September 24, 2011

सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र : एक ओयासिस

सिद्धेश्वर मंदिर
सिद्धेश्वर मंदिर, सोलापूर, महाराष्ट्र  
ऐन रखरखित उन्हाळ्याचे कोरडे दिवस होते. अन्‌ मी अचानक विजापूरला माझ्या यात्रेला निघालो. चक्क वेडेपणा! पहिला मुक्काम सोलापूर. कुठे जायचे, काय पाहायचे, काहीच ठरवले नव्हते. पायीं भटकत निघालो आणि सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलो, चुंबकाने ओढल्यागत!

मंदिराच्या प्रांगणात उतरलो आणि चकित झालो, भारावलो. सारी दुपार तेथेच काढली. संकुलात सभोवार भटकलो. कधी झाडांच्या सावलीत ताणून दिली. आणि आठवणीसाठी त्याचा एक आराखडा रेखाटला. जवळ कॅमेरा होता, पण एकही फोटो टिपला नाही. सारा वेळ तेथील शांत शीतळ वातावरणाचा सर्व संवेदना एकवटून आस्वाद घेत राहिलो.

सोलापूर, विजापूर जिल्हे कमी २५ ते ३० ईंच पावसाचे, उष्ण-कोरड्या हवामानाचे. अर्थात येथे पाण्याची कमतरता! आणि इथे पाहातो तर पारंपरिक वास्तुशिल्पाने ओयासिस निर्माण केले होते.

आजच्या सुधारलेल्या युगात पर्यावरणाचा बराच गवगवा होतोय. पण व्यवहारात मात्र उलटेच होत असलेले दिसते.

शहरांत इमारतींची उंची वाढत जातेय तर खेडोपाडीं पाण्याचं दुर्भिक्ष्य वाढतेय. कोंकणात १००-१२०  इंच पाऊस पडतो पण जमिनीतील पाणी १५० मात्र फूटाहून खाली गेलेय. मुंबई महानगरात पाण्याची कशी वाताहात होतेय विचारू नका!

वास्तू-महाविद्यालयात भारतीय वास्तूशिल्पाच्या इतिहासाचा अभ्यास करताना या मंदिराचा उल्लेख कधी आला नाही. अर्थात ती पुस्तके परदेशी विद्वानांनी लिहिली होती.

या वास्तू-इतिहासाचा अभ्यास करताना (शिकवताना व शिकताना) समकालीन नैसर्गिक, तसेच सामाजिक, राजकीय व आर्थिक पर्यावरणाचा विचार कधी शिवलाच नाही. केवळ सौंदर्यशास्त्राच्या रूढ संकेतांचा रट्टा मारणे चालत असे.

मूलतः वास्तू व पर्यावरण यांचा घनिष्ट संबंध आहे. किबहुना पर्यावरणात बदल करणे हा वास्तूचा मूल उद्देश आहे, मग ती झोपडी असो की प्रासाद असो, शेती असो वा उपवन असो, विहीर असो वा तलाव असो (हे सर्व वास्तशिल्पाचे प्रकार). पर्यायाने वास्तू पारिस्थितिकीत पण बदल करते आणि ऊर्जेचा व्यय पण करते.*

जेथे जळ आले तेथे जीवन आले, तेथे जलचर आले, तेथे वानसे आली, तेथे वनचर आले, त्याने समृद्धी आली.

उजाड फतेपूर सिक्री : ही वास्तू मोगल बादशहा अकबराने आपल्या नव्या राजधानीसाठी बांधली. हे सर्वश्रूत आहे. तेथे खास तानसेनसाठी एक छोटा कृत्रिम तलाव बांधलेला आहे व मध्यभागी गाण्यासाठी बैठक आहे.

अकबराने सर्व लवाजमा घेऊन त्याच्या नव्याकोर्‌या राजधानीत स्थलांतर केले. पण काही दिवसांनंतर तो आपला बाडबिस्तरा घेऊन परत मागे गेला. कारण तेथे पाणी पुरवठा नव्हता. मुंबईची पण अशी अवस्था व्हायला फार काळ जाणार नाही!

उजाड पडलेली फतेपूर सिक्री 'वास्तूशिल्पा' चे एक वस्तूसंग्रहालय musium होऊन राहिली.

सिद्धेश्वर मंदिराची वास्तू निवांतपणे पाहिली. मंदिराच्या चारी बाजूंना सिद्धेश्वर तलावाचे पाणी आहे. विशेष म्हणजे पाण्याचे नियोजन व संधारण यांचे हे अनन्यसाधारण जीवंत - जागृत - उदाहरण आहे! अशा इतरत्र अनेक विहिरी, तलाव, मंदिरे, मशिदी, राजवाडे, गांवे, किल्ले, उपवने, शेतीवाड्या इ. वास्तू सर्व भारतभर आहेत. प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय! पण यासम ही! एक सुजलाम सुफलाम वास्तू!

अशा पारंपरिक वास्तू लोकशिक्षणाची लोकाभिमुख साधने असतात असा माझा निष्कर्ष आहे आणि श्रद्धा पण! जो शिकला नाही तो करंटा. येथे प्रात्यक्षिकाने, उदाहरण देऊन व्यावहारिक पाठ दिले जातात असे मला प्रांजळपणे वाटते. याला देव पावले म्हणायचे नाही का?

माणसे ध्रुवीय प्रदेशांपासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत लक्षावधी वर्षें चित्रविचित्र नैसर्गिक परिस्थितीत राहात आले.

सृष्टी मानव समाजाना ओळखत नाही मग तो समाज आपल्या कल्पनेप्रमाणे मागासलेला असो वा पुढारलेला. सृष्टी मानवाच्या सामाजिक अधिश्रेणी वा हुद्दे ओळखत नाही, मग ते सम्राट-पंतप्रधान, संत-महंत वा काळे-गोरे-पिवळे-ब्राऊन असोत. सृष्टीच्या लेखी जीवाणू व मानव यांत काहीच फरक नाही.

ती सर्वांचा भार वाहण्यास समर्थ आहे. सृष्टीचे अलिखित नियम जाणून त्यानुसार वागले तर दुसऱ्याचा भार उचलायची गरज राहणार नाही; खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होईल. मात्र उद्दाम उर्मट माणूस समाजातील आपल्या सत्तेच्या जोरावर हे विसरतो.

इथून पुढची माझी यात्रा विजापूर, ऐहोळी, पडत्कल (इंग्रजी अपभ्रंश - Pattadakal), बदामी - लेणी व गांव; नंतर बागलकोट - बेळगांव मार्गें माझ्या घरी कोंकणात. मायला माझा अवतार पाहून रडूं कोसळले. दहा दिवसांत माझे दहा किलो वजन घातले होते.

मग आठवडाभर घरी असताना रोज सकाळी सड्यावर लक्या धनगराच्या वाड्यावर जायचे, अनशापोटी शेळीचे धारोष्ण दुध ग्लास भरून प्यायचे हा माझा रोजचा क्रम. आठवड्याभरात माझ्या गालांवर गुलाबी आली.

आयुष्यभर केलेले भटकणे केवळ यात्रा होत्या, प्रवास (tours) नव्हते, की कधी प्रवासवर्णने लिहिली नाहीत. उद्धेश केवळ अध्ययन. वर लिहिलेले प्रवासवर्णन नव्हे. मी काय शिकलो त्याची केवळ नोंद आहे.

टीप: घर आणि परिसर झोपडी, प्रासाद, शेतीवाडी, उपवन, तलाव, विहीर, इ. सर्वांचा वास्तूमध्ये समावेश होतो.
~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.| Page copy protected against web site content infringement by Copyscape

5 comments:

 1. पाणी असलेल्या ठिकाणी वस्ती होते, कालांतराने वाढणा-या लोकसंख्येला पाणी कमी पडते -- हा अनुभव काही नवा नाही, जुन्या काळीही हे घडत होतेच. इतिहास अशा अनेक घटना सांगतो. बदलणारा निसर्ग हे पण एक कारण असते त्यामागे. बदलले इतकेच की पाण्याबद्दल जो 'पूज्य' भाव होता पूर्वी तो मागे पडून पाणी ही आता एक commodity झाली आहे.

  तुमचे स्केच १९७० चे आहे तसेच वर्णन पण त्याच काळातले आहे की वर्णन अलिकडचे आहे?

  ReplyDelete
 2. आपलें म्हणणें वस्तुस्थितीला धरून आहे. एक वचन वाचण्यांत आलें : Wherever civilization stepped it left desert behind.
  मी एकदाच सोलापूरला गेलो. पुन्हा जाणे झाले नाही. तेव्हा जें पाहिले अनुभवले जाणवले ते आता लिहिले. सहाजिकच त्यांत मागचें व पुढचें पण आलें.
  कधीतरी सवडीने माझे इंग्रजी ब्लॉग जरूर पाहावे. तेथे बरंच काहीं बघायला मिळेल.

  ReplyDelete
 3. 'साक्षी आकाशाचे पुराण' ही कविता या प्रवासांत लिहिली होती. नोवेंबर ११, २०१० रोजी या ब्लॉगवर प्रसिद्ध केली. या प्रवासांत अनेक फोटो काढले तसेंच रेखा चित्रे पण.

  ReplyDelete
 4. पाहते आता ती. तुमची ही माहिती पण मी ब-याच उशीरा पाहते आहे!

  ReplyDelete
 5. धन्यवाद! Education, Biodivrsity, Amrtya Sen, Lowest Common Multiple इत्यादि टॅग वर जरुर नजर टाका.

  ReplyDelete