February 10, 2012

बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला (छायाचित्रांसह)

बांबू भारतात दुर्लक्षित का व कसा राहिला (छायाचित्रांसह)
रेमीजीयस डिसोजा
1. Miniature Bamboo, India

फॉरेस्ट रिसर्च इंस्टिट्युट देहरादून यांच्या उपवनात बांबूच्या सुमारे १०० जाती आहेत.
('पहिली बांबू परिषद', नारायणगाव, जिल्हा पुणे येथे २२-२३ एप्रिल १९९५ रोजी संपन्न झाली. त्यावेळी लेखकाने २३ -०४ -१९९५ रोजी या परिषदेत दिलेल्या भाषणाची ही संपादित प्रत. त्यावेळी त्याने भिल्ल जमातीच्या बांबूच्या पारंपरिक घरांच्या स्लाईड दाखवल्या.)
2. Entrance to a Bhill house in Satpura Ranges
 भिल्लांची घरे व वापरातल्या अनेक वस्तू आणि अवजारे बांबूची असतात.
शहरात सर्वास बांबू वा वेळू परिचित आहे. बगिच्यात शोभेचे झाड, इमारतीच्या बांधकामासाठी बांधलेली परांची, पतंगाला लावलेल्या काड्या, हेलकर्‌याची टोपली, किंवा धान्य पाकडायचे सूप अशी अनेक उदाहरणे आहेत.

एका पाश्चिमात्य लेखकाने बांबूचे १००० उपयोग एका पुस्तकात संकलित केले आहेत. पण कळत-नकळत कागदाच्या रुपाने बांबूशी आपला सतत संबंध येतो.
3. Shiva head craved in bamboo root (NE India)
नैॠत्य राज्यांतील लोकांनी कळकाच्या मुळात कोरलेले शिवाचे शिल्प
4. Manicured Bamboo at corporate house, Mumbai
 औद्योगिक क्रांतीने डबाबंद दुध, अन्न, पेय बनवली तसेच डबाबंद (कुंडीतील खच्ची केलेला) बांबू लोकप्रिय केला.
5. Bamboo is means for survival of Squatters in Mumbai

बांबू केवळ संगीताचे वाद्यच नाही, तर विस्थापितांच्या जगण्याचे साधनपण आहे.

आतापर्यत या परिषदेचा भर मुख्यत्वे 'बांबूचे वनस्पतीशास्त्र व शेती आणि अर्थशास्त्र व व्यापार' यावर जास्त राहिला. त्याच्या उपयोगांकडे मात्र आपण फारसे लक्ष दिलेले नाही. त्याचे उपयोग आपण गृहित धरलेले.

घर-निवारा जरी मूलभूत गरज समजली जाते. तरीही घरबांधणीतसुद्धा बांबूचा उपयोग आपण व्यवसायिक व नागरिक गृहित धरतो.
 
कागदाचा तुटवडा आपणास माहित होतो. पण घरांच्या तुटवड्याची कागदावरील व प्रत्यक्ष आकडेवारी, आणि हा तुटवडा भरून काढण्यासाठी केलेली कृति यांचा ताळमेळ कधीच जमला नाही.

काही संस्था / व्यक्ति यांच्या उपक्रमाने बांबूच्या उपयोगी वा शोभेच्या वस्तू नक्कीच तयार केल्या. पण त्या वस्तुतः नागरी जनतेला विषेशतः पांढरपेशा वर्गाला आकर्षित करण्यासाठी आहेत.

पण आज कुणालाही उपयुक्त होतील अशा वस्तूंचे संशोधन केले जात नाही. यात काही गहन सिद्धांत गुंतलेला नाही. साधा सरळ व्यवहार आहे : ज्यांच्यापाशी हुन्नर व व्यासंग आहेत ते जनतेसाठी आपल्या गरजेच्या वस्तू तयार करतात.

6. The Displaced survive on Bamboo in Mumbai

सृष्टीच्या मुक्त विश्वविद्यापीठात शिकलेल्या हुन्नरी कोट्यवधी ग्रामिण-वनवासी जनतेला हजारो वर्षें आधारभूत झाल्या - आजही होताहेत.
7- The Displaced in Mumbai are Self-reliant
 बांबू विस्थापितांचा अन्नदाता
हजारो वर्षांपासून आपल्या देशात बहुसंख्य लोक वेळूचा उपयोग अन्न, घर, घरकाम व व्यवसाय यांसाठी करीत आले.
मग आजच्या पांढरपेशा वर्गात बांबू दुर्लक्षित का राहिला?
आणि आता त्याकडे लक्ष का गेले?
या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
एक "ते" आणि दुसरी बाजू "आम्ही"!
एक ते जे वापरतात वेळू निवर्‌यासाठी घर, घरकाम, निर्वाह.
दुसरी बाजू "आम्ही" जे वापरतो बांबू "कागदासाठी".
या आहेत परस्परविरोधी दोन बाजू.
एका बाजूला आहे "छापा" शासन करणार्‌याचा.
दुसर्‌या बाजूला "काटा" सातपुडा, विंध्याद्री, अरवली, सह्याद्री, निलगिरी, हिमालय आणि यांचा परिसर-प्रदेश ज्याची आर्थिक-औद्योगिक प्रगतिच्या प्रत्येक पावलागणिक फुगवट्याच्या बाजारात सतत उतरते पत - किंमत!
जर "त्याना" बांबूची लागवड व उत्पादनास उद्युक्त करायचे असेल तर बहुसंख्याकांच्या अनेकविध गरजा व उपयोगासाठी त्याना सवलती मिळायला तर हव्यातच. 

त्याबरोबरच बांबूचा समाजाच्या सर्व स्तरांवर सतत अभ्यास, रियाज, व्यासंग करणे गरजेचे आहे.

माड आपल्याला कल्पवृक्ष आहे.
तर बांबू जीवन-संगीत आहे. त्याचा आमच्या संस्कृतीशी विलायती संस्कृतीशी नव्हे अन्योन्य संबंध आहे. जन्माला आलेल्या मुलाची नाळ कापणे आणि त्याचे पाळणे यापासून अंतयात्रेची तिरडी, आणि दरम्यानच्या काळात बांसरीचे सूर, अशा अनेक मिती-परिमाणानी बांबू आपली संस्कृती संपन्न करतो.

चीन, जपान व इतर आशियाई देशात तर बांबू हा चित्र, काव्य, संगीत, उपवन इत्यदि माध्यमांत अभिव्यक्तिचे स्फूर्तिस्थान आजही – आजच्या व्यापारी युगात – टिकून आहे. चीनमध्ये तर 'कागद' प्रथम तयार केला.

आम्ही आधुनिक वास्तूविद व स्थापत्यविशारद, पण माती व बांबू या दोन महत्वाच्या इमारती सामानाची आम्हास पुरेशी ओळख नाही.

भारतात ही दोन साधने घर-बांधणीसाठी सार्वत्रिक वापरात आहेत. पण उच्चभ्रू भारतीय त्याना अपारंपरिक - non-conventional - समजतात. आणि पोलाद सिमेंट ऍल्युमिनियम काच याना आम्ही रूढ - conventional - म्हणतो. ही कल्पना अर्थातच विलायतेहून आयात केलेल्या बहुल-शिक्षणाच्या रुढीबरोबरच आली.
 

मात्र गेल्या २०० वर्षांत भारतातली बहुसंख्य जनता या आयात केलेल्या शिक्षणापासून वंचित राहिली. की याला 'वाचली बचावली' म्हणायचे? ज्या शिक्षणात "जळ, जमीन, जीव, वने, वानसे, वनचर, वेळू" नाहित, ते काय कामाचे?

बांबू आणि मातीसुद्धा दुर्लक्षित राहिली कारण ते "त्यांचे" आहेत. कारण काय तर बांबू विलायतेत होत नाही. तिथले संशोधक आता बांबूचा अभ्यास करू लागलेत, म्हणून आपणही करायचा. नाहीतर "आम्ही" मागासलेले राहू!

महाराष्टात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या अभ्यासक्रमात आता बांबूचा समावेश करण्यात आला आहे. हे चांगलेच झाले. पण हे पाठ केवळ शाब्दिक कसरत राहू नयेत. हे पाठ वर्गाच्या चार भिंतीबाहेर व्हायला हवेत.
 

त्याहूनही अधिक महत्वाचे : हे पाठ वास्तूविद्या व स्थापत्याच्या महाविद्यालयांत सुरू करायला हवेत.
 

एका बाजूला देशात घर निवारा यांचा तुटवडा आहे. (केवळ मुंबईतच ६० लाखांवर लोक झोपडपट्टीत व रस्त्यावर / उघड्यावर राहतात.); आणि दुसर्‌या बाजूला व्यवसायिकांचे शिक्षण लोकाभिमुख नसावे, हे मात्र तर्कसंगतीला धरून नाही. याच्यामागे काही सारासार विवेक असलाच तर तो तुटपुंजा, लंगडा आहे.
 

यासाठी या परिषदेसमोर मी दोन ठराव मांडतो :
(१)
बांबू नियंत्रित वितरणाखाली आणला जावा. वने, ग्रामीण व शहरातील लोकांस, आणि बांबूकाम करणार्‌या कुटुंबांना नियंत्रित व स्वस्त भावांत उपलब्ध व्हावा.
(२)
उच्च शिक्षणात विशेषतः वास्तू व स्थापत्य आणि यासंबंधित इतर अभ्यासक्रमांत बांबू व माती यांचा समावेश घरबांधणीचे साहित्य म्हणून करण्यात यावा.

* * *
तारिख- २३-०४-१९९५
टीप : १. लेखकाने सुचवलेले ठराव या परिषदेने अर्थातच स्वीकारले नाहीत हे सांगायला नकोच. असे ठराव सरकारपण स्वीकारणार नाही.
२. हा लेख संपादित करीत असताना प्रसिद्ध झालेली बातमी - UK student designs smartphone made from bamboo - वाचनीय आहे.

~ ~ ~ ~ ~
© Remigius de Souza. All rights reserved.

3 comments:

  1. तुम्ही कधी बांबूची फुलं पाहिली आहेत कां?

    ReplyDelete
    Replies
    1. सावितादी, बांबूच्या फुलांवर नवीन पोस्ट लिहिलेय. अवश्य वाचा.

      Delete
  2. मुंबईत बांबू कुठे पाहायला मिळतो? मग फुलं कशी दिसणार? लिहायला पुष्कळ आहे.
    आपण भेट दिली; आनंद आहे. :-)

    ReplyDelete