साधन (concious entry and exit) असं आल्डो वान आय्‌क हा वास्तुविद म्हणतो. याची सर्वपरिचित उदाहरणे: मंदिराचे गोपूर, किंवा घराचे प्रवेशद्वार जेथे तोरण बांधले जातें, समोर रांगोळी घातली जाते !

मला वाटते ब्लॉगचं पण असंच काहीसं.
मात्र येथे आपले सर्वच परिचित आपला ब्लॉग वाचायला येतीलच असं नाही. 
पण खेडेगांवात दोनशे घरांतली बाराशे पंधराशे लहानथोर माणसे सर्वांनाच परिचित असतात. त्याशिवाय पंचक्रोशीतील इतर व्यक्ती परिचित असतात. खेडेगांवात समष्टीचे विश्व प्रसारण पावते व आपले खाजगी विश्व लघुत्तम किंवा किमानोत्तम होते; त्यामुळे आपल्याला ओळखीची - स्वत्वाची - (identity) उणीव कधीच जाणवत नाही, भासतही नाही. समष्टी एकसंध जमात बनते. मग घरातल्या लग्न-बारशाच्या कार्यासाठी नारळ घेऊन तोंडी आमंत्रण दिले तरी चालते. शेवटच्या रवानगीसाठी लोक स्वत:हून जमा होतात.

पण* ब्लॉगचे अस्तित्व "जगभर अरण्य" - जाल (www: world wide wilderness) अशा अवस्थेत असते. यास्तव मला नेहमीच जाणीव होत असते : एवढे महागडे माध्यम कशासाठी कितपत वापरायचे? वैयक्तिक बाबींना येथे जागा नाही. तरीपण लिहिणारा मी व लेखनातला मी आणि वाचणारा मी (वाचक) हे जाणता-अजाणता एकमेकास, दुसर्‌यास किंवा स्वत:स पहात असतात.

मायावी वास्तव:
शब्द किंवा चित्र - जसे 'झाड' हा शब्द किंवा झाडाचे चित्र केवळ मायावी वास्तवता असते; ते कधीच सत्य, वास्तव नसते. आपली बोधना (perception) त्या शब्दाचा / चित्राचा अर्थ दाखवते. जितकी बोधना विस्तृत, प्रगल्भ तेवढा त्याचा अर्थही. म्हणून प्राचीन सूक्ताचा साकल्याने अर्थ समजणे कधीकधी दुष्कर होते. मग आदिशंकराचार्य एका कडव्यावर वीस कडव्यांची टीका लिहितात, आचार्य रजनीश वीस पृष्ठांची टिप्पणी लिहितात. 'ॐ' हे संकेत चिन्ह (icon) कोणाला क्षणार्धात समजले असेल. पण या लेखकाला मात्र कधी समजेल याची खात्री नाही; उगाच भावूक होण्यात काय अर्थ?

(आज गटारी अमावास्या!)
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

 1. For a moment I thought that you are going to declare a short break from your blog. Glad to note that you don’t intend so!

  A discretion regarding whom to allow ‘inside’ and whom to keep ‘outside’ of our life is absolutely essential. As we come across many nameless and faceless strangers, more so in the blog-world. I liked the integration of Architectural concepts (experiences) and the blog concepts.

  We don’t understand ancient concepts because our life, perceptions and experiences have changed. Even the great seers would find today’s life amazing – I don’t know whether it is better or not, but for us that is the ‘Reality’ and we have to live with that. Always wonder what generations after 5000 years would think about us. Because even today there is such a vast range of life, culture, tradition .. they might be confused about us like we are bout past traditions.

  And your house in Konkan is beautiful… do you often go and stay there?

  Sorry for not responding in Marathi :-(

  ReplyDelete
 2. सविताजी! बडी मुश्कीलासे मिलता है मगर एक कदरदान. आणि तुम्ही तर विचारांना चालना देतां. ब्रेक घेऊन कसं चालेल? सवड भरपूर आहे, पण वेळ नाही. तन-मन ही सतत श्रम-विश्राम-स्वास्थ्य- अध्ययन आणि प्रजनन विचार, कल्पना, प्रकल्प सतत बदलणाऱ्या युगात, व्यतीत करणे यात सवडीचा विनिमय करणे एवढेच! याला कोणी व्यक्ती वा संस्था, कोणत्याही युगात मनाई करू शकत नाही.

  येथे अनुभवाची नोंद केलीय. या काँक्रीटच्या महानगरात मला स्वत्व-संघर्ष (identity crisis) कधीच जाणवला नाही. यामुळे कोणत्याही वादाचा (ism) पाठपुरावा करण्याचे मला कारणही नाही! एकदा का समष्टीचे दर्शन झाले की सारे वाद गौणच नव्हे तर तुच्छ होतात. मी समाज (society), जमात (community) हे शब्द येथे जाणीवपूर्वक वापरत नाही.

  वास्तूची सामाजिक अनुभवाशी सांगड स्वाभाविक आहे. कारण हा अनुभव वैश्विक आहे. अन्न, निवारा अन् वस्त्र या केवळ मूलभूत गरजाच नव्हेत तर संस्कृतिच्या मूलभूत अभिव्यक्ती पण आहेत. पंडित लोक विसरले त्याला मी काय करूं? सुदैवाने मला या तीन गरजांच्या पूर्तीसाठी लागणारे मूलशिक्षण १५ व्या वर्षांपर्यंत मिळाले. हे मुंबईत वा ऑक्सफर्डला मिळाले नसते.

  ओटीचे अस्तित्व पुरातन आहे. ती सिंधू संस्कृतीत अगदी लहान घरातपण आहे, एस्किमोच्या इगलूत आहे, मंदिरात याला सभाघर नाव आहे. (Minimal house! ओटी, माजघर व सैपाकघर एवढेच!)
  ५००० वर्षें कां? हा आमचा 'काळ' जेवढ्या झपाट्याने आमच्या गळ्यातला फांस झालाय त्याच वेगाने नष्ट होणार हे अटळ आहे. किती महाबली समाज - साम्राज्ये यापूर्वी गेले? मात्र लोकमात्र राहिले!

  ReplyDelete