September 30, 2011

बा. भ. बोरकरांची "कृतार्थ जीवित" आणि पांच कविता

बालकृष्ण भगवंत बोरकर (१९१०-१९८५)
 "कृतार्थ जीवित" ― कविता बोरकरांची झाली माझी प्रार्थना

    ॥  कृतार्थ जीवित ॥ 

ओळखतिल जे मला आणि मज
दावितील मम यथार्थ ओळख.
कणकणिं माझ्य, देतिल किंवा
अवघ्या ब्रम्हांडाची पारख.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ १ ॥

निसर्गसम जे संतत सुंदर
नित्य निरामय जे बाह्यांतर.
सुखदुःखाच्या स्थित्यंतरिं जे
अखंड आनंदाचे निर्झर.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ३ ॥

आकाशापरि कवळिति जग जे
उजळिति, जिवविति तेजें अविरत,
ढग जे येती भाळीं त्यांच्या
धुळींत पिकते त्यांनी दौलत.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित .    ॥ ३ ॥

सागरसम जीं विशाल हृदयें
गगन धराया करिती तडफड
अपेश जडलें तरि जयांना
धडपडण्याची दुर्दम आवड.
असीम त्यांवरि प्रेम करुनियां
करीन मी हें कृतार्थ जीवित.    ॥ ४ ॥

(दूधसागर, १९४७; बोराकरांची समग्र कविता, २००५| पृष्ठ २२९) 
शाळेच्या पाठ्यपुस्तकात ही कविता शिकलो होतो. अगदी तोंडपाठ. पुढे आयुष्यभर ती कधी मनातल्या मनांत, कधी मुक्त आवाजात गात आलो. पण एकदा वाचकाच्या एका टिप्पणीला प्रतिसाद देताना ही कविता शान्ता ज. शेळके यांची आहे असा उल्लेख केला होता. त्या चुकीची जाहीर दुरुस्ती इथं करतो. टागोरांच्या "उच्च जेथा शिर..." या कवितेप्रमाणे "कृतार्थ जीवित" ही पण आयुष्यभर माझ्यासाठी प्रार्थना झाली.

* * *
     ॥ मागणें ॥

माझें थकलें मागणें तुझें सरेना दान
गिमामागून अमाप तुझें पिके समाधान

दिसा वरुषे चांदणें स्वर्ग रात्रीचा आंदण
दाही दिशांच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण

आतां खुंटली रे तृष्णा माझें कुंठलें मागणें
मीच झालो तुझ्या हातीं तुझें लाडकें खेळणें

तुझें माझें दयासिंधो जगावेगळालें नातें
तुझ्या माझ्या जिव्हाळ्यांत उभें त्रैलोक्यच न्हातें

माझ्या मागण्याहुनी रे तुझें देणेंच शहाणें
'तुझें-माझें' हेहि आतां फक्त शब्दांचे बहाणे

६ .१२ .१९५९ (चित्रवीणा, १९६० | बोरकरांची कविता, १९६०  | बोरकरांची समग्र कविता, २००५, पृष्ठ ४३१)
बोरकरांनी कोणाला उद्धेशून ही कविता लिहिली हें स्पष्टच आहे. मला मात्र हा ज्याचा अनुभव घेतां येतो असा निसर्ग दिसतो - सृष्टी दिसते.
* * *
 ॥ भाताचें रोप ॥ 

चिमणें इवलालें बीज
रम्य त्यांत होती शेज
दीड वितीचें कुणी रोप
घेत तिथें होतें झोप

ऊन म्हणालें, "ऊठ गड्या !"
पाऊस वदला, "मार उड्या
जगात येरे या उघड्या
करीं जळाच्या पायघड्या."

वायु बोलला, "ऊठ किं रे
माझ्याशीं धर फेर बरें
हसलें जर आपणां कुणी
दावुं वाकुल्या नाचोनी!"

भूमि म्हणाली, "चल बाळा,
वाजव पाण्याचा वाळा
आंगी हिरवी सोनसळा
घालुनि ही दावी सकळां. "

झोप झटकुनी तें उठलें
नंदबाळ जणुं अवतरलें
पाउस, वारा, ऊन तसें
जमले भवंतीं गोप जसे

अद्भुत याचा खेळ अहा!
जरा येउनी पहा तरी
उगवे, चमके पहा पहा
मोरपिसांचा तुरा शिरीं

केपें, ८.८.१९४० (बोरकरांची कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५ पृष्ठ  ३२७)
मी माझ्या निकटच्या लोकांना सांगतो तुमच्या लहान-मोठ्या मुलांना हंगामांत भातशेती दाखवायला "ट्रीप" काढा. डिस्ने-लॅंड नाही पहिले तरी चालेल.
* * *

    ॥ माडाचें भावगीत ॥

ताठ उंच मी उभा नभास नित्य बाहुनी
राहिलो तुझ्याचसाठिं बाहु हे उभारुनी

स्वर्ग सांडिला मुदें तुझ्याच मुक्तिकारणें
देव वाहिला तुला, तुलाच वाहिलें जिणें

तापतां उन्हीं तुला दिली प्रशान्त सांवली
भागवावया तहान गोड गार शाहळीं

मेघ वारिले किती सुरम्य बांधुनी मठी
खावया दिलीं तुला फळें रसाळ गोमटीं

स्नान उष्ण घातलें तनूस तेल लावुनी
घास लाविले मुखा मुठेल तया मुठेल त्यात वाहुनी

रात दाटतां घरीं सुवर्णदीप लाविले
कुंतलीं प्रभातकालिं दैन्य सर्व झाडिलें

लग्नकारणीं, सणासुदीस, दुःखसंकटीं
साह्य मीं दिलें तुला सदैव बांधुनी कटी

स्वर्ग दाविण्या तुला स्वतःच जाहलों शिडी
चांदण्यांचिया तुला दिल्या भरून कावडी

गीत ऐकुनी तुझें तरारलों, थरारलों
नी चितारुनी भविष्य मी सहर्ष डोललो

तू परी कृपेमुळेंच होसि नित्य आंधळा
अन्‌ सुखामुळेंच जासि दुर्गतीचिया तळा

शंभु ठाकतां समोर गांगतीर्थ सांडुनी
कंठिंच्या हलाहलास जासि शीघ्र मोहुनी

कोटितीर्थ, मानवा ! असून माझाया शिरीं
तूं विषार्थ लाविली गळ्यास माझिया सुरी

स्वर्ग लाभतां करीं तयास नेसि रौरवा
धन्य धन्य बुद्धि रे तुझी विचित्र मानवा !

दुर्गतींत परी तुला करीन साथ मी
भावबद्ध मी तुला, तुझाच मित्र नेहमीं

भाविलें तुझ्यासवेँ रमेन दिव्य गौरवीं
स्वप्न तें विरून आज मी विषण्ण रौरवीं !

मुंबई, २६.५.१९४६ (आनंदभैरवी, १९५० | बोरकरांच्या कविता, १९६० | बोरकरांची समग्र कविता, २००५  पृ. २८२-२८३)
हल्लीच एक विज्ञान विषयक लेख वाचला. (दुवा : Coconuts and sunshine will power South Pacific islands )   आता नारळापासून वीज तयार करण्यात येणार आहे. आमच्या अतिउत्साही राजकर्त्यांनी जर असा प्रकल्प सुरु केला तर तो आणखी किती शेतकरी लोकांचा बळी घेईल? दक्षिण अमेरिकेत मक्यापासून डिझेल तयार करण्याचा कट तर जगजाहिर झाला आहे. भांडवलशाहीची हवस कोठवर जाईल याला मर्यादा नाही. म्हणून का माड म्हणतो मी विषण्ण रौरवीं?
* * * 

  ॥ कवि कोण ? ॥

देवलसी जीव सदाचा उदासी
                  फुकाचा सुखाची पार नसे
भावनेचा फूल भक्तीचा गोसावी
                  दिसे तसें गोंवी काव्याभासें
लोण्याहून मऊ मायेचे अंतर
                  दुर्बळा अंतर देत नसे
देवाचे संदेश उकलुनी दावी
                  विश्वासी सुखवी आत्मज्ञानीं
मनाने बालक बुद्धीने जो वृद्ध
                  तोडितो संबंध जगे जरी
सौंदर्याचा भोगी जीवनी विरागी
                  निद्रेतही जागी जगासाठीं
कर्तव्याची चाड कुडीच्यापरीस
                  दगडा परीस करूं शके
मतीने कृतीने उक्तीने निर्मळ
                 तेजाने उजळ करी जना
हाच खरा कवी प्रीत पाझरवी
                  तेजें दिपे रवि ईश्वर हा

धारवाड १९२८ (प्रतिभा, १९३० | बोरकरांच्या कविता १९६० | बोसक. २००५ पृष्ठ ७०)
बोरकरांनी अठराव्या वर्षीं लिहिलेली ही कविता त्यांचे "दिशाभिमुखन" (orienetation) दाखवते. व्यक्तीच्या पुढील आयुष्याची मांडवळ संगोपन, अध्ययन, पर्यावरण व दिशाभिमुखन पहिल्या पंधरा ते अठरा वयापर्यंत होते, त्याचा हा दाखला. नंतरच्या काळांत त्यांनी एका संमेलनांत "संत कवी" आणि "साहित्यिक कवी" यांतला फरक स्पष्ट केला होता.
#
टीप : या कविता निवडक नाहीत. पण त्यांना प्रातिनिधिक म्हणता येईल. बोरकरांच्या कविता म्हणजे "आरसा". म्हणून या कविता आवड - नावड अशी प्रतवारी लावून निवडलेल्या नाहीत. तरीही अशी एक कविता, "मी अश्रांत प्रवासी", जिने माझ्यातल्या भटक्याला स्पर्श केला, ती इथे उद्धृत केलेली नाही.

 ॠणनिर्देश : या कविता "बोरकरांची समग्र कविता - खंड : १ " या पुस्तकांतून घेतल्या आहेत. (प्रकाशक: देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे | २००५ | मूल्य : ४५० रुपये | पृष्ठें : एकवीस + ४४९) या पुस्तकांत ३४३ कविता संग्रहित केल्या आहेत.  


Images: Sorce: Google Sites

© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

2 comments:

  1. धन्यवाद, रेमी ! तुमच्यामुळे फारा दिवसांनी पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला !

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही फार बरं वाटलं कोणीतरी या कविता वाचल्या. आणि पोहोच दिली. तुमचा G+ वर ब्लॉग उघडला आणि आनंदयात्री -- जी कधीकधी गुणगुणतो नजरेस पडली. दुधात साखर पडली.

      Delete